श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४४ वा - अन्वयार्थ

चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार -

अथ - नंतर एवं - ह्याप्रमाणे चर्चितसंकल्पः - ज्याने आपला विचार निश्चित केला आहे असा भगवान् मधुसूदनः - भगवान श्रीकृष्ण चाणूरम् आससाद - चाणूराजवळ प्राप्त झाला (च) रोहिणीसुतः - आणि बलराम मुष्टिकं (आससाद) - मुष्टिकाजवळ प्राप्त झाला. ॥१॥

(तौ) विजिगीषया - ते दोघे जिंकण्याच्या इच्छेने हस्ताभ्यां हस्तयोः बद्ध्‌वा - आपल्या दोन्ही हातांनी प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही हात जखडून पद्‌भ्याम् च एव पादयोः (बद्ध्‌वा) - आणि आपल्या पायांनी प्रतिपक्षाचे पाय जखडून प्रसह्य अन्योन्यं विचकर्षतुः - बलात्काराने एकमेकांना ओढिते झाले. ॥२॥

अरत्नीभ्यां द्वे अरत्नी - हातांनी हातांना च जानुभ्यां जानुनी एव - आणि मांडयांनी मांडयांना शीर्ष्णा शिरः - मस्तकाने मस्तकाला उरसा उरः - छातीने छातीला (एवं) तौ अन्योन्यम् अभिजघ्नतुः - याप्रमाणे ते दोघे एकमेकांना ताडिते झाले.॥३॥

परिभ्रामण - हाताने धरून गरगर फिरविणे, विक्षेपपरिरम्भावपातनैः - फेकणे, घट्ट आवळून धरणे व खाली पाडणे या क्रियांनी च उत्सर्पणापसर्पणैः - दुसर्‍याच्या पेचांतून सुटणे व दूर जाणे ह्यांनी अन्यौन्यं प्रत्यरुन्धताम् - एकमेकांनाच रोध करिते झाले. ॥४॥

उत्थापनैः उन्नयनैः - वर उठवणे व उचलून नेणे ह्या विधीने चालनैः स्थापनैः अपि - आपला पेच सोडवणे व दुसर्‍याला पेच घालून स्थिर करणे ह्यांनी परस्परं जिगीषन्तौ - एकमेकाला जिंकण्याची इच्छा करणारे ते आत्मनः अपचक्रतुः - शरीराला दुखविते झाले. ॥५॥

राजन् - हे परीक्षित राजा सर्वयोषितः - सर्व स्त्रिया वरूथशः समेताः - संघाने जमून तत् युद्धं बलाबलवत् (अस्ति) - हे मल्लयुद्ध बलवानाचे निर्बलाशी होणारे होय (इति) सानुकम्पाः - असे म्हणून ज्यांच्या हृदयात दया उत्पन्न झाली आहे अशा परस्परं ऊचुः - एकमेकींमध्ये बोलू लागल्या. ॥६॥

ये - जे बलाबलवत् युद्धं पश्यतः राज्ञः - बलांचे निर्बलांशी होणारे युद्ध पाहणार्‍या राजांच्या अन्विच्छन्ति - इच्छेला अनुसरत आहेत अयं - हा एषां राजसभासदां - ह्या राजसभेत बसलेल्या लोकांचा महान् अधर्मः बत - खरोखर मोठा अधर्मच होय. ॥७॥

वज्रसारसर्वाङगौ - वज्राप्रमाणे बळकट अवयव असणारे शैलेन्द्रसन्निभौ मल्लौ क्व - मोठया पर्वतासारखे हे दोन मल्ल कोणीकडे च - आणि अतिसुकुमाराङगौ - अत्यंत कोमल शरीराचे नाप्तयौवनौ - ज्यांना तारुण्य प्राप्त झाले नाही किशौरौ क्व - असे हे दोघे लहान बालक कोणीकडे. ॥८॥

ध्रुवं - खरोखर अस्य समाजस्य - ह्या समाजाचा धर्मव्यतिक्रमः हि - हा मोठा अधर्मच भवेत् - होय यत्र अधर्मः समुत्तिष्ठेत् - जेथे अधर्म उत्पन्न होईल तत्र कर्हिचित् न स्थेयम् - तेथे कधीही राहू नये. ॥९॥

