श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय ६ वा - अन्वयार्थ

पूतना उद्धार -

नंदः - नंद - पथि - वाटेत - शौरेः वचः न मृषा - वसुदेवाचे वचन खोटे नाही - इति विचिंतयन् - असे मनात म्हणत - उत्पातागमशंकितः - संकट येईल की काय अशी शंका वाटून - हरिं शरणं जगाम - परमेश्वराला शरण गेला. ॥१॥ - कंसेन प्रहिता - कंसाने पाठविलेली - बालघातिनी - बालकांचा संहार करणारी, - घोरा पूतना राक्षसी - भयंकर अशी पूतना नावाची राक्षसी - शिशून् निघ्नंती - बालकांचा वध करीत - पुरग्रामव्रजादिषु - नगरे, गावे व गोकुळे इत्यादि ठिकाणी - चचार - संचार करिती झाली. ॥२॥

यत्र - जेथे - स्वकर्मसु - आपली इतर कर्मे चालली असता - रक्षोघ्नानि सात्त्वतां - राक्षसांचा नाश करणारी - भर्तुः (नाम) श्रवणादीनि - अशी भक्तरक्षक श्रीकृष्णाची नाम श्रवणादि कृत्ये - न कुर्वंति - करीत नाहीत - तत्र च हि - तेथेच खरोखर - यातुधान्यः (प्रभवन्ति) - राक्षसिणींचा प्रभाव चालतो. ॥३॥

सा खेचरी - ती आकाशात फिरणारी - कामचारिणी पूतना - व इच्छेस येईल तिकडे संचार करणारी पूतना - एकदा नंदगोकुलं उपेत्य - एके दिवशी नंदाच्या गोकुळाजवळ येऊन - मायया आत्मानं योषित्वा - मायेने स्वतःला सभ्य स्त्री बनवून - प्राविशत् - प्रवेश करिती झाली. ॥४॥

केशबंधव्यतिषक्तमल्लिकां - वेणीमध्ये गुंफिली आहेत मोगरीची फुले जिने अशा - बृहन्नितंब - विशाल असा कटिप्रदेश - स्तनकृच्छ्ररध्यमां - व स्तन यांमुळे जिचा मह्द्यभाग पीडित झाला आहे अशा - सुवाससम् - सुंदर वस्त्र नेसलेल्या - कंपितकर्णभूषणत्विषा - हलणार्‍या कुंडलांच्या कांतीने चकचकणार्‍या केसांमुळे - उल्लसत्कुंतलमंडिताननां - सुशोभित आहे मुख जिचे अशा - वल्गुस्मितापांगविसर्गवीक्षितैः - सुंदर हास्ययुक्त कटाक्षांचे फेकणे ज्यांत चालले आहे अशा पाहण्याने - व्रजौकसां मनः हरंतीं - गोकुळातील लोकांचे मन हरण करणार्‍या - तां वनितां - त्या स्त्रीला - गोप्यः - गोपी - अंभोजकरेण (उपलक्षितां) पतिं द्रष्टुं - कमलाने युक्त अशा हाताने शोभणार्‍या व पतीला - आगतां रूपिणीं श्रियं इव अमंसत - पाहण्याकरिता आलेल्या साक्षात् लक्ष्मीप्रमाणे मानत्या झाल्या. ॥५-६॥

बालग्रहः (सा) - मुलांना पीडा देणारे पिशाच अशी पूतना - तत्र शिशून् विचिन्वती - त्या गोकुळात मुलांचा शोध करीत - यदृच्छया नंदगृहे (आगता) - सहज त्या नंदाच्या घरी आली - असदंतकं - दुष्टांचा काळ अशा - प्रतिच्छन्ननिजोरुतेजसं बालं - ज्याने स्वतःचे भव्य तेज झाकिलेले आहे अशा त्या बालकृष्णाला - भसि आहितं अग्निं इव - भस्मात झाकून ठेविलेल्या अग्नीप्रमाणे - तल्पे ददर्श - अंथरूणावर पाहती झाली. ॥७॥

