|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १६ वा - अन्वयार्थ
परशुरामांकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्रांच्या वंशाची कथा - कुरुनंदन - हे परीक्षित राजा- पित्रा उपशिक्षितः रामः - पित्याने उपदेश केलेला राम- तथा इति (उक्त्वा) - बरे आहे असे म्हणून- संवत्सरं तीर्थयात्रां चरित्वा - एक वर्षापर्यंत तीर्थयात्रा करून- आश्रमं आव्रजत् - आश्रमाला आला. ॥१॥ कदाचित् रेणुका गंगायां याता (सती) - एके दिवशी रेणुका गंगेवर गेली असता- अप्सरोभिः क्रीडंतं - अप्सरांबरोबर क्रीडा करणार्या- पद्ममालिनं गंधर्वराजं अपश्यत् - गळ्यात कमळांच्या माळा घातलेल्या गंधर्वराजाला पाहती झाली. ॥२॥ उदकार्थं नदीं गता - पाणी आणण्याकरिता नदीवर गेलेली रेणुका- क्रीडंतं अवलोकयती - क्रीडा करणार्या गंधर्वराजाला पाहात- किंचित् चित्ररथस्पृहा - चित्ररथाविषयी जिला थोडा आभिलाष उत्पन्न झाला आहे अशी- होमवेलां न सस्मार - होमाची वेळ विसरली. ॥३॥ तं कालात्ययं विलोक्य - ते वेळेचे उल्लंघन पाहून- मुनेः शापविशंकिता (सा) - ऋषीच्या शापाची भीती बाळगणारी ती- आगत्य कलशं पु्राधाय - येऊन कलश पुढे ठेऊन- कृतांजलिः तस्थौ - हात जोडून उभी राहिली. ॥४॥ पत्न्याः व्यभिचारं ज्ञात्वा - पत्नीचा व्यभिचार जाणून- प्रकुपितः मुनिः अब्रवीत् - रागावलेला मुनी बोलला- पुत्रकाः एनां पापां घ्नत - मुलांनो, या पापिणीला मारा- इति उक्ताः ते (तथा) न चक्रिरे - असे सांगितलेले ते मुलगे याप्रमाणे न करते झाले. ॥५॥ पित्रा संचोदितः रामः - बापाने आज्ञा केलेला राम - मात्रा सह भ्रातृन् अवधीत् - आईसह भावांचा वध करिता झाला- सः - तो परशुराम- मुनेः तपसः समाधेः च सम्यक् प्रभावज्ञः (आसीत्) - ऋषीच्या तपाचा व योगविद्येचा प्रभाव चांगल्या प्रकारे जाणणारा होता. ॥६॥ प्रीतः सत्यवतीसुतः - संतुष्ट झालेला सत्यवतीचा मुलगा जमदग्नि- वरेण छंदयामास - वराच्या योगाने लोभविता झाला- रामः अपि - परशुरामहि- हतानां जीवितं वधे अस्मृतिं च वव्रे - मारलेले जिवंत व्हावे व त्यांना आपल्या वधाचा विसर पडावा असा वर मागता झाला. ॥७॥ ते - भाऊ व माता अशी ती- निद्रापाये इव - झोप पुरी झाल्याप्रमाणे - कुशलिनः अंजसा उत्तस्थुः - सुखरूपपणे तत्काळ उठले- (एवं) पितुः तपोवीर्यं विद्वान् रामः - याप्रमाणे बापाच्या तपाचा प्रभाव जाणणारा राम- सुहृद्वधं चक्रे - आप्तांचा वध करिता झाला. ॥८॥ - राजन् - हे राजा- रामवीर्यपराभूताः अर्जुनस्य सुताः - रामाच्या पराक्रमाने पराजय पावलेले सहस्रार्जुनाचे मुलगे- स्वपितुः वधं स्मरंतः - आपल्या बापाचे मरण स्मरणारे- क्वचित् शर्म न लेभिरे - केव्हाही सुख न मिळविते झाले. ॥