श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४६ वा - अन्वयार्थ

उद्धवाचे व्रजगमन -

वृष्णीनां प्रवरः मंत्री - यादवांमध्ये श्रेष्ठ व सल्लामसलत देणारा साक्षात् बृहस्पतेः शिष्यः - प्रत्यक्ष बृहस्पतीचा शिष्य बुद्धिसत्तमः उद्धवः - विशालबुद्धीचा असा उद्धव कृष्णस्य दयितः सखा (आसीत्) - श्रीकृष्णाचा प्रिय मित्र होता. ॥१॥

प्रपन्नार्तिहरः - शरण आलेल्यांची पीडा दूर करणारा भगवान् हरिः - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण क्वचित् - एके प्रसंगी तं एकान्तिनं प्रेष्ठं भक्तं - त्या एकनिष्ठ व श्रेष्ठ अशा उद्धवाला पाणिं पाणिना गृहीत्वा आह - त्याचा हात आपल्या हाताने धरून म्हणाला. ॥२॥

सौ‌म्य उद्धव - हे शांत उद्धवा व्रजं गच्छ - गोकुळात जा नौ पित्रोः प्रीतिं आवह - आमच्या मातापित्यांना सुख होईल असे कर गोपीनां मद्वियोगाधिं - गोपींची माझ्या वियोगाने झालेली पीडा मत्संदेशैः विमोचय - माझ्य़ा निरोपांनी दूर कर. ॥३॥

ताः मन्मनस्काः - त्या माझ्यावर ज्यांचे मन मत्प्राणाः - व प्राण आसक्त झाले आहेत अशा मदर्थे त्यक्तदैहिकाः - माझ्याकरिता ज्यांनी देहाभिमान सोडून दिला आहे अशा च अहं - आणि मी ये मदर्थे त्यक्तलोकधर्माः - ज्यांनी माझ्यासाठी लौकिक धर्म सोडून दिले आहेत तान् बिभर्मि - त्यांचे पोषण करितो. ॥४॥

अङग - हे उद्धवा ताः गोकुलस्त्रियः - त्या गोपी प्रेयसां प्रेष्ठे मयि दुरस्थे - प्रियांमध्ये अत्यंत प्रिय असा मी दूर असताना (माम्) स्मरन्त्यः - माझ्या दर्शनाच्या विरहौत्कण्ठयविह्वलाः - वियोगामुळे लालसेने विव्हल झालेल्या विमुह्यन्ति - मूर्च्छित होतात. ॥५॥

मदात्मिकाः बल्लव्यः - मद्रूप झालेल्या गोपी मे प्रत्यागमनसंदेशैः - मी परत येईन अशा उद्देशांनी अति कृच्छ्‌रेण - मोठया कष्टाने प्रायः प्राणान् कथंचन धारयन्ति - बहुधा प्राण कष्टाने धारण करीत आहेत. ॥६॥

राजन् - हे राजा इति उक्तः आदृतः उद्धवः - अशारीतीने सांगून सत्कारलेला उद्धव भर्तुः संदेशं आदाय - श्रीकृष्णाचा निरोप घेऊन रथं आरुह्य - रथात बसून नंदगोकुलं प्रययौ - नंदाच्या गोकुळाला जाण्यास निघाला. ॥७॥

विभाबसौ निम्लोचति - सूर्य अस्ताला जात असता प्रविशतां - गोकुळात प्रवेश करणार्‍या पशूनां खुररेणुभिः - धेनूंच्या खुरांनी उडालेल्या धुळीने छन्नयानः - ज्याचा रथ आच्छादून गेला आहे श्रीमान् - असा श्रीमान उद्धव नंदव्रजं प्राप्तः - नंदाच्या गोकुळात येऊन पोचला. ॥८॥

वासितार्थे अभियुध्‌द्‌यद्भिः - ऋतुमती गाईंसाठी युद्ध करणार्‍या शुष्मिभिः वृषैः - उन्मत्त वृषभांनी (च) ऊधोभारैः - स्तनांच्या भारांनी स्ववत्सकान् - आपल्या वासरांकडे धावन्तीभिः वास्राभिः - धावत जाणार्‍या गायींनी नादितं (व्रजं विवेश) - गजबजलेल्या गोकुळात उद्धव गेला. ॥९॥

इतः ततः विलङ्‌घद्भिः - इकडे तिकडे धावणार्‍या सितैः गोवत्सैः - शुभ्र वर्णाच्या वासरांनी वेणूनां निस्वनेन च मण्डितं - आणि मुरलीच्या शब्दाने शोभणार्‍या गोदोहशब्दाभिरवं - गाईचे दूध काढण्याच्या शब्दांनी गजबजून गेलेल्या. ॥१०॥

