श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ९ वा - अध्याय १९ वा - अन्वयार्थ

ययातीचा गृहत्याग -

स्रैणः सः - स्त्रीलंपट असा तो- इत्थं कामान् आचरन् - याप्रमाणे विषयोपभोग सेवन करीत असता- आत्मनः अपह्नवं बुध्‌द्वा - आत्म्याचा लोप जाणून- निर्विण्णः - खिन्न झालेला- प्रियायै एतां गाथां अगायत - स्त्रीला ही कथा सांगता झाला. ॥१॥

भार्गवि - हे भृगुकन्ये- भुवि मद्विधाचरितां - पृथ्वीवर माझ्यासारख्याच - अमूं गाथां शृणु - एकाने आचरिलेला हा इतिहास ऐक- वने वसन्तः धीराः - वनात राहणारे विवेकी पुरुष- ग्रामवासिनः - गावात राहणार्‍या - यस्य (आचरणं) अनुशोचंति - ज्याच्या आचरणाविषयी शोक करितात. ॥२॥

वने कश्चित् एकः बस्तः - अरण्यात कोणी एक बोकड- आत्मनः प्रियं अन्विच्छन् - आपले प्रिय शोधीत असता- स्वकर्मवशगां - आपल्या कर्माच्या अधीन होऊन - कूपे पतितां अजां ददर्श - विहिरीत पडलेल्या एका शेळीला पाहता झाला. ॥३॥

कामी बस्तः - तो कामी बोकड- तस्याः उद्धरणोपायं विचिंतयन् - तिला वर काढण्याच्या उपायाचा विचार करीत- विषाणाग्रेण रोधसी उद्धृत्य - शिंगाच्या टोकाने विहिरीच्या कडा उखळून- तीर्थं व्यधत्त - मार्ग करिता झाला. ॥ ४ ॥

सा सुश्रोणी - ती सुंदर शेळी- कूपात् उत्तीर्य - विहिरीतून बाहेर येऊन- तं एव किल चकमे - त्या बोकडालाच खरोखर वरण्यास इच्छिती झाली- पीवानं श्मश्रुलं प्रेष्ठं - तरुण, दाढीवाला अतिप्रिय, - मीढ्‌वांसं (तं) याभकोविदं - रेतसिंचन करणारा व रतिशास्त्रात निपुण अशा त्याला - तया वृतं समुद्वीक्ष्य - त्या शेळीने वरलेले पाहताच- बह्‌व्याः अजाः - दुसर्‍याही पुष्कळ शेळ्या- (तं एव) चकमिरे - त्यालाच वरण्यास इच्छित्या झाल्या- सः एकः अजवृषः - तो एकटा तरुण बोकड- बह्‌वीणां तासां रतिवर्धनः - त्या पुष्कळ शेळ्यांचा काम वाढविणारा- रेमे - रममाण झाला- कामग्रहग्रस्तः (सः) - कामरूपी पिशाचाने झपाटलेला तो - आत्मानं न अवबुध्यत - आत्मस्वरूपाला जाणता झाला नाही. ॥५-६॥

कूपसंविग्ना अजा - विहीरीत सापडलेली शेळी- तं एव अन्यया - त्याच बोकडाला दुसर्‍या एका - प्रेष्ठतमया रममाणं विलोक्य - अत्यंत प्रिय शेळीबरोबर रमताना पाहून- तत् बस्तकर्म न अमृष्यत् - ते बोकडाचे कृत्य सहन करती झाली नाही. ॥७॥

दुःखिता (सा) - दुःखित झालेली ती शेळी- सुहृद्रूपं दुर्हृदं - मित्रासारखा भासणारा पण अंतरी दुष्ट अशा- क्षणसौहृदं - क्षणिक प्रेम करणार्‍या - इंद्रियारामं - आणि इंद्रियसुखातच आनंद मानणार्‍या - (तं) कामिनं उत्सृज्य - त्या कामी बोकडाला सोडून- स्वामिनं ययौ - आपल्या धन्याजवळ गेली. ॥८॥

स्रैणः कृपणः सः अपि - स्त्रीलंपट असा तो दीन बोकडही- तां प्रसादयितुं - तिला प्रसन्न करण्याकरिता- इडविडाकारं कुर्वन् अनुगतः - बें बें शब्द करीत तिच्या मागोमाग गेला- पथि (तां) संधितुं न अशक्नोत् - मार्गात तिला समजावू शकला नाही. ॥९॥

