श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय १ ला - अन्वयार्थ

भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन,
वसुदेव-देवकीविवाह आणि कंसाकडून देवकीपुत्रांची हत्या -

भवता सोमसूर्ययोः वंशविस्तारः कथितः आपण चंद्र आणि सूर्य या दोन्ही वंशांचा विस्तार सांगितला उभयवंश्यानां राज्ञां च आणि दोन्ही वंशातील राजांचे परमाद्‍भुतं चरितं कथितम् अत्यंत आश्चर्यकारक चरित्रेही सांगितलीत (१)

मुनिसत्तम ! हे मुनिश्रेष्ठा नितरां धर्मशीलस्य यदोः च चरितं कथितम् अत्यंत धार्मिक अशा यदुराजाचेही चरित्र सांगितलेत तत्र अंशेन अवतीर्णस्य विष्णोः आता त्या यदुकुलात अंशाने अवतीर्ण झालेल्या विष्णूचे वीर्याणि शंसः पराक्रम आम्हाला सांगा. (२)

विश्वात्मा भूतभावनः भगवान् जगाचा आत्मा व जगाची उत्पत्ति करणार्‍या भगवंताने यदोः वंशे अवतीर्य यदूच्या कुळात अवतार घेऊन यानि चरितानि कृतवान् ज्या ज्या लीला केल्या तानि नः विस्तरात् वद त्या आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. (३)

पशुघ्नात् विना कः पुमान् निरपराधी प्राण्यांना मारणार्‍या मनुष्याशिवाय निवृत्ततर्षौः उपगीयमानात् ज्यांच्या सर्व कामना पूर्ण झालेल्या आहेत (अर्थात् अनासक्त झालेले आहेत) अशांकडून गायिल्या जाणार्‍या भवौषधात् श्रोत्रमनोभिरामात् जे संसाररूपी रोगाचे औषध असून कानांना व चित्ताला आनंदित करणार्‍या अशा उत्तमश्लोक गुणानुवादात् परमेश्वराच्या गुणकथांपासून विरज्येत ? कोण बरे पराङ्‌मुख होईल ? (४)

यत्प्लवाः मे पितामहाः ज्याला नौका समजणारे माझे आजोबा पांडव समरे युद्धात अमरंजयः देवांनाही जिंकणार्‍या देवव्रतादि अतिरथैः तिमिंगलः भीष्माचार्यादि अतिरथी हे जणू भयंकर मत्स्य असताही दुरत्ययं कौरवसैन्यसागरं त्यांच्यामुळे तरून जाण्यास अत्यंत कठीण झालेल्या कौरवसैन्यरूपी सागराला वत्सपदं कृत्वा अतरम् स्म वासराच्या पावलाने झालेल्या चिमुकल्या डबक्याल्या सह ओलांडावे तसे तरून गेले. (५)

यः च आत्तचक्रं आणि जो हातात चक्र धारण करणारा भगवान श्रीकृष्ण शरणं गतायां मे मातुः कुक्षिंगतः शरण गेलेल्या माझ्या आईच्या उदरात प्रवेश करून कुरुपांडवानां संताजबीजं कौरवपाण्डवांच्या पुढील वंशाचे बीज अशा द्रौण्यस्त्रविप्लुष्टं इदं मदंगं अश्वत्थाम्याच्या अस्त्राने दग्ध होऊ लागलेल्या ह्या माझ्या शरीराचा जुगोप रक्षण करता झाला. (६)

विद्वन् ! हे ज्ञानी शुकदेवा अखिलदेहभाजां अंतः बहिः च सर्व प्राण्यांच्या आंत आणि बाहेर पूरुषकालरूपैः अमृतं उत मृत्युं प्रयच्छतः क्रमाने पुरुष व काल या रूपाने राहून मोक्ष व मृत्यू देणार्‍या तस्य मायामनुष्यस्य वीर्याणि वदस्व मायेने मनुष्यरूप धारण करणार्‍या त्या परमेश्वराचे पराक्रम सांगा. (७)