चराचरात्मा (कृष्णः) - स्थावर जंगमात्मक सर्व जगाचा अंतर्यामी असा श्रीकृष्ण - तां बालकमारिकाग्रहं विबुध्य - त्या पूतनेला बालके मारणारे पिशाच जाणून - निमीलितेक्षणः आस - मिटलेले आहेत डोळे ज्याने असा राहिला - यथा अबुद्धिरज्जुधीः - जसा अज्ञानामुळे दोरी आहे असे समजून - सुप्तं उरगं (गृः‌ह्‌णाति) - मनुष्य निजलेल्या सापाला उचलितो त्याप्रमाणे - (आत्मनः) अंतकं अनंतं - आपला काळच अशा श्रीकृष्णाला - अंकं आरोपयत् - मांडीवर घेती झाली. ॥८॥

कोशपरिच्छदासिवत् तीक्ष्णचित्तां - म्यानात घातलेल्या तलवारीप्रमाणे कठोर अंतःकरणाच्या - (बाह्यतः) च अतिवामचेष्टितां - आणि बाह्यतः फार प्रेमळ आहे वर्तन जिचे अशा - तां वरस्त्रियं अंतरा (आगतां) वीक्ष्य - त्या प्रौढ स्त्रीला घरात आलेली पाहून - तत्प्रभया धर्षिते - तिच्या तेजाने दिपून गेलेल्या - जननी - माता यशोदा व रोहिणी - निरीक्षमाणे हि अतिष्ठतां - टकमक पाहतच उभ्या राहिल्या. ॥९॥

घोरा (सा) - दुष्ट अशी ती पूतना - तस्मिन् (क्षणे) - ताबडतोब - (तं बालं) अंकं आदाय - त्या लहान मुलाला मांडीवर घेऊन - दुर्जरवीर्यं उल्बणं स्तनं - ज्यात जिरावयास कठीण असे भयंकर विष आहे - शिशोः ददौ - असा स्तन बालकाला देती झाली - अथ भगवान् रोषसमन्वितः - नंतर श्रीकृष्ण रागावून - (तं) कराभ्यां गाढं प्रपीडय - तो स्तन दोन्ही हातांनी घट्ट आवळून - तत्प्राणैःसमं (तत्) अपिबत् - तिच्या प्राणांसह ते विष पिता झाला. ॥१०॥

अखिलजीवमर्मणि निष्पीडयमाना - सर्व शरीराच्या कोमल भागात अत्यंत पीडा पावलेली - मुंच मुंच अलं इति प्रभाषिणी - सोड सोड पुरे असे ओरडून बोलणारी - प्रस्विन्नगात्रा - घामाने डवरले आहे अंग जिचे अशी - चरणौ भुजौ मुहुः क्षिपती सा - हात पाय वारंवार आपटणारी ती पूतना - नेत्रे विवृत्य रुरोद ह - डोळे फाडून अतिशय रडू लागली. ॥११॥

तस्याः अतिगंभीररंहसा स्वनेन - तिच्या त्या अत्यंत गंभीर वेगाच्या ओरडण्याच्या वेगाने - साद्रिः मही - पर्वतांसह पृथ्वी - सग्रहा द्यौः च - आणि ग्रहांसह स्वर्ग - चचाल - थरथरू लागला - रसा दिशः च - रसातल व दाही दिशा - प्रतिनेदिरे - प्रतिध्वनी काढू लागल्या - जनाः वज्रनिपातशंकया - लोक वज्रपात झाला की काय अशा भीतीने - क्षितौ पेतुः - पृथ्वीवर पडले. ॥१२॥

