श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १० वा - अन्वयार्थ

यमलार्जुनांचा उद्धार -

कुरुश्रेष्ठ - हे परीक्षित राजा- नन्दादयः गोपाः - नंदादि गोप- पततोः द्रुमयोः - पडणार्‍या दोन वृक्षांचा- रवं श्रुत्वा - शब्द ऐकून- निर्घातभयशङ्‌किताः (सन्तः) - वज्रपाताच्या भीतीने शंकित होऊन- तत्र - तेथे- आजग्मुः - आले. ॥१॥

तत्र भूम्यां - त्या जागी- निपतितौ - पडलेल्या जुळ्या - यमलार्जुनौ - अर्जुन वृक्षांना- (ते) ददृशुः - ते पाहते झाले- तत् - त्यावेळी - लक्ष्यं पतनकारणं - दिसण्यासारखे पडण्याचे कारण - अविज्ञाय - न जाणल्यामुळे - बभ्रमुः - गोंधळात पडले. ॥२॥

उलूखलं विकर्षन्तं - उखळाला ओढणार्‍या - दाम्ना च बद्धं - आणि दाव्याने बांधलेल्या - बालकं (दृष्ट्वा) - मुलाला पाहून - कस्य इदं कृत्यं - कोणाचे हे कृत्य - (अहो) आश्चर्यम् - काय हो आश्चर्य - कुतः (अयं) - हा अपघात - उत्पातः (संजातः) - कशामुळे घडला - इति (ते) - असे म्हणत ते - कातराः (बभूवुः) - भीतीने व्याकुळ झाले. ॥३॥

तिर्यग्गतं - आडव्या पडलेल्या - उलूखलं विकर्षता - उखळाला ओढणार्‍या - (वृक्षयोः) मध्यगेन - दोन वृक्षांच्या मधून गेलेल्या - अनेन (एतौ उत्पाटितौ) - ह्या बालकाने हे वृक्ष उपटिले - (वृक्षनिर्गतौ) - आणि वृक्षांतून निघालेले - पुरुषौ अपि अचक्ष्महि - दोन पुरुषहि आम्ही पाहिले - इति बालाः ऊचुः - असे मुले म्हणाली. ॥४॥

तस्य बालस्य - त्या बाळकृष्णाकडून - तत् तर्वोः उत्पाटनं - ते वृक्ष उपटण्याचे कृत्य - न घटेत - घडणार नाही - इति - असे म्हणून - ते - ते गोप - तदुक्तं न जगृहुः - त्यांची भाषण स्वीकारते झाले नाहीत - केचित् - काही जण - संदिग्धचेतसः (बभूवुः) - संशययुक्त असे झाले. ॥५॥

प्रहसद्वदनः नंदः - हास्यमुख असा नंद - उलूखलं विकर्षन्तं - उखळाला ओढणार्‍या - दाम्ना बद्धं च - आणि दाव्याने बांधलेल्या - स्वं आत्मजं विलोक्य - आपल्या पुत्राला पाहून - (तं) विमुमोच ह - त्याला सोडिता झाला. ॥६॥

भगवान् - श्रीकृष्ण - क्वचित् - एखादे वेळी - गोपीभिः स्तोभितः - गोपींकडून तालादिकांनी प्रोत्साहन दिला गेला असता - बालवत् अनृत्यत् - लहान मुलाप्रमाणे नाचे - क्वचित् - एखादे समयी - मुग्धः (भूत्वा) - भोळा होऊन - दारुयन्त्रवत् - लाकडाच्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे - तद्वशः - त्या गोपींच्या कह्यात वागणारा असा - उद्‌गायति - मोठयाने गात असे. ॥७॥

आज्ञप्तः (सन्) - आज्ञापिला असता - क्वचित् - एखादे वेळी - पीठकोन्मानपादुकं बिभर्ति - पाट, मापे व पायतणे घेऊन येई - स्वानां च - आणि स्वकीयांना - प्रीतिं आवहन् - प्रीती उत्पन्न करीत - बाहुक्षेपं कुरुते - हातवारे करीत असे. ॥८॥

लोके - ह्या लोकांमध्ये - तद्विदां - कृष्णाचे सामर्थ्य जाणणार्‍या पुरुषांना - आत्मनः भृत्यवश्यतां - स्वतःचे भक्ताधीनत्व - दर्शयन् भगवान् - दाखविणारा श्रीकृष्ण - बालचेष्टितैः - बाललीलांनी - वै - खरोखर - व्रजस्य हर्षं उवाह - गोकुळाला आनंद देता झाला. ॥९॥

