श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ४ था - अन्वयार्थ

कंसाच्या हातून सुटून योगमायेचे आकाशात जाऊन भविष्यकथन -

बहिः अन्तः - बाहेरील व आतील - सर्वाः पुरद्वारः - सगळी नगराची द्वारे - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - आवृताः - झाकली गेली - ततः - मग - बालध्वनिम् श्रुत्वा - मुलाचा शब्द ऐकून - गृहपालाः - कारागृहाचे रक्षक - समुत्थिताः - उठले. ॥१॥

ते तु - ते तर - तूर्णम् उपव्रज्य - त्वरेने जवळ जाऊन - देवक्याः तत् (अष्टमं) गर्भजन्म - देवकीच्या त्या आठव्या गर्भाचा जन्म - भोजराजाय आचख्युः - भोजराज कंसाला सांगते झाले - यत् - कारण - सः - तो - उद्विग्नः (सन्) - उद्विग्न होत्साता - प्रतीक्षते - वाट पाहत होता. ॥२॥

सः - तो - तल्पात् तूर्णम् उत्थाय - शयनावरून झटकन उठून - अयम् कालः इति (मत्वा) - हा आपला काळ होय असे समजून - विह्‌वलः (भूत्वा) - विव्हळ होऊन - मुक्तमूर्धजः - मोकळे आहेत केश ज्याचे असा - प्रस्खलन् - धडपड करीत - तूर्णम् सूतीगृहम् अगात् - तत्काळ बाळंतिणीच्या खोलीशी गेला.॥३॥

तम् भ्रातरम् - त्या भावाला - सती कृपणा देवी - साध्वी अशी ती दीन देवकी - करुणम् आह - दीनवाणीने म्हणाली - हे कल्याण - हे भाग्यशाली बंधो - इयम् तव स्नुषा (स्यात्) - ही तुझी सून होईल - स्त्रियं हन्तुं मा अर्हसि - स्त्रीला मारण्यास तू योग्य नाहीस. ॥४॥

भ्रातः - हे बंधो - (मे) बहवः पावकोपमाः शिशवः - माझे पुष्कळ अग्नीसारखे तेजस्वी बालक - दैवनिसृष्टेन त्वया - दैवाने प्रेरिलेल्या त्वा - हिंसिताः - मारिले - एका पुत्रिका (मे) प्रदीयताम् - एक मुलगी मला द्यावी. ॥५॥

प्रभो - हे समर्थ कंसा - हि - खरोखर - अहं - मी - ते - तुझी - हतसुता दीना अवरजा - मारिले आहेत पुत्र जीचे अशी दीन धाकटी बहीण - ननु - नाही काय - अंग - हे बंधो - मन्दायाः मे - मंदभागी अशा मला - इमाम् चरमां प्रजाम् - हे शेवटचे अपत्य - दातुम् अर्हसि - तू द्यावयास योग्य् आहेस. ॥६॥

आत्मजां उपगुह्य - आपल्या मुलीला उराशी धरून - एवं दीनदीनवत् रुदत्या (तया) - याप्रमाणे अति दीनवाणीने रडणार्‍या तिने - याचितः खलः - प्रार्थिलेला तो दुष्ट कंस - तां विनिर्भर्त्स्य - तिची निर्भर्त्सना करून - (कन्यकां) हस्तात् आचिच्छिदे - मुलीला हातांतून हिसकाविता झाला. ॥७॥

तां जातमात्रां स्वसुः सुताम् - त्या नुकत्याच जन्मलेल्या बहिणीच्या मुलीला - चरणयोः गृहीत्वा - पायाशी धरून - स्वार्थोन्मूलितसौहृदः (कंसः) - स्वार्थाने नष्ट झाले आहे प्रेम ज्याचे असा कंस - शिलापृष्ठे अपोथयत् - शिळेच्या पाठीवर आपटता झाला. ॥८॥

