श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १० वा - अध्याय २ रा - अन्वयार्थ

भगवंतांचा गर्भ प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती -

प्रलंबबकचाणूर - प्रलंब, बक, चाणूर, - तृणावर्तमहाशनेः - तृणावर्त व खादाड अघासुर यांनी - मुष्टिकारिष्टद्विविद - प्रलंब, बक, चाणूर, - पूतनाकेशिधेनुकैः - प्रलंब, बक, चाणूर, पूतना, केशी व धेनुक यांनी. ॥ १ ॥

अन्यैः च बाणभौ‌मादिभिः - आणि दुसर्‍या बाणासुर, भौ‌मासुर आदिकरून - असुरभूपालैः - राक्षसी वृत्तींच्या राजांनी - युतः - युक्त असा - मागधसंश्रयः - मगधराजाचा आश्रय आहे ज्याला असा बली बलवान कंस - यदूनां कदनं चक्रे - यादवांचा संहार करिता झाला. ॥ २ ॥

पीडिताः ते - पीडित झालेले ते यादव - कुरुपांचालकेकयान् - कुरु, पांचाल, केकय, - शाल्वान् विदर्भान् निषधान् - शाल्व, विदर्भ, निषध, - विदेहान् कोसलान् अपि निविवशुः - विदेह आणि कोसल ह्या देशांत जाऊन राहिले. ॥ ३ ॥

एके ज्ञातयः - कोणी ज्ञातिबांधव - तं अनुरुंधानाः पर्युपासते - त्या कंसाच्या अनुरोधाने वागून त्याची सेवा करिते झाले - औग्रसेनिना - कंसाने - देवक्याः षट्‌सु बालेषु हतेषु - देवकीचे सहा पुत्र मारले असता.. ॥ ४ ॥

यं अनंतं प्रचक्षते - ज्याला अनंत असे म्हणतात - तत् वैष्णवं धाम - ते विष्णूचे तेज - देवक्याः हर्षशोकविवर्धनः - देवकीचा हर्ष व शोक वाढविणारा - सप्तमः गर्भः बभूव - असा सातवा गर्भ झाला. ॥ ५ ॥

विश्वात्मा भगवान् अपि - जगदात्मा परमेश्वरही - निजनाथानां यदूनां - आपणच ज्यांचे त्राते आहोत अशा यादवांना - कंसजं भयं विदित्वा - कंसापासून उत्पन्न झालेले भय जाणून - योगमायां समादिशत् - योगमायेला आज्ञा देता झाला. ॥ ६ ॥

भद्रे देवि - हे कल्याणकारिणी देवी - गोपगोभिः अलंकृतं व्रजं गच्छ - गोप व गाई ह्यांनी सुशोभित अशा गोकुळात जा - नंदगोकुले वसुदेवस्य भार्या रोहिणी आस्ते - नंदाच्या गोकुळात वसुदेवाची स्त्री रोहिणी आहे - अन्याः च (वसुदेवस्य भार्याः) - आणखीही दुसर्‍या वसुदेवाच्या स्त्रिया - कंससंविग्नाः विवरेषु वसंति हि - कंसाच्या भीतीमुळे तेथेच गुप्तस्थळी राहत आहेत. ॥ ७ ॥

देवक्याः जठरे स्थितं - देवकीच्या उदरातील - मामकं शेषाख्यं धाम - माझाच शेष नावाचा अंश अशा - गर्भं - गर्भाला - संनिकृष्य - काढून - रोहिण्याः उदरे संनिवेशय - रोहिणीच्या उदरात नेऊन ठेव. ॥ ८ ॥

शुभे - हे शुभकारिणी - अथ अहं - नंतर मी - अंशभागेन देवक्याः पुत्रतां प्राप्स्यामि - पूर्णरूपाने देवकीचा पुत्र होईन - त्वं नंदपत्न्या यशोदयां भविष्यसि - तूहि नंदाची पत्नी जी यशोदा तिच्या उदरी जन्म घेशील. ॥ ९ ॥

मनुष्याः - लोक - सर्वकामवरेश्वरीं - सर्व कामनारूप वर देण्यास समर्थ - सर्वकामवरप्रदां त्वां - व सर्व मनोरथरूप वर देणार्‍या अशा तुला - धूपोपहारबलिभिः अर्चिष्यन्ति - धूप, नैवेद्य व बलि ह्या सामग्रीच्या योगाने पूजितील. ॥ १० ॥

नराः च - आणि लोक - भुवि - पृथ्वीवर - दुर्गा इति भद्रकाली इति विजया वैष्णवी इति - दुर्गा, भद्रकाली, विजया व वैष्णवी अशी - तव नामधेयानि स्थानानि च कुर्वन्ति - तुला नावे देतील व तुझी मंदिरे बांधतील. ॥ ११ ॥

कुमुदा चंडिका कृष्णा - कुमुदा, चंडिका, कृष्णा, - माधवी कन्यका इति - माधवी, कन्यका अशी - माया नारायणी ईशानी - आणि माया, नारायणी, ईशानी, - शारदा अंबिका इति च - तशीच शारदा, अंबिका अशी. ॥ १२ ॥

भुवि - पृथ्वीवर - तं - त्या पुत्राला - गर्भसंकर्षणात् वै - खरोखर गर्भाचे आकर्षण केल्यामुळे - संकर्षणं प्राहुः - संकर्षण म्हणतील - लोकरमणात् रामः इति (आहुः) - लोकांना रमविणारा म्हणून राम म्हणतील - बलवदुच्छ्‌रयात बलं च (प्राहुः)- आणि अत्यंत बलवान असल्यामुळे बल असे म्हणतील. ॥ १३ ॥

एवं भगवता संदिष्टा (योगमाया) - याप्रमाणे परमेश्वराने आज्ञापिलेली योगमाया - तथा इति ओम् इति - तसे असो, ठीक आहे, असे म्हणून - तद्वचः प्रतिगृह्य - त्याच्या आज्ञेचा स्वीकार केल्यावर - (तं) परिक्रम्य गां गता - त्याला प्रदक्षिणा करून पृथ्वीवर गेली - तत् तथा अकरोत् - ते सर्व त्याप्रमाणे करिती झाली. ॥ १४ ॥

योगनिद्रया देवक्याः गर्भे - योगमायेने देवकीचा गर्भ - रोहिणीं प्रणीते - रोहिणीच्या उदराते नेला असता - पौराः - नागरिक लोक - अहो गर्भः विस्रंसितः इति विचुक्रुशुः - अहो गर्भ गळला असे बोलू लागले. ॥ १५ ॥

भक्तानां अभयंकरः भगवान् विश्वात्मा अपि - भक्तांना अभय देणारा जगाचा आत्मा परमेश्वरही - अंशभागेन आनकदुंदुभेः मनः आविवेश - पूर्णरूपाने वसुदेवाच्या मनात प्रवेश करिता झाला. १६ ॥

पौरुषं धाम बिभ्रत् - परमेश्वराची मूर्ती हृदयात धारण करणारा - यथा रविः (तथा) भ्राजमानः सः - जसा सूर्य त्याप्रमाणे प्रकाशणारा तो वसुदेव - भूतानां दुरासदः अतिदुर्धषः (च) संबभूव ह - खरोखर जवळ जाण्यास कठीण व अजिंक्य झाला. ॥ १७ ॥

ततः - त्यानंतर - देवीं - देवकी - शूरसुतेन समाहितं - वसुदेवाने स्थापिलेल्या - जगन्मंगलं - जगाचे मंगल करणारा, - सर्वात्मकं आत्मभूतं अच्युतांशं - सर्वांचा आत्मा व आत्मस्वरूप अशा परमेश्वराच्या पूर्ण स्वरूपाला - यथा काष्ठा आनंदकरं (चंद्रं दधाति तथा) - ज्याप्रमाणे पूर्व दिशा आनंदकारक चंद्रबिंबाला धारण करिते त्याप्रमाणे - मनस्तः दधार - हृदयात धारण करिती झाली. ॥ १८ ॥

सर्वजगन्निवासन्निवासभूता - सर्व जगाला आधारभूत अशा परमेश्वराचे निवासस्थान झालेली - भोजेंद्रगृहे अग्निशिखा इव - कोंडलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे - रुद्धा सा देवकी - कंसाच्या घरात कोंडलेली देवकी - यथा सती सरस्वती - ज्याप्रमाणे उत्तम विद्या - ज्ञानखले - ज्ञानाचा उपयोग न जाणणार्‍या जवळ असावी त्याप्रमाणे - नितरां न रेजे - उत्तमप्रकारे शोभली नाही. ॥ १९ ॥

तां अजितान्तरां प्रभया - हृदयस्थ ईश्वरामुळे आपल्या कांतीने - भवनं विरोचयंतीं - घराला प्रकाशमान करणार्‍या - शुचिस्मितां वीक्ष्य - त्या पवित्र हास्ययुक्त देवकीला पाहून - कंसः आह - कंस म्हणाला - एषः मे प्राणहरः - हा माझे प्राण हरण करणारा - हरिः गुहां श्रितः - हरि हिच्या उदरात राहिला आहे - यत्ः - कारण - इयं पुरा ईदृशी न (आसीत्) - ही पूर्वी अशी नव्हती. ॥ २० ॥

तस्मिन् - त्यावर - अद्य - आता - मे किं आशु करणीयं - मला कोणता उपाय लवकर करण्यासारखा आहे - यत् - कारण - अर्थतंत्रः (पुरुषः) विक्रमं न विहंति - कार्यसाधु पुरुष आपले शौर्य नष्ट करीत नाही - स्त्रियः स्वसुः गुरुमत्याः अयं वधः - स्त्री, बहिण व त्यात गरोदर अशा हिचा वध - यशः श्रियं आयुः (च) - कीर्ति, लक्ष्मी व आयुष्य ह्यांचा - अनुकालं हंति - तत्काल नाश होतो. ॥ २१ ॥

यः अत्यंतनृशंसितेन वर्तेत - जो मनुष्य अतिशय क्रूर कर्मे करून राहतो - सः एषः जीवन् संपरेत् - जिवंत असून तो हा मेल्यासारखा होय - मनुष्याः तं शपंति - असे समजून मनुष्य त्याला निंदतात - देहे मृते - देह मरण पावला असता - तनुमानिनः - देहाचा अभिमान बाळगणारे जे पापी लोक - अंधं तमः ध्रुवं गन्ता - त्यांच्या अंध नावाच्या घोर नरकात निश्चयेकरून जातो. ॥ २२ ॥

इति - याप्रमाणे विचार केल्यावर - प्रभुः घोरतमात् भावात् - कंस राजा अत्यंत घोर कर्मापासून - स्वयं संनिवृत्तः - स्वतःच परावृत्त झाला - हरेः वैरानुबंधकृत् (च) - आणि हरीचे शत्रुत्व निश्चयाने करणारा तो - तज्जन्म प्रतीक्षन् आस्ते - त्या परमेश्वराच्या जन्माची वाट पाहत राहिला. ॥ २३ ॥

आसीनः संविशन् तिष्ठन् - बसताना, निजताना, उभा असताना, - भुंजानः महीं पर्यटन् - भोजन करताना व पृथ्वीवर इकडे तिकडे फिरताना - हृषीकेशं चिंतयानः (सः) - परमेश्वराचे चिंतन करणारा तो कंस - जगत् तन्मयं अपश्यत् - जग परमेश्वरमय पाहता झाला. ॥ २४ ॥

ब्रह्मा भवः च - ब्रह्मदेव आणि शंकर - नारदादिभिः मुनिभिः - नारदादिक ऋषि - सानुचरैः देवैः (च) साकं - व परिवारयुक्त इंद्रादि देव यांसह - तत्र एत्य - त्याठिकाणी येऊन - वृषणं (मधुराभिः) गीर्भिः ऐडयन् - परमेश्वराला मधुर वाणीने स्तविते झाले. ॥ २५ ॥

सत्यव्रतं सत्यपरं - सत्यप्रतिज्ञ सत्य हेच ज्याला श्रेष्ठ आहे - त्रिसत्यं - व तिन्ही काळी ज्याचे रूप विद्यमान असते अशा - सत्यस्य योनिं सत्ये च निहितं - सत्याचे बीज अशा सत्यातच स्थापिलेल्या - सत्यस्य सत्यं - सत्याचेही सत्य - ऋतसत्यनेत्रं - आणि ऋत व सत्य यांचा प्रवर्तक अशा - सत्यात्मकं त्वां - सत्यमूर्ती तुला - शरणं प्रपन्नाः - शरण आलो आहो. ॥ २६ ॥

असौ (संसाररूपः) आदिवृक्षः - हा संसाररूपी पुरातन वृक्ष - हि - खरोखर - एकायनः - प्रकृति हा एकच आहे आश्रय ज्याचा असा; - द्विफलः - सुख व दुःख ही दोन फळे आहेत ज्याची असा; - त्रिमूलः - सत्त्व, रज, तम हे तीन गुण आहेत मुळे ज्याची असा; - चतूरसः - धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चार रसांनी युक्त; - पंचविधः - पांच ज्ञानेंद्रिये हे ज्याचे भेद आहेत असा; - षडात्मा - षड्‌विकार हेच आहेत स्वरूप ज्याचे असा; - सप्तत्वक् - सप्तधातू ज्याची त्वचा आहेत असा; - अष्टविटपः - पंच महाभूते , मन, बुद्धी व अहंकार ह्या आठ ज्याच्या शाखा, - नवाक्षः - नऊ द्वारे ही ज्याची छिद्रे, - दशच्छदः - दहा प्राण ही ज्याची पाने - द्विखग (आस्ते) - आणि जीव व ईश्वर हे दोन पक्षी ज्यावर आहेत असा आहे. ॥ २७ ॥

अस्य सतः - ह्या कार्यरूप संसारवृक्षाच्या - त्वं एव एकः प्रसूतिः - उत्पत्तीला कारणीभूत तूच एकटा आहेस - त्वं संनिधानं - तूच त्याचे विलीन होण्याचे ठिकाण - त्वं च अनुग्रहः - आणि तूच त्याचा पालनकर्ता आहेस - त्वन्मायया संवृतचेतसः - तुझ्या मायेने ज्याचे ज्ञान झाकून गेले आहे असे लोक - त्वां नाना पश्यंति - तुला भेदबुद्धीने पाहतात - ये विपश्चितः (ते) न - जे ज्ञानी आहेत ते तसे समजत नाहीत. ॥ २८ ॥

(त्वं) अवबोधः आत्मा (च सन्) - तू ज्ञानस्वरूप व सर्वांचा आत्मा असून - चराचरस्य लोकस्य क्षेमाय - स्थावरजंगमात्मक जगाच्या कल्याणाकरिता - सत्त्वोपपन्नानि - सत्त्वगुणयुक्त - सतां सुखावहानि - सज्जनांना सुख देणारी - खलानां अभद्राणि रूपाणि - दुष्टांना अहितकारक अशी रूपे - मुहुः बिभर्षि - वारंवार धारण करितोस. ॥ २९ ॥

अंबुजाक्ष - हे कमलनयना - अखिलसत्त्वधाम्नि त्वयि - सर्व सत्त्वगुणाची केवळ मूर्ती अशा तुझ्या ठिकाणी - समाधिना आवेशितचेतसा - समाधीच्या योगाने लाविलेल्या मनाने - महत्कृतेन त्वत्पादपोतेन - मोठयांनी आदरलेल्या अशा तुझ्या चरणरूपी नौकेने - एके - कित्येक - भवाब्धिं गोवत्सपद कुर्वंति - भवसमुद्राला वासराच्या पायाने झालेल्या डबक्याप्रमाणे लेखितात. ॥ ३० ॥