प्राज्ञः - बुद्धिमान पुरुषाने सभ्यदोषान् अनुस्मरन् - सभासदांचे स्वाभाविक उत्पन्न होणारे दोष मनात आणून नरः - पुरुष अब्रुवन् - माहित असूनहि न बोलणारा विब्रुवन् - किंवा विरुद्ध बोलणारा अज्ञः - अथवा मला काहीएक माहित नाही असे बोलणारा सुद्धा किल्बिषम् अश्रुते - दोषी होतो. ॥१०॥

शत्रुम् अभितः वल्गतः कृष्णस्य - शत्रूच्या सभोवार धावणार्‍या श्रीकृष्णाचे अम्बुभिः पद्मकोशम् इव - उदकांनी युक्त अशा कमळांच्या गाभ्याप्रमाणे असणारे श्रमवार्युप्तं - व श्रमाने उत्पन्न झालेल्या घर्मबिंदूंनी व्यापिलेले वदनाम्बुजं वीक्षतां - मुखकमल पहा. ॥११॥

रामस्य - बलरामाचे मुष्टिकं प्रतिसामर्षं - मुष्टिकाला उद्देशून क्रोधाविष्ट झालेले हाससंरम्भशोभितं - हसण्याच्या वेशाने शोभणारे आताम्रलोचनं मुखं - किंचित् तांबूस वर्णाचे मुख न पश्यत किं - तुम्ही पहात नाही काय ॥१२॥

बत व्रजभुवः पुण्याः - खरोखर गोकुळातील भूमि पुण्यवान होय यत् - कारण अयं - हा नृलिङगगूढः - मनुष्यरूप धारण करून गुप्तरीतीने राहणारा पुराणपुरुषः - अनादि परमेश्वर वनचित्रमाल्यः - गळ्यात चित्रविचित्र अशी अरण्यातील फुलांची माळा धारण करणारा गिरित्ररमार्चिताङ्‌घ्रिः - शंकर व लक्ष्मी ह्यांनी ज्याच्या चरणाचे पूजन केले आहे असा सहबलः - बलरामासह वेणुं क्वणयन् - वेणू वाजवीत गाः पालयन् - गाई राखीत विक्रीडया अञ्चति - जेथे क्रीडेसाठी जातो. ॥१३॥

गोप्यः - गोपी किं तपः अचरन् - कोणते तप करत्या झाल्या यत् - कारण अमुष्य - ह्या श्रीकृष्णाचे लावण्यसारं - सौंदर्याचे सारच असे असमोर्ध्वं - व ज्याच्याशी बरोबरीने किंवा अधिकपणाने तुलना करता येत नाही असे अनन्यसिद्धं - दुसर्‍या कशानेहि सिद्ध न होणारे अनुसवाभिनवं - प्रत्येक क्षणी नव्याप्रमाणे भासणारे दुरापं - दुर्लभ यशसः श्रियः ऐश्वर्यस्य एकान्तधाम - कीर्ति, लक्ष्मी व ऐश्वर्य यांचे एकच स्थान असे रूपं दृग्भिः पिबन्ति - स्वरूप नेत्रांनी प्राशितात. ॥१४॥

च - आणि याः - ज्या गोपी एनं अनुरक्तधियः - ह्या श्रीकृष्णाच्या ठिकाणी प्रेमबुद्धि ठेवून अश्रुकण्टयः - अश्रूमुळे दाटला आहे कंठ ज्यांचा अशा दोहने - दूध काढण्याच्या वेळी अवहनने - कांडण्याच्या वेळी मथनोपलेपप्रेङखेङखना - घुसळणे, उटी लावणे, पाळणा हालवणे, अर्भरुदितौक्षणमार्जनादौ - मूल रडू लागले असता, सारविणे, झाडणे इत्यादि कार्याच्या वेळी गायन्ति - गाणी गातात उरुक्रमचित्तयानाः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त झाले आहे अशा व्रजस्त्रियः धन्याः - गोकुळातील त्या गोपी धन्य होत. ॥१५॥

