|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ६१ वा - अन्वयार्थ
भगवंतांच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे - ताः कृष्णस्य अबलाः - त्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया - एकैकशः दश दश - प्रत्येकीला दहा दहा याप्रमाणे - सर्वात्मसंपदा पितुः अनवमान् - सर्वप्रकारच्या स्वतःच्या संपत्तीने पित्याहून उणे नाहीत असे - पुत्रान् अजीजनन् - पुत्र उत्पन्न करित्या झाल्या. ॥१॥ राजपुत्र्यः - राजाच्या कन्या अशा त्या कृष्णस्त्रिया - अच्युतं गृहात् अनपगं स्थितं वीक्ष्य - श्रीकृष्ण आपल्या घरातून कधीहि बाहेर न जाता नेहमी घरातच रहातो असे पाहून - स्वं स्वं (तस्य) प्रेष्ठं न्यमंसत - स्वतःला कृष्णाची अत्यंत लाडकी असे मानित्या झाल्या - स्त्रियः - त्या कृष्णाच्या स्त्रिया - तत्तत्त्वविदः न - त्या कृष्णाचे स्वरूप जाणणार्या नव्हत्या. ॥२॥ विभूम्नः भगवतः वनिताः - महात्म्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया - चार्वब्जकोशवदनायतबाहुनेत्रसप्रेमहासरसवीक्षितवल्गुजल्पैः - सुंदर कमळातील गाभ्यासारखे मुख, दीर्घ हात व नेत्रांचे प्रेमपूर्वक हास्यरसाने युक्त अवलोकन आणि मधुर भाषण यांनी - संमोहिताः - मोहित झाल्या - स्वैः विभ्रमैः - स्वतःच्या विलासांनी - (तस्य) मनः विजेतुं न समशकन् - त्या श्रीकृष्णाचे अंतःकरण जिंकण्यास समर्थ झाल्या नाहीत. ॥३॥ षोडशसहस्त्रं पत्न्यः तु - सोळा हजार श्रीकृष्णाच्या स्त्रिया तर - स्मायावलोकलवदर्शितभावहारिभ्रूमण्डलप्रहितसौ रतमन्त्रशौण्डैः - मंदहास्ययुक्त अवलोकनाने दाखविलेल्या अभिप्रायामुळे मनोहर दिसणार्या भ्रुकुटींनी योजिलेले जे कामोत्तेजक उपाय त्यात प्रवीण अशा - अनंगबाणैः - मदनाचे बाणच अशा - करणैः - इंद्रियांनी - यस्य इंद्रियं विमथितुं - ज्या श्रीकृष्णाचे मन क्षुब्ध करण्यास - न शेकुः - समर्थ झाल्या नाहीत. ॥४॥ इत्थम् - याप्रमाणे - ताः स्त्रियः - त्या श्रीकृष्णपत्न्या - ब्रह्मादयः अपि - ब्रह्मादि देवसुद्धा - यदीयां पदवीं न विदुः - ज्या श्रीकृष्णाच्या मार्गाला जाणत नाहीत - (तं) रमापतिं पतिं अवाप्य - त्या लक्ष्मीपति श्रीकृष्णाला पति म्हणून मिळवून - एधितया (प्रीत्या) अनुरागहासावलोकनवसंगमलालसाद्यम् - वाढलेल्या प्रेमाने हास्ययुक्त अवलोकन, नवीन सुरतसंगाविषयी लालसा इत्यादि विलास करणार्या श्रीकृष्णाला - मुदा अविरतं भेजुः - आनंदाने एकसारख्या सेवित्या झाल्या. ॥५॥ दासीशताः अपि (ताः) - शेकडो दासी आहेत ज्यांपाशी अशाहि त्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया - प्रत्युद्गमासनवरार्हणपादशौचताम्बूलविश्रमणवीजनगन्धमाल्यैः - सामोरे जाणे, बसायला आसन देणे, पूजा करणे, पाय धुणे, विडा देणे, श्रमपरिहारार्थ पंख्याने वारा घालणे, सुगंधी पदार्थ व फुले अर्पण करणे ह्या कृत्यांनी - केशप्रसारशयनस्नपनोपहार्यैः - केस तेल लावून नीटनेटके करणे, शय्या घालून देणे, स्नान घालणे, खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवणे इत्यादि गोष्टींनी - विभोः दास्यं विदधुः स्म - श्रीकृष्णाची सेवा करित्या झाल्या. ॥६॥ दशपुत्राणां तासां कृष्णस्त्रीणां - दहा दहा पुत्र असणार्या त्या श्रीकृष्णाच्या स्त्रियांपैकी - पुरा उदिताः याः अष्टौ महिष्यः - पूर्वी सांगितलेल्या ज्या आठ पट्टराण्या - तत्पुत्रान् प्रद्युम्नादीन् - त्यांचे प्रद्युम्नादि जे पुत्र - ते गृणामि - ते तुला सांगतो. ॥७॥ चारुदेष्णः च सुदेष्णः वीर्यवान् चारुदेहः च - चारुदेष्ण आणि सुदेष्ण आणि पराक्रमी चारुदेह - सुचारुः च चारुगुप्तः तथा अपरः भद्रचारुः - सुचारु आणि चारुगुप्त त्याचप्रमाणे दुसरा भद्रचारु - चारुचंद्रः च विचारुः च दशमः चारुः - चारुचंद्र आणि विचारु आणि दहावा चारु - (इति) पितुः नावमाः प्रद्युम्नप्रमुखाः (पुत्राः) - असे पित्याहून न्यून नसलेले प्रद्युम्नादि पुत्र - हरेः रुक्मिण्यां जाताः - श्रीकृष्णापासून रुक्मिणीला झाले. ॥८-९॥ भानुः सुभानुः स्वर्भानुः - भानु, सुभानु, स्वर्भानु - प्रभानुः भानुमान् - प्रभानु, भानुमान - तथा चन्द्रभानुः बृहद्भानुः - त्याचप्रमाणे चंद्रभानु, बृहद्भानु - तथा अष्टमः अतिभानुः - त्याचप्रमाणे आठवा अतिभानु. ॥१०॥ श्रीभानुः च प्रतिभानुः - श्रीभानु व प्रतिभानु - (इति) दश सत्यभामात्मजाः (आसन्) - असे सत्यभामेचे दहा मुलगे होत - साम्बः सुमित्रः पुरुजित् शतजित् सहस्त्रजित् च - सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित आणि सहस्त्रजित - विजयः चित्रकेतुः च वसुमान् द्रविडः च क्रतुः - विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविड व क्रतु - एते पितृसंमताः सांबाद्याः जाम्बवत्याः सुताः हि - हे पित्याला मान्य असे सांबादि दहा पुत्र जांबवतीचेच होते. ॥११-१२॥ वीरःचन्द्रः अश्वसेनः चित्रगुः वेगवान् च वृषः - वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान आणि वृष - आमः शंकुः वसुः श्रीमान् कुन्तिः - आम, शंकु, वसु व श्रीमान असा कुंति - (इति) नाग्नजितेः सुताः - हे नाग्नजितीचे मुलगे होत. ॥१३॥ श्रुतः कविः वृषः वीरः सुबाहुः एकलः भद्रः - श्रुत, कवि, वृष, वीर, सुबाहु, भद्र - शांतिः दर्शः पूर्णमासः अवरः सोमकः - शांति, दर्श, पूर्णमास व सर्वात लहान सोमक - (एते) कालिंद्याः (दश पुत्राः) - हे कालिंदीचे दहा पुत्र होत. ॥१४॥ प्रघोषः गात्रवान् सिंहः - प्रघोष, गात्रवान, सिंह - बलः प्रबलः ऊर्ध्वगः - बल, प्रबल, ऊर्ध्वग - महाशक्तिः सहः ओजः (च) अपराजितः - महाशक्ति, सह, ओज व अपराजित - (एते) माद्रयाः पुत्राः - हे लक्ष्मणेचे मुलगे. ॥१५॥ वृकः हर्षः अनिलः - वृक, हर्ष, अनिल - गृध्रः वर्धनः च अन्नादः एव - गृध्र, वर्धन, आणि अन्नाद सुद्धा - महाशः पावनः वह्निः क्षुधिः - महाश, पावन, वह्नि व क्षुधि - (एते) मित्रविन्दात्मजाः - हे मित्रविंदेचे मुलगे होत. ॥१६॥ संग्रामजित् बृहत्सेनः शूरः - संग्रामजित, बृहत्सेन, शूर - प्रहरणः अरिजित् जयः - प्रहरण, अरिजित, जय - सुभद्रः आयुः वामः च सत्यकः - सुभद्र, आयु, वाम व सत्यक - (एते) भद्रायाः (सुताः) - हे भद्रेचे पुत्र होत. ॥१७॥ दीप्तिमान् ताम्रतप्ताद्याः - दीप्तिमान, ताम्रतप्त इत्यादि - हरेः रोहिण्याः तनयाः - श्रीकृष्णापासून झालेले रोहिणीचे मुलगे होत - राजन् - हे राजा - च भोजकटे पुरे - आणि भोजकट नगरामध्ये - प्रद्युम्नात् रुक्मिणो पुत्र्यां रुक्मवत्यां तु - आणि प्रद्युम्नापासून रुक्मीची कन्या जी रुक्मवती तिच्या ठिकाणी तर - महाबलः नाम्ना अनिरुद्धः अभूत् - मोठा बलाढय अनिरुद्ध नावाचा पुत्र झाला - नृप - हे राजा - एतेषां कोटिशः पुत्रपौत्राः च बभूवुः - ह्यांचे नातू पणतू मिळून कोटयवधि होते - कृष्णजातानाम् (सुतानाम्) - कृष्णापासून झालेल्या पुत्रांच्या - च षोडश सहस्राणि मातरः (बभूवुः) - आणखी सोळा हजार माता होत्या. ॥१८-१९॥ विद्वन् - हे शुकाचार्या - रुक्मी - रुक्मी - दुहितरम् - आपली कन्या - अरिपुत्राय कथं प्रादात् - शत्रूच्या पुत्राला कशी देता झाला - कृष्णेन युधि परिभूतः (सः) - श्रीकृष्णाने युद्धात जिंकिलेला रुक्मी - तं हन्तुं रन्ध्रं प्रतीक्षते - त्या श्रीकृष्णाला मारण्याची संधी पहात होता - द्विषोः मिथः एतत् वैवाहिकं - शत्रूंचा आपापसातील हा विवाहसंबंध - मे आख्याहि - मला सांगा. ॥२०॥ योगिनः - योगी लोक - अनागतं अतीतं - अद्यापि न घडलेले व पूर्वीच घडून गेलेले - वर्तमानं च अतीन्द्रियम् - आणि प्रस्तुत काळी घडणारे व इंद्रियांनी पहाता न येणारे - विप्रकृष्टं व्यवहितं - अति दूर असणारे व आच्छादून गेलेले असे - सम्यक् पश्यन्ति - चांगल्या रीतीने पहातात. ॥२१॥ साक्षात् अनङगः - प्रत्यक्ष मदन - अङगयुतः - शरीराने युक्त असा - तया स्वयंवरे वृतः - तिच्याकडून स्वयंवरामध्ये वरिला गेला - एकरथः (सः) - एकटा रथात बसलेला तो प्रद्युम्न - समेतान् राज्ञः युधि निर्जित्य - एकत्र जमलेल्या राजांना युद्धामध्ये जिंकून - (तां) जहार - तिला हरण करिता झाला. ॥२२॥ यदि अपि - जरीहि - कृष्णावमानितः रुक्मी - कृष्णाने अवमानिलेला रुक्मी - वैरं अनुस्मरन् (आसीत्) - वैर स्मरत होता - स्वसुः प्रियं कुर्वन् - रुक्मिणीचे प्रिय करण्यासाठी - भागिनेयाय सुतां व्यतरत् - बहिणीचा पुत्र जो प्रद्युम्न त्याला कन्या देता झाला. ॥