द्युमन् - हे स्वयंप्रकाशा - अदभ्रसौहृदाः ते - अतिशय प्रेमभावाने वागणारे ते पुरुष - भीमं सुदुस्तरं - भयंकर व तरून जाण्यास कठीण - भवार्णवं स्वयं समुत्तीर्य - असा भवसमुद्र स्वतः तरून - भवत्पदांभोरुहनावं अत्र निधाय - परमेश्वराच्या चरणकमलरूपी नावेला या लोकी ठेवून - (पारं) याताः - परतीराला जातात - भवान् सदनुग्रहः - सज्जनांवर तू कृपा करणारा आहेस. ॥ ३१ ॥

अरविंदाक्ष - हे कमलनयना - ये अन्ये - जे दुसरे - विमुक्तमानिनः - कित्येक आपल्याला मुक्त मानणारे - अनादृतयुष्मदंघ्रयः - व तुझ्या चरणकमलांचा अनादर करणारे - त्वयि अस्तभावात् अविशुद्धबुद्धयः - तुझ्या ठिकाणी श्रद्धा न ठेवल्यामुळे बुद्धिभ्रष्ट झालेले - कृच्छ्ररेण परं पदं आरुह्य - मोठया कष्टाने श्रेष्ठ पदवीला प्राप्त होऊन - ततः अधः पतंति - तेथून खाली पडतात. ॥ ३२ ॥

माधव - हे लक्ष्मीपते - तावकाः त्वयि बद्धसौहृदाः - तुझे म्हणविणारे व तुझ्या ठिकाणी दृढ प्रीती ठेवणारे जन - तथा मार्गात् क्वचित् न भ्रश्यन्ति - आपल्या मार्गापासून तसे कधीही भ्रष्ट होत नाहीत - प्रभो - हे समर्था - त्वया अभिगुप्ताः निर्भयाः ते - तू रक्षिलेले निर्भय असे ते जन - विनायकानकिपमूर्धसु विचरंति - विघ्नकर्त्याचे सैन्य बाळगणार्‍याच्या मस्तकावर पाय देत फिरतात. ॥ ३३ ॥

भवान् - तू - (जगतः) स्थितौ - जगाचे पालन करण्याकरिता - शरीरिणां श्रेयउपायनं - प्राण्यांना कल्याण प्राप्त करून देणारे - विशुद्धं सत्त्वं वपुः श्रयते - शुद्ध सत्त्वमय शरीर धारण करतोस - येन - ज्याच्यायोगे - जनः - लोकसमुदाय - वेदक्रियायोग - वेदांतील कर्मकांड, उपासना, - तपःसमाधिभिः - तपश्चर्या व समाधि - तव अर्हणं समीहते - यांनी तुझी पूजा करितो. ॥ ३४ ॥

धातः - हे जगत्कर्त्या - इदं सत्त्वं निजं (तव) न भवेत् चेत् - हे सत्त्वगुणात्मक शरीर तुला जर नसेल तर - अज्ञानभिदापमार्जनं - अज्ञान व द्वैत ही नाहीशी करणारे - विज्ञानं (न भवेत्) - विशिष्ट ज्ञान होणार नाही - च - आणि - यस्य येन वा गुणः प्रकाशते - ज्याचा बुद्धी आदिकरून गुण प्रकाशतो - (सः) भवान् - असा तू - गुणप्रकाशैः अनुमीयते - बाह्य पदार्थांच्या प्रकाशावरून अनुमानिला जातोस. ॥ ३५ ॥

देव - हे परमेश्वरा - साक्षिणः - सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहणारा - अनुमेयवर्त्मनः - व ज्याच्या ज्ञानाचा मार्ग अनुमानानेच कळण्याजोगा आहे - तस्य तव - अशा त्या तुझी - नामरूपे - नावे व रूपे - गुणजन्मकर्मभिः - तुझ्या गुणांनी, जन्मांनी व कर्मांनी - मनोवचोभ्यां - तसेच मनाने किंवा वाणीनेही - निरूपितव्ये न - निरूपण करिता येणारी नाहीत - अथापि हि - तथापि निश्चयेकरून - क्रियायां प्रतियन्ति - तुझ्या आराधनेने ती प्रतीतीस येतात. ॥ ३६ ॥