बलकृष्णयोः - बलराम व श्रीकृष्ण शुभानि कर्माणि गायन्तीभिः - ह्यांची पवित्र कृत्ये गाणार्‍या स्वलंकृताभिः गोपीभिः च गौपैः - व अलंकार घातलेल्या गोपींनी व गोपांनी सुविराजितं (व्रजं विवेश) - शोभित झालेल्या गोकुळात उद्धव शिरला. ॥११॥

अग्न्यर्कातिथिगोविप्र - अग्नि, सूर्य, अतिथि, गाई, ब्राह्मण, पितृदेवार्चनान्वितैः - पितर, देव ह्यांच्या पूजनांनी युक्त गोपावासैः - गोपांच्या घरांनी माल्यैः च धूपदीपैः च - आणि फुले, धूप, दीप ह्यांनी मनोरमं (व्रजं विवेश) - रमणीय झालेल्या गोकुळात उद्धव गेला. ॥१२॥

सर्वतः पुष्पितवनं - तेथे सर्वठिकाणी उपवने प्रफुल्लित झाली आहेत अशा द्विजालिकुलनादितम् - जे पक्षी व भ्रमर ह्यांच्या समूहांच्या नादाने भरलेले हंसकारण्डवाकीर्णैः - व हंस, कारंडव ह्यांनी व्यापिलेल्या पद्मखण्डैः मण्डितं (व्रजं विवेश) - कमलवनांनी शोभणार्‍या गोकुळात गेला. ॥१३॥

नंदः - नंद आगतं कृष्णस्य प्रियं अनुचरं - आलेल्या श्रीकृष्णाचा आवडता सेवक अशा तं समागम्य - त्या उद्धवाजवळ येऊन परिष्वज्य प्रीतः - व आलिंगन देऊन प्रसन्न झालेला (तं) वासुदेवाधिया - हा श्रीकृष्णच अशा कल्पनेने अर्चयत् - उद्धवाला पूजिता झाला. ॥१४॥

परमान्नेन भोजितं - उत्तम अन्नाचे भोजन घातलेल्या कशिपौ सुखं संविष्टं - शय्येवर सुखाने बसविलेल्या उद्धवाला पादसंवाहनादिभिः - पाय चेपणे इत्यादिकांनी गतश्रमं (कृत्वा) - ज्याचे श्रम दूर झाले आहेत असा (तं) पर्यपृच्छत् - त्याला विचारिता झाला. ॥१५॥

अङग महाभाग - हे मोठया भाग्यवंता उद्धवा नः सखा शूरनंदनः - आमचा मित्र वसुदेव अपत्याद्यैः युक्तः - पुत्रादि परिवारांनी युक्त झाला आहे सुहृद्‌वृतः - मित्रांनी युक्त झाला आहे मुक्तः - मुक्त झाला आहे (सः) कुशली आस्ते कच्चित् - तो खुशाल आहे ना ॥१६॥

यः - जो साधूनां धर्मशीलानां - सदाचारी व धार्मिक अशा यदूनां सदा द्वेष्टि - यादवांचा नेहमी द्वेष करीत असे (सः) पापः कंसः - तो पापी कंस सानुगः - अनुयायांसह स्वेन पाप्मना दिष्टया हतः - आपल्या पापकर्माने सुदैवाने मारिला गेला. ॥१७॥

कृष्णः - श्रीकृष्ण नः मातरं - आम्हाला, मातेला सुहृदः सखीन् गोपान् - मित्र, सवंगडी व इतर गोप यांना आत्मनाथं व्रजं - आपणच आहे रक्षक ज्याचा अशा गोकुळाला गावः वृन्दावनं गिरिं - गाई, वृंदावन व गोवर्धन पर्वत ह्यांना स्मरति अपि - स्मरतो काय ॥१८॥

गोविंदः - श्रीकृष्ण स्वजनान् सकृत् ईक्षितुम् - आप्तेष्टांना एकवार पाहण्याकरिता आयास्यति अपि - येईल काय तर्हि - जर आला तरच सुनसं सुस्मितेक्षणं - सरळ नाकाचे व हास्यपूर्वक अवलोकन करणारे तद्वक्त्र द्रक्ष्यामः - त्या कृष्णाचे मुख पाहण्यास मिळेल. ॥१९॥

