|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ७२ वा - अन्वयार्थ
पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार - एकदा - एके दिवशी सभामध्य आस्थितः - सभेत बसलेला मुनिभिः ब्राह्मणैः क्षत्रियैः वैश्यैः भ्रातृभिः च वृतः - आणि ऋषि, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व भीमादि भाऊ यांनी वेष्टिलेला युधिष्ठिरः तु - धर्मराजा तर आचार्यैः कुलवृद्धैः ज्ञातिसम्बन्धिबान्धवैः च (वृतः) - आचार्य, कुळातील वडील मंडळी, जातभाई, इष्टमित्र व बांधव यांनी वेष्टिलेला एतेषां शृण्वतां एव - ही सर्व मंडळी ऐकत असताच (कृष्णम्) आभाष्य इदं उवाच ह - श्रीकृष्णाला हाक मारून असे म्हणाला ॥१-२॥ प्रभो गोविंद - हे समर्थ गोविंदा क्रतुराजेन राजसूयेन भवतः पावनीः विभूतीः यक्ष्ये - सर्व यज्ञांचा राजा अशा राजसूय यज्ञाच्या द्वारे तुझ्या पवित्र इंद्रादि विभूतीचे मी पूजन करणार आहे तत् नः (कार्यं) संपादय - ते आमचे कार्य सिद्धीला ने ॥३॥ कमलनाभ ईश - ज्याच्या नाभिस्थानावर कमल आहे अशा हे श्रीकृष्णा ये शुचयः (नराः) - जे पुण्य़वान पुरुष अभद्रनशने त्वत्पादुके - अशुभांचा नाश करणार्या तुझ्या पायांची अविरतं परि चरन्ति - एकसारखी सेवा करितात ध्यायन्ति गृणन्ति (च) - ध्यान करितात व स्तुति करितात ते भवापवर्गं विन्दन्ति - ते संसारबंधनातून मुक्ति मिळवितात. यदि आशासते (तर्हि) ते आशिषः (विंदन्ति) - जर ते काही इच्छा करतील तर त्या इष्ट वस्तु ते मिळवितात अन्ये न (विन्दंति) - दुसरे कोणी या मिळवीत नाहीत. ॥४॥ देवदेव प्रभो - हे देवांच्या देवा श्रीकृष्णा तत् - म्हणून एषः लोकः - हा जनसमुदाय इह - ह्या ठिकाणी भवतः चरणारविन्दसेवानुभावं - तुझ्या पदकमलाच्या सेवेचे सामर्थ्य पश्यतु - पाहो ये त्वां भजन्ति - जे तुला भजतात उत वा (ये) न भजन्ति - किंवा जे भजत नाहीत अशा उभयेषां कुरुसृञ्जयानां - दोन्ही प्रकारच्या कौरवांना व सृंजयांना (तेषां) निष्ठां प्रदर्शय - त्यांची स्थिती दाखव. ॥५॥ ब्रह्मणः सर्वात्मनः समदृशः स्वसुखानुभूतेः तव - ब्रह्मरूपी, सर्वत्र आत्मरूपाने रहाणार्या समदृष्टि व आत्मसुखाचा अनुभव घेणार्या तुला स्वपरभेदमतिः न स्यात् - आपपर भाव मुळीच नाही संसेवतां सुरतरोः इव ते प्रसादः - सेवा करणार्यांना कल्पवृक्षाप्रमाणे असणार्या तुझी कृपा सेवानुरूपं उदयः (भवति) - सेवेला उचित असा उत्कर्ष होणे हीच होय अत्र विपर्ययः न - ह्यात कधीही उलट होत नाही. ॥६॥ शत्रुकर्शन राजन् - हे शत्रुनाशका धर्मराजा भवता सम्यक् व्यवसितं - तू उत्तम निश्चय केला आहेस येन ते कल्याणी कीर्तिः - ज्यामुळे तुझी कल्याणकारक कीर्ति लोकान् अनुभविष्यति - सर्व लोकांचा अनुभव घेईल. ॥७॥ प्रभो - हे धर्मराजा अयं क्रतुराट् - हा यज्ञांचा राजा असा राजसूय यज्ञ ऋषीणां पितृदेवानां - ऋषि, पितर, व देव ह्यांना सुहृदाम् नः अपि - मित्र अशा आम्हालाही सर्वेषाम् अपि भूतानां - सर्वही प्राणिमात्रांना ईप्सितः - इष्ट आहे. ॥८॥ सर्वान् नृपतीन् विजित्य - सर्व राजांना जिंकून जगतीं च वशे कृत्वा - आणि जगाला आपल्या स्वाधीन करून सर्वसंभारान् संभृत्य - सर्व साहित्य गोळा करून महाक्रतुं आहरस्व - तू राजसूय यज्ञ कर. ॥९॥ राजन् - हे धर्मराजा एते ते भ्रातरः - हे तुझे भाऊ लोकपालांशसंभवाः (सन्ति) - इंद्रादि लोकपालांच्या अंशापासून उत्पन्न झाले आहेत यः अकृतात्मभिः दुर्जेयः - जो इंद्रियनिग्रह न करणार्यांना जिंकता न येणारा असा आहे (सः) अहं - तो मी आत्मवता ते जितः अस्मि - जितेंद्रिय अशा तुझ्याकडून जिंकला गेलो आहे. ॥१०॥ कश्चित् देवः अपि - कोणता देवही लोके - लोकांमध्ये मत्परं - माझी उपासना करणार्या भक्ताचा तेजसा यशसा श्रिया - तेजाने, कीर्तीने व ऐश्वर्याने वा विभूतिभिः - किंवा सैन्यादि सामग्रीने न अभिभवेत् - पराभव करू शकणार नाही उ पार्थिवः किम् - अरे, मग सामान्य राजाची कथा काय ? ॥११॥ फुल्लमुखाम्बुजः प्रतिः (सः) - प्रफुल्लित झाले आहे मुखकमळ ज्याचे असा प्रसन्न झालेला धर्मराज भगवद्गीतं निशम्य - श्रीकृष्णाचे भाषण ऐकून विष्णुतेजोपबृंहितान् भ्रातृन् - भगवंताच्या तेजाने वाढलेल्या भावांना दिग्विजये अयुङ्क्त - दिग्विजयाच्या कामी योजिता झाला. ॥१२॥ सृञ्जयैः सह सहदेवं दक्षिणस्याम् आदिशत् - सहदेवाला सृंजयासह दक्षिण दिशेकडे जाण्यास आज्ञा देता झाला प्रतीच्यां दिशि नकुलं - पश्चिम दिशेकडे नकुळाला उदीच्यां सव्यसाचिनं - उत्तर दिशेकडे अर्जुनाला प्राच्यां (च) मत्स्यैः केकयैः मद्रकैः सह वृकोदरं (आदिशत्) - व पूर्व दिशेकडे मत्स्य, केकय व मद्रदेश येथील राजांसह भीमाला जाण्याची आज्ञा देता झाला. ॥१३॥ नृप - हे परीक्षित राजा ते वीराः - ते पराक्रमी भीमादि भाऊ नृपान् विजित्य - राजांना जिंकून ओजसा - उत्साहशक्तीच्या योगाने यक्ष्यते अजातशत्रवे - यज्ञ करणार्या धर्मराजाकरिता दिग्भ्यः भूरि द्रविणं आजह्लुः - चारहि दिशांकडून पुष्कळ द्रव्य आणिते झाले. ॥१४॥ आद्यः हरिः - आदि पुरुष असा श्रीकृष्ण ध्यायतः नृपतेः - विचार करीत बसलेल्या धर्मराजाकडून जरासंधं अजितं श्रुत्वा - जरासंध जिंकिला गेला नाही असे ऐकून यं (उपायं) उद्धवः उवाच ह - जो उपाय उद्धवाने पूर्वी सुचविला होता तम् एव उपायम् आह - तोच उपाय सांगता झाला. ॥१५॥ तात - हे परीक्षित राजा भीमसेनः अर्जुनः कृष्णः (च) - भीम, अर्जुन व कृष्ण असे ब्रह्मलिङगधराः त्रयः - ब्राह्मणाचे रूप धारण करणारे तिघेजण यतः बृहद्रथसुतः (आसीत्) - बृहद्रथाचा पुत्र जरासंध जेथे रहात होता (तं) गिरिव्रजं जग्मुः - त्या पर्वतसमूहाने वेष्टिलेल्या स्थानाला गेले. ॥१६॥ ब्रह्मलिङगिनः ते राजन्याः - ब्राह्मणांचे रूप धारण करणारे ते क्षत्रिय आतिथ्यवेलायां गत्वा - अतिथीचे पूजन करण्याच्या प्रसंगी ब्रह्मण्यं गृहेषु गृहमेधिनं (जरासंधम्) - ब्राह्मणांचे हित करणार्या व घरामध्ये गृहस्थधर्माचे आचरण करणार्या जरासंधाजवळ समयाचेरन् - याचना करिते झाले. ॥१७॥ राजन् - हे राजा दूरं आगतान् - लांबून आलेले अर्थिनः अतिथीन् प्राप्तान् - याचनार्थ अतिथि म्हणून आलेले (नः) विद्धि - आम्हाला जाण यत् वयं कामयामहे तत् नः प्रयच्छ - जे आम्ही इच्छित आहोत ते आम्हाला दे ते भद्रं (अस्तु) - तुझे कल्याण असो. ॥१८॥ तितिक्षूणां किं दुर्मर्षं - सहनशीलांना असह्य काय आहे असाधुभिः अकार्यं किम् - दुष्टांना वाईट काय आहे वदान्यानां अदेयं किम् - दानशूरांना न देता येण्यासारखे काय आहे समदर्शिनां कः परः - समदृष्टि ठेवणार्यांना परकी कोण आहे ? ॥१९॥ यः स्वयंकल्पः (सन्) - जो स्वतः समर्थ असता अनित्येन शरीरेण - क्षणभंगुर अशा शरीराने सतां गेयं ध्रुवं यशः - सज्जनांना गाता येण्यासारखे चिरस्थायी यश न आचिनोति - साठवीत नाही सः वाच्यः - तो निंदेला पात्र होतो सः शोच्यः एव - तो कीव करण्यास योग्य होय. ॥२०॥ हि - खरोखर हरिश्चंद्रः रंतिदेवः उञ्छवृत्तिः शिबिः बलिः - हरिश्चंद्र, रंतिदेव, उञ्छवृत्तीने निर्वाह करणारा मुद्गल, शिबि, व बलि व्याधः कपोतः बहवः (अन्ये च) - व्याध, कपोत व तसेच दुसरे पुष्कळजण अध्रुवेण ध्रुवं गताः - क्षणभंगुर शरीराने चिरस्थायी मोक्षाला प्राप्त झाले ॥२१॥ तु - परंतु स्वरैः आकृतिभिः - स्वर, आकार यांवरून ज्याहतैः प्रकोष्ठैः अपि - धनुष्यरज्जूचे घट्टे पडलेल्या हातांवरून तान् दृष्टपूर्वान् राजन्यबंधून् विज्ञाय - त्यांना पूर्वी पाहिलेले क्षत्रिय असे ओळखून अचिंतयत् - विचार करिता झाला ॥२२॥ एते हि राजन्यबन्धवः - हे खरोखर क्षत्रिय ब्रह्मलिंगानि बिभ्रति - ब्राह्मणांची चिन्हे धारण करीत आहेत भिक्षितं (सत्) दुस्त्यजं आत्मानम् अपि - याचिलेले असता देण्यास कठीण असे शरीरसुद्धा तेभ्यः ददामि - मी त्यांना देईन. ॥२३॥ विप्रव्याजेन इंद्रस्य श्रियं जिहिर्षता विष्णुना - ब्राह्मणाच्या रूपाने इंद्राची संपत्ति इंद्रासाठी हरण करण्याची इच्छा करणार्या विष्णूने ऐश्वर्यात् भ्रंशितस्य अपि बलेः - ऐश्वर्यापासून भ्रष्ट केलेल्याहि बलिराजाची नु - खरोखर अकल्मषा कीर्तिः - निर्दोष कीर्ति दिक्षु वितता - दाही दिशांमध्ये पसरलेली श्रूयते - ऐकण्यात येते जानन् अपि (शुक्रेण) वार्यमाणः अपि दैत्यराट् - सर्व जाणणाराहि व शुक्राचार्याकडून निषेधिला जाणाराहि दैत्यांचा राजा बलि द्विजरूपिणे विष्णवे महीं प्रादात् - ब्राह्मणाचे रूप घेतलेल्या विष्णूला पृथ्वी देता झाला. ॥२४-२५॥ ब्राह्मणार्थाय - ब्राह्मणासाठी पतमानेन देहेन विपुलं यशः न ईहता जीवता क्षत्रबंधुना - नाशवंत देहाकडून पुष्कळ कीर्ति संपादण्याची इच्छा न करणार्या जिवंत क्षत्रियांचा कः नु अर्थः - कोणता बरे उपयोग आहे ? ॥२६॥ इति उदारमतिः (सः) - याप्रमाणे उदारबुद्धीचा तो जरासंध कृष्णार्जुन वृकोदरान् प्राह - श्रीकृष्ण, अर्जुन व भीम ह्यांना म्हणाला हे विप्राः - ब्राह्मण हो कामः व्रियतां - इच्छेप्रमाणे याचना करावी आत्मशिरः अपि वः ददामि - स्वतःचे मस्तकहि तुम्हाला देईन. ॥२७॥ वयं राजन्याः - आम्ही क्षत्रिय युद्धार्थिनः प्राप्ताः - युद्धभिक्षा मागण्यासाठी आलो आहो अन्नकांक्षिणः न - अन्नाची इच्छा करणारे नाही राजेन्द्र - जरासंधा यदि मन्यसे - जर तुला वाटत असेल तर द्वंद्वशः युद्धं नः देहि - द्वंद्वयुद्ध आम्हाला दे. ॥२८॥ असौ पार्थः वृकोदरः (अस्ति) - हा कुंतिपुत्र भीम होय अयं हि तस्य भ्राता अर्जुनः - हा खरोखर त्या भीमाचा भाऊ अर्जुन आहे अनयोः मातुलेयं मां ते रिपुं कृष्णं जानीहि - या दोघांचा मामेभाऊ असा मी तुझा शत्रु कृष्ण समज. ॥२९॥ एवं आवेदितः मागधः राजा - ह्याप्रमाणे सांगितलेला जरासंध राजा उच्चैः जहास स्म - मोठयाने हसला अमर्षितः च आह - आणि रागावलेला असा म्हणाला मंदाः - अहो मंदबुद्धीच्या पुरुषांनो तर्हि वः युद्धं ददामि - तर तुम्हाला मी द्वंद्वयुद्ध देतो. ॥३०॥ स्वपुरीं मथुरां त्यक्त्वा - आपली नगरी मथुरा सोडून (त्वं) समुद्रं शरणं गतः - तू समुद्राला शरण गेलास (तेन) विक्लवचेतसा भीरुणा त्वया - अशा त्या भ्रमिष्ट अंतःकरणाच्या भित्र्या तुझ्याबरोबर युधि न योत्स्ये - द्वंद्वयुद्धामध्ये मी युद्ध करणार नाही. ॥३१॥ अयं अर्जुनः तु - हा अर्जुन तर वयसा अतुल्यः - वयाने समान नाही असा न अतिसत्त्वः न समः - अत्यंत बलिष्ठ नाही व माझ्या समान नाही मे योद्धा न भवेत् - माझा प्रतिस्पर्धी होणे योग्य नाही भीमः मम तुल्यबलः - भीम हा माझ्याशी बलाने सारखा आहे. ॥३२॥ इति उक्त्वा - असे म्हणून भीमसेनाय महतीं गदां प्रादाय - भीमाला मोठी गदा देऊन (च) द्वितीयां (गदां) स्वयं आदाय - आणि दुसरी गदा स्वतः घेऊन पुरात् बहिः निर्जगाम - नगरातून बाहेर निघाला. ॥३३॥ ततः समे खले - नंतर सपाट युद्धभूमीवर संयुक्तौ - एकत्र भिडलेले रणदुर्मदौ वीरौ - युद्धामुळे उन्मत्त बनलेले ते दोघे वीर वज्रकल्पाभ्यां गदाभ्यां - वज्राप्रमाणे बळकट अशा गदांनी इतरेतरौ जघ्नतुः - एकमेकांवर प्रहार करिते झाले. ॥३४॥ सव्यं दक्षिणं च एव - उजव्या बाजूने व डाव्या बाजूने विचित्राणि मण्डलानि चरतोः (तयोः) युद्धम् - चित्रविचित्र मंडलाकार भ्रमण करणार्या त्या दोघांचे युद्ध रंगिणोः इव नटयोः - रंगभूमीवर फिरणार्या नटांच्या हालचालींप्रमाणे शुशुभे - शोभले. ॥३५॥ राजन् - हे परीक्षित राजा ततः - नंतर क्षिप्तयोः गदयोः - फेकलेल्या दोन गदांचा दन्तिनोः दन्तयोः इव - हत्तींच्या दातांच्या प्रमाणे वज्रनिष्पेषसन्निभः चटचटाशब्दः (जातः) - वज्राच्या आघातासारखा चटचट असा शब्द झाला. ॥३६॥ दीप्तमन्य्वोः द्विरदयोः इव संयुध्यतोः (तयोः) - प्रदीप्त झाला आहे राग ज्यांचा अशा हत्तीप्रमाणे लढणार्या त्या दोघांच्या भुजजवेन निपात्यमाने ते गदे - बाहूंच्या योगे जोराने फेकल्या जाणार्या त्या दोन गदा अन्योन्यतः - एकमेकांकडून अंसकटिपादकरोरुजत्रून् उपेत्य - खांदे, कंबर, हात, मांडया, सांधे यांवर पडून यथा अर्कशाखे - जशा रुईच्या फांद्या (तथा) चूर्णीबभूवतुः - तशा चूर्ण झाल्या. ॥३७॥ इत्थं तयोः गदयोः प्रहतयोः - याप्रमाणे त्या गदा एकमेकांवर फेकिल्या असता क्रुद्धौ नृवीरौ - रागावलेले असे ते दोघे पराक्रमी पुरुष अयःस्पर्शैः स्वमुष्ठिभिः - लोखंडाप्रमाणे मारा ज्यांचा अशा मुठींनी अपिष्टां - चूर्ण करिते झाले तलताडनोत्थः - ताडांच्या ताडनाने उत्पन्न झालेला प्रहरतोः तयोः शब्दः - प्रहार करणार्या त्या दोघांचा शब्द इभयोः इव - हत्तीप्रमाणे निर्घातवज्रपरुषः आसीत् - एकमेकांवर आदळलेल्या वज्रांप्रमाणे भयंकर असा होता. ॥३८॥ नृप - हे परीक्षित राजा एवं प्रहरतोः - याप्रमाणे प्रहार करणार्या समशिक्षाबलोजसोः - सारखी आहेत शिक्षण, शक्ति व सामर्थ्य ही ज्यांची अशा अक्षीणजीवयोः तयोः - क्षीण झाले नाही बळ ज्यांचे अशा त्या दोघांचे निर्विशेषं युद्धं अभूत् - सारख्या योग्यतेचे युद्ध झाले. ॥३९॥ महाराज - हे परीक्षित राजा तत्र - तेथे निशि सुहृद्वत् तिष्ठतोः - रात्री मित्रांप्रमाणे वागणार्या (दिवा) युध्यतोः तयोः - दिवसा युद्ध करणार्या त्या दोघांचे एवं सप्तविंशतिः दिनानि निरगन् - याप्रमाणे सत्तावीस दिवस निघून गेले. ॥४०॥ राजन् - हे परीक्षित राजा एकदा - एके दिवशी वृकोदरः मातुलेयं वै प्राह - भीम मामेभाऊ जो श्रीकृष्ण त्याला म्हणाला माधव - हे श्रीकृष्णा अहं जरासंधं युधि निर्जेतुं न शक्तः - मी जरासंधाला युद्धात जिंकण्यास समर्थ नाही. ॥४१॥ हरिः - श्रीकृष्ण शत्रोः जन्ममृती - शत्रु जो जरासंध त्याचे जन्म व मृत्यू ह्यांना जराकृतं च जीवितं विद्वान् - आणि जराराक्षसीकडून मिळालेल्या त्याचे जीवित जाणणारा असा स्वेन तेजसा पार्थं आप्याययन् - आपल्या तेजाने भीमाला पुष्ट करीत होत्साता अचिन्तयत् - विचार करू लागला. ॥४२॥ अमोघदर्शनः (सः) - निष्फळ नाही दर्शन ज्याचे असा तो श्रीकृष्ण अरिवधोपायं संचिन्त्य - शत्रूच्या वधाविषयीचा उपाय मनात योजून संज्ञया विटपं पाटयन् इव - खुणेने झाडाची फांदी जणू दुभागीत भीमस्य दर्शयामास - भीमाला सुचविता झाला. ॥४३॥ प्रहरतां वरः महासत्त्वः सः भीमः - योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ व मोठा बलाढय असा तो भीम तत् विज्ञाय - ती खूण जाणून पादयोः गृहीत्वा - पाय धरून भूतले शत्रुं पातयामास - भूमीवर शत्रु जो जरासंध त्याला पाडिता झाला. ॥४४॥ सः - तो भीम (स्वेन) पदा (शत्रोः) एकं पादं आक्रम्य - आपल्या पायाने शत्रूचा एक पाय दाबून धरून अन्यं दोर्भ्यां प्रगृह्य - दुसरा पाय दोन हातांनी धरून महागजः शाखाम् इव - जसा मोठा हत्ती, झाडाची फांदी फाडितो त्याप्रमाणे गुदतः पाटयामास - गुदापासून फाडीता झाला. ॥४५॥ प्रजाः - लोक एकपादोरुवृषणकटिपृष्ठस्तनांसके - एक पाय, एक मांडी, एक वृषण, एक कटिभाग, एक पृष्ठभाग, एक स्तन व एक खांदा असे एकएकच अवयव असलेले एकबाह्वक्षिभ्रूकर्णे शकले - एक दंड, एक डोळा, एक भुवई व एक कान असलेले, मधोमध चिरलेले शरीराचे दोन भाग ददृशुः - पहाते झाले. ॥४६॥ मगधेश्वरे निहते - जरासंध मारिला गेला असता महान् हाहाकारः आसीत् - मोठा हाहाकार झाला जयाच्युतौ - अर्जुन व श्रीकृष्ण भीमं परिरभ्य पूजयामासतुः - भीमाला आलिंगन देऊन प्रशंसिते झाले. ॥४७॥ अमेयात्मा प्रभुः - निरुपम सामर्थ्याचा व सर्वशक्तिमान भूतभावनः भगवान् - प्राण्यांचे रक्षण करणारा श्रीकृष्ण तत्तनयं सहदेवं - त्या जरासंधाचा पुत्र जो सहदेव त्याला मगधानां पतिं अभ्यषिञ्चत् - मगध देशाचा राजा म्हणून अभिषेकिता झाला ये मागधेन संरुद्धाः - जे जरासंधाने बंदीत ठेविले होते (तान्) राजन्यान् मोचयामास - त्या राजांना सोडविता झाला. ॥४८॥ अध्याय बहात्तरावा समाप्त |