|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय २५ वा - अन्वयार्थ
श्रीसंकर्षणदेवांचे विवरण आणि स्तुती - तस्य मूलदेशे त्रिंशद्योजनसहस्रान्तरे भगवतः या वै तामसी कला आस्ते सा अनंतः इति समाख्याता सात्वतीयाः यं संकर्षणं अहं इति अभिमानलक्षणं संकर्षणं इति आचक्षते त्या पाताळाच्या मूलप्रदेशी तीस योजने अंतरावर परमेश्वराची जी खरोखर तमोगुणी कला आहे, ती अनंत अशा नावाने प्रसिद्ध आहे, सात्विक तंत्रमार्गे जाणारे भगवद्भक्त ज्या अनंताला आकर्षण करणारा असा आहे, ‘मी आहे’ असा अभिमान आहे लक्षण ज्याचे असा संकर्षण असे म्हणतात. ॥१॥ यस्य अनंतमूर्तेः सहस्रशिरसः भगवतः एकस्मिन् एव शीर्षणि ध्रियमाणं इदं क्षितिमंडलं सिद्धार्थः इव उपलक्ष्यते ज्या असंख्यस्वरूपी हजारो मस्तके असणार्या शेषावतारी भगवंताच्या एकाच मस्तकावर धारण केलेले हे पृथ्वीमंडळ मोहरीच्या दाण्याप्रमाणे अगदी अल्पसे दिसते. ॥२॥ ह वा इदं कालेन उपसंजिहीर्षतः यस्य अमर्षविरचितरुचिरभ्रमद्भ्रुवोः अन्तरेण सांकर्षणो नाम एकादशव्यूहः त्र्यक्षः रुद्रः त्रिशिखं शूलं उत्तम्भयन् उदतिष्ठत् खरोखर ह्या जगाला योग्य काळाने हरण करण्याची इच्छा करणार्या ज्या संकर्षणाच्या क्रोधाने युक्त अशा चंचल व सुंदर भुवयांच्या मध्यभागाने सांकर्षण नावाचा अकरा मूर्तींनी युक्त तीन डोळे असणारा रुद्र तीन पाती असणार्या शूळाला उभारून उठून उभा रहातो. ॥३॥ यस्य अंघ्रिकमलारुणविशदनखमणिषण्डमण्डलेषु सात्त्वतर्षभैः सह एकांतभक्तियोगेन अवनमन्तः अहिपतयः प्रमुदितमनसः परिस्फुरत्कुण्डलप्रभामंडितगंडस्थलानि अतिमनोहराणि स्ववदनानि खलु विलोकयन्ति ज्या संकर्षण नामक अनंताच्या पादकमळावरील आरक्त वर्णाच्या स्वच्छ नखरूपी रत्नसमूहांच्या मंडळावर श्रेष्ठ भगवद्भक्तांसह अखंड भक्तियोगाने नम्र होणारे सर्पांचे राजे आनंदित अंतःकरणाचे चकचकणार्या कुंडलांच्या कांतीने ज्यावरील गंडस्थले शोभत आहेत अशा अत्यंत सुंदर आपल्या मुखांना खरोखर पहातात. ॥४॥ हि यस्य एव आशिषः आशासानाः चार्वंगवलयविलसितविशदविपुलधवलसुभगरुचिरभुजरजतस्तंभेषु अगुरुचंदनकुंकुमपङ्कानुलेपेन अवलिंपमानाः तदभिमर्शनोन्मथितहृदयमकरध्वजावेशरुचिरललितस्मिताः नागराजकुमार्यः तदनुरागमदमुदितमदविघूर्णितारुणकरुणावलोकनयनवदनारविन्दं सव्रीडं किल विलोकयन्ति खरोखर ज्या संकर्षणनामक अनंताच्याच उपभोगांना इच्छिणार्या सुंदर शरीरमंडळावर शोभणारे निर्मळ, मोठे, पांढरे, सुभग व मनोहर असे जे भुजरूपी रूप्याचे खांब त्यावर कृष्णागरु, चंदन व केशर ह्यांच्या उट्यांच्या लेपाने ज्यांची शरीरे भरून गेली आहेत अशा उटी देताना झालेल्या शेषाच्या शरीराच्या स्पर्शाने हृदयात मदनाने खळबळ उडवून दिल्यामुळे ज्यांच्या ठिकाणी मनोहर व रमणीय स्मित हास्य झळकत आहे अशा नागराजांच्या कन्या त्या अनंत शेषाच्यावर असलेल्या प्रेमाने व मदाने आनंदित झालेल्या मदाने गरगर भ्रमण करणार्या आरक्तवर्ण कृपाकटाक्षयुक्त नेत्रामुळे सुंदर दिसणार्या मुखकमळाला लज्जित होऊन खरोखर पहातात. ॥