श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २४ वा - अन्वयार्थ

इंद्रयज्ञ निवारण -

बलदेवेन संयुतः - बळरामाने युक्त असा - भगवान् अपि - कृष्णहि - तत्र एव निवसन् - त्याठिकाणीच रहात असता - इंद्रयागकृतोद्यमान् - इंद्रासाठी यज्ञाची खटपट चालविली आहे - गोपान् अपश्यत् - ज्यांनी अशा गोपांना पहाता झाला. ॥१॥

सर्वात्मा सर्वदर्शनः - सर्वांचा आत्मा व सर्वसाक्षी असा - भगवान् - श्रीकृष्ण - तत् अभिज्ञः अपि - ते सर्व जाणत असूनहि - प्रश्रयावनतः - मोठ्या नम्रतेने - नंदपुरोगमान् वृद्धान् - नंदप्रमुख वृद्ध गोपांना - अपृच्छत् - विचारता झाला. ॥२॥

पितः - हे पित्या - कः अयम् संभ्रमः - कोणता हा धांदलीचा प्रसंग - वः उपागतः - तुम्हाला आला आहे - इति मे कथ्यतां - हे मला सांगा - (अस्य) फलं किं - याचे फल काय - कस्य च उद्देशः (तस्मिन् अस्ति) - आणि यात कोणता उद्देश आहे - केन वाम मुखः साध्यते - आणि कशाने हा यज्ञ साध्य होतो - पितः - हे पित्या - शुश्रूषवे मह्यं - ऐकू इच्छिणार्‍या मला - एतत् ब्रूहि - हे सांगा - महान् कामः - मोठी उत्कंठा आहे - इह हि - येथे खरोखर - सर्वात्मनां साधूनां - सर्वत्र साक्षीरूपाने असणार्‍या साधूंना - गोप्यं कृत्यं न हि - कोणतेही कृत्य गुप्त ठेवण्यासारखे नसते. ॥३-४॥

अस्वपरदृष्टींनां अपि - ज्यांची आपपर दृष्टि नाही अशा लोकांनाहि - अमित्रोदास्तविद्विषां (मध्ये) - मित्र नसलेल्या, उदासीन व शत्रू यांपैकी - उदासीनः अरिवत् वर्ज्यः - उदासीन मनुष्य शत्रूप्रमाणे वर्ज असतो - तु - परंतु - सुहृद् आत्मवत् उच्यते - मित्र स्वतःप्रमाणे म्हटला आहे. ॥५॥

अयं जनः - हा लोकसमूह - ज्ञात्वा च अज्ञात्वा - जाणून किंवा अज्ञानाने - कर्माणि अनुतिष्ठति - कर्मे करीत असतो - विदुषः कर्मसिद्धिः (भवति) - ज्ञान्याला कर्माचे फळ मिळते - तथा अविदुषः न भवेत् - त्याप्रमाणे अज्ञान्याला मिळत नाही. ॥६॥

तत्र तावत् - तर त्याअर्थी - भवतां क्रियायोगः - तुमचा हा यज्ञकर्माचा खटाटोप - किम् विचारितः - कोणत्या शास्त्रविचाराने ठरविलेला आहे - अथवा लौकिकः - किंवा लौकिक आचाराने ठरविलेला आहे - पृच्छतः मे - प्रश्न करणार्‍या मला - तत् भण्यतां - ते नीटपणे सांगा. ॥७॥

भगवान् इंद्रः पर्जन्यः - भगवान इंद्र हा पर्जन्यरूप आहे - तस्य (च) - व त्या इंद्राची - आत्ममूर्तयः मेघाः - जणू स्वतःची शरीरेच असे मेघ - ते - ते - भूतानां प्रीणनं - प्राणिमात्राला समाधान देणारे - जीवनं पयः - त्यांच्या जगण्याचे साधन असे पाणी - अभिवर्षंति - वर्षतात. ॥८॥

तात - बाळा - वयं - आम्ही - अन्ये च नराः - व दुसरे लोक - तं वार्मुचां पतिं ईश्वरं - त्या मेघांचा स्वामी अशा इंद्राला - तद्रेतसा - त्याच्या वृष्टिरूपी जलाने - सिद्धैः द्रव्यैः - सिद्ध झालेल्या द्रव्यांनी - क्रतुभिः यजंते - यज्ञाच्या रूपाने पूजीत असतात. ॥९॥

