श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ५ वा - अन्वयार्थ

गोकुळात भगवंतांचा जन्म महोत्सव -

महामनाः नंदः तु - उदार अंतःकरणाचा नंद तर - आत्मजे उत्पन्ने - मुलगा झाला असता - जाताह्रादः स्नातः - ज्याला आनंद झाला आहे असा स्नान करुन - शुचिः अलंकृतः - शुद्ध होऊन व अलंकार धारण करून - दैवज्ञान् विप्रान् आहूय - ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून - स्वस्त्ययनं वाचयित्वा - त्यांकडून पुण्याहवाचन करवून - वै आत्मजस्य जातकर्म - मुलाचे जातकर्म - तथा पितृदेवार्चनं - तसेच पितर व देवता यांचे पूजन - विधिवत् कारयामास - यथाविधि करविता झाला. ॥१-२॥

समलंकृते धेनूनां नियुते - उत्तम रीतीने अलंकृत केलेल्या दोन लक्ष गाई - रत्‍नौघशातकौंभांबरावृतान् - अनेक रत्‍ने, सुवर्ण आणि वस्त्रे यांनी आच्छादिलेल्या - सप्त तिलाद्रीन् (च) - तिळांच्या सात राशी - विप्रेभ्यो प्रादात् - ब्राह्मणांना देता झाला. ॥३॥

द्रव्याणि कालेन - निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ काही काळाने, - स्नानशौचाभ्यां - काही स्नानाने, काही धुण्याने, - संस्कारैः तपसा - काही संस्काराने, काही तपश्चर्येने, - इज्यया दानैः - काही यज्ञाने, काही दानाने - संतुष्ट्या शुद्‍ध्यन्ति - व काही संतोषवृत्तीने असे शुद्ध होतात - (तत्र) आत्मा आत्मविद्यया (शुद्‍ध्यति) - त्यांत जीवात्मा आत्मज्ञानाने शुद्ध होतो ॥४॥

विप्राः सूतमागधबंदिनः - ब्राह्मण, पौराणिक, वंशांचे वर्णन करणारे आणि स्तुतिपाठक - सौ‌मंगल्यगिरः बभूवुः - चांगले मंगलयुक्त भाषण करिते झाले - गायकाः जगुः - गवई गाते झाले - भेर्यः दुंदुभयः च मुहुः नेदुः - आणि भेरी व दुंदुभी वारंवार वाजल्या. ॥५॥

व्रजः - गोकुळ - संमृष्टसंसिक्तद्वाराजिरगृहांतरः - झाडलेली व सारविलेली आहेत द्वारे, अंगणे व घरे ज्यांतील असे - चित्रध्वजपताकास्रक्‌चैल - चित्रविचित्र ध्वज, पताका, माळा, वस्त्रे, - पल्लवतोरणै (भूषितः) च - पल्लव आणि तोरणे यांनी विभूषित असे - बभूव - झाले. ॥६॥

गावः वृषाः वत्सतराः - गाई, बैल आणि वासरे - हरिद्रातैलरूषिताः - हळद व तेल यांनी माखलेली - विचित्रधातुबर्हस्रग्वस्त्र - चित्रविचित्र रंगांनी मढविलेली मोराच्या पिसांनी - कांचनमालिनः (बभूवुः) - व सोन्याच्या अलंकारांनी शोभणारी अशी झाली. ॥७॥

राजन् - हे राजा - महार्हवस्त्राभरणकंचुकोष्णीषभूषिताः - अत्यंत मौ‌ल्यवान वस्त्रे, अलंकार, अंगरखे व पागोटी यांनी भूषित झालेले - नानोपायनपाणयः - व अनेकप्रकारचे भेटीचे पदार्थ हातांत घेतलेले असे - गोपाः - गवळी - (नंदं) समाययुः - नंदाकडे आले. ॥८॥

यशोदायाः सुतोद्भवं आकर्ण्य - यशोदेच्या मुलाचा जन्म झालेला ऐकून - मुदिताः - आनंदित झालेल्या - गोप्यः च - गोपीही - आत्मानं वस्त्राकल्पांजनादिभिः - स्वतःला वस्त्रे, अलंकार, काजळ इत्यादिकांनी - भूषयांचक्रुः - शोभवित्या झाल्या. ॥९॥

नवकुंकुमकिंजल्क - ताज्या केशराच्या तंतूंनी - मुखपंकजभूतयः - मुखकमलावर शोभा आली आहे ज्यांच्या अशा, - पृथुश्रोण्यः - ज्यांचा कटिप्रदेश विस्तीर्ण आहे - चलत्कुचाः (ताः गोप्यः) - अशा व हालत आहेत स्तन ज्यांचे अशा त्या गोपी - बलिभिः त्वरितं (यशोदां) जग्मुः - वायनासह त्वरेने यशोदेच्या घरी गेल्या. ॥१०॥