हे नृप - हे राजा - इत्थं व्यथितस्तना - याप्रमाणे जिच्या स्तनांना पीडा झाली आहे - निशाचरी - अशी ती राक्षसी - व्यसुः (भूत्वा) - गतप्राण होऊन - निजरूपम् आस्थिता - आपले खरे स्वरूप धारण केलेली - व्यादाय - तोंड वासून - केशान् चरणौ भुजौ अपि प्रसार्य - केश व हातपायसुद्धा पसरून - गोष्ठे - गोकुळात - वज्राहतः वृत्र इव अपतत् - वज्राने ताडिलेल्या वृत्रासुराप्रमाणे पडली. ॥१३॥

राजेंद्र - हे राजश्रेष्ठा - पतमानः अपि तद्देहः - पडणारा असा तिचा देह - त्रिगव्युत्यंतरद्रुमान् चूर्णयामास - सहा कोसातील वृक्षांना चूर्ण करिता झाला - तत् महत् अद्‌भुतं आसीत् - ते कृत्य मोठे आश्चर्यकारक झाले. ॥१४॥

ईषामात्रोग्रदंष्ट्रास्यं - ज्याच्या मुखात नांगराच्या दांडयाएवढया तीक्ष्ण दाढा आहेत - गिरिकंदरनासिकं - व पर्वताच्या गुहे‌एवढया आहेत नाकपुडया ज्याच्या असे - गंडशैलस्तनं - ज्याचे स्तन पर्वतावरून गडगडत आलेल्या शिळेप्रमाणे आहेत - प्रकीर्णारुणमूर्धजं - व अस्ताव्यस्त झाले आहेत तांबूस वर्णाचे केस ज्याचे असे - अंधकूपगभीराक्षं - ज्याचे डोळे अंधार्‍या विहीरीप्रमाणे खोल आहेत - पुलिनारोहभीषणं - व वाळवंटाप्रमाणे विस्तीर्ण अशा ढुंगणामुळे भयंकर असे - बद्धसेतुभुजोर्वंघ्रि - ज्यावर हात, मांडया आणि पाय पुलाप्रमाणे बांधले आहेत असे - शून्यतोयह्लदोदरं - व ज्याचे पोट निःशेष पाणी झालेल्या डोहाप्रमाणे आहे असे - तत् रौद्रं कलेवरं वीक्ष्य - ते भयंकर शरीर बघून - गोपाः गोप्यः (च) - गोप आणि गोपी - संतत्रसुः स्म - घाबरल्या - पूर्वं तु - प्रथम तर - तन्निस्वनित - तिच्या शब्दाने - भिन्नहृत्कर्णमस्तकाः (आसन्) - ज्यांची हृदये, कान व मस्तके फुटून गेली आहेत अशा झाल्या. ॥१५-१७॥

तस्याः च उरसि क्रीडंतं - आणि तिच्या उरावर खेळणार्‍या - अकुतोभयं बालं (दृष्ट्‌वा) - व ज्याला कोठूनही भीति नाही अशा बालकाला पाहून - गोप्यः - गोपी - जातसंभ्रमाः - झाली आहे धांदल ज्यांची अशा - तूर्णम् समभ्येत्य (तं) जगृहुः - लगबगीने जवळ येऊन त्याला उचलत्या झाल्या. ॥१८॥

यशोदा रोहिणीभ्यां समं - यशोदा व रोहिणी यांच्यासह - ताः - त्या - गोपुच्छभ्रमणादिभिः - अंगावरून गाईची शेपटी फिरविणे इत्यादि - सर्वतः बालस्य रक्षां - सर्वप्रकारचे मुलाच्या रक्षणाचे उपाय - सम्यक् विदधिरे - नीटरीतीने करित्या झाल्या. ॥१९॥

गोमूत्रेण अर्भकं स्नापयित्वा - गोमूत्राने त्या बालकाला स्नान घालून - पुनः गोरजसा - आणखी गाईच्या पायधुळीने, - शकृता (द्वादशभिः) नामभिः च - शेणाने व बारा नावांनी - द्वादशांगेषु रक्षां चक्रुः - बारा अंगांच्या ठिकाणी रक्षाबंधन करित्या झाल्या. ॥२०॥