९॥ एकदा - एके दिवशी- सभ्रातरि रामे आश्रमतः वनं गते - राम भावांसह आश्रमातून वनात गेला असता- वैरं सिसाधयिषवः - वैर साधू इच्छिणारे- लब्धछिद्राः (अर्जुनसुताः) उपागमन् - संधी मिळालेले सहस्रार्जुनाचे पुत्र तेथे आले. ॥१०॥ पापनिश्चयाः ते - पापबुद्धीचे ते- अग्न्यगारे आसीनं - होमशाळेत बसलेल्या- भगवति उत्तमश्लोके आवेशितधियं मुनिं दृष्ट्वा - पुण्यश्लोक भगवंताच्या ठिकाणी बुद्धि लाविलेल्या ऋषीला पाहून- जघ्नुः - मारिते झाले. ॥११॥ कृपणया राममात्रा याच्यमाना - दीन अशा रामाच्या आईकडून प्रार्थिलेले- अतिदारुणाः ते क्षत्त्रबंधवः - अत्यंत दुष्ट असे ते नीच क्षत्रिय- प्रसह्य (मुनेः) शिरः उत्कृत्य निन्युः - बलात्काराने मुनीचे शिर तोडून नेते झाले. ॥१२॥ दुःखशोकार्ता सती रेणुका - दुःखाने व शोकाने पीडिलेली ती साध्वी रेणुका- आत्मना आत्मानं निघ्नंती - आपणच आपले हृदय बडवून घेत- तात राम राम एहि - अरे रामा रामा ये- इति उच्चकैः विचुक्रोश - असे मोठयाने ओरडली. ॥१३॥ तत् - तेव्हा- दूरस्थः - दूर असलेला राम- हा राम इति आर्तवत् स्वनं उपश्रुत्य - हे रामा असा पीडितासारखा शब्द ऐकून- त्वरया आश्रमं आसाद्य - गडबडीने आश्रमात येऊन- पितरं हतं ददृशे - पित्याचा वध झाला आहे असे पाहता झाला. ॥१४॥ तद्दुःखरोषामर्षार्तिशोकवेगविमोहितः - ते दुःख, त्वेष, संताप, पीडा व शोक यांच्या आवेशाने मूर्च्छित झालेला राम- हा धर्मिष्ठ साधो तात - हे धर्मशील सदाचरणी पित्या- अस्मान् त्यक्त्वा भवान् स्वः गतः - आम्हाला टाकून तू स्वर्गाला गेलास काय ? ॥१५॥ एवं विलप्य - याप्रमाणे शोक करून- पितुः देहं भ्रातृषु निधाय - बापाचा देह भावांवर सोपवून- परशुं प्रगृह्य - परशु घेऊन- रामः स्वयं क्षत्त्रांताय मनः दधे - राम स्वतः क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय करिता झाला. ॥१६॥ राजन् - हे राजा- ब्रह्मघ्नविहतश्रियं माहिष्मतीं गत्वा - ब्रह्महत्या करणार्यांनी ज्याची शोभा नष्ट केली आहे अशा माहिष्मती नगरीला येऊन- तेषां शीर्षभिः - त्या क्षत्रियांच्या मस्तकांनी- सः मध्ये महागिरिं चक्रे - तो राम त्या नगरीमध्ये मोठा पर्वत रचिता झाला- तद्रक्तेन - त्यांच्या रक्ताने- अब्रह्मण्यभयावहां घोरां नदीं (चक्रे) - ब्रह्मद्वेषी लोकांना भय देणारी भयंकर नदी करिता झाला. ॥१७॥ क्षत्त्रे अमंगलकारिणि - क्षत्रिय अमंगल कृत्य करू लागले असता- पितृवधं हेतुं कृत्वा - बापाच्या वधाचे निमित्त करून- प्रभुः - समर्थ राम- त्रिःसप्तकृत्वः निःक्षत्रियां पृथ्वीं कृत्वा - एकवीस वेळा निःक्षत्रिय पृथ्वी करून- स्यमंतपंचके शोणितोदान् नव ह्लदान् चक्रे - स्यमंतपंचक ह्या नावाच्या प्रदेशात रक्ताने भरलेले नऊ डोह करिता झाला. ॥