तत्र अजास्वामी कश्चित् द्विजः - त्याठिकाणी शेळीचा स्वामी कोणी एक ब्राह्मण- रुषा तस्य लंबंतं वृषणं अच्छिनत् - रागाने त्याचा लोंबत असलेला वृषण तोडिता झाला- योगवित् (सः ब्राह्मणः) - पण जोडण्याचा उपाय माहीत असलेला तो ब्राह्मण - भूयः (अजायाः) अर्थाय - पुनः आपल्या शेळीचा कार्यभाग पूर्ण होण्यासाठी - संदधे - तो जोडिता झाला. ॥१०॥- भद्रे - हे कल्याणि- संबद्धवृषणः सः अपि - वृषण जोडलेला तो बोकडही- कूपलब्धया अजया - विहिरीत सापडलेल्या शेळीबरोबर- बहुतिथं हि कालं (रममाणः) अपि - पुष्कळ वर्षेपर्यंत रमत असताही- कामैः न तुष्यति - भोगांनी अजूनही खरोखर तृप्त होत नाही. ॥११॥

सुभ्रु - हे सुंदरी- तथा भवत्याः प्रेमयंत्रितः कृपणः अहं - त्याप्रमाणे तुझ्या मायेने मोहित झालेला दीन मी- आत्मानं न अभिजानामि - आत्मस्वरूपाला मुळीच जाणत नाही. ॥१२॥

पृथिव्यां यत् व्रीहियवं - पृथ्वीवर जे तांदूळ, गहू, - हिरण्यं पशवः स्त्रियः - सोने, पशु, स्त्रिया इत्यादि उपभोग्य पदार्थ आहेत- ते - ते- कामहतस्य पुंसः - भोगेच्छांनी व्याप्त झालेल्या पुरुषाच्या- मनःप्रीतिं न दुह्यंति - मनाला संतोष देऊ शकत नाहीत. ॥१३॥

कामानां उपभोगेन - विषयांचा उपभोग घेतल्याने- हविषा कृष्णवर्त्मा इव - तुपाने जसा अग्नि त्याप्रमाणे - कामः न शाम्यति - भोगेच्छा शांत होत नाही- भूयः एव अभिवर्धते - पुनः अधिकच वाढते. ॥१४॥

यदा सर्वभूतेषु - जेव्हा कोणत्याही प्राण्याविषयी- अमंगलं भावं न कुरुते - द्वेषादि अमंगल विचार धरीत नाही- तदा समदृष्टेः पुंसः - तेव्हा समदृष्टि ठेवणार्‍या पुरुषाला- सर्वाः दिशः सुखमयाः (भवन्ति) - सर्व दिशा सुखमय होतात. ॥१५॥

दुर्मतिभिः या दुस्त्यजा - दुष्ट बुद्धीच्या जनांकडून जी सोडली जाण्यास कठीण- जीर्यतः या न जीर्यते - मनुष्य क्षीण झाला तरी जी क्षीण होत नाही- तां दुःखनिवहां तृष्णां - त्या दुःखप्राप्तीचे मूळ अशा तृष्णेला- शर्मकामः द्रुतं त्यजेत् - कल्याणाची इच्छा करणार्‍याने लवकर सोडून द्यावे. ॥१६॥

मात्रा स्वस्रा वा दुहित्रा - आई, बहिण किंवा मुलगी यांच्याशी - विविक्तासनः न भवेत् - एकांती एका आसनावर बसू नये- बलवान इंद्रियग्रामः - बळकट असा इंद्रियसमुदाय- विद्वांसं अपि कर्षति - शहाण्या मनुष्यालाही ओढितो. ॥१७॥

तथापि - त्याचप्रमाणे- पूर्णं वर्षसहस्रं - पुरी सहस्र वर्षे- असकृत् विषयान् सेवतः मे - वारंवार विषयांचे सेवन करणार्‍या मला- अनुसवनं - वेळोवेळी- तेषु तृष्णा उपजायते - त्यांविषयी इच्छा उद्भवतेच. ॥१८॥

तस्मात् अहं एतां त्यक्त्वा - त्याकरिता मी ही विषयेच्छा सोडून- ब्रह्मणि मानसं आधाय - ब्रह्मरूपी मन ठेऊन- निर्द्वन्‌द्वः निरहंकारः (भूत्वा) - सुखदुःखादि द्वंद्वरहित व निरभिमान होऊन- मृगैः सह चरिष्यामि - वनातील पशूंसह फिरत राहीन. ॥१९॥