तच्छेषेण - ह्या यज्ञातील शेषाने - त्रिवर्गफलहेतवे - धर्म, अर्थ व काम ह्यांच्या सिद्धीकरिता - ते उपजीवंति - ते उपजीविका करितात - पुरुषकाराणां पुंसां - कृषिकर्मादि उद्योग करणार्‍या पुरुषांना - पर्जन्यः फलभावनः (अस्ति) - पर्जन्य फल देणारा होय. ॥१०॥

यः नरः - जो मनुष्य - एवं पारंपर्यागतं धर्मं - याप्रमाणे परंपरेने प्राप्त झालेल्या धर्माला - कामात् लोभात् - स्वेच्छाचारामुळे किंवा लोभाने - भयात् द्वेषात् - भयाने किंवा द्वेषाने - विसृजेत् - सोडील - सः वै - तो खरोखर - शोभनं न आप्नोति - कल्याणाला प्राप्त होत नाही. ॥११॥

नंदस्य - नंदाचे - तथा - त्याप्रमाणे - अन्येषां व्रजौकसां - इतर गोकुलवासी लोकांचे - वचः निशम्य - भाषण श्रवण करून - केशवः - श्रीकृष्ण - इंद्राय मन्युं जनयन् - इंद्राला क्रोध उत्पन्न होईल असे - पितरं प्राह - पित्याला बोलला. ॥१२॥

जंतुः कर्मणा जायते - प्राणी कर्माने उत्पन्न होतो - कर्मणा एव विलीयते - कर्मानेच नाश पावतो - सुखं दुःखं - सुख किंवा दुःख - भयं क्षेमं - भीति किंवा कल्याण - कर्मणा एव अभिपद्यते - कर्मानेच प्राप्त होते. ॥१३॥

अन्यकर्मणां फलरूपी - इतर कर्मांचा फलदाता - कश्चित् ईश्वरः - कोणी एक ईश्वर - अस्ति चेत् - जर असेल - सः अपि - तो सुद्धा - कर्तारं भजते - कर्म करणार्‍यालाच फल देतो - सः हि - तो खरोखर - अकर्तुः प्रभुः नहि - कर्म न करणार्‍याला फल देण्यास समर्थ नाहीच. ॥१४॥

स्वस्वकर्मानुवर्तिनां - आपापल्या कर्माला अनुसरणार्‍या - भूतानाम् नृणां (च) - प्राण्यांचे व मनुष्यांचे - स्वभावविहितं - स्वभावानुरुप - अन्यथा कर्तुं - केलेले कर्म उलट करण्यास - अनीशेन इंद्रेण - असमर्थ अशा इंद्राकडून - इह किम् - या लोकात काय होण्यासारखे आहे. ॥१५॥

स्वभावतंत्रः हि जनः - खरोखर निसर्गाच्या आधीन असलेले हे लोक - स्वभावं अनुवर्तते - निसर्गाला अनुसरतात - इदं सदेवासुरमानुषं सर्वं - हे देव, असुर व माणसे यांसह सर्व जग - स्वभावस्थं - निसर्गाच्या ठिकाणी रहाणारे होय. ॥१६॥

कर्मणा - कर्माने - उच्चावचान् - उच्च किंवा नीच - देहान् प्राप्य - देहांना प्राप्त होऊन - जन्तुः तान् उत्सृजति - प्राणी त्यांना टाकून देतो - शत्रुः मित्रं उदासीनः - शत्रु, मित्र व तटस्थ - गुरुः ईश्वरः - तसेच गुरु आणि ईश्वर हे - कर्म एव - कर्मच होत. ॥१७॥

तस्मात् स्वभावस्थः - त्याकरिता निसर्गाच्या ठिकाणी राहून - स्वकर्मकृत् - स्वकर्म करणार्‍या मनुष्याने - कर्म संपूजयेत् - कर्माला मान द्यावा - येन (नरः) अंजसा वर्तेत - ज्यायोगे मनुष्य सुखाने राहील - तत् एव - तेच - हि अस्य दैवतम् - खरोखर त्याचे दैवत होय. ॥१८॥

यः तु - पण जो - एकतरं भावं आजीव्य - एकावर श्रद्धा ठेवून - अन्यं उपजीवति - दुसर्‍यावर उपजीविका चालवितो - तस्मात् - त्यापासून - क्षमं न विन्दते - कल्याणाला प्राप्त होत नाही - यथा - ज्याप्रमाणे - जारं (आजीव्य) - जारावर प्रेम दाखवून - असती नारी - व्यभिचारिणी स्त्री - क्षेमं न विन्दते - कल्याणाला प्राप्त होत नाही. ॥१९॥

