श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५७ वा - अन्वयार्थ

स्यमंतक हरण, शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेत बोलावणे -

गोविंदः - श्रीकृष्ण - विज्ञातार्थः सन् अपि - जाणिला आहे खरा वृत्तांत ज्याने असा असताहि - पाण्डवान् कुंतीं दग्धान् आकर्ण्य - पांडव व कुंती जळून मेली असे ऐकून - कुल्यकरणे - कुळाला साजेशी विचारपूस करण्याकरिता - सहरामः कुरून् ययौ - बलरामासह कुरुदेशाला गेला. ॥१॥

भीष्मं सविदूरं कृपं गांधारीं द्रोणम् एव च - भीष्म, विदुरासह कृप, गांधारी आणि द्रोण यांसुद्धा सर्वांना - संगम्य - भेटून - तुल्यदुःखौ च - आणि त्यांच्याशी समदुःखी होऊन - हा कष्टं - अरेरे फार वाईट गोष्ट झाली - इति ह ऊचतुः - असे खरोखर म्हणाले. ॥२॥

राजन् - हे राजा - एतत् अन्तरं लब्ध्वा - ही संधी साधून - अक्रूरकृतवर्माणौ - अक्रूर व कृतवर्मा - कस्मात् मणिः न गृह्यते - काय कारणास्तव स्यमंतक मणी घेत नाहीस ? - (इति) शतधन्वानं ऊचतुः - असे शतधन्व्याला म्हणाले. ॥३॥

यः अस्मभ्यं कन्यारत्‍नं संप्रतिश्रुत्य - जो आम्हाला मुलगी देण्याचे वचन देऊन - नः विगर्ह्य - आमचा तिरस्कार करून - कृष्णाय अदात् - श्रीकृष्णाला देता झाला - (सः) सत्राजित् - तो सत्राजित - भ्रातरं कस्मात् न अन्वियात् - भाऊ जो प्रसेन त्याच्या मागोमाग का न जावा ? ॥४॥

एवं ताभ्यां भिन्नमतिः - याप्रमाणे अक्रूर व कृतवर्मा यांनी मोहित केली आहे बुद्धि ज्याची असा - असत्तमः क्षीणजीवितः सः पापः - अत्यंत दुष्ट व संपले आहे आयुष्य ज्याचे असा पापी शतधन्वा - लोभात् - लोभामुळे - शयानं सत्राजितम् अवधीत् - निजलेल्या सत्राजिताला मारिता झाला. ॥५॥

(तस्य) स्त्रीणां अनाथवत् क्रन्दन्तीनां विक्रोशमानानां च - सत्राजिताच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडून आक्रोश करीत असताना - पशून् सौनिकवत् - पशूंना जसा खाटिक त्याप्रमाणे - (तं) हत्वा - त्या सत्राजिताला मारून - मणिम् आदाय - स्यमंतक मणी घेऊन - जग्मिवान् - निघून गेला. ॥६॥

च - आणि - सत्यभामा - सत्यभामा - पितरं हतं वीक्ष्य - पित्याला मारिलेला पाहून - शुचार्दिता (भूत्वा) - शोकाकुल होऊन - तात तात इति - अहो बाबा, अहो बाबा असे - हा हता अस्मि इति - अरे माझा घात झाला असे म्हणून - मुह्यती - मूर्च्छित झालेली - व्यलपत् - विलाप करिती झाली. ॥७॥

तप्ता (सा) - दुःख पावलेली ती सत्यभामा - मृतं तैलाद्रोण्यां प्रास्य - मेलेल्या पित्याला तेलाच्या बुधल्यात ठेवून - गजसाह्वयम् जगाम - हस्तिनापुरला गेली - विदितार्थाय कृष्णाय - ज्याला खरा प्रकार माहित आहे अशा श्रीकृष्णाला - पितुः वधं आचख्यौ - पित्याचा वध झाल्याचे सांगती झाली. ॥८॥

