|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय १५ वा - अन्वयार्थ
ऋचीक, जमदग्नी आणि परशुराम यांचे चरित्र - नृप - हे राजा- ऐलस्य च - आणि पुरूरव्याला - उर्वशीगर्भात् - उर्वशीच्या गर्भापासून - आयुः श्रुतायुः सत्यायुः रयः विजयः अथ जयः (इति) - आयु, श्रुतायु, सत्यायु, रय, विजय आणि जय असे - षट् आत्मजाः आसन् - सहा पुत्र झाले. ॥१॥ श्रुतायोः पुत्रः वसुमान् - श्रुतायुचा पुत्र वसुमान - सत्यायोः च श्रुतंजयः - आणि सत्यायुचा श्रुतंजय - रयस्य तनयः एकः - रयाचा मुलगा एक नावाचा होता - जयस्य च तनयः अमितः - आणि जयाचा मुलगा अमित. ॥२॥ विजयस्य तु भीमः - आणि विजयाचा मुलगा तर भीम - अथ (भीमस्य) काञ्चनः - आणि भीमाचा काञ्चन - ततः होत्रकः - त्यापासून होत्रक - तस्य सुतः जह्नुः - त्याचा मुलगा जह्नु - यः गंगां गंडूषीकृत्य अपिबत् - जो गंगेला एक चूळ करून पिता झाला - जह्नोः तु पूरुः - आणि जह्नुचा पुत्र पुरु - तत्पुत्रः च बलाकः - आणि त्याचा मुलगा बलाक - (बलाकस्य) आत्मजः अजकः - बलाकाचा पुत्र अजक. ॥३॥ तत् कुशः (अभवत्) - त्यापासून कुश झाला - कुशस्य कुशांबूः मूर्तयः वसुः कुशनाभः च (इति) चत्वारः (पुत्राः आसन्) - कुशाला कुशांबू, मूर्तय, वसु आणि कुशनाभ असे चार मुलगे झाले - कुशांबुजः गाधिः आसीत् - कुशांबूचा पुत्र गाधि नामक होता. ॥४॥ तस्य कन्यां सत्यवतीं ऋचीकः द्विजः अयाचत - त्या गाधीची कन्या सत्यवती हिला ऋचीक ब्राह्मण मागता झाला - वरं विसद्दशं मत्वा - हा वर अयोग्य मानून - गाधिः भार्गवं अब्रवीत् - गाधि भार्गवाला म्हणाला. ॥५॥ (यतः) वयं कुशिकाः (ततः) - ज्या कारणास्तव आम्ही कुशिककुलात उत्पन्न झालेले आहोत त्या कारणास्तव - एकतः श्यामकर्णानां चंद्रवर्चसां हयानां सहस्रं - ज्यांचा एक कान श्याम आहे असे चंद्रासारखी कांति असणारे एक हजार घोडे - कन्यायाः शुल्कं दीयतां - कन्येचे मूल्य म्हणून द्यावे. ॥६॥ इति उक्तः सः - असे सांगितलेला तो ऋचीक - तन्मतं ज्ञात्वा - त्या गाधीचे मत जाणून - वरुणान्तिकं गतः - वरुणाच्या जवळ गेला - तान् अश्वान् आनीय दत्वा च - आणि ते घोडे आणून देऊन - वराननां उपयेमे - त्या सुंदर कन्येला वरिता झाला. ॥७॥ सः ऋषिः - तो ऋषि - पत्न्या श्वश्र्वा च अपत्यकाम्यया प्रार्थितः - पत्नीकडून व सासूकडून अपत्याच्या इच्छेने प्रार्थिला गेला - उभयैः मंत्रैः चरुं श्रपयित्वा - दोन्ही प्रकारच्या मंत्रांनी दोन चरू शिजवून - मुनिः स्नातुं गतः - ऋषि स्नानाला गेला. ॥८॥ तावत् - इतक्यात - सत्यवती - सत्यवती - तया मात्रा - त्या मातेने - श्रेष्ठं मत्वा - श्रेष्ठ समजून - स्वचरूं याचिता सती - स्वतःचा चरु मागितला असता - (तं) मात्रे अयच्छत् - तो आईला देती झाली - मातुः (चरुं) स्वयं अदत् - आणि मातेचा चरु स्वतः भक्षिती झाली. ॥९॥ तत् विज्ञाय - ते जाणून - ऋषिः पत्नी प्राह - ऋषि स्त्रीला म्हणाला - कष्टं अकारषीः - तू फार दुःखदायक गोष्ट केलीस - ते पुत्रः - तुझा पुत्र - घोरः दंडघरः (स्यात्) - भयंकर दंडधारी होईल - भ्राता च ब्रह्मवित्तमः (स्यात्) - आणि तुझा भाऊ ब्रह्मज्ञानी होईल. ॥१०॥ एवं मा भूत इति सत्यवत्या प्रसादितः भार्गवः - याप्रमाणे न व्हावे म्हणून सत्यवतीने कृपेसाठी प्रार्थिलेला भार्गव ऋषि - अथ तर्हि पौत्रः (घोरः) भवेत् (इति उवाच) - बरे तर तुझा नातू तसा भयंकर होईल असे म्हणाला - ततः (सत्यवत्यां) जमदग्निः अभवत् - नंतर त्या सत्यवतीला जमदग्नि पुत्र झाला. ॥११॥ सा च - आणि ती सत्यवती - महापुण्या लोकपावनी कौशिकी अभूत् - मोठी पवित्र व लोकांना पवित्र करणारी कौशिकी नदी झाली - जमदग्निः वै - जमदग्नि खरोखर - यां रेणोः सुतां रेणुकां उवाह - ज्या रेणूच्या रेणुका नामक कन्येला वरिता झाला. ॥१२॥ तस्यां वै - तिच्या पोटी खरोखर - भार्गवऋषेः - भार्गव मुनीपासून - वसुमदादय सुताः (अभवन्) - वसुमान आदिकरून पुत्र झाले - एतेषां यवीयान् - त्यात धाकटा - रामः इति अभि विश्रुतः जज्ञे - राम ह्या नावाने विख्यात झाला. ॥१३॥ यं - ज्याला - हैहयानां कुलांतकं वसुदेवांशं आहुः - हैहयकुलाचा नाश करणारा व वासुदेवाचा अंश म्हणतात - यः - जो - त्रिःसप्तकृत्वः - एकवीस वेळा - इमां महीं - ह्या पृथ्वीला - निःक्षत्त्रियां चक्रे - क्षत्रियरहित करता झाला. ॥१४॥ फल्गुनि अंहसि कृते अपि - अल्प अपराध केला असताही - अब्रह्मण्यं दुष्टं क्षत्त्रं अहन् - ब्राह्मणांचा द्वेष करणार्या दुष्ट क्षत्रियाना मारिता झाला. ॥१५॥ अजितात्मभिः राजन्यैः - ज्यांनी मन जिंकिले नाही अशा क्षत्रियांनी - भगवतः किं तन् अंहःकृतं - परमेश्वराचा कोणता अपराध केला होता - येन अभीक्ष्णशः क्षत्त्रियाणां कुलं नष्टं - ज्या योगाने वारंवार क्षत्रियांचे कुल नष्ट केले. ॥१६॥ हैहयानां अधिपतिः - हैहयांचा स्वामी - क्षत्त्रियर्षभः अर्जुनः - क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ असा अर्जुन - परिकर्मभिः नारायणांशं दत्तं आराध्य - पूजोपचारांनी नारायणाचा अंश जो दत्त, त्याला प्रसन्न करून. ॥१७॥ दशशतं बाहून् - हजार हात - अरातिषु दुर्धर्षत्वं - शत्रूपासून अजिंक्यपण - अव्याहतेंद्रि यौजःश्रीतेजोवीर्ययशोबलं - नित्य टिकणारा इंद्रियांचा उत्साह, संपत्ति, तेज, पराक्रम, यश व बल - लेभे - मिळविता झाला. ॥१८॥ यत्र अणिमादयः गुणः - ज्यामध्ये अत्यंत सूक्ष्म स्वरूप घेण्याची शक्ति आदि करून गुण आहेत - तत् योगेश्वरत्वं ऐश्वर्यं (लेभे) - तसे योगसामर्थ्यरूप ऐश्वर्य मिळविता झाला - यथा पवनः - वायूप्रमाणे - लोकेषु अव्याहतगतिः चचार - लोकांमध्ये अकुंठित गतीने संचार करिता झाला. ॥१९॥ वैजयन्तीं स्रजं बिभ्रत् - वैजयन्तीमाला धारण करणारा - मदोत्कटः - मदोन्मत्त असा - सः - तो - रेवाम्भसि स्त्रीरत्नैः आवृतः क्रीडन् - नर्मदेच्या उदकात सुंदर स्त्रियांसह क्रीडा करीत असता - भुजैः सरितं रुरोध - बाहूंनी नदी अडविता झाला. ॥२०॥ वीरमानी दशाननः - स्वतःला पराक्रमी समजणारा रावण - प्रतिस्रोतःसरिज्जलैः स्वशिबिरं विप्लावितं (दृष्ट्वा) - नदीच्या उलटया प्रवाहाने आपले शिबिर बुडालेले पाहून - तस्य तद्वीर्यं न अमृश्यत् - त्या अर्जुनाचा तो पराक्रम सहन करिता झाला नाही. ॥२१॥ येन - ज्या अर्जुनाकडून - कृतकिल्बिषः (रावण) - अपराध केला गेलेला रावण - स्त्रीणां समक्षं - स्त्रियांच्या समक्ष - यथाकपिः - वानराप्रमाणे - लीलया गृहीतः - सहज धरिला गेला - माहिष्मत्यां संनिरुद्धः (पश्चात्) मुक्तः - माहिष्णती नगरीत कोंडिला गेला व मागून सोडिला गेला. ॥२२॥ सः तु एकदा - एकदा तर तो अर्जुन - विपिने वने मृगयां विचरन् - गहन अरण्यात शिकारीसाठी फिरत असता - यदृच्छया जमदग्नेः आश्रमपदं उपाविशत् - सहजगत्या जमदग्नीच्या आश्रमात प्रवेश करिता झाला. ॥२३॥ तपोघनः सः मुनिः - तप हेच ज्याचे धन आहे असा तो ऋषि - हविष्मत्या - कामधेनूच्या साहाय्याने - ससैन्यामात्यवाहाय तस्मै नरदेवाय - सैन्य, प्रधान व वाहने यासह त्या राजाला - अर्हणं आहरत् - पूजा अर्पिता झाला. ॥२४॥ सहैहयः सः वीरः - हैहयांसह तो पराक्रमी अर्जुन - तत्र आत्मैश्वर्यातिशायिनं तत् दृष्ट्वा - त्याठिकाणी आपल्या ऐश्वर्याला मागे टाकणारे ते वैभव पाहून - अग्निहोत्र्यां साभिलाषः - कामधेनूविषयी इच्छा करणारा असा - तत् न आद्रियत - ते स्वीकारिता झाला नाही. ॥२५॥ दर्पात् - गर्वाने - नरान् - दूतांना - ऋषेः हविर्धानीं हर्तुं अचोदयत् - ऋषीची कामधेनु हरण करण्याविषयी आज्ञा देता झाला - ते च - आणि ते दूत - सवत्सां क्रंदंतीं (धेनुं) बलात् माहिष्मतीं निन्युः - आक्रोश करणार्या कामधेनुला वत्सासह बलात्काराने माहिष्मती नगरीला नेते झाले. ॥२६॥ अथ राजनि निर्याते - नंतर राजा निघून गेला असता - रामः आश्रम आगतः - राम आश्रमात आला - तस्य (अर्जुनस्य) च तत् दौरात्म्यं श्रुत्वा - आणि त्या अर्जुनाचे ते दुष्ट कृत्य ऐकून - आहतः अहिः इव चुक्रोध - प्रहार केलेल्या सर्पाप्रमाणे संतापला. ॥२७॥ दुर्घर्षः - तो दुर्घर राम - घोरं परशुं - भयंकर कुर्हाड - सतूणं कार्मुकं चर्म च आदाय - भात्यासह धनुष्य व ढाल घेऊन - मृगेंद्रः यूथपं इव - सिंह जसा हत्तीच्या कळपाच्या स्वामीवर चाल करितो त्याप्रमाणे - (हैहयान्) अन्वधावत - त्या हैहयावर चालून गेला. ॥२८॥ पुरीं विशन् (अर्जुनः) - नगरीत प्रवेश करणारा अर्जुन - ओजसा आपतन्तम् - वेगाने चाल करून येणार्या - धनुर्धरं बाणपरश्वधायुधं - धनुष्य धारण केलेल्या व बाण आणि कुठार ही आयुधे घेतलेल्या - ऐणेयचर्मांबरं - हरणाचे कातडे पांघरलेल्या - अर्कधामभिः जटाभिः युतं - सूर्यासारख्या तेजःपुंज जटांनी युक्त अशा - तं भृगुवर्यं ददृशे - त्या परशुरामाला पाहता झाला. ॥२९॥ हस्तिरथाश्वपत्तिभिः - हत्ती, रथ, घोडे व पायदळ यामुळे - गदासिबाणर्ष्टिशतघ्निशक्तिभिः - गदा, तरवार, बाण, ऋष्टि, शतघ्नी व शक्ति यामुळे - अतिभीषणाः सप्तदश अक्षौहिणीः - अत्यंत भयंकर अशा सतरा अक्षौहिणी सैन्याला - (अर्जुनः) अचोदयत् - अर्जुन प्रेरित झाला - एकः भगवान् रामः - तो एकटा भगवान् परशुराम - ताः असूदयत् - त्या अक्षौहिणींना नष्ट करिता झाला. ॥३०॥ मनोनिलौजाः परचक्रसूदनः - मनाप्रमाणे वेग असलेला, वायूसारखा पराक्रम करणारा व पराक्रमाचा संहार उडविणारा - असौ परश्वधः - तो कुर्हाड धारण करणारा परशुराम - यतः यतः प्रहरत् - जिकडे जिकडे प्रहार करी - ततः ततः - तिकडे तिकडे - छिन्नभुजोरुकन्धराः हतसूतवाहनाः - हात, पाय, मांडया व माना तुटलेले व सारथी आणि वाहने ज्यांची वध पावली आहेत असे योद्धे - उर्व्यां निपेतुः - पृथ्वीवर पडले. ॥३१॥ हैहयः - तो हैहयांचा राजा अर्जुन - रुधिरौघकर्दमे रणाजिरे - रक्तांच्या ओघाने चिखल झालेला आहे ज्यात अशा रणांगणामध्ये - रामकुठारसायकैः - रामाच्या कुर्हाडीने व बाणांनी - विवृक्णचर्मध्वजचापविग्रहं निपातितं स्वसैन्यं दृष्ट्वा - ज्यांच्या ढाली, ध्वज, बाण व शरीरे तुटली आहेत अशा पडलेल्या आपल्या सैन्याला पाहून - रुषा (रामं) आपतत् - क्रोधाने रामावर चाल करून गेला. ॥३२॥ अथ सः अर्जुनः - नंतर तो अर्जुन - रामाय - रामाला उद्देशून - बाहुभिः पंचशतेषु धनुषु बाणान् युगपत् संदघे - हातांनी पाचशे धनुष्यांना एका वेळी बाण जोडिता झाला - अस्रभृतां समग्रणीः रामः - अस्रधरांमध्ये श्रेष्ठ असा राम - तान् - त्या सर्व बाणांना - एकधन्वेषुभिः समं आच्छिनत् - एकाच धनुष्याने बाणवृष्टि करून एकदाच तोडिता झाला. ॥