|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ६६ वा - अन्वयार्थ
पौंड्रक आणि काशिराजाचा उद्धार - नृप - हे राजा - रामे नंदव्रजं गते - बलराम नंदाच्या गोकुळात गेला असता - अज्ञः - ज्ञानहीन असा - करूषाधिपतिः - करूष देशाचा राजा पौंड्रक - अहं वासुदेवः इति - मी वासुदेव आहे असे म्हणून - कृष्णाय दूतं प्राहिणोत् - श्रीकृष्णाकडे दूत पाठविता झाला. ॥१॥ त्वं जगत्पतिः भगवान् वासुदेवः अवतीर्णः - तू त्रैलोक्याधिपति भगवान वासुदेव अवतीर्ण झाला आहेस - इति बालैः प्रस्तोभितः (सः) - याप्रमाणे अज्ञानी लोकांनी चढविलेला तो - आत्मानं अच्युतं मेने - स्वतःला ईश्वर मानिता झाला. ॥२॥ च - आणि - यथा अबुधः बालः - ज्याप्रमाणे एखादा अज्ञ बालक - बालकृतः नृपः - मुलांनी केलेला खेळातला राजा - (तथा) मंदः (सः) - त्याप्रमाणे मंदबुद्धीचा तो पौंड्रक - द्वारकायां - द्वारकेत - अव्यक्तवर्त्मने कृष्णाय दूतं प्राहिणोत् - ज्याचा मार्ग कळण्यासारखा नाही अशा कृष्णाकडे दूत पाठविता झाला. ॥३॥ दूतः तु द्वारकाम् एत्य - दूत तर द्वारकेत येऊन - सभायाम् आस्थितं प्रभुं - सभेत बसलेल्या समर्थ अशा - कमलपत्राक्षं कृष्णं - कमळाच्या पानाप्रमाणे नेत्र असलेल्या कृष्णाला - राजसंदेशम् अब्रवीत् - राजाचा निरोप सांगता झाला. ॥४॥ अहम् एकः एव वासुदेवः भूतानां अनुकंपार्थं अवतीर्णः - मी एकटाच वासुदेव प्राण्यांवर दया करण्यासाठी अवतीर्ण झालो आहे - न च अपरः - आणि दुसरा कोणीहि नाही - त्वं तु मिथ्याभिधां त्यज - तू धारण केलेले खोटे नाव सोड. ॥५॥ सात्वत - हे यादवा - त्वं मौढयात् यानि अस्मच्चिह्नानि बिभर्षि - तू मूर्खपणाने जी आमची चिन्हे धारण केली आहेस - (तानि) त्यक्त्वा - ती टाकून देऊन - त्वं मां शरणं एहि - तू मला शरण ये - नो चेत् मम आहवं देहि - नाहीतर माझ्याशी युद्ध कर. ॥६॥ अल्पमेधसः पौंड्रकस्य - अल्पबुद्धीच्या पौंड्रक राजाचे - तत् कत्थनं उपाकर्ण्य - ते बडबडणे ऐकून - तदा - त्यावेळी - उग्रसेनादयः सभ्याः - उग्रसेनप्रमुख सभासद - उच्चकैः जहसुः - मोठयाने हसू लागले. ॥७॥ भगवान् - श्रीकृष्ण - परिहासकथाम् अनु - हास्यगोष्टी संपल्यानंतर - दूतं उवाच - दूताला म्हणाला - मूढ - हे मूर्ख पौंड्रका - त्वं यैः एवं विकत्थसे - तू ज्या कृत्रिम चिन्हांनी अशी बडबड करीत आहेस - (तानि) चिह्नानि उत्स्रक्ष्ये - ती चिन्हे टाकायला लावीन. ॥८॥ अज्ञ - हे मूर्खा - कङकगृध्रवटैः वृतः (त्वं) - कंक पक्षी, गिधाडे व वटवाघूळ यांनी वेढिलेला तू - तत् मुखं अपिधाय - ते आपले तोंड झाकून - तत्र हतः शयिष्यसे - तेथे मरून शयन करशील - शुनां शरणं भविता - कुत्र्यांचे आश्रयस्थान होशील. ॥९॥ इति (कथितः) दूतः - असे सांगितला गेलेला दूत - सर्वं तदाक्षेपं स्वामिने आहरत् - कृष्णाचे सर्व निंदात्मक भाषण राजा पौंड्रकाला सांगता झाला - कृष्णः अपि - कृष्णसुद्धा - रथम् आस्थाय - रथात बसून - काशीम् उपजगाम ह - काशीला जाता झाला. ॥१०॥ महारथः पौंड्रकः अपि - महारथी पौंड्रकसुद्धा - तदुद्योगं उपलभ्य - त्या श्रीकृष्णाचा उद्योग जाणून - अक्षौहिणीभ्यां संयुक्तः - दोन अक्षौहिणी सैन्यासह - पुरात् द्रुतं निश्चक्राम - नगरातून तत्काळ बाहेर पडला. ॥११॥ नृप - हे राजा - तस्य मित्रं काशिपतिः तिसृभिः अक्षौहिणीभिः (सह) - त्याचा मित्र काशिपति तीन अक्षौहिणी सैन्य बरोबर घेऊन - पार्ष्णिग्राहः अन्वयात् - पाठिराखा म्हणून त्याच्या मागोमाग बाहेर पडला - हरिः पौंड्रकं अपश्यत् - श्रीकृष्ण पौंड्रकाला पहाता झाला. ॥१२॥ शङखार्यसिगदाशार्ङगश्रीवत्साद्युपलक्षितं - शंख, चक्र, तरवार, गदा, शार्ङग धनुष्य व श्रीवत्सादि चिन्हे यांनी युक्त अशा - कौस्तुभमणिं बिभ्राणं - कौस्तुभमणी धारण करणार्या - वनमालाविभूषितं - वनमालेने शोभणार्या - पीते कौशेयवाससी वसानं - पिवळी दोन रेशमी वस्त्रे धारण करणार्या - गरुडध्वजं - ज्याच्या ध्वजावर गरुडाचे चिन्ह आहे अशा - अमूल्यमौल्याभरणं - अमूल्य असा किरीट व अलंकार आहेत ज्याचे असा - स्फुरन्मकरकुण्डलं - तळपत आहेत मकराकार कुंडले ज्याच्या कानात अशा - यथा रङगगतं नटं - ज्याप्रमाणे रंगभूमीवर आलेला नट त्याप्रमाणे - कृत्रिमं आत्मनः तुल्यवेषं आस्थितं तं दृष्टवा - बनावट असा स्वतःसारखा वेष धारण केलेल्या त्याला पाहून - हरिः भृशं विजहास - श्रीकृष्ण अत्यंत हास्य करिता झाला. ॥१३-१५॥ अरयः - शत्रु - शूलैः गदाभिः परिघैः - त्रिशूळ, गदा, अर्गळा यांनी - शक्त्यृष्टिप्रासतोमरैः - शक्ति, ऋष्टि, भाला, तोमर यांनी - असिभिः पट्टिशैः बाणैः - तरवारी, पटटे व बाण यांनी - हरिं प्राहरन् - श्रीकृष्णावर प्रहार करिते झाले. ॥१६॥ कृष्णः तु - श्रीकृष्ण तर - पौंड्रककाशिराजयोः - पौंड्रक व काशिपति यांचे - गजस्यन्दनवाजिपत्तिमत् - हत्ती, रथ, घोडेस्वार व पायदळ असे चार प्रकारचे - तत् बलं - ते सैन्य - यथा हुतभुक् युगान्ते पृथक् प्रजाः - ज्याप्रमाणे अग्नि प्रलयकाळी सर्व प्रकारच्या प्राण्यांना त्रस्त करितो त्याप्रमाणे - गदासि चक्रेषुभिः - गदा, तरवार, सुदर्शनचक्र व बाण ह्या योगे - भृशं आर्दयत् - अत्यंत मर्दिता झाला. ॥१७॥ अरिणा अवखण्डितैः - सुदर्शनचक्राने तोडून टाकिलेल्या - रथवाजिकुञ्जरद्विपत्खरोष्ट्रैः चितं - रथ, घोडे, हत्ती, मनुष्ये, गाढव, उंट ह्यांनी भरलेले - तत् आयोधनं - ते युद्धस्थान - भूतपतेः उल्बणं आक्रीडनम् इव - शंकराचे भयंकर क्रीडांगणच की काय असे - मनस्विनां मोदवहं बभौ - शूर पुरुषांना आनंद देणारे असे शोभले. ॥१८॥ अथ शौरिः पौंड्रकं आह - नंतर श्रीकृष्ण पौंड्रकाला म्हणाला - भो भो पौंड्रक - हे हे पौंड्रक - यत् भवान् दूतवाक्येन माम् आह - जे तू दूताकडून मला बोललास - तानि अस्राणि ते उत्सृजामि - ती अस्त्रे तुझ्या अंगावर सोडतो. ॥१९॥ अज्ञ - हे मूढा - यत् त्वया मे अभिधानं मृषा धृतं - जे तू माझे नाव खोटेपणाने धारण केले आहेस - (तत् त्वया) त्याजयिष्ये - ते तुझ्य़ाकडून टाकवीन - यदि संयुगं न इच्छामि - जर मला युद्ध करण्याची इच्छा नसेल - (तर्हि) अद्य ते शरणं व्रजामि - तर आज तुला शरण येईन. ॥२०॥ इति क्षिप्त्वा - अशा रीतीने निंदा करून - शितैः बाणैः पौंड्रकं विरथीकृत्य - तीक्ष्ण बाणांनी पौंड्रकाला रथविहिन करून - यथा इन्द्रः वज्रेण गिरः (शिरः) - जसा इंद्र वज्राने पर्वताचे शिखर त्याप्रमाणे - रथाङगेन (तस्य) शिरः अवृश्चत् - चक्राच्या योगे त्याचे मस्तक तोडिता झाला.॥२१॥ तथा पत्रिभिः काशिपतेः कायात् शिरः उत्कृत्य - त्याचप्रमाणे बाणांनी काशिपतीच्या शरीरापासून मस्तक उपटून काढून - अनिलः पद्मकोशम् इव - वायु जसा कमळाच्या कळ्याला दूर नेतो त्याप्रमाणे - काशिपुर्यां न्यपातयत् - काशीनगरीत पाडिता झाला. ॥२२॥ सिद्धैः गीयमानकथामृतः हरिः - सिद्धांनी ज्याच्या अमृतासारख्या कथा गायिल्या आहेत असा श्रीकृष्ण - एवं मत्सरिणं ससखं पौंड्रकं हत्वा - याप्रमाणे द्वेष करणार्या त्या पौंड्रकाला मित्रासह मारून - द्वारकाम् आविशत् - द्वारकेत शिरला. ॥२३॥ राजन् - हे राजा - नित्यं भगवद्ध्यानप्रध्वस्ताखिलबन्धनः - नेहमी भगवंताचे चिंतन केल्यामुळे ज्याची सर्व बंधने तुटून गेली आहेत असा - च हरेः स्वरूपं बिभ्राणः - आणि श्रीकृष्णासारखे स्वरूप धारण करणारा - सः - तो पौंड्रक - तन्मयः अभवत् - श्रीकृष्णमय झाला. ॥२४॥ जनाः - लोक - राजद्वारे पतितं सकुण्डलं शिरः आलोक्य - राजवाडयाच्या दरवाज्याजवळ पडलेले कुंडलांसहित मस्तक अवलोकन करून - किम् इदं वा कस्य वक्त्रं - हे काय आहे किंवा हे कोणाचे शिर आहे - इति संशयिरे - अशा संशयात पडले. ॥२५॥ (इदं) काशिपतेः राज्ञः (शिरः) - हे काशिपति राजाचे मस्तक - (इति) ज्ञात्वा - असे जाणून - महिष्यः पुत्रबान्धवाः पौराः च - राजस्त्रिया, राजपुत्र, राजबांधव व नागरिक लोक - हा हताः (स्मः) - अरेरे आमचा घात झाला - राजन् नाथ नाथ इति प्रारुदन् - हे राजा, आमचे मनोरथ पूर्ण करणार्या नाथा, नाथा असे म्हणून रडू लागले. ॥२६॥ तस्य सुतः सुदक्षिणः - त्या काशिराजाचा पुत्र सुदक्षिण - पितुः संस्थाविधिं कृत्वा - पित्याचा और्ध्वदेहिक संस्कार करून - पितृहन्तारं निहत्य - पित्याला मारणाराला मारून - पितुः अपचितिं यास्यामि - पित्याच्या ऋणातून मुक्त होईन. ॥२७॥ इति आत्मना अभिसंधाय - याप्रमाणे आपल्या मनाशी ठरवून - सोपाध्यायः सुदक्षिणः - उपाध्यायासह तो सुदक्षिण - परमेण समाधिना - एकाग्र समाधीच्या योगाने - महेश्वरं अर्चयामास - शंकराला पूजिता झाला. ॥२८॥ भगवान् भवः - भगवान शंकर - अविमुक्ते - काशीक्षेत्रामध्ये - प्रीतः - प्रसन्न होऊन - तस्मै वरं अदात् - त्याला वर देऊ लागला - सः पितृहन्तृवधोपायं - तो सुदक्षिण पित्याला मारणार्याचा नाश करण्याचा उपाय हा - ईप्सितं वरं वव्रे - इष्ट वर मागता झाला. ॥२९॥ ब्राह्मणैः समं - ब्राह्मणांसह - अभिचारविधानेन - जारण, मारण, उच्चाटन अशा विधीने - ऋत्विजं दक्षिणाग्निं परिचर - ऋत्विज नाव धारण करणारा जो दक्षिणाग्नि त्याचे पूजन कर - सः अग्निः च - आणि तो दक्षिणाग्नि - प्रमथैः वृतः - प्रमथादि क्रूर गणांसहित - अब्रह्मण्ये प्रयोजितः - दुष्कृत्यांच्या ठिकाणी योजिला असता - (तव) संकल्पं साधयिष्यति - तुझे मनोरथ पूर्ण करील - इति आदिष्टः - अशा रीतीने उपदेशिलेला - कृष्णाय अभिचरन् व्रती - कृष्णाला मारण्यासाठी मारणविधीचे अनुष्ठान करून व्रत करणारा तो - तथा चक्रे - तसे करता झाला. ॥३०-३१॥ ततः - नंतर - अतिभीषणः - अत्यंत भयंकर - तप्तताम्रशिखश्मश्रुः - ज्याची शेंडी व दाढीमिशी तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल आहे असा - अंगारोद्गारिलोचनः - ज्याच्या नेत्रांतून झळझळीत ज्वाळा बाहेर पडत आहेत असा - मूर्तिमान् अग्निः - प्रत्यक्ष अग्नि - कुण्डात् उत्थितः - कुंडातून वर आला ॥३२॥ दंष्ट्रोग्रभ्रुकुटीदंडकठोरास्यः - दाढांनी व भयंकर यष्टीसारख्या लांब भृकुटींनी ज्याचे मुख क्रूर दिसत आहे असा - स्वजिह्वया सृक्किणी आलिहन् - आपल्या जिभेने ओठांच्या बाहेरचा भाग चाटणारा - नग्नः ज्वलत् त्रिशिखं विधुन्वन् - नग्न व पेटता त्रिशूळ फिरविणारा ॥३३॥ भूतैः वृतः सः - भूतगणांनी वेष्टिलेला तो अग्नि - तालप्रमाणाभ्यां पद्भ्यां अवनीतलं कम्पयन् - ताडासारख्या पायांनी पृथ्वीला कापवीत - दिशः प्रदहन् द्वारकां अभ्यधावत् - दिशांना जाळीत द्वारकेकडे धावला ॥३४॥ सर्वे द्वारकौकसः - सर्व द्वारकावासी जन - आयान्तं तं आभिचारदहनं विलोक्य - येणार्या त्या लोकनाशक अग्नीला पाहून - यथा वनदाहे मृगाः - जसे अरण्य जळू लागले असता हरिणादि पशु त्याप्रमाणे - तत्रसुः - घाबरले ॥३५॥ भयातुराः - भीतीने व्याकुळ झालेले लोक - सभायां अक्षैः क्रीडन्तं भगवन्तं (आगत्य) - सभेत फाशांनी खेळणार्या श्रीकृष्णाजवळ येऊन - त्रिलोकेश - हे त्रैलोक्याधिपते कृष्णा - पुरं प्रदहतः वन्हेः त्राहि त्राहि - नगरीला जाळणार्या अग्नीपासून आमचे रक्षण कर ॥३६॥ शरण्यः (सः) - शरणागतांचे रक्षण करणारा तो श्रीकृष्ण - तत् जनवैक्लव्यं श्रुत्वा - लोकांचे ते संकट ऐकून - स्वानां च साध्वसं दृष्ट्वा - व स्वकीयांचे भय पाहून - मा भैष्ट इति संप्रहस्य आह - भिऊ नका असे किंचित् हसून म्हणाला - अहं अवितास्मि - मी रक्षण करीन ॥३७॥ सर्वस्य अन्तर्बहिःसाक्षी विभुः - सर्वांच्या हृदयांतील व बाह्य प्रदेशातील प्रत्येक गोष्ट साक्षीरूपाने पहाणारा श्रीकृष्ण - माहेश्वरीं कृत्यां विज्ञाय - शंकराने निर्माण केलेली ही लोकविनाशक कृत्या आहे असे जाणून - तद्विघातार्थं पार्श्वस्थं चक्रम् आदिशत् - त्या कृत्येच्या नाशार्थ जवळ असणार्या सुदर्शनचक्राला आज्ञा देता झाला ॥३८॥ अथ - नंतर - सूर्यकोटिप्रतिमं - कोट्यवधि सूर्याप्रमाणे प्रखर - जाज्वल्यमानं प्रलयानलप्रभं - अत्यंत चकचकणारे, प्रलयाग्नीप्रमाणे तेजस्वी असे - स्वतेजसा खं ककुभः अथ रोदसी (प्रकाशयत्) - आपल्या तेजाने आकाश, दिशा, त्याचप्रमाणे स्वर्ग व भूमी ह्यांना प्रकाशित करणारे - मुकुंदास्त्रं - श्रीकृष्णाचे मुख्य अस्त्र - तत् सुदर्शनं चक्रं अग्निम् आर्दयत् - ते सुदर्शनचक्र अग्नीला त्रासून सोडिते झाले ॥३९॥ नृप - हे राजा - सः कृत्यानलः - लोकांचा नाश करणारा तो कृत्याग्नि - रथाङ्गपाणेः अस्त्रौजसा प्रतिहतः - चक्रपाणि श्रीकृष्णाच्या अस्त्रप्रभावाने पराजित झाला - सः भग्नमुखः निवृत्तः - तो अग्नि तोंड फुटल्यासारकखा तेथून परत फिरला - वाराणसीं परिसमेत्य - काशीक्षेत्रात येऊन - सर्त्विग्जनं तं सुदक्षिणं - ऋत्विजांसह त्या सुदक्षिणाला - समदहत् - जाळून टाकिता झाला - (सः) अभिचारः स्वकृतः (एव) - हा नाश त्याने स्वतःच करून घेतलेला होय ॥४०॥ तदनुप्रविष्टं विष्णोः चक्रं च - आणि त्यामागून प्रविष्ट झालेले विष्णूचे सुदर्शन चक्र - साट्टसभालयापणां - उंच पीठांनी युक्त सभागृहे व बाजार यांसहित अशा - सगोपुराट्टालककोष्ठसंकुलां - वेशी, गच्च्या, व कोठारे यांनी व्यापिलेल्या - सकोशहस्त्यश्वरथान्नशालां - भांडारे, गजशाला, अश्वशाला, रथ व अन्नशाला यांनी भरलेल्या - वाराणसीम् (अदहत्) - काशीनगराला जाळिता झाला ॥४१॥ अक्लिष्टकर्मणः विष्णोः कृष्णस्य - सहाजिकपणे मोठमोठी कृत्ये करणार्या व्यापक श्रीकृष्णाचे - सुदर्शनं चक्रं - सुदर्शनचक्र - सर्वां वाराणसीं दग्ध्वा - सर्व काशीनगरी जाळून - भूयः (कृष्णस्य) पार्श्वं उपातिष्ठत् - पुनः श्रीकृष्णाच्या जवळ प्राप्त झाले ॥४२॥ यः मर्त्यः - जो मनुष्य - समाहितः - शांतपणे - एनं उत्तमश्लोकविक्रमं श्रावयेत् - हा भगवंताचा पराक्रम लोकांना सांगतो - वा (स्वयं) शृणुयात् - किंवा स्वतः श्रवण करतो - (सः) सर्वपापैः प्रमुच्यते - तो सर्व पातकांपासून मुक्त होतो ॥४३॥ अध्याय सहासष्टावा समाप्त |