राजन् - हे परीक्षित राजा - ईश्वरौ - बलराम व कृष्ण - तत् आकर्ण्य - ते ऐकून - नृलोकतां अनुसृत्य - मनुष्यधर्माला अनुसरून - अहो नः परमं कष्टं - केवढे हो आमच्यावर मोठे संकट आले - इति - असे म्हणून - अस्राक्षौ विलेपतुः - डोळ्यात अश्रू आहेत ज्यांच्या असे विलाप करिते झाले. ॥९॥

सभार्यः साग्रजः भगवान् - पत्‍नीसह व बलरामासह श्रीकृष्ण - तस्मात् - त्या हस्तिनापुरातून - पुरं आगत्य - द्वारकानगरीला येऊन - शतधन्वानं हन्तुम् ततः च मणिं हर्तुं आरेभे - शतधन्व्याला मारण्याच्या व त्यापासून मणी हरण करण्याच्या उद्योगाला लागला. ॥१०॥

सः अपि - शतधन्वासुद्धा - कृष्णोद्यमं ज्ञात्वा - श्रीकृष्णाचा उद्योग जाणून - भीतः - भ्यालेला असा - प्राणपरीप्सया - प्राणरक्षणाच्या इच्छेने - कृतवर्माणं - कृतवर्म्याला - साहय्ये अयाचत - साहाय्यासाठी प्रार्थिता झाला - सः च अब्रवीत् - पण तो कृतवर्मा म्हणाला. ॥११॥

ईश्वरयोः रामकृष्णयोः - सर्वसमर्थ अशा बलराम व श्रीकृष्ण यांच्याशी - हेलनं न कुर्याम् - मी विरोध करणार नाही - तयोः वृजिनम् आचरन् - त्या रामकृष्णांचा अपराध करणारा - कः नु क्षेमाय कल्पेत - कोणता पुरुष कल्याण मिळविण्यास तयार होईल बरे ॥१२॥

यद्‌द्वेषात् - ज्या रामकृष्णांशी शत्रुत्व केल्यामुळे - श्रिया त्याजितः - लक्ष्मीने टाकिलेला - सानुगः कंसः अपीतः - अनुचरासह कंस मृत झाला - जरासंधः - जरासंध - सप्तदशसंयुगान् - सतरा युद्धांमध्ये - विरथः गतः - विरथ होऊन गेला. ॥१३॥

(तेन) प्रत्याख्यातः सः च - त्या कृतवर्म्याने नाकारलेला तो शतधन्वा - अक्रूरं पार्ष्णिग्राहं अयाचत - अक्रूराला सहायक म्हणून याचिता झाला - सः अपि - तो अक्रूरसुद्धा - ईश्वरयोः बलं विद्वान् कः - समर्थ अशा रामकृष्णांचे बळ जाणणारा कोणता पुरुष - (तयोः) विरुद्‌ध्येत (इति) आह - त्या दोघांच्या विरुद्ध आचरण करील असे म्हणाला. ॥१४॥

यः - जो - विश्वं - हे जग - लीलया सृजति अवति हन्ति च - लीलेने उत्पन्न करतो, रक्षितो व नष्ट करितो - अजया मोहिताः (जनाः) - मायेने मोहित झालेले लोक - विश्वसृजः यस्य - जो जग निर्माण करतो अशा - तस्य चेष्टां न विदुः - त्या ईश्वराची लीला जाणत नाहीत. ॥१५॥

यः सप्तहायनः बालः (सन्) - जो सात वर्षांचा बालक असताना - एकेन पाणिना शैलम् उत्पाटय - एका हाताने पर्वत उपटून - अर्भकः उच्छिलीन्ध्रम् इव - बालक जसे अळंब्याला उचलते त्याप्रमाणे - लीलया दधार - लीलेने धरिता झाला. ॥१६॥

अद्‌भुतकर्मणे आदिभूताय कूटस्थाय - आश्चर्यकारक कर्मे करणारा, सर्वांच्या आदि आणि अविकार्य अशा - अनन्ताय - अविनाशी - आत्मने तस्मै भगवते कृष्णाय नमः नमः - सर्वव्यापी त्या षड्‌गुणैश्वर्यसंपन्न कृष्णाला वारंवार नमस्कार असो. ॥१७॥