त्वया संकर्षणः रामः तुम्ही आत्ताच संकर्षण नाव धारण करणारा बलराम रोहिण्याः तनयः प्रोक्तः रोहिणीचा मुलगा म्हणून सांगितलेत तेन देहांतरं विना देवक्याः गर्भसंबंधः कुतः प्राप्तः ? मग दुसरा देह प्राप्त झाल्याशिवाय त्याला देवकीचा गर्भसंदर्भ कसा प्राप्त झाला. (८)

भगवान् मुकुंदः षड्‌गुणैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण कस्मात् पितुः गेहात् व्रजं गतः कोणत्या कारणामुळे पित्याचे घर सोडून गोकुळात गेला सात्वतां पतिः यादवाधिपति श्रीकृष्ण ज्ञातिभिः सार्धं बांधवांसह क्व वासं कृतवान् ? कोणकोणत्या ठिकाणी वास करता झाला ? (९)

व्रजे मधुपुर्यां च वसन् केशवः गोकुळात व मथुरेत राहणार्‍या श्रीकृष्णाने किं अकरोत् ? तेथे काय काय केले ? मातुः भ्रातरं च आणि आईचा भाऊच असल्याने अतदर्हणं कंसं ज्याला मारणे योग्य नव्हे अशा कंसाला अद्धा किं अवधीत् ? खरेच त्याने का मारले ? (१०)

मानुषं देहं आश्रित्य मनुष्य देह धारण करून वृष्णिभिः सह यादवांसह यदुपुर्यां द्वारकेमध्ये कति वर्षाणि अवात्सीत् ? किती वर्षे राहिला प्रभोः पत्‍न्यः कति अभवत् ? त्या प्रभू श्रीकृष्णाच्या स्त्रिया तरी किती होत्या ? (११)

सर्वज्ञ मुने ! हे सर्वज्ञ मुने ! एतत् अन्यत् च सर्वं मी विचारलेले आणि आणखी इतर सर्व कृष्णचेष्टितं कृष्णाचे चरित्र श्रद्दधानाय मे ज्याविषयी श्रद्धा बाळगतो अशा मला विस्तृतं वक्तुं अर्हसि विस्ताराने सांगण्यास तूच योग्य आहेस. (१२)

एषा अतिदुःसहा क्षुत् ही सहन करण्यास अत्यंत कठीण अशी तहान त्य्रक्तोदं अपि किंचितहि अन्न सेवन न करता व उदकहि वर्ज्य केले असता त्वन्मुखांभोजच्युतं हरिकथामृतं पिबंतं मां तुझ्या मुखकमलातून निघालेले हरिकथारूप अमृत प्राशन करणार्‍या मला न बाधते तहानभूक बाधा करीत नाही. (१३)

भृगुनंदन ! हे शौनकमुने ! अथ सः भागवतप्रधानः भगवान् वैयासकिः नंतर भगवद्‌भक्तांत श्रेष्ठ असा तो व्यासपुत्र भगवान शुकाचार्य एवं साधुवादं निशम्य याप्रमाणे उत्तम प्रश्न ऐकून विष्णुरातं प्रत्यर्च्य परीक्षिताचे अभिनंदन करून कलिकल्मषघ्नं कृष्णचरितं व्याहर्तुं आरभत । कलियुगातील पापांचा नाश करणारे कृष्णाचे चरित्र सांगू लागला. (१४)

राजर्षिसत्तम ! हे राजश्रेष्ठा ! तव बुद्धिः सम्यक् व्यवसिता तुझ्या बुद्धीने चांगला निश्चय केला आहे यत् वासुदेवकथायां ते नैष्ठिकी रतिः जाता । कारण श्रीकृष्णाच्या कथेविषयी तुला श्रद्धायुक्त प्रीती उत्पन्न झाली आहे. (१५)

यथा तत्पादसलिलं जसे परमेश्वराच्या चरणकमलापासून निघालेले उदक तथा त्याप्रमाणेच वासुदेवकथाप्रश्नः श्रीकृष्णाच्या कथेविषयीचा प्रश्न वक्तारं पृच्छकं श्रोतृन् कथा सांगणार्‍या, त्याविषयी प्रश्न करणार्‍या व त्या ऐकणार्‍या त्रीन् पुरुषान् पुनाति हि अशा तिन्ही पुरुषांना पवित्र करतो. (१६)