यः - जो- दृष्टं श्रुतं असत् बुध्‌द्वा - जे दिसते व ऐकू येते ते खोटे आहे असे जाणुन- तत्र संसृति आत्मनाशं च विद्वान् - त्यात जन्ममृत्यूचा फेरा व आत्मनाश आहे असे जाणणारा- (तत्) न अनुध्यायेत् न संविशेत् - त्या वस्तूंचे चिंतन व सेवन करणार नाही- आत्मदृक् - तो आत्मज्ञानी होय. ॥२०॥

जायां इति उक्त्वा - आपल्या स्त्रीला याप्रमाणे सांगून- विगतस्पृहः नाहुषः - निरिच्छ झालेला ययाति- पूरवे तदीयं वयः दत्त्वा - पूरूला त्याचे तारुण्य परत देऊन- तस्मात् स्वां जरसं आददे - त्यापासून आपली जरा घेता झाला. ॥२१॥

दक्षिणपूर्वस्यां दिशि द्रुह्युं - आग्नेयी दिशेकडे द्रुह्युला- दक्षिणतः यदुं - दक्षिणेकडे यदूला- प्रतीच्यां तुर्वसुं - पश्चिम दिशेकडे तुर्वसुला- उदीच्यां अनुं - उत्तर दिशेकडे अनूला- ईश्वरं चक्रे - राजा करिता झाला. ॥२२॥

विशां अर्हत्तमं पूरुं - प्रजांना अत्यंत पूज्य अशा पूरूला- सर्वस्य भूमंडलस्य (राज्ये) अभिषिच्य - सार्वभौ‌म पदाचा अभिषेक करून- तस्य वशे अग्रजान् स्थाप्य - वडील भावांना त्याच्या स्वाधीन करून- वनं ययौ - आपण वनाला गेला. ॥२३॥

वर्षपूगान् विषयेषु - तो पुष्कळ वर्षे विषयांचे - आसेवितं षड्‌वर्गं - सेवन करणार्‍या सहा इंद्रियांना- जातपक्षः द्विजः नीडं इव - पंख फुटलेला पक्षी घरटे सोडतो त्यापमाणे- सः - तो ययाति- क्षणेन (विषयेभ्यः) मुमुचे - एका क्षणात विषयांपासून मुक्त झाला. ॥२४॥

निर्मुक्तसमस्तसंगः - टाकिला आहे सर्व संग ज्याने - आत्मानुभूत्या - व आत्मानुभवाच्या योगाने - विधुतत्रिलिंगः सः - नष्ट झाला आहे त्रिगुणात्मक लिंगदेह ज्याचा असा तो ययाति राजा- तत्र परे अमले ब्रह्मणि - त्या श्रेष्ठ व निर्मल ब्रह्मरूप अशा - वासुदेवे प्रतीतः - वासुदेवाच्या ठिकाणी निष्ठावान झालेला असा- भागवतीं गतिं लेभे - भगवद्भक्तांच्या गतीला मिळविता झाला. ॥२५॥

देवयानी गाथां श्रुत्वा - देवयानी हा इतिहास ऐकून- स्त्रीपुंसोः स्नेहवैक्लव्यात् - स्त्री-पुरुषांच्या स्नेहपरवशतेबद्दल - परिहासं इव ईरितं - थटेटेसारखे केलेले भाषण- आत्मनः प्रस्तोभं मेने - स्वतःला मर्मभेदी आहे असे मानिती झाली. ॥२६॥

सा भार्गवी - ती भृगुकन्या देवयानी- प्रपायां गच्छतां इव - पाणपोईवर गेलेल्या प्रवाशांच्या भेटीप्रमाणे- ईश्वरतंत्राणां सुहृदां सन्निवासं - ईश्वराच्या स्वाधीन असलेल्या आप्तांचा सहवास- प्रभोः मायाविरचितं विज्ञाय - प्रभूच्या मायेने घडविलेला आहे असे जाणून- स्वप्नौपम्येन - स्वप्नाच्या दृष्टांताला अनुसरून - सर्वत्र संगं उत्सृज्य - सर्व पदार्थांवरील आसक्ति सोडून- कृष्णे मनः समावेश्य - कृष्णाच्या ठिकाणी मन लावून- आत्मनः लिंगं व्यधुनोत् - स्वतःच्या लिंगशरीराला सोडिती झाली. ॥२७-२८॥

भगवते वासुदेवाय - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न वासुदेव - वेधसे तुभ्यं नमः - व जगत्कर्ता अशा तुला नमस्कार असो- सर्वभूताधिवासाय - सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करणार्‍या, - शांताय बृहते नमः - शांत व ब्रह्मस्वरूप अशा तुला नमस्कार असो. ॥२९॥

नवमः स्कन्धः - अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP