श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ३१ वा - अन्वयार्थ

गोपी गीत -

ते जन्मना - तुझ्या जन्माच्या योगाने - अत्र - या ठिकाणी - इन्दिरा - लक्ष्मी - शश्वत् - निरंतर - श्रयते - राहत आहे - हि - म्हणून - व्रजः - गोकुळ - अधिकं जयति - अधिक उत्कर्ष पावत आहे - दयित - हे प्रियकरा - त्वयि धृतासवः - तुझ्या ठिकाणी धारण केले आहेत प्राण ज्यांनी - तावकाः (एताः) - अशा या सर्वस्वी तुझ्या गोपी - दिक्षु - दाही दिशांच्या ठिकाणी - त्वां विचिन्वते - तुला शोधीत आहेत - दृश्यताम् - पहावे. ॥१॥

सुरतनाथ - हे संभोगपते - शरदुदासये - शरदऋतूतील सरोवरात - साधुजातसत्सरसिजोदरश्रीमुषा दृशा - उत्तम फुललेल्या सुंदर कमळाच्या मध्यभागाची शोभा हरण करणार्‍या नेत्राने - अशुल्कदासिकाः - मूल्याशिवाय दास्य करणार्‍या - (अस्मान्) निघ्नतः ते - आम्हाला मारणार्‍या तुझ्याकडून - इह - येथे - वरद - हे वर देणार्‍या श्रीकृष्णा - वधः न (भवति) किम् - वधच होत नाही काय ? ॥२॥

ऋषभ - हे श्रेष्ठा - विषजलाप्ययात् - विषमय झालेल्या जलाच्या सेवनांनी आलेल्या मृत्यूपासून - व्यालराक्षसात् - अजगररूपी राक्षसापासून - वर्षमारुतात् - पाऊस व वारा यांपासून - वैद्युतानलात् - विजेच्या अग्नीपासून - वृषमयात्मजात् - बैलाचे रूप घेतलेला व मयासुराचा पुत्र जो व्योमासुर यांपासून - विश्वतः भयात् - सर्व ठिकाणच्या भीतीपासून - ते - तुझ्याकडून - वयम् - आम्ही - मुहुः - वारंवार - रक्षिताः (स्मः) - रक्षिल्या गेल्या आहो. ॥३॥

सखे - हे मित्रा - खलु - खरोखर - भवान् - तू - गोपिकानन्दनः न (अस्ति) - यशोदा गोपीचा पुत्र नाहीस - विखनसा विश्वगुप्तये अर्थितः - ब्रह्मदेवाने जगताच्या संरक्षणासाठी प्रार्थिलेला - सात्वतां कुले उदेयिवान् - यादवाच्या कुळात जन्मास आलेला - अखिलदेहिनां अन्तरात्मदृक् (अस्ति) - सर्व प्राण्यांचे अंतःकरण पाहणारा ईश्वर आहेस. ॥४॥

वृष्णिधुर्य - हे यादवश्रेष्ठा - संसृतेः भयात् - संसाराच्या भीतीमुळे - ते चरणं ईयुषाम् - तुझ्या पायांजवळ आलेल्यांना - अभयं विरचिता (असि) - तू अभय देणारा आहेस - कान्त - हे प्रियकरा - कामदं श्रीकरग्रहम् करसरोरुहम् - इष्ट फल देणारा व लक्ष्मीचे पाणिग्रहण करणारा तुझा कमळासारखा हात - नः शिरसि धेहि - आमच्या मस्तकावर ठेव. ॥५॥

निजजनस्मयध्वंसनस्मित - आपल्या लोकांच्या आश्चर्याचा निरास करणारे आहे हसणे ज्याचे अशा - व्रजजनार्तिहन् वीर - गोकुळातील लोकांचे दुःख नष्ट करणार्‍या वीरा - योषितां भज - स्त्रियांचा तू स्वीकार कर - सखे - हे सख्या - (वयं) भवत्किङ्‌करीः रमः - आम्ही तुझ्या दासी आहोत - नः - आम्हाला - चारु जलरुहाननं दर्शय - सुंदर असे व कमलासारखे मुख दाखव. ॥६॥

प्रणतदेहिनां पापकर्शनम् - अत्यंत नम्र झालेल्या प्राण्यांचे पाप नष्ट करणारे - तृणचरानुगम् - गवतावरून फिरणार्‍या गाईवासरांच्या मागून जाणारे - फणिफणार्पितम् - सर्पाच्या फणांवर ठेविलेले - श्रीनिकेतनम् - सौंदर्याचे वसतिस्थान असे - ते पदाम्बुजम् - तुझे चरणकमळ - नः कुचेषु कृणु - आमच्या स्तनांवर ठेव - (नः) हृच्छयम् कृन्धि - आमच्या कामाला छेदून टाक. ॥७॥

पुष्करेक्षण - हे कमलनेत्रा - बुधमनोज्ञया - ज्ञानी लोकांना आवडणार्‍या - वल्गुवाक्यया - सुंदर आहेत वाक्ये जिच्यामध्ये अशा - मधुरया गिरा - मधुर वाणीने - मुह्यतीः इमाः नः विधिकरीः - मोहित झालेल्या ह्या आम्हा दासींना - अधरसीधुना आप्याययस्व - अधरामृताने तू सजीव कर. ॥८॥

तप्तजीवनम् - दुःखित जीवांना शांत करणारे - कविभिः ईडितम् - ज्ञान्यांनी स्तविलेले - कल्मषाषहम् - पाप नाहीसे करणारे - श्रवणमङगलम - ऐकावयास मंगलकारक असे - श्रीमत् - सौंदर्याने युक्त असे - ते आततम् कथामृतं - तुझे विस्तृत असे कथारूपी अमृत - भुवि (ये) गृणन्ति - पृथ्वीवर जे गातात - ते जनाः भूरिदाः (सन्ति) - ते लोक मोठे धन्य होत. ॥९॥

प्रिय - हे प्रियकर - ते प्रहसितं प्रेमवीक्षणं - तुझे हसणे, प्रेमाने पाहणे, - विहरणं च ध्यानमङगलं (अस्ति) - व विहार करणे ध्यानाला मंगलकारक आहे - कुहक - हे धूर्ता - हृदिस्पृशा याः रहसि संविदः (ताः) - अंतःकरणाला भेदणारी अशी जी एकांतातील संभाषणे ती - नः मनः क्षोभयन्ति हि - आमच्या मनाला खरोखरच क्षुब्ध करीत आहेत. ॥१०॥

नाथ - हे नाथा - कान्त - हे प्रियकरा - यत् - ज्यावेळी - पशून् चारयन् - गुरांना चरवीत - व्रजात् चलसि - तू गौळवाडयातून जातोस - ते नलिनसुन्दरं पदम् - तुझ्या कमळासारख्या सुंदर अशा पायांना - शिलतृणाङ्‌कुरैः सीदति - कापणी झाल्यानंतर राहिलेल्या गवताच्या बुडख्यांनी दुःख होईल - इति - असे वाटून - नः मनः - आमचे मन - कलिलतां गच्छति - व्याकुळतेला प्राप्त होते. ॥११॥

वीर - हे वीरा - दिनपरिक्षये - दिवस संपण्याच्या वेळी - नीलकुन्तलैः आवृतम् - निळ्या कुरळ्या केसांनी झाकलेले - घनरजस्वलम् - दाट धुळीने माखलेले - वनरुहाननं बिभ्रत् - कमळासारखे मुख धारण करणारा - मुहुः दर्शयन् त्वं - वारंवार दाखविणारा तू - नः मनसि - आमच्या अंतःकरणात - स्मरं यच्छसि - मदनाला स्थापितोस. ॥१२॥

आधिहन् रमण - हे मनोव्यथा नष्ट करणार्‍या प्रियकरा - प्रणतकामदं - नम्र झालेल्यांना इष्ट फल देणारे - पद्मजार्चितम् - लक्ष्मीने पूजिलेले - धरणिमण्डनं - पृथ्वीला भूषण असलेले - आपदि ध्येयम् - संकटकाली ध्यान करण्यास योग्य असे - शंतमम् - अत्यंत कल्याणकारक असे - ते चरणपङ्‌कजं - तुझे चरणकमळ - नः स्तनेषु अर्पय - आमच्या स्तनांवर ठेव. ॥१३॥