सुमहात्मना कृष्णेन - महात्म्या श्रीकृष्णाकडून दावाग्नेः वातवर्षात् - वणव्यापासून, वादळापासून, पावसापासून वृषसर्पात् - तसेच वृषासुरापासून, दुरत्ययेभ्यः मृत्यूभ्यः च - कालियापासून आणि टाळता न येणार्‍या अशा मृत्यूपासून रक्षिताः - आम्ही रक्षिले गेलो. ॥२०॥

अङग - हे उद्धवा कृष्णवीर्याणि - श्रीकृष्णाचे पराक्रम लीलापाङगनिरीक्षतं - लीलायुक्त अशा कटाक्षांनी पहाणे हसितं भाषितं च - हसणे व बोलणे स्मरतां नः - स्मरणार्‍या आमची सर्वाः क्रियाः शिथिलाः (भवन्ति) - सर्व कृत्ये शिथिल होतात. ॥२१॥

मुकुंदपदभूषितान् आक्रीडान् - श्रीकृष्णांच्या पायांनी भूषविलेली क्रीडांगणे सरिच्छैलवनोद्देशान् - नद्या, पर्वत, उपवने हे प्रदेश ईक्षमाणानां नः - अवलोकन करणार्‍या आमचे मनः तदात्मतां याति - मन श्रीकृष्णस्वरूपी लीन होऊन जाते. ॥२२॥

यथा गर्गस्य वचनं - जसे गर्ग मुनींचे भाषण (तथा) रामं च कृष्णं - त्याचप्रमाणे बलराम व श्रीकृष्ण इह सुराणां - ह्या भूलोकी देवांचे महदर्थाय प्राप्तौ - मोठे कार्य करण्याकरिता उत्पन्न झालेले सुरोत्तमौ मन्ये - श्रेष्ठ देव होत असे मी मानितो. ॥२३॥

(तौ) नागायुतप्राणं कंसं - ते दोघे दहा हजार हत्तीचे बळ असणार्‍या कंसाला मल्लौ तथा गजपतिं - दोन मल्लांना तसेच मोठया हत्तीला मृगाधिपः पशून् इव - सिंह पशुंना मारतो त्याप्रमाणे लीलया एवं अवधिष्टाम् - लीलेनेच मारिते झाले. ॥२४॥

(कृष्णः) तालत्रयं महासारं धनुः - श्रीकृष्ण तीन ताडांएवढे मोठे बळकट धनुष्य इभराट् यष्टिं इव बभञ्ज - जसा मोठा हत्ती काठीला त्याप्रमाणे मोडून टाकिता झाला एकेन हस्तेन - एका हाताने सप्ताहं गिरिं अदधात् - सात दिवस पर्वत धारण करिता झाला. ॥२५॥

येन इह - ज्याने याठिकाणी प्रलंबः धेनुकः अरिष्टः तृणावर्तः - प्रलंब, धेनुक, अरिष्ट व तृणावर्त सुरासुरजितः - देवदैत्यांना जिंकणारे बकादयः दैत्याः च लीलया हताः - बकासुरादि दैत्य लीलेने मारिले. ॥२६॥

इति संस्मृत्य संस्मृत्य - अशा रीतीने वारंवार स्मरण करून कृष्णानुरक्तधीः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी रमली आहे बुद्धी ज्याची असा अत्युत्कण्ठः - कृष्णाविषयी उत्सुक झालेला प्रेमप्रसरविह्वलः नंदः - व प्रेमभराने विव्हल झालेला नंद तूष्णीम् अभवत् - स्तब्ध झाला. ॥२७॥

वर्ण्यमानानि पुत्रस्य - वर्णन करण्याजोगी पुत्राची चरितानि श्रृण्वन्ति - चरित्रे श्रवण करणारी स्नेहस्नुतपयोधरा - स्तनांतून प्रेमाने दुधाच्या धारा वहात आहेत यशोदा अश्रूणि अस्राक्षीत् - अशी यशोदा नेत्रांतून प्रेमाने अश्रू सोडिती झाली. ॥२८॥

उद्धवः - उद्धव तयोः नन्दयशोदयोः - त्या नंद व यशोदा ह्या दोघांचे भगवति कृष्णे - भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी इत्थं परमं अनुरागं वीक्ष्य - ह्याप्रमाणे असलेले श्रेष्ठ प्रेम अवलोकन करून मुदा नन्दं आह - आनंदाने नंदाला म्हणाला. ॥२९॥

मानद - हे मान देणार्‍या नंदा युवां इह - तुम्ही उभयता ह्या लोकी देहिनां नूनं श्लाघ्यतमौ - खरोखर देहधारी लोकांमध्ये अत्यंत स्तुत्य आहा यत् - कारण अखिलगुरौ नारायणे - सर्वांचा गुरु अशा भगवंताच्या ठिकाणी ईदृशी मतिः कृता - अशाप्रकारची सद्‌बुद्धी ठेविली आहे. ॥३०॥

