|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय २३ वा - अन्वयार्थ
यज्ञपत्न्यांवर कृपा - राम राम - अरे रामा, हे बलरामा - दुष्टनिबर्हण महावीर्य कृष्ण - अरे दुष्टांचा नाश करणार्या महापराक्रमी कृष्णा - एषा क्षुधा - ही भूक - नः वै बाधते - आम्हाला खरोखर त्रास देत आहे - तच्छांतिं कर्तुं अर्हथ - त्या भुकेची शांति करण्यास तुम्ही समर्थ आहा. ॥१॥ इति गोपैः विज्ञापितः - याप्रमाणे गोपांनी प्रार्थिलेला - भगवान् देवकीसुतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न देवकीपुत्र श्रीकृष्ण - भक्तायाः - आपल्या भक्त - विप्रभार्यायाः - अशा ब्राह्मण स्त्रियांवर - प्रसीदन् - प्रसाद करण्याकरिता - इदं अब्रवीत् - असे म्हणाला. ॥२॥ यत्र - ज्याठिकाणी - ब्रह्मवादिनः ब्राह्मणाः - ब्रह्माचे प्रतिपादन करणारे ब्राह्मण - स्वर्गकाम्यया - स्वर्गाच्या इच्छेने - आंगिरसं नाम - आंगिरस नावाचा - सत्रं आसते - यज्ञ करीत आहेत. ॥३॥ गोपाः - हे गोपांनो - तत्र गत्वा - तेथे जाऊन - भगवतः आर्यस्य - भगवान बलरामाचे - च मम - आणि माझे - अभिधां कीर्तयंतः - नाव सांगून - अस्मद्विसर्जिताः - आम्ही पाठविलेले असे - ओदनं याचत - अन्न मागा. ॥४॥ इति भगवता आदिष्टाः ते - याप्रमाणे कृष्णाने आज्ञापिलेले ते गोप - तथा गत्वा - त्याप्रमाणे जाऊन - भुवि दंडवत् पतिताः - भूमीवर साष्टांग नमस्कार केलेले असे - कृतांजलिपुटाः - हात जोडणारे होत्साते - विप्रान् (अन्नं) अयाचंत - ब्राह्मणांपाशी अन्न मागते झाले. ॥५॥ हे भूमिदेवाः - हे ब्राह्मण हो - शृणुत - ऐका - नः गोपान् - आम्ही जे गोप त्यांना - कृष्णस्य आदेशकारिणः - कृष्णाची आज्ञा मानणारे - रामचोदितान् - बलरामाने पाठविलेले - प्राप्तान् जानीत - आलेले समजा - वः भद्रं (अस्तु) - तुमचे कल्याण असो. ॥६॥ धर्मवित्तमाः द्विजाः - हे धर्म जाणणार्यांमध्ये श्रेष्ठ अशा ब्राह्मणांनो - अविदूरे गाः चारयंतौ - जवळच गाई चारीत असलेले - बुभुक्षितौ च - आणि अतिशय भुकेलेले - रामाच्युतौ - बलराम व कृष्ण - वः ओदनं लषतः - तुमच्यापासून अन्नाची इच्छा करीत आहेत - यदि वः (तयोः) - जर तुमचा त्याच्यावर - श्रद्धा (स्यात्) - विश्वास असेल तर - तयोः अर्थिनोः - त्या अन्न मागणार्या रामकृष्णांना - ओदनं यच्छत - अन्न द्या. ॥७॥ सत्तमाः - हे श्रेष्ठ ब्राह्मण हो - दीक्षायाः पशुसंस्थायाः - दीक्षा, पशुवध आणि - सौत्रामण्याः च - सौत्रामणी याग यांच्याहून - अन्यत्र - इतर काळी - दीक्षितस्य अपि - दीक्षा घेतलेल्या पुरुषापासूनही - अन्नम् अश्नन् - अन्न खाणारा - नहि दुष्यति - खरोखर दोषास पात्र होत नाही. ॥