(एवं) तेन अपि प्रत्याख्यातः - याप्रमाणे त्या अक्रूरानेहि निषेधिलेला - सः शतधन्वा - तो शतधन्वा - महामणिं तस्मिन् न्यस्य - स्यमंतकमणी त्या अक्रूराजवळ ठेवून - शतयोजनगं - चारशे कोस वेगाने चालणार्‍या - अश्वं आरुह्य - घोडयावर बसून - ययौ - जाता झाला. ॥१८॥

राजन् - हे राजा - रामजनार्दनौ - बलराम व श्रीकृष्ण - गरुडध्वजं रथम् आरुह्य - ज्याच्या ध्वजावर गरुड बसला आहे अशा रथात बसून - महावेगैः अश्वैः - मोठया वेगाने धावणार्‍या घोडयांच्या योगे - गुरुद्रुहुं अन्वयाताम् - गुरूचा द्रोह करणार्‍या शतधन्व्याचा पाठलाग करिते झाले. ॥१९॥

मिथिलायां उपवने - मिथिलेतील उपवनात - पतितं हयं विसृज्य - पडलेल्या घोडयाला सोडून - संत्रस्तः पद्‌भ्याम् अधावत् - पीडित झालेला असा पायांनीचा धावू लागला - कृष्णः अपि रूषा अन्वद्रवत् - श्रीकृष्णहि क्रोधाने त्याच्या मागोमाग धावला. ॥२०॥

पदातिः भगवान् - पायाने धावणारा श्रीकृष्ण - पदातेः तस्य - पायाने धावणार्‍या शतधन्व्याचे - शिरः - मस्तक - तिग्मनेमिना चक्रेण उत्कृत्य - तीक्ष्ण धारेच्या सुदर्शन चक्राने तोडून - (तस्य) वाससोः मणिं व्यचिनोत् - त्याच्या दोन्ही वस्त्रांमध्ये स्यमंतकमणी शोधिता झाला. ॥२१॥

अलब्धमणिः कृष्णः - स्यमंतकमणी न सापडलेला श्रीकृष्ण - अग्रजान्तिकम् आगत्य - ज्येष्ठ बंधू जो बलराम त्याजवळ येऊन - आह - म्हणाला - शतधनुः वृथा हतः - शतधन्वा उगीच मारिला - तत्र मणिः न विद्यते - त्याच्यापाशी मणी नाही. ॥२२॥

ततः बलः आह - तेव्हा बलराम म्हणाला - सः मणिः - तो मणी - शतधन्वना नूनं कस्मिंश्चित् पुरुषे न्यस्तः - शतधन्व्याने खरोखर कोणत्या तरी पुरुषाजवळ ठेविला असावा - तं अन्वेष (ततः) पुरं व्रज - त्याला शोध, व नंतर नगरीत जा. ॥२३॥

अहं मम प्रियतमं विदेहं द्रष्टुं इच्छामि - मी माझ्या अत्यंत प्रिय अशा जनकराजाला भेटू इच्छितो - इति उक्त्वा - असे बोलून - राजन् - हे राजा - यदुनन्दनः - बलराम - मिथिलां विवेश - मिथिला नगरीत शिरला. ॥२४॥

मैथिलः - जनकराजा - तं दृष्टवा सहसा उत्थाय - त्या बलरामाला पाहून एकाएकी उठून - प्रीतमानसः - प्रसन्न अंतःकरण झालेला - अर्हणीयं (तं) - पूज्य अशा त्या बलरामाला - समर्हणैः विधिवत् अर्हयामास - पूजासामग्रीने यथाशास्त्र पूजिता झाला. ॥२५॥

