श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ७३ वा - अन्वयार्थ

जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्थाला परतणे -

लीलया युधि निर्जिताः - लीलेने युद्धात जिंकलेले मलिः मलवाससः - मळकट शरीरे झालेले, मळकट आहेत वस्त्रे ज्यांची असे गिरिद्रोण्यां (निरुद्धाः) - पर्वताच्या खोर्‍यांत अटकावून ठेविलेले ते द्वे अयुते अष्टौ शतानि (राजानः) - ते दोन हजार आठशे राजे निर्गताः - बाहेर आले. ॥१॥

क्षुत्क्षामाः - भुकेने क्षीण झालेले शुष्कवदनाः - सुकून गेली आहेत तोंडे ज्यांची असे संरोधपरिकर्शिताः - अटकावून ठेविल्यामुळे कृश झालेले ते - ते राजे पीतकौशेयवाससं घनश्यामं ददृशुः - पिवळे रेशमी वस्त्र धारण केलेल्या व मेघांप्रमाणे कृष्णवर्णाच्या श्रीकृष्णाला पहाते झाले. ॥२॥

श्रीवत्साङ्‌कं चतुर्बाहुं - श्रीवत्सलांछन धारण करणार्‍या व चार भुजा असलेल्या पद्मगर्भारुणेक्षणं - कमळांतील गाभ्याप्रमाणे आरक्त नेत्रांच्या चारुप्रसन्नवदनं - सुंदर व प्रसन्न मुखाच्या स्फुरन्मकरकुण्डलं - चकाकत आहेत मकराकार कुंडले ज्याची अशा पद्महस्तं - हातात कमळे धरणार्‍या गदाशङ्खरथाङ्‌गैः उपलक्षितम् - गदा, शंख, व चक्र यांनी युक्त अशा किरीटहारकेयूरकटिसूत्राङ्‌गदाचितं - मुकुट, हार, बाहूभूषणे, करगोटा व पोची यांनी भूषविलेल्या भ्राजद्वरमणिग्रीवम् - शोभत आहे उत्तम मणी कंठात ज्याच्या अशा वनमालया निवीतं - वनमाळेने युक्त अशा श्रीकृष्णाला चक्षुर्भ्यां पिबन्तः इव - नेत्रांनी पीतच आहेत की काय असे जिह्वया लिहन्तः इव - जिभेने चाटीतच आहेत की काय असे ॥३-५॥

नासाभ्यां जिघ्रन्तः इव - नाकपुडयांनी हुंगीतच आहेत की काय असे बाहुभिः रम्भन्तः इव - बाहूंनी आलिंगन देत आहेत की काय असे हतपाप्मानः (ते) - पापरहित झालेले ते राजे हरेः पादयोः मूर्धभिः प्रणेमुः - श्रीकृष्णाच्या पायावर मस्तकांनी नमस्कार करिते झाले. ॥६॥

कृष्णसंदर्शनाह्‌लादध्वस्तसंरोधनक्लमाः - श्रीकृष्णाच्या दर्शनामुळे उत्पन्न झालेल्या आनंदाने नष्ट झाले आहेत बंदिवासाचे क्लेश ज्यांचे असे प्राञ्जलयः नृपाः - हात जोडलेले राजे गीर्भिः हृषीकेशं प्रशशंसुः - शब्दांनी श्रीकृष्णाची स्तुति करिते झाले. ॥७॥

देवदेवेश प्रपन्नार्तिहर अव्यय - देवांच्या देवांचा अधिपति व शरणागतांची पीडा दूर करणार्‍या अविनाशी अशा हे श्रीकृष्णा ते नमः (अस्तु) - तुला नमस्कार असो कृष्ण - हे कृष्णा घोरसंसृतेः निर्विण्णान् - भयंकर संसारापासून खेद पावलेल्या प्रपन्नान् नः पाहि - शरण आलेल्या आमचे रक्षण कर. ॥८॥

मधुसूदन विभो - मधु दैत्याला मारणार्‍या हे कृष्णा नाथ - हे स्वामिन् एनं मागधं न अन्वसूयामः - आम्ही ह्या जरासंधाला मुळीच दोष देत नाही यत् - कारण राज्ञां राज्यच्युतिः - राजांचे राज्यापासून भ्रष्ट होणे (अयम् एव) भवतः अनुग्रहः - हाच तुझा आमच्यावर मोठा अनुग्रह होय. ॥९॥

