|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय १२ वा - अन्वयार्थ
अघासुराचा उद्धार - क्वचित् - एकदा - वनाशाय मनः दधत् - वनभोजनाकडे मन लाविणारा - हरिः - श्रीकृष्ण - प्रातः समुत्थाय - सकाळी उठून - चारुणा शृंगरवेण - शिंगाच्या मनोहर ध्वनीने - वयस्यवत्सपान् - बरोबरीच्या वासरे राखणार्या गोपालांना - प्रबोधयन् - जागे करीत - वत्सपुरः सरः - वासरांना पुढे करून - व्रजात् विनिर्गतः - गौळवाडयातून बाहेर पडला. ॥१॥ स्निग्धाः - प्रेमळ - सुशिग्वेत्र - चांगली शिंकी, वेताच्या काठया, - विषाणवेणवः - शिंगे व वेणुवाद्ये ही ज्यांच्याजवळ आहेत असे - सहस्त्रशः पृथुकाः - गोपांचे हजारो बालक - तेन एव साकं - त्याच श्रीकृष्णाबरोबर - सहस्त्रोपरिसंख्यया अन्वितान् - हजारांपेक्षा अधिक संख्येने युक्त अशा - स्वान् स्वान् वत्सान् - आपापल्या वासरांना - पुरस्कृत्य - पुढे करून - मुदा विनिर्ययुः - आनंदाने निघाले. ॥२॥ असंख्यातैः कृष्णवत्सैः - अगणित अशा श्रीकृष्णाच्या वासरांसह - स्ववत्सकान् यूथीकृत्य - आपल्या वासरांना कळपात घालून - चारयन्तः - चरवीत - तत्र तत्र ह - त्या त्या ठिकाणी खरोखर - अर्भलीलाभिः विजह्रुः - मुलांच्या खेळांनी खेळू लागले. ॥३॥ फलप्रवालस्तबक - कवंडलादि फळे, पोवळ्यांचे घोस, - सुमनःपिच्छधातुभिः - पुष्पे व मोरांची पिसे आणि काव आदिकरून धातू यांनी - काचगुञ्जामणि - आणि काच, गुंजा, मणी - स्वर्णभूषिताः अपि - व सुवर्ण यांनी अलंकृत झाले असताहि - (आत्मनः) अभूषयन् - स्वतःला भूषविते झाले. ॥४॥ अन्योन्यशिक्यादीन् - एकमेकांची शिंकी इत्यादि वस्तू - मुष्णन्तः - चोरणारे - ज्ञातान् (तान्) - ओळखलेल्या त्या वस्तूंना - आरात् च चिक्षिपुः - दूर फेकून देत - तत्रत्याःच - आणि तेथे असलेले - पुनःदूरात् (चिक्षिपुः) - पुन्हा दूर फेकीत - हसन्तः च - आणि हसत - पुनः ददुः - पुनः ती शिंकी आणून देत. ॥५॥ यदि - जर - कृष्णः - श्रीकृष्ण - वनशोभेक्षणाय - वनशोभा पाहण्याकरिता - दूरं गतः - दूर गेला - अहं पूर्वं अहं पूर्वं इति - मी अगोदर मी अगोदर असे म्हणून - तं संस्पृश्य - त्याला स्पर्श करून - रेमिरे - खेळू लागले. ॥६॥ केचित् वेणून् वादयन्तः - कित्येक वेणुवाद्ये वाजवीत - केचन - काहीजण - श्रृङगाणि ध्मान्तः - शिंगे फुंकीत - केचित् - कोणी - भृङगैःप्रगायन्तः - भुंग्यांबरोबर गायन करीत - परे - दुसरे कोणी - कोकिलैः कूजन्तः - कोकिळासारखे शब्द करीत. ॥७॥ विच्छायाभिः प्रधावन्तः - पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावणारे - हंसकैः साधु गच्छन्तः - हंसांबरोबर चांगल्या रीतीने चालणारे - बकैः च उपविशन्तः - आणि बगळ्यांबरोबर बसणारे - कलापिभिः च नृत्यन्तः - आणि मोरांबरोबर नाचणारे असे. ॥८॥ कीशवालान् - वानरांच्या शेपटयांना - विकर्षन्तः - ओढणारे - तैः च द्रुमान् आरोहन्तः - आणि त्या वानरांच्या शेपटया धरून वृक्षावर चढणारे - विकुर्वन्तः च - आणि चेष्टा करणारे - च - आणि - तैः साकं - त्या वानरांबरोबर - पलाशिषु प्लवन्तः - वृक्षांवर उडया मारणारे असे. ॥९॥ भेकैः साकं विलङघयन्तः - बेडकांच्या बरोबर उडया मारणारे - सरित्प्रस्रवसंप्लुताः - नदीच्या प्रवाहात बुडी मारुन - प्रचिच्छायाः विहसन्तः - प्रतिबिंबांना हसणारे - प्रतिस्वनान् शपन्तः - आणि प्रतिध्वनीवर ओरडणारे असे. ॥१०॥ कृतपुण्यपुञ्जाः - पुष्कळ पुण्य मिळविलेले गोपबालक - इत्थं - याप्रमाणे - सतां ब्रह्मसुखानुभूत्या - साधूंच्या ब्रह्मविषयक सुखानुभवाने - दास्यं गतानां - सेवा करणार्या भक्तांचे - परदैवतेन - श्रेष्ठ दैवतच अशा - मायाश्रितानां (दृष्टया) - अज्ञानाचा आश्रय केलेल्याच्या दृष्टीने नरदारकेण - मनुष्य बालक अशा - (कृष्णेन) साकं - कृष्णासह - विजह्लुः - खेळते झाले. ॥११॥ यत्पादपांसुः - ज्या कृष्णाची चरणधूळ - बहुजन्मकृच्छ्रतःधृतात्मभिः - अनेक जन्मांतील कष्टाने इंद्रिये जिंकिली आहेत ज्यांनी - योगिभिः - अशा योग्यांनाही - अगम्यः (अस्ति) - मिळविता न येणारी आहे - सःएव - तोच - स्वयं - स्वतः - यदृग्विषयः - ज्यांच्या दृष्टीचा विषय - स्थितः - झाला - अतः - याहून - व्रजौकसां - गोकुळवासी जनांचे - दिष्टं - सुदैव - किं वर्ण्यते - काय वर्णावे. ॥१२॥ अथ - नंतर - तेषां सुखक्रीडनवीक्षणाक्षमः - ज्याला त्यांचे आनंदाचे खेळ पहावले नाहीत असा - अघनामा महासुरः अभ्यपतत् - अघ नावाचा मोठा दैत्य जवळ आला - पीतामृतैः - प्याले आहे अमृत ज्यांनी अशा - निजजीवितेप्सुभिः - आपल्या जीविताची इच्छा करणार्या - अमरैः अपि - देवांकडूनही - यदन्तः - ज्या दैत्याच्या नाशाची वाट - नित्यं प्रतीक्ष्यते - नित्य पाहिली जाते. ॥१३॥ कंसानुशिष्टः - कंसाने आज्ञा दिलेला - बकीबकानुजः - पूतना व बकासुर ह्यांचा कनिष्ठ बंधू - सः अद्यासुरः - तो अघासुर - कृष्णमुखान् अर्भकान् दृष्ट्वा - श्रीकृष्ण आदिकरून बालकांना पाहून - अयं तु - हा श्रीकृष्ण तर - मे सोदरनाशकृत् - माझ्या बंधूचा व भगिनीचा नाश करणारा होय - मम तयोः द्वयोः - माझ्या त्या दोघा बंधुभगिनींच्या स्थानी - एवं सबलं एनं हनिष्ये - ह्या श्रीकृष्णाला मी बळरामासह मारीन. ॥