भूमिः पृथ्वी दृप्तनृपव्याज मदोन्मत्त राजांच्या रूपाने उत्पन्न झालेल्या दैत्यानीकशतायुतैः दैत्यांच्या लक्षावधी सैन्यांच्या योगे भूरिभारेण आक्रांता अतिशय भाराने दडपून गेलेली अशी ब्रह्माणं शरणं ययौ त्यावरील उपायाच्या निमित्ताने ब्रह्मदेवाला शरण गेली (१७)

गौः भूत्वा तिने गाईचे रूप धारण केले खिन्ना अश्रुमुखी कष्टी व जिच्या मुखावरून अश्रुधारा वहात आहेत अशी करुणं क्रंदंती व दीन स्वराने आक्रोश करीत विभोः अंतिके उपस्थिता सा परमेश्वराजवळ गेलेल्या अशा तिने तस्मैः स्वं व्यसनं अवोचत त्या प्रभूला आपले दुःख कथन केले. (१८)

अथ तत् उपधार्य त्यानंतर तिचे म्हणणे ऐकून देवैः सह तया सह च इतर देवांसह आणि त्या पृथ्वीसह सत्रिनयनः ब्रह्मा तसे त्रिनयन शंकरांसह तो ब्रह्मदेव क्षिरपयोनिधेः तीरं जगाम् क्षीरसमुद्राच्या तीरावर गेला. (१९)

तत्र गत्वा त्याठिकाणी जाऊन समाहितः सः स्वस्थ अंतःकरणाने युक्त असा तो जगन्नाथं देवदेवं वृषाकपिं पुरुषं जगाचा स्वामी, सर्व देवांचा देव व सर्वांतर्यामी अशा प्रभूचे पुरुषसूक्तेन उपतस्थे समाधी लावून पुरुषसूक्ताने स्तवन करू लागला. (२०)

समाधौ समाधीमध्ये गगने समीरितां गिरं निशम्य, वेधां आकाशात झालेली वाणी ऐकून तो ब्रह्मदेव त्रिदशान् ह उवाच आश्चर्याने सर्वांना सांगू लागला अमराः ! हे देवहो ! पौरुषीं गां मे श्रृणुत परमेश्वराने आज्ञा करून सांगितलेले शब्द माझ्याकडून ऐका पुनः तथा एव आशु विधीयतां आणि त्वरित त्याप्रमाणे आचरण करा मा चिरं आणि अजिबात विलंब करू नका. (२१)

पुंसा धराज्वरः पुरा अवधृतः पृथ्वीचे दुःख परमेश्वराने आधीच जाणले आहे सः इश्वरेश्वरः तो परमेश्वर यावत् उर्व्याः भरं जोपर्यंत पृथ्वीचा भार स्वकालशक्त्या क्षपयन् आपल्या कालशक्तीच्या योगाने दूर करीत भुवि चरेत् पृथ्वार संचार करेल तावत् भवद्‌भिः अंशैः तोपर्यंत तुम्ही आपापल्या अंशाने यदुषु उपजन्यताम् यदुकुळात अवतरावे. (२२)

वसुदेवगृहे साक्षात् भगवान् परः पूरुषः जनिष्यते वसुदेवाच्या घरी प्रत्यक्ष षड्‌गुणैश्वर्यसंपन्न परमपुरुष अवतार घेईल तत्प्रियार्थं सुरस्त्रियः संभवंतु त्याच्या संतोषाकरता देवांच्या स्त्रियांनी जन्म घ्यावा. (२३)

वासुदेवकला सहस्रवदनः परमेश्वराचा अंश असा सहस्रमुखांचा देवं स्वराट् अनंतः प्रकाशमान व जगदाधार असा शेष हरेः प्रियचिकीर्षया अग्रतः भविता परमेश्वराचे प्रिय करण्याच्या इच्छेने प्रथम अवतार घेईल. (२४)

यया जगत् संमोहितं जिने सर्व जग मोहून टाकले आहे सा भगवती विष्णोः माया ती ऐश्वर्यसंपन्न विष्णूची योगमाया प्रभुणा आदिष्टा प्रभूने आज्ञा केलेली अंशेन अंशाने कार्यार्थे संभविष्यति त्याच कार्याकरिता जन्म घेईल. (२५)

प्रजापतिपतिः विभुः मरीच्यादिक प्रजापतींचा स्वामी ब्रह्मदेव इति अमरगणान् आदिश्य याप्रमाणे देवगणांना आज्ञा करून महीं च गीर्भिः आश्वास्य आणि पृथ्वीला आपल्या भाषणाने आश्वासन देऊन परमं स्वधाम ययौ श्रेष्ठ अशा आपल्या स्थानाला निघून गेला. (२६)

पुरा यदुपतिः शूरसेनः पूर्वी यादवांचा राजा शूरसेन मथुरां पुरीं आवसन् मथुरा नगरीत राहात माथुरान् शूरसेनान् च विषयान् बुभुजे मथुरेच्या जवळचे धेश व शूरसेन देश ह्या राज्यांचा उपभोग घेत असे. (२७)

ततः सा मथुरा तेव्हांपासून ती मथुरा सर्वयादवभूभुजां राजधानी अभूत् सर्व यादवराजांची राजधानी झाली यत्र भगवान् हरिः नित्यं सन्निहितः ज्या ठिकाणी भगवान परमेश्वराचा नित्य वास असतो. (२८)

तस्यां तु त्या मथुरेमध्ये तर कर्हिचित् एकदा कृतोद्वाहं शौरिः वसुदेवः नुकताच विवाह झालेला शूरसेनाचा पुत्र वसुदेव सूर्यया देवक्या सार्धं नवीन लग्न झालेली जी देवकी तिच्यासह प्रयाणे रथं आरुहत् आपल्या घरी जाण्याकरिता रथावर बसला. (२९)

रौक्मैः रथशतैः वृतः सोन्याने मढलेल्या शेकडो रथांनी वेष्टिलेला उग्रसेनसुतः कंसः उग्रसेनाचा मुलगा कंस याने स्वसुः प्रियचिकीर्षया आपल्या बहिणीला संतुष्ट करण्याच्या इच्छेने हयानां रश्मीम् जग्राह रथाच्या घोड्यांचे लगाम आपल्या हातात घेतले. (३०)

पारिबर्हं हेममालिनां गजानां चतुःशतं आंदण म्हणून सोन्याने अलंकृत चारशे हत्ती अश्वानां सार्धं अयुतं पंधरा हजार घोडे रथानां त्रिषटशतं अठराशे रथ सुकुमारीणां दासीनां च समलंकृते द्वे शते आणि सुंदर अलंकार घतलेल्या दोनशे सुंदर दासी दुहितृवत्सलः देवकः कन्येवर प्रेम करणार्‍या देवकाने देवक्याः याने देवकी जाऊ लागली असता दुहित्रे प्रादात् कन्येला दिले. (३१,३२)

तावत् वरवध्वोः प्रयाणप्रक्रमे त्यावेळी वधूवर जावयास निघाले असता शंखतूर्यमृदंगाः दुंदुभयः च शंख, तुतार्‍या, मृदंग व नगारे ही सर्व सुमंगलं समं नेदुः मंगलकारक वाद्ये एकाच वेळी वाजू लागली. (३३)

पथि प्रग्रहिणं कंसं आभाष्य तेवढ्यात रस्त्यात लगामाच्या दोर्‍या हातात घेतलेल्या कंसाला उद्देशून अशरीरवाक् आह एक आकाशवाणी झाली आणि म्हणाली, अबुध ! यां वहसे हे मूर्खा, तू जिला रथात वाहून नेत आहेस अस्याः अष्टमः गर्भः त्वां हंता हिचा आठवा गर्भ तुला ठार करणार आहे. (३४)

इति उक्तः या प्रमाणे बोलला गेलेला भोजानां कुलपांसनः सः पापः खलः आणि भोजकुलाला कलंक लावणारा तो पापी दुष्ट कंस भगिनीं हंतुं आरब्धं बहिणीला ठार मारण्यास सिद्ध झाला खड्गपाणिः तां कचे अग्रहीत् आणि हातात तलवार घेऊन त्याने तिचे केस धरले. (३५)

महाभागः वसुदेवः उदारबुद्धीचा वसुदेव तं जुगुप्सितकर्माणं नृशंसं त्या निंद्य कर्म करणार्‍या घातकी निरपत्रपं परिसांत्वयन् उवाच व निर्लजा कंसाला शांत करण्याकरता म्हणाला – (३६)

शूरैः श्लाघनीयगुणः शूर पुरुषांनी ज्याच्या गुणांची प्रशंसा करावी असा भोजयशस्करः सः भवान् भोजकुलाला कीर्तिमान करणारा तू उद्वाहपर्वणि या विवाहप्रसंगी स्त्रियं भगिनीं कथं हन्यात् ? स्त्रीजातीला व त्यातही भगिनीला कसा मारतोस ? (३७)

वीर ! हे पराक्रमी कंसा ! जन्मवतां मृत्युः देहेन सह जायते । जन्मास आलेल्या प्राण्याला मृत्यू हा देहाबरोबरच उत्पन्न होतो अद्य वा अब्दशतांते वा मग तो आज का शंभर वर्ष झाल्यानंतर काय प्राणिनां मृत्युः वै ध्रुवः । खरोखरच प्राण्यांना मृत्यू हा ठरलेलाच आहे. (३८)

कर्मानुगः अवशः देही कर्माच्या अनुषंगाने जाणारा पराधीन जीव देहे पंचत्वं आपन्ने देह मृत्यूप्रत प्राप्त झाला असताही देहांतरं अनुप्राप्य दुसर्‍या देहाप्रत प्राप्त होऊन प्राक्तनं वपुः त्यजते । पूर्वीचे शरीर टाकतो. (३९)

यथा व्रजन् पुरुषः जसा चालणारा पुरुष एकेन पदा तिष्ठन् एका पायाने उभा राहात एकेन एव गच्छति एका पायानेच पुढे जातो यथा तृणजलूका जशी गवतावरील जळू (एका पायानेच पुढे जाते) एवं कर्मगतिं गतः देही करोति । त्याचप्रमाणे कर्मानुसार मिळालेल्या गतीला प्राप्त झालेला जीव कार्य करतो. (४०)

यथा ज्या प्रमाणे दुष्टश्रुताभ्यां विषयाभ्यां पाहिलेल्या आणि ऐकिलेल्या विषयांच्या योगाने मनसा अनुचिन्तयन् मनाने चिंतन करणारा मनुष्य मनोरथेन अभिनिविष्टचेतनः त्या विषयांच्या इच्छेने मन भरून गेले आहे असा होत्साता तत् प्रपद्यते त्या त्या विषयाला मिळवितो स्वप्ने च आणि स्वप्नामध्ये अपस्मृतिः हि पूर्वीच्या स्थितीचा विसर पडला आहे असा ईदृशं किं अपि देहं पश्यति । त्या चिंतलेल्या विषयांसारखा काही विषय जीव पाहतो. (४१)

दैवचोदितं विकारात्मकं मनः दैवाने प्रेरणा केलेले विकारात्मक मन मायारचितेषु पंचसु गुणेषु मायेने रचलेल्या पाच भूतांपैकी यतः यतः धावति ज्या ज्या शरीराकडे धावते आप च आणि ज्या शरीराला जाऊन पोचते तत् प्रपद्यमानः असौ देही तेन सह जायते । ते बनणारा हा जीव त्या देहासह जन्मास येतो. (४२)

यथा एव अथवा ज्याप्रमाणे अदः ज्योतिः हा तेजोगोल उदकपार्थिवेषु पाण्याने भरलेल्या भांड्याने समीरवेगानुगतं विभाव्यते वायूच्या वाहण्याच्या वेगाना अनुसरून हालल्यासारखा दिसतो एवं असौ पुमान् त्याप्रमाणे हा पुरुष स्वामायारचितेषु गुणेषु आपल्या मायेने रचलेल्या विषयांच्या ठिकाणी रागानुगतः विमुह्यति । प्रेमाच्या स्वाधीन होऊन मोह पावतो. (४३)