८॥ इति - याप्रमाणे - भगवद्याञ्चां - भगवान श्रीकृष्णाची मागणी - श्रृण्वंतः अपि - ऐकत असताहि - क्षुद्राशाः - स्वर्गादि क्षुद्र आहेत अशा ज्यांच्या - भूरिकर्माणः - व मोठी आहेत कर्मे ज्यांची असे - वृद्धमानिनः - स्वतःला मोठे मानणारे - बालिशाः ते - ते पोरकट वृत्तीचे ब्राह्मण - न शुश्रुवुः - न ऐकिते झाले. ॥९॥ देशः कालः पृथग्द्रव्यं - देश, काल, निरनिराळी द्रव्ये - मंत्रतंत्रर्त्विजः अग्नयः - मंत्र, तंत्र, ऋत्विज व अग्नि - देवता यजमानः च - देवता व यजमान - ऋतुः धर्मः च - तसेच यज्ञ आणि धर्म - यन्मयः (अस्ति) - ज्या परमेश्वराचे स्वरूप होय. ॥१०॥ तं - त्या - साक्षात् परमं ब्रह्म - साक्षात श्रेष्ठ ब्रह्मस्वरूपी - अधोक्षजं भगवंतं - व इंद्रियांचा साक्षीभूत अशा परमेश्वराला - मर्त्यात्मानः दुष्प्रज्ञाः - मनुष्य स्वभावाचे दोषयुक्त बुद्धीचे लोक - मनुष्यदृष्टया - मनुष्य आहे या दृष्टीमुळे - न मेनिरे - मानते झाले नाहीत. ॥११॥ परंतप - हे शत्रुतापना राजा - यत् - जेव्हा - ते - ते ब्राह्मण - ओम् इति - होय असे - न प्रोचुः - बोलले नाहीत - च न इति - व नाही असेही - न (प्रोचुः) - बोलले नाहीत - निराशाः गोपाः - निराश झालेले ते गोप - प्रत्येत्य - परत येऊन - कृष्णरामयोः - बलराम व श्रीकृष्ण यांना - तथा ऊचुः - तसे सांगते झाले. ॥१२॥ जगदीश्वरः भगवान् - जगाचा स्वामी षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - तत् उपाकर्ण्य - ते ऐकून - प्रहस्य - हसून - लौकिकीं गतिं दर्शयन् - जगातील व्यवहाराचे स्वरूप दाखवीत - पुनः गोपान् व्याजहार - पुनः गोपांना म्हणाला. ॥१३॥ ससंकर्षणम् - संकर्षणासह - आगतं मां - मी आलो आहे असे - (ब्राह्मणानां) पत्नीभ्यः ज्ञापयत - त्या ब्राह्मणांच्या स्त्रियांना कळवा - धिया मयि उषिताः - अंतःकरणाने माझ्या ठिकाणी राहणार्या - स्निग्धाः (ताः) - अशा त्या प्रेमळ स्त्रिया - वः - तुम्हाला - कामम् अन्नं दास्यंति - पुष्कळ अन्न देतील. ॥१४॥ अथ गत्वा - तेथे जाऊन - गोपाः - ते गोप - पत्नीशालायां - स्त्रियांच्या भागात - स्वलंकृताः - अलंकारांनी सुशोभित झालेल्या - आसीनाः - बसलेल्या अशा - द्विजसतीः दृष्टवा - ब्राह्मण स्त्रियांना पाहून - प्रश्रिताः (ताः) नत्वा - नम्रपणे त्यांना नमस्कार करून - इदं अब्रुवन् - असे म्हणाले. ॥१५॥ विप्रपत्नीभ्यः - तुम्हां ब्राह्मण स्त्रियांना - वः नमः - आमचा नमस्कार असो - नः वचांसि निबोधत - आमची भाषणे ऐका - इतः अविदूरे - येथून जवळच - चरता कृष्णेन - फिरत असलेल्या कृष्णाकडून - वयं इह प्रेषिताः - आम्ही येथे पाठविले आहोत. ॥