संस्पृष्टसलिलाः गोप्यः - स्पर्शिले आहे उदक ज्यांनी अशा गोपी - आत्मनि - आपल्या अंगावर - अंगेषु करयोः न्यस्य - निरनिराळ्या अवयवांच्या हातांनी न्यास करून - अथ - नंतर - बालस्य पृथक् - बालकाच्या अंगाला वेगवेगळे - बीजन्यासं अकुर्वत - बीजन्यास करित्या झाल्या. ॥२१॥

अजः अङ्‌घ्रिं अव्यात् - अज तुझ्या पायाचे रक्षण करो - अणिमान् तव जानु - अणिमान तुझ्या गुडघ्याचे - अथ - तसेच - यज्ञः ऊरू - यज्ञ मांडयांचे - अच्युतः कटितटं - अच्युत कटिप्रदेशाचे - हयास्यः जठरं - हयग्रीव उदराचे - केशवः हृत् - केशव अंतःकरणाचे - ईशः त्वदुरः - ईश तुझ्या वक्षस्थलाचे - इनः तु कंठं - सूर्य तर तुझ्या कंठाचे - विष्णुः भुजं - विष्णु भुजांचे - उरुक्रमः मुखं - त्रिविक्रम मुखाचे - ईश्वरः कं (अव्यात्) - आणि ईश्वर तुझ्या मस्तकाचे रक्षण करो. ॥२२॥

चक्री हरिः अग्रतः - चक्र धारण करणारा हरी अग्रभागी असो - सहगदः पश्चात् - गदाधारी परमेश्वर पृष्ठभागी असो - धनुरसी मधुहा च - धनुष्य धारण करणारा मधुसूदन व तलवार घेणारा - अजनः त्वत्पार्श्वयोः - जन्मरहित परमेश्वर हे तुझ्या दोन्ही बाजूंकडे असोत - उरुगायः शंखः कोणेषु - ज्याची लीला सर्व लोक गातात असा शंखमूर्ती देव चारी कोपर्‍यांना असो - उपरि उपेंद्रः - वरच्या भागास उपेंद्र असो - तार्क्ष्यः क्षितौ - गरुड अधोभागी असो - हलधरः पुरुषः समंतात् - हातात नांगर धरणारा पुराणपुरुष तुझ्या सभोवती असो. ॥२३॥

हृषीकेशः इंद्रियाणि (अवतु) - हृषीकेश इंद्रियांचे रक्षण करो - नारायणः प्राणान् अवतु - नारायण प्राणांचे रक्षण करो - श्वेतद्वीपपतिः चित्तं - श्वेतद्वीपाचा स्वामी चित्ताचे - योगेश्वरः (च) मनः अवतु - आणि योगेश्वर मनाचे रक्षण करो. ॥२४॥

पृश्र्निगर्भः ते बुद्धिं - पृश्र्नीच्या उदरी उत्पन्न झालेला ईश्वर तुझ्या बुद्धीचे - परः भगवान् आत्मानं - श्रेष्ठ असा भगवान आत्म्याचे - गोविंदःक्रीडंतं (त्वां) पातु - गोविंद खेळत असताना तुझे रक्षण करो - माधवः शयानं (त्वां) पातु - माधव निजलेल्या अशा तुझे रक्षण करो.॥२५॥

वैकुंठः व्रजंतं - तू चालत असताना वैकुंठ रक्षण करो - श्रियः पतिः आसीनं त्वां अव्यात् - लक्ष्मीपति तू बसलेला असताना तुझे रक्षण करो - सर्वग्रहभयंकरः - सर्व ग्रहांना भय उत्पन्न करणारा - यज्ञभुक् भुंजानं पातु - यज्ञभोक्ता तुझे जेवत असताना रक्षण करो. ॥२६॥