सा देवी - ती तेजस्वी कन्या - तद्धस्तात् समुत्पत्य - त्याच्या हातातून निसटून - सद्यःअंबरं गता - तत्काळ आकाशात गेली - (सा) विष्णोः अनुजा - ती विष्णूची धाकटी बहीण - सायुधा अष्टमहाभुजा अदृश्यत - सशस्त्र आणि आठ आहेत मोठे बाहु जिला अशी दिसली. ॥९॥

दिव्यस्रगंबरालेपरत्नाभरणभूषिता - स्वर्गीय फुलांच्या माळा, वस्त्रे, उटया, रत्ने, भूषणे यांनी अलंकारिलेली - धनुःशूलेषुचर्मासिशंखचक्रगदाधरा - धनुष्य, शूल, बाण, ढाल, तलवार, शंख, चक्र आणि गदा धारण करणारी. ॥१०॥

उपाहृतोरुबलिभिः - आणिले आहेत पुष्कळ भेटीचे पदार्थ ज्यांनी अशा - सिद्धचारणगंधर्वैः - सिद्ध, चारण आणि गंधर्व यांनी - अप्सरःकिन्नरोरगैः - अप्सरा, किन्नर व सर्प यांनी - स्तूयमाना (सा) - स्तविली जाणारी ती - इदम् अब्रवीत् - असे बोलली. ॥११॥

मन्द - हे मंदबुद्धे - मया हतया किम् - मी ठार झाल्याने काय होणार - तव अन्तकृत् - तुझा नाश करणारा - पूर्वशत्रुः - पूर्वजन्मीचा वैरी - यत्र क्व वा खलु जातः - कोठेतरी खरोखर जन्मला आहे - कृपणान् (शिशून्) - निरपराधी बालकांना - वृथा मा हिंसीः - निष्कारण मारू नकोस. ॥१२॥

इति तं प्रभाष्य - याप्रमाणे त्याला सांगून - (सा) देवी भगवती माया - ती तेजस्वी भाग्यशाली आदिमाया - भुवि - पृथ्वीवर - बहुनामनिकेतेषु - पुष्कळ नावांच्या ठिकाणी - बहुनामा बभूव ह - पुष्कळ नावांची खरोखर झाली. ॥१३॥

तया अभिहितम् आकर्ण्य - तिने बोललेले शब्द ऐकून - कंसः परमविस्मितः (बभूव) - कंस अगदी आश्चर्यचकित झाला - देवकीं वसुदेवं च विमुच्य - आणि देवकीला व वसुदेवाला बंधमुक्त करून - प्रश्रितः - नम्र असा - अब्रवीत् - बोलला. ॥१४॥

अहो भगिनी - हे बहिणी - हे भाम - हे भगिनीपते - मया पाप्मना - म्या पाप्याने - पुरुषादः अपत्यम् इव - राक्षस आपले मूल जसे तसे - वांबहवः सुताः बत हिंसिताः - तुमचे पुष्कळ पुत्र खरोखर मारिले. ॥१५॥

सः अहं तु - तो मी तर - त्यक्तकारुण्यः - ज्याने दया सोडिली आहे - त्यक्तजातिसुहृत् खलः - ज्याने ज्ञातिबांधव इष्टमित्र टाकिले आहेत असा दुष्ट - श्वसन् मृतः - जिवंत असून मेल्यासारखा - ब्रह्महा इव - ब्रह्मघातक्याप्रमाणे - कान् वै लोकान् गमिष्यामि - कोणत्या लोकी खरोखर जाणार. ॥१६॥

दैवं अपि अनृतं वक्ति - देवतासुद्धा खोटे बोलतात - केवलं मर्त्या एव न (वदन्ति) - केवळ मनुष्य बोलतात असे नाही - यद्विश्रंभात् - ज्याच्यावरील विश्वासामुळे - पापःअहं - पापी मी - स्वसुः शिशून् निहतवान् - बहिणीच्या मुलांना मारिता झालो. ॥१७॥

