श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १८ वा - अन्वयार्थ

ययाति - चरित्र -

यतिः ययातिः संयातिः आयतिः वियतिः कृतिः - यति, ययाति, संयाति, आयति, वियति व कृति- इमे षट् - हे सहा- देहिनः इंद्रियाणि इव नहुषस्य (पुत्राः) आसन् - प्राण्याला जशी सहा इंद्रिये तसे नहुषाचे पुत्र होते. ॥१॥

पित्रा दत्तं राज्यं - पित्याने दिलेले राज्य- तत्परिणामवित् यतिः - त्याचा परिणाम जाणणारा यति- न ऐच्छत् - इच्छिता झाला नाही- यत्र प्रविष्टः पुरुषः - ज्या ठिकाणी प्रविष्ट झालेला पुरुष- आत्मानं न अवबुध्यते - आत्म्याला ओळखीत नाही. ॥२॥

इंद्राण्याः घर्षणात् - इंद्राणीची अवहेलना केल्यामुळे- द्विजैः पितरि स्थानात् - ब्राह्मणांनी पित्याला स्थानापासून - भ्रंशिते अजगरत्वं वै प्रापिते - भ्रष्ट करून अजगरयोनीत दवडिले असता- ययातिः नृपः अभवत् - ययाति राजा झाला. ॥३॥

भ्राता - भाऊ ययाति- यवीयसः भ्रातृन् - आपल्या कनिष्ठ भावांना- चतसृषु दिक्षु आदिशत् - चार दिशांमध्ये योजिता झाला- काव्यस्य (च) वृषपर्वणः कृतदारः - शुक्राचार्य व वृषपर्वा यांच्या कन्या स्त्रिया केल्या आहेत ज्याने असा- उर्वीं जुगोप - पृथ्वीचे पालन करिता झाला. ॥४॥

भगवान् काव्यः ब्रह्मर्षिः (आसीत्) - भगवान शुक्राचार्य ब्रह्मर्षि होता- नाहुषः च क्षत्त्रबंधुः (आसीत्) - आणि ययाति क्षत्रिय होता- राजन्यविप्रयोः - क्षत्रिय व ब्राह्मण यांचा - प्रातिलोमिकः विवाहः कस्मात् (अभवत्) - उलटा विवाह कोणत्या कारणास्तव झाला. ॥५॥

एकदा - एके दिवशी- दानवेंद्रस्य शर्मिष्ठा नाम कन्यका - दैत्यराज वृषपर्व्याची शर्मिष्ठा नावाची मुलगी- सखीसहस्रसंयुक्ता - हजार सख्यांसह- गुरुपुत्र्या देवयान्या च (सहिता) - आणि गुरुकन्या देवयानीसह- भामिनी अबला - गर्विष्ठ स्त्री- पुष्पितद्रुमसंकुले - फुललेल्या वृक्षांनी भरलेल्या - कलगीतालिनलिनी - व मधुर गुंजारव करणारे भ्रमर आहेत ज्यावर अशा कमळांच्या सरोवराच्या - पुलिने व्यचरत् - वालुकामय तीरावर हिंडत होती ॥६-७॥

ताः कमललोचनाः कन्याः - त्या कमलाप्रमाणे नेत्र असणार्‍या कन्या- जलाशयं आसाद्य - सरोवरावर जाऊन- तीरे दुकूलानि न्यस्य - तीरावर आपली वस्त्रे ठेवून- मिथः सिंचतीः विजहरुः - एकमेकींच्या अंगावर पाणी उडवीत खेळत होत्या. ॥८॥

देव्या सह वृषस्थितं व्रजंतं गिरिशं वीक्ष्य - पार्वतीसह बैलावर बसून जाणार्‍या शंकराला पाहून- व्रीडिताः स्त्रियः - लज्जित झालेल्या त्या स्त्रिया- सरसः उत्तीर्य - सरोवरातून बाहेर येऊन- वासांसि पर्यधुः - वस्त्रे नेसल्या. ॥९॥