१६॥ सरामः सः - बलरामासह तो कृष्ण - गोपालैः गाः चारयन् - गोपाळांसह गाई चारीत - दूरं आगतः - दूरवर आला आहे - सानुगस्य बुभुक्षितस्य तस्य - सवंगडयासह भुकेलेल्या त्याला - अन्नं प्रदीयतां - तुम्ही अन्न द्यावे. ॥१७॥ नित्यं तद्दर्शनोत्सुकाः - निरंतर त्या श्रीकृष्णाच्या दर्शनाविषयी उत्सुक - (ताः) विप्रपत्न्याः - अशा त्या स्त्रिया - तत्कथाक्षिप्तमनसः - त्या श्रीकृष्णाच्या गोष्टींनी भरून गेले आहे मन ज्यांचे अशा - उपायांतं अच्युतं श्रुत्वा - कृष्ण जवळ आला आहे असे ऐकून - जातसंभ्रमाः बभूवुः - झाली आहे धांदल ज्यांची अशा झाल्या. ॥१८॥ चतुर्विधम् - चार प्रकारचे - बहुगुणम् - पुष्कळ प्रमाणात - अन्नं - अन्न - भाजनैः आदाय - भांडयांनी घेऊन - सर्वाः (ताः) - त्या सर्व विप्रस्त्रिया - प्रियं (कृष्णं) - आवडत्या कृष्णाकडे - निम्नगाः समुद्रम् इव - नद्या जशा समुद्राकडे तशा - अभिसस्रुः - गेल्या. ॥१९॥ पतिभिः भ्रातृभिः - पतींनी, भावांनी - बंधुभिः सुतैः - इष्टमित्रांनी व मुलांनी - निषिद्ध्यमानाः - नको म्हणून सांगितलेल्या - उत्तमश्लोके - पुण्यकारक आहे कीर्ति ज्याची - भगवति - अशा भगवंताच्या ठिकाणी - दीर्घश्रुत - पुष्कळ काळ श्रीकृष्णाचे गुण ऐकल्यामुळे - धृताशयाः - त्याच्या ठिकाणी लागले आहे मन ज्यांचे अशा. ॥२०॥ स्त्रियः - त्या स्त्रिया - अशोकनवपल्लवमंडिते - अशोक वृक्षाच्या कोवळ्या पानांनी शोभिवंत झालेल्या - यमुनोपवने - यमुनेच्या काठावरील कुरणात - गोपैः वृतं - गोपांनी वेष्टिलेल्या - साग्रजं विचरंतं - बलरामासह फिरत असलेल्या श्रीकृष्णाला - ददृशुः - पाहत्या झाल्या. ॥२१॥ श्यामं - श्यामवर्णाच्या - हिरण्यपरिधिं - सुवर्णाप्रमाणे पिवळे आहे नेसलेले वस्त्र ज्यांचे अशा - वनमाल्य - अरण्यातील फुले, - बर्हधातुप्रवाल - मोरांची पिसे, काव आदिकरून रंग व अंकुर यांनी - नटवेषं - नटासारखा वेष झाला आहे ज्याचा अशा - अनुव्रतांसे विन्यस्तहस्तं - मित्रांच्या खांद्यावर ठेविला आहे हात ज्याने अशा - इतरेण अब्जं धुनानं - दुसर्या हाताने कमळ फिरविणार्या - कर्णोत्पलालक - कानात कमळे आहेत ज्याच्या - कपोलमुखाब्जहासं - व गालांवर केसांचे झुबके, मुखकमळावर हास्य असलेल्या. ॥२२॥ प्रायः - पुष्कळ वेळा - श्रुतप्रिय - ऐकलेल्या अत्यंत आवडत्या अशा कृष्णाच्या - तमोदयकर्णपूरैः - उत्कर्षाच्या कथा हीच कर्णभूषणे त्यांच्या योगाने - यस्मिन् - ज्याच्या ठिकाणी - निमग्नमनसः - बुडून गेले आहे चित्त ज्यांचे अशा त्या स्त्रिया - तं अन्तः प्रवेश्य - त्या श्रीकृष्णाला अंतःकरणात नेऊन - नरेंद्र - हे परीक्षित राजा - यथा अभिमतयः - जशा अहंकारादि वृत्ति सुषुप्तीत - प्राज्ञं सुचिरं परिरभ्य - जागृत असणार्या जीवाला चिरकाल मिठी मारून - तल्लीनाः भवंति तथा - तल्लीन होतात त्याप्रमाणे - तापं विजहुः - तापत्रयाला सोडत्या झाल्या. ॥