श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६७ वा - अन्वयार्थ

द्विविदाचा उद्धार -

अहं - मी - अद्‌भुतकर्मणः अनन्तस्य अप्रमेयस्य रामस्य अन्यत् (चरितम्) - आश्चर्यजनक कर्मे करणार्‍या अविनाशी व निरुपम अशा बलरामाचे दुसरे चरित्र - भूयः श्रोतुम् इच्छामि - पुनः ऐकू इच्छितो - यत् अन्यत् (प्रभुः) कृतवान् - जे तो प्रभु करिता झाला ॥१॥

नरकस्य सखा - नरकासुराचा मित्र - कश्चित् द्विविदः नाम वानरः (आसीत्) - कोणी द्विविद नावाचा वानर होता - अथ - आणि - सः - तो - सुग्रीवसचिवः - सुग्रीवाचा प्रधान - मैन्दस्य - मैन्द नामक वानराचा - वीर्यवान् भ्राता (आसीत्) - पराक्रमी भाऊ होता ॥२॥

सख्युः अपचितिं कुर्वन् - मित्र जो नरकासुर त्याच्या ऋणाची फेड करणारा - सः वानरः - तो द्विविद वानर - राष्ट्रविप्लवं वह्निम् उत्सृजन् - देशाचा नाश होईल अशा रीतीने अग्नि पेटवून - पुरग्रामाकरान् घोषान् (च) अद्रहत् - नगरे, गाव, खाणी व गौळवाडे हे जाळून टाकिता झाला. ॥३॥

सः - तो द्विविद वानर - क्वचित् - एकदा - शैलान् उत्पाटय - पर्वत उपटून - तैः आनर्तान् देशान् सुतराम् एवं समचूर्णयत् - त्या पर्वतांनी आनर्तदेशांचे अगदी चूर्णच करिता झाला - यत्र - ज्या आनर्त देशात - मित्रहा हरिः आस्ते - मित्र जो नरकासुर त्याला मारणारा श्रीकृष्ण होता. ॥४॥

नागायुतप्राणः (सः) - दहा हजार हत्तींचे बळ असलेला तो द्विविद वानर - क्वचित् - एकदा - समुद्रमध्यस्थः - समुद्रामध्ये उभा राहिलेला असा - दोर्भ्यां तज्जलम् उत्क्षिप्य - दोन बाहूंनी ते समुद्रातील उदक वर उडवून - वेलाकूलान् देशान् अमज्जयत् - समुद्रकाठचे देश बुडविता झाला. ॥५॥

खलः - दुष्ट असा द्विविद - ऋषिमुख्यानां आश्रमान् भग्नवनस्पतीन् कृत्वा - मोठमोठया ऋषींचे आश्रम ज्यातील झाडे मोडून टाकिली आहेत असे करून - शकृन्मूत्रैः वैतानिकान् अग्नीन् अदूषयत् - विष्ठा व मूत्र यांनी यज्ञातील अग्नीना दूषित करिता झाला. ॥६॥

दृप्तः सः - गर्विष्ठ असा तो द्विविदवानर - पुरुषान् योषितः च - पुरुष व स्त्रिया यांना - क्ष्माभृद्‌द्रोणीगुहासु - पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये - पेशस्कारी कीटकम् इव निक्षिप्य - भ्रमर किडयाला ठेवितो त्याप्रमाणे ठेवून - शैलैः अप्यघात् - पाषाणांनी झाकून टाकी. ॥७॥

एवं - याप्रमाणे - देशान् विप्रकुर्वन् - देशांना त्रस्त करीत - कुलस्त्रियः च दूषयन् - आणि कुलीन स्त्रियांना भ्रष्ट करीत - सुललितं गीतं श्रुत्वा - अत्यंत मधुर गायन श्रवण करून - रैवतकं गिरिं ययौ - रैवतक पर्वतावर गेला. ॥८॥

तत्र - तेथे - पुष्करमालिनं सुदर्शनीयसर्वाङगं - कमळांची माळ धारण केलेल्या व ज्याचे सर्व अवयव सुंदर आहेत अशा - ललनायूथमध्यगं - स्त्रीसमूहाच्या मध्ये असणार्‍या - यदुपतिं रामं अपश्यत् - यादवाधिपति बलरामाला पाहता झाला. ॥९॥