हि रामः मुकुन्दः च एतौ - खरोखर बलराम व श्रीकृष्ण हे दोघे विश्वस्य बीजयोनी - जगाच्या उत्पत्तीला कारणीभूत होत पुरुषः प्रधानं च - हेच पुरुष व प्रकृति होत इमौ पुराणौ - हे दोघे पुराणपुरुष होत भूतेषु अन्वीय - प्राण्यांमध्ये प्रवेश करून विलक्षणस्य ज्ञानस्य = विशिष्ट ज्ञानाच्या योगाने ईशाते - अधिपति झाले आहेत. ॥३१॥

जनः - लोक प्राणवियोगकाले - मृत्यूकाळी यस्मिन् शुद्धं मनः क्षणं समावेश्य - जेथे शुद्ध मन क्षणभर ठेवून आशु कर्माशयं निर्हृत्य - लवकरच कामवासनांचा त्याग करून ब्रह्ममयः अर्कवर्णः - ब्रह्मरूप व सूर्यकांतीचा होऊन परां गतिं याति - श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. ॥३२॥

महात्मन् - हे महात्म्या नंदा भवंतौ - तुम्ही उभयतांनी तस्मिन् अखिलात्महेतौ - त्या सर्वात्मरूपी व कारणमर्त्यमूर्तौ नारायणे - मनुष्यमूर्ति धारण करणार्‍या नारायणाच्या ठिकाणी नितरां भावं विधत्तां - अत्यंत भक्ति करीत आहा युवयोः सुकृत्यं किं वा - तुमच्या हातून कोणते पुण्यकर्म अवशिष्टं - करावयाचे राहिले आहे. ॥३३॥

भगवान् सात्वतां पतिः अच्युतः - यादवांचा अधिपति भगवान श्रीकृष्ण अदीर्घेण कालेन - थोडक्या कालावधीतच व्रजं आगमिष्यति - गोकुळात येईल पित्रोः प्रियं विधास्यते - मातापित्यांचे प्रिय करील. ॥३४॥

कृष्णः - श्रीकृष्ण रंगमध्ये - रंगभूमीवर सर्वसात्वतां प्रतीपं कंसं हत्वा - सर्व यादवांचा शत्रु जो कंस त्याला मारून वः समागत्य - तुम्हाजवळ येऊन यत् आह - जे म्हणाला तत् सत्यं करोति - ते खरे करील. ॥३५॥

महाभागौ - हे महाभाग्यवंता नंदा, हे यशोदे मा खिद्यतम् - खेद करू नका अन्तिके कृष्णं द्रक्ष्‌यथ - लवकरच कृष्णाला पाहाल सः भूतानां अन्तर्ह्लदि - तो प्राण्यांच्या हृदयात एधसि ज्योतिः इव - काष्ठातील अग्नीप्रमाणे आस्ते - रहातो. ॥३६॥

अमानिनः समानस्य अस्य - निरभिमानी व समबुद्धी अशा ह्याला प्रियः वा अप्रियः न अस्ति - प्रिय किंवा अप्रिय नाही उत्तमः अधमः अपि नास्ति - उच्च व नीचहि नाही असमः अपि वा न - विषमहि कोणी नाही. ॥३७॥

तस्य माता न पिता न - त्याला आई नाही बाप नाही भार्या न सुतादयः न - स्त्री नाही व पुत्रादिकही नाहीत आत्मीयः न च परः अपि न - आपलाहि नाही आणि परकाहि नाही देहः च जन्म एव न - देह व जन्मसुद्धा नाही. ॥३८॥

अस्य कर्म अपि न - ह्याला कर्महि नाही सः क्रीडार्थं - तो क्रीडेसाठी साधूनां परित्राणाय च - आणि साधूंच्या रक्षणासाठी सदसन्मिश्रयोनिषु - रामादि सद्योनि, मत्स्यादि असद्योनि व नरसिंहादि मिश्र योनी कल्पते - ह्यांमध्ये अवतार धारण करितो. ॥३९॥

निर्गुणः अपि - निर्गुण असूनहि सत्त्वं रजः तमः इति गुणान् भजते - सत्त्व, रज, व तम अशा गुणांचे सेवन करितो अतीतः - गुणांच्या पलीकडे असलेला तो अजः क्रीडन् - जन्मरहित असूनहि क्रीडा करीत गुणैः सृजति - गुणांच्या योगे उत्पत्ति करितो अवति च हन्ति - रक्षितो व संहार करितो. ॥४०॥

यथा मही - जशी पृथ्वी भ्रमरिकादृष्टया - दृष्टि फिरू लागली असता भ्राम्यती इव ईयते - फिरल्यासारखी दिसते (तथा) चित्ते कर्तरि - त्याचप्रमाणे चित्त कर्म करीत असता तत्र अहंधिया आत्मा - तेथे मीपणाने आत्मा कर्ता इव स्मृतः - कर्ता म्हणून समजला जातो. ॥४१॥

अयं भगवान् हरिः - हा सर्वगुणसंपन्न श्रीकृष्ण युवयोः एव आत्मजः न एव - तुमचा पुत्र नव्हेच हि सः सर्वेषां आत्मजः - तो तर सर्वांचा पुत्र होय आत्मा पिता माता ईश्वरः - आत्मा, पिता, माता व ईश्वर होय. ॥४२॥

दृष्टं श्रुतं भूतभवद्भविष्यत् - पाहिलेले, ऐकिलेले भूत, वर्तमान व भविष्य स्थास्नुः चरिष्णुः महत् अल्पकं च - स्थावर, जंगम, मोठे व लहान वस्तु - पदार्थ अच्युतात् विना - श्रीकृष्णाहून वेगळे आहेत तरां न वाच्यं - असे कधीही सांगता येत नाहीत परमार्थभूतः सः एव सर्वं - सत्यस्वरूपी तो सर्वत्र भरला आहे. ॥४३॥

राजन् - हे परीक्षित राजा नंदस्य कृष्णानुचरस्य च - नंद व कृष्णसेवक उद्धव ह्यांचा एवं ब्रुवतोः - अशा रीतीने संवाद चालला असताना सा निशा व्यतीता - ती रात्र निघून गेली गोप्यः समुत्थाय - गोपी उठून दीपान् निरूप्य - दिवे लावून वास्तून् समभ्यर्च्य - वास्तुदेवतांना पुजून दधीनि अमन्थन् - दही घुसळू लागल्या. ॥४४॥

रज्जूः विकर्षद् - मंथनरज्जू ओढीत असल्यामुळे भुजकंकणस्रजः - हातांतील कांकणे शब्द करीत होती व माळा हालत होत्या अशा चलन्नितम्बस्तनहारकुण्डल - ज्यांचे नितंब, स्तन, हार, कुंडले हालत असून त्विषत्कपोलारुण - कुंडलांच्या कांतींनी आरक्त झालेले गाल कुङ्‌कुमाननाः - व आपल्या मुखावर केशर लाविले आहे अशा ताः दीपदीप्तैः - त्या गोपी दिव्यांनी प्रकाशणार्‍या मणिभिः विरेजुः - मण्यांनी अधिक शोभल्या. ॥४५॥

दध्नः निर्मन्थनशब्दमिश्रितः - दह्याच्या मंथनापासून निघणार्‍या शब्दाने युक्त अरविन्दलोचनं उदायतीनां - श्रीकृष्णलीलांचे गायन करणार्‍या व्रजाङगनानां ध्वनिः - गोपींचा शब्द दिवं अस्पृशत् - स्वर्गापर्यंत जाऊन पोचला येन दिशां अमङ्गलं निरस्यते - ज्या शब्दाने दिशांमधील पापांचा नाश होतो. ॥४६॥

व्रजौकसः - गोकुळातील लोक भगवति सूर्ये उदिते - भगवान सूर्य उगवला असता नंदद्वारि शातकौ‌म्भं रथं दृष्टवा - नंदाच्या दरवाज्याशी सुवर्णाचा रथ पाहून कस्य अयम् इति अब्रुवन् - कोणाचा हा रथ असे म्हणाले. ॥४७॥

यः कंसस्य अर्थसाधकः - जो कंसाचा कार्यभाग साधणारा येन च - आणि ज्याने कमललोचनः कृष्णः - कमळाप्रमाणे नेत्र असणारा श्रीकृष्ण मधुपुरीं नीतः - मथुरेला नेला (सः) अक्रूरः आगतः किं वा - तो अक्रूर आला की काय. ॥४८॥

प्रीतस्य भर्तुः निष्कृतिं - संतुष्ट झालेल्या स्वामींचे उत्तर कार्य अस्माभिः साधयिष्यति किं - आमच्या योगे संपादन करणार की काय इति वदन्तीनां स्त्रीणाम् - असे स्त्रिया बोलत असता कृताह्निकः उद्धवः अगात् - नित्यकृत्य समाप्त केलेला उद्धव तेथे प्राप्त झाला. ॥४९॥

अध्याय सेहेचाळिसावा समाप्त

GO TOP