श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४५ वा - अन्वयार्थ

श्रीकृष्ण-बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश -

पुरुषोत्तमः - श्रीकृष्ण पितरौ उपलब्धार्थौ विदित्वा - मातापिता ज्ञानसंपन्न झाले असे जाणून (एवं) मा भूत् इति - असे होऊ नये म्हणून जनमोहिनी - लोकांना मोहित करणार्‍या निजां मायां ततान - स्वतःच्या मायेला पसरविता झाला. ॥१॥

साग्रजःसाक्त्त्वर्षभः - भावांसह यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण पितरौ एत्य - मातापित्यांजवळ येऊन प्रश्नयावनतः - नम्रतापूर्वक लीन होऊन अंब तात इति प्रीणन् - हे माते, अहो बाबा असे म्हणून त्यांना आनंदविणारा होऊन सादरम् उवाच - आदराने बोलू लागला. ॥२॥

तात - अहो बाबा नित्योत्कण्ठितयोः अपि युवयोः - नेहमी उत्सुक झालेल्याहि तुम्हा उभयतांना अस्मत्तः पुत्राभ्यां - आम्हा पुत्रांकडून बाल्यपौगण्डकैशोराः - बाल्य, पौगंड व किशोर या अवस्थांतील सुखे क्वचित् न अभवन् - केव्हाही मिळाली नाहीत. ॥३॥

दैवहतयोः नौ - दुर्दैवी अशा आम्हाला भवदन्तिके वासः न लब्धः - तुमच्याजवळ रहावयास मिळाले नाही पितृगेहस्थः लालितः बालः - पितृगृही राहून लालनपालन केली गेलेली मुले यां मुदं विन्दन्ते - जो आनंस मिळवितात. ॥४॥

मर्त्यः - मनुष्य सर्वार्थसंभवः - सर्व पुरुषार्थ मिळवून देणारा देहः यतः जनितः - देह ज्यापासून उत्पन्न झाला च पोषितः - आणि पोषिला गेला तयोः पित्रोः निर्वेशं - त्या मातापित्यांचे उपकार फेडणे शतायुषा न याति - शंभर वर्षाचे आयुष्य खर्ची घातले तरी शक्य होणार नाही. ॥५॥

यः आत्मनः कल्पः - जो स्वतः सामर्थ्यवान असून आत्मना धनेन च - शरीर कष्टाने व द्रव्यद्वाराने तयोः वृत्तिं न दद्यात् - त्या मातापित्यांचे पोषण करीत नाही (यमदूताः) तं प्रेत्य - यमदूत त्याच्याकडून मरणानंतर स्वमांसं खादयन्ति - स्वतःचेच मांस खावयाला लावितात. ॥६॥

कल्पः - अंगी सामर्थ असून मातरं वृद्धं पितरं - माता, वयोवृद्ध पिता भार्यां साध्वीं शिशुं सुतं - पतिव्रता पत्नी व अल्पवयी बालक गुरुं प्रियं च प्रपन्नं - गुरु, ब्राह्मण व शरणागत ह्यांना अबिभ्रत् - न पोसणारा श्वसन् मृतः - जिवंत असूनहि मेल्यासारखा होय. ॥७॥

तत् कंसात् - म्हणून कंसापासून नित्यं उद्विग्नचेतसोः अकल्पयोः - नेहमी भ्यालेल्या व असमर्थ वां अनर्चतोः नौ - आणि तुमची सेवा न करणार्‍या आमचे एते दिवसाः मोघं व्यतिक्रान्ताः - इतके दिवस निरर्थ गेले. ॥८॥

तात - अहो बाबा मातः - हे आई तत् - म्हणून दुर्हृदा भृशं क्लिष्टयोः - दुष्ट कंसाने अत्यंत क्लेशहि केलेल्या वां शुश्रूषां अकुर्वतोः - तुमची सेवा न करणार्‍या परतन्त्रयोः नौ - पराधीन अशा आम्हा दोघांना क्षन्तुं अर्हथः - क्षमा करण्यास योग्य आहा. ॥९॥

मायामनुष्यस्य - मायेने मनुष्यरूप घेणार्‍या विश्वात्मनः हरेः - विश्वरूपी श्रीकृष्णाच्या इति गिरा मोहितौ - ह्या वाणीने मोहित झालेली वसुदेवदेवकी अङ्‌कं आरोप्य - मांडीवर घेऊन (च) परिष्वज्य - आणि आलिंगन देऊन मुदं आपतुः - आनंदित झाली. ॥१०॥

