श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ७ वा - अन्वयार्थ

समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान -

कुरूद्वह - हे कुरूश्रेष्ठा परीक्षित राजा - मुदान्विताः - आनंदित झालेले - ते - ते देव व दैत्य - फलभागेन - फळांतील भाग देऊ करून - नागराजं वासुकिं - सर्पाचा राजा जो वासुकि त्याला - आमन्त्र्य - बोलावून - (तं) नेत्रं - त्याला दोरी म्हणून - तस्मिन् - त्या - गिरौ - पर्वतावर - परिवीय - गुंडाळून - अमृतार्थं - अमृताकरिता - सुसंयत्ताः - सज्ज झालेले असे - अब्धिं (मथितुं) - समुद्राचे मंथन करण्यास - आरेभिरे - आरंभ करिते झाले - हरिः - श्रीविष्णु - पूर्वं - प्रथम - पुरस्तात् - पुढच्या बाजूस - जगृहे - धरिता झाला - ततः - त्याच्या मागोमाग - देवाः - देव - अभवन् - त्या बाजूला झाले. ॥१-२॥

दैत्यपतयः - दैत्याधिपति - तत् - त्या - महापुरुषचेष्टितं - महाविष्णूच्या कृत्याला - न ऐच्छन् - न इच्छिते झाले - स्वाध्यायश्रुतसंपन्नाः - वेदाध्ययन व शास्त्रश्रवण यांनी पूर्ण असे - जन्मकर्मभिः - चांगल्या कुळात जन्म व पराक्रमाची कृत्ये ह्यांनी - प्रख्याताः - प्रसिद्धीस आलेले - वयं - आम्ही - अहेः - सर्पाच्या - अमङगलं अङगम् - अशुद्ध अवयव अशा - पुच्छं - शेपटीला - न गृह्‌णीमः - धरणार नाही - इति - असे म्हणून - तूष्णीं - स्तब्ध - स्थितान् - उभ्या राहिलेल्या - दैत्यान् - दैत्यांना - विलोक्य - पाहून - स्मयमानः - स्मित हास्य करणारा - सामरः पुरुषोत्तमः - देवांसह श्रीविष्णु - अग्रं - पुढच्या भागाला - विसृज्य - सोडून - पुच्छं - शेपटीला - जग्राह - धरिता झाला - एवं - याप्रमाणे - कृतस्थानविभागः - केली आहे स्थानांची वाटणी ज्यांनी असे - ते - ते - कश्यपनन्दनाः - कश्यपाचे मुलगे देव व दैत्य - परमायत्ताः - फार सावध असे - अमृतार्थं - अमृताकरिता - पयोनिधिम् - समुद्राला - ममन्थुः - घुसळिते झाले - पाण्डुनन्दन - हे पाण्डुपुत्रा परीक्षित राजा - अर्णवे मथ्यमाने - समुद्र घुसळिला जात असता - अनाघारः सः अद्रिः - आधाररहित असा तो मंदर पर्वत - बलिभिः - बलवान अशा देवदैत्यांनी - ध्रियमाणः अपि - धरिला जात असताही - गौरवात् - जडपणामुळे - हि - खरोखर - अपः - पाण्यात - अविशत् - शिरू लागला - अति बलीयसा दैवेन - अत्यंत बलवान अशा दैवाने - स्वपौरुषे नष्टे - आपला पराक्रम नष्ट केला असता - सुनिर्विण्णमनसः - अंतःकरण खिन्न झालेले असे - ते - ते देव व दैत्य - परिम्लानमुखश्रियः आसन् - ज्यांची मुखशोभा पार मावळून गेली आहे असे झाले. ॥३-७॥

तदा - त्यावेळी ज्याच्या पराक्रमाचा अंत लागणे कठीण आहे असा - अवितथाभिसन्धिः - सत्य प्रतिज्ञ असा - ईश्वरः - परमेश्वर - विघ्नेशविधिं - विघ्नराजाचे कृत्य - विलोक्य - पाहून - महत् अद्भुतं - मोठे आश्चर्यजनक असे - काच्छपं वपुः - कासवाचे शरीर - कृत्वा - धारण करून - तोयं प्रविश्य - पाण्यात शिरून - गिरिं उज्जहार - मंदरपर्वताला वर आणिता झाला. ॥८॥