२३॥ तथा - त्याप्रमाणे - आत्मदिदृक्षया - पाहण्याच्या इच्छेने - त्यक्तसर्वाशाः - सोडिल्या आहेत सर्व आशा ज्यांनी अशा - ताः - त्या स्त्रिया - प्राप्ताः विज्ञाय - आलेल्या जाणून - अखिलदृक् दृष्टा - सर्वांकडे ज्याची दृष्टि आहे असा सर्वसाक्षी कृष्ण - प्रहसिताननः प्राह - हास्यमुख होत्साता बोलता झाला. ॥२४॥ महाभागाः - हे भाग्यशाली स्त्रियांनो - वः स्वागतं - तुमचे स्वागत असो - आस्यतां - बसावे - किं करवाम् - आम्ही काय करावे - यत् - ज्याअर्थी आम्ही - नः दिदृक्षया - मला पाहण्याच्या इच्छेने - (यूयम्) प्राप्ताः - तुम्ही आलेल्या आहा - (तत्) इदम् हि वः - त्याअर्थी तुमचे हे करणे - उपपन्नम् (अस्ति) - योग्यच आहे. ॥२५॥ ननु - खरोखर - स्वार्थदर्शनाः - आपला पुरुषार्थ पाहणारे - कुशलाः (पुरुषाः) - विवेकी पुरुष - आत्मप्रिये - सर्वांच्या अंतर्यामी व सर्वांना आवडता अशा - मयि - माझ्या ठिकाणी - यथा (वत्) - योग्य रीतीने - अहैतुक्यव्यवहितां भक्तिं - फलाची कल्पना जीत नाही अशी अखंड भक्ति - अद्धा कुर्वंति - प्रत्यक्ष करितात. ॥२६॥ प्राणबुद्धिमनःस्वात्म - प्राण, बुद्धि, मन, इष्टमित्र, आत्मा, - दारापत्यधनादयः - स्त्री, पुत्र, धन इत्यादि - यत्संपर्कात् प्रियाः आसन् - ज्याच्या संबंधामुळे प्रिय होतात - ततः अपरः कः - त्याहून दुसरा कोणता पदार्थ - नु प्रियः (अस्ति) - खरोखर प्रिय असणार. ॥२७॥ तत् - तरी - देवयजनं यात् - यज्ञशाळेत जा - गृहमेधिनः - गृहस्थाश्रमी - वः पतयः द्विजातयः - असे तुमचे पती जे ब्राह्मण ते - युष्माभिः - तुमच्या योगाने - स्वसत्रं पारयिष्यंति - आपला यज्ञ समाप्त करतील. ॥२८॥ विभो - हे प्रभो - भवान् - तू - एवं नृशंसं गदितुं - याप्रमाणे कठोर भाषण करण्यास - मा अर्हसि - योग्य नाहीस - (स्वं) निगमं सत्यं कुरुष्व - आपली प्रतिज्ञा खरी कर - वयं समस्तबंधून् अतिलंघ्य - आम्ही सर्व बांधवांना सोडून - (तव) पदा - तुझ्या चरणांनी - अवसृष्टं तुलसिदाम - स्पर्श केलेली तुळशीची माळ - केशैः निवोढुं - केसांनी धारण करण्याकरिता - (अत्र) प्राप्ता - येथे आलेल्या आहो. ॥२९॥ पतयः पितरौ सुताः - आमचे पति, आईबाप व मुले - नः एव गृह्णन्ति - आम्हाला घरात घेणार नाहीत - वा - तसेच - भ्रातृबंधुसुहृदः - भाऊ, इष्टमित्र, बांधव - (न गृह्णन्ति) - हेही घेणार नाहीत - च अन्ये कुतः एव - मग दुसरे कोठून घेणार - तस्मात् - म्हणून - अरिंदम - हे शत्रूंचे दमन करणार्या कृष्णा - भवत्प्रपदयोः - तुझ्या पायांवर पडला आहे - पतितात्मनां नः - देह ज्यांचा अशा आम्हाला - अन्य गतिः - दुसरा मार्ग - न भवेत् - राहिला नाही - (यथा) तत् विधेहि - जे योग्य वाटेल तसे कर. ॥३०॥ पतयः पितृभ्रातृसुतादयः - पती, आईबाप, मुलगे वगैरे - लोकाः च - आणि इतर जन - न (वः) अभ्यसूयेरन् - तुमचा तिरस्कार करणार नाहीत - मया उपेताः - मी आज्ञा दिलेले - देवाः अपि अनुमन्वते - देवसुद्धा तुमचा मान राखतील. ॥३१॥ इह - या लोकी - नृणां अङगसङगः - मनुष्यांचा परस्पर होणारा शरीरसंबंध - प्रीतये अनुरागाय (च) - खर्या सुखाला किंवा खर्या प्रेमाला न हि (भवति) - कारण होत नाही - तत् मयि - त्याकरिता माझे ठिकाणी - मनः युञ्जानाः - चित्त ठेवणार्या अशा तुम्ही - अचिरात् मां अवाप्स्यथ - लवकरच माझ्या ठिकाणी प्राप्त व्हाल. ॥३२॥ इति (कृष्णेन) उक्ताः - याप्रमाणे कृष्णाने सांगितल्या गेलेल्या - ताः मुनिपत्न्यः - त्या ऋषिपत्न्या - पुनः यज्ञवाटं गताः - पुनः यज्ञशाळेत गेल्या - च ते - आणि ते ब्राह्मणहि - अनसूयवः (ब्राह्मणाः) - त्यांचा तिरस्कार न करणारे होत्साते - स्वाभिः स्त्रीभिः - आपआपल्या स्त्रियांसह - सत्रं अपारयन् - यज्ञ समाप्त करिते झाले. ॥३३॥ तत्र एका - त्या यज्ञशाळेत एक स्त्री - भर्त्रा विधृता - पतीने धरून ठेविलेली - भगवंतं - परमेश्वराचे स्वरूप - यथाश्रुतं - जसे ऐकिले होते त्याप्रमाणे त्याला - हृदा उपगुह्य - मनाने आलिंगन देऊन - कर्मानुबंधनं - कर्मानुरूप प्राप्त झालेल्या - देहं जहौ - देहाला सोडिती झाली. ॥३४॥ भगवान् प्रभुः गोविंदः अपि - षड्गुणैश्वर्यसंपन्न समर्थ कृष्णही - तेन चतुर्विधेन - त्या चार प्रकारच्या - अन्नेन एव - अन्नानेच - गोपकान् अशयित्वा - गोपांना जेवू घालून - स्वयं च बुभुजे - स्वतःहि जेविता झाला. ॥३५॥ एवं - याप्रमाणे - लीलानरवपुः - लीलेने मनुष्यरूप धारण करणारा श्रीकृष्ण - नृलोकं अनुशीलयन् - मनुष्यांप्रमाणे आपले वर्तन ठेवणारा - रूपवाक्कृतैः - रूपाने, वाणीने, व कृतीने - गोगोपगोपींना रमयन् - गाई, गोप व गोपी ह्यांना रमवीत - रेमे - क्रीडा करिता झाला. ॥३६॥ अथ - नंतर - ते विप्राः - ते ब्राह्मण - यत् - ज्याअर्थी - नृविडंबयोः - मनुष्याचे अनुकरण करणार्या - विश्वेश्वरयोः - व विश्वाचे स्वामी अशा - याञ्चाम् - बलरामकृष्णांच्या याचनेला - अहन्म - आम्ही हाणून पाडिले - (तत्) कृतागसः (वयं) अनुस्मृत्य - त्याअर्थी आम्ही अपराधी आहो असे स्मरण करून - अन्वतप्यन् - पश्चात्ताप पावते झाले. ॥