राजन् - हे परीक्षित राजा विमोहितौ - मोहित झालेले स्नेहपाशेन आवृतौ - व प्रेमपाशाने वेष्टून गेलेले अश्रुधाराभिः सिञ्चन्तौ - अश्रुधारांनी स्नान घालणारे बाष्पकण्ठौ (पितरौ) - सद्‌गदित कंठ झालेले मातापिता न किंचित् ऊचतुः - काहीहि बोलले नाहीत. ॥११॥

भगवान् देवकीसुतः - भगवान श्रीकृष्ण पितरौ एवं आश्वास्य - आई बापांचे याप्रमाणे समाधान करून मातामहं उग्रसेनं तु - आईचा पिता जो उग्रसेन त्याला तर यदूनां नृपं अकरोत् - यादवांचा राजा करिता झाला. ॥१२॥

आह च - आणि म्हणाला महाराज - हे राजाधिराजा प्रजाः अस्मान् - तुझी प्रजा अशा आम्हांला आज्ञप्तुं अर्हसि - आज्ञा करण्यास योग्य आहेस यदुभिः ययातिशापात् - यादवांनी ययातीच्या शापामुळे नृपासने न आसितव्यं - राज्यासनावर बसणे योग्य नव्हे. ॥१३॥

मयि भृत्ये उपासीने - मी सेवक जवळ असताना अवनताः विबुधादयः - नम्र झालेले देवादिक भवतः बलिं हरन्ति - तुला करभार अर्पण करतील उत अन्ये नराधिपाः किम् - मग इतर राजांची कथा काय ॥१४॥

विश्वकृत् - जगाची उत्पत्ति करणारा श्रीकृष्ण कंसभयाकुलान् - कंसाच्या भीतीने व्याकुळ झालेल्या सर्वान् स्वान् ज्ञातिसंबन्धान् - सर्व आपल्या आप्तेष्टांना यदुवृष्ण्यन्धकमधु - यदु, वृष्णि, अंधक, मधु, दाशार्हकुकुरादिकान् - दाशार्ह व कुकुर इत्यादि वंशात उत्पन्न झालेल्यांना दिग्भ्यः (आनाय्य) - सर्व दिशांकडून आणून विदेशावासकर्षितान् - परदेशी राहिल्यामुळे कृश झालेल्या सभाजितान् समाश्वास्य - सत्कारलेल्या त्यांचे समाधान करून वित्तैः संतर्प्य - द्रव्यांनी संतुष्ट करून स्वगेहेषु न्यवासयत् - आपापल्या घरात राहविता झाला. ॥१५-१६॥

कृष्णसङ्‌कर्षणभुजैः गुप्ताः - श्रीकृष्ण व बलराम यांच्या बाहुबलाने रक्षिलेले कृष्णरामगतज्वराः - श्रीकृष्ण व बलराम यांच्या सहाय्याने सर्व पीडा नष्ट पावलेले असे लब्धमनोरथाः सिद्धाः - ज्यांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत असे कृतार्थ झालेले यादव गृहेषु रेमिरे - घरांमध्ये आनंदाने राहू लागले. ॥१७॥

नित्यं प्रमुदितं - नेहमी आनंदित असणारे श्रीमत् - शोभायमान व सदयास्मितवीक्षणं - दयापूर्वक हास्य करून सर्वत्र अवलोकन करणारे मुकुन्दवदनाम्बुजं - श्रीकृष्णाचे मुखकमल अहरहः वीक्षन्तः (ते) - दररोज पहाणारे ते प्रीताः - आनंदित होत असत. ॥१८॥

तत्र अक्षैः - तेथे नेत्रांनी मुकुन्दस्य मुखाम्बुजसुधां - श्रीकृष्णाचे मुखकमलामृत मुहुः पिबन्तः - वारंवार पिणारे प्रवयसः अपि - वृद्धसुद्धा अतिबलौजसः युवानः आसन् - अतिबलिष्ठ व तरुण बनले. ॥१९॥

राजेन्द्र - हे राजा अथ - नंतर भगवान् देवकीसुतः - भगवान श्रीकृष्ण च संकर्षणः - आणि बलराम नन्दं समासाद्य - नंदाजवळ येऊन (च) परिष्वज्य - आणि आलिंगन देऊन इदं ऊचतुः - याप्रमाणे बोलते झाले. ॥२०॥

पितः - अहो बाबा स्निग्धाभ्यां युवाभ्यां - प्रेमळ अशा तुम्हांकडून भृशं पोषितौ - उत्तमरीतीने पोषिले गेलो हि - कारण पित्रोः - मातापित्यांची आत्मजेषु - पुत्रांच्या ठिकाणी आत्मनः अपि अभ्यधिका प्रीतिः - स्वतःपेक्षाहि अधिक प्रीति असते. ॥२१॥

