श्रीमद् भागवत महापुराण

षष्ठ स्कंध - अध्याय २ रा - अन्वयार्थ

विष्णुदूतांकडून भागवत-धर्म-निरूपण आणि अजामिळाचे परमधामगमन -

राजन् ते नयकोविदाः भगवद्‍दूताः एवं यमदूताभिभाषितं उपधार्य अथ तान् प्रत्याहुः हे परीक्षित राजा ते न्यायमार्गात निष्णात विष्णूचे दूत याप्रमाणे यमदूतांचे भाषण ऐकून घेऊन नंतर त्या यमदूतांना उलट बोलिते झाले ॥ १ ॥

अहो कष्टं अधर्मः धर्मदृशां सभां स्पृशते यत्र यैः अदंड्येषु अपापेषु वृथा दण्डः ध्रियते अहो खेद आहे की अधर्म धर्म जाणणार्‍या लोकांच्या सभेला स्पर्श करीत आहे जेथे ज्यांच्याकडून शिक्षेला अयोग्य अशा पातकी नसणार्‍या लोकांच्याठिकाणी व्यर्थ शिक्षा दिली जाते ॥ २ ॥

ये प्रजानां पितरः च शास्तारः समाः साधवः यदि तेषु वैषम्यं स्यात् प्रजाः कं शरणं यांति जे प्रजांचे पिते आणि शिक्षक निःपक्षपाती साधु आहेत जर त्यांच्या ठिकाणी विषमभाव असेल प्रजा कोणाला शरण जातील ॥ ३ ॥

श्रेयान् यत् यत् आचरति इतरः तत् तत् ईहते सः यत् प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते श्रेष्ठ मनुष्य जसे जसे आचरण ठेवितो इतर लोक तसे तसे आचरण करण्यास इच्छितो तो जे प्रमाण करितो लोक त्याला अनुसरुन वागतो ॥ ४ ॥

लोकः यस्य अंके शिर आधाय निर्वृतः स्वपिति तं धर्मं वा अधर्मं यथा पशुः स्वयं नहि वेद लोक ज्याच्या मांडीवर डोके ठेवून सुखी होत्साता झोप घेतो तो धर्म आहे की अधर्म आहे हे जसा पशु त्याप्रमाणे स्वतः जाणत नाही ॥ ५ ॥

भूतानां विश्रम्भणीयः कृतमैत्रं अचेतनं द्रोग्धुं कथं अर्हति प्राण्यांच्या विश्वासाचे स्थान असा मैत्री केलेल्या अजाण अशा प्राण्याला छळण्यास कसा योग्य होतो ॥ ६ ॥

अयं हि जन्मकोट्यंहसां अपि कृतनिर्वेशः अस्ति यत् विवशः स्वस्त्ययनं हरेः नाम सः व्याजहार हा तर कोटि जन्मातील पापांचे सुद्धा प्रायश्‍चित्त केलेला आहे ज्याअर्थी परवश होत्साता कल्याणाचे माहेरघर असे परमेश्वराचे नाव तो उच्चारिता झाला ॥ ७ ॥

हि यत् नारायण आय इति चतुरक्षरं सः जगाद एतेन एव अस्य अघोनः अघनिष्कृतं कृतं स्यात् कारण जे हे नारायण इकडे हे असे चार अक्षराचे नाव तो उच्चारिता झाला एवढ्यानेच ह्या पाप्याच्या पापाचे प्रायश्‍चित्त झाले आहे ॥ ८ ॥

स्तेनः सुरापः मित्रध्रुक् ब्रह्महा गुरुतल्पगः स्त्रीराजपितृगोहन्ताः च ये अपरेः पातकिनः सर्वेषां अघवतां अपि विष्णोः नामव्याहरणं इदं एव सुनिष्कृतम् यतः तद्विषया मतिः भवति चोर व मद्य पिणारा आणि मित्राचा द्वेष करणारा ब्राह्मणाचा वध करणारा व गुरुच्या भार्येशी गमन करणारा स्त्री, राजा, आई, बाप व गाई यांचा वध करणारा आणि जे दुसरे पाप करणारे आहेत त्या सगळ्या पाप्यांचेहि विष्णुचे नामस्मरण करणे हेच उत्तम प्रायश्‍चित्त होय ज्याअर्थी तो विष्णूच आहे विषय जीचा अशी त्या मनुष्याची बुद्धी होते ॥ ९-१० ॥

यथा अघवान् उदाहृतैः हरेः नामपदैः विशुद्ध्यति तथा ब्रह्मवादिभिः उदितैः व्रतादिभिः निष्कृतैः न तत् उत्तमश्लोकगुणोपलम्भकं ज्याप्रमाणे पापी मनुष्य उच्चारिलेल्या परमेश्वराच्या नावाच्या शब्दांनी शुद्ध होतो त्याप्रमाणे वेदवादी लोकांनी सांगितलेल्या व्रते इत्यादि प्रायश्‍चितांनी शुद्ध होत नाही ते नामस्मरण परमेश्वराच्या गुणाची रुचि लावून देणारे आहे ॥ ११ ॥

हि निष्कृते कृते अपि मनः पुनः असत्पथे धावति चेत् तत् ऐकांतिकं न तत् कर्मनिर्हारं अभीप्सतां खलु सत्त्वभावनः हरेः गुणानुवादः खरोखर प्रायश्‍चित्त केले असतानाहि मन पुनः जर पापमार्गाकडे धावत असेल तर ते प्रायश्‍चित्त निश्‍चयाने शुद्धि करणारे नव्हेच ते कर्माचा नाश इच्छिणार्‍यांचे निश्‍चयेकरुन अंतःकरण शुद्ध करण्याचे साधन परमेश्वराचे गुणवर्णन हेच होय ॥ १२ ॥

अथ कृतशेषाघनिष्कृतं एनम् मा अपनयत यत् असौ म्रियमाणः भगवन्‍नाम अग्रहीत् याकरिता सर्व पापांचे प्रायश्‍चित्त ज्याने केले आहे अशा या अजामिळाला घेऊन जाऊ नका ज्याअर्थी हा मरणसमयी ईश्वराचे नाव घेता झाला ॥ १३ ॥

साकेत्यं वा पारिहास्यं स्तोभं वा हेलनं वैकुण्ठनामग्रहणम् एव अशेषाघहर विदुः संकेताने उच्चारिलेले अथवा थट्‍टेने घेतलेले गाण्याच्या सुरात घेतलेले किंवाअवहेलना करुन घेतलेले परमेश्वराचे नामग्रहणच संपूर्ण पापांचा नाश करणारे आहे असे जाणतात ॥ १४ ॥

पतितः स्खलितः भग्नः संदष्टः तप्तः आहतः पुमान् अवशेन हरिः इति आह तहि सः यातनां न अर्हति उंचावरून पडलेला ठेच लागलेला हात व पाय मोडलेला सर्पादिकांनी दंश केलेला ज्वरादिकाने तप्त झालेला मार खाल्लेला पुरुष सहजहि जर हरि हरि असे बोलेल तर तो शिक्षेला योग्य होत नाही ॥१५ ॥

च महर्षिभिः गुरुणां च लघूनां पापानां गुरुणि च लघूनि च प्रायश्‍चित्तानि ज्ञात्वा उक्तानि आणि मोठमोठ्या ऋषींनी मोठ्या आणि लहान पापांची मोठी आणि लहान प्रायश्‍चित्ते जाणून सांगितली आहेत ॥ १६ ॥

तैः तपोदानजपादिभिः तानि अघानि पूयते अधर्मजं तध्दॄदयं न ईशाघ्रिसेवया तत् अपि त्या तपश्‍चर्या, दान व जप इत्यादिकांनी ती पापे पवित्र रूप होतात अधर्मापासून उत्पन्न झालेला त्याच्या मनावरील संस्कार पवित्र होत नाही परमेश्वराच्या चरणसेवेने तो संस्कारहि नष्ट होतो ॥ १७ ॥

अज्ञानात् अथवा ज्ञानात् यत् उत्तमश्‍लोकनाम संकीतितं पुंसः अघं यथा अनलः एधः दहेत् न कळत अथवा समजून जे परमेश्वराचे नाम घेतलेले असते पुरुषाच्या पापाला जसा अग्नि काष्ठाला त्याप्रमाणे जाळते ॥ १८ ॥

यथा वीर्यतमं यदृच्छया उपयुक्तं अगदं अजानतः अपि आत्मगुणं कुर्यात् उदाहृतः मन्त्रः अपि जसे अत्यंत तीव्र व सहज सेवन केलेले औषध न जाणणार्‍यालाहि आपला गुण करिते उच्चारिलेल नाममन्‍त्र सुद्धा पापाचा नाश करितो ॥ १९ ॥

भटाः अस्मिन् धर्मे यदि संशयः वः पति पृच्छत भगवान् सः यमः धर्मस्य परमं गुह्यं वेद वीरहो ह्या धर्माविषयी जर संशय असेल तर आपल्या धन्याला विचारा ऐश्वर्यसंपन्न तो धर्मराज धर्माचे अत्यंत गूढतत्त्व जाणत आहे ॥ २० ॥

नृप ते भागवतं धर्मं सुविनिर्णीय तं विप्र याम्यपाशात् निर्मुच्य मृत्योः अमूमुचन् हे राजा ते विष्णुदूत भगवत्संबंधी धर्माचा चांगला निर्णय सांगून त्या ब्राह्मणाला यमपाशापासून मुक्त करुन मृत्यूपासून सोडविते झाले ॥ २१ ॥

अरिदम इति प्रत्युदिताः याम्याः दूताः यमांतिके यात्वा यमराजे यथा सर्वं आचचक्षुः हे शत्रूंना दमन करणार्‍या राजा या प्रमाणे प्रत्युत्तर ज्यांना मिळाले आहे असे यमाचे दूत यमाजवळ जाऊन यमराजाला जसे झाले तसे सगळे सांगते झाले ॥ २२ ॥

पाशात् विनिर्मुक्तः गतभीः प्रकृति गतः दर्शनोत्सवः द्विजः विष्णोः किंकरान् शिरसा ववंदे पाशापासून मुक्त झालेला ज्याची भीति गेली आहे असा शुद्धीवर आलेला विष्णुदूतांच्या दर्शनाने आनंद पावलेला अजामिळ ब्राह्मण विष्णूच्या दूतांना मस्तकाने नमस्कार करिता झाला ॥ २३ ॥

अनघ महापुरुषकिंकराः तं विवक्षु अभिप्रेत्य तस्य पश्यतः सहसा तत्र अंतर्दधिरे हे पुण्यपुरुषा राजा ते विष्णूचे दूत त्या अजामिळाला बोलू इच्छिणारा असे समजून तो पहात असता अकस्मात् त्याठिकाणी गुप्त झाले ॥ २४ ॥

अथ अजामिलः अपि यमकृष्णयोः दूतानां गुणाश्रय च त्रैविद्यं शुद्ध धर्मं आकर्ण्य नंतर अजामिळहि यम व विष्णु यांच्या दूतांच्या गुणांच्या आश्रयाने असणार्‍या आणि तीन वेदांनी प्रतिपादिलेल्या शुद्ध भागवतधर्माला श्रवण करून ॥ २५ ॥

हरेः माहात्म्यश्रवणात् आशु भगवति भक्तिमान् आत्मनः अशुभ स्मरतः महान् अनुतापः आसीत् परमेश्वराच्या माहात्म्याच्या श्रवणाने लवकर परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिमान झाला स्वतःच्या पापाचे स्मरण करणार्‍या अजामिळाला मोठा पश्‍चात्ताप झाला ॥ २६ ॥

अहो अविजितात्मनः मे परमं कष्टं अभूत् येन वृषल्यां जायता आत्मना ब्रह्म विप्लावितं अहो मन न जिंकिलेल्या अशा माझ्या हातून मोठी वाईट गोष्ट घडली ज्याअर्थी शूद्र स्त्रीच्याठिकाणी स्वतः पुत्ररुपाने झालेल्या माझ्याकडून ब्राह्मणाचा नाश केला गेला ॥ २७ ॥

यः अहं सतीं बालां हित्वा सुरापां असतीं अगाम् तं दुष्कृतं कुलकज्जलम् सद्‌भिः विगर्हितं मां धिक् जो मी साध्वी व अल्पवयस्क अशा स्त्रीला टाकून मद्य पिणार्‍या जारिणीकडे गेलो त्या दुराचारी कुळाला कलंक लावणार्‍या सत्पुरुषांनी निंदिलेल्या मला धिक्कार असो ॥ २८ ॥

अहो अकृतज्ञेन मया वृद्धौ अनाथौ नान्यबंधू तपस्विनौ पितरौ नीचवत् अधुना त्यक्तौ अहो उपकार न जाणणार्‍या माझ्याकडून म्हातारे, अनाथ व ज्यांना दुसर्‍या कोणाचा आश्रय नाही असे कष्टी आईबाप अधमाप्रमाणे सांप्रत टाकिले गेले ॥ २९ ॥

सः अहं भृशदारुणे नरके व्यक्तं पतिष्यामि यत्र धर्मघ्नाः कामिनः यमयातनाः विन्दन्ति तो मी अत्यंत भयंकर अशा नरकात खरोखर पडणार जेथे धर्माचा घात करणारे विषयी लोक यमयातना भोगतात ॥ ३० ॥