(आत्मनः वासः) अजानती शर्मिष्ठा - आपले वस्त्र कोणते हे न जाणणारी शर्मिष्ठा- गुरुपुत्र्याः वासः स्वीयं मत्वा - गुरुच्या कन्येचे वस्त्र आपले मानून- समव्ययत् - नेसली- देवयानी प्रकुपिता इदं अब्रवीत् - देवयानी क्रुद्ध होऊन असे म्हणाली. ॥१०॥

अहो अस्याः दास्याः असांप्रतं कर्म निरीक्षतां - अहो ह्या दासीचे अयोग्य कर्म पाहा- अध्वरे शुनी हविः हव - यज्ञात कुत्रीने हविर्भाग घ्यावा त्याप्रमाणे- अस्मद्धार्यं (वस्त्रं) धृतवती - आम्ही धारण करण्याचे वस्त्र ही नेसली. ॥११॥

यैः इदं तपसा सृष्टं - ज्यांनी हे जग तपश्चर्येने उत्पन्न केले- ये परस्य पुंसः मुखं - जे परमेश्वराचे मुख- यैः इह ज्योतिः धार्यते - ज्यांच्याकडून ह्या लोकी वेद धारण केले जातात- (यैः) शिवः पंथाः च दर्शितः - आणि ज्यांच्याकडून कल्याणाचा मार्ग दाखविला जातो. ॥१२॥

लोकनाथाः सुरेश्वराः - लोकांचे स्वामी मोठमोठे देव- यान् वंदन्ति उपत्तिष्ठंते (च) - ज्यांना वंदन करितात आणि स्तवितात- विश्वात्मा - विश्वाचा आत्मा, - पावनः श्रीनिकेतनः - अत्यंत पवित्र व लक्ष्मीचे निवासस्थान असा - भगवान् अपि (यान् वंदते) - परमेश्वरही ज्यांना वंदन करितो. ॥१३॥

तत्र अपि (ब्राह्मणेषु) वयं भृगवः (स्म) - अशा त्या ब्राह्मणांमध्येही आम्ही भृगुकुलात उत्पन्न झालेले आहोत- अस्याः पिता असुरः नः शिष्यः - हिचा पिता दैत्य वृषपर्वा आमचा शिष्य होय- (एवं स्थिते अपि) शूद्रः वेदं इव - असे असता शूद्र जसा वेद ग्रहण करितो त्याप्रमाणे- असती अस्मृद्धार्यं (वस्त्रं) धृतवती - ही नीच स्त्री आम्ही नेसावयाचे वस्त्र नेसली. ॥१४॥

एवं शपंती गुरुपुत्रीं - याप्रमाणे अपशब्द बोलणार्‍या गुरुकन्येला- रुषा धर्षिता उरङ्गी इव - क्रोधाने चवताळलेल्या नागिणीप्रमाणे- श्वसन्ति दष्टदच्छदा शर्मिष्ठा - फोफावणारी व दातओठ चावणारी शर्मिष्ठा- अभाषत् - बोलली. ॥१५॥

भिक्षुकि - अग भिकरडे- आत्मवृत्तं अविज्ञाय बहु कत्थसे - स्वतःचे चरित्र माहीत नसल्यामुळे तू फारच बडबड चालविली आहेस- यथा बलिभुजः - जसे कावळे त्याप्रमाणे- अस्माकं गृहान् न प्रतीक्षसे किम् - आमच्या घराची तू वाट पाहात नाहीस काय ? ॥१६॥

एवंविधैः सुपरुषैः (शब्दैः) क्षिप्त्वा - अशा प्रकारच्या अत्यंत कठोर भाषणांनी निंदा करून- मन्युना वासः आदाय - क्रोधाने वस्त्र ओढून घेऊन- सतिं आचार्यसुतां - साध्वी अशा गुरुकन्येला- शर्मिष्ठा कूपे प्राक्षिपत् - शर्मिष्ठा विहिरीत लोटिती झाली. ॥१७॥