सुरासुराः - देव व दैत्य - तं कुलाचलं - त्या मंदरपर्वताला - उत्थितं वीक्ष्य - वर आणिलेला पाहून - पुनः - फिरून - निर्मथितुं - मंथन करण्याकरिता - समुत्थिताः स्म - उठून तयार झाले - सः - तो पर्वत - लक्षयोजनप्रस्तारिणा पृष्ठेन - चार लक्ष कोस विस्ताराच्या पाठीने - अपरः महान् द्वीपः इव - दुसरे मोठे बेटच की काय अशा रीतीने - दधार - धारण करिता झाला. ॥९॥

अङग - हे राजा - सुरासुरेन्द्रैः - देवदैत्यांच्या अधिपतींनी - भुजवीर्यवेपितं - बाहुबलाने घुसळल्या जाणार्‍या - परिभ्रमन्तं - फिरणार्‍या - गिरिं - मंदरपर्वताला - पृष्ठतः - पाठीवर - ब्रिभ्रत् - धारण करणारा - अप्रमेयः - मोजमाप करता न येणारा - आदिकच्छपः - कच्छपरूपी भगवान - तदावर्तनं - त्या पर्वताचे पाठीवर फिरणे - अङगकण्डूयनं - अंगाचे खाजविणे - मेने - मानिता झाला. ॥१०॥

तथा - त्याप्रमाणे - तेषां - त्या देवदैत्यांच्या - बलवीर्यं - पराक्रमाला - ईरयन् - प्रेरणारा - उद्दीपयन् - उद्दीपित करणारा - विष्णुः - विष्णु - असुरान् - दैत्यांच्या शरीरात - आसुरेण रूपेण - दैत्यरूपाने - च - आणि - देवगणान् - देव संघांच्या शरीरात - दैवेन - देवरूपाने - च - आणि - अबोधरूपः - जडरूपाने - नागेन्द्रं - वासुकीमध्ये - अविशत् - शिरला. ॥११॥

सहस्रबाहुः - हजार हातांचा विष्णु - अगेन्द्रं उपरि - मंदर पर्वताच्या वरती - अन्यःगिरिराट् इव - दुसर्‍या मोठया पर्वताप्रमाणे - हस्तेन - हाताने - आक्रम्य - आक्रमण करून - तस्थौ - राहता झाला - दिवि - स्वर्गामध्ये - अभिष्टुवद्भिः - स्तुती करणार्‍या - ब्रह्मभवेन्द्रमुख्यैः - शंकर, ब्रह्मदेव इंद्र इत्यादि मुख्य देवांनी - सुमनोऽभिवृष्टः - फुलांची वृष्टि केलेला असा. ॥१२॥

गोत्रनेत्रयोः - पर्वत व दोरी ह्यांमध्ये - उपरि - वरती - अधः - खाली - च - आणि - आत्मनि - शरीरात - प्रावेशिता - प्रविष्ट झालेल्या - परेण - परमेश्वराने - समेघिताः - वृद्धिंगत केलेले - मदोत्कटाः - मदोन्मत्त असे - ते - देव व दैत्य - महाद्रिणा - मोठया पर्वताने - क्षोभितनक्रचक्रं अब्धिं - खवळून गेला आहे नक्रांचा समुदाय ज्यांतील अशा समुद्राला - तरसा - जोराने - ममन्थुः - घुसळिते झाले. ॥१३॥

अहीन्द्रसाहस्रकठोरदृङमुखश्वासाग्निघूमाहतवर्चसः - सर्पराज वासुकीच्या हजारो नेत्र, मुख व श्वास ह्यांतून निघणार्‍या धूमयुक्त अग्नीने ज्यांची तेजे नष्ट झाली आहेत असे - पौलोमकालेयबलील्वलादयः - पौलोम, कालेय, बलि व इल्वल इत्यादि - असुराः - दैत्य - दवाग्निदग्धाः सरलाः इव - वणव्याने पोळलेल्या सरलवृक्षाप्रमाणे - अभवन् - झाले. ॥१४॥

भगवद्वशाः - भगवंताच्या आधीन असणारे - घनाः - मेघ - तच्छ्वासशिखाहतप्रभान् - त्या वासुकीच्या श्वासाच्या अग्रांनी ज्यांची तेजे लुप्तप्राय झाली आहेत असे - धूम्राम्बरस्रग्वरकञ्चुकाननान् - धुरकटलेली वस्त्रे, माळा, चिलखत व मुखे ज्यांची अशा - देवान् - देवांच्यावर - समभ्यवर्षन् - पाऊस पाडिते झाले - च - आणि - समुद्रोर्म्युपगूढवायवः - समुद्रांच्या लाटांच्या स्पर्शांनी शीतल झालेले वायु - ववुः - वाहू लागले. ॥१५॥

देवासुरवरूथपैः - देवदैत्यांच्या सेनापतींकडून - तथा - तशा रीतीने - मथ्यमानात् - घुसळल्या जाणार्‍या - सिंधोः - समुद्रापासून - यदा - जेव्हा - सुधा - अमृत - न जायेत - उत्पन्न झाले नाही - अजितः - श्रीविष्णु - स्वयं - स्वतः - निर्ममंथ - घुसळू लागला. ॥१६॥

अथो - त्यावेळी - मेघश्यामः - मेघाप्रमाणे निळ्या रंगाचा - कनकपरिघिः - सुवर्णाचे वस्र सभोवार ज्याने गुंडाळले आहे असा - कर्णविद्योतविद्युत् - ज्याच्या कानात विजेप्रमाणे चकाकणारी तेजस्वी कुंडले आहेत असा - मूर्घ्नि - मस्तकावर - भ्राजद्विलुलितकचः - लोळणारे सुंदर केश आहेत ज्याचे असा - स्रग्धरः - माळा धारण करणारा - रक्तनेत्रः - लाल नेत्रांचा - धृताद्रिः (विष्णुः) - पर्वताला धारण करणारा विष्णु - जैत्रैः - विजयी अशा - जगदभयदैः - जगाला अभय देणार्‍या - दोर्भिः - बाहूंनी - दंदशूकं - वासुकि सर्पाला - गृहीत्वा - घेऊन - मथ्ना - मंदाररूपी रवीने - मथ्नन् - मंथन करणारा असा - गिरिपतिः इव - दुसरा पर्वतराजच की काय असा - अशोभत - शोभला. ॥१७॥

निर्मथ्यमानात् - घुसळल्या जाणार्‍या - संभ्रान्तमीनोन्मकराहिकच्छपात् - ज्यांतील मासे, मगर, सर्प व कासव घाबरून गेले आहेत अशा - तिमिद्विपग्राहतिमिङ्गिलाकुलात् - तिमि नावाचे मासे, पाणहत्ती, नक्र व तिमिंगल नावाचे जलचर ह्यांनी गजबजून गेलेल्या - उदधेः - समुद्रापासून - अग्रतः - प्रथम - महोल्बणं - मोठे - हालाहलह्वं - हालाहल नावाचे - विषं - विष - अभूत् - उत्पन्न झाले. ॥१८॥

अंग - हे राजा - उग्रवेगं - भयंकर वेगाच्या - उत्सर्पत् - उसळणार्‍या - अप्रति - अप्रतिम - दिशिदिशि - प्रत्येक दिशेला - उपरि - वरती - अधः - खाली - विसर्पत् - पसरणार्‍या - तत् - त्या - असह्यं - सहन न होणार्‍या - भीताः - भ्यालेल्या - सेश्वराः - अधिपतींसह - प्रजाः - प्रजा - अरक्ष्यमाणाः - कोणाकडूनही रक्षिल्या न जाणार्‍या अशा - सदाशिवं - शंकराला - शरणं - शरण - दुद्रुवुः - गेले. ॥१९॥

त्रिलोक्याः - त्रैलोक्याच्या - भवाय - उत्कर्षाकरिता - देव्या - पार्वतीसह - अद्रौ - पर्वतावर - आसीनं - असलेल्या - मुनीनां - ऋषींना - अभिमतं - मान्य अशा - अपवर्गहेतोः - लोकांना मुक्ती मिळावी म्हणून - तपः - तपश्चर्या - जुषाणं - करणार्‍या - तं - त्या - देववरं - शंकराला - विलोक्य - पाहून - स्तुतिभिः - स्तोत्रांच्या पठणाने - प्रणेमुः - नमस्कार करित्या झाल्या. ॥२०॥

देवदेव - देवांचाही देव अशा - महादेव - हे महादेवा - भूतात्मन् - भूतांच्या अंतर्यामी राहणार्‍या - भूतभावन - सृष्टीचे पालन करणार्‍या - शरणापन्नान् - शरण आलेल्या - नः - आम्हाला - त्रैलोक्यदहनात् - त्रैलोक्याला जाळणार्‍या - विषात् - विषापासून - त्राहि - रक्षण कर. ॥२१॥

त्वं - तू - सर्वजगतः - सर्व जगाच्या - बन्धमोक्षयोः - बंधनाला व मोक्षाला - एकः - एकटा - ईश्वरः - देण्यास समर्थ - कुशलाः - ज्ञानी पुरुष - प्रपन्नार्तिहरं - शरण आलेल्यांच्या पीडा दूर करणार्‍या - गुरुं - श्रेष्ठ अशा - तं - त्या - त्वां - तुला - अर्चन्ति - पूजितात. ॥२२॥

स्वदृक् - हे स्वतःसिद्धज्ञानसंपन्ना - भूमन् - हे सर्वव्यापक - विभो - हे समर्था - गुणमय्या - त्रिगुणात्मक - स्वशक्त्या - आपल्या मायारूप शक्तीने - अस्य - ह्या जगाच्या - सर्गस्थित्यप्ययान् - उत्पत्ति, स्थिति व संहार ह्या कृत्यांना - यदा - जेव्हा - धत्से - चालवितोस - तदा - त्यावेळी - ब्रह्मविष्णुशिवाभिघां - ब्रह्मदेव, विष्णु, व शंकर ह्या संज्ञा - धत्से - धारण करितोस. ॥२३॥

सदसद्भावभावनः - उच्चनीच वस्तु उत्पन्न करणारा - त्वं - तू - परमं - श्रेष्ठ - गुह्यं - गोपनीय - ब्रह्म - ब्रह्म - नानाशक्तिभिः - अनेक शक्तींनी - आभातः - भासलेला - त्वं - तू - आत्मा - अंतर्यामी असा - जगदीश्वरः - जगाचा अधिपति ॥२४॥

त्वं - तू - शब्दयोनिः - वेदांना उत्पन्न करणारा - जगदादिः - जगाचा आदि - प्राणेन्द्रियद्रव्यगुणस्वभावः - प्राण, इंद्रिये, द्रव्य, गुण व अहंकार ही सर्व ज्याची स्वरूपे आहेत असा - आत्मा - आत्मा - कालः - काल - क्रतुः - यज्ञ - सत्यं - सत्य - ऋतं - ऋत - धर्मं - धर्म - च - आणि - यत् - जे - त्रिवृत् - त्रिगुणात्मक - अक्षरं - ओम्‌काररूपी ब्रह्म - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आमनन्ति - मानितात. ॥२५॥

अखिल देवतात्मा - संपूर्ण देवतांचा आत्मा - अग्निः - अग्नि - ते - तुझे - मुखं (अस्ति) - मुख आहे - लोकभव - हे लोकरक्षका शंकरा - क्षिंतिं - पृथ्वीला - अङिपङकजं - तुझे चरणकमळ - कालं - काळाला - अखिलदेवतात्मनः - सर्व देवतात्मक अशा - ते - तुझी - गतिम् - गति - दिशः - दिशांना - कर्णौ - कान - च - आणि - जलेशं - वरुणाला - रसनं - जिव्हा - विदुः - असे जाणतात. ॥२६॥