१८-१९॥ ततः - मग- पितुः शिरः आदाय - नंतर पित्यांचे मस्तक घेऊन- कायेन संधाय - धडाला जोडून- बर्हिषि - यज्ञात- सर्वदेवमयं आत्मानं देवं - सर्वदेवस्वरूपी परमात्मा ईश्वराला- मखैः अयजत् - यज्ञांनी पूजिता झाला. ॥२०॥ होत्रे प्राचीं दिशं - होत्याला पूर्व दिशा- ब्रह्मणे दक्षिणां दिशं - ब्रह्म्याला दक्षिण दिशा- अध्वर्यवे प्रतीचीं - अध्वर्यूला पश्चिम दिशा- उद्गात्रे (च) उत्तरान् दिशं ददौ - व उद्गात्याला उत्तर दिशा देता झाला. ॥२१॥ अन्येभ्यः अवांतरदिशः - इतरांना इतर दिशा- कश्यपाय च मध्यतः - आणि कश्यपाला मध्यप्रदेश- उपद्रष्ट्रे आर्यावर्तं - उपद्रष्टयाला आर्यावर्त देश- सदस्येभ्यः ततः परं (ददौ) - आणि उरलेला प्रदेश सभासदांना देता झाला. ॥२२॥- ततः च - आणि नंतर- ब्रह्मनद्यां सरस्वत्यां - ब्रह्मदेवाची नदी जी सरस्वती तीमध्ये- अवभृथस्नानविघूताशेषकिल्बिषः - अवभृथ स्नान केल्याने धुवून गेली आहेत सर्व पातके ज्याची असा राम- व्यभ्रः अंशुमान् इव रेजे - मेघरहित सूर्याप्रमाणे शोभू लागला. ॥२३॥ रामपूजितः सः जमदग्निः तु - रामाने पूजिलेला तो जमदग्नि तर- संज्ञानलक्षणं स्वदेशं लब्ध्वा - स्मृतिरूप असा आपला देह प्राप्त करून- ऋषीणां मण्डले सप्तमः अभूत् - ऋषिमंडळात सातवा ऋषि होऊन राहिला. ॥२४॥ राजन् - हे राजा- कमललोचनः जामदग्न्यः भगवान् रामः अपि - कमलाप्रमाणे नेत्र असलेला जमदग्नीचा पुत्र भगवान परशुरामही- आगामिनि अन्तरे - पुढे येणार्या मन्वंतरात- वै बृहत् वर्तयिष्यति - खरोखर वेद प्रवृत्त करील. ॥२५॥ न्यस्तदंडः प्रशांतधीः (सः) - टाकिला आहे दंड ज्याने असा शांत बुद्धि धारण केलेला तो राम- सिद्धगंधर्वचारणैः उपगीयमानचरितः - सिद्ध, गंधर्व व चारण ह्यांकडून गायिले जात आहे चरित्र ज्याचे असा- अद्य अपि महेंद्राद्रौ आस्ते - अजूनही महेंद्रपर्वतावर राहिला आहे. ॥२६॥ विश्वात्मा भगवान् ईश्वरः हरिः - सर्वांतर्यामी भगवान सर्वसमर्थ हरि- एवं भृगुषु अवतीर्य - याप्रमाणे भृगुकुलात अवतार घेऊन- बहुशः - पुष्कळ वेळा- भुवः परं भारं - भूमीला मोठा भारच अशा- नृपान् - राजांना- अहन् - मारिता झाला. ॥२७॥ गाधेः - गाधीपासून- समिद्धः पावकः इव महातेजाः (विश्वामित्रः) अभूत् - प्रदीप्त अग्निप्रमाणे अत्यंत तेजस्वी असा विश्वामित्र उत्पन्न झाला- यः - जो- तपसा क्षात्त्रं उत्सृज्य - तपश्चर्येने क्षत्रियपणा सोडून- ब्रह्मवर्चसं लेभे - ब्रह्मतेज मिळविता झाला. ॥२८॥ नृप - हे राजा- विश्वामित्रस्य च एकशतं एव पुत्राः आसन् - आणि विश्वामित्राला शंभरच मुलगे होते- मध्यमः तु मधुच्छन्दाः - त्यापैकी मधला तर मधुच्छंद नावाचा होता- ते मधुच्छंदसः एव - ते सगळेच मधुच्छंद नावाचे होते. ॥२९॥ च - आणखी- भार्गवं आजीगर्तं शुनःशेपं देवरातं पुत्रं कृत्वा - भृगुकुलात उत्पन्न झालेला अजीगर्ताचा पुत्र जो शुनःशेप त्याला देवांकडून मिळालेला पुत्र मानून- (विश्वामित्रः) सुतान् आह - विश्वामित्र आपल्या मुलांना म्हणाला- एषः ज्येष्ठः प्रकल्प्यतां - हा वडील भाऊ असे माना. ॥३०॥ यं वै हरिश्चंद्रमखे पुरुषः पशुः विक्रीतः - जो खरोखर हरिश्चंद्राच्या यज्ञात पुरुषरूप पशु विकत घेतलेला होता- (सः) प्रजेशादीन् देवान् स्तुत्वा - तो ब्रह्मदेवप्रमुख देवांना स्तवून- पाशबंधनात् मुमुचे - पाशबंधनापासून मुक्त झाला. ॥३१॥ यः तापसः - जो निराश्रित असा- देवयजने - देवांच्या पूजेच्या प्रसंगी- देवैः गाधिषु रातः - देवांनी गाधींना दिला- सः भार्गवः शुनःशेपः - तो भृगुकुलांत जन्मलेला शुनःशेप- देवरातः इति ख्यातः - देवरात नावाने प्रसिद्ध झाला. ॥३२॥ ये मधुच्छंदसः ज्येष्ठाः - जे मधुच्छंदांपेक्षा वडीलभाऊ होते- (ते) तत् कुशलं न मेनिरे - ते ते बरे मानिते झाले नाहीत- क्रद्धुः मुनिः तान् अशपत् - क्रुद्ध झालेला ऋषि त्यांना शापिता झाला- दुर्जनाः म्लेच्छाः भवत - अहो दुष्टांनो, तुम्ही म्लेच्छ व्हा. ॥३३॥ ततः सः मधुच्छंदाः - नंतर तो मधुच्छंद- पंचाशता सार्धं ह उवाच - पन्नास भावांसह म्हणाला- भवान् नः यत् संजानीते - तू आम्हाला जे सांगतोस- तस्मिन् वयं तिष्ठामहे - तसे आम्ही वागू. ॥३४॥ ते मंत्रदृशं ज्येष्ठं चक्रुः - ते मंत्रद्रष्टया शुनःशेपाला ज्येष्ठ भाऊ करिते झाले- (ऊचुः च) वयं हि त्वां अन्वञ्चः स्म - आणि म्हणाले आम्ही खरोखर तुला अनुसरणारे आहो- विश्वामित्रः (तान्) सुतान् आह - विश्वामित्र मुलांना म्हणाला- वीरवंतः भविष्यथ - तुम्ही पराक्रमी पुत्र उत्पन्न करणारे व्हाल- ये - जे तुम्ही- मे मानं अनुगृह्णंतः - माझा मोठेपणा राखून- मां वीरवंतं अकर्त - मला पुत्रवान करिते झालांत. ॥३५॥ कुशिकाः - कुशिकांनो- एषः देवरातः वः वीरः (अस्ति) - हा देवरात तुमच्यात पराक्रमी आहे- तं अन्वित - त्याला अनुसरा- (विश्वामित्रस्य) अन्ये च अष्टकहारीतजयक्रतुमदादयः (सुताः आसन्) - विश्वामित्राला आणखीही अष्टक, हारीत, जय, ऋतुमत् इत्यादिक मुलगे होते. ॥३६॥ एवं - याप्रमाणे- कौशिकगोत्रं - कौशिकगोत्र- विश्वामित्रैः पृथग्विधं - विश्वामित्राच्या मुलांपासून नानाप्रकारचे झालेले- प्रवरांतरं आपन्नं - दुसर्या प्रवराला प्राप्त झाले- तत् हि च एवं प्रकल्पितं - आणि ते खरोखर ह्याप्रमाणे सांगितले आहे. ॥३७॥ नवमः स्कन्धः - अध्याय सोळावा समाप्त |