यो - जे पोषणरक्षणे - पालनपोषण व रक्षण करण्यास अकल्पैः बंधुभिः - असमर्थ अशा बंधूंनी उत्सृष्टान् शिशून् - टाकून दिलेल्या बालकांचे स्वपुत्रवत् पुष्णीतां - आपल्या पुत्राप्रमाणे पोषण करितात सः पिता च सा (एव) जननी - तोच बाप व तीच माता होय. ॥२२॥

तात - अहो बाबा यूयं व्रजं यात - तुम्ही गोकुळात जा सुहृदां सुखं विधाय - आणि आप्तेष्टांना सुख देऊन स्नेहदुःखितान् ज्ञातीन् वः - प्रेमामुळे दुःखी झालेले संबंधी अशा तुम्हाला द्रष्टुं एष्यामः - भेटण्यास येऊ. ॥२३॥

भगवान् अच्युतः - भगवान श्रीकृष्ण एवं संव्रजं नन्दं सान्त्वय्य - याप्रमाणे गोपांसह नन्दाचे सांत्वन करून वासोलंकारकुप्याद्यैः - वस्त्रे, अलंकार व तांब्याची भांडी इत्यादिकांनी सादरं अर्हयामास - आदरपूर्वक पूजिता झाला. ॥२४॥

इति उक्तः प्रणयविह्वलः नन्दः - याप्रमाणे बोलून प्रेमाने विव्हल झालेला नंद तौ परिष्वज्य - त्या दोघांना आलिंगन देऊन अश्रुभिः नेत्रे पूरयन् - अश्रूंनी ज्याचे नेत्र भरून आले आहेत असा गोपैः सह व्रजं ययौ - गोपांसह गोकुळात गेला. ॥२५॥

राजन् - हे राजा अथ शूरसुतः - नंतर वसुदेव पुरोधसा च ब्राह्मणैः - पुरोहितांकडून व ब्राह्मणांकडून पुत्रयोः द्विजसंस्कृतिं - दोन्ही पुत्रांचे उपनयन संस्कार यथावत् समकारयत् - यथाविधि करविता झाला. ॥२६॥

रुक्ममालाः - सुवर्णाच्या माळा घातलेल्या स्वलंकृताः क्षौ‌ममालिनीः - अलंकार घातलेल्या व रेशमी झुली घातलेल्या सवत्साः गाः - अशा सवत्स गाई दक्षिणाः - दक्षिणा स्वलंकृतेभ्यः तेभ्यः - अलंकार घातलेल्या त्या ब्राह्मणांची संपूज्य अदात् - पूजा करून देता झाला. ॥२७॥

महामतिः - थोर मनाचा वसुदेव कृष्णरामजन्मर्क्षे - कृष्ण व राम ह्यांच्या जन्मनक्षत्री याः मनोदत्ताः आसन् - ज्या मनाने दिल्या होत्या (याः) च कंसेन अधर्मतः हृताः - आणि ज्या कंसाने अधर्माने हरण केल्या होत्या ताः अनुस्मृत्य अददात् - त्या गाई स्मरण करून देता झाला. ॥२८॥

ततः च - आणि त्यानंतर लब्धसंस्कारौ - ज्यांचे उपनयनादि संस्कार केले आहेत व सुव्रतौ - चांगल्या रीतीने व्रताचरण करीत आहेत असे ते दोघे बलराम व श्रीकृष्ण द्विजत्वं प्राप्य - द्विजपणाला मिळवून यदुकुलाचार्यात् गर्गात् - यदुकुलाचा आचार्य जो गर्ग ऋषि त्यापासून गायत्रं - गायत्र्युपदेशग्रहणपूर्वक व्रतं आस्थितौ - ब्रह्मचर्यव्रताचे अनुष्ठान करिते झाले. ॥२९॥

सर्वविद्यानां प्रभवौ - सर्व विद्यांचे उत्पादक सर्वज्ञौ - सर्व काही जाणणारे जगदीश्वरौ - त्रैलोक्याधिपति बलराम व श्रीकृष्ण नरेहितैः - मनुष्यासारख्या आचरणांनी नान्यसिद्धामलज्ञानं - स्वतःसिद्ध अशा निर्मळ ज्ञानाला गूहमानौ (स्तः) - आच्छादून टाकणारे झाले. ॥३०॥

अथौ - नंतर गुरुकुले वासं इच्छन्तौ - गुरुगृही राहण्याची इच्छा करणारे अवन्तीपुरवासिनं - अवंतिनगरीत राहणार्‍या सांदीपनिं नाम - सांदीपनि नामक काश्यं उपजग्मतुः - काश्यपगोत्री गुरूजवळ गेले. ॥३१॥

यथा (बत) उपसाद्य - योग्य पद्धतीने गुरूजवळ जाऊन दान्तौ - इंद्रियनिग्रह केलेले गुरौ - गुरूजवळ अनिन्दितां वृत्तिं ग्राहयन्तौ - योग्य वर्तन कसे ठेवावे हे लोकांना शिकविणारे आदृतौ तौ - आदरसत्कार केलेले ते बलराम व श्रीकृष्ण भक्त्या देवं इव - भक्तीने जसे देवाजवळ जावे उपेतौ स्म - तसे ते गुरूजवळ गेले. ॥३२॥

तयोः - त्या दोघांच्या शुद्धभावानुवृत्तिभिः तुष्टः - निर्मळ भावनापूर्वक आचरणांनी संतुष्ट झालेला द्विजवरः गुरुः - ब्राह्मणश्रेष्ठ सांदिपनि गुरू साङ्‌गोपनिषदः - सहा वेदांगे, उपनिषदे अखिलान् वेदान् प्रोवाच - व सर्व वेद पढविता झाला. ॥३३॥

सरहस्यं धनुर्वेदं - मंत्रज्ञानपूर्वक धनुर्विद्या धर्मान् तथा न्यायपथान् - धर्मशास्त्र तसेच न्यायशास्त्र तथा च आन्वीक्षिकीं विद्या - तशीच तर्कविद्या च षड्‌विधां राजनीतिं - आणि सहाप्रकारची राजनीति. ॥३४॥

नृप - हे राजा सर्वविद्याप्रवर्तकौ - सर्व विद्यांचे उत्पादक नरवरश्रेष्ठौ - मनुष्यश्रेष्ठ असे राम व कृष्ण सकृन्निगदमात्रेण - एकदा सांगताक्षणीच सर्वं जगृहतुः - सर्व स्वीकारते झाले. ॥३५॥

नृप - हे राजा संयत्तौ - नियमितरीतीने वागणारे चतुःषष्टया अहोरात्रैः - चौसष्ठ दिवसांनी तावतीः कलाः - तितक्याच कला गुरुदक्षिणाय - गुरुदक्षिणेकरिता आचार्यं छंदयामासतुः - सांदिपनीला लोभविते झाले. ॥३६॥

राजन् - हे राजा सः द्विजः - तो ब्राह्मण तयोः - त्या दोघांच्या अद्भुतं तं महिमानं - त्या आश्चर्यकारक सामर्थ्याला संलक्ष्य - पाहून (च) अतिमानुषीं मतिं (संलक्ष्य) - आणि अलौकिक बुद्धिमत्ता पाहून पत्न्या संमन्त्र्य - पत्नीसह विचार ठरवून प्रभासे महार्णवे मृतं बालं - प्रभासक्षेत्री महासागरात मृत झालेल्या पुत्राला वरयांबभूव - मागता झाला. ॥३७॥

अथ - नंतर दुरन्तविक्रमौ महारथौ - अनन्त पराक्रम करणारे ते महारथी बलराम व श्रीकृष्ण तथेति - बरे आहे असे म्हणून रथं आरुह्य - रथावर चढून प्रभासं आसाद्य - प्रभासक्षेत्री जाऊन वेलाम् उपव्रज्य - व तेथील समुद्रतीराजवळ प्राप्त होऊन क्षणं निषीदतुः - क्षणभर बसले तौ ईश्वरौ इति विदित्वा - ते दोघे परमेश्वर आहेत असे जाणून सिंधुः - समुद्र तयोः अर्हणम् आहरत् - त्या दोघांची पूजा करिता झाला. ॥३८॥

महता उर्मिणा त्वया - मोठया लाटेने तुझ्याकडून इह - येथे यः असौ बालकः - जो हा बालक ग्रस्तः - गिळला गेला (सः) गुरूपुत्रः आशु प्रदीयताम् - तो गुरुपुत्र लवकर परत द्यावा (इति) भगवान् तम् आह - असे श्रीकृष्ण त्या समुद्राला म्हणाला. ॥३९॥

देवकृष्ण - हे तेजस्वी श्रीकृष्णा अहं (तं) न एव अहार्षम् - मी त्या गुरूपुत्राचे हरण केले नाही शंखरूपधरः - शंखासारखे स्वरूप धारण केलेला महान् असुरः - मोठा व स्वप्राणाच्या ठिकाणी रममाण होणारा पञ्चजनः दैत्यः - पंचजन नावाचा दैत्य अन्तर्जलचरः (अस्ति) - पाण्यात संचार करणारा आहे. ॥४०॥

नूनं तेन आहृतः आस्ते - खरोखर त्याने हरण केलेला आहे तत् श्रुत्वा - ते ऐकून प्रभुः - समर्थ श्रीकृष्ण सत्वरं जलं आविश्य - तत्काळ पाण्यात शिरून तं हत्वा - त्याला मारून उदरे अर्भकं न अपश्यत् - त्याच्या उदरात बालक पाहता झाला नाही. ॥४१॥

तदङ्‌‌गप्रभवं शङ्खं आदाय - त्याच्या अवयवापासून निघालेला शंख घेऊन रथं आगमत् - रथाजवळ आला ततः संयमनीं नाम - नंतर संयमनी नावाच्या यमस्य दयितां पुरीं गत्वा - यमाच्या आवडत्या नगरीला जाऊन सहलायुधः जनार्दनः - बलरामासह श्रीकृष्ण शङ्खं प्रदध्मौ - शंख वाजविता झाला शंखनिह्लादम् आकर्ण्य - शंखाचा मोठा ध्वनि श्रवण करून प्रजासंयमनः यमः - प्रजेचे नियमन करणारा यम तयोः - त्या दोघा रामकृष्णांची भक्त्या उपबृंहिता महतीं सपर्यां चक्रे - भक्तीने वाढलेली अशी मोठी पूजा करता झाला अवनतः - नम्र होऊन हे लीलामनुष्य विष्णो - हे क्रीडार्थ मनुष्य वेष घेतलेल्या कृष्णा युवयोः किं करवाम - तुमचे काय काम करावे इति - असे सर्वभूताशयालयं कृष्णम् उवाच - सर्व प्राण्यांच्या इच्छांचे आश्रयस्थान अशा श्रीकृष्णाला म्हणाला. ॥४२-४४॥

महाराज - हे महाराजा यमा मच्छासनपुरस्कृतः (त्वं) - माझ्या आज्ञेला पुढे करून तू इह आनीतं - येथे आणिलेल्या निजकर्मनिबन्धनं (अपि) गुरुपुत्रं - आपल्या कर्माने बद्ध झालेल्याहि त्या गुरुपुत्राला आनयस्व - आण. ॥४५॥

यदूत्तमौ - बलराम व श्रीकृष्ण तेन तथा इति (उक्ता) - यमाने बरे आहे असे म्हणून उपनीतं गुरुपुत्रं - आणलेल्या त्या गुरुपुत्राला स्वगुरवे दत्त्वा - आपल्या गुरुप्रत अर्पण करून भूयः वृणीष्व - पुनः वर मागा इति तं ऊचतुः - असे त्याला म्हणाले. ॥४६॥

वत्स - बाळा श्रीकृष्णा भवद्‌भयां गुरुनिष्क्रयः सम्यक् संपादितः - तुम्हां दोघांनी गुरुदक्षिणा फारच उत्तम दिली युष्मद्विधगुरोः कः नु कामः - तुमच्यासारख्याचा गुरु अशा माझी कोणती बरे इच्छा अवशिष्यते नाम - पूर्ण व्हावयाची राहील बरे. ॥४७॥

वीरौ - पराक्रमी अशा हे बलरामा स्वगृहं गच्छतं - आपल्या घरी जा (ते) कीर्तिः पावनी अस्तु - जगाला तुझी कीर्ति पवित्र करणारी असो इह च परत्र - ह्या लोकी व परलोकी छंदांसि अयात यामानि भवन्तु - वेद ताजे तरतरीत असोत. ॥४८॥

तात - बा परीक्षिता एवं गुरुणा अनुज्ञातौ - याप्रमाणे गुरूने आज्ञा दिलेले बलराम व श्रीकृष्ण पर्जन्यनिदेन - मेघाप्रमाणे गर्जना करणार्‍या अनिलरंहसा रथेन - व वायुवेगाने धावणार्‍या रथाने वै स्वपुरं आयातौ - खरोखर आपल्या नगराला आले. ॥४९॥

नष्टलब्धधनः इव - सापडलेले द्रव्य मिळाल्याप्रमाणेच बह्वहानि - पुष्कळ दिवसपर्यंत रामजनार्दनौ अपश्यन्त्यः - श्रीकृष्ण व बलराम ह्यांना न पाहणार्‍या सर्वाः प्रजाः - सर्व प्रजा (तौ) दृष्ट्वा समनन्दन् - त्यांना पाहून आनंदित झाल्या. ॥५०॥

अध्याय पंचेचाळिसावा समाप्त

GO TOP