राज्यैश्वर्यमदोन्नद्धः त्वन्मायामोहितः नृपः - राज्यैश्वर्याच्या मदाने उन्मत्त झालेला व तुझ्या मायेने मोहित झालेला राजा श्रेयः न विन्दते - कल्याणाला मिळवीत नाही अनित्याः संपदः अचलाः मन्यते - अस्थिर अशा संपत्तींना स्थिर मानितो. ॥१०॥

यथा बालाः - ज्याप्रमाणे बालक मृगतृष्णां उदकाशयं मन्यन्ते - मृगजळाला तलाव असे मानितात एवं - याप्रमाणे अयुक्ताः - अविचारी पुरुष वैकारिकीं मायां वस्तु चक्षते - सृष्टयादि उत्पन्न करणार्‍या मायेला सद्वस्तु असे समजतात. ॥११॥

प्रभो - हे श्रीकृष्णा पुरा - पूर्वी वयं - आम्ही श्रीमदनष्टदृष्टयः - ऐश्वर्यमदाने ज्यांची दृष्टि नष्ट झाली आहे असे अस्याः जिगीषयाः इतरेतरस्पृधः - ह्या पृथ्वीला जिंकण्याच्या इच्छेने एकमेकांशी स्पर्धा करणारे स्वाः प्रजाः घ्नन्तः - आपल्या प्रजांचा नाश करणारे अतिनिर्घृणाः - अत्यंत निर्दय पुरः मृत्यूं त्वां अविगणय्य - पुढे उभ्या असलेल्या मृत्यूस्वरूपी तुला न जुमानून दुर्मदाः - मदोन्मत्त झालो होतो. ॥१२॥

आद्य कृष्ण - हे आदिपुरुषा श्रीकृष्णा (तव) तन्वा गभीररंहसा दुरन्तवीर्येण कालेन - तुझेच स्वरूप अशा अत्यंत वेगवान व ज्याच्या पराक्रमाचा अंत जाणणे कठीण आहे अशा काळाकडून श्रियः विचालिताः ते एव (वयम्) - ऐश्वर्यापासून भ्रष्ट केले गेलेले तेच आम्ही राजे भवतः अनुकम्पया - तुझ्या कृपेने विनष्टदर्पाः (सन्तः) - गर्वरहित होत्साते ते चरणौ स्मराम - तुझ्या चरणकमलाचे आम्ही स्मरण करितो. ॥१३॥

विभो - हे श्रीकृष्णा अथो - आता शश्वत्पतता रुजां भुवा देहेन - वारंवार पडणार्‍या, रोगांचे माहेरघर अशा देहाने उपासितव्यं - सेविल्या जाणार्‍या मृगतृष्णिरूपितं राज्यं - मृगजळाप्रमाणे मिथ्या असणार्‍या राज्याला (तथा) च - त्याचप्रमाणे कर्णरोचनं प्रेत्य (उपासितव्यं) क्रियाफलं - आणि कानाला आवडणार्‍या व मरणानंतर प्राप्त होणार्‍या कर्माच्या स्वर्गादि फळाला न स्पृहयामहे - आम्ही इच्छित नाही. ॥१४॥

इह - ह्या लोकी संसरतां नः अपि - संसारात रहाणार्‍याहि आमची यथा - जेणेकरून येन - ज्यामुळे ते चरणाब्जयोः स्मृतिः न विरमेत् - तुझ्या चरणकमलांची आठवण नाहीशी होणार नाही तं उपायं समादिश - त्या उपायाचा उपदेश कर. ॥१५॥

हरये परमात्मने - सर्वांची दुःखे हरण करणार्‍या व श्रेष्ठ अशा आत्मस्वरुपाने रहाणार्‍या प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय - शरणागतांची दुःखे दूर करणार्‍या व इंद्रियांचा स्वामी अशा वासुदेवाय कृष्णाय नमः नमः - वसुदेवपुत्र श्रीकृष्णाला वारंवार नमस्कार असो ॥१६॥

