|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १५ वा - अन्वयार्थ
धेनुकसुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव - ततः च - त्यानंतर - पौगण्डवयःश्रितौ तौ - पौगंड वयाचा आश्रय केलेले ते दोघे - व्रजे पशुपालसंमतौ बभूवतुः - गोकुळात गाई राखण्याजोगे झाले - सखिभिः समं गाः चारयन्तौ - मित्रांसह गाई चारणारे ते - वृंदावनं - वृंदावनाला - पदैः - पावलांनी - अतीव पुण्यं चक्रतुः - अत्यंत पवित्र करते झाले. ॥१॥ तत् (एकदा) - मग एके दिवशी - विहर्तुकामः माधवः - खेळण्याची इच्छा करणारा श्रीकृष्ण - वेणुं उदीरन् - मुरली वाजवीत - स्वयशः गृणद्भिः गौपेः वृतः - आपले यश गाणार्या गोपांनी वेष्टिलेला - बलान्वितः - बलरामासह - पशून् पुरस्कृत्य - गाईंना पुढे करून - पशव्यं कुसुमाकरं वनं आविशत् - गाईंना सोईस्कर व फुलांनी युक्त अशा वनात शिरला. ॥२॥ मञ्जुघोषालिमृगद्विजाकुलं - मंजुळ शब्द करणारे भृंग, हरिण व पक्षी यांनी व्यापिलेले - महन्मनःप्रख्यपयःसरस्वता - साधू पुरुषांच्या मनाप्रमाणे स्वच्छ आहे उदक ज्यातील अशा सरोवरावरून वाहणार्या - शतपत्रगन्धिना वातेन - कमळाचा वास ज्यात आहे अशा वायूने - जुष्टं - सेविलेले - तत् (वृंदावनं) निरीक्ष्य - ते वृंदावन पाहून - भगवान् (तत्र) रन्तु मनः दधे - श्रीकृष्ण तेथे रमण्याचा विचार करिता झाला. ॥३॥ सः आदिपुरुषः - तो श्रीकृष्ण - तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी - अरुणपल्लवश्रिया - आरक्तवर्ण पानांच्या कांतीने - फलप्रसूनोरुभरेण - फळे व फुले ह्यांच्या मोठया भाराने - पादयोः स्पृशच्छिखान् - पायांच्या ठिकाणी ज्यांच्या अग्राचा स्पर्श झाला आहे अशा - वनस्पतीन् वीक्ष्य - वनस्पतींना पाहून - मुदा स्मयन् इव - आनंदाने हास्य करीत - अग्रजम् आह - ज्येष्ठ बंधू जो बलराम त्याला म्हणाला. ॥४॥ अहो - अहो - अमी - हे वृक्ष - यत्कृतं तरुजन्म - ज्या पापाने वृक्षयोनीत जन्म दिला - आत्मनः तमोपहत्यै - त्या स्वतःच्या पापाचा नाश करण्यासाठी - शिखाभिः - शेंडयांनी - सुमनःफलार्हणं - पुष्पे व फळे यांची भेट - उपादाय - घेऊन - देववर - हे श्रेष्ठ देवा - अमरार्चितं - देवांनी पूजिलेल्या - ते पादाम्बुजं - तुझ्या चरणकमलाला - नमन्ति - नमस्कार करीत आहेत. ॥५॥ अनघ - हे निष्पापा - अखिललोकतीर्थं - सर्व लोकाला पवित्र करणारे - तव यशः गायन्तः - तुझे यश गाणारे - एते अलिनः - हे भ्रमर - आदिपुरुषानुपदं भजन्ते - आदिपुरुषाच्या प्रत्येक पावलाला सेवीत आहेत - प्रायः - बहुतकरून - अमी (भ्रमराः) - हे भ्रमर - भवदीयमुख्याः मुनिगणाः - तुझ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ असे ऋषिसमूह - वने अपि - अरण्यातही - गूढं आत्मदैवं न जहति - गुप्तरूपाने राहणार्या स्वतःच्या देवतेला सोडीत नाहीत. ॥६॥ ईडय - हे स्तुत्या - अमी शिखिनः - हे मोर - मुदा नृत्यन्ति - आनंदाने नाचत आहेत - हरिण्यः - हरिणी - गोप्यः इव - गोपींप्रमाणे - ईक्षणेन ते प्रियं कुर्वान्ति - अवलोकनाने तुझे प्रिय करीत आहेत - धन्याः वनौकसः कोकिलगणाः - अरण्यात राहणारे भाग्यशाली असे कोकिळांचे समुदाय - गृहं आगताय (ते) - घरी आलेल्या तुझे - इयान् हि सतां निसर्गः - कारण साधूंचा स्वभावच असा असतो. ॥७॥ अद्य - आज - इयं धरणी - ही पृथ्वी - धन्या - कृतकृत्य झाली आहे - त्वत्पादस्पृशः - तुझ्या पायांना स्पर्श करणार्या - तृणवीरुधः (धन्याः) - गवत व वेली धन्य होत - करजाभिमृष्टाः द्रुमलताः - नखांनी स्पर्शिलेले वृक्ष व त्यांवरील वेली - नद्यः अद्रयः खगमृगाः - नद्या, पर्वत, पक्षी व पशू - सदयावलोकैः (धन्याः) - दयापूर्ण अवलोकनांनी धन्य झाले आहेत - गोप्यः - गोपी - श्रीः अपि यत्स्पृहा (तेन) भुजयो अन्तरेण - लक्ष्मीसुद्धा ज्याची इच्छा करिते अशा त्या दोन बाहूंमधील वक्षस्थलाने - धन्या - धन्य झाल्या आहेत. ॥८॥ एवं - याप्रमाणे - श्रीमत्कृष्णः - ऐश्वर्याने शोभणारा श्रीकृष्ण - सानुगः - अनुसरणार्या मित्रांसह - अद्रेः सरिद्रोधस्सु - पर्वताजवळच्या नदीच्या तीरावर - पशून् संचारयन् - गाई चारीत - वृंदावनं (प्रति) प्रीतमनाः - वृंदावनावर प्रसन्न आहे चित्त ज्याचे असा - (तत्र) रेमे - तेथे रमता झाला. ॥९॥ अनुव्रतैः उपगीयमानानुचरितः - अनुसरणारे गोप गात आहेत चरित्र ज्याचे असा - स्रग्वी - कंठात माळा धारण करणारा - सङकर्षणान्वितः (सः) - बलरामासह तो श्रीकृष्ण - मदान्धालिषु गायत्सु - पुष्पांतील रसाने धुंद झालेले भ्रमर शब्द करीत असता - क्वचित् गायति - एखादे वेळी गाऊ लागे. ॥१०॥ क्वचित् च - आणि एखादे वेळी - कलहंसानां कूजितम् - कलहंस पक्षांच्या शब्दांप्रमाणे - अनुकूजति - शब्द करी - क्वचित् - एखादे वेळी - (मित्राणि) हासयन् - मित्रांना हासवीत - नृत्यन्तं बर्हिणं अभिनृत्यति - नाचणार्या मोरापुढे नृत्य करी. ॥११॥ क्वचित् - एखादे वेळी - गोगोपालमनोज्ञया - गाई व गोप यांना आवडणार्या - मेघगम्भीरया वाचा - मेघाप्रमाणे गंभीर अशा वाणीने - प्रीत्या - प्रेमाने - दूरगान् पशून् - दूर गेलेल्या पशूंना - नामभिः आह्वयति - नावांनी हाका मारी. ॥१२॥ क्वचित् - एखादे वेळी - चकोरक्रौञ्चचक्राह्वभारद्वाजान् बर्हिणः च - चकोर, क्रौंच, चक्रवाक, चंडोल आणि मोर यांप्रमाणे - अनुरौति स्म - शब्द करी - सत्त्वानां (इव) - इतर प्राण्यांप्रमाणे - व्याघ्रसिंहयोः भीतवत् (भवति) - वाघ व सिंह यांना भ्यालासारखा होतो.॥१३॥ क्वचित् - एखादे वेळी - क्रीडापरिश्रान्तं - खेळून दमलेल्या - गोपोत्सङगोपबर्हणम् - गोपाची मांडी हीच आहे उशी ज्याची अशा - आर्यं - ज्येष्ठ भ्राता जो बलराम त्याला - पादसंवाहनादिभिः - पाय चेपणे इत्यादिकांनी - स्वयं विश्रमयति - स्वतः विसावा देत असे. ॥१४॥ क्व अपि - एखादे प्रसंगी - गृहीतहस्तौ (तौ) - धरले आहेत हात ज्यांनी असे ते बलराम व श्रीकृष्ण - नृत्यतः - नाचणार्या - गायतः - गाणार्या - वल्गतः - बडबडणार्या - मिथः युध्यतः - आपापसांत कुस्ती खेळणार्या - गोपालान् - गोपांना - (हसन्तौ) प्रशशंसतुः - हास्यपूर्वक प्रशंसीत असत. ॥१५॥ क्वचित् - एखाद्या प्रसंगी - नियुद्धश्रमकर्शितः - कुस्तीच्या श्रमाने थकलेला - वृक्षमूलाश्रयः - झाडाच्या मूळाचा केला आहे आश्रय ज्याने असा - गोपोत्सङगोपबर्हणः - गोपाची मांडी आहे उशी ज्याची असा - पल्लवतल्पेषु - पानांच्या शय्येवर - शेते - निजे. ॥१६॥ केचित् - काही गोप - तस्य महात्मनः - त्या महात्म्या श्रीकृष्णाचे - पादसंवाहनं चक्रुः - पाय चेपण्याचे काम करीत - हतपाप्मानः अपरे - नष्ट झाले आहे पाप ज्यांचे असे दुसरे कित्येक गोप - व्यजनैः समवीजयन् - पंख्यांनी वारा घालीत. ॥१७॥ महाराज - हे परीक्षित राजा - स्नेहक्लिन्नधियः - प्रेमाने थबथबलेली आहे बुद्धी ज्यांची असे - अन्ये - दुसरे गोप - तदनुरूपाणि महात्मनः मनोज्ञानि (चरितानि) - त्याला साजेशी त्या माहात्म्या कृष्णाची मधुर चरित्रे - शनैः गायन्ति स्म - हळूहळु गात असत. ॥१८॥ ईशचेष्टितः (सः) - परमेश्वरासारख्या अलौकिक क्रिया करणारा तो श्रीकृष्ण - एवं स्वमायया निगूढात्मगतिः - त्याप्रमाणे आपल्या मायेच्या योगे झाकून टाकिला आहे स्वभाव ज्याने असा - चरितैः गोपात्मजत्वं विडम्बयन् - आचरणांनी गवळ्याच्या पुत्राचे अनुकरण करणारा - रमालालितपादपल्लवः - लक्ष्मीने सेविले आहेत कोमल चरण ज्याचे असा - ग्राम्यैः समं - खेडवळ मुलांसह - ग्राम्यवत् - गावंढळाप्रमाणे - रेमे - क्रीडा करीत असे. ॥१९॥ श्रीदामा नाम गोपालः - श्रीदामा या नावाचा एक गोपाल - रामकेशवयोः सखा (आसित्) - बलराम व श्रीकृष्ण ह्यांचा मित्र होता - सुबलस्तोककृष्णाद्याः - सुबल, स्तोककृष्ण इत्यादि - गोपाः - गोप - प्रेम्णा इदम् अब्रुवन् - प्रेमाने याप्रमाणे म्हणाले. ॥२०॥ राम - हे बलरामा - महाबाहो राम - मोठे आहेत बाहू ज्याचे अशा हे बलरामा - दुष्टनिबर्हण कृष्ण - हे दुष्टांचा नाश करणार्या कृष्णा - इतः अविदूरे - येथून जवळच - तालालिसंकुलं - ताडाचे वृक्ष व भ्रमरांचे थवे ह्यांनी व्याप्त - सुमहत् वनं (अस्ति) - असे एक मोठे अरण्य आहे. ॥२१॥ तत्र - त्या अरण्यात - भूरीणि फलानि - पुष्कळ फळे - पतन्ति पतितानि च सन्ति - पडतात व पडलेलीही असतील - किन्तु - परंतु - दुरात्मना धेनुकेन - दुष्टबुद्धीच्या धेनुकाने - अवरुद्धानि (सन्ति) - रोधून ठेविली आहेत. ॥२२॥ हे रामकृष्ण - हे बलरामा, हे कृष्णा - खररूपधृक् - गाढवाचे रूप धारण करणारा - अतिवीर्यः सः असुरः - मोठा पराक्रमी असा तो असुर - आत्मतुल्यबलैः अन्यैः - आपल्यासारख्या बलाढय अशा दुसर्या - बहुभिः ज्ञातिभिः वृतः (अस्ति) - पुष्कळशा भाऊबंदांनी वेष्टिलेला असा आहे. ॥२३॥ अमित्रहन् - हे शत्रुनाशका श्रीकृष्णा - कृतनराहारात् तस्मात् भीतैः - केले आहे मनुष्यांचे भक्षण ज्याने अशा त्याला भ्यालेल्या - नृभिः - मनुष्यांकडून - पशुगणैः पक्षिसंघैः च - पशुसमुदायांकडून व पक्षिकुलांकडून - विवर्जितं तत् - ओसाड असे ते अरण्य - न सेव्यते - सेविले जात नाही. ॥२४॥ फलानि - फळे - अभुक्तपूर्वाणि सुरभीणि - पूर्वी केव्हाही न सेविलेली व सुगंधी अशी - विद्यन्ते - आहेत - वै विषूचीनः सुरभिः एषः गन्धाः - खरोखर सर्वत्र पसरलेला हा मनोहर सुवास - अवगृह्यते - सेविला जात आहे. ॥२५॥ कृष्ण - हे कृष्णा - गन्धलोभितचेतसां नः - सुगंधाने लुब्ध झाली आहेत अन्तःकरणे ज्यांची अशा आम्हाला - तानि - ती फळे - प्रयच्छ - दे - राम - हे बलरामा - नः महती वाञ्छा अस्ति - आम्हाला फळे खाण्याची फारच इच्छा आहे - यदि रोचते गम्यतां - जर आमचे म्हणणे तुम्हाला आवडत असेल तर चला. ॥२६॥ एवं सुहृद्वचः श्रुत्वा - याप्रमाणे मित्रांची भाषण ऐकून - सुहृत्प्रियचिकीर्षया - मित्रांचे प्रिय करण्याच्या इच्छेने - गोपैः वृतौ प्रभू - गोपांनी वेष्टिलेले ते समर्थ रामकृष्ण - प्रहस्य जग्मतुः - हसून जाण्यास निघाले. ॥२७॥ बलः - बलराम - ओजसा मतंगजःइव - बळाने माजलेल्या हत्तीसारखा - प्रविश्य - वनात शिरून - बाहुभ्यां तालान् संपरिकम्पयन् - दोन बाहूंनी ताडवृक्षांना गदगद हलवीत - फलानि पातयामास - फळे पाडिता झाला. ॥२८॥ असुररासभः - गाढवाचा वेष घेतलेला असुर - पततां फलानां शब्दं निशम्य - पडणार्या फळांचा शब्द ऐकून - सनगं क्षितितलं परिकम्पयन् - पर्वतांसह पृथ्वीला कापवीत - अभ्यधावत् - धावत आला. ॥२९॥ खलः बली - दुष्ट व बलिष्ठ दैत्य - तरसा - वेगाने - समेत्य - येऊन - प्रत्यक् द्वाभ्याम् पद्भयां - मागच्या दोन तंगडयांनी - बलं उरसि निहत्य - बलरामाच्या उरावर प्रहार करून - काशब्दं मुञ्चन् - कुत्सित शब्द करीत - पर्यसरत् - सभोवार फिरू लागला. ॥३०॥ राजन् - हे राजा - उपक्रोष्टा - गाढव - पुनः आसाद्य - पुनः येऊन - पराक् स्थितः - पाठ करून उभा राहिला - रुषा संरब्धः - रागाने क्षुब्ध होऊन - अपरौ चरणौ बलाय प्राक्षिपत् - मागील पाय बलरामावर झाडिता झाला ॥३१॥ सः - तो बलराम - एकपाणिना प्रपदोः गृहीत्वा - एका हाताने दोन पाय धरून - भ्रामयित्वा - गरगर फिरवून - भ्रामणत्यक्तजीवितं तं - गरगर फिरविल्यामुळे ज्याचे प्राण निघून गेले आहेत अशा त्याला - तृणराजाग्रे - ताडाच्या झाडाच्या शिखरावर - चिक्षेप - फेकिता झाला ॥३२॥ तेन आहतः - त्याने ताडिलेला - बृहच्छिराः महातालः - मोठ्या विस्ताराचा तो मोठा ताडवृक्ष - वेपमानः - कापत - पार्श्वस्थं कम्पयन् भग्नः - जवळच्या वृक्षालाहि कापवीत मोडून पडला - सः च अन्यं (कंपयन् भग्नः) - तो वृक्ष दुसर्या वृक्षाला कापवीत मोडून पडला - सः अपि च अपरं - तो दुसरा वृक्षही तिसर्या वृक्षाला कापवीत पडता झाला ॥३३॥ बलस्य - बलरामाच्या - लीलया - लीलेने - उत्सृष्टखरदेहहताहताः - फेकिलेल्या गाढवाच्या शरीराने ताडिलेल्या ताडाने ताडिले गेलेले - सर्वे तालाः - सर्व ताडवृक्ष - महावातेरिताः इव - मोठ्या वादळाने हलविल्याप्रमाणे - चकम्पिरे - कापू लागले ॥३४॥ अङ्ग - हे राजा - जगदीश्वरे भगवति अनन्ते - त्रैलोक्याच्या व षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा बलरामाच्या ठिकाणी - एतत् - हे कृत्य - चित्रं नहि - आश्चर्यकारक नाही - यथा तन्तुषु पटः - जसे सुतांमध्ये वस्त्र - तथा - तसे - यस्मिन् इदं ओतप्रोतं (अस्ति) - ज्या ठिकाणी हे सर्व जग विणलेले आहे ॥३५॥ ततः - नंतर - संरब्धाः हतबान्धवाः - रागावलेले व ज्यांचे बंधु मारले गेले आहेत असे - ये धेनुकस्य ज्ञातयः - जे धेनुकासुराचे भाऊबंद - (ते) सर्वेक्रोष्ट्रारः - ते सर्व गाढव - कृष्णं च रामं च - कृष्ण व राम ह्यांवर - अभ्यद्रवन् - चाल करून आले ॥३६॥ नृप - हे राजा - कृष्णः रामः च - कृष्ण व बलराम - आपततः तान् तान् - अंगावर चालून येणार्या त्या त्या असुरांना - लीलया गृहीतपश्चाश्चरणान् - सहजरीतीने धरिले आहेत मागील पाय ज्यांचे अशा रीतीने - तृणराजसु प्राहिणोत् - ताडाच्या वृक्षांवर फेकिते झाले ॥३७॥ फलप्रकरसंकीर्णा - फळांच्या राशींनी व्याप्त झालेली - भूः - पृथ्वी - घनैःनभस्तलम् इव - मेघांनी आच्छादिलेल्या आकाशाप्रमाणे - सतालाग्रैः गतासुभिः दैत्यदेहैः - ताडाच्या शिखरांसह मरून पडलेल्या दैत्यांच्या देहांनी - रराज - शोभली ॥३८॥ विबुधादयः - देव आदिकरून मंडळी - तयोः तत् सुमहत् कर्म निशम्य - त्यांचे ते अत्यंत मोठे कृत्य ऐकून - पुष्पवर्षाणि मुमुचुः - फुलांची वृष्टि करते झाले - वाद्यानि चक्रुः - वाद्ये वाजविते झाले - तुष्टुवुः - स्तुती करिते झाले ॥३९॥ अथ - नंतर - गतसाध्वसाः मनुष्याः - निर्भय झालेले लोक - तालफलानि आदन् - ताडाची फळे खाते झाले - पशवः च - आणि गाई - हतधेनुककानने - नष्ट केला आहे धेनुकासुर ज्यातून अशा त्या अरण्यात - तृणं चेरुः - गवत खात फिरु लागल्या ॥४०॥ कमलपत्राक्षः - कमळाच्या पानांप्रमाणे डोळे आहेत ज्याचे असा - पुण्यश्रवणकीर्तनः - पुण्यकारक आहे श्रवण व कीर्तन ज्याचे असा - अनुगैः गोपैः स्तूयमानः - अनुचर अशा गोपांनी स्तविलेला - कृष्णः - श्रीकृष्ण - साग्रजः - ज्येष्ठ भाऊ जो बलराम त्यासह - व्रजम् आविशत् - गोकुळात शिरला ॥४१॥ दिदृक्षितदृशः गौप्यः - ज्यांच्या दृष्टी कृष्णदर्शनाविषयी उत्कंठित झाल्या आहेत अशा गोपी - समेताः - एकत्र जमून - गोरजश्छुरितकुंतलबद्धबर्हवन्यप्रसून - गाईच्या पायधुळीने रंगलेल्या केसात खोविलेली जी मोरांची पिसे व रानफुले - रुचिरेक्षणचारुहासम् - त्यामुळे शोभत आहेत सुंदर नेत्र व मनोहर हास्य ज्याचे असा - वेणुं क्वणन्तं - मुरली वाजविणारा - अनुगैः अनुगीतकीर्तिं - अनुचर अशा गोपांनी गाईली आहे कीर्ति ज्याची अशा - तं अभ्यगमन् - त्या श्रीकृष्णाला सामोर्या आल्या ॥४२॥ व्रजयोषितः - गोकुळातील स्त्रिया - अक्षिभृङ्गैः - नेत्ररूपी भ्रमरांनी - मुकुन्दमुखसारघं पीत्वा - श्रीकृष्णाच्या मुखकमळातील पुष्परस पिऊन - अह्रि विरहजं तापं जहुः - दिवसा श्रीकृष्णविरहामुळे झालेला ताप दूर करित्या झाल्या - सव्रीडहासविनयं - लज्जायुक्त मंद हास्य व नम्रपणा ज्यात आहे - यदपाङगमोक्षं तत्सकृतिं - असे जे गोपींचे कटाक्षदर्शन तद्रूप सत्काराला - समधिगम्य - मिळवून - कृष्णः - कृष्ण - गोष्ठं विवेश - गोठयात शिरला. ॥४३॥ पुत्रवत्सले यशोदारोहिण्यौ - पुत्रांवर प्रेम करणार्या यशोदा व रोहिणी - यथाकामं यथाकालं - इच्छेनुसार व कालानुरूप - तयोः पुत्रयोः - बलराम व श्रीकृष्ण ह्या दोन पुत्रांना - परमाशिषः व्यधत्तां - उत्तम आशीर्वाद देत्या झाल्या. ॥४४॥ तत्र - तेथे - मज्जनोन्मर्दनादिभिः - स्नान व अंग चोळणे इत्यादि क्रियांनी - गताध्वानश्रमौ - ज्यांचे मार्गातील श्रम नाहीसे झाले आहेत असे ते दोघे - रुचिरां नीवीं वसित्वा - सुंदर वस्त्रे नेसवून - दिव्यस्रग्गन्धमण्डि तौ (कृतौ) - ताज्या फुलांच्या माळा व सुगंधी द्रव्ये ह्यांनी शोभिवंत केले. ॥४५॥ व्रजे - गोकुळात - जनन्यपहृतं - मातांनी आणिलेले - स्वाद्वन्नं प्राश्य - मधुर अन्न सेवन करून - उपलालितौ (तौ) - खेळविले गेलेले ते दोघे राम व कृष्ण - वरशय्यायां - उत्तम बिछान्यावर - संविश्य - पडून - सुखं सुषुपतुः - सुखाने झोप घेते झाले. ॥४६॥ एवं - याप्रमाणे - वृन्दावनचरः - याप्रमाणे वृंदावनात हिंडणारा - सः भगवान् कृष्णः - तो षड्गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - क्वचित् - एके दिवशी - रामम् ऋते - रामाशिवाय - सखिभिः वृतः - आपले मित्र जे गोप त्यांनी वेष्टिलेला असा - कालिन्दिं ययौ - यमुनेच्या काठी गेला. ॥४७॥ अथ - नंतर - निदाघातपपीडितः - उन्हाळ्यातील उन्हाने पीडिलेल्या - गावः च गोपाः च - गाई व गोप - तृषार्ताः - तहानेने व्याकुळ होऊन - तस्याः विषदूषितं - त्या यमुनेचे विषाने वाईट झालेले - जुष्टं जलं - पाणी पिते झाले. ॥४८॥ कुरुद्वह - हे परीक्षित राजा - दैवोपहतचेतसः - दुर्दैवाने ज्यांची बुद्धी गांगरून गेली आहे असे - सर्वे - ते सर्व गोप व गाई - तत् विषाम्भः उपस्पृश्य - ते विषाने दूषित झालेले उदक पिऊन - सलिलान्ते व्यसवः निपेतुः - पाण्याच्या समीप मरून पडले. ॥४९॥ योगेश्वरेश्वरः कृष्णः - मोठमोठया योग्यांचाही अधिपती असा श्रीकृष्ण - तथाभूतान् वै तान् वीक्ष्य - तशा रीतीने खरोखर मृत झालेल्या त्यांना पाहून - अमृतवर्षिण्या ईक्षया - अमृताचा वर्षाव करणार्या दृष्टीने - स्वनाथान् - आपणच ज्याचे रक्षक आहोत - समजीवयत् - अशा त्यांना जिवंत करिता झाला. ॥५०॥ संप्रतीतस्मृतयः ते सर्वे - तत्काळ आली आहे स्मृति ज्यांना असे ते सर्व - जलान्तिकात् समुत्थाय - पाण्याच्या तीरावर उठून - सुविस्मिताः - अत्यंत आश्चर्यचकित झालेले असे - परस्परं वीक्षमाणाः आसन् - एकमेकांकडे पाहत राहिले. ॥५१॥ राजन् - हे परीक्षित राजा - ननु - खरोखर - विषं पीत्वा परेतस्य आत्मनः - विष पिऊन मृत झालेल्या आपले - तत् पुनःउत्थानं - ते पुनः उठणे - गोविन्दानुग्रहेक्षितं - श्रीकृष्णाच्या कृपादृष्टीचे फळ - अमंसत - मानिते झाले. ॥५२॥ अध्याय पंधरावा समाप्त |