सर्वफल प्रदः अच्युतः - सर्वांचे मनोरथ सफल करणारा श्रीकृष्ण - भोः फलानि क्रीणीहि - अहो फळे विकत घ्या - इति श्रुत्वा - असा शब्द ऐकून - फलार्थी - फळे घेण्याची इच्छा करणारा - सत्वरं धान्यं आदाय - तत्काळ धान्य घेऊन - ययौ - गेला. ॥१०॥

फलविक्रयिणी - फळे विकणारी बाई - तस्य - त्या श्रीकृष्णाचे - च्युतधान्यकरद्वयं - ज्यातील धान्य पडले आहे असे दोन्ही हात - फलैः अपूरयत् - फळांनी भरती झाली - (तस्याः) च फलभाण्डं - आणि तिची फळांची टोपली - रत्‍नैः अपूरि - रत्‍नांनी भरून गेली. ॥११॥

अथ - नंतर - देवी रोहिणी - रोहिणी राणी - सरित्तीरगतं - नदीतीरी गेलेल्या - भग्नार्जुनं कृष्णं - मोडिले आहेत अर्जुनवृक्ष ज्याने अशा श्रीकृष्णाला - बालकैः भृशं - आणि बालकांसह दंग होऊन - क्रीडन्तं रामं च - क्रीडा करणार्‍या बलरामाला - आह्वयत् - बोलाविती झाली. ॥१२॥

यदा - जेव्हा - पुत्रकौ आहूतौ (अपि) - ते मुलगे बोलविले असताही - क्रीडासङगेन न उपेयातां - खेळण्याच्या नादामुळे आले नाहीत - रोहिणी - रोहिणी - पुत्रवत्सलां - पुत्रांवर प्रेम करणार्‍या - यशोदां प्रेषयामास - यशोदेला पाठविती झाली. ॥१३॥

पुत्रस्नेहस्नुतस्तनी - पुत्रप्रेमाने पान्हा फुटला आहे स्तनांना जिच्या अशी - सा यशोदा - ती यशोदा - बालैः सह - मुलांबरोबर पुष्कळ - अतिवेलं क्रीडन्तम् - वेळपर्यंत खेळत असलेल्या - सुतं कृष्णं - आपला पुत्र जो श्रीकृष्ण त्याला - अग्रजम् (च) - व त्याचा वडील भाऊ जो बलराम त्याला - अजोहवीत् - हाका मारिती झाली. ॥१४॥

तात कृष्ण - अरे श्रीकृष्णा - अरविन्दाक्ष कृष्ण - हे कमलनेत्रा कृष्णा - पुत्रक - अरे बाळा - विहारैः अलं - खेळणे पुरे कर - क्रीडाश्रान्तः असि - खेळून दमला आहेस - (त्वं) क्षुत्क्षान्तः (असि) - तू भुकेने व्याकुळ झाला असशील - एहि - ये - स्तनं च पिब - आणि स्तनपान कर. ॥१५॥

हे तात कुलनन्दन राम - बा कुलाला आनंद देणार्‍या रामा - सानुजः आशु आगच्छ - आपल्या धाकटया भावासह लवकर ये - (त्वं) प्रातः एव - सकाळीच तेवढे - कृताहारः (असि) - तुझे भोजन झाले आहे - तत् - ह्याकरिता - भवान् भोक्तुम् अर्हति - तू भोजन करण्यास योग्य आहेस. ॥१६॥

दाशार्ह - हे श्रीकृष्णा - भोक्ष्यमाणः - भोजनास बसणारा - व्रजाधिपः - गोकुळाचा अधिपति नंद - त्वां प्रतीक्ष्यते - तुझी वाट पाहत आहे - एहि - ये - (नः) प्रियं धेहि - आमचे प्रिय कर - बालकाः - मुलांनो - स्वगृहान् यात - आपल्या घरी जा. ॥१७॥

पुत्र - हे श्रीकृष्णा - धूलिधूसरिताङ्गः त्वं - ज्याचे अवयव धुळींनी मळून गेले आहेत असा तू - मज्जनं आवह - स्नान कर - अद्य भवतः जन्मर्क्षं (अस्ति) - आज तुझे जन्मनक्षत्र आहे - शुचिः (भूत्वा) - शुचिर्भूत होऊन - विप्रेभ्यः गाः देहि - ब्राह्मणांना गाई दे. ॥१८॥

