|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १९ वा - अन्वयार्थ
भगवान वामनांचे बलीकडून तीन पावले जमीन माहणे, बलीचे वचन देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडविणे - इमि वैराचनेः धर्मयुक्तं सूनृतं वाक्यं निशम्य - याप्रमाणे बलिराजाचे धर्मयुक्त व मधुर भाषण ऐकून - प्रीतः सः भगवान् - प्रसन्न झालेला तो परमेश्वर - प्रतिनंद्य इदं अव्रवीत् - प्रशंसा करून असे म्हणाला. ॥१॥ जनदेव - हे राजा - एतत् सूनृतं धर्मयुतं यशस्करं तव वचः कुलोचितं (अस्ति) - हे मधुर धर्मानुसारी कीर्तिमापक तुझे भाषण तुझ्या वंशाला साजेसेच आहे - यस्य सांपराये - ज्याच्या पारलौकिक धर्मांचरणात - भृगवः कुलवृद्धः प्रशान्तः पितामहः प्रमाणं (सन्ति) - भृगुऋषि आणि वंशांतील वृद्ध शांत आजोबा प्रल्हाद हेच प्रमाणभूत होत. ॥२॥ एतस्मिन् कुले - या कुळात - कश्चित् पुमान् - कोणीही पुरुष - निसत्त्वः कृपणः नहि (जातः) - निर्बळ व कृपण असा उत्पन्न झाला नाही - यः द्विजातये प्रत्याख्याता प्रतिश्रुत्य वा अदाता (नास्ति) - जो ब्राह्मणाला देत नाही किंवा देण्याचे वचन देऊन न देणारा असा झाला नाही. ॥३॥ तीर्थे युधि च अर्थिना अर्थिताः (सन्तः) - दानप्रसंगी व युद्धामध्ये याचकाने प्रार्थिलेले - ये तु पराङ्मुखाः (सन्ति) - जे खरोखर माघार घेणारे होतात - (ते) अमनस्विनः नृपाः - असे अनुदार मनाचे राजे - युष्मत्कुले न सन्ति - तुमच्या कुळांत झालेले नाहीत - यत् - ज्या कुळात - यथा उडुपः खे - जसा चंद्र आकाशात - (तथा) प्रह्लादः अमलेन यशसा उद्भाति - तसा प्रल्हाद शुद्धकीर्तीने शोभतो. ॥४॥ यतः जातः - ज्या वंशात उत्पन्न झालेला - गदायुधः हिरण्याक्षः - गदा धारण करणारा हिरण्याक्ष - दिग्विजये इमां महीं एकः चरन् - दिग्विजयप्रसंगी या पृथ्वीवर एकटाच फिरणारा - प्रतिवीरं न अविन्दत - बरोबरीच्या योद्ध्याला मिळविता आला नाही. ॥५॥ विष्णुः - विष्णु - क्ष्मोद्धारे आगतं यं - पृथ्वी वर काढीत असता आलेल्या ज्याला - कृच्छ्रेण विनिर्जित्य - मोठया संकटाने जिंकून - भूरि तद्वीर्यम् अनुस्मरन् - त्याच्या मोठया पराक्रमाला स्मरत - आत्मानं जयिनं न मने - स्वतःला विजयी मानिता झाला नाही. ॥६॥ भ्राता हिरण्यकशिपुः - भाऊ हिरण्यकशिपु - पुरा तद्वघं निशम्य - पूर्वी त्याचा वध झालेला ऐकून - क्रुद्धः भ्रातृहणं हन्तुं हरेः निलयं जगाम - रागावलेला असा भावाला मारणार्या विष्णूला मारण्याकरिता त्याच्या स्थानी गेला. ॥७॥ मायाविनां वरः कालज्ञः विष्णुः - मायिक पुरुषांमध्ये श्रेष्ठ असा काळाला ओळखणारा विष्णु - शूलपाणिं तं कृतान्तवत् आयान्तं समालोक्य - हातात शूळ घेऊन यमाप्रमाणे आलेल्या त्या हिरण्यकशिपुला पाहून - चिन्तयामास - विचार करू लागला. ॥८॥ अहं यतः यतः (गच्छामि) - मी जेथे जेथे जाईन - तत्र असौ - तेथे हा - प्राणभृतां मृत्यूः इव (स्यात् एव) - प्राण्यांच्या पाठीस लागलेल्या मृत्यूप्रमाणे असणारच - अतः अहं - म्हणून मी - पराग्दृशः अस्य हृदयं प्रवेक्ष्यामि - बाह्य विषयांकडे दृष्टि असणार्या ह्या हिरण्यकशिपुच्या हृदयात शिरेन. ॥९॥ असुरेन्द्र - हे बलिराजा - विविग्नचेताः सः - भीतियुक्त अंतःकरण झालेला तो विष्णु - एवं निश्चित्य - असा निश्चय करून - श्वासानिलान्तर्हितसूक्ष्मदेहः - श्वासवायूमध्ये गुप्त केला आहे सूक्ष्मदेह ज्याने असा - आधावतः रिपोः शरीरं - अंगावर धावून येणार्या शत्रूच्या शरीरात - तत्प्राणरन्ध्रेण - त्याचे प्राणरंध्र जे नाक तेथून - निर्विविशे - शिरला. ॥१०॥ वीरः सः - पराक्रमी तो हिरण्यकशिपु - शून्यं तन्निकेतं परिमृश्य - शून्य अशा त्याच्या स्थानाला शोधून - अपश्यमानः - त्याला न पाहणारा - कुपितः ननाद - रागावून गर्जना करिता झाला - (च) क्ष्मां द्यां दिशः खं विवरान् समुद्रान् विष्णुं विचिन्वन् - आणि पृथ्वी, स्वर्ग, दिशा, आकाश, सप्तपाताळे, सातसमुद्र इतक्या ठिकाणी विष्णूला शोधूनही - न ददर्श - पाहता झाला नाही. ॥११॥ विष्णुं अपश्यन् इति ह उवाच - विष्णूला न पाहिल्यामुळे तो ह्याप्रमाणे म्हणाला - मया इदं जगत् अन्विष्टं - मी हे जग शोधिले - भ्रातृहा - माझ्या भावाला मारणारा - यतः पुमान् न आवर्तते (तत्र) नूनं गतः - जेथून पुरुषाला परत येता येत नाही तेथेच खरोखर गेला. ॥१२॥ एतावान् वैरानुबन्धः - इतका वैरसंबंध - इह - या लोकी - देहिनां - प्राण्यांमध्ये - आमृत्योः - मृत्यूपर्यंत - अज्ञानप्रभवः अहंमानोपबृंहितः मन्युः तावत् (भवति) - अज्ञानापासून उत्पन्न झालेला व अहंकाराने वाढलेला क्रोध तेथपर्यंत असतो. ॥१३॥ प्रह्लादपुत्रः ते पिता - प्रल्हादाचा मुलगा म्हणजे तुझा पिता विरोचन - द्विजवत्सलः (आसीत्) - ब्राह्मणांवर फारच प्रेम करीत असे - सः याचितः - त्याच्याजवळ याचना केली असता - तद्विद्वान् - त्यांना जाणूनही - द्विजलिङगेभ्यः देवेभ्यः स्वम् आयुः अदात् - ब्राह्मणांची स्वरूपे घेतलेल्या देवांना त्याने आपले आयुष्य दिले. ॥१४॥ भवान् - तू - गृहमेधिभिः पूर्वजैः ब्राह्मणैः - गृहस्थाश्रमी अशा पूर्वीच्या ब्राह्मणांनी - च - आणि - अन्यैः उद्दामकीर्तिभिः शूरैः - दुसर्या अत्यंत शूर पुरुषांनी - आचरितान् धर्मान् आस्थितः (असि) - आचरिलेल्या धर्माप्रमाणे वागत आहेत. ॥१५॥ तस्मात् दैत्येन्द्र - ह्याकरिता हे दैत्यपते बलिराजा - अहं वरदर्षभात् त्वत्तः - मी वर देणार्यात श्रेष्ठ अशा तुझ्यापासून - मम पदा संमितानि त्रीणि पदानि - माझ्या पावलाने मोजलेली तीनच पावले - ईषत् मही वृणे - थोडी भूमि मागतो. ॥१६॥ राजन् - हे बलिराजा - वदान्यात् जगदीश्वरात् ते - दानशूर व त्रैलोक्याधिपति अशा तुझ्याकडून - अन्यत् न कामये - मी दुसरे इच्छित नाही - यावदर्थपरिग्रहः विद्वान् - काम साधण्यापुरतेच मागणारा ज्ञानी पुरुष - एनः न वै प्राप्नोति - पापाला प्राप्त होत नाही. ॥१७॥ अहो ब्राह्मणदायाद - हे ब्राह्मणकुलोत्पन्न बटो - ते वाचः वृद्धसंमताः (सन्ति) - तुझी भाषणे वृद्ध लोकांनी मान्य करण्यासारखी आहेत - (किन्तु) त्वं बालः बालिशमति (असि) - बाल वयाचा तू पोरकट बुद्धीचा आहेस - स्वार्थं प्रति - स्वतःच्या कार्याविषयी - यथा अबुधः (अस्ति) - जसा अज्ञानी मनुष्य असतो. ॥१८॥ यः - जो - लोकानाम् एकम् ईश्वरं द्वीपदाशुषं मां - त्रैलोक्याचा एकटा अधिपति व द्वीप देणार्या अशा मला - वचोभिः समाराध्य - भाषणांनी संतुष्ट करून - पदत्रयं वृणीते - तीन पावले मागतो - सः - अबुद्धिमान - (अस्तिः) - तो वेडा होय. ॥१९॥ बटो - हे मुला - पुमान् माम् उपव्रज्य भूयः याचितुं न अर्हति - एकदा माझ्या जवळ आले असता पुरुषाला पुनः याचना करावी लागणे योग्य नाही - तस्मात् कामं वृत्तिकरीं भूमिं मे प्रतीच्छ - त्या कारणास्तव यथेच्छ निर्वाह चालण्यापुरती भूमि तू माझ्यापासून मागून घे. ॥२०॥ नृप - हे बलिराजा - त्रिलोक्यां यावन्तः प्रेष्ठाः विषयाः (सन्ति) - त्रैलोक्यात जेवढे मोठमोठे विषय आहेत - ते सर्वे (अपि) अजितेन्द्रियं प्रतिपूरयितुं न शक्नुवन्ति - ते सर्व इंद्रियनिग्रह न करणार्यांची तृप्ति करण्यास समर्थ नाहीत. ॥२१॥ त्रिभिः क्रमैः असंतुष्टः (पुरुषः) - तीन पावलांनी संतुष्ट न होणारा पुरुष - सप्तद्वीपवरेच्छया - सात द्वीपे मिळावी अशा इच्छेने - नववर्षसमेतेन द्वीपेन अपि न पूर्यते - नऊ खंडांनी युक्त अशा जंबूद्वीपाने तृप्त होत नाही. ॥२२॥ सप्तद्वीपाधिपतयः वैन्यगयादयः नृपाः - सात द्वीपांचे अधिपति असे पृथू, गय आदि करून राजे - अर्थैः कामैः - अर्थ व काम ह्यांनी - तृष्णायाः अन्तं न गताः - इच्छेच्या अंताला गेले नाहीत - इति नः श्रुतं - असे आम्ही ऐकले आहे. ॥२३॥ यदृच्छया उपपन्नेन संतुष्टः (नरः) सुखं वर्तते - सहज रीतीने प्राप्त झालेल्या वस्तूने संतुष्ट झालेला मनुष्य सुखी होतो - अजितात्मा असन्तुष्टः उपसादितैः त्रिभिः लोकः न - इंद्रियनिग्रह न करणारा व संतुष्ट नसणारा मनुष्य त्रैलोक्यानेही संतुष्ट होत नाही. ॥२४॥ अर्यं अर्थकामयोः असंतोषः पुंसः संसृतेः हेतुः - अर्थ व काम याविषयी असंतोष हा पुरुषाला, संसारात पाडणारा होय - यदृच्छया उपपन्नेन - सहजगत्या मिळालेल्या वस्तूने होणारा - संतोषः मुक्तये स्मृतः - संतोष मोक्षाचे साधन होय असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. ॥२५॥ यदृच्छालाभतुष्टस्य विप्रस्य तेजः वर्धते - सहजरीतीने मिळालेल्या वस्तूने संतुष्ट असणार्या ब्राह्मणाचे तेज वाढते - आशुशुक्षणिः अम्भसा इव असंतोषात् तत् प्रशाम्यति - जसा उदकाने अग्नि त्याप्रमाणे असंतोषाने ते तेज नष्ट होते. ॥२६॥ तस्मात् वरदर्षभात् त्वत् त्रीणि पदानि एव वृणे - म्हणून वर देणार्यांत श्रेष्ठ अशा तुझ्यापासून तीनच पावले मी मागतो - अहं एतावता एव सिद्धः (भवामि) - मी एवढयानेच धन्य होईन - वित्तं यावत्प्रयोजनं (स्यात्) - द्रव्य कामापुरतेच असावे. ॥२७॥ इति उक्तः सः - असे बोललेला तो बलिराजा - हसन् आह - हास्य करून म्हणाला - वाञ्छातः प्रतिगृह्यताम् - इच्छेप्रमाणे घेतले जावे - ततः सः - नंतर तो बलिराजा - वामनाय महीं दातुं जलभाजनं जग्राह - वामनाला पृथ्वी देण्याकरिता पाण्याचे भांडे घेता झाला. ॥२८॥ विदांवरः - ज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ असा - उशना - शुक्राचार्य - विष्णोः चिकीर्षितं जानन् - विष्णूच्या मनातील गोष्ट जाणून - विष्णवे क्ष्मां प्रदास्यन्तं शिष्यं असुरेश्वरं - विष्णूला पृथ्वी देणार्या शिष्य अशा दैत्यपति बलिराजाला - प्राह - म्हणाला. ॥२९॥ वैरोचने - हे बलिराजा - एषः साक्षात् भगवान् अव्ययः विष्णुः - हा प्रत्यक्ष षड्गुणैश्वर्यसंपन्न अविनाशी विष्णु - देवानां कार्यसाधकः - देवांचे कार्य साधणारा - कश्यपात् अदितेः जातः - कश्यपापासून अदितीच्या ठिकाणी उत्पन्न झाला. ॥३०॥ अनर्थम् अजानता त्वया - अनर्थाला न जाणणार्या तुझ्याकडून - एतस्मै यत् प्रतिश्रुतं - ह्याला जे वचन दिले गेले - (तत्) साधु न मन्ये - ते मी चांगले मानीत नाही - दैत्यानां महान् अनयः उपगतः - दैत्यावर मोठे संकट आले आहे. ॥३१॥ एषः मायामाणवकः हरिः - हा मायेने मानवाचे सोंग घेतलेला विष्णु - ते स्थानं ऐश्वर्यं श्रियं तेजः यशः श्रुतं (च) आच्छिद्य - तुझे स्थान, ऐश्वर्य, लक्ष्मी, तेज, कीर्ति, व ज्ञान ही हिरावून - शक्राय दास्यति - इंद्राला देईल. ॥३२॥ विश्वकायः - विराटस्वरूपी विष्णु - त्रिविक्रमैः इमान् लोकान् क्रमिष्यति - तीन पावलांनी ह्या लोकांना आक्रमून टाकील - मूढ - हे मूर्खा - सर्वस्वं विष्णवे दत्वा - सर्व जवळ असलेले विष्णुला देऊन - कथं वर्तिष्यसे - कसा निर्वाह करशील. ॥३३॥ एकेन पदा गां - एका पावलाने पृथ्वीला - द्वितीयेन दिवं - दुसर्या पावलाने स्वर्गाला - महता कायेन च - आणि मोठया शरीराने - खं क्रमतः विभोः - आकाशाला व्यापणार्या परमेश्वराच्या - तार्तीयस्य (पदस्य) गतिः कुतः - तिसर्या पावलाला ठेवण्यास जागा कोठून मिळणार ? ॥३४॥ प्रतिश्रुतम् हि अप्रदातुः ते नरके निष्ठां मन्ये - कबूल केलेले खरोखर न देणार्या तुला नरकात ठिकाण प्राप्त होणार असे मला वाटते - यः भवान् प्रतिश्रुतस्य प्रतिपादयितुं अनीशः - जो तू कबूल केलेले देण्यास समर्थ नाहीस. ॥३५॥ येन वृत्तिः विपद्यते - ज्यायोगे निर्वाहाचे साधन नष्ट होते - तत् दानं न प्रशंसन्ति - त्या दानाची प्रशंसा करीत नाहीत - यतः लोके - कारण लोकांमध्ये - वृत्तिमतः (एव) - निर्वाहाचे साधन जवळ असणार्याच्या हातूनच - दानं यज्ञः तपः कर्म (भवति) - दान, यज्ञ, तप व कर्म होते. ॥३६॥ धर्माय यशसे अर्थाय कामाय स्वजनाय च - धर्म, कीर्ति, अर्थ, काम व स्वजन ह्याकरिता - पञ्चधा वित्तं विभजन् - पाच भागांत वाटणी करणारा - इह अमुत्र च मोदते - ह्या लोकी व परलोकी आनंदित होतो. ॥३७॥ असुरसत्तम - हे दैत्यश्रेष्ठा बलिराजा - अत्र अपि बह्वृचैः गीतं - ह्या ठिकाणीही ऋग्वेदांनी गाइलेले - मे शृणु - माझ्यापासून ऐक - ओम् इति - ठीक असे - यत् प्रोक्तं तत् सत्यं - जे बोलले ते सत्य होय - हि - त्याचप्रमाणे - न इति यत् आह तत् अनृतं - नाही म्हणून जे म्हटले जाते त्याला असत्य म्हणतात. ॥३८॥ सत्यं आत्मवृक्षस्य पुष्पफलं विद्यात् - सत्य हे शरीररूपी वृक्षाचे फूल व फळ होय असे जाणावे - गीयते - असे गाइले आहे - वृक्षे अजीवति - शरीररूपी वृक्षच जिवंत राहिला नाही - तत् न स्यात् - तर ते फळ मिळत नाही - अनृतं आत्मनः मूलं (अस्ति) - असत्य हे आत्मरूपी वृक्षाचे मूळ होय. ॥३९॥ तत् यथा उन्मूलः वृक्षः शुष्यति - त्याचप्रमाणे जसा मुळे उपटलेला वृक्ष सुकतो - अचिरात् उद्वर्तते - लवकरच उन्मळून पडतो - एवं नष्टानृतः आत्मा सद्यः शुष्येत् - याप्रमाणे असत्यरहित शरीर तात्काळ सुकते - (अत्र) न संशयः - ह्यात संशय नाही. ॥४०॥ यत् ओम् इति अक्षरं - जे ‘ठीक आहे’ असे उच्चारिलेले अक्षर - तत् पराक् रिक्तं वा अपूर्णं - ते द्रव्य घेऊन दूर पळणारे, रिकामे अथवा अपुरे होय - पुमान् यत् किंचित् ओम् इति ब्रूयात् - पुरुष जे काही ‘ठीक आहे’ असे म्हणतो - तेन वै रिच्येत - त्यायोगे खरोखर रिकामा होतो - भिक्षवे च सर्वं ओम् कुर्वन् - आणि याचकाला सर्व काही ‘ठीक आहे’ असे म्हणणारा - आत्मने कामेन न अलं - स्वतःची कोणतीच इच्छा पूर्ण करू शकत नाही. ॥४१॥ अथ - आता - यत् न इति अनृतं वचः - जे ‘नाही’ असे मिथ्या भाषण - एतत् पूर्णं अभ्यात्मं - हे पूर्ण स्वतःची भर करणारे आहे - च - आणि - (यः) सर्वं न इति अनृतं ब्रूयात् - जो सर्व काही ‘नाही’ म्हणून असत्य बोलेल - सः दुष्कीर्तिः श्वसन् मृतः - तो अपकीर्तिवान पुरुष जिवंत असून मेल्यासारखाच होय. ॥४२॥ स्त्रीषु नर्मविवाहे वृत्त्यर्थे - स्त्रियांजवळ, थट्टेमध्ये, लग्नामध्ये, निर्वाहासाठी, - प्राणसङकटे गोब्राह्मणार्थे हिंसायां च - प्राणांवर संकट आले असता, गाई व ब्राह्मण ह्यांकरिता व हिंसेच्या बाबतीत - अनृतं जुगुप्सितं न स्यात् - असत्य भाषण निंद्य होत नाही. ॥४३॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय एकोणिसावा समाप्त |