१४॥ यदा - ज्यावेळी - एते - हे गवळ्याचे मुलगे - मत्सुहृदोः - हे माझ्या दोघा मित्रांचे - तिलापः कृताः (भवन्ति) - तिलोदकाच्या ठिकाणी केले जातील - तदा - त्यावेळी - व्रजौकसः - गोकुळातील लोक - नष्टसमाः (भविष्यन्ति) - नाश पावल्यासारखे होतील - प्राण गते - प्राण गेला असता - वर्ष्मसु - देहाविषयी - का अनुचिन्ता - कसली काळजी - हि - कारण - ये - जे - प्राणभृतः - प्राणधारी पुरुष - ते - ते - प्रजासवः (सन्ति) - प्रजाच आहेत प्राण ज्यांचे असे आहेत. ॥१५॥ तदा - त्यावेळी - खलः सः - दुष्ट असा तो अघासुर - इति व्यवस्यन् - याप्रमाणे निश्चय करून - योजनायाममहाद्रिपीवरम् - चार कोस लांब व मोठ्या पर्वताप्रमाणे पुष्ट असे - अद्भुतं - आश्चर्यजनक - व्यात्तगुहाननं - पसरले आहे गुहेसारखे मुख ज्याने असे - बृहत् अजगरं वपुः - मोठे अजगर शरीर - धृत्वा - धारण करून - ग्रसनाशया - गिळण्याच्या इच्छेने - पथि व्यशेत - रस्त्यावर पडून राहिला ॥१६॥ धराधरोष्ठः - ज्याचा खालचा ओठ पृथ्वीला चिकटला आहे असा - जलदोत्तरोष्ठः - ज्याचा वरचा ओठ मेघाला जाऊन भिडला आहे असा - दर्याननान्तः - ज्याच्या तोंडाच्या आतील भाग गुहेप्रमाणे विशाल आहे असा - गिरिश्रृङ्गदंष्ट्र - पर्वताच्या शिखराप्रमाणे ज्याच्या दाढा आहेत असा - ध्वान्तान्तरास्यः - अंधकाराप्रमाणे ज्याच्या मुखातील भाग आहे असा - वितताध्वजिह्वः - रस्त्याप्रमाणे लांब आहे जिव्हा ज्याची असा - परुषानिल - सोसाट्याच्या वायूप्रमाणे ज्याचे - श्वासदवेक्षणोष्णः - श्वासोच्छ्वास आहेत व दावानलाप्रमाणे नेत्र आहेत असा - आसीत् - होता ॥१७॥ सर्वे - सर्व बालक - तादृशं तं दृष्ट्वा - तशा त्या अघासुराला पाहून - वृन्दावनश्रियं मत्वा - वृंदावनाची ही शोभाच आहे असे मानून - लीलया - गमतीने - व्यात्ताजगरतुण्डेन - पसरलेल्या अजगराच्या मुखाशी - उत्प्रेक्षन्ते स्म - कल्पना बसवू लागले ॥१८॥ अहो मित्राणि - अहो मित्रहो - गदत - सांगा - पुरःस्थितं सत्त्वकूटं - पुढे उभा असणारा हा मोठा प्राणी - अस्मत्संग्रसन - आम्हाला गिळण्यासाठी - व्यात्तव्यालतुण्डायते न वा - मुख पसरिले आहे असा अजगर तर नाही ना ॥१९॥ सत्यं - खरोखर - उत्तराहनुवत् - वरच्या ओठाप्रमाणे असलेला - अर्ककरारक्तं घनं - सूर्यकिरणांनी तांबडा झालेला मेघ - अधराहनुवत् - खालच्या ओठाप्रमाणे असलेला - तत्प्रतिच्छायया - त्या मेघाच्या पडच्छायेने - अरुणं रोधः - तांबडा झालेला तटप्रदेश ॥२०॥ सव्यासव्ये - उजवी व डावी अशा दोन - नगोदरे - पर्वताच्या गुहा - सृक्किभ्यां - ओष्ठप्रताशी - च - आणि - एताः तुग्ङश्रृग्ङालयः अपि - ही उंच उंच शिखरांची स्थाने सुद्धा - तद्दंष्ट्राभिः - त्याच्या दाढांशी - प्रतिस्पर्धेते - जणू स्पर्धा करीत आहेत - पश्यत - पहा ॥२१॥ अयं आस्तृतायाममार्गः - हा पसरलेला लांबलचक रस्ता - रसनांप्रतिगर्जति - जिभेशी स्पर्धा करण्याची गर्जना करीत आहे - एषां - ह्या शिखरांच्या - अन्तर्गतं - आतील - एतत् ध्वान्तं - हा अंधकार - अपि अन्तराननम् - जणू त्याच्या मुखाच्या आतील भागच आहे ॥२२॥ अयं दावोष्णखरवातः - हा वणव्यासारखा उष्ण व रुक्ष वायू - श्वासवत् (अस्ति) - श्वासोच्छवासाप्रमाणे आहे - तद्दग्धसत्त्वदुर्गंन्धः अपि - त्या दावाग्नीने जळून गेलेल्य प्राण्यांचा दुर्गंधहि - अन्तरामीषगन्धवत् - तोंडातील मांसाच्या वासाप्रमाणे - भाति - भासत आहे - पश्यत - पहा ॥२३॥ अयं - हा - अत्र निविष्टान् अस्मान् - येथे बसलेल्या आम्हांला - किम् ग्रसिता - काय गिळून टाकील - तथा चेत् - तसे झाले तर - अनेन - ह्या कृष्णाकडून - क्षणात् - क्षणामध्ये - बकवत् - बकासुराप्रमाणे - विनङ्क्ष्यति - नाश पावेल - इति - असे म्हणत - बकार्युशन्मुखं वीक्ष्य - बकासुराला मारणार्या श्रीकृष्णाच्या सुंदर मुखाकडे पाहून - उद्धसन्तः (ते) - मोठ्याने हंसणारे ते बालक - करताडनैः - टाळ्या वाजवीत - ययुः - निघून गेले ॥२४॥ इत्थं - याप्रमाणे - मिथः (संभूतं) - एकमेकांत चाललेले - अतथ्यं - निरर्थक - अतज्ज्ञभाषितं - श्रीकृष्णाला न जाणणार्या गोपबालकांचे भाषण - श्रुत्वा - ऐकून - (तत्) रक्षः विदित्वा - तो राक्षसच आहे असे जाणून - (तत्) अमृषा मृषायते - तो खरोखरच फसवीत आहे - इति विचिन्त्य - असा विचार करुन - अखिलभूतह्रत्स्थितः - सर्व प्राण्यांच्या ह्रदयांत असलेला - भगवान् - श्रीकृष्ण - स्वानां निरोद्धुं - आपल्या संवगड्यांना अडविण्यास - मनः दधे - मनात निश्चय करिता झाला ॥२५॥ तावत् - इतक्यात - सवत्साः शिशवः - वासरासह गोपबालक - असुरोदरान्तरं प्रविष्टाः - राक्षसाच्या पोटात शिरले - परंतु - परंतु - बकारिवेशनं - बकासुराला मारणारा जो श्रीकृष्ण त्याच्या प्रवेशाची - प्रतीक्षमाणेन - वाट पहाणार्या - हतस्वकान्तस्मरणेन - नष्ट झालेल्या स्वकीयांच्या मरणाचे स्मरण करणार्या - रक्षसा - अघासुराकडून - न गीर्णाः - गिळिले गेले नव्हते ॥२६॥ सकलाभयप्रदः - सर्वांना अभय देणारा - कृष्णः - श्रीकृष्ण - हि - खरोखर - अनन्यनाथान् - दुसरा कोणीहि ज्यांचा रक्षक नाही अशा - स्वकरात् अवच्युतान् - आपल्या हातातून निसटलेल्या - च - आणि - दीनान् - दीन झालेल्या - मृत्योः - अघासुररुपी मृत्यूच्या - जठराग्निघासान् - जठराग्नीमध्ये पडलेले घासच अशा - तान् - त्या गोपबालकांना - वीक्ष्य - पाहून - घृणार्दितः - दयेमुळे पीडित झालेला - दिष्टकृतेन - दैवानेच ह्या गोष्टी घडवून आणिल्या - विस्मितः - असे म्हणून आश्चर्यचकित झाला ॥२७॥ अत्र किम् कृत्यम् - या प्रसंगी काय करावे - अस्य खलस्य जीवनं न (भवति) - ह्या दुष्ट अघासुराचे आयुष्य नष्ट होईल - अमीषां सतां - आणि ह्या सज्जन अशा गोपबालकांचा खरोखर - विहिंसनं च वै (न भवति) - विनाश होणार नाही - द्वयं कथं स्यात् - ह्या दोन्ही गोष्टी कशा घडतील - इति संविचिन्त्य - असा विचार करून - तत् ज्ञात्वा - ते जाणून - अशेषदृक् हरिः - सर्व पहाणारा श्रीकृष्ण - (तस्य) तुण्डे अविशत् - त्या अजगाराच्या तोंडात शिरला ॥२८॥ तदा - त्यावेळी - घनच्छदाः देवाः - मेघ आहेत आच्छादन ज्यांचे असे देव - भयात् - भीतीने - हा हा इति - अरे घात झाला असा - चुक्रुशुः - आक्रोश करू लागले - च - आणि - ये - जे - अघबान्धवः कौणपाः - अघासुराचे बंधु असे राक्षस - कंसाद्याः तु - आणि कंसादि - (ते) जहृषुः - ते आनंदित झाले ॥२९॥ भगवान् अव्ययः कृष्णः तु - भगवान अविनाशी श्रीकृष्ण तर - तत् श्रुत्वा - ते ऐकून - सार्भवत्सकं - गोपबालकांसह वासरांचे - चूर्णीचिकीर्षोः (तस्य) - चूर्ण करण्याची इच्छा करणार्या अघासुराच्या - गले - गळ्यात - तरसा आत्मानं ववृधे - वेगाने शरीर वाढविता झाला ॥३०॥ ततः - नंतर - अतिकायस्य - मोठे आहे शरीर ज्याचे अशा - निरुद्धमार्गिणः - ज्याचा श्वासोच्छावासाचा मार्ग रोधून गेला आहे अशा - उदीर्णदृष्टेः - ज्याचे डोळे बाहेर आले आहेत अशा - इतस्ततः भ्रमतः - इकडेतिकडे फिरणार्या - अन्तरङ्गे - हृदयात - पूर्णः निरुध्दः पवनः तु - पूर्णपणे भरून राहिलेला व अडविलेला प्राणवायू तर - मूर्धन् विनिष्पाट्य - मस्तक फोडून - बहिः हि विनिर्गतः - खरोखर बाहेर पडला ॥३१॥ भगवान् मुकुन्दः - भगवान श्रीकृष्ण - तेन एव - त्यामुळेच - सर्वेषु प्राणेषु बहिर्नतेषु - सर्व प्राण बाहेर निघून गेले असता - परेतान् सुहृदः वत्सान् (च) - मृत झालेल्या मित्रांना व वासरांना - स्वया (अमृतमय्या) दृष्टया उत्थाप्य - आपल्या अमृतदृष्टीने उठवून - तदन्वितः - त्यासह - पुनः वक्रात् विनिर्ययौ - पुनः तोंडातून बाहेर निघाला ॥३२॥ पीनाहिभोगोत्थितं - पुष्ट अशा अजगराच्या शरीरापासून निघालेले - अद्भुतं - आश्चर्यजनक - महत् - मोठे - स्वधान्मा दश दिशः ज्वलयत् - आपल्या तेजाने दाही दिशा प्रकाशित करणारे - खे अवस्थितं - आकाशात दृग्गोचार होणारे - ईशनिर्गमं - परमेश्वराकडे जाण्यास निघालेले - ज्योतिः - तेज - (तं) प्रतीक्ष्य - त्याला पाहून - दिवौकसां मिषतां - देव पहात असताना - तस्मिन् विवेश - त्या श्रीकृष्णामध्ये प्रविष्ट झाले ॥३३॥ ततः - नंतर - अतिह्रष्टाः - अत्यंत आनंदित झालेले - सुराः - देव - पुष्पैः - फुलांनी - च - आणि - अप्सरसः - अप्सरा - नर्तनैः - नृत्यांनी - च - आणि - सुर्गाः - गायनकुशल गवई - गीतैः - गायनांनी - च - आणि - वाद्यधराः - वाद्ये वाजविणारे - वाद्यकैः - वाद्यांनी - च - आणि - विप्राः - ब्राह्मण - स्तवैः - स्तोत्रांनी - गणाः - लोकांचे थवे - जयनिस्वनैः - जयजयकारांच्या ध्वनींनी - स्वकृतः - आपले कार्य करणार्या - अर्हणं अकृत - श्रीकृष्णाचे पूजन करिते झाले ॥३४॥ अजः - ब्रह्मदेव - तदद्भुतस्तोत्रसु - ती आश्चर्योत्पादक स्तोत्रे, - वाद्यगीतिकाजयादि - ती सुस्वर वाद्ये, ती गाणी, ते जयजयकार, - नैकोत्सव - इत्यादिकांचे अनेक प्रकारचे उत्सवाप्रीत्यर्थ - मङ्गलस्वनान् - निघालेले मंगल ध्वनी - स्वधान्मः - आपले स्थान जो सत्यलोक त्याच्या - अन्ति श्रुत्वा - समीपभागी श्रवण करून - अचिरात् आगतः - त्वरेने आला - ईशस्य महि दृष्ट्वा - श्रीकृष्णाचे माहात्म्य पाहून - विस्मयं जगाम - आश्चर्यचकित झाला ॥३५॥ राजन् - हे परिक्षित राजा - वृंदावने - वृंदावनामध्ये - अद्भुतं - आश्चर्यजनक - शुष्कं अजगरं चर्म - सुकलेले अजगराचे कातडे - बहुतिथं - पुष्कळ दिवसपर्यंत - व्रजौकसां - गोकुळवासी लोकांचे - आक्रीडगह्वरं - खेळण्याची गुहा - बभूव - झाले ॥३६॥ मृत्योः आत्माहिमोक्षणं - मृत्यूपासून आपली व अजगराची झालेली सुटका - एतत् - हे - हरेः - श्रीकृष्णाचे - कौमारजं कर्म दृष्ट्वा - कुमारावस्थेतील कृत्य पाहून - विस्मिताः बालाः - आश्चर्यचकित झालेले बालक - (तस्य) पौगण्डके (अपि) - त्याच्या पौगंडावस्थेतही - (तत्) व्रजे ऊचुः - ते गोकुळात सांगते झाले ॥३७॥ मनुजार्भमायिनः - मायेच्या योगे मनुष्ययोनीत बालस्वरूप धारण करणार्या - परावराणां परमस्य - लहानमोठ्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठ अशा - वेधसः - परमेश्वराचे - एतत् - हे कृत्य - विचित्रं न - आश्चर्यजनक नव्हे - अघः अपि - अघासुरसुद्धा - यत्स्पर्शनधौतपातकः - ज्याच्या संपर्काने नष्ट झाले आहे पाप ज्यांचे असा - असतां सुदुर्लभं - दुर्जनांना मिळण्यास अत्यंत कठीण असे - आत्मसात्म्यं - स्वस्वरुप - प्राप - मिळविता झाला ॥३८॥ हि - कारण - मनोमयी यदङ्गप्रतिमा - ज्याच्या मूर्तीची मनःकल्पित प्रतिकृति - सकृत् अन्तराहिता - एकवार अंतःकरणात स्थापित केली असता - भागवतीं गति ददौ - भगवद्भक्तांना प्राप्त होणारी गति देते - नित्यात्मसुखानुभूति - नेहमी घेतलेल्या आत्मसुखाच्या अनुभवाने - अभिव्युदस्तमायः - ज्याने माया नष्ट केली आहे असा - सः एव - तोच - अन्तर्गतः - शरीरात शिरला असता - भागवतीं गतिं दद्यात् - वैष्णवांना मिळणारी गति देईल - इति किं पुनः - हे काय पुनः सांगावयास पाहिजे ॥३९॥ द्विजाः - हे शौनकादि ऋषि हो - यादवदेवदेत्तः - परीक्षित राजा - इत्थं - याप्रमाणे - स्वरातुः - श्रीकृष्णाचे - विचित्रं चरितं श्रुत्वा - आश्चर्यजनक कथानक ऐकून - यन्निगृहीतचेताः - ज्याचे ज्याचे अन्तःकरण आकृष्ट झाले आहे असा - तत् एव पुण्यं (चरितं) - तेच पुण्यकारक कथानक - भूयः अपि - पुनरपि - वैयासकिं पप्रच्छ - शुकाचार्याला विचारिता झाला ॥४०॥ ब्रह्मन् - हे शुकाचार्य - यत् कौमारे हरिकृतं - जे कौमारावस्थेत श्रीकृष्णाने केले - अर्भकाः - गोपबालक - पोगण्डे अपि जगुः - पौगंडावस्थेत सुद्धा वर्णिते झाले - (इति) कालान्तरकृतं - असे हे दुसर्या काळात केलेले - तत्कालीनं कथं भवेत् - त्याचकाळी घडलेले असे कसे झाले ॥४१॥ महायोगिन् गुरो - हे महायोगी शुकाचार्या - तत् कौतूहलं मे ब्रूहि - ते कौतुकास्पद कथानक मला सांगा - नूनं - खरोखर - एतत् - हे - हरेः माया एव - श्रीकृष्णाची मायाच होय - अन्यथा न भवति - एरवी अशी गोष्ट घडणार नाही ॥४२॥ गुरो - हे शुकाचार्या - वयं - आम्ही - क्षतबन्धवः अपि - दोषयुक्त क्षत्रिय असूनहि - लोके धन्यतमाः (स्मः) - ह्या भूलोकी अत्यंत धन्य आहो - यतः - कारण - मुहुः - वारंवार - त्वन्तः - तुझ्याकडून - पुण्यं - पुण्यकारक - कृष्णकथामृतं - श्रीकृष्णाचे कथामृत - पिबामः - पीत आहो ॥४३॥ भागवतोत्तमोत्तम - हे भागवतश्रेष्ठा शौनका - इत्थं पृष्टः - याप्रमाणे विचारलेला - सः बादरायणिः तु - तो व्यासपुत्र शुकाचार्य तर - तत्स्मारितान् - त्या परीक्षिताने आठवण करून दिलेल्या - अन्तह्रताखिलेंद्रियः - भगवंताने हरण केली आहेत सर्व इंद्रिये ज्याची असा - कृच्छरात् - मोठ्या कष्टाने - पुनर्लब्धबहिदृशिः - पुनः ज्याला बाह्यदृष्टी मिळाली आहे असा - शनैः - हळू हळू - तं प्रति आह स्म - त्या परीक्षित राजाला सांगता झाला ॥४४॥ अध्याय बारावा समाप्त |