विप्रं ब्रह्मणा वर्तेत - ब्राह्मणाने वेदाध्ययनाने रहावे - राजन्यः भुवः रक्षया - क्षत्रियाने पृथ्वीच्या रक्षणाने - वैश्यः तु - वैश्याने तर - वार्तया जीवेत् - वाणिज्य वृत्तीने उपजीविका करावी - शूद्रः तु - आणि शुद्राने - द्विजसेवया (वर्तेत) - द्विजांच्या सेवेने रहावे. ॥२०॥

कृषिवाणिज्यगोरक्षा (इति त्रयम्) - कृषिकर्म, व्यापार, पशूपालन ही तीन - तुर्यं (च) कुसीदं - व चौथा व्याजबट्टा - चतुर्विधा वार्ता उच्यते - चार प्रकारची उपजीविका सांगितली आहे - तत्र - त्यामध्ये - वयम् - आपण - अनिशं गोवृत्तयः (स्मः) - रात्रंदिन गाईंवर उपजीविका करणारे आहो. ॥२१॥

सत्त्वं रजः तमः - सत्त्वगुण, रजोगुण व तमोगुण - इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः (सन्ति) - हे उत्पत्ति, स्थिति व नाश यांना कारणीभूत आहेत - रजसा विश्वं उत्पद्यते - रजोगुणाने हे विश्व उत्पन्न होते - अन्योन्यं - स्त्री-पुरुषांच्या संयोगाने - विविधं जगत् (उत्पद्यते) - नानाप्रकारचे जीवमय जगत होते. ॥२२॥

चोदिताः मेघाः - रजोगुणाने प्रेरित असे मेघ - सर्वतः अंबूनि वर्षंति - सर्व ठिकाणी उदकांची वृष्टि करितात. - तैः एव - त्या उदकानीच - प्रजाः सिद्ध्यन्ति - लोक जगतात - (तत्र) महेंद्रः किं करिष्यति - त्यात इंद्र काय करणार. ॥२३॥

तात - हे तात - पुरःनः न - नगरे आमची नव्हेत - जनपदः न - देश नव्हे - ग्रामाः गृहाः न - गावे व घरे नव्हेत - वयं वनौकसः - वन हेच ज्यांचे घर असे - नित्यं - निरंतर - वनशैलनिवासिनः - अरण्य व पर्वत यांमध्ये राहणारे आहोत. ॥२४॥

तस्मात् - यास्तव - गवां ब्राह्मणानां अद्रेः च - गाई, ब्राह्मण व पर्वत यांच्यासाठी - मखः आरभ्यतां - यज्ञ आरंभावा - ये इंद्रयागसंभाराः - ज्या इंद्राच्या यज्ञाकरिता संपादन केलेल्या वस्तू आहेत - तैः - त्यांनी - अयं मखः साध्यतां - हा यज्ञ साधावा. ॥२५॥

पायसादयः सूपान्ताः - खिरीपासून आमटीपर्यंत - विविधाः पाकाः - नानाप्रकारचे पदार्थ - संयावापूपशष्कुल्यः (च) - गव्हाचा शिरा, करंज्या इत्यादि - पच्यन्ताम् - शिजविले जावेत - सर्वदोहः च गृह्यतां - आणि दुधाचे सर्व पदार्थ घ्यावे. ॥२६॥

ब्रह्मवादिभिः ब्राह्मणैः - वेद पठण करणार्‍या ब्राह्मणांकडून - अग्नयः सम्यक् हूयंतां - अग्नि चांगल्या रीतीने पूजिले जावेत - वः तेभ्यः - तुम्हांकडून त्या ब्राह्मणांना - बहुविधं अन्नं देयं - नानाप्रकारचे अन्न दिले जावे - धेनुदक्षिणाः (च) देयाः - आणि गाईरूपी दक्षिणा दिल्या जाव्या. ॥२७॥

अन्येभ्यः - त्याप्रमाणेच इतर - आश्वचांडालपतितेभ्यः च - म्हणजे कुत्रे, चांडाल, पतित यांपर्यंत सर्वांना - यथार्हतः (अन्नं दत्वा) - योग्यतेप्रमाणे अन्न देऊन - गवां च - आणि गाईंना - यवसं दत्त्वा - तृण देऊन - गिरये बलिः दीयतां - पर्वताला नैवेद्य द्यावा. ॥२८॥

च - आणि - स्वलंकृताः - चांगले अलंकार धारण केलेले - भुक्तवंतः - व जेऊन तृप्त झालेले - स्वनुलिप्ताः - अंगाला चांगल्या उटया लाविलेले - सुवाससः (यूयम्) - व सुंदर वस्त्रे धारण केलेले असे तुम्ही - गोविप्रानलपर्वतान् - गाई, ब्राह्मण, अग्नि व पर्वत यांना - प्रदक्षिणं कुरूत - प्रदक्षिणा करा. ॥२९॥