५॥ सः एव अनन्तगुणार्णवः आदिदेवः उपसंहृतामर्षरोषवेगः भगवान् अनन्तः लोकानां स्वस्तये आस्ते तोच असंख्य गुणांचा समुद्र असा आदिदेव ज्याने आपला क्रोधावेश आवरून धरला आहे असा सर्वैश्वर्यसंपन्न शेषावतारी संकर्षणसंज्ञक परमेश्वर लोकांच्या कल्याणाकरिता रहात असतो. ॥६॥ सुरासुसेरगसिद्धगंधर्वविद्याधरमुनिगणैः ध्यायमानः अनवरतमदमुदितविकृतविह्वललोचनः सुललितमुखरिकामृतेन स्वपार्षदविबुधयूथपतीन् आप्यायमानः नीलवासाः एककुंडलः हलककुदि कृतसुभगसुंदरभुजः उदारलीलः भगवान् अपरिम्लानरागनवतुलसिकामोदमध्वासवेन माद्यन्मधुकरव्रातमधुरगीतश्रियम् वैजयन्तीं स्वां वनमालां माहेंद्रः वारणेन्द्रः कांचनीं कक्षां इव बिभर्ति देव, दैत्य, सर्प, सिद्ध, गंधर्व, विद्याधर व ऋषिसमुदाय यांनी ध्यायिला जाणारा ज्याची मुद्रा नेहमी असणार्या मदाने आनंदित असून ज्याचे नेत्र उग्र व चंचल आहेत असा सुंदर अशा वचनामृताने स्वतःच्या सेवकांना व देवसंघांच्या अधिपतींना पुष्ट करणारा निळ्या रंगाचे वस्त्र पांघरलेला एकच कुंडल धारण करणारा नांगराच्या पृष्ठभागावर ठेविला आहे मनोहर व सुंदर भुज ज्याने असा ज्याच्या लीला उदार आहेत असा भगवान जिचा लालपणा म्लान झाला नाही अशा नूतन तुळशींच्या सुगंधित व मधुर मकरंदाने मत्त झालेल्या भ्रमरसमूहांच्या मधुर गायनाने शोभणार्या वैजयन्ती नावाच्या स्वतःच्या वनमाळेला इंद्राचा ऐरावत नामक गजपति सुवर्णाच्या साखळीप्रमाणे धारण करितो. ॥७॥ एव अनुश्रुतः ध्यायमानः यः एषः मुमुक्षूणां अन्तर्हृदयं गतः अनादिकालकर्मवासनाग्रथितं अविद्यात्मयं सत्त्वरजस्तमोमयं हृदयग्रन्थि आशु निर्भिनत्ति भगवान् स्वायंभुवः नारदः तुंबुरुणा सह तस्य अनुभावान् ब्रह्मणः सभायां संश्लोकयामास याप्रमाणे गाइलेला ध्यायिला जाणारा जो हा मोक्षाची इच्छा करणार्या भगवद्भक्तांच्या हृदयामध्ये शिरलेला असा अतिप्राचीन काळामध्ये केलेल्या कर्माच्या इच्छेने बांधून टाकिलेल्या अज्ञानरूपी सात्त्विक, राजस व तामस अशा अहंकार नामक हृदयातील गाठीला लवकर तोडून टाकतो, सर्वगुणसंपन्न ब्रह्मदेवाचा मुलगा नारद तुंबुरूसह त्या शेषाच्या पराक्रमांना ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये वर्णिता झाला. ॥८॥ अस्य उत्पत्तिस्थितिलयहेतवः सत्त्वाद्याः प्रकृतिगुणाः यदीक्षया कल्पाः आसन् यद्रूपं ध्रुवं अकृतं यत् एकं आत्मन् नाना अधात् तस्य वर्त्म उ ह कथं वेद ह्या जगाच्या उत्पत्तीला, रक्षणाला व नाशाला कारणीभूत असे सत्त्वादिक मायेचे तीन गुण ज्या शेषाच्या अवलोकनाने कार्य करण्यास समर्थ झाले ज्याचे स्वरूप अविनाशी कोणीहि निर्मिलेले नव्हे असे जे एकटे असूनहि आत्म्याच्या ठिकाणी अनेकत्वाला धारण करिते झाले त्याचा मार्ग खरोखर कसा जाणावा बरे ॥