नंदालयं व्रजंत्यः गोप्यः - नंदाच्या घरी जाणार्‍या गोपी - सुमृष्टमणिकुंडलनिष्ककंठयः - ज्यांच्या कंठात स्वच्छ व तेजस्वी रत्‍नांची कुंडले - चित्रांबराः - व पुतळ्याच्या माळा आहेत अशा - सवलयाः - ज्यांच्या हातात कंकणे आहेत अशा - व्यालोलकुंडल - व हालणार्‍या कुंडलांनी, - पयोधरहारशोभाः - स्तनांनी व त्यांजवरील मुक्ताहारांनी ज्या अधिकच सुंदर दिसत आहेत - विरेजुः - अशा शोभल्या. ॥११॥

बालके चिरं पाहि इति - बालकाला चिरकाल प्रजांचे रक्षण कर - आशिषःप्रयुञ्जानाः ताः - असे आशिर्वाद देणार्‍या त्या गोपी - जनं हरिद्राचूर्णतैलाद्भिः - लोकांवर हळद, तेल व पाणी - सिंचंत्यः उज्जगुः - शिंपीत मोठयांनी गाणी म्हणू लागल्या. ॥१२॥

विश्वेश्वरे अनंते कृष्णे - जगाचा अधिपति शेषशायी श्रीकृष्ण - नंदस्य व्रजं आगते - नंदाच्या गोकुळात आला असता - महोत्सवे विचित्राणि - त्या महोत्सवप्रसंगी नानाप्रकारची - वादित्राणि अवाद्यंत - वाद्ये वाजविली गेली. ॥१३॥

हृष्टाः गोपाः - आनंदित झालेले गोप - परस्परं क्षीरघृतांबुभिः आसिंचंतः - एकामेकांवर दूध, तूप व उदक शिंपडीत - नवनीतैः च विलिंपंतः - आणि लोण्याने अंगे माखीत - (परस्परेषु) दधि चिक्षिपुः - एकमेकांवर दही फेकते झाले. ॥१४॥

महामनाः नंदः - उदार अंतःकरणाचा नंद - तेभ्यः सूतमागधबंदिभ्यः - त्यांपैकी सूत, मागध व स्तुतिपाठक यांना - ये (च) अन्ये विद्योपजीविनः - व जे दुसरे विद्येवर उपजीविका करणारे - (तेभ्यः) वासोऽलंकारगोधनं (प्रादात्) - त्यांना वस्त्रे, अलंकार व गाई देता झाला. ॥१५॥

अदीनात्मा (नंदः) विष्णोः आराधनार्थाय - उदार अंतःकरणाचा नंद विष्णूच्या आराधनेसाठी - स्वपुत्रस्य च उदयाय - व आपल्या मुलांच्या उत्कर्षासाठी - (अन्यान् अपि) तैः तैः कामैः - इतरांना सुद्धा त्या त्या इष्ट वस्तू देऊन - यथोचितं अपूजयत् - यथायोग्य पूजिता झाला. ॥१६॥

महाभागा नंदगोपाभिनंदिता रोहिणी च - महाभाग्यशाली व नंदाने सत्कारिलेली रोहिणीही - दिव्यवासस्रग् - उत्तम वस्त्रे, माळा, - कंठाभरणभूषिता - गळ्यातील अलंकार इत्यादिकांनी भूषित होऊन - व्यचरत् - इकडेतिकडे हिंडत होती. ॥१७॥

नृप - हे परीक्षित राजा - ततः आरभ्य - तेव्हापासून - नंदस्य व्रजः - नंदाचे गोकुळ - सर्वसमृद्धिमान् - सर्व समृद्धीने युक्त - हरेः निवासात्मगुणैः - व कृष्णाच्या वास्तव्यामुळे सर्व गुणांनी मंडित असे - रमाक्रीडं (च) अभूत् - लक्ष्मीचे क्रीडाभुवन झाले. ॥१८॥

कुरूद्वह - हे कुरुकुलोद्धारका परीक्षित राजा - गोपान् गोकुलरक्षायां निरूप्य - गोपांना गोकुळाची रक्षा करण्याकरिता सांगून - कंसस्य वार्षिक्यं करं दातु - कंसाला वार्षिक कर देण्याकरिता - नंदः मथुरां गतः - नंद मथुरेला गेला. ॥१९॥

भ्रातरं नंदं आगतं उपश्रुत्य - आपला बंधूच असा नंद आलेला ऐकून - राज्ञे (च) दत्तकरं ज्ञात्वा - आणि राजाला दिला आहे करभार ज्याने असा जाणून - वसुदेवः तदवमोचनं ययौ - वसुदेव नंदाच्या गाडया सोडण्याच्या ठिकाणी गेला. ॥२०॥

प्राणं (आगतं दृष्ट्वा) देहः इव - प्राण आलेला पाहून देह जसा तसा - तम् आगतं दृष्ट्वा - त्या वसुदेवाला आलेला पाहून - सहसा उत्थाय - खडबडून उठून - प्रीतः प्रेमविह्वलः (नंदः) - आनंदित झालेला व प्रेमाने भरून गेलेला असा नंद - (तं) दोर्भ्याम् सस्वजे - त्याला बाहूंनी आलिंगन देता झाला. ॥२१॥