तस्यां स्वगृहं गतायां - ती शर्मिष्ठा आपल्या घरी गेली असता- मृगयां चरन् जलार्थी ययातिः - मृगया करीत हिंडत असता पाण्याची इच्छा करणारा ययाति राजा- यदृच्छया कूपे प्राप्तः - सहजगत्या विहीरीजवळ आला- तां च ददर्श - आणि त्या शुक्रकन्येला पाहता झाला. ॥१८॥

विवाससे तस्यै स्वं उत्तरं वासः दत्त्वा - नग्न अशा तिला आपले पांघरलेले वस्त्र देऊन- दयापरः राजा - दयाशील राजा- पाणिना तस्याः पाणिं गृहीत्वा उज्जहार - आपल्या हाताने तिचा हात धरून वर काढिता झाला. ॥१९॥

औशनसी - शुक्राचार्याची कन्या- प्रेमनिर्भरया गिरा - प्रेमपूर्ण वाणीने- तं वीरं - त्या वीराला- आह - म्हणाली- परपुरंजय राजन् - हे शत्रूंची नगरे जिंकणार्‍या राजा- त्वया मे पाणिः गृहीतः - तू माझा हात स्वीकारिला आहेस. ॥२०॥

त्वया गृहीतायाः मे - तू स्वीकारिलेल्या माझा- हस्तग्राहः अपरः हि मा भूत् - हात ग्रहण करणारा दुसरा कोणी खरोखर होऊ नये- वीर - हे वीरा- एषः नौ संबंधः - हा आपला दोघांचा संबंध- ईशकृतः (अस्ति) पौरुषः न - परमेश्वराने केलेला होय, मनुष्याने नव्हे. ॥२१॥

यत् - ज्याअर्थी- कूपलग्नायाः मम - विहीरीत पडलेल्या मला- इदं भवतः दर्शनं (जातम्) - हे तुझे दर्शन झाले- महाभुज - हे महाबाहो- बार्हस्पत्यस्य कचस्य शापात् - बृहस्पतीचा मुलगा जो कच त्याच्या शापामुळे- मे हस्तग्राहः ब्राह्मणः न भविता - माझे पाणिग्रहण करणारा ब्राह्मण असणार नाही- यम् (अहं) पुरा अशपम् - ज्या कचाला मी पूर्वी शाप दिला. ॥२२॥

ययातिः - ययाति- आत्मनः अनभिप्रेतं - आपल्याला इष्ट न वाटणारे- तु दोवेपहृतं - परंतु दैवाने आणिलेले- (तत्) स्त्रीरत्नं - ते स्त्रीरत्न- दद्‌गतं (स्वं) मनः च बुद्‌ध्वा - आणि तिच्याकडे लागलेले आपले मन जाणून- तद्वतः प्रतिजग्राह - तिचे भाषण स्वीकारिता झाला. ॥२३॥

वीरे राजनि गते - तो पराक्रमी राजा गेला असता- रुदती सा - रडणारी ती- गृहं आगच्छत् - घरी गेली- ततः शर्मिष्ठया उक्तं कृतं (च) - नंतर शर्मिष्ठेने बोललेले व केलेले - सर्वं पितुः तत्र न्यवेदयत् स्म - सर्व कृत्य तेथे बापाला सांगती झाली. ॥२४॥

सः दुर्मनाः भगवान् काव्यः - तो खिन्न झालेला भगवान शुक्राचार्य- पौरोहित्यं विगर्हयन् - पुरोहितपणाची निंदा करीत- कापोतीं वृत्तिं च स्तुवन् - आणि उख्यछ्‌वृत्तीची स्तुति करीत- दुहित्रा पुरात् ययौ - कन्येसह नगरातून निघून गेला. ॥२५॥

वृषपर्वा - वृषपर्वा- प्रत्यनीकविवक्षितं आज्ञाय - शत्रुसैन्यातील देवांना हे हितावहच होईल असे ध्यानात येताच- तं गुरुं प्रसादयन् - त्या गुरुला प्रसन्न करण्यासाठी- पथि मूर्ध्ना पादयोः पतितः - मार्गामध्ये मस्तक पायांवर ठेवून नमस्कार करिता झाला. ॥२६॥