तस्मात् तथाविधः सः म्हणून तशाप्रकारच्या त्या पुरुषाने आत्मनः क्षेमं अन्विच्छन् स्वतःच्या कल्याणाची इच्छा असल्यास कस्यचित् द्रोहं न आचरेत् कोणाचाही द्वेष करू नये वै खरोखर द्रोग्धुः परतः भयं अस्ति । द्वेष करणार्‍यालाच दुसर्‍याकडून भय असते. (४४)

एषा कृपणा तव अनुजा बाला ही दीन अशी तुझी धाकटी बहीण पुत्रिकोपमा अस्ति बाहुलीप्रमाणे आहे दीनवत्सलः त्वं दीनांवर दया करणारा तू इमां कल्याणीं हंतुं न अर्हसि । या निरपराध मुलीला मारणे तुझ्यासारख्याला योग्य नव्हे. (४५)

कौरव्य ! हे परीक्षिता ! एवं सामभिः भेदैः च याप्रमाणे सामाच्या व भेदाच्या गोष्टी सांगून बोध्यमानः अपि समजाविले असताही दारुणः सः अतिदुष्ट असा तो कंस पुरुषादान् अनुव्रतः राक्षसांचे अनुकरण करीत न न्यवर्तत । मारण्यापासून निवृत्त झाला नाही. (४६)

आनकदुंदुभिः वसुदेव (हे त्याचे दुसरे नाव) तस्य तं निर्बंधं ज्ञात्वा विचिंत्य त्या कंसाचा तो निर्धार जाणुन् आणि मनात विचार करून प्राप्तं कालं प्रतिव्योढुं प्राप्त झालेल्या प्रसंगाला टाळण्याकरिता तत्र इदं अन्वपद्यत । त्याने एक वेगळा उपाय योजायचे ठरविले. (४७)

बुद्धिमता त्याने विचार केला की बुद्धिमान पुरुषाने यावत् बुद्धिबलोदयं जोपर्यंत आपली बुद्धी व शक्ती चालेल तोपर्यंत मृत्युः अपोह्यः मृत्यू दूर सारला पाहिले एवं अपि यदि असौ न निवर्तेत इतके करून जर तो मृत्यू टळला नाही तर्हि तर देहिनः अपराधः न अस्ति । प्राण्याला क्काही दोष लागत नाही. (४८)

मृत्यवे पुत्रान् प्रदाय कंसरूपी प्रत्यक्ष मृत्यूला आपले पुत्र देऊन कृपणां इमां मोचये । दीन अशा हिला सोडवतो. यदि मे सुताः जायेरन् जर मुला मुलगे होतील मृत्युः वा न म्रियेत चेत् आणि प्रस्तुत प्रत्यक्ष हा मृत्यूरूपी कस जर मरणार नाही, (असे घडले) (४९)

वा अत्र विपर्ययः किं न स्यात् । वा यामध्ये काही उलटेसुलटे कशावरून होणार नाही धातुः गतिः दुरत्यया कारण दैवगति तर उल्लंघविणे कठीण आहे उपस्थितः मृत्युः निवर्तेत कदाचित् अगदी जवळ येऊन ठेपलेला मृत्यू टळेल निवृतः पुनः आपतेत् । वा टळलेला मृत्यू ताबडतोब प्राप्त होईल. (५०)

यथा अग्नेः दारुवियोगयोगयोः निमित्तं जसे अग्नीच्या काष्ठाशी होणार्‍या संयोगाचे व वियोगाचे कारण अदृष्टतः अन्यत् न अस्ति, दैवाशिवाय दुसरे नाही एवं हि अगदी त्याप्रमाणे जंतोः अपि शरीर संयोगवियोगहेतुः दुर्विभाव्यः । प्राण्याच्याही शरीराशी होणार्‍या संयोगाचे वा वियोगाचे कारण जाणण्यास कठीण आहे. (५१)