भूरिपुण्याः अबलाः - ज्यांनी पुष्कळ पुण्य केले आहे अशा गोपी पथि - मार्गामध्ये गोभिः समं - गाईंसह प्रातः व्रजात् व्रजतः - सकाळी गोकुळातून बाहेर जाणार्‍या च सायं आविशतः - आणि संध्याकाळी गोकुळात परत येणार्‍या क्वणयतः अस्य - व वेणुवाद्य वाजविणार्‍या ह्या श्रीकृष्णाचा वेणुं निशम्य - वेणुध्वनि ऐकून तूर्णं निर्गम्य - त्वरेने बाहेर पडून सदयावलोकं - दयेने पहाणार्‍या व सस्मितमुखं पश्यन्ति - स्मित हास्य करणारे आहे मुख ज्याचे अशा श्रीकृष्णाला पहातात. ॥१६॥

भरतर्षभ - हे भरतश्रेष्ठा परीक्षित राजा योगेश्वरः भगवान् हरिः - योगाधिपति भगवान श्रीकृष्ण स्त्रीषु एवं प्रभाषमाणासु - स्त्रिया याप्रमाणे भाषण करीत असता शत्रुं हन्तुं मनः चक्रे - शत्रूला मारण्याचे मनात आणिता झाला. ॥१७॥

सभयाः स्त्रीगिरः श्रुत्वा - भीतिदर्शक असे स्त्रियांचे शब्द ऐकून पुत्रस्नेहशुचातुरौ - पुत्राविषयीच्या प्रेमामुळे शोकाकुल झालेले पितरौ - वसुदेव व देवकीहि पुत्रयोः बलम् अबुधौ - रामकृष्णांचे सामर्थ्य न जाणणारी अन्वतप्येतां - दुःख करू लागली. ॥१८॥

यथा - ज्याप्रमाणे अच्युतेतरौ - श्रीकृष्ण व चाणूर हे दोघे तैः तैः - त्या त्या विविधैः - अनेक प्रकारच्या नियुद्धविधिमिः - मल्लयुद्धाच्या पेचांनी तथा एव - तशाच प्रकारे बलमुष्टिकौ - बलराम व मुष्टिक युयुधाते - युद्ध करू लागले. ॥१९॥

चाणूरः - चाणूर वज्रनिष्पेषनिष्ठुरैः - वज्राच्या तीक्ष्ण प्रतापाप्रमाणे कठीण अशा भगवद्‌गात्रनिष्पातैः - भगवंताच्या अवयवांच्या तीक्ष्ण प्रहारांनी भज्यमानाङगः - ज्याचे अवयव मोडून जात आहेत असा मुहुः ग्लानिम् अवाप ह - वारंवार मूर्च्छा पावला. ॥२०॥

श्येनवेगः सः - ससाण्यासारखा वेग आहे ज्याचा असा चाणूर उभौ करौ मुष्टीकृत्य - दोन्ही हातांच्या मुठी वळून उत्पत्य - उडी मारून क्रुद्धः - रागावलेला असा भगवन्तं वासुदेवं - भगवान श्रीकृष्णाला वक्षसि अताडयत् - वक्षस्थलावर ताडिता झाला. ॥२१॥

हरिः - श्रीकृष्ण मालाहतः द्विपः इव - पुष्पमाळेने ताडिलेल्या हत्तीप्रमाणे तत् प्रहारेण - चाणूराच्या ताडनाने न अचलत् - हलला नाही चाणूरं बाह्वोः निगृह्य - चाणूराला दोन बाहूंचे ठिकाणी घट्ट धरून बहुशः भ्रामयन् - पुष्कळ वेळ गरगर फिरवीत. ॥२२॥

क्षीणजीवितं - ज्याचे जीवित नष्ट झाले आहे अशा त्याला तरसा - वेगाने भूपृष्ठे पोथयामास - जमिनीवर आपटिता झाला विस्रस्ताकल्पकेशस्रक् (सः) - वेष, केशपाश, पुष्पमाळा व भूषणे ही गळून पडलेला असा तो चाणूर इन्द्रध्वजः इव अपतत् - इंद्रध्वजाप्रमाणे पडला. ॥२३॥

तथा एव - त्याचप्रमाणे मुष्टिकः - मुष्टिक पूर्वं स्वमुष्टया अभिहतेन - पूर्वी स्वतःच्या मुठीने ताडिलेल्या बलिना बलभद्रेण - बलवान अशा बलरामाने तलेन भृशं अभिहतः - तळहाताने अत्यंत ताडिला गेला. ॥२४॥

अर्दितः सः - पीडिलेला तो मुष्टिक प्रवेपितः - कंपित होऊन मुखतः रुधिरं उद्वमन् - तोंडातून रक्त ओकत वाताहतः अङ्‌घ्रिपः इव - वार्‍याने ताडिलेल्या वृक्षाप्रमाणे व्यसुः (भूत्वा) - मृत होऊन उर्व्युपस्थे - जमिनीवर पपात - पडला. ॥२५॥

राजन् - हे राजा ततः - नंतर प्रहरतां वरः रामः - प्रहार करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ असा बलराम अनुप्राप्तं कूटं - आलेल्या कूट नावाच्या राक्षसाला सावज्ञं - अपमानपूर्वक लीलया वाममुष्टिना - सहज डाव्या हाताच्या मुठीने अवधीत् - मारिता झाला. ॥२६॥

तर्हि एव हि - त्याच वेळी खरोखर कृष्णपदापहतशीर्षकः - श्रीकृष्णाच्या पायाने ज्याचे मस्तक तुडविले गेले आहे असा शलः - शल (च) द्विधा विदीर्णः तोशलकः - आणि दोन शकले केलेला तोशलक उभौ अपि निपेततुः - हे दोघेहि जमिनीवर पडले. ॥२७॥

चाणूरे मुष्टिके कूटे - चाणूर, मुष्टिक, कूट, शले तोशलके हते - शल व तोशलक हे मारिले असता शेषाःप्राणपरीप्सवः सर्वे मल्लाः - उरलेले प्राणरक्षणाची इच्छा करणारे इतर सर्व मल्ल प्रदुद्रुवुः - पळून गेले. ॥२८॥

रुतनुपरौ वल्गन्तौ - पायांतील पैंजणांचा आवाज करीत इकडेतिकडे धावणारे रामकृष्ण तूर्येषु वाद्यमानेषु - भेरी वाजू लागल्या असता वयस्यान् गोपान् आकृष्य - बरोबरीच्या गोपांना पुढे ओढून तैः संसृज्य - त्यांशी संघटित होऊन विजह्लतुः - क्रीडा करू लागले. ॥२९॥

रामकृष्णयोः कर्मणा - बलराम व श्रीकृष्ण ह्यांच्या कृत्याने कंसं ऋते सर्वे जनाः - कंसाशिवाय सर्व लोक प्रजहृषुः - आनंदित झाले साधवः विप्रमुख्याः - सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मण साधु साधु इति (अब्रुवन्) - चांगले, चांगले असे म्हणाले. ॥३०॥

मल्लवर्येषु हतेषु - श्रेष्ठ श्रेष्ठ असे कित्येक मल्ल मारले गेले असता च विद्रुतेषु - व कित्येक पळून गेले असता भोजराट् - कंस स्वतूर्याणि न्यवारयत् - स्वतःच्या वाद्यांचे निवारण करिता झाला इदं च वाक्यम् उवाच ह - आणि हे वाक्य बोलला. ॥३१॥

दुर्वृत्तौ वसुदेवात्मजौ - दुराचारी असे वसुदेवपुत्र जे बलराम व श्रीकृष्ण पुरात् निःसारयत - ह्यांना नगरातून हाकलून द्या गोपानां धनं हरत - गोपांचे द्रव्य हरण करा दुर्मतिं नन्दं बध्नीत - दुर्बुद्धि अशा नंदाला बांधून टाका. ॥३२॥

असत्तमः दुर्मेधाः वसुदेवः तु - असद्वर्तन करणारा वाईट बुद्धीचा वसुदेव तर आशु हन्यताम् - लवकर मारून टाका अपि च - आणखीहि परपक्षगः पिता उग्रसेनः - शत्रुपक्ष स्वीकारलेला पिता उग्रसेन सानुगः (हन्यतां) - अनुचरांसह मारा. ॥३३॥

कंसे एवं वै विकत्थमाने - कंस ह्याचप्रमाणे खरोखर बडबड करीत असता प्रकुपितः अव्ययः (सः) - रागावलेला अविनाशी असा तो श्रीकृष्ण लघिन्मा तरसा उत्पत्य - कुशलतेने वेगाने उडी मारून उत्तुंङगं मञ्चं आरुहत् - उंच अशा आसनावर आरुढ झाला. ॥३४॥

मनस्वी सः - गंभीर मनाचा तो कंस तं आत्मनः मृत्यूं - तो श्रीकृष्ण मूर्तिमान आपला मृत्यूच असा आविशन्तं आलोक्य - आपल्याकडे येत आहे असे पाहून सहसा आसनात् उत्थाय - एकाएकी आसनावरून उठून असिचर्मणी जगृहे - तलवार व ढाल घेता झाला. ॥३५॥

दुर्विषहोग्रतेजाः (सः) - ज्याचे भयंकर तेज सहन करण्यास कठीण आहे असा तो श्रीकृष्ण खड्‌गपाणिं - हातात तलवार घेतलेल्या यथा श्येनं - ससाण्याप्रमाणे अम्बरे दक्षिणसव्यं विचरन्तं - अंतरिक्षात उजव्या डाव्या बाजूने फिरणार्‍या तं - त्या कंसाला यथा तार्क्ष्यसुतः उरगं - जसा गरुड सर्पाला त्याप्रमाणे प्रसह्य आशु समग्रहीत् - बलात्काराने तत्काळ धरिता झाला. ॥३६॥

विश्वाश्रयः आत्मतन्त्रः अब्जनाभः - जगाला आश्रयभूत व स्वतंत्र असा पद्मनाभ श्रीकृष्ण चलत्किरीटं तुङ्गं (तं) - ज्याच्या मस्तकावरील मुकुट हालत आहे अशा उंच कंसाला केशेषु प्रगृह्य - केसांचे ठिकाणी धरून मञ्चात् रंगोपरि निपात्य - उच्चासनावरून रंगभूमीवर पाडून तस्य उपरिष्टात् स्वयं पपात - त्याच्यावर स्वतः पडला. ॥३७॥

नरेन्द्र - हे परीक्षित राजा यथा हरिः - जसा सिंह इभं - हत्तीला (तथा) जगतः विपश्यतः - त्याप्रमाणे लोक पहात असता संपरेतं तं - मेलेल्या त्या कंसाला भूमौ विचकर्ष - पृथ्वीवर ओढिता झाला सर्वजनैः उदीरितः - त्या वेळी सर्व लोकांनी उच्चारिलेला हा हा इति सुमहान् शब्दः अभूत् - हा हा असा मोठा शब्द झाला. ॥३८॥

सः - तो कंस पिबन् - प्राशन करीत असता वदन् विचरन् - बोलत असता, हिंडत असता, स्वपन् वा श्वसन् - निद्रा घेत असता किंवा श्वासोच्छ्‌वास करीत असता नित्यदा उद्विग्नधिया - नेहमी उद्विग्नबुद्धीने तं चक्रायुधं ईश्वरं - चक्र धारण करणार्‍या ऐश्वर्यसंपन्न अशा त्या श्रीकृष्णाला अग्रतः ददर्श - पुढे पहात असे यतः - ज्यामुळे तत् एव दुरवापं - त्याच दुर्लभ श्रीकृष्णाच्या रूपं (सः) आप - रूपाला तो प्राप्त झाला. ॥३९॥

कंकन्यग्रोधकादयः - कंक, न्यग्रोध इत्यादि तस्य अनुजाः अष्टौ भ्रातरः - त्या कंसाचे धाकटे आठ भाऊ भ्रातुः निर्वेशकारिणः - भ्रात्याच्या ऋणातून मुक्त होण्याची इच्छा करणारे अभिक्रुद्धाः अभ्यधावन् - क्रुद्ध होऊन धावत आले. ॥४०॥

रोहिणीसुतः - बलराम मृगाधिपः पशून् इव - सिंह पशूंना मारतो तथा - त्याप्रमाणे अतिरभसान् - अत्यंत वेगवान व संयत्तान् तान् तु - सज्ज झालेल्या त्या कंकादिकांना परिघं उद्यम अहन् - हातात अर्गळा घेऊन मारिता झाला. ॥४१॥