क्षणार्धमन्युः भगवान् भार्गवः - ज्याचा क्रोध अर्धा क्षण टिकणारा होता असा भगवान शुक्राचार्य- शिष्यं व्याचष्टे - शिष्य जो वृषपर्वा त्याला सांगता झाला- राजन् अस्याः कामः क्रियतां - हे राजा हिच्या इच्छेप्रमाणे करावे- इह एनां त्यक्तुं न उत्सहे - ह्या गोष्टीत हिला सोडण्याला मी समर्थ नाही. ॥२७॥

तथा इति अवस्थिते - बरे आहे असे वृषपर्व्याने म्हटले असता- देवयानी मनोगतं प्राह - देवयानी आपले मनोगत सांगती झाली- पित्रा दत्ता यतः यास्ये - पित्याने दिलेली मी जेथे जाईन- तत्र सानुगा (शर्मिष्ठा) मां अनुयातु - तेथे दासींसह शर्मिष्ठा माझ्या मागोमाग येवो. ॥२८॥

स्वानां तत्संकट - आपल्या आप्तांवरील शुक्राचार्यामुळे येणारे संकट- तदर्थस्य च गौरवं - व शुक्राचार्य गुरु झाला असता होणारा लाभ- वीक्ष्य - जाणून- स्त्रीसहस्रेण (सह) - हजारो स्त्रियांसह- दासवत् - दासीप्रमाणे- देवयानीं पर्यचरत् - देवयानीची सेवा करिती झाली. ॥२९॥

उशना - शुक्राचार्य- नाहुषाय - ययातीला- शर्मिष्ठया सह सुतां दत्त्वा - शर्मिष्ठेसह कन्या देऊन- तं आह - त्याला म्हणाला- राजन् शर्मिष्ठां कर्हिचित् तल्पे न आधाः - हे राजा शर्मिष्ठेला कधीही मंचकावर घेऊ नको. ॥३०॥

राजन् - हे परीक्षित राजा- सती शर्मिष्ठा - साध्वी शर्मिष्ठा- क्वचित् औशनसीं सप्रजां विलोक्य - कोणा एका प्रसंगी शुक्राचार्याच्या कन्येला लेकुरवाळी पाहून- ऋतौ - ऋतुकाळी- रहसि - एकांतात- तं एव सख्याः पतिं वव्रे - त्याच आपल्या सखीच्या पतीची प्रार्थना करिती झाली. ॥३१॥

राजपुत्र्या अर्थितः धर्मवित् (ययातिः) - नंतर राजकन्येने प्रार्थिलेला धर्मज्ञ ययाति राजा- शुक्रवचः स्मरन् (अपि) - शुक्राचे भाषण आठवीत असताही- अपत्ये (अर्थनां) धर्मं अवेक्ष्य - पुत्राकरिता केलेली प्रार्थना म्हणजे धर्म आहे असे जाणून- काले दिष्टं एव अभ्यपद्यत - योग्य काळी दैवाने घडून येणार्‍या गोष्टीचाच स्वीकार करिता झाला. ॥३२॥

देवयानी यदुं तुर्वसुं च एव व्यजायत - देवयानी यदु आणि तुर्वसु ह्या दोन मुलांनाच प्रसवती झाली- वार्षपर्वणी शर्मिष्ठा च - आणि वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा- द्रुह्युं च अनुं च पूरुं च (असूत) - द्रुह्यु, अनु आणि पूरु ह्या तीन मुलांना प्रसवती झाली. ॥३३॥

मानिनी देवयानी - मोठया मानाची अशी देवयानी- भर्तुः आसुयौः - आपल्या भर्त्यापासून दैत्यकन्येच्या पोटी - गर्भसंभवं विज्ञाय - गर्भाची उत्पत्ति जाणून- क्रोधविमूर्च्छिता पितुः गेहं ययौ - क्रोधाने जळफळत बापाच्या घरी गेली. ॥३४॥