९॥ यत्र इदं सदसत् बिभाति उदारवीर्यः नः पुरुकृपया संशुद्धं सत्त्वं मूर्तिं बभार स्वजनमनांसि आदातुं अनवद्यां यल्लीलां मृगपतिः आददे ज्याच्याठिकाणी हे जग स्थूलसूक्ष्मरूपी असे भासते तो मोठा पराक्रमी शेष आम्हावर पुष्कळ दया करून अत्यंत शुद्ध अशा सात्त्विक मूर्तीला धारण करिता झाला, आपल्या भक्तांच्या मनांना वश करण्याकरिता निर्दोष अशा ज्याच्या शौर्यादि क्रीडांना सिंह स्वीकारिता झाला. ॥१०॥ यदि पतितः श्रुतं यन्नाम अकस्मात् आर्तः वा प्रलंभनात् अनुकीर्तयेत् तर्हि सः शुद्ध्येत नृणां अशेषं अंहः सपदि हन्ति मुमुक्षुः भगवतः शेषात् अन्यं कं आश्रयेत् जरी चंडाळ श्रवण केलेल्या ज्याच्या नावाला एकाएकी पीडित होऊन किंवा थटेटेने वर्णील तरीसुद्धा तो शुद्ध होईल, मनुष्यांच्या संपूर्ण पापाला तत्काळ नष्ट करितो, मोक्षाची इच्छा करणारा पुरुष भगवान शेषाहून दुसर्या कोणाजवळ आश्रय मागेल ॥११॥ सगिरिसरित्समुद्रसत्त्वं भूगोलं सहस्रमूर्ध्नः मूर्धनि अणुवत् अर्पितं सहस्रजिह्वः कः आनंत्यात् अनिमितविक्रमस्य भूम्नः वीर्याणि अधिगणयेत् पर्वत, नद्या, समुद्र व प्राणी ह्यांसह भूगोल हजार फणांच्या शेषाच्या मस्तकावर अणूसारखा ठेविला आहे हजार जिह्वा असलेलाहि कोणता पुरुष अनंत गुण असल्यामुळे अपरिमित पराक्रम असणार्या व्यापक अशा शेषाच्या पराक्रमांना मोजू शकेल ॥१२॥ एवंप्रभावः अनन्तः दुरन्तवीर्योरुगुणानुभावः आत्मतंत्रः भगवान् रसायाः मूले स्थितः यः स्थितये लीलया क्ष्मां बिभर्ति अशा तर्हेचा पराक्रम करणारा ज्याच्या गुणांचा अंत नाही असा अपरिमित पराक्रम व पुष्कळ गुण आहेत ज्याचे असा स्वतंत्र सर्वैश्वर्यसंपन्न शेष पृथ्वीच्या मुळाशी राहिला असून जो पृथ्वीला स्थिरत्व यावे एवढयाकरिता सहजरीतीने पृथ्वीला धरितो. ॥१३॥ कामान् कामयमानैः नृभिः उपगन्तव्याः यथाकर्मविनिर्मिताः एताः एव ह गतयः इह यथोपदेशं अनुवर्णिताः उपभोगांना इच्छिणार्या मनुष्यांनी मिळविण्याजोग्या कर्मानुसार निर्माण केलेल्या ह्याच खरोखर कर्मगति येथे जशा मला गुरूने सांगितल्याप्रमाणे वर्णन करून सांगितल्या. ॥१४॥ राजन् पुंसः प्रवृत्तिलक्षणस्य धर्मस्य उच्चावचाः विसदृशाः एतावतीः हि विपाकगतयः यथाप्रश्नं व्याचख्ये अन्यत् किं कथयामः इति हे परीक्षित राजा, पुरुषाचा प्रवृत्तिमार्गांनी युक्त अशा धर्माच्या लहानमोठया कमीअधिक प्रमाणांनी मिळणार्या एवढया खरोखर कर्मफलांच्या गति विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून सांगितल्या दुसरे काय सांगू असे शुकाचार्य म्हणाले ॥१५॥ पंचम स्कन्धः - अध्याय पंचविसावा समाप्त |