विभुः - व्यापक असा बलराम - तस्यां मिथिलायां - त्या मिथिलानगरीत - प्रीतियुक्तेन महात्मना जनकेन मानितः - प्रेमळ व थोर मनाच्या जनकाने सत्कारिलेला असा - कतिचित् समाः उवास - कित्येक वर्षे राहिला - ततः - त्याच्यापासून - धार्तराष्ट्रः सुयोधनः - धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन - काले गदां अशिक्षत् - योग्य काळी गदाविद्या शिकला. ॥२६॥

प्रियायाः प्रियकृत् विभुः केशवः - पत्‍नी जी सत्यभामा तिचे प्रिय करणारा सर्वव्यापी श्रीकृष्ण - द्वारकां एत्य - द्वारकेत येऊन - शतधन्वनः निधनं - शतधन्व्याचा मृत्यू - मणेः च अप्राप्तिं प्राह - व स्यमंतकमण्याची प्राप्ति न झाल्याचे सांगता झाला. ॥२७॥

ततः सः भगवान् - नंतर तो श्रीकृष्ण - सुहृद्‌भिः साकं - बांधवांसह - याः याः सांपरायिकाः क्रियाः स्युः - ज्या ज्या पारलौकिक क्रिया आहेत - (ताः) - त्या - हतस्य बन्धोः वै कारयामास - मेलेल्या सत्राजिताच्या खरोखर करविता झाला. ॥२८॥

प्रयोजकौ अक्रूरः कृतवर्मा च - शतधन्व्याचे प्रेरक अक्रूर आणि कृतवर्मा - शतधनोः वधं श्रुत्वा - शतधन्व्याचा वध ऐकून - भयवित्रस्तौ - भीतीने गांगरून गेलेले असे - द्वारकायाः व्यूषतुः - द्वारकेतून निघून गेले. ॥२९॥

अक्रूरे प्रोषिते - अक्रूर द्वारकेतून निघून गेला असता - द्वारकौकसां अरिष्टानि आसन् वै - द्वारकावासी जनांना दुश्चिन्हे होऊ लागली - दैविकभौतिकाः - आधिदैविक व आधिभौतिक असे - शारीराः मानसाः तापाः मुहुः (अभजन्) - शारीरिक व मानसिक असे ताप वारंवार होऊ लागले. ॥३०॥

अङग - हे राजा - एके - कित्येक लोक - प्रागुदाहृतं विस्मृत्य - पूर्वी सांगितलेल्या श्रीकृष्ण माहात्म्याला विसरून - मुनिवासनिवासे - मुनींचे निवासस्थान अशा श्रीकृष्णाच्या रहाण्याच्या ठिकाणी - अरिष्टदर्शनं घटेत किं - दुश्चिन्हे उद्‌भवणे संभवनीय आहे काय ? असे म्हणू लागले. ॥३१॥

काशीशः - काशीपति - काशिषु देवे अवर्षति - काशीदेशामध्ये पाऊस पडत नाहीसा झाला असता - आगताय श्वफल्काय - आलेल्या श्वफल्काला - स्वसुतां गांदिनी वै प्रादात् - आपली कन्या जी गांदिनी ती खरोखर देता झाला - ततः अवर्षत् स्म - नंतर पाऊस पडला. ॥३२॥

तत्प्रभावः तत्सुतः असौ अक्रूरः - तसाच पराक्रम करणारा त्या श्वफल्काचा पुत्र अक्रूर - यत्र यत्र आस्ते तत्र देवः अभिवर्षते ह - जेथे जेथे असतो तेथे तेथे पाऊस पडतो - उपतापाः न - व त्रिविध ताप होत नाहीत - मारिकाः न - कालर्‍यासारखे मारक रोग होत नाहीत. ॥३३॥

इति वृद्धवचः श्रुत्वा - असे वृद्धांचे भाषण ऐकून - एतावत् इह कारणं न इति मत्वा - एवढेच केवळ ह्याला कारण नाही असे मानून - जनार्दनः अक्रूरं समानाय्य प्राह - श्रीकृष्ण अक्रूराला बोलावून म्हणाला. ॥३४॥