वीर - हे वीरा - सुरतवर्धनम् - कामेच्छा वाढविणारे - शोकनाशनम् - शोक नष्ट करणारे - स्वरितवेणुना सुष्ठु चुम्बितम् - वाजणार्‍या मुरलीने उत्तमप्रकारे चुंबिलेले - नृणां इतररागविस्मारणम् - मनुष्यांना इतर विषयांच्या प्रेमाचा विसर पाडणारे - ते अधरामृतम् - तुझे अधरामृत - नः वितर - तू आम्हांला दे. ॥१४॥

अह्नि यत् भवान् काननं अटति - दिवसा जेव्हा तू अरण्यात हिंडत असतोस - (तत्) त्वां अपश्यताम् (अस्माकम्) - तेव्हा तुला न पाहणार्‍या आम्हाला - त्रुटिः (अपि) - चुटकी एवढा कालहि - युगायते - युगाप्रमाणे होतो - च - आणि - ते कुटिलकुन्तलं श्रीमुखम् - तुझे कुरळ्या केसांनी युक्त असे सुंदर मुख - उदक्षितां (नः) - टक लावून पाहणार्‍या आम्हाला - दृशां पक्ष्मकृत् (ब्रह्मा अपि) जडः (भाति) - डोळ्यांना पापण्या करणारा ब्रह्मदेवहि मूर्ख वाटतो. ॥१५॥

कितव अच्युत - हे धूर्ता श्रीकृष्णा - गतिविदः तव - गायनाचे तत्त्व जाणणार्‍या तुझ्या - उदगीतमोहिताः - उंच सुरांतील गायनाने मोहित झालेल्या अशा - पतिसुनान्वयभ्रातृबान्धवान् अतिविलङ्‌घ्य - पति, पुत्र, कुल, भाऊ व भाऊबंद यांना सोडून - ते अन्ति निशि आगताः - तुझ्या जवळ रात्रीच्या वेळी आलेल्या अशा - (नः) योषितः - आम्हां स्त्रियांस - कः त्यजेत् - कोण टाकील ? ॥१६॥

ते - तुझे - हृच्छयोदयं रहसि संविदम् - मदनाला उत्पन्न करणारे एकांतातील भाषण - प्रहसिताननम् - हसरे मुख - प्रेमवीक्षणम् - प्रेमाने पाहणे - श्रियः धाम बृहत् उरः - लक्ष्मीचे स्थान असे विशाल वक्षस्थल - वीक्ष्य - पाहून - (नः) ते अतिस्पृहा (भवति) - आम्हास तुझ्याविषयी अतिशय इच्छा उत्पन्न होते - (नः) मनः मुहुः मुह्यते - आमचे मन वारंवार मोह पावते. ॥१७॥

च - आणि - अङग - हे श्रीकृष्णा - ते व्यक्तिः - तुझा अवतार - व्रजवनौकसां वृजिनहन्त्री - गोकुळातील व वृंदावनात राहणार्‍या प्राण्यांचे पाप नाहीसे करणारा असा - अलं विश्वमङगलं (अस्ति) - विश्वाला अत्यंत मंगलकारक असा आहे - त्वत्स्पृहात्मनां नः - तुझ्याविषयीची इच्छा आहे मनांत ज्यांच्या अशा आम्हांला - स्वजनहृद्रुजां निषूदनं यत् (अस्ति) - स्वजनांच्या अंतःकरणातील रोग नष्ट करणारे जे असेल - (तत्) मनाक् त्यज - ते थोडेसे दे. ॥१८॥

सुजात प्रिय - हे सुकुमारा, हे प्रियकरा - यत् ते चरणाम्बुरुहम् - जे तुझे चरणरूपी कमळ - (नः) कर्कशेषु स्तनेषु - आमच्या कठीण अशा स्तनांवर - भीताः - भीतभीत - शनैः - हळुहळु - दधीमहि - आम्ही ठेवावे - तेन अटवीं अटसि - त्याने तू अरण्यात हिंडतोस - तत् कूर्पादिभिः - ते दगडाच्या कपर्‍या इत्यादिकांनी - किंस्वित् न व्यथते (किम्) - क्लेश पावत नसेल काय - भवदायुषानः - तूच आहेस आयुष्य ज्यांचे अशा आमची - धीः भ्रमति - बुद्धि गोंधळते. ॥१९॥

अध्याय एकतीसावा समाप्त

GO TOP