३७॥ भगवति कृष्णे - षड्गुणैश्वर्यसंपन्न कृष्णाच्या ठिकाणी - स्त्रीणां अलौकिकीं भक्तिं दृष्टवा - स्त्रियांची अलौकिक भक्ति पाहून - अनुतप्ताः - पश्चात्ताप पावलेले ते ब्राह्मण - आत्मानं च तया हीनं - आणि त्या भक्तिने रहित अशा स्वतःला पाहून - व्यगर्हयन् - स्वतःची निंदा करिते झाले. ॥३८॥ तेषां ये (वयम्) तु - त्यामध्ये जे आम्ही ते तर - अधोक्षजे विमुखाः (स्मः) - परमेश्वराच्या ठिकाणी पराङ्मुख आहो - नः त्रिवृत् जन्म धिक् - त्या आमचा तिहेरी जन्म व्यर्थ होय - (नः) व्रतं धिक् - आमच्या ब्रह्मचर्याला धिक्कार असो - बहुज्ञतां धिक् - सर्वज्ञत्वाला धिक्कार असो - कुलं धिक् - कुळाला धिक्कार असो - क्रियादाक्ष्यं (अपि) धिक् - व आमच्या कार्यकुशलतेलाही धिक्कार असो. ॥३९॥ यत् - ज्याअर्थी - नृणां गुरवः - मनुष्यांचे गुरु असे - वयं द्विजाः - आम्ही ब्राह्मण - स्वार्थे मुह्यामहे - स्वार्थाच्या विषयात मोहित होतो - भगवतः माया - परमेश्वराची माया - नूनं योगिनांअपि - खरोखर योगी लोकांना सुद्धा - मोहिनी - मोहित करणारी आहे. ॥४०॥ अहो - अहो - (तस्मिन्) जगद्गुरौ कृष्णै - त्या जगद्गुरु श्रीकृष्णाच्या ठिकाणी - नीराणां अपि - स्त्रियांची सुद्धा - दुरंतभावं पश्यत - अद्वितीय भक्ति पहा - यः - जी - गृहाभिधान् मृत्यूपाशान् - संसाररूपी मृत्यूच्या पाशांना - अविध्यत् - तोडती झाली. ॥४१॥ आसां द्विजातिसंस्कारःन - ह्या स्त्रियांचा उपनयनादि संस्कार झालेला नाही - गुरौ निवासः अपि न - गुरूचे घरी राहणे देखील झालेले नाही - (आसां) तपः न - ह्यांनी तपश्चर्या केली नाही - आत्ममीमांसा न - ह्यांनी आत्मा व अनात्मा यांचा विचार केलेला नाही - (आसां) न शौचं - यांना पवित्रता नाही - शुभाः क्रियाः न - शुभकारक संध्योपासनादि क्रियाहि ह्यांनी केल्या नाहीत. ॥४२॥ अथ अपि हि - असे असूनही खरोखर - उत्तमश्लोके - ज्याची कीर्ति पुण्यकारक आहे - योगेश्वरे कृष्णे - अशा श्रेष्ठ योगी जनांचा अधिपति जो कृष्ण त्याच्या ठिकाणी - (आसाम्) दृढा भक्तिः (अस्ति) - ह्या स्त्रियांची निश्चल भक्ति आहे - च - आणि - संस्कारादिमतां अपि - व संस्कारादिक झालेल्या अशा - अस्माकं न - आमचीही नाही. ॥४३॥ अहो - अहो - ननु गृहेहया - खरोखर गृहासक्त असल्यामुळे - स्वार्थविमूढानां - स्वार्थाविषयी अविचारी अशा - प्रमत्तानां नः - उन्मत्त झालेल्या आम्हाला - गोपवाक्यैः - गोपांच्या भाषणांच्या द्वारा - सतां गतिः - सज्जनांचा आश्रय असा कृष्ण - (आत्मस्वरूपं) - आत्मस्वरूपाची - स्मारयामास - आठवण करून देता झाला. ॥४४॥ अन्यथा पूर्णकामस्य - नाही तर निरिच्छ अशा - कैवल्याद्याशिषांपतेः - मोक्षादिक वैभव देण्याविषयी समर्थ - ईशस्य - अशा परमेश्वराला - ईशितव्यैः अस्माभिः - ऐश्वर्येच्छु अशा आमच्याशी - एतत् विडम्बनं किम् - हे अन्नाची याचना करण्याचे क्षुल्लक काम कशाला हवे होते. ॥४५॥ असकृत् - वारंवार परमेश्वराच्या - पादस्पर्शाशया श्रीः - चरणस्पर्शाची इच्छा करणारी लक्ष्मी - अन्यान् हित्वा - दुसर्यांना टाकून - यं भजते - ज्याची सेवा करते - आत्मदोषापवर्गेण तद्याञ्चा - त्याने चांचल्य व गर्व सोडून केलेली याचना - जनविमोहिनी - लोकांना मोहात पाडणारी होय. ॥४६॥ देशः कालः पृथक् द्रव्यं - देश, काल, प्रत्येक वस्तु - मंत्रतंत्रर्त्विजः अग्नयः - मंत्र, तंत्र, ऋत्विज, अग्नि - देवता यजमानः च - देवता आणि यजमान - क्रतुः धर्मः च - तसेच यज्ञ व धर्म - यन्मयः - ज्या परमेश्वराचे स्वरूप आहे. ॥४७॥ सः एषः - तो हा - साक्षात् भगवान् - प्रत्यक्ष षड्गुणैश्वर्यसंपन्न - योगेश्वरेश्वरः विष्णुः - योगेश्वरांमध्येहि श्रेष्ठ असा विष्णु - यदुषुः जातः (अस्ति) - यदुकुलांत उत्पन्न झाला आहे - इति अशृण्म - असे आम्ही ऐकिले - (तथा) अपि हि मूढाः (वयं) - तरीदेखील खरोखर मूर्ख असे आम्ही - (तं) न विद्महे - त्याला जाणत नाही. ॥४८॥ अहो - अहो - वयं धन्यतमाः (स्मः) - आम्ही अत्यंत धन्य आहोत - येषां नः - ज्या आमच्या - तादृशीः स्त्रियः (सन्ति) - तशा स्त्रिया आहेत - यासां भक्त्या - ज्यांच्या भक्तीने - हरौ - परमेश्वराच्या ठिकाणी - अस्माकं निश्चला मतिः जाता - आमची अढळ भक्ति उत्पन्न झाली ॥४९॥ यन्मायामोहितधियः - ज्याच्या मायेने मोहित झाली आहे बुद्धि ज्यांची असे आम्ही - कर्मवर्त्मसु भ्रमामः - कर्ममार्गात भ्रमण करीत आहो - (तस्मै) अकुंठमेधसे भगवते - अकुंठित आहे बुद्धि ज्याची अशा त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न - तुभ्यं कृष्णाय नमः - कृष्णस्वरुपी तुला नमस्कार असो ॥५०॥ सः आद्यः पुरुषः - तो आदिपुरुष कृष्ण - स्वमाया मोहितात्मनां - आपल्या मायेने मोहित झाले आहे चित्त ज्यांचे अशा - अविज्ञातानुभावानां नः - व स्वानुभव समजला नाही ज्यांना अशा आमच्या - अतिक्रमं क्षंतुं अर्हति - अपराधाबद्दल क्षमा करण्यास समर्थ आहे ॥५१॥ इति स्वाघं अनुस्मृत्य - याप्रमाणे आपले दुष्कृत स्मरुन - कृष्णे कृतहेलनाः ते - कृष्णाची निर्भर्त्सना केलेले ते विप्र - अच्युतयोः - रामकृष्णांना - दिदक्षवः अपि - पहाण्याची इच्छा करणारे असताहि - कंसात् भीताः - कंसाला भिऊन - न च अचलन् - गेले नाहीत ॥५२॥ अध्याय तेविसावा समाप्त |