तात - हे परीक्षित राजा मुक्तबन्धनैः राजभिः संस्तूयमानः - कारागृहातून मुक्त झालेल्या राजांकडून स्तविला जाणारा शरण्यः करुणः भगवान् - शरणागतांचे रक्षण करणारा दयाळु श्रीकृष्ण श्‍लक्ष्णया गिरा तान् आह - मधुर वाणीने त्या राजांना म्हणाला ॥१७॥

भूपाः - राजेहो यथा (युष्माभिः) आशंसितं (तथा) - जशी तुम्ही इच्छा केली आहे त्याप्रमाणे अद्यप्रभृति - आजपासून अखिलेश्वरे आत्मनि मयि - त्रैलोक्यधीश व आत्मरूपी अशा माझ्या ठिकाणी वः भक्तिः सुदृढा बाढम् जायते - तुमची भक्ति निश्चयाने दृढ होईल ॥१८॥

भूपाः - राजेहो दिष्ट्या (युष्माभिः) व्यवसितं - सुदैवाने तुम्ही हा निश्चय केला भवन्तः ऋतभाषिणः (सन्ति) - तुम्ही खरे बोलणारे आहा श्रियैश्वर्यमदोन्नाहं नृणां उन्मादकं पश्ये - संपत्तीच्या ऐश्वर्यमदामुळे प्राप्त झालेले स्वैरपण मनुष्यांना मद उत्पन्न करणारे आहे हे मी पाहतो ॥१९॥

हैहयः नहुषः वेनः रावणः नरकः - सहस्रार्जुन, नहुष, वेनराजा, रावण व नरकासुर अपरे देवदैत्यनरेश्वराः - दुसरेहि देव, दैत्य व राजे श्रीमदात् स्थानात् भ्रंशिताः - ऐश्वर्यमदामुळे स्थानापासून भ्रष्ट झाले ॥२०॥

भवन्तः - तुम्ही देहादि उत्पाद्यं अन्तवत् - देह आदिकरून उत्पन्न झालेले पदार्थ नाशिवंत आहेत एतत् विज्ञाय - असे जाणून अध्वरैः मां यजन्तः - यज्ञांनी माझे पूजन करीत युक्ताः - दक्ष असे धर्मेण प्रजाः रक्षथ - धर्माने प्रजांचे रक्षण करा ॥२१॥

प्रजातन्तून् सन्तन्वन्तः - प्रजारूपी अंकुराला वाढविणारे सुखं दुःखं भवाभवौ च - सुख, दुःख व जन्म-मरण प्राप्तं प्राप्तं सेवन्तः - जे जे प्राप्त होईल ते सेविणारे मच्चित्ताः विचरिष्यथ - माझ्या ठिकाणी अन्तःकरण वृत्ति स्थिर करून वागा ॥२२॥

देहादौ उदासीनाः - देहादिकांच्या ठिकाणी आसक्ति न ठेवणारे असे आत्मारामाः धृतव्रताः च - आत्म्याच्या ठिकाणी रममाण होणारे व व्रतादिकांचे अनुष्ठान करणारे मनः मयि सम्यक् आवेश्य - मन माझ्या ठिकाणी चांगल्या रितीने ठेऊन अन्ते ब्रह्म मां यास्यथ - शेवटी ब्रह्मरुपी माझ्या जवळ याल ॥२३॥

भुवनेश्वरः भगवान् कृष्णः - त्रैलोक्याधिपति भगवान श्रीकृष्ण इति नृपान् आदिश्य - याप्रमाणे राजांना उपदेश करून तेषां मज्जनकर्मणि - त्यांच्या स्नानादि कृत्यांमध्ये स्त्रियः पुरुषान् (च) न्ययुङ्क्त - दासी व सेवक यांची योजना करिता झाला ॥२४॥

भारत - हे परीक्षित राजा सहदेवेन - सहदेवाकडून नरदेवोचितैः वस्त्रैः भूषणैः स्नग्विलेपनैः - राजाला योग्य अशा वस्त्रांनी, अलंकारांनी, माळांनी व उट्यांनी (तेषां) सपर्यां कारयामास - त्या राजांची पूजा करविता झाला ॥२५॥

सुस्नातान् समलंकृतान् (तान्) - स्नान केलेल्या व अलंकारांनी भूषविलेल्या त्या राजांना वरान्नेन भोजयित्वा - उत्तम अन्नांचे भोजन देववून नृपोचितैः ताम्बूलाद्यैः विविधैः भोगैः च युक्तान् कृत्वा - राजांना योग्य अशा तांबूलादि अनेक भोगांनी युक्त असे करून ॥२६॥