महाभागौ - हे उदारबुद्धीच्या वसुदेवा व देवकी - स्वकृतंभुजः आत्मजान् मा शोचतं - आपल्या कर्माची फळे भोगणार्‍या आपल्या मुलांविषयी शोक करू नका - दैवाधीनाः जंतवः सदा न (आसते) - दैवाधीन असे प्राणी नेहमी राहणारे नाहीत - तद् (हि) एकत्र (न) आसते - आणि त्यातूनही एके ठिकाणी राहत नाहीत. ॥१८॥

यथा - ज्याप्रमाणे - भौ‌मानि भूतानि - पृथ्वीपासून होणारे पदार्थ - (भुवः) यांति भुवि च अपयांति - पृथ्वीपासून होतात आणि पृथ्वीतच लय पावतात - यथा (एव) भूः न विपर्येति - ज्याप्रमाणे पृथ्वी अगदी भिन्न होत नाही - तथा एव एतेषु (भूतेषु उत्पद्यमानेषु लीयमानेषु च) - त्याचप्रमाणे ही शरीरे उत्पन्न होत असता व नष्ट होत असता - अयं आत्मा न विपर्येति - हा आत्मा विकृत होत नाही. ॥१९॥

यथा (वत्) - ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे - अनेवंविदः - हे न समजणार्‍याची - आत्मविपर्ययः (भवति) - आत्म्याच्या बाबतीत उलटी समजूत होते - यतः भेदः - ज्या समजुतीमुळे भेदबुद्धी होते - देहयोगवियोगौ - आणि म्हणून पुत्रकलत्रादि शरीराचे संयोग व वियोग - संसृतिः च न निवर्तते - आणि संसार ही नष्ट होत नाहीत. ॥२०॥

भद्रे - हे भाग्यशाली देवकी - यतः - कारण - अवशः सर्वः - पराधीन असा प्रत्येक प्राणी - स्वकृतं विंदते - आपल्या कर्माची फळे भोगितो - तस्मात् मया व्यापादितान् अपि - यास्तव मी मारिलेल्याही - स्वतनयान् मा अनुशोच - आपल्या मुलांविषयी शोक करू नकोस. ॥२१॥

यावत् - जोपर्यंत - अस्वदृक् - आत्मस्वरूप न जाणणारा - तदभिमानी - देहाचा अभिमान बाळगणारा - आत्मानं हतः अस्मि हंता अस्मि इति मन्यते - मी मारिला गेलो किंवा मी मारणारा आहे असे मी मानितो - तावत् अज्ञः (सः) - तोपर्यंत अज्ञानी असा तो - बाध्यबाधकतां इयात् - बाध्य आणि बाधक या संबंधाला प्राप्त होतो. ॥२२॥

दीनवत्सलाः साधवः - अहो दीनावर दया करणारे सज्जन हो - मम दौरात्म्यं क्षमध्वं - माझ्या दुष्टपणाची क्षमा करा - इति उक्त्वा - असे म्हणून - अथ - मग - अश्रुमुखः (सः) श्यालः - मुखावर अश्रु गळत आहेत ज्याच्या असा तो वसुदेवाचा मेहुणा - स्वस्रोः पादौ अग्रहीत् - बहिण व मेहुणा ह्या दोघांचे पाय धरिता झाला. ॥२३॥

कन्यकागिरा विश्रब्धः - कन्यारूपी योगमायेच्या भाषणाने विश्वास उत्पन्न झालेला कंस - देवकीं वसुदेवं च आत्मसौहृदं दर्शयन् - देवकी आणि वसुदेव ह्यांना आपले प्रेम दाखवीत - निगडात् मोचयामास - शृंखलांपासून मुक्त करिता झाला. ॥२४॥