३३॥ पुनः - पुनः - रामः - परशुराम - अहेः इव - सर्पाप्रमाणे - मृधे - युद्धात - स्वहस्तैः अचलान् अंघ्रिपान् उत्क्षिप्य - आपल्या हातांनी पर्वत व वृक्ष यांना उचलून - युधिवेगात् अभिधावतः - युद्धात वेगाने धावून येणार्या अर्जुनाच्या - भुजान् - बाहूंना - कठोरनेमिना कुठारेण - तीक्ष्ण धारेच्या कुर्हाडीने - प्रसभं चिच्छेद - झपाटयाने तोडिता झाला. ॥३४॥ गिरेः शृंगं इव - पर्वताच्या शिखराप्रमाणे - कृत्तबाहोः तस्य शिरः - ज्याचे हात तुटले आहेत अशा त्या हैहयाचे मस्तक - (रामः) आहरत् - परशुराम तोडिता झाला - पितरि हते - बाप मरण पावला असता - अयुतं तत्पुत्राः - त्याचे दहा हजार पुत्र - भयात् दुद्रुवुः - भयाने पळून गेले. ॥३५॥ परवीरहा (रामः) - शत्रूच्या वीरांचा नाश करणारा राम - परिक्लिष्टां सवत्सां अग्निहोत्रीं उपावर्त्य - त्रासून व थकून गेलेल्या त्या कामधेनूला वासरासह परत आणून - आश्रमं समुपेत्य - आश्रमात येऊन - पित्रे समर्पयत् - पित्याला समर्पण करिता झाला. ॥३६॥ तत् कृतं स्वकर्म - त्या केलेल्या स्वतःच्या कर्माला - पित्रे भ्रातृभ्यः च एव वर्णयामास - पित्याला व भावांना सुद्धा सांगता झाला - जमदग्निः तत् श्रुत्वा अभाषत - जमदग्नि ते श्रवण करून म्हणाला. ॥३७॥ महाबाहो राम राम - हे महाबाहू परशुरामा - भवान् पापं अकारषीत् - तू हे मोठे पाप केलेस - यत् सर्वदेवमयं नरदेवं वृथा अवधीत् - कारण सर्वदेवरूपी राजाचा तू विनाकारण वध केला. ॥३८॥ तात - अरे - वयं ब्राह्मणाः - आपण ब्राह्मण - क्षमया हि अर्हणतां गताः - खरोखर क्षमाशीलपणाने पूज्यतेला प्राप्त झालो आहो - यथा लोकगुरुः देवः - ज्याप्रमाणे लोकांचा गुरु ब्रह्मदेव - (क्षमया एव) पारमेष्ठ्य़ं पदं अगात् - क्षमेच्या योगानेच ब्रह्मपदाला गेला. ॥३९॥ यथा सौरी प्रभा - ज्याप्रमाणे सूर्याची कांती - ब्राह्मी लक्ष्मीः क्षमया रोचते - ब्राह्मणाचे तेज क्षमेने शोभते - भगवान् हरिः ईश्वरः - षड्गुणैश्वर्यसंपन्न समर्थ परमेश्वर - क्षमिणां आशु तुष्यते - क्षमाशील पुरुषांवर लवकर प्रसन्न होतो. ॥४०॥ मूर्धावसिक्तस्य राज्ञः वधः - मूर्धाभिषिक्त राजाचा वध - ब्रह्मवधात् गुरुः - ब्रह्महत्येपेक्षाही अधिक दोषावह आहे - अतः च - आणि म्हणून - अंग - हे रामा - अच्युतचेतनः (त्वं) - ज्याचे चित्त अच्युताकडे लागले असा तू - तीर्थसंसेवया अंहः जहि - तीर्थयात्रेने आपले पाप दूर कर. ॥४१॥ नवमः स्कन्धः - अध्याय पंधरावा समाप्त |