एवं याप्रमाणे यावत् आत्मदर्शनं विमृश्य, आपल्या ज्ञानाच्या मर्यादेनुसार विचार करून शौरिः वसुदेव (हे त्याचे आणखी एक नाव) तं पापं त्या पापी कंसाला बहुमानपुरःसरं वै पूजयामास । खरोखर मोठ्या मानाने स्तवन करता झाला. (५२)

दूयमानेन मनसा खरे तर दुःखित झालेल्या अंतःकरणाने प्रसन्नवदनांभोज सः पण आपले मुखकमळ प्रसन्न ठेऊन विहसन् हसत हसत निरपत्रपं नृशंसं निर्लज्ज व घातकी अशा कंसाला इदं अब्रवीत् । असे म्हणाला. (५३)

सौम्य ! हे शांत स्वभावाच्या कंसा सा अशरीरवाक् ती आकाशवाणी यत् हि आह जे काही बोलली त्याप्रमाणे अस्याः ते वै भयं न । हिच्यापासून तर तुला खरोखर भय नाही यतः ते भयं उत्थितं ज्याच्यापासून (म्हणजे हिच्या पुत्रापासून) तुला भय उपस्थित झाले आहे तान् अस्याः पुत्रान् समर्पयिष्ये । ते हिचे पुत्र मी तुला अर्पण करीन. (५४)

तत् वाक्यसारवित् कंसः वसुदेवाच्या त्या भाषणातील तात्पर्य जाणून कंस स्वसुः वधात् निववृते बहिणीच्या वधापासून परावृत्त झाला वसुदेवः अपि प्रीतः वसुदेवही संतुष्ट झाला तं प्रशस्य गृहं प्राविशत् । आणि त्याची प्रशंसा करून तो आपल्या घरी गेला. (५५)

अथ सर्वदेवतास्वरूपी देवकी काही काळ गेल्यानंतर सर्वदेवतारूपी देवकी काले उपावृते योग्य काळ आला असता अनुवत्सरं अष्टौ पुत्रान् कन्यां च प्रसुषुवे । प्रतिवर्षी एक अशा रीतीने आठ मुलांना व एका मुलीला प्रसविती झाली. (५६)

अनृतात् अतिविह्वलः सः आनकदुंदुभिः असत्य भाषणाने अत्यंत व्याकुल होणारा तो वसुदेव प्रथमजं कीर्तिमंतं पुत्रं प्रथम झालेला कीर्तिमान् नावाचा पुत्र कृच्छ्रेण कंसाय अर्पयामास । अति कष्टाने पण, कंसाला देता झाला. (५७)

साधूनां किं न दुःसहं ? सज्जनांना खरोखर दुःसह असे काय आहे ? विदुषां किं अपेक्षितं ? ज्ञानी पुरुषांना इच्छा ती कसली असणार ? कदर्याणां किं अकार्यं । स्वार्थ परायणता जेथे असते त्यांना कोणतेही कृत्य करताना त्यात काही गैर असे काही कधी वाटते का ? धृतात्मनां दुस्त्यजं किं ? आणि ज्यांनी इंद्रियांसहित मन जिंकले आहे त्यांना टाकण्याला (त्याग करण्याला) कठीण असे काही असे काय आहे ? (५८)

राजन् ! हे परीक्षित राजा ! कंस तत् समत्वं कंस च कंस वसुदेवाचा तो सरळपणा आणि सत्ये एव व्यवस्थितिं आणि सत्यावरील खरोखर निष्ठा दृष्ट्वा पाहून तुष्टमनाः प्रसहन् इदं अब्रवीत् । संतुष्ट झालेल्या असा तो म्हणाला, (५९)

अयं कुमारः प्रतियातु । हा तुझा मुलगा परत जाऊ दे हि, कारण अस्मात् मे भयं न अस्ति, ह्याच्यापासून मला भिती नाही युवयोः अष्टमात् गर्भात् मे मृत्युः किल विहितः । तुम्हां दोघांपासून होणार्‍या आठव्या गर्भापासून मला खरोखर मृत्यू ठरलेला आहे. (६०)