च - आणि - क्षान्तरोषा देवकी - जिचा राग शांत झाला आहे अशी देवकी - समनुतप्तस्य भ्रातुः - पश्चात्ताप प्राप्त झालेल्या भाऊ कंसाला - व्यसृजत् - जाऊ देती झाली - वसुदेवः च प्रहस्य तं उवाच ह - आणि वसुदेव स्मित हास्य करून त्याला म्हणाला. ॥२५॥

महाभाग यथा वदसि एवं एतत् - हे भाग्यशाली पुरुषा, तू जसे म्हणतोस तसे हे आहे - यतः स्वपरेतिभिदा भवति - जिच्यामुळे मी व दुसरा अशी भेदबुद्धी होते - (सा) देहिनां अहंधीः अज्ञानप्रभवा - ती प्राण्यांची अहंकारबुद्धी अज्ञानापासून उत्पन्न होते. ॥२६॥

शोकहर्षभयद्वेषलोभमोहमदान्विताः - शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह व गर्व यांनी युक्त - पृथक्दृशः - व भेदबुद्धीने पाहणारे लोक - (निमित्तभूतैः) भावैः - निमित्तमात्र होणार्‍या काही देहाकडून - (भावान्) मिथः घ्नंतः - इतर देहांचा परस्पर नाश करविणार्‍या - भावं न पश्यंति - परमेश्वररूप वस्तूला पाहत नाहीत. ॥२७॥

प्रसन्नाभ्यां देवकीवसुदेवाभ्यां - संतुष्ट झालेल्या देवकी व वसुदेव यांच्याकडून - एवं विशुद्धं प्रतिभाषितः - याप्रमाणे निष्कपटपणाचे उत्तर दिले गेलेला - अनुज्ञातः कंसः गृहं अविशत् - व त्यांनी आज्ञा दिलेला कंस घरी गेला. ॥२८॥

तस्यां रात्र्यां व्यतीतायां - ती रात्र निघून गेल्यावर - मंत्रिणः आहूय - प्रधानांना बोलावून - कंसः - कंस - योगनिद्रया यत् उक्तं - योगमायेने जे सांगितले होते - तत् सर्वं तेभ्यः आचष्ट - ते सर्व त्यांना निवेदन करिता झाला. ॥२९॥

(ततः) देवशत्रवः नातिकोविदाः दैतेयाः - तेव्हा ते देवांचे शत्रू व अदूरदर्शी दैत्य - भर्तुः गदितं आकर्ण्य - आपल्या धन्याचे भाषण ऐकून - देवान् प्रति कृतामर्षाः तं ऊचुः - देवांविषयी आलेला आहे राग ज्यांना असे त्या कंसाला म्हणाले. ॥३०॥

भोजेंद्र एवं चेत् तर्हि - हे भोजराजा असे जर आहे तर - अद्य पुरग्रामव्रजादिषु - आज नगरे, गावे व गोकुळे आदिकरून सर्व ठिकाणी असलेल्या - अनिर्दशान् निदर्शान् च शिशून् - दहा दिवसांच्या आतील व दहा दिवसानंतरच्या सर्व मुलांना - वै हनिष्यामः - आपण खरोखरच मारून टाकू या. ॥३१॥

तव धनुषः ज्याघोषैः - तुझ्या धनुष्याच्या दोरीच्या शब्दांनी - नित्यं उद्विग्नमनसः - ज्यांची मने नित्य भेदरून गेलेली असतात - समरभीरवः देवाः - व युद्धाच्या कामात अगदी भित्रे असे देव - उद्यमैः (अस्माकम्) किं करिष्यंति - प्रयत्न करून आपले काय करणार. ॥३२॥

अस्यतः ते शरव्रातैः - तुझ्या सोडिलेल्या बाणांच्या वर्षावांनी - समंततः हन्यमानाः - चोहोकडून ताडले गेलेले देव - जिजीविषवः (रणं) उत्सृज्य - जगण्याची इच्छा करणारे युद्ध सोडून - पलायनपराः ययुः - पळून जाण्याविषयी उद्युक्त झाले. ॥३३॥