तात - अहो तात - एतत् मम मतं - असे माझे मत आहे - यदि (तुभ्यम्) - जर तुम्हाला - रोचते तर्हि क्रियतां - आवडत असेल तर करा - मह्यं च - मला तर - गोब्राह्मणाद्रीणां - गाई, ब्राह्मण व पर्वत यांच्यासाठी - अयं मखः - केलेला हा यज्ञ - दयितः - आवडतो. ॥३०॥

शक्रदर्पं जिघांसता - इंद्राचा गर्व नष्ट करण्याची इच्छा करणार्‍या - कालात्मना भगवता - कालस्वरूपी कृष्णाने - प्रोक्तं - बोललेले - निशम्य - श्रवण करून - नंदाद्याः - नंद आदिकरून मंडळी - तद्वचः - त्याचे भाषण - साधु अगृह्‌णन्त - चांगले म्हणून स्वीकारते झाले. ॥३१॥

च - आणि - यथा - ज्याप्रमाणे - मधुसूदनः आह - कृष्ण बोलला - तथा (ते) सर्वं व्यदधुः - त्याप्रमाणे ते सर्व करिते झाले - स्वस्त्ययनं वाचयित्वा - पुण्याहवाचन करवून - तद्‌द्रव्येण - त्या द्रव्यानेच - गिरिद्विजान् - पर्वत व ब्राह्मण यांना. ॥३२॥

बलीन् उपहृत्य - पूजा समर्पण करून - गवां (च) यवसं (उपहृत्य) - तसेच गाईंना गवत देऊन - आदृताः - आदराने युक्त असे - गोधनानि पुरस्कृत्य - गाईंना पुढे करून - गिरिं प्रदक्षिणं चक्रुः - पर्वताला प्रदक्षिणा करिते झाले. ॥३३॥

च - आणि - स्वलंकृताः ते - अलंकार धारण केलेले ते गोप - अनडुद्युक्तानि अनांसि आरुह्य - बैल जुंपलेल्या गाडयात बसून - गोप्यः च - आणि गोपीही - कृष्णवीर्याणि गायंत्यः - कृष्णाचे पराक्रम गाणार्‍या अशा - सद्विजाशिषः - ब्राह्मणांच्या त्या आशीर्वादाने युक्त अशा - गिरिं प्रदक्षिणं - पर्वताला प्रदक्षिणा - चक्रुः - करित्या झाल्या. ॥३४॥

गोपविश्रंभणं - गोपांना विश्वास उत्पन्न होईल असे - अन्यतमं - दुसरे - बहद्वपुः गतः - मोठे आहे शरीर ज्यांचे असे रूप धारण करणारा - शैलः अस्मि - मी पर्वत आहे - इति ब्रुवन् - असे बोलून - भूरिं बलीं आददत् - अर्पण केलेला अन्नाचा ढीग खाता झाला. ॥३५॥

तस्मै आत्मने - त्या आपल्याच स्वरूपाला - व्रजजनैः सह - गोकुळातील लोकांसह - आत्मना नमः चक्रे - आपणच नमस्कार करिता झाला - अहो पश्यत - अहो पहा - असौ शैलः - हा पर्वत - रूपी (भूत्वा) - शरीर धारण करणारा होऊन - नः अनुग्रहं व्यधात् - आम्हांवर अनुग्रह करिता झाला. ॥३६॥

कामरूपी एषः - सर्पादि ऐच्छिक रूपे धारण करणारा हा पर्वत - अवजान - अपमान करणार्‍या - वनौकसः मर्त्यान् - वनात राहणार्‍या लोकांना - हंति - मारितो - आत्मनः - स्वतःच्या - गवां च शर्मणे - व गाईंच्या कल्याणाकरिता - अस्मै हि - ह्याला आपण खरोखर - नमस्यामः - नमस्कार करू या. ॥३७॥

इति - याप्रमाणे - वासुदेवप्रणोदिताः ते गोपाः - कृष्णाने प्रेरणा केलेले ते गोप - अद्रिगोद्विजमखं - पर्वत, गाई व ब्राह्मण यांची पूजा - यथा (वत्) विधाय - यथाशास्त्र करून - सहकृष्णः - कृष्णासह - व्रजं ययुः - गोकुळात जाते झाले. ॥३८॥

अध्याय चोविसावा समाप्त

GO TOP