मातृमृष्टान् - मातांनी स्नान घालून स्वच्छ केलेल्या - स्वलंकृतान् (च) - व अलंकारांनी भूषविलेल्या - ते वयस्यान् पश्य पश्य - तुझ्या सोबत्यांकडे पहा पहा - (तथा) त्वं च - तसाच तू सुद्धा - स्नातः - स्नान केलेला - कृताहारः - भोजन केलेला असा - स्वलंकृतः सन् - अलंकार धारण करून - अनन्तरं विहरस्व - मग खेळ. ॥१९॥

नृप - हे राजा - इत्थं - याप्रमाणे - अशेषशेखरं - सर्वांचा मुकुटमणि - तं (कृष्णं) - अशा त्या श्रीकृष्णाला - सुतं मत्वा - पुत्र समजून - स्नेहनिबद्धधीः यशोदा - प्रेमाने बांधले आहे चित्त जिचे अशी यशोदा - सहरामं अच्युतम् - बलरामासह श्रीकृष्णाला - हस्ते गृहीत्वा - हाताने धरून - स्ववाटं नीत्वा - आपल्या ठिकाणावर नेऊन - अथ (तस्य) - मग त्याचे - उदयं कृतवती - स्नान, भोजन इत्यादि मंगल करिती झाली. ॥२०॥

नंदादयः गोपवृद्धः - नंदादिक वृद्ध गोप - (तस्मिन्) बृहद्वने - त्या घोर अरण्यात - महोत्पातान् - मोठमोठी संकटे - अनुभूय - अनुभवून - समागम्य च - आणि एकत्र जमून - व्रजकार्यं - गोकुळाच्या कार्याविषयी - आमन्त्रयन् - विचार करिते झाले. ॥२१॥

तत्र - त्यावेळी - ज्ञानवयोधिकः - ज्ञानाने व वयाने अधिक असा - देशकालार्थ - देशाला व कालाला अनुसरून - तत्वज्ञः - तात्विक अर्थाचे ज्ञान असणारा - रामकृष्णयोः प्रियकृत् - बलराम व श्रीकृष्ण ह्यांचे प्रिय करणारा - उपनन्दनामा गोपः - उपनंद नावाचा गोप - आह - म्हणाला. ॥२२॥

गोकुलस्य हितैषिभिः - गोकुळाच्या कल्याणाची इच्छा करणार्‍या - अस्माभिः - आम्ही - इतः उत्थातव्यम् - येथून उठून दुसरीकडे जावे - अत्र - येथे - बालानां नाशहेतवः - बालकांच्या नाशाला कारणीभूत असे - महोत्पाताः आयान्ति - मोठे उत्पात येत आहेत. ॥२३॥

असौ हि बालकः - कारण हा बालक श्रीकृष्ण - बालघ्न्याः राक्षस्याः - बालकांचा नाश करणार्‍या पूतना राक्षसीपासून - कथंचित् मुक्तः - मोठ्या कष्टाने सुटला - च - आणि - नूनं हरेः (एव) अनुग्रहात् - खरोखर परमेश्वराच्याच कृपेने - (अस्य) उपरि - ह्या श्रीकृष्णाच्या अंगावर - अनः न अपतत् - गाडा पडला नाही ॥२४॥

चक्रवातेन दैत्येन - वावटळीच्या रूपाने आलेल्या दैत्याने - वियत् विपदं नीतः - पक्ष्यांचे उडण्याचे स्थान अशा आकाशात नेलेला - अयं - हा श्रीकृष्ण - शिलायां पतितः - दगडावर पडला - (परंतु) सुरेश्वरैः तत्र परित्रातः - पण देवांकडून त्याठिकाणी रक्षिला गेला ॥२५॥

असौ - हा श्रीकृष्ण - वा - किंवा - अन्यतमः अपि बालकः - दुसरा कोणीही बालक - द्रुमयोः अन्तरं प्राप्य - दोन वृक्षामध्ये सापडून - यत् न म्रियेत - जो मेला नाही - तत् अपि - ते सुद्धा - अच्युतरक्षणम् - परमेश्वराने केलेले रक्षणच होय. ॥२६॥