केचित् दिवौकसः न्यस्तशस्त्राः - कित्येक देव हातांतील शस्त्रे टाकून - दीनाः प्राञ्जलयः तिष्ठन्ति - दीनपणे हात जोडून उभे राहतात - केचित् मुक्तकच्छशिखाः - कित्येक शिखा व कासोटे सुटलेले असे - भीताः स्म इति वादिनः (भवन्ति) - आम्ही भ्यालो आहो असे म्हणतात. ॥३४॥

त्वं - तू - विस्मृतशस्त्रास्त्रान् विरथान् - तू शस्त्रास्त्रे विसरून आलेल्या व ज्यांना रथ नाहीत अशा - भयसंवृतान् - भयभीत झालेल्या - अन्यासक्तविमुखान् - व दुसर्‍यांशी युद्ध करीत असल्यामुळे तुझ्यासमोर नसलेल्या - भग्नचापान् अयुद्‌ध्‌यतः शत्रून् - धनुष्य मोडलेल्या व युद्ध करीत नसलेल्या शत्रूंना - न हंसि - मारीत नाहीस. ॥३५॥

क्षेमशूरैः - निर्भय देशात शूर म्हणविणार्‍या - असंयुगविकत्थनैः - व युद्धाशिवाय इतर ठिकाणी प्रौढी मिरविणार्‍या - विबुधैः किं - देवांकडून आमचे काय होणार - रहोजुषा हरिणा वनौकसा - एकांत सेवणार्‍या विष्णूच्याने किंवा अरण्यात राहणार्‍या - शंभुना वा किं - शंकराच्याने आमचे काय होणार - अल्पवीर्येण इंद्रेण - अल्पशक्तीच्या इंद्राकडून - तपस्यता ब्रह्मणा वा (अस्माकं किं भविष्यति) - किंवा तपश्चर्या करणार्‍या ब्रह्मदेवाकडून आमचे काय होणार आहे. ॥३६॥

तथापि सापत्न्यात् देवाः - तरीही त्यांच्याविषयीच्या वैरामुळे देव - न उपेक्ष्याः इति मन्महे - उपेक्षा करण्यास योग्य नाहीत असे आम्हाला वाटते - ततः अनुव्रतान् अस्मान् - म्हणून आज्ञाधारी अशा आम्हाला - तन्मूलखनने नियुंक्ष्व - त्यांची पाळेमुळे खणून काढण्याच्या कामी योज. ॥३७॥

यथा नृभिः समुपेक्षितः - ज्याप्रमाणे मनुष्यांनी सर्वस्वी हयगय केलेला - (अतएव) अंगे रूढपदः आमयः - व म्हणूनच शरीरात रोविलेला आहे पाय ज्याने असा रोग - चिकित्सितुं न शक्यते - उपाययोजना करण्यास शक्य होत नाही - यथा उपेक्षितः इंद्रियग्रामः - ज्याप्रमाणे उपेक्षा केलेला इंद्रियांचा समूह - तथा (उपेक्षितः सन्) - त्याप्रमाणे उपेक्षा केल्यामुळे - बद्धबलः महान् रिपुः न चाल्यते - सैन्य जमवून बलिष्ठ झालेला शत्रू जिंकिला जात नाही. ॥३८॥

विष्णुः हि - विष्णु खरोखर - देवानां मूलं (अस्ति) - देवांचा मूळ आधार होय - यत्र - ज्याठिकाणी - सनातनः धर्मः (अस्ति) - त्रिकालाबाधित धर्म असतो - तस्य च धर्मस्य मूलं - आणि त्या धर्माचे मूळ कारण - ब्रह्मगोविप्राः - वेद, गाई, व ब्राह्मण - सदक्षिणाः यज्ञाः (सन्ति) - दक्षिणायुक्त यज्ञ होत. ॥३९॥