मुकुन्देन - श्रीकृष्णाने क्लेशात् मोचिताः - दुःखमुक्त केलेले मृष्टकुण्डलाः ते राजानः - तेजस्वी कुंडले धारण करणारे ते राजे पूजिताः - पूजिले असता यथा प्रावृडन्ते ग्रहाः - जसे पावसाळ्याच्या शेवटी ग्रह (तथा) विरेजुः - तसे शोभले ॥२७॥

मणिकाञ्चनभूषितान् सदश्वान् रथान् आरोप्य - मण्यांनी व सुवर्णाने भूषविलेल्या व चांगले घोडे जुंपलेल्या रथांत बसवून सूनृतैः वाक्यैः प्रीणय्य - मधुर भाषणांनी आनंदित करून (तान्) स्वदेशान् प्रत्ययापयत् - त्यांना आपापल्या देशांत पाठविता झाला ॥२८॥

सुमहात्मना कृष्णेन - थोर मनाच्या श्रीकृष्णाने एवं कृच्छ्रात् मोचिताः ते - याप्रमाणे दुःखापासून मुक्त केलेले ते राजे तम् एव ध्यायन्तः - त्या श्रीकृष्णाचेच चिंतन करीत जगत्पतेः कृतानि च (स्मरन्तः) - व त्या जगन्नाथाच्या पराक्रमाचे स्मरण करीत ययुः - गेले ॥२९॥

ते - ते राजे महापुरुषचेष्टितं प्रकृतिभ्यः जगदुः - परमेश्वराचे कृत्य प्रजांना सांगते झाले च - आणि भगवान् यथा अन्वशासत् - भगवान जसा उपदेश करिता झाला तथा अतन्द्रिताः चक्रुः - त्याप्रमाणे सावधपणे करते झाले ॥३०॥

सहदेवेन पूजितः केशवः - सहदेवाने पूजिलेला श्रीकृष्ण भीमसेनेन जरासंधं घातयित्वा - भीमाकडून जरासंधाला मारवून पार्थाभ्यां संयुतः प्रायात् - भीमार्जुनांसह जाण्यास निघाला ॥३१॥

स्वसुहृदः हर्षयन्तः - आपल्या स्नेह्यांना आनंद देणारे दुर्हृदां च असुखावहाः - आणि दुष्ट शत्रूंना दुःख देणारे जितारयः ते - ज्यांनी शत्रूला जिंकिले आहे असे श्रीकृष्ण, भीम व अर्जुन खाण्डवप्रस्थं गत्वा - इंद्रप्रस्थाला जाऊन शङ्खान् दध्मुः - शंख वाजविते झाले ॥३२॥

तत् श्रुत्वा - तो शंखनाद श्रवण करून प्रीतमनसः - प्रसन्न झाले आहे चित्त ज्यांचे असे इन्द्रप्रस्थनिवासिनः - इंद्रप्रस्थात रहाणारे लोक मागधं शान्तं मेनिरे - जरासंध मृत झाला असे मानिते झाले राजा च - आणि राजा युधिष्ठिर आप्तमनोरथः (बभूव) - प्राप्त झाला आहे मनोरथ ज्याला असा झाला ॥३३॥

अथ - नंतर भीमार्जुनजनार्दनाः - भीम, अर्जुन, श्रीकृष्ण हे राजानम् अभिवन्द्य - धर्मराजाला वंदन करून यत् आत्मना अनुष्ठितं - जे कार्य आपल्याकडून केले गेले (तत्) सर्वं आश्रावयांचक्रुः - ते सर्व सविस्तर सांगते झाले ॥३४॥

धर्मराजः - धर्मराज केशवेन अनुकंपितं तत् निशम्य - श्रीकृष्णाने कृपाळूपणे घडवून आणिलेले ते कृत्य श्रवण करून प्रेम्णा आनन्दाश्रुकलां मुञ्चन् - प्रेमाने आनंदाश्रूचे बिंदु सोडीत किंचन न उवाच - काहीहि बोलला नाही ॥३५॥

अध्याय त्र्याहत्तरावा समाप्त

GO TOP