इदं किं स्वप्‍नः आहोस्वित् इह अद्भुतं साक्षात् दॄष्टं ये पाशपाणयः मां व्यकर्षन् ते अद्य क्‍व याताः हे काय स्वप्‍न आहे किंवा येथे चमत्कार प्रत्यक्ष दिसला जे हातात पाश असलेले मला ओढिते झाले ते आता कोठे गेले ॥ ३१ ॥

अथ ये पाशैः बद्धा भुवः अधः नीयमानं व्यमोचयन् ते चारुदर्शनाः चत्वार सिद्धाः क्‍व गताः बरे जे पाशांनी बांधून पृथ्वीच्या खाली नेल्या जाणार्‍या मला सोडविते झाले ते रमणीय स्वरुपाचे चार सिद्ध कोठे गेले ॥ ३२ ॥

अथ अपि दुर्भगस्य मे विबुधोत्तम दर्शने मंगलेन भवितव्यं येन मे आत्मा प्रसीदति आणखी सुद्धा हतभागी अशा माझे श्रेष्ठ देवाच्या दर्शनामध्ये पुण्यच असले पाहिजे ज्याअर्थी माझे अंतःकरण प्रसन्न होत आहे ॥ ३३ ॥

अन्यथा इह म्रियमाणस्य अशुचेः वृषलीपतेः जिह्वा वैकुंठनामग्रहणं वक्तुं न अर्हति तसे नसते तर सांप्रत मरणसमयी अपवित्र अशा वेश्येशी रममाण होणार्‍या अशा माझी जीभ परमेश्वराचे नामग्रहण करण्यास योग्य नव्हती ॥ ३४ ॥

च अहं कितवः पापः ब्रह्मघ्‍नः निरपत्रपः क्‍व च नारायण इति एतत् मंगलं भगवन्‍नाम क्‍व शिवाय मी कपटी पापी, ब्राह्मण्य बुडविणारा निर्लज्ज कोणीकडे आणि नारायण असे हे मंगलकारक परमेश्वराचे नाव कोणीकडे ॥ ३५ ॥

सः अहं यतचित्तेंद्रियनिलः यथा भूयः आत्मानं अंधे नरके न मज्जये तथा यतिष्यामि तो मी मन, इंद्रिये व प्राण स्वाधीन ठेविले आहेत ज्याने असा जेणेकरुन पुनः स्वतःला अंधाररुपी नरकात पाडणार नाही तसा प्रयत्‍न करीन ॥ ३६ ॥

तं इमं अविद्याकामकर्मजं बन्धं विमुच्य सर्वभूतसुह्रत् शान्तः मैत्रः करुणः आत्मवान् त्या त्या अविद्या व सकाम कर्म यापासून उत्पन्न होणार्‍या बंधनाला सोडून देऊन सर्व प्राण्यांचा हितकर्ता शांत प्रत्येकाचा मित्र दयाळू आत्मनिग्रही असा होऊन ॥ ३७ ॥

योषिन्मय्या आत्ममायया ग्रस्तं आत्मानं मोचये यया एव अधमः अहं क्रीडामृगः इव विक्रीडितः स्त्रीरुप परमेश्वराच्या मायेने ग्रासलेल्या अशा स्वतःला सोडवीन जिने च नीच मी खेळण्यातील हरिणाप्रमाणे खेळविला गेलो ॥ ३८ ॥

अमिथ्यार्थधीः देहादौ अहं मम इति मति हित्वा तत्कीर्तनादिभिः शुद्ध मनः भगवति धास्ये ज्याचे खर्‍या तत्त्वावर मन आहे असा मी देहादिकाच्या ठिकाणी मी व माझे अशा बुद्धीला सोडून परमेश्वराचे नामसंकीर्तन व श्रवण इत्यादिकांनी पवित्र झालेले मन परमेश्वरावर ठेवीन ॥ ३९ ॥

इति साधुषु क्षणसंगेन जातसुनिर्वेदः मुक्तसर्वानुबन्धनः गंगाद्वार उपेयाय याप्रमाणे साधूंच्या क्षणमात्र संगतीने वैराग्य उत्पन्‍न झालेला अजामिळ सर्वसंगपरित्याग केला आहे ज्याने असा गंगाद्वाराला जाता झाला ॥ ४० ॥