यावत् - जोपर्यंत - औत्पातिकः अरिष्टः - उत्पातापासून होणारे संकट - व्रजं न अभिभवेत् - गोकुळावर प्राप्त झाले नाही - तावत् - त्याच्या पूर्वीच - सानुगाः - अनुयायांसह - बालान् उपादाय - बालकांना घेऊन - इतः अन्यत्र यास्यामः - येथून दुसरीकडे जाऊ या. ॥२७॥

नवकाननं - ताज्या तृणादि वस्तू ज्यात आहेत असे - पशव्यं - पशूंना हितकारक - गोपगोपीगवां सेव्यं - गोपाल, गोपी व गाई यांनी सेविण्याजोगे - पुण्याद्रितृणवीरुधम् - पवित्र असे पर्वत, गवत व वेली आहेत ज्यामध्ये असे - वृन्दावनं नाम वनम् (अस्ति) - वृंदावन नावाचे एक अरण्य आहे. ॥२८॥

तत् - त्या कारणास्तव - भवतां यदि रोचते - तुम्हाला जर आवडत असेल - (तर्हि) अद्य एव तत्र यास्यामः - तर आपण आजच तेथे जाऊ या - मा चिरं - उशीर नको - शकटान् युङ्क्त - गाडया जुंपा - अग्रतः गोधनानि यान्तु - पुढे गाई जावोत. ॥२९॥

तत् श्रुत्वा - ते ऐकून - एकधियः - एक आहे निश्चय ज्यांचा असे - साधु साधु - चांगले चांगले - इति वादिनः - असे बोलणारे - गोपाः - गोप - स्वान् स्वान् - आपापल्या - व्रजान् समायुज्य - गाडयांचे समुदाय जुंपून - रुढपरिच्छदाः - त्यावर चढविले आहेत पदार्थ ज्यांनी असे - (वृंदावनं) ययुः - वृंदावनाला गेले. ॥३०॥

राजन् - हे परीक्षित राजा - वृद्धान् - म्हातार्‍या माणसांना - बालान् - लहान मुलांना - स्त्रियः - बायकांना - च सर्वोपकरणानि - आणि सर्व गृहसाहित्यांना - अनस्सु आरोप्य - गाडयांवर चढवून - गोपालाः - गोप - आत्तशरासनाः - घेतली आहेत धनुष्ये ज्यांनी असे - यत्ताः - सज्ज झाले. ॥३१॥

सहपुरोहिताः (ते) - उपाध्यायांसह ते गोप - गोधनानि पुरस्कृत्य - गाईंना पुढे करून - सर्वतः शृंगाणि आपूर्य - जिकडेतिकडे शिंगे वाजवून - महता तूर्यघोषेण - नगार्‍यांच्या मोठया घोषासह - ययुः - जाऊ लागले. ॥३२॥

नूत्‍न - नवीन अशी जी - कुचकुंकुमकान्तयः - स्तनांना लावलेली केशराची उटी, तीमुळे अतिशय सुंदर अशा - निष्ककण्ठयः - सोन्याचे अलंकार धारण करणार्‍या - सुवाससः - चांगली वस्त्रे नेसलेल्या - गोप्यः - गोपी - रूढरथाः - रथात बसून - प्रीताः - प्रेमाने - कृष्णलीलाः जगुः - श्रीकृष्णाच्या लीला गाऊ लागल्या. ॥३३॥

तथा - त्याचप्रमाणे - एकं शकटं आस्थिते - एका गाडयात बसलेल्या - तत्कथाश्रवणोत्सुके - रामकृष्णांच्या कथा ऐकण्याविषयी उत्कंठित झालेल्या - यशोदारोहिण्यौ - यशोदा व रोहिणी - कृष्णरामाभ्यां रेजतुः - कृष्ण व बलराम ह्यांसह शोभल्या. ॥३४॥

शकटैः - गाडयांतून - सर्वकालसुखावहं - सतत सुख देणार्‍या - वृन्दावनं संप्रविश्य - वृंदावनात प्रवेश करून - तत्र - तेथे - अर्धचन्द्रवत् - अर्ध्या चंद्राच्या कोरेप्रमाणे - व्रजावासं चक्रुः - गौळवाडयाची रचना केली. ॥३५॥