ये अर्भकग्रहाः - जे बालकांना पीडा देणारे - डाकिन्यः यातुधान्यः कूष्मांडाः - डाकिनी, यातुधानी, कूष्मांड - भूतप्रेतपिशाचाद्याः - भूत, प्रेत, पिशाच आदिकरून - यक्षरक्षोविनायकाः - यक्ष, राक्षस विनायक - सन्ति - आहेत. ॥२७॥

ये - जे - कोटरारेवती - कोटरा, रेवती, - ज्येष्ठापूतना मातृकादयः - ज्येष्ठा, पूतना व मातृका आदिकरून - उन्मादाः - उन्माद आणि - देहप्राणेंद्रियद्रुहः - देह, प्राण व इंद्रिये यांचा द्रोह - अपस्माराः (च) - करणारे अपस्मार रोग. ॥२८॥

स्वप्नदृष्टाः महोत्पाताः - स्वप्नांत दिसलेले मोठाले उत्पात - ये च वृद्धबालग्रहाः - आणि जे वृद्धांना व बालांना पीडा देणारे ग्रह - विष्णोः नामग्रहणभीरवः (सन्ति) - विष्णूच्या नामग्रहणाला भिणारे असे आहेत - ते सर्वे नश्यंतु - ते सर्व नष्ट होवोत. ॥२९॥

प्रणयबद्धाभिः गोपीभिः - कृष्णावर दृढ प्रेम असणार्‍या गोपींनी - इति कृतरक्षणं आत्मजं - याप्रमाणे रक्षण केलेल्या आपल्या पुत्राला - स्तनं पाययित्वा - स्तनपान करवून - माता संन्यवेशयत् - यशोदा माता निजविती झाली. ॥३०॥

तावत् - इतक्यात - मथुरायाः व्रजं (आ) गताः - मथुरेहून गोकुळात आलेले - नंदादयः गोपाः - नंदादिक गोप - पूतना देहं विलोक्य - पूतनेचा देह बघून - अतिविस्मिताः बभूवुः - अत्यंत आश्चर्यचकित झाले. ॥३१॥

नूनं बत सः - खरोखर वसुदेव हा कोणी - ऋषिः संजातः - एक ऋषीच उत्पन्न झाला आहे - वा योगेशः समास - किंवा उत्तम महाज्ञानी योगी असावा - यत् हि आनकदुंदुभिः आह - कारण जे वसुदेव म्हणाला - सः एव उत्पातः दृष्टः - तोच उत्पात आम्ही पाहिला. ॥३२॥

(ततः) ते व्रजौकसः - नंतर ते गोकुळवासी जन - तत् कलेवरं परशुभिः छित्त्वा - ते शरीर कुर्‍हाडीने तोडून - अवयवशः दूरे क्षिप्त्वा - एक एक अवयव दूर नेऊन - काष्ठधिष्ठितं (कृत्वा) न्यदहन् - काष्ठांवर चढवून दहन करिते झाले. ॥३३॥

कृष्णनिर्भुक्तसपद्याहतपाप्मनः - कृष्णाने स्तनपान केल्यामुळे तत्काळ पापनष्ट झालेल्या - दह्यमानस्य देहस्य धूमः - जळत असलेल्या त्या देहाचा धूर - अगुरुसौरभः उत्थितः - चंदनाप्रमाणे सुवासिक असा उठला. ॥३४॥

लोकबालघ्नी - लोकांची मुले मारणारी - रुधिराशना राक्षसी पूतना - व रक्त पिणारी ती राक्षसी पूतना - जिघांसया अपि हरये - मारण्याच्या इच्छेनेही श्रीकृष्णाला - स्तनं दत्वा - स्तनपान देऊन - सद्‌गतिं आप - उत्तम गति मिळविती झाली. ॥३५॥