कामी (ययातिः) प्रियां अनुगतः - विलासी ययाति राजा स्त्रीच्या मागोमाग गेला- वचोभिः उपमंत्रयन् (अपि) - गोड भाषणांनी विनवणी करीत असताही- पादसंवाहनादिभिः - पायधरणी आदि अनेक उपायांनीही - (तां) प्रसादयितुं न शेके - तिला प्रसन्न करू शकला नाही. ॥३५॥

कुपितः शुक्रः तं आह - रागावलेला शुक्र त्याला म्हणाला- स्त्रीकाम अनृतपुरुष मंद - हे स्त्रीलंपटा व खोटे बोलणार्‍या मूर्खा- नृणां विरूपकरणी - मनुष्यांना कुरूप करणारी - जरा त्वां विशतां - जरा तुझ्या अंगी शिरो. ॥३६॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मन्- ते दुहितरि अद्य कामानां - तुझ्या कन्येविषयी अजून माझ्या कामना - अतृप्तः अस्मि - खरोखर तृप्त झाल्या नाहीत- (तदा) शुक्रः उवाच - तेव्हा शुक्र म्हणाला- यः (ते जरा) अभिधास्यति - जो कोणी तुझी जरा घेईल- (तस्य) वयस - त्याच्या तारुण्याशी - यथाकामं (तां) व्यत्यस्यतां स्म - यथेच्छ ती पालटून घेतली जावो. ॥३७॥

इति लब्धव्यवस्थानः - याप्रमाणे मिळाली आहे सवड ज्याला असा राजा- ज्येष्ठ पुत्रं अवोचत - वडील मुलाला म्हणाला- तात यदो - हे बाळा यदो- मातामहकृतां इमां जरां प्रतीच्छ - तुझ्या आजोबांनी दिलेली ही जरा तू घे- निजं वयः (मह्यं) देहि - आपले तारुण्य मला दे- वत्स अहं विषयेषु न तृप्तः - बाळा, मी विषयांविषयी तृप्त झालो नाही- भवदीयेन वयसा - तुझ्या तारुण्याने- कतिपयाः समाः रंस्ये - काही वर्षे विलास भोगीन. ॥३८-३९॥

अंतरा प्राप्तया तव जरसा - मध्येच प्राप्त झालेल्या तुझ्या जरेसह- स्थातुं न उत्सहे - मी राहण्यास समर्थ नाही- ग्राम्यं सुखं अविदित्वा - वैषयिक सुख न अनुभविता- पुरुषः वैतृषं न एति - पुरुष विषयतृष्णेच्या शांतीप्रत जात नाही. ॥४०॥

भारत - हे परीक्षित राजा- पित्रा चोदितः तुर्वसुः द्रुह्युः च अनुः च - बापाने विचारिलेला तुर्वसु तसाच द्रुह्यु आणि अनु हे- अधर्मज्ञाः - धर्म न जाणणारे - अनित्ये (यौवनादिके) नित्यबुद्धयः - व तारुण्यादिक अनित्य वस्तूंच्या ठिकाणी नित्यबुद्धि ठेवणारे- प्रत्याचख्युः - नाकारिते झाले. ॥४१॥

(ततः) वयसा ऊनं - नंतर वयाने लहान - गुणाधिकं पूरुं तनयं - पण गुणाने श्रेष्ठ अशा पूरु नावाच्या मुलाला - (ययातिः) अपृच्छत् - (ययाति) विचारिता झाला- वत्स अग्ररजवत् त्वं - बाळा, वडील भावांप्रमाणे तू - मां प्रत्याख्यातुं न अर्हसि - माझी मागणी नाकारण्यास योग्य नाहीस. ॥४२॥

मनुष्येंद्र - हे राजा- कः पुमान् - कोणता मनुष्य- लोके - या लोकी- आत्मकृतः पितुः प्रतिकर्तुं क्षमः नु - आपल्या निर्माणकर्त्या पित्याचा उतराई होण्यास समर्थ आहे बरे- यस्य प्रसादात् (नरः) परं विंदते - ज्या पित्याच्या प्रसादाने पुरुष उत्तम पद मिळवितो. ॥४३॥

