|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय १८ वा - अन्वयार्थ
भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन - इत्थं - याप्रमाणे - विरिञ् व्रस्तुतकर्मवीर्यः - ब्रह्मदेवाने स्तविले आहे कर्म व पराक्रम ज्याचा असा - अमृतभूः - जन्ममरणरहित - चतुर्भुजः - चार हातांचा - शंखगदाब्जचक्रः - शंख, गदा, कमळ व चक्र धारण करणारा - पिशङगवासाः - पिंगट वस्त्र नेसणारा - नलिनायतेक्षणः - कमळाप्रमाणे विशाल नेत्रांचा - श्यामावदातः - निर्मळ श्यामवर्णाचा - झषराजकुण्डलत्विषा उल्लसच्छ्रीवदनांम्बुजः - मकराकार कुंडलांच्या कांतीने शोभत आहे सुंदर मुखकमळ ज्याचे असा - पुमान् श्रीवत्सवक्षाः - श्रीवत्सलांछन धारण करणारा पुरुषरूपी - वलयाङगदोल्लसत्किरीटकाञ्चीगुणचारुनूपुरः - कडी, पोंच्या, शोभायमान मुकुट, कंबरपटटा आणि पैंजण ह्यांनी शोभणारा - मधुव्रतव्रातविघुष्टया स्वया श्रवनमालया विराजितः - भ्रमरसमूह जेथे गुंजारव करितात अशा आपल्या शोभायमान वनमालेने शोभणारा - कंठनिविष्टकौस्तुभः - कौस्तुभमणि कंठामध्ये धारण केला आहे ज्याने असा - स्वरोचिषा प्रजापतेः वेश्यतमः विनाशयन् - आपल्या कांतीने कश्यपप्रजापतीच्या घरातील अंधकार नष्ट करणारा - हरिः अदित्यां प्रादुर्बभूव - श्रीविष्णु अदितीच्या ठिकाणी प्रगट झाला. ॥१-३॥ तदा - त्यावेळी - दिशः सलिलाशयाः प्रसेदुः - दिशा व सरोवरे स्वच्छ झाली - प्रजाः प्रहृष्टाः (अभवन्) - लोक आनंदित झाले - ऋतवः गुणान्विताः (अभवन्) - सर्व ऋतू सकलगुणसंपन्न झाले - द्यौः अन्तरिक्षं क्षितिः अग्निजिह्वाः गावः द्विजाः च नगाः संजहृषुः - स्वर्ग, आकाश, पृथ्वी, देव, गाई, ब्राह्मण आणि पर्वत आनंदित झाले. ॥४॥ श्रोणायां श्रवणद्वादश्यां - भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशीच्या दिवशी - अभिजिति मुहूर्ते - अभिजिति मुहुर्तावर - प्रभुः - ईश्वर - सर्वे नक्षत्रताराद्याः - संपूर्ण नक्षत्रे व चांदण्या आदि करून - तज्जन्म दक्षिणं चक्रुः - त्याचा जन्म अत्यंत शुभ करते झाले. ॥५॥ यस्यां द्वादश्यां - ज्या द्वादशीच्या दिवशी - हरेः जन्म - भगवंताचा जन्म - अहनि विदुः - दिवसा झाला असे लोक जाणतात - तदा सविता मध्यन्दिनगतः अतिष्ठत् - त्या वेळी सुर्य दिवसाच्या मध्यभागावर आला होता - सा विजया नाम प्रोक्ता - त्या द्वादशीला विजयादशमी असे म्हणतात. ॥६॥ शङगदुन्दुभयः मृदङगपणवानकाः नेदुः - शंख, दुंदुभि, मृदंग, पणव आणि आनक ही वाद्ये वाजू लागली - चित्रवादित्रतूर्याणाः तुमुलः निर्धोषः अभवत् - चित्रविचित्र वाद्ये, नगारे यांचा मोठा शब्द सुरू झाला. ॥७॥ प्रीताः अप्सरसः नृत्यन् - संतुष्ट झालेल्या अप्सरा नाचू लागल्या - मुनयः तुष्टुवुः - ऋषि स्तुती करू लागले - देवाः मनवः पितरः अग्नयः - देव, मनु, पितर व अग्नि - सकिंपुरुषकिन्नराः सिद्धविद्याधरगणाः - किंपुरुष व किन्नर ह्यांसह सिद्ध व विद्याधर यांचे समूह - चारणाः यक्षरक्षांसि सुपर्णाः भुजगोत्तमाः - चारण, यक्ष, राक्षस गरुड व मोठमोठे साप - विबुधानुगाः - देवांचे सेवक - गायन्तः अतिप्रशंसन्तः नृत्यन्तः - नाचत, गात व स्तुति करीत - अदित्याः आश्रमपदं कुसुमैः समवाकिरन् - अदितीच्या आश्रमावर पुष्पांचा वर्षाव करू लागले. ॥८-१०॥ अदितिः - अदिति - तं परं पुमांसं - त्या श्रेष्ठ परमेश्वराला - निजयोगमायया गृहीतदेहं - आपल्या योगमायेच्या योगे देह धारण केलेला - निजगर्भसंभवं - आपल्या उदरी उत्पन्न झालेला असे - दृष्ट्वा - पाहून - विस्मिता मुदम् आप - आश्चर्याने युक्त होऊन आनंदित झाली - च - आणि - प्रजापतिः विस्मितः - कश्यपप्रजापतीही आश्चर्यचकित झालेला असा - ‘जय’ इति आह - ‘तुझा विजय असो’ असे म्हणाला. ॥११॥ तत् - तेव्हा - अव्यक्तचित् हरिः - ज्याचे चैतन्यस्वरूप न दिसणारे आहे असा श्रीविष्णु - भातिविभूषणायुधैः व्यक्तं - तेज, अलंकार, व आयुधे ह्यांनी व्यक्त होणारे - यत् वपुः अधारयत् - जे शरीर धरिता झाला - तेन एव - त्याच्या योगेच - यथा नटः - जसा नाटकी पुरुष - संपश्यतोः (तयोः) - आईबापांच्या समक्ष - वामनः बटुः बभूव - ठेंगु ब्रह्मचारी असा बनला. ॥१२॥ तं बटुं वामनं दृष्ट्वा - त्या ब्रह्मचारी वामनमूर्तीला पाहून - मोदमानाः महर्षयः प्रजापतिं पुरस्कृत्य - आनंदित झालेले मोठमोठे ऋषि प्रजापतीला पुढे करून - कर्माणि कारयामासुः - जातकर्मादि संस्कार करविते झाले. ॥१३॥ तस्य उपनीयमानस्य - त्याचा मौंजीबन्धन संस्कार चालू असता - सविता सावित्रीम् अब्रवीत् - सूर्य गायत्रीमंत्राचा उपदेश करिता झाला - बृहस्पतिः ब्रह्मसूत्रं अददात् - बृहस्पति यज्ञोपवित देता झाला - कश्यपः मेखलाम् (अददात्) - कश्यप मेखला देता झाला. ॥१४॥ भूमिः जगतः पतेः कृष्णाजिनं (ददौ) - पृथ्वी जगन्नाथ अशा वामनाला काळविटाचे कातडे देती झाली - वनस्पतिः सोमः दण्डं (ददौ) - औषधीचा राजा सोम दंड देता झाला - माता कौपीनाच्छादनं (ददौ) - आदिती लंगोटी देती झाली - द्यौः छत्रं (ददौ) - स्वर्गदेवतेने छत्री दिली. ॥१५॥ महाराज - हे परीक्षित राजा - देवगर्भः - ब्रह्मदेव - अव्ययात्मनः कमण्डलुं (ददौ) - अविनाशी अशा त्या वामनाला कमंडलु देता झाला - सप्तर्षयः कुशान् ददुः - सप्तर्षि दर्भ देते झाले - सरस्वती अक्षमालां (ददौ) - सरस्वती रुद्राक्षांची माळ देती झाली. ॥१६॥ इति उपनीताय तस्मै - ह्याप्रमाणे मौञ्जीबंधन संस्कार केलेल्या त्याला - यक्षराट् पात्रिकां अदात् - कुबेर भिक्षापात्र देता झाला - साक्षात् भगवती अंबिका उमा सती भिक्षाम् अदात् - प्रत्यक्ष सर्वैश्वर्यसंपन्न अंबिका साध्वी पार्वती भिक्षा घालिती झाली. ॥१७॥ एवं संभावितः सः मारिषः बटुः - याप्रमाणे सत्कारिलेला तो श्रेष्ठ ब्रह्मचारी वामन - ब्रह्मवर्चसेन ब्रह्मर्षिगणसंजुष्टां सभां अत्यरोचत - ब्रह्मतेजाच्या योगे ब्रह्मर्षिसंघांनी सेविलेल्या त्या सभेमध्ये अधिक शोभला. ॥१८॥ द्विजः - ब्रह्मचारी वामन - आहितं समिद्धं वह्निं परिसमूहनं कृत्वा - स्थापिलेल्या व प्रज्वलित केलेल्या अग्नीला परिसमूहन करून - परिस्तीर्य समभ्यर्च्य - परिस्तरणे घालून व पूजून - समिद्भिः अजुहोत् - समिधांचा होम करिता झाला. ॥१९॥ भृगूणाम् उपकल्पितैः अश्वमेधैः यजमानं बलिं ऊर्जितं श्रुत्वा - भृगू ऋषींनी चालविलेल्या अश्वमेध यज्ञांनी ईश्वरपूजन करणारा बलिराजा सामर्थ्यवान झालेला ऐकून - अखिल सारसंभृतः - सकल शक्तीने पूर्ण भरलेला - भारेण पदेपदे गां सन्नमयन् - आपल्या भाराने पावलोपावली पृथ्वीला नमवीत - तत्र जगाम - तेथे गेला. ॥२०॥ नर्मदाया उत्तरे तटे - नर्मदा नदीच्या उत्तर तीरावर - भृगूकच्छसंज्ञके (क्षेत्रे) - भृगुकच्छनामक क्षेत्रांत - क्रतूत्तमं प्रवर्तयन्तः - उत्तम यज्ञाला चालविणारे - ये बलेः ऋत्विजः भृगवः - जे बलीचे ऋत्विज भृगु - ते तं - ते त्या वामनाला - यथा आरात् उदितं रविं (तथा) व्यचक्षत - जवळच उगवलेल्या सूर्याप्रमाणे पाहते झाले. ॥२१॥ नृप - हे राजा - यजमानः सऋत्विजः सदस्याः (च) - यजमान बलि, ऋषि व ऋत्विजांसह सभासद - वामनतेजसा हतत्विषः - वामनाच्या कांतीने निस्तेज झालेले - क्रतोः दिदृक्षया - यज्ञ पाहण्याच्या इच्छेने - सूर्यः किल आयाति - खरोखर सूर्य येत आहे - उत वा विभावसुः (आयाति) - अथवा अग्नी येत आहे - अथवा सनत्कुमारः (आयाति) - किंवा सनत्कुमार येत आहे - इति अतर्कयन् - असा तर्क करू लागले. ॥२२॥ सशिष्येषु भृगुषु - शिष्यांसह भृगुंमध्ये - इत्थं अनेकधा वितर्क्यमाणः - ह्याप्रमाणे पुष्कळ प्रकाराने तर्क केला जाणारा - छत्रं सदण्डं सजलं कमण्डलुं बिभ्रत् - छत्री व दण्ड ह्यांसह पाण्याने भरलेला कमंडलू धारण करणारा - सः भगवान् वामनः - तो षड्गुणैश्वर्यसंपन्न वामन - हयमेधवाटं विवेश - अश्वमेध यज्ञाच्या मंडपात शिरला. ॥२३॥ मौञ्ञ्या मेखलया वीतं - मुञ्ज गवताच्या कडदोर्याने वेष्टिलेल्या - उपवीताजिनोत्तरं - यज्ञोपवीताप्रमाणे धारण केलेले आहे उपवस्त्र ज्याने अशा - जटिलं - जटा धारण करणार्या - मायामाणवकं वामनं विप्रं हरिं - मायेने शिष्याचे सोंग घेतलेल्या ब्राह्मण बटुरूपी श्रीविष्णूला. ॥२४॥ प्रविष्टं वीक्ष्य - यज्ञमंडपात शिरलेला पाहून - तस्य तेजसा संक्षिप्ताः - त्याच्या तेजाने निस्तेज झालेले - सशिष्याः ते भृगवः - शिष्यांसह ते भृगुऋषि - अग्निभिः सह - अग्नीसह - समुत्थाय प्रत्यगुह्यन् - उठून पूजिते झाले. ॥२५॥ दर्शनीयं मनोरमं रूपानुरूपावयवं (तं दृष्ट्वा) - पाहण्याजोग्या मनोहर व स्वरूपाला साजेसे अवयव असणार्या त्या वामनाला पाहून - प्रमुदितः यजमानः - आनंदित झालेला यजमान बलि - तस्मै आसनम् आहरत् - त्याला आसन देता झाला. ॥२६॥ अथ - नंतर - बलिः - बलिराजा - स्वागतेन अभिनन्द्य - स्वागतपूर्वक अभिनंदन करून - भगवतः पादौ अवनिज्य - षड्गुणैश्वर्यसंपन्न वामनाचे पाय धुऊन - मुक्तसङगमनोरमं - सर्वसंगपरित्याग केलेल्या योग्यांच्या मनाला रमविणार्या - (तं) अर्चयामास - त्या वामनाची पूजा करिता झाला. ॥२७॥ धर्मवित् सः - धर्म जाणणारा तो बलिराजा - जनकल्मषापहं सुमङगलं तत्पादशौचं - लोकांच्या पापांचे क्षालन करणार्या व अत्यंत मंगलप्रद अशा त्याच्या चरणतीर्थाला - मूर्ध्नि अदधात् - मस्तकावर धारण करिता झाला - यत् - जे - चन्द्रमौलिः देवदेवः गिरिशः च - मस्तकावर चंद्र धारण करणारा देवाधिदेव शंकरसुद्धा - परया भक्त्या मूर्ध्ना दधार - मोठया भक्तीने मस्तकावर धरिता झाला. ॥२८॥ ब्रह्मन् - हे ब्राह्मणबटो - ते स्वागतं (अस्तु) - तुझे स्वागत असो - तुभ्यं नमः - तुला नमस्कार असो - ते किं करवाम - आम्ही तुझे काय काम करावे - आर्य - हे श्रेष्ठ वामना - त्वा - तुला - ब्रह्मर्षीणां साक्षात् वपुर्धरं तपः मन्ये - ब्रह्मर्षीचे प्रत्यक्ष मूर्तिमंत तप मानितो. ॥२९॥ यत् भवान् गृहान् आगतः - ज्याअर्थी आपण आमच्या घरी आला - अद्य नः पितरः तृप्ताः - आज आमचे पितर तृप्त झाले - अद्य नः कुलं पावितं - आज आमचे कुळ पवित्र झाले - अद्य अयं क्रतुः स्विष्टः - आज हा यज्ञ यथासांग सिद्धीस गेला. ॥३०॥ अहो द्विजात्मज - हे ब्राह्मणपुत्रा - अद्य - आज - त्वच्चरणावनेजनैः वार्भिः - तुझे पाय धुण्याच्या पाण्याने - हतांहसः मे अग्नयः - निष्पाप झालेल्या माझे अग्नी - यथाविधि सुहुताः - यथाशास्त्र पूजिले गेले - तथा च - त्याप्रमाणेच - इयं भूः तव तनुभिः पदैः पुनीता - ही पृथ्वी तुझ्या कोमल पायांनी पवित्र झाली. ॥३१॥ बटो - हे वामना - यत् यत् वाञ्छसि तत् मे प्रतीच्छ - जे जे तुला पाहिजे असेल ते ते माझ्याकडून मागून घे - विप्रसुत - हे ब्राह्मणपुत्रा - त्वाम् अर्थिनम् अनुतर्कये - तू याचक म्हणून आला आहेस असे मला वाटते - अर्हत्तम विप्र - हे पूज्य ब्राह्मणा - गां काञ्चनं गुणवत् धाम तथा मृष्टं अन्नपेयं - गाय, सुवर्ण, सर्व पदार्थांनी भरलेले घर, तसेच मधुर अन्न व पेय - उत कन्यां - किंवा कन्या - वा - किंवा - समृद्धान् ग्रामान् - सर्वैश्वर्यांनी पूर्ण असे गाव - तुरगान् गजान् - घोडे अथवा हत्ती - तथा वा रथान् - त्याप्रमाणे रथ - संप्रतीच्छ - मागून घे. ॥३२॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय अठरावा समाप्त |