विदिताखिलचित्तज्ञः स्मयमानः (सः) - सर्वांच्या अन्तःकरणांतील अभिप्राय जाणणारा व मंद हास्य करणारा तो श्रीकृष्ण - एनं पूजयित्वा - ह्या अक्रूराची पूजा करून - अभिभाष्य - विचारपूस करून - प्रियाः कथाः कथयित्वा - आवडत्या कथा सांगून - उवाच ह - बोलला. ॥३५॥

दानपते - हे दान देणार्‍यांमध्ये श्रेष्ठ अक्रूरा - शतधन्वना - शतधन्वाने - त्वयि - तुझ्या ठिकाणी - श्रीमान् स्यमन्तकः मणिः - शोभायमान स्यमंतक मणी - ननु न्यस्तः आस्ते - खरोखर ठेव म्हणून ठेविली आहे. ॥३६॥

सत्राजितः अनपत्यत्वात् - सत्राजिताला पुत्र नसल्यामुळे - दुहितुः सुताः - मुलीचे मुलगे - अपः पिण्डान् च निनीय - त्याला पाणी व पिंड देऊन - ऋणं च विमुच्य - आणि त्याला तीन्ही ऋणांतून मुक्त करून - शेषितं दायं - उरलेले धन - गृह्‌णीयुः - घेवोत. ॥३७॥

तथापि - तरी - अन्यैः दुर्धरः मणिः तु - दुसर्‍यांनी धारण करण्यास कठीण असा स्यमंतकमणी मात्र - त्वयि आस्तां - तुझ्याजवळ राहो - किंतु - परंतु - अग्रजः - ज्येष्ठ बंधु बलराम - मणिं प्रति - मण्याच्या बाबतीत - मां सम्यक् न प्रत्येति - माझ्यावर चांगला विश्वास ठेवीत नाहीत. ॥३८॥

महाभाग - हे थोर भाग्याच्या अक्रूरा - (तस्मात्) (तं) दर्शयस्व - ह्यासाठी स्यमंतकमणी दाखीव - बंधूनां शांतिम् आवह - व बांधवांना शांति दे - अद्य ते रुक्मवेदयः मखाः - आज तुझे सुवर्णाची वेदी असणारे यज्ञ - अव्युच्छिन्नाः वर्तन्ते - अखंड चालले आहेत. ॥३९॥

एवं सामभिः आलब्धः - याप्रमाणे शांततेच्या उपायांनी उपदेशिलेला - श्वफल्कतनयः - श्वफल्काचा पुत्र अक्रूर - वाससा आच्छन्नं - वस्त्राने गुंडाळलेला - सूर्यसमप्रभम् - सूर्याप्रमाणे तेज असणारा - मणिम् आदाय - स्यमंतक मणी घेऊन - (कृष्णाय) ददौ - कृष्णाला देता झाला. ॥४०॥

प्रभुः - श्रीकृष्ण - स्यमंतकं ज्ञातिभ्यः दर्शयित्वा - स्यमंतक बांधवांना मणी दाखवून - आत्मनः रजः मणिना विसृज्य - आपल्यावरील आरोप मण्याच्या योगे दूर करून - भूयः तस्मै प्रत्यपर्यत् - पुनः त्या अक्रूराला परत देता झाला. ॥४१॥

यः तु - जो कोणी पुरुष - भगवतः ईश्वरस्य विष्णोः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न भगवान विष्णूचे - वीर्याढयं वृजिनहरं सुमङगलं च एतत् आख्यानं - पराक्रमाने युक्त, पातकाचे क्षालन करणारे आणि अत्यंत मंगल असे हे चरित्र - पठति शृणोति वा अनुस्मरेत् - पठण करितो, श्रवण करितो किंवा सतत स्मरतो - (सः) दुष्कीर्तिं दुरितं (च) अपोह्य - तो अपकीर्ति आणि पातक ह्यांचा नाश करून - शान्तिं याति - शांततेला प्राप्त होतो. ॥४२॥

अध्याय सत्तावन्नावा समाप्त

GO TOP



सत्तावन्नावा अध्याय समाप्त -