|
श्रीमद् भागवत महापुराण
षष्ठ स्कंध - अध्याय ४ था - अन्वयार्थ
दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव - त्वया तु स्वायंभुवे अन्तरे देवासुरनृणां नागानां मृगपक्षिणां यः सर्गः सामासिकः प्रोक्तः तू तर स्वायंभुव मन्वन्तरातील देव, दैत्य व मनुष्य यांची नाग, पशु व पक्षी यांची जी सृष्टी संक्षेपाने सांगितली ॥ १ ॥ भगवन् तस्य एव व्यासं यथा भगवान् परः यथा शक्त्या अनुसर्गं ससर्ज ते ज्ञातुं इच्छामि हे शुकाचार्य त्याच सृष्टीचा विस्तार ज्या प्रकारे ऐश्वर्यवान परमेश्वर ज्या आपल्या शक्तीने पहिल्या सृष्टीच्या नंतर उत्पन्न करिता झाला तुझ्यापासून जाणण्याची मी इच्छा करितो ॥ २ ॥ मुनिसत्तमाः इति महायोगी बादरायणिः राजर्षेः संप्रसश्नं आकर्ण्य (च) प्रतिनंद्य जगाद हे शौनकादि श्रेष्ठ ऋषि हो याप्रमाणे महायोगी शुकाचार्य राजर्षि परीक्षिताच्या उत्तम प्रश्नाला श्रवण करुन व त्याचे अभिनंदन करुन बोलला ॥ ३ ॥ यदा प्राचीनबर्हिषः पुत्राः दश प्रचेतसः अन्तः समुद्रात् उन्मग्नाः (तदा) गां द्रुमैः वृतां ददृशुः ज्यावेळी प्राचीनबर्हि राजाचे मुलगे दहा प्रचेते समुद्रातून बाहेर आले तेव्हा पृथ्वीला वृक्षांनी आच्छादिलेली पहाते झाले ॥ ४ ॥ तपोदीपितमन्यवः ते द्रुमेभ्यः क्रुध्यमानाः तद्दिधक्षया मुखतः वायुं च अग्निं ससृजुः तपश्चर्येने ज्यांचा क्रोध प्रदीप्त झाला आहे असे ते प्रचेते वृक्षांवर रागावणारे ते जाळण्याच्या इच्छेने तोंडातून वायूला आणि अग्नीला उत्पन्न करिते झाले ॥ ५ ॥ कुरुद्वह ताभ्यां निर्दह्यमानान् तान् उपलभ्य महान् सोमः राजा मन्युं प्रशमयन् इव उवाच हे कुरुकुलोद्धारका परीक्षिता तो वायु व अग्नि यांनी सर्वस्वी जळून जाणार्या त्या वृक्षांना पाहून मोठा सोमनावाचा औषधींचा राजा क्रोधाला शांत करीतच की काय बोलला ॥ ६ ॥ महाभागाः दीनेभ्यः वृक्षेभ्यः द्रोग्धुं मा अर्हथ यूयं विवर्धयिषवः प्रजानां पतयः स्मृताः हे महासमर्थ प्रचेते हो दीन वृक्षांना नष्ट करण्यास तुम्ही योग्य नाही तुम्ही सृष्टीची पुष्कळ वृद्धि करण्याची इच्छा करणारे प्रजेचे स्वामी म्हटलेले आहा ॥ ७ ॥ अहो प्रजापतिपतिः भगवान् अव्ययः प्रभुः हरिः वनस्पतीन् च औषधीः (प्रजानां) ऊर्जमिषं ससर्ज अहो प्रजापतींचा अधिपति, ऐश्वर्यसंपन्न, अविनाशी व समर्थ परमेश्वर वनस्पतींना आणि औषधींना प्रजांचे भक्ष्य अन्न म्हणून उत्पन्न करिता झाला ॥ ८ ॥ अचराः चराणां अन्नं हि अपदः पादचारिणां अन्नम् अहस्ताः हस्तयुक्तानां (भक्ष्यं) च चतुष्पदः द्विपदां झाडे इत्यादि स्थावर पदार्थ जंगम प्राण्यांचे भक्ष्य होत तसेच पाय नसणारे गवत इत्यादिक पदार्थ पायांनी चालणार्या प्राण्यांचे भक्ष्य होत हात नसणारे मासे वगैरे पदार्थ हात असणार्या प्राण्यांचे भक्ष्य होत आणि चार पाय असणारे मेंढरे आदिकरुन पशु दोन पायांच्या मनुष्यप्राण्याचे भक्ष्य होत ॥ ९ ॥ अनघाः पित्रा च देवदेवेन प्रजासर्गाय अन्वादिष्टाः यूयम् वृक्षान् निर्दग्धुं कथं हि अर्हथ हे पुण्यपुरुषांनो पित्याने आणि ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न करण्याकरिता आज्ञापिलेले तुम्ही वृक्षांना जाळण्याकरिता कसे बरे योग्य व्हाल ॥ १० ॥ वः पित्रा पितामहेन प्रपितामहैः अपि जुष्टं सतां मार्गं आतिष्ठत दीपितं कोपं यच्छत तुमच्या पित्याने, आजोबाने व पणजोबानेसुद्धा सेविलेल्या उत्तम मार्गाचा आश्रय करा प्रदीप्त झालेल्या कोपाला आवरा ॥११ ॥ पितरौ तोकानां बन्धुः दृशः (बंधुः) पक्ष्म स्त्रियः (बंधुः) पतिः भिक्षूणां (बंधुः) गृही अज्ञानां सृहृत् बुधः प्रजानां पतिः (युष्मादृशाः प्रजापतयः) आई बाप मुलांचे हितकारी होत नेत्रांचे रक्षण करणारी पापणी होय स्त्रीसंरक्षक भर्ता होय संन्याशांचा आधार असा गृहस्थाश्रमी होय अज्ञानी लोकांचा हितकर्ता ज्ञानी पुरुष होय प्रजांचे पालक तुम्हासारखे प्रजापति होत ॥ १२ ॥ भूतानां अन्तर्देहेषु ईश्वरः हरिः आत्मा आस्ते सर्वं तद्धिष्ण्यं ईक्षध्वं एवं असौ वः तोषितः प्राण्यांच्या ह्रदयात ऐश्वर्यसंपन्न विष्णु आत्मस्वरुपाने वास करीत आहे संपूर्ण पदार्थ मात्र परमेश्वराचे वसतिस्थान आहे असे पहा ह्या प्रमाणे हा परमेश्वर तुम्ही संतुष्ट केला होता ॥ १३ ॥ यः आकाशात् समुत्पतितं उल्बणं मन्युं आत्मजिज्ञासया यच्छेत् सः गुणान् अतिवर्तते जो आकाशातून एकाएकी पडलेल्या भयंकर अशा कोपाला आत्मज्ञानाच्या इच्छेने नियमन करील तो गुणांना अतिक्रमण करितो ॥ १४ ॥ दग्धैः दीनैः द्रुमैः अलं खिलानां च वः शिवं अस्तु हि एषा वाक्षीं वरा कन्या पत्नीत्वे (युष्माभिः ) प्रतिगृह्यतां बिचारे वृक्ष जेवढे जळाले तेवढेच पुरेत उरलेल्यांचे आणि तुमचे कल्याण असो आता ही वृक्षांनी बाळगिलेली श्रेष्ठ मुलगी स्त्रीच्या नात्याने तुम्हाकडून स्वीकारली जावो ॥ १५ ॥ नृप सोमः राजा इति आमन्त्र्य वरारोहां कन्यां दत्त्वा ययौ ते धर्मेण (ता) उपयेमिरे हे राजा सोम राजा याप्रमाणे सांगून रुपवती उपवर झालेल्या अप्सरेच्या मुलीला देऊन जाता झाला ते प्रचेते धर्मानुसार तिच्याशी विवाह करिते झाले ॥ १६ ॥ तेभ्यः तस्यां प्राचेतसः दक्षः समभवत् किल यस्य प्रजाविसर्गेण त्रयः लोकाः आपूरिताः त्या प्रचेत्यांपासून त्या कन्येच्या पोटी प्राचेतस नावाचा दक्ष उत्पन्न झाला खरोखर ज्या दक्षाच्या संततीने तीन लोक भरुन गेले ॥ १७ ॥ दुहितृवत्सलः दक्षः रेतसा मनसा एव यथा भूतानि ससर्ज तत् मम अवहितः शॄणु कन्यांवर प्रेम करणारा दक्ष वीर्याने आणि मनानेच ज्या रीतीने प्राण्यांना उत्पन्न करिता झाला ते माझ्यापासून सावधानपणाने तू ऐक ॥ १८ ॥ प्रजापतिः पूर्वं मनसा एव इमाः नभस्थलजलौकसः देवासुर मनुष्यादिन् प्रजा असृजत् दक्षप्रजापति प्रथम मनानेच ह्या आकाश, भूमि व पाणी ह्याठिकाणी रहाणार्या देव, दैत्य व मनुष्ये इत्यादि प्रजा उत्पन्न करिता झाला ॥ १९ ॥ सः प्रजापतिः तं प्रजासर्गं अबृहित आलोक्य विन्ध्यपादान् उपव्रज्य दुष्करं तपः अचरत् तो प्रजापति त्या प्रजेच्या सृष्टीला न वाढलेली पाहून विंध्याद्रीच्या पायथ्यांशी जाऊन घोर तप करिता झाला ॥ २० ॥ तत्र अघमर्षणं नाम परं पापहरं अनुसवनं उपस्पृश्य तपसा हरिं अतोषयत् त्या ठिकाणी अघमर्षण नावाच्या श्रेष्ठ पापनाशक तीर्थात त्रिकाळ स्नान करुन तपश्चर्येने परमेश्वराला संतोषविता झाला ॥ २१ ॥ हंसगुह्येन अधोक्षजं भगवंतं अस्तौषीत् यतः हरिः कस्य अतुष्यत् तत् तुभ्यं अभिधास्यामि हंसगुह्यनामक स्तोत्राने इंद्रियाना अगोचर अशा परमेश्वराला स्तविता झाला ज्यामुळे परमेश्वर दक्षावर प्रसन्न झाला ते स्तोत्र तुला सांगतो ॥ २२ ॥ अवितथानुभूतये परायगुणत्रयाभासनिमित्तबंधवे गुणतत्त्वबुद्धिभिः अदृष्टधाम्ने निवृत्तमानाय स्वयंभुवे नमः दधे ज्याची चिच्छवित मिथ्या नाही अशा श्रेष्ठ व तीन गुणांमुळे प्रतीतीस येणारा जो जीव व त्या गुणांचे कारण जी माया यांचा नियामक अशा गुणांच्या ठिकाणी तत्त्वबुद्धि झालेल्या जीवांना ज्यांचे स्वरुप पाहिले नाही अशा ज्याला देशकालाची इयत्ता नाही अशा दुसर्या कोणापासून उत्पन्न न झालेल्या परमेश्वराला नमस्कार करितो ॥ २३ ॥ अस्मिन् पुरे वसन् सखा पुरुषः संवसतः व्यक्तदृष्टेः यस्य सख्युः सख्यं न अवैति गुणितः (सख्यं) गुणः (न अवैति) तस्मै महेशाय नमस्करोमि ह्या देहात राहणारा मित्र असा पुरुष एकत्र राहणार्या प्रपंचाचा द्रष्टा अशा ज्या मित्राचे मित्रत्व जाणत नाही जसे इंद्रियांचे प्रकाशकत्व विषयाला कळून येत नाही त्या महासमर्थाला नमस्कार करितो ॥ २४ ॥ देहः असवः अक्षाः मनवः भूतमात्राः आत्मानं च अन्यं यत् परं न विदुः पुमान् सर्वं च गुणान् वेद तज्ज्ञः सर्वज्ञं न वेद अनंतं ईडे देह, प्राण, इंद्रिये, अंतःकरणे व सूक्ष्म भूते स्वतःला आणि दुसरे जे आपल्याहून भिन्न याला जाणत नाहीत जीव सर्व पदार्थांना व तीन गुणांना जाणतो ते सर्व जाणणारा असूनहि परमेश्वराला जाणत नाही त्या श्रीहरीला मी स्तवितो ॥ २५ ॥ यदा नामरुपरुपस्य मनसः दृष्टस्मृतिसंप्रमोषात् उपरामः यः केवलया स्वसंस्थया ईयते तस्मै शुचिसद्मने हंसाय नमः जेव्हा विषय, नाव व रुप यांचा बोध करुन देणार्या मनाचा दर्शन व स्मरण यांच्या नाशामुळे तल्लीनपणा होतो तेव्हा जो केवळ स्वरुपज्ञानाने प्रत्ययास येतो शुद्ध मन हे ज्याचे वसतिस्थान आहे अशा या हंसरुपी ईश्वराला नमस्कार असो ॥ २६ ॥ मनीषिणः मनीषया अंतर्हृदि संनिवेशितं त्रिवृद्भिः नवभिः स्वशक्तिभिः गूढं यथा दारुणि पांचदश्यं वह्निं निष्कर्षन्ति विचारी पुरुष आपल्या बुद्धीने ह्रदयात स्थापिलेल्या तिहींनी गुणिलेल्या स्वतःच्या नऊ शक्तींनी झाकलेल्या ईश्वराला काष्ठातील पंधरा सामिधेनी मंत्रांनी मंथन केलेल्या अग्नीप्रमाणे शक्तींपासून ओढून वेगळा करितात ॥ २७ ॥ सः अशेषविशेषमायानिषेधनिर्वाणसुखानुभूतिः वै सः सर्वनामा च सः विश्वरुपः मन प्रसीदतां तो संपूर्ण चमत्कारिक पदार्थ जिची कार्ये आहेत अशा मायेला दूर करुन अत्यंत सुख अनुभवणारा खरोखर तो ज्याला सर्व नावे शोभतात असा आणि ज्यावर मायाशक्ति आरोपिली जात नाही असा तो परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होवो ॥ २८ ॥ यत् यत् वचसा निरुवंत अक्षभिः वा मनसा वा उत धिया निरुपितं तत् तत् गुणरुप यस्य स्वरुपं मा भूत् हि सः वै गुणापायविसर्गलक्षणः जे जे वाणीने सांगितले इंद्रियांनी किंवा मनाने अथवा बुद्धीने वर्णन केलेले ते ते गुणात्मक ज्याचे स्वरुप नाही कारण तो खरोखर गुणांची उत्पत्ति व नाश करणे हेच ज्याचे लक्षण आहे असा ॥ २९ ॥ यः यत् येन यस्मै यतः यस्य यस्मिन् यथा कुरुते च कार्यते तत् परावरेषां परमं प्राक् प्रसिद्धं तद्धेतुः अनन्यत् एकं ब्रह्म जो ज्याला ज्याने ज्याकरिता ज्यापासून ज्यासंबंधी ज्याच्या आधारावर आणि जसे करितो आणि करवितो ते लहान व मोठ्या कारणांचे मुख्य कारण पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले सर्व कार्यांचे कारण विजातीयभेदाने रहित असे ब्रह्म अद्वितीय होय ॥ ३० ॥ यच्छक्तयः वदतां वादिनां वै विवादसंवादभुवः भवन्ति च एषां आत्ममोहं मुहुः कुर्वति तस्मै अनंतगुणाय भूम्ने नमः ज्याच्या शक्ति संभाषण करणार्यांच्या व वादी लोकांच्या खरोखर वाद व संवाद यांचा विषय होऊन राहिल्या आहेत आणि ह्या मीमांसक इत्यादि लोकांना बुद्धिभ्रमाला वारंवार उत्पन्न करितात त्या अनंतशक्तियुक्त व्यापक परमेश्वराला नमस्कार असो ॥ ३१ ॥ अस्ति इति च न अस्ति इति वस्तुनिष्ठयोः भिन्नविरुद्धधर्मयोः एकस्थयोः योगसांख्ययोः समं किंचन अवेक्षितं तत् परं हि अनुकूलं बृहत् आहे असे आणि नाही असे वस्तूवर रहाणार्या भिन्न व विरुद्ध धर्म ज्यात आहेत अशा एकावर प्रतिपादन करणार्या योग व सांख्य या शास्त्रांना सारखे जे काही दिसून आलेले आहे खरोखर ते श्रेष्ठ व दोन्ही शास्त्रांना अनुकूल ब्रह्म होय ॥ ३२ ॥ अनामरुपः यः अनंतः भगवान् पादमूलं भजतां अनुग्रहार्थं जन्मकर्मभिः नामानि च रुपाणि भेजे सः परमः मह्यं प्रसीदतु नामरुपातीत जो अनंत शक्तिमान परमेश्वर स्वतःच्या चरणकमलाची सेवा करणार्यांवर अनुग्रह करण्याकरिता जन्म व कर्म यांनी नावे आणि रुपे स्वीकारितो तो परमेश्वर माझ्यावर प्रसन्न होवो ॥ ३३ ॥ यथा पार्थिवं गुणं आश्रितः अनलः तथा यः प्राकृतैः ज्ञानपथैः यथाशयं जनानां देहगतः विभाति सः ईश्वरः मे मनोरथं कुरुतात् ज्याप्रमाणे पृथ्वीपासून उत्पन्न होणार्या गुणाला आश्रय धरुन राहिलेला वायु त्याप्रमाणे जो अर्वाचीन उपासनामार्गांनी वासनारुप लोकांच्या देहात नानाप्रकारचा भासतो तो ईश्वर माझ्या मनोरथाला पूर्ण करो ॥ ३४ ॥ कुरुश्रेष्ठ इति तस्मिन् अघमर्षणे स्तुतः सः भक्तवत्सलः भगवान् संस्तुवतः आविरासीत् हे परीक्षित राजा याप्रमाणे त्या अघमर्षणतीर्थात स्तविलेला तो भक्तांवर प्रेम करणारा परमेश्वर स्तुति करणार्या दक्षाच्या पुढे प्रकट झाला ॥ ३५ ॥ सुपर्णासे कृतपादः प्रलंबाष्टमहाभुजः चक्रशंखासिचर्मेषुधनुः पाशगदाधरः गरुडाच्या खांद्यावर पाय ठेविलेला आणि लांब व मोठे आठ हात धारण केलेला अनुक्रमाने एकेका हातात चक्र, शंख, तलवार, ढाल, बाण, धनुष्य, पाश व गदा अशी आयुधे ज्याने धारण केली आहेत असा ॥ ३६ ॥ पीतवासाः घनश्यामः प्रसन्नवदनेक्षणः वनमालानिवीतांगः लसच्छ्रीवत्सकौस्तुभः पिवळे वस्त्र नेसलेला व मेघाप्रमाणे श्यामवर्णाचा मुख व नेत्र प्रसन्न असलेला गळ्यात वनमाळा लोंबत आहे ज्याच्या असा शोभत आहे श्रीवत्सकौस्तुभ ज्याच्या गळ्यात असा ॥ ३७ ॥ महाकिरीटकटकस्फुरन्मुकुटकुंडलः काञ्च्यङ्गुलीवलयनूपुरांगदभूषितः मस्तकावर मोठा मुकुट व हातात कडी धारण केलेला व कानात मकराकार कुंडले शोभत आहेत असा कमरपट्टा, अंगठ्या, साखळ्या, पैंजणे व बाहुभूषणे यांनी भूषित झालेला ॥ ३८ ॥ त्रिभुवनेश्वरः त्रैलोक्यमोहनं रुपं बिभ्रत् नारदनंदाद्यैः पार्षदैः सुरयूथपैः वृतः त्रैलोक्याचा स्वामी त्रैलोक्याला मोहित करणार्या रुपाला धारण करणारा नारद, नंद इत्यादि बाजूला उभे रहाणार्या सेवकांनी देवांच्या समुदायांनी वेष्टिलेला ॥ ३९ ॥ अनुगायद्भिः सिद्धगंधर्वचारणैः स्तूयमानः तत् महदाश्चर्यं रुपं आ विचक्ष्य गतसाध्वसः प्रह्रष्टात्मा प्रजापतिः भूमौ दण्डवत् ननाम गायन करणार्या सिद्ध, गंधर्व व चारण यांनी स्तविलेला असे ते मोठे आश्चर्यकारक रुप आसमंतात पाहून निष्पाप व ज्याचे अंतःकरण आनंदित झाले आहे असा दक्षप्रजापति पृथ्वीवर काठीप्रमाणे साष्टांग नमस्कार करिता झाला ॥ ४० ॥ तीव्रया मुदा आपूरित मनोद्धारैः निर्झरैः (पूरिताः) हनदिन्यः इव किंचन उदीरयितुं न अशकत् अत्यंत हर्षामुळे सर्व इंद्रिये चोंदल्यासारखी झाल्यामुळे चोहोंकडून पाझर सुटल्यामुळे भरलेल्या नद्यांप्रमाणे काहीसुद्धा बोलण्यास समर्थ झाला नाही ॥ ४१ ॥ सर्वभूतानां चित्तज्ञः जनार्दनः तथा अवनतं तं भक्तं व्रजाकामं प्रजापतिं इदं आह सर्व प्राण्यांच्या मनातील जाणणारा परमेश्वर त्याप्रमाणे नम्र अशा त्या भगवद्भक्त व प्रजेची इच्छा पूर्ण करणार्या दक्षप्रजापतीला हे बोलला ॥ ४२ ॥ महाभाग प्राचेतस भवान् तपसा संसिद्धः यत् मत्परयाश्रद्धया मयि परं भावं गतः थोर भाग्यसंपन्न हे प्राचेतसा दक्षा तू तपाने पूर्णपणे सिद्ध झाला आहेस कारण मद्विषयक श्रद्धेने माझ्या ठिकाणी श्रेष्ठ भक्तीला प्राप्त झालास ॥ ४३ ॥ प्रजानाथ अहं ते प्रीतः यत् ते तपः अस्य उद्बृहणं मम एषः कामः यत् भूतानां विभूतयः भुयासुः हे प्रजापते दक्षा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे कारण तुझे तप ह्या जगाची वृद्धि करणारे आहे माझा हा हेतु की प्राण्यांची समृद्धि व्हावी ॥ ४४ ॥ हि ब्रह्मा भवः च भवन्तः मनवः विबुधेश्वराः भूतानां भूतिहेतवः एताः मम विभूतयः कारण ब्रह्मदेव, शंकर व तुम्ही प्रजापति मनु व मोठमोठे देव प्राण्यांचे उत्पत्तिकर्ते ह्या माझ्या विभूति होत ॥ ४५ ॥ ब्रह्मन् तपः यमनियमादि मे ह्रदयं (अस्ति) विद्या (मे) तनुः क्रिया (मे) आकृतिः जाताः क्रतवः (मे) अंगानि (सन्ति) धर्मः (मे) आत्मा सुराः (मे) असवः सन्ति हे दक्षप्रजापते अंगांसहित ध्यान माझे हृदय होय अंगांसह मंत्रांचा जप माझे शरीर होय ध्यानाविषयी करावयाचे व्यापार माझी आकृति होय उत्तम रितीने अनुष्ठिलेले यज्ञ माझे अवयव होत यज्ञ करुन उत्पन्न झालेले पुण्य माझे मन होय देव माझे प्राण होत ॥ ४६ ॥ अहम् एव अग्रे आसं अन्यत् किंच आंतरं बहिः न (मम स्वरुपं) संज्ञानमात्रं अव्यक्तं विश्वतः प्रसुप्तं इव (आसीत्) मीच प्रथम होतो दुसरे कोणतेहि ग्रहण करणारे ग्रहणाचा विषय नव्हते माझे स्वरुप केवळ चैतन्यमय इंद्रियांना न कळणारे सर्वत्र झोपी गेल्यासारखे होते ॥ ४७ ॥ अनन्तगुणे अनन्ते मयि यदा गुणतः गुणविग्रहः आसीत् ततः एव आद्यः स्वयंभूः अजः समभूत् अपरिमित गुण असणार्या अनंत शक्तिमान अशा माझ्या ठिकाणी ज्या वेळी त्रिगुणात्मक मायेपासून गुणमय शरीर झाले त्यावेळीच आद्य स्वयंभू ब्रह्मदेव उद्भवला ॥ ४८ ॥ यदा वै मम वीर्योपबृहितः सर्गकर्मणि उद्यतः सः महादेवः आत्मानं खिलं इव मेने ज्या वेळी खरोखर माझ्या वीर्याने पुष्ट झालेला सृष्टिरूप कार्य करण्याविषयी सिद्ध झालेला तो ब्रह्मदेव स्वतःला असमर्थ जणू काय मानिता झाला ॥ ४९ ॥ अथ मे अभिहितः देवः दारुणं तपः अतप्यत येन विभुः आदौ युष्मान् नव विश्वसृजः असृजत् नंतर माझ्या आज्ञेवरुन ब्रह्मदेव घोर तप आचरिता झाला ज्यामुळे महासमर्थ असा तो प्रथम तुम्हा नऊ प्रजापतींना उत्पन्न करिता झाला ॥ ५० ॥ अंग प्रजेश असिवनी नाम एषा पंचजनस्य प्रजापतेः वै दुहिता पत्नीत्वे (त्वया) प्रतिगृह्यतां बा प्रजापते दक्षा असिक्री नावाची ही पंचजननावाच्या प्रजापतीची खरोखर मुलगी पत्नी म्हणून तुझ्याकडून स्वीकारली जावी ॥ ५१ ॥ त्वं मिथुन व्यवायधर्मः मिथुनव्यवाय धर्मिण्यां इमं प्रजासर्गं पुनः भूरिशः भावयिष्यसि मैथुनाविषयी प्रेम करणे हाच धर्म आहे ज्याचा असा तू मैथुनविषयक प्रेम करणे हाच धर्म जिच्या अंगी आहे अशा स्त्रीच्या ठिकाणी ह्या प्रजेच्या सृष्टीला पुनः पुष्कळप्रकारे निर्माण करशील ॥ ५२ ॥ त्क्तः अधस्तात् सर्वाः प्रजाः मदीयया मायया मिथुनीभूय भविष्यंति च मे बलिं हरिष्यंति तुझ्यापुढे सर्व प्रजा माझ्या मायारुप स्त्रीशी समागम करुन उत्पन्न होतील आणि मला पूजा अर्पण करितील ॥ ५३ ॥ विश्वभावनः भगवान् हरिः इति उक्त्वा तस्य मिषतः स्वप्नोपलब्धार्थः इव तत्र एव अंतर्दधे सृष्टिपालक ऐश्वर्यवान परमेश्वर याप्रमाणे बोलून तो दक्ष पहात असता स्वप्नात दिसलेल्या वस्तूप्रमाणे तेथेच् गुप्त झाला ॥ ५४ ॥ षष्ठ स्कन्धः - अध्याय चवथा समाप्त |