नृप - हे परीक्षित राजा - वृंदावनं - वृंदावन नामक अरण्य - गोवर्धनं - गोवर्धन नावाचा पर्वत - यमुनापुलिनानि च - आणि यमुनेची वाळवंटे - वीक्ष्य - पाहून - राममाधवयोः - बलराम व लक्ष्मीपती श्रीकृष्ण यांना - उत्तमा प्रीतिः (अभवत्) - अत्यंत आनंद झाला. ॥३६॥

एवं - याप्रमाणे - बालचेष्टितैः - बाललीलांनी - कलवाक्यैः (च) - आणि मधुर भाषणांनी - व्रजौकसां (मनसि) - गौळवाडयात राहणार्‍या सर्व लोकांच्या मनात - प्रीतिं यच्छन्तौ (तौ) - प्रेम उत्पन्न करणारे ते रामकृष्ण - स्वकालेन - योग्य काळी - वत्सपालौ बभूवतुः - वासरे राखणारे झाले. ॥३७॥

नानाक्रीडापरिच्छदौ (तौ) - अनेकप्रकारचे खेळ खेळणारे ते रामकृष्ण - गोपालदारकैः सह - गोपालांच्या मुलांसह - व्रजभुवः अविदूरे - गौळवाडयाच्या जवळच - वत्सान् चारयामासतुः - वासरांना चरवू लागले. ॥३८॥

क्वचित् - एखादे वेळी - वेणुं वादयतः - वेणु वाद्य वाजवीत - क्वचित् - कधी कधीच - क्षेपणैः क्षिपतः - गोफणींनी दगड फेकीत - क्वचित् - एखादे प्रसंगी - किङ्‌किणीभिः पादैः (नृत्यतः) - घुंगुर घातलेल्या पायांनी नाचत - क्वचित् - एखादे वेळी - कृत्रिमगोवृषैः (क्रीडतः) - बैलांची सोंगे घेऊन क्रीडा करीत. ॥३९॥

वृषायमाणौ नर्दन्तौ - वृषभाप्रमाणे गर्जना करणारे रामकृष्ण - परस्परं युयुधाते - आपापसांत कुस्ती करीत - रुतैः - शब्दांनी - जन्तून् अनुकृत्य - प्राण्यांचे अनुकरण करून - यथा प्राकृतौ - साधारण पुरुषांप्रमाणे - चेरतुः - संचार करीत. ॥४०॥

कदाचित् - एके दिवशी - स्वकैः वयस्यैः - आपल्या सोबत्यांसह - यमुनातीरे - यमुनेच्या तीरी - कृष्णबलयोः वत्सान् चारयतोः - कृष्ण व बलराम वासरे चारीत असता - (तौ) जिघांसुः - त्यांना मारण्याची इच्छा करणारा - (कश्चित्) दैत्यःआगमत् - कोणी एक दैत्य प्राप्त झाला. ॥४१॥

हरिः - श्रीकृष्ण - वत्सरूपिणं - वासराचे रूप घेतलेल्या - वत्सयूथगतं - वासरांच्या कळपात शिरलेल्या - तं - त्या वत्सासुराला - बलदेवाय - बलदेवाला - दर्शयन् - दाखवीत - मुग्धः इव - भोळ्याप्रमाणे - शनैः - हळू हळू - तं आसदत् - त्या दैत्याजवळ गेला. ॥४२॥

अच्युतः - श्रीकृष्ण - (तस्य) लाङ्गुलं - त्याची शेपटी - अपरपादाभ्यां सह - मागील दोन पायांसह - गृहीत्वा - धरून - भ्रामयित्वा - गरगर फिरवून - गतजीवितं (तं) - गतप्राण झालेल्या त्या वत्सासुराला - कपित्थाग्रे - कवठाच्या झाडाच्या टोकावर - प्राहिणोत् - फेकिता झाला - सः महाकायः - तो मोठया शरीराचा दैत्य - पात्यमानैः कपित्थैः (सह) - पाडिल्या जाणार्‍या कवठांसह - पपात ह - खाली पडला. ॥४३॥

तं वीक्ष्य - त्या दैत्याला पाहून - विस्मिताः बालाः - आश्चर्यचकित झालेले बालक - साधु साधु इति - चांगले चांगले असे म्हणून - शशंसुः - प्रशंसा करू लागले - च - आणि - परिसन्तुष्टाः देवाः - संतुष्ट झालेले देव - पुष्पवर्षिणः बभूवुः - फुलांची वृष्टि करिते झाले. ॥४४॥