गायन्तं - गाणार्‍या - वारुणीं पीत्वा मदविह्वललोचनं - वारुणी नावाचे मद्य पिऊन ज्याचे डोळे मदाने विव्हल झाले आहेत अशा - प्रभिन्नं वारणं इव - मत्त हत्तीप्रमाणे - वपुषा विभ्राजमानं - शरीराने शोभणार्‍या. ॥१०॥

दुष्टः शाखामृगः - तो दुष्ट द्विविद वानर - शाखाम् आरुढः - फांदीवर चढून - द्रुमान् कंपयन् - झाडे हलवीत - आत्मानं संप्रदर्शयन् - स्वतःला दाखवीत - किलकिलाशब्दं चक्रे - किलकिल असा शब्द करिता झाला. ॥११॥

जातिचापलाः हास्यप्रियाः - स्वभावतः चंचल व हास्यप्रिय अशा - बलदेवपरिग्रहाः तरुण्यः - बलरामाच्या त्या तरुण स्त्रिया - तस्य कपेः धार्ष्टयं वीक्ष्य - त्या वानराचा धीटपणा पाहून - विजहसुः - हसत्या झाल्या. ॥१२॥

कपिः - द्विविद वानर - रामस्य निरीक्षतः - बलराम पहात असता - स्वगुदं तासां दर्शयन् - आपले गुदद्वार त्या स्त्रियांना दाखवित - भ्रूक्षेपैः संमुखादिभिः च - भुवया वाकड्या करणे व समोर उभे राहणे इत्यादि प्रकारांनी - ताः हेलयामास - त्यांची अवहेलना करिता झाला - प्रहरतां वरः बलः - प्रहर करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा बलराम - क्रुद्धः ग्राव्णां तं प्राहरत् - रागावून दगडाने त्या वानरावर प्रहार करिता झाला ॥१३॥

सः धूर्तः कपिः - तो लबाड वानर - ग्रावाणं वञ्चयित्वा - दगड चुकवून - मदिराकलशं गृहीत्वा - मद्याचे पात्र हिरावून घेऊन - तं कोपयन् हसन् - त्या बलरामाला राग आणीत व हसत - हेलयामास - अवहेलना करिता झाला ॥१४॥

दुष्टः सः - तो दुष्ट वानर - कलशं निर्भिद्य - मद्यपात्र फोडून टाकून - (स्त्रीणां) वासांसि आस्फालयत् - स्त्रियांची वस्त्रे फाडिता झाला - बलवान् मदिद्धतः (सः) - बलिष्ठ व मदोन्मत्त असा तो - (एवं) कदर्थीकृत्य विप्रचक्रे - याप्रमाणे त्या स्त्रियांना व बलरामाला तुच्छ लेखून अपकार करिता झाला ॥१५॥

तस्य तं अविनयं दृष्टवा - त्याचा तो द्वाडपणा पाहून - देशान् च तदुपद्रुतान् (दृष्टवा) - आणि देशांना त्याने पीडा दिली आहे असे पाहून - क्रुद्धः (सः) - रागावलेला तो बलराम - अरिजिघांसया - शत्रूला मारण्याच्या इच्छेने - मुसलं हलम् च आदत्त - मुसळ व नांगर हातात घेता झाला. ॥१६॥

महावीर्यः द्विविदः अपि - मोठा पराक्रमी द्विविद वानर सुद्धा - पाणिना शालम् उद्यम्य - हाताने ताडवृक्ष उपटून घेऊन - तरसा अभ्येत्य - वेगाने जवळ येऊन - तेन बलं मूर्धनि अताडयत् - त्या ताडवृक्षाने मस्तकावर ताडिता झाला. ॥१७॥

तु - परंतु - बलवान् संकर्षणः - बलिष्ट असा बलराम - यथा अचलः - जसा पर्वत स्थिर त्याप्रमाणे - मूर्घ्नि पतन्तं तं - मस्तकावर पडणार्‍या त्या ताडवृक्षाला - प्रतिजग्राह - धरिता झाला - च - आणि - सुनंदेन तम् अहनत् - सुनंद नामक मुसळाने त्या द्विविदाला ताडिता झाला. ॥१८॥

मुसलाहतमस्तिष्कः (सः) - मुसळाने ताडिला आहे मेंदु ज्याचा असा तो द्विविद - प्रहारं न अनुचिन्तयन् - बलरामाच्या प्रहाराला न जुमानता - यथा गैरिकया गिरिः - जसा कावेने पर्वत त्याप्रमाणे - रक्तधारया विरेजे - रक्ताच्या धारेने शोभला. ॥१९॥

पुनः अन्यं समुत्क्षिप्य - पुनः दुसरा ताडवृक्ष उपटून - ओजसा निष्पत्रं कृत्वा - आपल्या शक्तीने त्याची पाने नाहीशी करून - सुसंक्रुद्धः तेन (बलं) अहनत् - अत्यंत रागावून त्या ताडाने बलरामाला ताडिता झाला - बलः शतधा तं अच्छिनत् - बलराम त्या ताडाचे शेकडो तुकडे करिता झाला. ॥२०॥

ततः - नंतर - रुषा अन्येन जघ्ने - क्रोधाने दुसर्‍या ताडवृक्षाने ताडिता झाला - तं च अपि (बलः) शतधा अच्छिनत् - त्या ताडवृक्षालाहि बलराम शंभर प्रकारे तोडिता झाला. ॥२१॥

एवं युद्धन् - याप्रमाणे युद्ध करीत - पुनः पुनः भगवता भग्ने भग्ने - पुनःपुनः भगवान बलरामाने ताडवृक्ष मोडमोडून टाकिले असता - सर्वतः वृक्षान् आकृष्य - सर्व बाजूंनी वृक्ष उपटून - तत् वनं - ते अरण्य - (द्विविदः) निर्वृक्षं अकरोत् - द्विविद वानर वृक्षरहित करिता झाला. ॥२२॥

ततः अमर्षितः (सः) - नंतर रागावलेला तो द्विविद वानर - बलस्य उपरि शिलावर्षम् अमुञ्चत् - बलरामावर पाषाणाची वृष्टि करिता झाला - मुसलायुधा - मुसळ आहे आयुध ज्याचे असा बलराम - लीलया तत्सर्वं चूर्णयामास - लीलेने त्या सर्व पाषाणांचे चूर्ण करिता झाला. ॥२३॥

कपीश्वरः सः - वानरश्रेष्ठ द्विविद - तालसंकाशौ बाहू मुष्टीकृत्य - ताडासारख्या दंडाच्या मुठी वळून - रोहिणीपुत्रं आसाद्य - बलरामावर चाल करून - ताभ्यां वक्षसि अरूरुजत् - त्या दोन्ही मुठींनी बलरामाच्या वक्षस्थळाला पीडा देता झाला. ॥२४॥

यादवेन्द्रः अपि - यादवाधिपति बलराम सुद्धा - मुसललांगले त्यक्त्वा - मुसळ व नांगर टाकून देऊन - क्रुद्धः - रागावलेला असा - तं जत्रौ दोर्भ्यां अभ्यर्दयत् - त्या द्विविदाला मानेवर दोन बाहूंनी ताडिता झाला - सः रुधिरं वमन् अपतत् - तो द्विविद रक्त ओकत खाली पडला. ॥२५॥

कुरुशार्दूल - हे कुरुश्रेष्ठा परीक्षित राजा - पतता तेन - पडणार्‍या त्या द्विविदामुळे - सवनस्पतिः सटंकः पर्वतः - वनस्पति व पाण्याची टाकी यांसह पर्वत - वायुना अंभसि नौः इव - वायूच्या योगे उदकामध्ये नौका हलते त्याप्रमाणे - चकम्पे - कापू लागला. ॥२६॥

कुसुमवर्षिणां सुरसिद्धमुनीन्द्राणां - पुष्पाची वृष्टि करणार्‍या देव, सिद्ध व श्रेष्ठ ऋषि यांचा - अंबरे - आकाशात - जयशब्दः नमःशब्दः - जयजय व नमः नमः असा शब्द - साधु साधु इति च (शब्दः) - आणि वाहवा वाहवा असा मंगल शब्द - आसीत् - झाला. ॥२७॥

जगद्‌व्यतिकरावहं द्विविदं - जगाचा नाश करणार्‍या त्या द्विविद वानराला - एवं निहत्य - याप्रमाणे मारून - जनैः संस्तूयमानः भगवान् - लोकांकडून स्तविला जाणारा बलराम - स्वपुरम् आविशत् - आपल्या नगरीत शिरला. ॥२८॥

अध्याय सदुसष्ठावा समाप्त

GO TOP