किं पुनः - मग काय - श्रद्धया - श्रद्धेने - भक्त्या - भक्तीने - कृष्णाय परमात्मने - श्रीकृष्ण परमात्म्याला - प्रियतमं यच्छन् - अति प्रिय वस्तु देणारा - न आप्नोति नु - मिळविणार नाही काय - यथा तन्मातरः - जशा त्याच्या माता - तथा रक्तः - तसा त्याच्यावर अनुरक्त झालेला - (सद्‌गतिं न आप्नोति) किम् - सद्‌गति मिळविणार नाही काय. ॥३६॥

लोकवंदितैः वंद्याभ्यां - लोकांना परममान्य अशा - भक्तहृदिस्थभ्यां - सत्पुरुषांना वंद्य व भक्तांच्या हृदयात राहणार्‍या - पद्‌भ्‌यां - अशा आपल्या चरणकमलांनी - यस्या अंगं समाक्रम्य - जिच्या शरीरावर आक्रमण करून - भगवान् स्तनं अपिबत् - भगवान स्तन पिता झाला. ॥३७॥

सा यातुधानी अपि - ती राक्षसीही - जननींगतिं - मातेला प्राप्त होणार्‍या - स्वर्गं अवाप - स्वर्गरूप गतीला मिळविती झाली - किं उ कृष्णभुक्तस्तनक्षीराः - मग ज्यांच्या स्तनांतील दुग्ध कृष्णाने प्याले आहे - गावः मातरः नु - अशा गाई व माता ह्या खरोखर का न मिळवितील. ॥३८॥

कैवल्याद्यखिलप्रदः - मोक्ष आदिकरून सर्व काही देऊ शकणारा - देवकीपुत्रः भगवान् - देवकीचा मुलगा श्रीकृष्ण - पुत्र स्नेहस्नुतानि - पुत्राच्या प्रेमाने पाझरणारी - यासां पयांसि अलं अपिबत् - अशी ज्यांची दुधे पोटभर पिता झाला. ॥३९॥

कृष्णे अविरतं सुतेक्षणं - कृष्णाच्या ठिकाणी हा आपला पुत्र आहे - कुर्वंतीनां तासां - अशी नित्य दृष्टि ठेवणार्‍या यांना - राजन् - हे राजा - अज्ञानसंभवः - पुनः अज्ञानापासून उत्पन्न होणारा - संसारः न कल्पते - संसार घडणार नाही. ॥४०॥

कटधूमस्य - प्रेत दहनापासून - सौरभ्यं अवघ्राय - निघालेला सुगंधित सुवास घेऊन - किम् इदं कुतः एव - हे काय व कोठून आले - इति वदंतः व्रजौकसः - असे बोलत गोकुळातील लोक. ॥४१॥

तत्र गोपैः वर्णितं - तेथे गोपांनी वर्णन केलेले - पूतनागमनादिकं तन्निधनं - पूतनेचे येणे, तिचे मरण - शिशोः च स्वस्ति श्रुत्वा - व बालकाचा सुखरूपपणा इत्यादि ऐकून - सुविस्मिताः आसन् - अत्यंत आश्चर्यचकित झाले. ॥४२॥

कुरूद्वह - हे कुरुकुलभूषणा राजा - उदारधीःनंदः - उदार अंतःकरणाचा नंद - प्रेत्य (इव) आगतं - मरूनच जणु काय पुनः आलेल्या - स्वपुत्रं आदाय - आपल्या पुत्राला घेऊन - मूर्ध्नि उपाघ्राय - मस्तकाला हुंगून - परमां मुदं लेभे - मोठया आनंदाला प्राप्त झाला. ॥४३॥

यः मर्त्यः - जो मनुष्य - एतत् कृष्णस्य - हे कृष्णाचे बाललीलेतील - अद्भुतं आर्भकं पूतनामोक्षं - पूतनामोक्षात्मक चमत्कारिक आख्यान - श्रद्धया श्रृणुयात् - श्रद्धेने ऐकेल - (सः) गोविंदे रतिं लभते - तो परमेश्वराच्या ठिकाणी प्रेम प्राप्त करून घेईल. ॥४४॥

अध्याय सहावा समाप्त

GO TOP