यः - जो - ते मंगलानि नामानि रूपाणि च श्रृण्वन् - तुझी मंगलकारक नावे व रूपे ऐकत, - गृणन् संस्मरयन् - गात व दुसर्‍याकडून ऐकवीत - चिंतयन् - आणि त्याचे चिंतन करीत - क्रियासु - पूजादि कर्मामध्ये - त्वच्चरणारविंदयोः - तुझ्या चरणकमळांच्या ठिकाणी - आविष्टचेताः (भवति) - मन लाविलेला असतो - भवाय न कल्पते - संसार चक्रात पडत नाही. ॥ ३७ ॥

हरे - हे ईश्वरा - दिष्टया - सुदैवाने - ईशितुः तव जन्मना - समर्थ अशा तुझ्या ह्या अवताराने - भवतः पदः - तुझे एक पाऊल - अस्याः भुवः भारः अपनीतः - अशी जी पृथ्वी तिचा भार दूर झाला - दिष्टया - सुदैवाने - गां - पृथ्वीला - सुशोभनैः - चांगल्या शोभणार्‍या - त्वत्पदकैः अंकितां - अशा तुझ्या कोमल पायांनी चिन्हित अशी - च - आणि - द्यां - स्वर्गाला - तव अनुकंपिताम् - तुझ्याकडून कृपा केलेली - द्रक्ष्याम - आम्ही पाहू. ॥ ३८ ॥

हे ईश - हे समर्था - अभयाश्रय - हे निर्भय असे आश्रयस्थान देणार्‍या - अभवस्य ते - जन्मरहित अशा तुझ्या - भवस्य कारणं - जन्माचे कारण - विनोदं विना बत न तर्कयाम - विनोदाशिवाय खरोखर तर्क करता येत नाही - यतः - कारण - आत्मनि त्वयि भवः - आत्मस्वरूपी अशा तुझ्या ठिकाणी जन्म, - निरोधः स्थितिः अपि - स्थिति आणि नाश ही देखील - अविद्यया कृताः - अज्ञानानेच कल्पिली आहेत. ॥ ३९ ॥

ईश - हे ईश्वरा - यथा - ज्याप्रमाणे - मत्स्याश्वकच्छप - मत्स्य, घोडा, कासव, - नृसिंहवराहहंस - नृसिंह, वराह, हंस, - राजन्यविप्रविबुधेषु - क्षत्रिय, ब्राह्मण व देव यांमध्ये - कृतावतारः त्वं - अवतार घेतलेला तू - नः त्रिभुवनं च पासि - आमचे आणि त्रैलोक्याचे रक्षण करितोस - (तथा) अधुना भुवः भारं हर - त्याप्रमाणे सांप्रत भूमीचा भार हरण कर - यदूत्तम ते वंदनं (अस्तु) - हे यादवश्रेष्ठा, तुला नमस्कार असो. ॥ ४० ॥

अंब - हे माते देवकी - दिष्टया - सुदैवाने - परः पुमान् साक्षात् भगवान् - पुरुषोत्तम असा साक्षात भगवान - नः भवाय - आमच्या कल्याणासाठी - अंशेन ते कुक्षिगतः - पूर्णरूपाने तुझ्या उदरात प्रविष्ट झाला आहे - मुमूर्षोः भोजपतेः - मरणाच्या जवळ आलेल्या - (तव) भयं मा भूत् - कंसापासून तुम्हाला भय नाही - तव आत्मजः यदूनां गोप्ता भविता - तुझा मुलगा यादवांचे रक्षण करणारा होईल. ॥ ४१ ॥

यद्‌रूपं अनिदं - ज्याचे रूप दृष्टीला अगोचर आहे अशा - (तं) पुरुषं - त्या परमात्म्याला - इति - याप्रमाणे - यथा (वत्) अभिष्टूय - योग्य रीतीने स्तवून - ब्रह्मेशानौ पुरोधाय - ब्रह्मदेव आणि शंकर यांना पुढे करून - देवाः दिवं ययुः - देव स्वर्गास गेले. ॥ ४२ ॥

अध्याय दुसरा समाप्त

GO TOP