तथा इति । ठीक आहे असे म्हणून आनकदुंदुभिः सुतं आदाय ययौ, वसुदेव आपल्या मुलाला घेऊन परत गेला किंतु असतः अविजितात्मनः परंतु जो दुष्ट आहे आणि ज्याचे अंतःकरण स्वाधीन नाही अशा त्या कंसाचे तद्वाक्यं न अभ्यनंदत । ते म्हणने त्याला खरे वाटले नाही. (६१)

नारद कंसाची भेट घेऊन त्याला सांगतात -
व्रजे ये गोपा सन्ति, अरे कंसा गोकुळात जे गोप आहेत, याः च अमिषां योषितः, आणि या ज्या गोपांच्या स्त्रिया आहेत वसुदेवाद्याः च ये वृष्णयः, आणि वसुदेवादिक जे यादव आहेत देवक्याद्याः यदुस्त्रियः च, आणि देवकी आदिकरूप यादवांच्या ज्या स्त्रिया आहेत ये च कंसं अनुव्रताः बन्धुसुहृदः ज्ञातयः, आणि कंसाला अनुसरणारे बंधू, स्नेही आणि संबंधी लोक उभयोः वसुदेवनंदयोः अपि सन्ति । जे लोक वसुदेव व नंद या दोघांच्याही घरात आहेत. (६२, ६३)

हे भारत ! हे परीक्षित राजा ! ते सर्वे वै देवता प्रायाः ते सगळे बहुतेक सर्वच्या सर्व देव आहेत भूमेः भारायमाणानां दैत्यानां वधोद्यमं आणि भूमीला भारभूत अशा दैत्यांच्या नाशाविषयी चाललेला उद्योग एतत् अभ्येत्य, भगवान् नारदः हे सर्व भगवान नारद येऊन कंसाय शशंस । कंसाला सांगता झाला. (६४)

ऋषेः विनिर्गमे नारदऋषि निघून गेल्यावर कंसः यदून् सुरान् मत्वा, कंस यादवांना देव समजून विष्णुं च आणि विष्णूला स्ववधं प्रति आपला वध करण्याकरिता देवक्याः गर्भसंभूतं मत्वा - देवकीच्या गर्भात उत्पन्न झालेला मानून, (६५)

देवकीं वसुदेवं च देवकीला आणि वसुदेवाला निगडैः गृहे निगृह्य बेड्यांनी बंदिगृहात कोंडून ठेऊन तयोः जातं जातं पुत्रं अजनशंकया अहन् । त्यांच्या जन्मलेल्या प्रत्येक मुळाला हा विष्णुच आहे अशी शंका घेऊन मारू लागला. (६६)

हि प्रायशः भुवि खरोखर, या लोकी असुतृपः लुब्धाः राजानः आपल्या जीवाची तृप्ती करणारे लोभी असे राजे मातरं पितरं भ्रातृन् तथा सर्वान् सुहृदः च घ्नन्ति । (कशाचीही पर्वा न करता अगदी) आई, बाप, भाऊ तसेच इष्ट मित्र या सर्वांना मारतात. (६७)

आत्मानं प्राक् स्वतःला पूर्वजन्मीचा इह संजातं आणि या लोकी जन्मलेला हे महासुरं कालनेमिं हे जाणत असलेला तो महादैत्य कालनेमि विष्णूना हतं ज्याला विष्णूने मारले होते जानन् सः हे जाणत असलेला तो कंस यदुभिः व्यरुध्यत । यादवांचा विरओध करू लाअला. (६८)

यदु-भोज-अंधिकाधिपं उग्रसेनं पितरं च निगृह्य आणि यदु, भोज व अंधक या तिघांचा अधिपति असा जो आपला पिता उग्रसेन त्याला कारागृहात कोंडून महाबलः स्वयं शूरसेनान् बुभुजे । महासामर्थ्यवान कंस स्वतः शूरसेन देशाचे राज्य भोगू लागला. (६९)

अध्याय पहिला समाप्त

GO TOP