बिशांपते - हे राजा - पूजितः सुखं आसीनः वसुदेवः - नंदाने पूजिलेला व आसनावर स्वस्थ बसलेला वसुदेव - अनामयं पृष्ट्वा - खुशाली विचारून - आत्मजयोः प्रसक्तधीः - दोन्ही मुलांकडे ज्याचे अंतःकरण लागून राहिले आहे असा - आदृतः इदं आह - आदराने नंदाला असे म्हणाला. ॥२२॥

भ्रातः - हे बंधो - प्रवयसः अप्रजस्य - वृद्ध व संतति नसणार्‍या - प्रजाशायाः निवृत्तस्य ते - व संतती होण्याच्या आशेपासून मागे वळलेल्या अशा तुला - दिष्टया इदानीं प्रजाः समपद्यत - सुदैवाने सांप्रत संतती झाली आहे. ॥२३॥

अस्मिन् संसारचक्रे वर्तमानः भवान् - ह्या संसारचक्रात पडलेला तू - पुनर्भवः (इव) - पुनर्जन्म झाल्यासारखा - दिष्टया अद्य उपलब्धः (असि) - आज सुदैवाने भेटलास - प्रियदर्शनं (हि) दुर्लभं - कारण प्रिय जनांचे दर्शन फार दुर्मिळ असते. ॥२४॥

यथा स्रोतसः ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां - ज्याप्रमाणे उदकाच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणार्‍या काष्ठांचा - (तथा) चित्रकर्मणां - त्याप्रमाणे निरनिराळे व्यासंग करणार्‍या - सुहृदां प्रियसंवासः एकत्र न - मित्रांचा आवडता असा समागम एकत्र घडून येत नाही. ॥२५॥

यत्र सुहृद्‌वृतः त्वं आस्से - जेथे इष्ट मित्रांसह तू राहतोस - तत् (स्थानं) भूर्यंबुतृणवीरुधं - ते स्थान, विपुल पाणी, गवत व वेली ज्यात आहे असे, - पशव्यं - अरण्यांतील पशूंना - बृहद्वनं नीरुजं कच्चित् - उपयोगी अशा मोठया कुरणांनी युक्त व रोगरहित असे आहे ना ? ॥२६॥

भ्रातः - हे बंधो - भवन्तं तातं मन्वानः - तुला बाप मानणारा - भवद्भ‌यां उपलालितः - व तुम्ही दोघांनी लालनपालन केलेला - मम सुतः - माझा पुत्र - मात्रा सह भवद्‌व्रजे (कुशली आस्ते) कच्चित् - आईसह गोकुळात खुशाल आहे ना ? ॥२७॥

सुहृदः हि अनुभावितः - कारण इष्ट मित्रांना दिलेलेच - त्रिवर्गः पुंसः विहितः - धर्म, अर्थ व काम हे तीन पुरुषार्थ पुरुषाला योग्य होत - तेषु क्लिश्यमानेषु - ते इष्टमित्र जर क्लेश पावत असले तर - त्रिवर्गः अर्थाय न कल्पते - ते तीन पुरुषार्थ कार्यसिद्धीला उपयोगी पडत नाहीत. ॥२८॥

अहो ते बहवः देवकीपुत्राः कंसेन हताः - हे वसुदेवा, तुझे देवकीच्या ठिकाणी झालेले पुष्कळ पुत्र कंसाने मारिले - एका अवरजा कन्या अवशिष्टा - शेवटी एक कन्या राहिली होती - सा अपि दिवं गता - तीही स्वर्गाला गेली. ॥२९॥

नूनं अयं जनः - खरोखर हा जनसमुदाय - अदृष्टनिष्ठः - सर्वस्वी दैवावर अवलंबणारा - अदृष्टपरमः (अस्ति) - व दैव हेच परम सुखाचे साधन मानणारा असा आहे - यः आत्मनः तत्त्वं अदृष्टं - जो आत्म्याचे सुख व दुःख प्राप्त होण्याचे दैव हेच कारण आहे - (इति) वेद सः न मुह्यति - असे जाणतो तो मोह पावत नाही. ॥३०॥

वः वार्षिकः करः राज्ञे दत्तः - तुम्ही वार्षिक करभार राजाला दिला - वयं च दृष्टाः - आणि आमची भेट घेतली - इह बहुतिथं न स्थेयं - येथे फार दिवस राहू नये - गोकुले च उत्पातः संति - आणि गोकुळात उत्पात होत आहेत. ॥३१॥

शौरिणा इति प्रोक्ताः ते नंदादयः गोपाः - वसुदेवाने याप्रमाणे सांगितलेले ते नंदादि गोप - तं अनुज्ञाप्य - त्या वसुदेवाची आज्ञा घेऊन - अनडुद्युक्तैः अनोभिः गोकुलं ययुः - बैल जुंपिलेल्या गाडयांतून गोकुळास गेले. ॥३२॥

अध्याय पाचवा समाप्त

GO TOP