(यः पितुः) चिंतितं कुर्यात् (सः) उत्तमः - जो पुत्र बापाने मनात योजिलेले कार्य करितो तो उत्तम होय- (यः) प्रोक्तकारी (सः) तु मध्यमः - जो सांगितलेलेच करितो तो मध्यम- (यः) अश्रद्धया कुर्यात् (सः) अधमः - सांगूनही जो अश्रद्धेने करील, तो अधम- अकर्ता पितुः उच्चरितं (स्यात्) - मुळीच न करणारा तो बापाची विष्ठाच होय. ॥४४॥

इति (उक्त्वा) प्रमुदितः पूरुः - याप्रमाणे बोलून आनंदित झालेला पूरु- पितुः जरां प्रत्यगृह्‌णात् - बापाची जरा पालटून घेता झाला- नृप - हे परीक्षित राजा- सः अपि - तो ययातीही- तद्वयसा - त्या पूरुच्या तारुण्याने- यथावत् कामान् जुजुषे - यथेच्छ विषयभोग घेता झाला. ॥४५॥

अव्याहतेंद्रियः - ज्याची इंद्रिये आकुंठित आहेत, - (सः) सप्तद्वीपपतिः - असा तो सात द्वीपांचा अधिपति ययाति- प्रजाः पितृवत् सम्यक् पालयन् - प्रजेचे बापाप्रमाणे उत्तमप्रकारे पालन करीत- यथोपजोषं विषयान् जुजुषे - यथेच्छ विषयभोग भोगिता झाला. ॥४६॥

प्रेयसी देवयानी अपि - आवडती देवयानीही- अनुदिनं रहः - प्रतिदिवशी एकांतामध्ये- मनोवाग्देहवस्तुभिः - मन, वाणी, शरीर व जे पाहिजेत ते पदार्थ समर्पण करून - प्रेयसः (पत्युः) परमां प्रीतिं उवाह - आपल्या प्रिय पतीला संतोष देई. ॥४७॥

भूरिदक्षिणैः क्रतुभिः - ज्यात पुष्कळ दक्षिणा दिली जाते अशा यज्ञांनी- सर्वदेवमयं - सकल देवतारूपी- सर्ववेदमयं - सर्ववेदस्वरूपी- यज्ञपुरुषं देवं - यज्ञपुरुष अशा श्रीहरि देवाला- अयजत् - आराधिता झाला. ॥४८॥

यस्मिन् विरचितं इदं - ज्याच्या ठिकाणी रचिलेले हे जग- व्योम्नि जलदावलिः इव - आकाशात जशी मेघपंक्ति त्याप्रमाणे- नाना इव भाति - नानाप्रकारचे आहे असे भासते- स्वप्नमायामनोरथः - आणि स्वप्नातील मायारूपी मनोरथाप्रमाणे - (इव पश्चात्) न आभाति - मागून भासेनासेही होते. ॥४९॥

तं एव वासुदेवं गुहाशयं अणीयांसं - त्याच जगदाधार वासुदेव व फार सूक्ष्म अशा- प्रभुं नारायणं - समर्थ नारायणाला- हृदि विन्यस्य - हृदयात स्थापन करून- निराशीः (सः) - निरिच्छ असा तो ययाति- अयजत् - आराधिता झाला. ॥५०॥

एवं - याप्रमाणे- वर्षसहस्राणि - हजारो वर्षे- मनः षष्ठैः कदिंद्रियैः - सहावे आहे मन ज्यात अशा दुष्ट इंद्रियांनी- मनःसुखं विदधानः अपि - मनाला वाटेल ते सुख भोगणाराही- सार्वभौ‌मः (सः) - सार्वभौ‌म असा तो ययाति राजा- न अतृप्यत् - तृप्ति पावला नाही. ॥५१॥

नवमः स्कन्धः - अध्याय अठरावा समाप्त

GO TOP