दुन्दुभयः व्योम्नि नेदुः - दुंदुभि आकाशांत वाजू लागल्या ब्रह्मोशाद्याः विभूतयः - ब्रह्मदेव शंकर इत्यादि विभूति पुष्पैः तं किरन्तः - फुलांनी त्या कृष्णावर वृष्टि करीत प्रीताः शशंसुः - प्रसन्न मुद्रेने स्तुति करित्या झाल्या स्त्रियः ननृतुः - स्त्रिया नृत्य करू लागल्या. ॥४२॥

महाराज - हे महाराजा परीक्षित राजा सुहृन्मरणदुःखिताः आपल्या पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या तेषां स्त्रियः - त्यांच्या स्त्रिया अश्रुविलोचनाः - ज्यांच्या डोळ्यांतून दुःखाश्रू वहात आहेत अशा शीर्षाणि विनिघ्नन्त्यः - मस्तकाला ताडण करीत तत्र - तेथे अभीयुः - आल्या. ॥४३॥

वीरशय्यायां शयानान् - रणांगणांत निजलेल्या पतीन् आलिङ्‌ग्य - पतींना आलिंगन देऊन शोचतीः - शोक करणार्‍या मुहुः शुचः विसृजन्त्यः नार्यः - वारंवार अश्रु ढाळणार्‍या त्या स्त्रिया सुस्वरं विलेपुः - करुण अशा स्वराने विलाप करू लागल्या. ॥४४॥

हा नाथ - अरेरे! हे नाथा प्रिय धर्मज्ञ - हे प्रिया, हे धर्म जाणणार्‍या, करुणानाथवत्सल - हे दयापते प्रेमळ स्वामिन् त्वया हतेन - तू मेल्यामुळे ते सगृहप्रजाः वयं - गृहासह अशा तुझ्या आम्ही प्रजा निहताः - मारिल्या गेलो आहोत. ॥४५॥

पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा पत्या त्वया विरहिता - पती अशा तुजपासून वियुक्त झालेली इयं पुरी - ही नगरी निवृत्तोत्सवमङगला - जीतील उत्सवादि मंगल कृत्ये बंद पडली आहेत अशी वयम् इव न शोभते - आम्हाप्रमाणेच शोभत नाही. ॥४६॥

भो - हे नाथा त्वं - तू अनागसां भूतानां - निरपराधी प्राण्याशी उल्बणं द्रोहं कृतवान् - मोठे वैर केलेस तेन इमां दशां नीतः - त्यामुळे अशा दुर्दशेला प्राप्त झालास भूतध्रुक् कः (पुरुषः) - प्राण्य़ांशी वैर करणारा कोणता पुरुष शं लभेत - कल्याणाला मिळवील. ॥४७॥

एषः हि - हा खरोखर इह - ह्या लोकी सर्वेषां भूतानां - सर्व प्राण्यांची प्रभावाप्ययः गोप्ता च - उत्पत्ति, नाश व रक्षण करणारा आहे तदवध्यायी - त्याचा अपमान करणारा क्वचित् सुखं न एधते - कधीहि सुखाला प्राप्त होणार नाही. ॥४८॥

लोकभावनः भगवान् - लोकांवर प्रेम करणारा श्रीकृष्ण राजयोषितः आश्वास्य - राजस्त्रियांचे सांत्वन करून यां हतानां - जिला मेलेल्यांची लौकिकीं संस्थां आहुः - लोकाचारानुसार और्ध्वदेहिक क्रिया असे म्हणतात (तां) समकारयत् - ती करविता झाला. ॥४९॥

अथ कृष्णरामौ - नंतर श्रीकृष्ण व बलराम मातरं च पितरं एव - मातेला आणि पित्यालाहि बन्धनात् मोचयित्वा - बन्धनापासून सोडवून पादयोः शिरसा स्पृश्य - पायांना मस्तकाने स्पर्श करून ववन्दाते - वंदन करते झाले. ॥५०॥

देवकी वसुदेवः च - देवकी आणि वसुदेव हे कृतसंवन्दनौ पुत्रौ - आपल्याला नमस्कार करणारे दोनहि पुत्र जगदीश्वरौ विज्ञाय - त्रैलोक्याधिपति परमेश्वरच आहेत असे जाणून शंकितौ न सस्वजाते - शंकायुक्त होऊन आलिंगन देते झाले नाहीत. ॥५१॥

अध्याय चव्वेचाळिसावा समाप्त

GO TOP