सर्वलोकैकपालकौ - सर्व लोकांचे रक्षक असे - तौ - ते रामकृष्ण - वत्सपालकौ (भूत्वा) - वासरांचे पालक होऊन - सप्रातराशौ - सकाळचे खाद्य पदार्थ घेऊन - गोवत्सान् चारयन्तौ - वासरे चरविणारे असे - विचेरतुः - हिंडू लागले. ॥४५॥

एकदा - एके दिवशी - सर्वे - सर्व बालक - स्वं स्वं वत्सकुलं - आपापल्या वासरांच्या समूहाला - पाययिष्यन्तः - पाणी पाजू इच्छिणारे - जलाशयाभ्याशं गत्वा - पाण्याच्या डोहाजवळ जाऊन - वत्सान् पाययित्वा - वासरांना पाणी पाजून - (स्वयं) च पपुः - स्वतःही पिते झाले. ॥४६॥

तत्र - तेथे - ते बालाः - ते बालक - वज्रनिर्भिन्नं - वज्राने विदीर्ण झालेले - च्युतं गिरेः शृङगम् इव - पडलेले पर्वताचे शिखरच की काय अशा प्रकारे - अवस्थितं - राहिलेल्या - महासत्त्वं ददृशुः - मोठया प्राण्याला पाहते झाले - तत्रसुः (च) - व भ्याले. ॥४७॥

सः वै बकरूपधृक् - तो खरोखर बगळ्यांचे रूप धारण करणारा - बली तीक्ष्णतुण्डः - बलिष्ठ व तीक्ष्ण चोचीचा - बकः नाम महान् असुरः - बक नावाचा मोठा दैत्य - सहसा कृष्णं आगत्य - एकाएकी कृष्णाजवळ येऊन - अग्रसत् - गिळून टाकिता झाला. ॥४८॥

कृष्णं - कृष्णाला - महाबकग्रस्तं दृष्ट्वा - मोठया बगळ्याने गिळलेला पाहून - प्राणं विना इंद्रियाणि इव - प्राणाशिवाय जशी इंद्रिये तसे - रामादयः अर्भकाः - बलरामादि बालक - विचेतसः बभूवुः - निश्चेष्ट झाले. ॥४९॥

बकः - बकासुर - तालुमूलं - ताळूच्या मूळप्रदेशाला - अग्निवत् प्रदहन्तं - अग्नीप्रमाणे जाळून टाकणार्‍या - जगद्‌गुरोः पितरं - त्रैलोक्यगुरु जो ब्रह्मदेव त्याचा पिता अशा - अक्षतं - व्रणरहित अशा - तं गोपालसूनुं - त्या नंदपुत्र श्रीकृष्णाला - सद्यः - तत्काळ - चच्छर्द - ओकून टाकिता झाला - सः - तो दैत्य - अतिरुषा - मोठया रागाने - तुण्डेन (तं) हन्तुम् - चोचीने त्या श्रीकृष्णाला मारण्याकरिता - अभ्यपद्यत - जवळ प्राप्त झाला. ॥५०॥

दिवौकसां मुदावहः - देवांना आनंद देणारा - सतां पतिः सः - साधुंचा अधिपति असा तो कृष्ण - आपतन्तं - चाल करुन येणार्‍या - कंससखं तं बकं - कंसाचा मित्र अशा त्या बकासुराला - दोर्भ्यां - दोन हातांनी - तुण्डयोः निगृह्य - चोचीच्या दोन्ही पाकळ्या धरुन - बालेषु पश्यत्सु - मुले पहात असता - वीरनवत् - गाठ नसलेल्या वीरण नावाच्या गवताप्रमाणे - लीलया ददार - सहज लीलेने फाडीता झाला ॥५१॥

तदा - त्या वेळी - सुरलोकवासिनः - स्वर्गवासी देव - नन्दनमल्लिकादिभिः - नंदनवनातील मोगर्‍यांच्या पुष्पांनी - बकारिं समाकिरन् - बकासुराला मारणार्‍या श्रीकृष्णावर वर्षाव करिते झाले - च - आणि - आनकशङ्खसंस्तवैः - दुंदुभि व शंख वाजवून केलेल्या स्तोत्रांनी - समीडिरे - स्तविते झाले - गोपालसुताः - गोपांचे पुत्र - तत् वीक्ष्य - ते पाहून - विसिस्मिरे - आश्चर्यचकित झाले ॥५२॥