सः तस्मिन् देवसदने आसीनः योगं आश्रितः प्रत्याह्रतेंद्रियग्रामः मनः आत्मनि युयोज तो त्या देवालयात बसलेला योगाचा अभ्यास करणारा ज्याने आपला इंद्रियसमूह विषयांपासून परतविला आहे असा मनाला आत्मस्वरुपी लाविता झाला ॥ ४१ ॥

ततः आत्मसमाधिना आत्मानं गुणेभ्यः वियुज्य भगवद्धाम्‍नि अनुभवात्मनि ब्रह्मणि युयुजे नंतर चित्ताचे एकीकरण करुन आत्म्याला गुणांपासून पृथक करुन परमेश्वराचे स्थान व साक्षात्कार हेच ज्याचे स्वरुप आहे अशा ब्रह्माच्या ठिकाणी योजिता झाला ॥ ४२ ॥

तस्मिन् उपारतधीः द्विजः यहिं पुरुषान् पुरः अद्राक्षीत प्राक् उपलब्धान् उपलभ्य शिरसा सः ववंदे त्या ईश्वरस्वरुपी ज्याची स्थिरबुद्धी झाली आहे असा अजामिळ ज्यावेळी पुरुषांना पुढे पहाता झाला पूर्वी भेटलेल्या पुरुषांना ओळखून तो मस्तकाने वंदन करिता झाला ॥ ४३ ॥

दर्शनात् अनु गंगाया तीर्थे कलेवर हित्वा सद्यः भगवत्पार्श्र्ववतिंनां स्वरुपं जगृहे विष्णुदुतांचे दर्शन होताच गंगेच्या तीर्थात शरीर टाकून तत्काल परमेश्वराच्या पार्थदांचे स्वरुप घेता झाला ॥ ४४ ॥

विप्रः महापुरुषकिंकरैः साकं हैमं विमानं आरुह्य विहायसा यत्र श्रियः पतिः ययौ तो अजामिळ परमेश्वराच्या दूतांसह सुवर्णाच्या विमानात बसून आकाशमार्गाने जेथे लक्ष्मीचा स्वामी असतो गेला ॥ ४५ ॥

एवं विप्लावितसर्वधर्मा दास्याः पतिः गर्ह्यकर्मणा पतितः हतव्रतः निरये निपात्यमानः सः भगवन्‍नाम गृहणन् सद्यः विमुक्तः याप्रमाणे ज्याने सर्व धर्म बुडविले आहेत असा दासीचा स्वामी निंद्य कर्माने पतित झालेला नष्ट झाली आहेत व्रते ज्याची असा नरकात पाडिला जाणारा तो अजामिळ परमेश्वराचे नाव घेतल्यामुळे तत्काळ मुक्त झाला ॥ ४६ ॥

मुमुक्षता अतः तीर्थपदानुकीर्तनात् परं कर्मनिबंधकृन्तनं न यत् मनः पुनः कर्मसु न सज्जते ततः अन्यथा रजस्तमोभ्यां कलिलं मुक्ति मिळविण्याची इच्छा करणार्‍यांना ह्या भगवंताच्या कीर्तनाहून दुसरे कर्म बंधन तुटण्याचे साधन नाही शिवाय जे मन फिरुन कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही त्याहून दुसर्‍या कोणत्याहि उपायाने रजोगुण व तमोगुण यांनी गढूळ होते ॥ ४७ ॥

एवं यः श्रद्धया युक्तः परमं गुह्यं अघापहं इतिहासं शॄणुयात् च यः भक्त्या अनुकीर्तयेत् सः मर्त्यः यदि अपि अमंगलः वै यमकिंकरैः ईक्षितः न नरकं न याति विष्णुलोके महीयते याप्रमाणे जो श्रद्धेने युक्त होत्साता श्रेष्ठ, गुप्त व पापनाशक अशा इतिहासाला श्रवण करील आणि जो भक्तीने वर्णन करील तो मनुष्य जरी पापी असला तरी खरोखर यमदूतांकडून पाहिला जात नाही नरकात जात नाही विष्णुलोकी पूज्य होतो ॥ ४८-४९ ॥

म्रियमाणः पुत्रोपचारितं हरेः नाम गृणन् अजामिलः अपि धाम अगात् पुनः श्रद्धया गृणन् किं न गच्छति मरण्यास टेकलेला पुत्राचे ठेविलेले परमेश्वराचे नाव घेणारा अजामिळसुद्धा विष्णुपदी गेला मग श्रद्धेने नामग्रहण करणारा का न जाईल ॥ ५० ॥

षष्ठ स्कन्धः - अध्याय दुसरा समाप्त

GO TOP