२३॥ राजन् - हे राजा - कृतवर्मसुतः बलीः - कृतवर्म्याचा पुत्र बली - रुक्मिण्याः तनयां - रुक्मिणीची मुलगी अशा - विशालाक्षीं कन्यां चारुमतीं - विस्तीर्ण नेत्रांच्या चारुमती कन्येला - किल उपयेमे - खरोखर वरिता झाला. ॥२४॥ हरेः बद्धवैरः रुक्मी - श्रीकृष्णापाशी शत्रुत्व करणारा रुक्मी - तत् अधर्मं यौनं जानन् अपि - हा विवाह धर्मविरुद्ध आहे हे जाणत असूनहि - स्वसुः प्रियचिकीर्षया - रुक्मिणी बहिणीचे प्रिय करण्याच्या इच्छेने - स्नेहपाशानुबन्धनः - प्रेमपाशाने बांधलेला - पौत्रीं रोचना - पुत्राची कन्या म्हणजे नात जी रोचना तिला - दौहित्राय अनिरुद्धाय - कन्येचा पुत्र जो अनिरुद्ध त्याला - अददात् - देता झाला. ॥२५॥ राजन् - हे राजा - रुक्मिणी रामकेशवौ - रुक्मिणी, बलराम व श्रीकृष्ण - साम्बप्रद्युम्नकादयः - सांब, प्रद्युम्न इत्यादि - तस्मिन् अभ्युदये - त्या विवाहोत्सवप्रसंगी - भोजकटं पुरं जग्मुः - भोजकट नगराला गेले - तस्मिन् उद्वाहे निवृत्ते - तो विवाह समाप्त झाला असता - दृप्ताः ते कालिङगप्रमुखाः नृपाः - गर्विष्ठ झालेले ते कालिंग आदिकरून राजे - अक्षैः बलं विनिर्जय - फाशांनी बलरामाला जिंकू - (इति) रुक्मिणं प्रोचुः - असे रुक्मीला म्हणाले. ॥२६-२७॥ राजन् - हे राजा रुक्मी - अयं हि अनक्षज्ञः - हा बलराम खरोखर फाशांचे शास्त्र जाणत नाही - अपि - तथापि - महत् तदव्यसनं - पण त्याला फाशांचे फार व्यसन आहे - इति उक्तः रुक्मी - अशा रीतीने बोलला गेलेला रुक्मी - बलं आहूय - बलरामाला बोलावून - तेन अक्षैः अदीव्यत - त्या बलरामाबरोबर फाशांनी खेळला. ॥२८॥ रामः - बलराम - तत्र - त्या अक्षक्रीडेमध्ये - शतं सहस्त्रं अयुतं पणं आददे - शंभर, हजार व दहा हजार अशी संख्या पणाला लाविता झाला - रुक्मी तु तं अजयत् - रुक्मी तर त्याला जिंकिता झाला - तत्र कालिङगः दन्तान् संदर्शयन् बलं उच्चैः प्राहसत् - त्या ठिकाणी कलिंग राजा दात दाखवीत बलरामाला मोठयाने हसला - हलायुधः तत् न अमृष्यत् - बलराम ते सहन करिता झाला नाही. ॥२९॥ ततः रुक्मी लक्षं ग्लहम् अगृह्णात् - नंतर रुक्मी एक लक्ष द्रव्य पणाला लाविता झाला - तत्र बलः अजयत् - त्यावेळी बलराम जिंकिता झाला - रुक्मी - रुक्मी - कैतवं आश्रितः - कपटमार्गाचा आश्रय करून - अहं (पणं) जितवान् इति आह - मी पण जिंकला असे म्हणाला. ॥३०॥ पर्वणि समुद्रः इव - पौर्णिमेच्या दिवशीच्या समुद्राप्रमाणे - मन्युना क्षुभितः श्रीमान् - क्रोधाने क्षुब्ध झालेला श्रीमान बलराम - जात्या अरुणाक्षः - स्वभावतः ज्याचे डोळे आरक्तवर्णाचे आहेत असा - अतिरुषा न्यर्बुदं ग्लहं आददे - अत्यंत क्रोधाने दहा कोटिंचा पण लाविता झाला.॥३१ ॥ रामः - बलराम - तं च अपि धर्मेण जितवान् - त्याहि पणाला धर्माने जिंकिता झाला - छलं आश्रितः रुक्मी - कपटमार्गाचा अवलंब केलेला रुक्मी - अत्र मया जितं - हा पण मी जिंकिला - इमे प्राश्निकाः वदन्तु - हे साक्षी पंच सांगोत - इति (अब्रवीत्) - असे म्हणाला. ॥३२॥ तदा - त्यावेळी - नभोवाणी - आकाशवाणी - बलेन एव धर्मतः ग्लहः जितः - बलरामानेच धर्माने पण जिंकिला आहे - रुक्मी वै मृषा वचनेन एव वदति - रुक्मी खोटेच भाषण करीत आहे - (इति) अब्रवीत् - असे म्हणाली. ॥३३॥ दुष्टराजन्यचोदितः कालचोदितः वैदर्भः - दुष्ट राजांनी प्रेरलेला व काळाने प्रेरिलेला रुक्मी - तां अनादृत्य - त्या आकाशवाणीचा अपमान करून - संकर्षणं परिहसन् बभाषे - बलरामाची थटटा करीत म्हणाला. ॥३४॥ वनगोचराः गोपालाः यूयं - अरण्यात हिंडणारे गुराखी असे तुम्ही - अक्षकोविदाः न एव - फाशांचा खेळ जाणणारे नव्हेच - राजानः - राजे - अक्षैः बाणैः च दीव्यन्ति - फाशांनी व बाणांनी खेळतात - भवादृशाः न - तुमच्यासारखे लोक खेळत नाहीत. ॥३५॥ रुक्मिणा एवं अधिक्षिप्तः - रुक्मीने याप्रमाणे निन्दिलेला - राजभिः च उपहासितः - व राजांनी उपहास केलेला - क्रुद्धः - रागाने - परिघं उद्यम्य - अर्गळा उचलून - नृम्णसंसदि तं जघ्ने - मंगलसभेमध्ये त्या रुक्मीला मारिता झाला. ॥३६॥ क्रुद्धः (सः) - रागावलेला तो बलराम - तरसा दशमे पदे कलिङगराजं गृहीत्वा - वेगाने धावत जाऊन दहाव्या पावली कलिंगराजाला पकडून - (तस्य) दन्तान् अपातयत् - त्याचे दात पाडिता झाला - यः विवृतैः द्विजैः अहसत् - जो कलिंगराजा दात दाखवून हसला होता. ॥३७॥ बलेन परिघार्दिताः - बलरामाने परिघाने ताडिलेले - निर्भिन्नबाहूरुशिरसः - ज्यांचे दंड, मांडया व मस्तके तुटून गेली आहेत असे - रुधिरोक्षिताः - रक्ताने माखलेले - अन्ये राजानः - दुसरे राजे - भीताः दुद्रुवुः - भिऊन पळत सुटले. ॥३८॥ राजन् - हे राजा - हरिः - श्रीकृष्ण - श्याले रुक्मिणी निहते - मेहुणा रुक्मी मारिला गेला असता - रुक्मिणीबलयोः स्नेहभङगभयात् - रुक्मिणी व बलराम यांमधील आपले सख्य नष्ट होईल या भीतीने - साधु वा असाधु (इति) न अब्रवीत् - चांगले किंवा वाईट असे काहीच बोलला नाही. ॥३९॥ ततः - नंतर - सिद्धाखिलार्थाः - ज्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत असे - मधुसूदनाश्रयाः - श्रीकृष्णाचा आश्रय घेऊन राहिलेले - रामादयः दशार्हाः - बलरामादि यादव - वरं अनिरुद्धं - नवरा मुलगा जो अनिरुद्ध त्याला - सूर्यया सह - नवीन वरलेल्या वधूसह - रथं समारोप्य - रथात बसवून - भोजकटात् कुशस्थलीं ययुः - भोजकट नगरातून द्वारकेला गेले. ॥४०॥ अध्याय एकसष्ठावा समाप्त |