भगवान् - हे शंकरा - नभः - आकाश - ते - तुझी - नाभिः (अस्ति) - बेंबी होय - नभस्वान् - वायु - श्वसनं - श्वासोच्छ्‌वास - सूर्यः - सूर्य - चक्षूंषि - डोळे - च - आणि - जलं - उदक - रेतः (अस्ति) - वीर्य होय - तव - तुझा - आत्मा - आत्मा - परावरात्माश्रयणं - उच्चनीच जीवांचा आश्रय - सोमः - चंद्र - मनः - मन - द्यौः - स्वर्ग - ते - तुझे - शिरः - मस्तक - (अस्ति) स्म - होय. ॥२७॥

त्रयीमयात्मन् - हे वेदस्वरूपा शंकरा - समुद्राः - समुद्र - कुक्षिः - उदर - गिरयः - पर्वत - अस्थिसंघा - अस्थिसमुदाय - सर्वौषधिवीरुधः - संपूर्ण औषधि व वेली - ते - तुझे - रोमाणि - केस - साक्षात् - प्रत्यक्ष - छंदांसि - सात छंद - तव - तुझे - सप्त - सात - धातवः - धातु - सर्वधर्मः - संपूर्ण धर्म - हृदयं - हृदय. ॥२८॥

ईश - हे समर्था - देव - शंकरा - पञ्चोपनिषदः - पाच उपनिषदे - तव - तुझी - मुखानि - मुखे होत - यैः - ज्यांनी - त्रिंशदष्टोत्तरमंत्रवर्गः (भवति) - अडतीस मंत्रांचा समुदाय होता - यत् - जे - शिवाख्यं - शिव नावाने प्रसिद्ध - परमार्थतत्त्वं - परब्रह्मरूपी श्रेष्ठ तात्त्विक अर्थमय स्वरूप - स्वयंज्योतिः (अस्ति) - स्वयंप्रकाश आहे - तत् - ते - ते - तुझे - अवस्थितिः - पूर्णावस्थायुक्त स्थान होय. ॥२९॥

देव - हे शंकरा - अधर्मो र्मिषु - अधर्मरूपी लाटामध्ये - यैः - ज्यांनी केलेला - विसर्गः - संहार - तु - तर - तव - तुझी - छाया - छाया - सत्त्वरजस्तमांसि - सत्त्व, रज व तम हे - नेत्रमयं - तीन डोळे - छंदोमयः - वेदरूपी - पुराणः - अति प्राचीन - ऋषिः - ऋषि - सांख्यात्मनः - सांख्यशास्त्रप्रतिपादक अशा - शास्त्रकृतः - शास्त्रे निर्माण करणार्‍या - ईक्षा - अवलोकन. ॥३०॥

गिरित्र - हे शंकरा - ते - तुझे - परं - श्रेष्ठ - ज्योतिः - तेज - अखिललोकपालविरिञ्चवैकुण्ठसुरेन्द्रगम्यं - संपूर्ण लोकपाल, ब्रह्मदेव, विष्णु व इंद्र ह्यांना कळण्याजोगे - न - नाही - यत्र - जेथे - रजः - रजोगुण - तमः - तमोगुण - च - आणि - सत्त्वं - सत्त्वगुण - न - नाही - यत् - जे - निरस्तभेदं - भेदभावरहित असे - ब्रह्म (अस्ति) - ब्रह्म होय. ॥३१॥

कामाध्वरत्रिपुरकालगराद्यनेकभूतद्रुहः - मदन, दक्षयज्ञ त्रिपुरासुर, कालविष इत्यादि भूतांना छळणार्‍या अनेकांना - क्षपयतः - मारून टाकणार्‍या - ते - तुझे - तत् - ते चरित्र - स्तुतये - स्तुतीला - न (अलं अस्ति) - पुरणार नाही - यः तु - जो तर - अन्तकाले - प्रलयकाळी - आत्मकृतं - स्वतः निर्मिलेले - इदं - हे जग - स्वनेत्रवन्हिस्फुलिंङगशिखया - आपल्या नेत्राग्नीच्या ठिणग्यांनी व ज्वालांनी - भसितं - भस्म केलेले - न वेद - जाणत नाही. ॥३२॥

ये - जे - आत्मरामगुरुभिः - आत्म्याच्याच ठिकाणी आराम पावल्यामुळे मोठेपणाला पावलेल्या ज्ञानांनी - हृदि - हृदयामध्ये - चिन्तिताङ्‌घ्रिद्वंद्वं - ज्याच्या पादयुगुलाचे चिंतन केले आहे अशा - तपसा अभितप्तं - तपश्चर्येने तेजस्वी झालेल्या - त्वां - तुला - उमया चरन्तं - पार्वतीसह संचार करणारा - उग्रपुरुषं - भयंकर व कठोर - श्मशाने निरंतं - श्मशानात आसक्त असणारा असे - कत्थन्ते - म्हणतात - ते हातलज्जाः - ते निर्लज्ज - नूनं - खरोखर - तव - तुझ्या - ऊर्ति - लीलेला - (किं) अविदन् - जाणतात काय ॥३३॥

तत् - म्हणून - ब्रह्मादयः - ब्रह्मादिदेव - सदसतोः - सत्पदार्थ व असत्पदार्थ ह्याहून - परतः - पलीकडे असणार्‍या - परस्य - श्रेष्ठ - भ्रूम्नः - व्यापक - तस्य - त्या - ते - तुझ्या - स्वरूपगमने - स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याविषयी - न प्रभवन्ति - समर्थ होत नाहीत - संस्तवने - स्तुती करण्याविषयी - किमुत (प्रभवन्ति) - कसे बरे समर्थ होतील - तत्सर्गसर्वविषयाः - त्याच्या सृष्टीतील सर्व विषय फक्त जाणणारे - वयं तु - आम्ही तर - अपि - सुद्धा - शक्तिमात्रं (स्तवनाय यतामहे) - यथाशक्ति स्तुति करीत आहो ॥३४॥

महेश्वर - हे शंकरा - ते - तुझ्या - एतत् - ह्या - परं - पुढे दिसणार्‍या स्वरूपाला - प्रपश्यामः - आम्ही पाहात आहो - परं - ह्यापेक्षा दुसर्‍या कशालाही - न - पाहात नाही - हि - कारण - अव्यक्तकर्मणः - ज्याची कर्मे गूढ आहेत अशा - ते - तुझे - व्यक्तिः - प्रत्यक्ष दिसणारे स्वरूप - लोकस्य - लोकांच्या - मृडनाय - सुखासाठी - अस्ति - आहे. ॥३५॥

सर्वभूतसुहृत् - सर्व प्राण्यांवर प्रेम करणारा - देवः - शंकर - तासां - ब्रह्मादिदेवांच्या - तत् - त्या - व्यसनं - संकटाला - वीक्ष्य - पाहून - कृपया - दयेने - भृशपीडितः - अत्यंत पीडित झालेला - सतीं - साध्वी अशा - प्रियां - प्रिय पार्वतीला - इदं - याप्रमाणे - आह - म्हणाला. ॥३६॥

अहो भवानि - हे पार्वती - बत - अरेरे - क्षीरोदमथनोद्भ्‌तात् - क्षीरसमुद्राचे मंथन केल्यामुळे उत्पन्न झालेल्या - कालकूटात् - कालकूट विषापासून - उपस्थितं - उत्पन्न झालेले - एतत् - हे - प्रजानां - लोकांचे - वैशसं - दुःख - पश्य - पाहा. ॥३७॥

हि - खरोखर - प्राणपरीप्सूनां - प्राणरक्षणाची इच्छा करणार्‍या - आसां - ह्या ब्रह्मादि देवांना - मे - माझ्याकडून - अभयं - अभय - विधेयं - दिले गेले पाहिजे - यत् - कारण - दीनपरिपालनं - दीनांचे रक्षण - एतावान् - हा - प्रभोः - प्रभुशब्दाचा - अर्थः (अस्ति) - अर्थ होय. ॥३८॥

आत्ममायया मोहितेषु बद्धवैरेषु भूतेषु - आपल्या मायेने मोहून गेल्यामुळे प्राणी परस्परांशी वैर करू लागले असता - साधवः - साधु - क्षणभङ्‌गुरैः स्वैः प्राणैः - क्षणांत नाश पावणार्‍या आपल्या प्राणांनी - प्राणिनः - प्राण्यांचे - पान्ति - रक्षण करितात. ॥३९॥

भद्रे - हे कल्याणकारिणी पार्वती - कृपयतः - दया करणार्‍या - पुंसः - पुरुषावर - सर्वात्मा - सर्वव्यापी - हरिः - श्रीविष्णु - प्रीयेत - प्रसन्न होतो - भगवति हरौ प्रीते - सर्वैश्वर्यसंपन्न श्रीविष्णु प्रसन्न झाला असता - सचराचरः - स्थावरजंगमात्मक प्राण्यांसह - अहं - मी - प्रीये - प्रसन्न होतो - तस्मात् - त्याकरिता - इदं - हे - गरं - विष - भुञ्जे - भक्षण करितो - मे - माझ्या - प्रजानां - प्रजेचे - स्वस्ति - कल्याण - अस्तु - असो. ॥४०॥

विश्वभावनः - जगद्रक्षक - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न शंकर - भवानीं - पार्वतीला - एवं - याप्रमाणे - आमन्त्र्य - सांगून - तत् - ते - विषं - विष - जग्धुं - खाण्यास - आरेभे - आरंभ करिता झाला - प्रभावज्ञा - सामर्थ्य जाणणारी - अन्वमोदत - अनुमोदन देती झाली. ॥४१॥

ततः - नंतर - भूतभावनः - प्राण्यांचे रक्षण करणारा - महादेवः - शंकर - कृपया - दयेने - व्यापि - व्यापणारे - हालाहलं - हालाहलनामक - विषं - विष - करतलीकृत्य - ओंजळीत घेऊन - अभक्षयत् - भक्षण करिता झाला. ॥४२॥

जलकल्मषः - पाण्याचा दोषच असे ते विष - तस्य अपि - शंकरालासुद्धा - स्ववीर्यं - आपला पराक्रम - दर्शयामास - दाखविते झाले - यत् - जे विष - (तत्) गले - ते कंठाच्या ठिकाणी - नीलं - निळा रंग - चकार - उत्पन्न करिते झाले - तत् च - तेसुद्धा - साधोः - सज्जनांचे - विभूषणं - भूषणच होय. ॥४३॥

साधवः - साधु - जनाः - पुरुष - प्रायशः - बहुतकरून - लोकतापेन - लोकांच्या दुःखाने - तप्यन्ते - पीडित होतात - हि - कारण - तत् - ते - अखिलात्मनः - सर्वांतर्यामी - पुरुषस्य - परमेश्वराचे - परं - श्रेष्ठ - आराधनं - पूजन होय. ॥४४॥

देवदेवस्य - देवांचाही देव अशा - मीढुषः - सुखदायक - शंभोः - शंकराचे - तत् - ते - कर्म - कृत्य - निशम्य - ऐकून - प्रजाः - प्रजा - दाक्षायणी - पार्वती - ब्रह्मा - ब्रह्मदेव - च - आणि - वैकुण्ठः - विष्णु - शशंसिरे - प्रशंसा करू लागले. ॥४५॥

पिबतः (शंकरस्य) - पिणार्‍या शंकराच्या - पाणेः - हातातून - यत् - जे - किंचित् - थोडेसे - प्रस्कन्नं - गळून पडले - तत् - ते विष - वृश्चिकाहिविषौषध्यः - विंचू, साप, व विषारी औषधि - च - आणि - ये - जे - अपरे - दुसरे - दंदशूकाः (सन्ति) - दंश करणारे विषारी प्राणी आहेत - जगृहुः स्म - स्वीकरिते झाले. ॥४६॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय सातवा समाप्त

GO TOP