रामादयः बालकाः - बलरामादि गोपाळ - ऐन्द्रियः गणः प्राणम् इव - इंद्रियसमुदाय जसा प्राणाला तसा - बकास्यात् मुक्तं - बकासुराच्या मुखातून मुक्त झालेल्या - स्थानागतं तं - आपल्या जागी परत आलेल्या त्या श्रीकृष्णाच्या - उपलभ्य - जवळ जाऊन - परिरभ्य (च) - आणि आलिंगन देऊन - निवृत्ताः - सुखी झालेले - वत्सान् प्रणीय - वासरांना एकत्र जमवून - व्रजं एत्य - गौळवाड्यात परत येऊन - तत् (कृष्णचरितं) जगुः - ते श्रीकृष्णाचे चरित्र गाऊ लागले ॥५३॥

तत् श्रुत्वा विस्मिताः - ते ऐकून आश्चर्यचकित झालेले - अतिप्रियादृताः - ज्यांना अत्यंत प्रेमामुळे आदर वाटत आहे असे - तृषितेक्षणाः - ज्यांचे नेत्र पहाण्याविषयी उत्सुक झाले आहेत असे - गोपाः च गोप्यः - गोप व गोपी - प्रेत्य आगतम् इव (तं) - मरुन जणू परत आलेल्या त्या श्रीकृष्णाला - औत्सुक्यात् ऐक्षन्त - उत्कंठेने पहात्या झाल्या ॥५४॥

बत - अरेरे - अहो - अहो - अस्य बालस्य - ह्या कृष्णाला - बहवः मृत्यवः अभवन् - पुष्कळ मृत्यू उपस्थित झाले - यतः भयं आसीत् - ज्यांच्यापासून भय प्राप्त झाले - तेषां - त्यांचे - पूर्वं - पूर्वी - अनेन अपि विप्रियं कृतम् आसीत् - कृष्णानेहि काही वाकडे केले असेल ॥५५॥

अथ अपि - तरीसुद्धा - घोरदर्शनाः ते - भयंकर स्वरूपाचे ते दैत्य - एनं न एव अभिभवन्ति - ह्या श्रीकृष्णाचा पराभवही करण्यास समर्थ होत नाहीत - जिघांसया - मारण्याच्या इच्छेने - एनं आसाद्य - ह्या श्रीकृष्णाचा पराभवही करण्यास समर्थ होत नाहीत - जिघांसया - मारणाच्या इच्छेने - एनं आसाद्य - ह्या श्रीकृष्णाजवळ येऊन - अग्नौ पतङ्गवत् - अग्नीवर येणार्‍या पतंगाप्रमाणे - (स्वयं एव) नश्यन्ति - स्वतःच नाश पावतात ॥५६॥

अहो - अहो - ब्रह्मविदां वाचः - ब्रह्मज्ञान्यांची वचने - कर्हिचित् - कधीहि - असत्याः नः सन्ति - खोटी होत नाहीत - यत् - जे - भगवान् गर्गः - भगवान गर्ग मुनी - आह - म्हणाला - तत् - ते - तथा एव - तसेच - अस्माभिः अन्वभावि - आम्ही अनुभविले ॥५७॥

इति - याप्रमाणे - मुदा - आनंदाने - कृष्णराम कथां कुर्वन्तः - श्रीकृष्ण व बलराम ह्यांच्या गोष्टी बोलणारे - रममाणाः च - आणि त्यात रमून जाणारे - नंदादयः गोपाः - नंदादि गोप - भववेदनां - संसार पीडा - अविन्दन् - जाणते झाले नाहीत ॥५८॥

एवं - याप्रमाणे - तौ - ते बलराम व श्रीकृष्ण - (तस्मिन्) व्रजे - त्या वृंदावनातील गौळवाड्यात - निलायनैः सेतुबन्धैः मर्कटोत्प्लवनादिभिः च - लपून बसणे, पूल बांधणे व वानरांसारख्या उड्या मारणे इत्यादि - कौमारैः विहारैः - लहानपणाच्या क्रीडांनी - कौ‍मारं जहतुः - लहानपण घालविते झाले ॥५९॥

अध्याय अकरावा समाप्त

GO TOP