तस्मात् - म्हणून - राजन् - हे राजा कंसा - ब्रह्मवादिनः ब्राह्मणान् - वेदपठण करणार्‍या ब्राह्मणांना - तपस्विनः - तप करणार्‍यांना - यज्ञशीलान् - यज्ञ हेच आहे व्रत ज्यांचे अशांना - हविर्दुधाः गाः च - यज्ञाला लागणारे दूध देणार्‍या गाई सुद्धा - वयं सर्वात्मना हन्मः - आपण सर्व प्रयत्न करून मारू या. ॥४०॥

विप्राः - ब्राह्मण - गावः च - आणि गाई - वेदाः च - आणि वेद - तपः सत्यं दमः शमः - तपश्चर्या, सत्य भाषण, इंद्रियदमन, शांति, - श्रद्धा दया तितिक्षा च - श्रद्धा, दया व सहनशीलपणा - क्रतवः च - आणि यज्ञ आदिकरून कर्मे - हरेः तनूः (सन्ति) - श्रीहरीची स्वरूपे होत. ॥४१॥

सः हि - तो श्रीहरी खरोखर - सर्वसुराध्यक्षः - सर्व देवांचा प्रमुख - हि असुर द्विड् - खरोखर असुरांचा द्वेष करणारा - गुहाशयः (अस्ति) - गुहेत राहणारा आहे - सेश्वराः सचतुर्मुखाः सर्वाः देवताः - शंकर व ब्रह्मदेव यासह सर्व देव - तन्मूलाः (सन्ति) - तो हरी आहे आधार ज्यांचा असे आहेत - अयं वै तद्वधोपायः (अस्ति) - हा खरोखर त्यांच्या नाशाचा उपाय आहे - यत् - जे - ऋषीणां विहिंसनम् - ऋषींना सर्वस्वी नष्ट करणे. ॥४२॥

एवं दुर्मंत्रिभिः सह संमन्त्र्य - याप्रमाणे दुष्ट मंत्र्यांशी विचार करून - कालपाशावृतः - कालाच्या पाशांनी वेष्ठिलेला - असुरः दुर्मतिः कंसः - असा तो असुर दुष्टबुद्धीचा कंस - ब्रह्महिंसां हितं मेने - ब्राह्मणांचा वध हितकारक मानिता झाला. ॥४३॥

साधुलोकस्य कदने - साधु लोकांचा नाश करण्याच्या कामी - कदनप्रियान् - नाश करणे ज्यांना प्रिय आहे अशा - कामरूपधरान् दानवान् - व इच्छेस येईल ते रूप धारण करणार्‍या दानवांना - दिक्षु संदिश्य - निरनिराळ्या दिशांमध्ये आज्ञा देऊन पाठविल्यावर - गृहम् आविशत् - आपल्या घरात गेला. ॥४४॥

रजःप्रकृतयः ते - रजोगुणाने युक्त आहे स्वभाव ज्यांचा असे ते दानव - तमसा मूढचेतसः - तमोगुणाने मोहून गेले आहे अंतःकरण ज्यांचे असे - आरात् आगतमृत्यवः - जवळ आला आहे मृत्यू ज्यांच्या असे - सतां विद्वेषं आचेरुः - साधूंचा द्वेष करिते झाले. ॥४५॥

महदतिक्रमः - मोठयांचा अपमान - पुंसः - पुरुषाच्या - आयुः श्रियं यशः धर्मम् - आयुष्याला, संपत्तीला, कीर्तीला, धर्माला - लोकान् - स्वर्गादि लोकांना - आशिषः एव - उपभोग्य वस्तूंनाही - सर्वाणि श्रेयांसि च - आणि सर्व हितांना - हंति - नष्ट करितो. ॥४६॥

अध्याय चवथा समाप्त

GO TOP