|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय २० वा - अन्वयार्थ
अन्य सहा द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन - अतः परं प्लक्षादीनां वर्षविभागः प्रमाणलक्षणसंस्थानतः उपवर्ण्यते ह्यानंतर प्लक्षादि द्वीपांचा खंडभेद, लांबीरुंदीचे प्रमाण, लक्षणे व रचना यायोगे वर्णिला जात आहे. ॥१॥ अयं जंबूद्वीपः यावत्प्रमाणविस्तारः तावता क्षारोदधिना यथा मेरु जम्ब्वाख्येन (वेष्टितः तथा) परिवेष्टितः लवणोदधिः अपि यथा परिखा बाह्योपवनेन (तथा) ततः द्विगुणविशालेन प्लक्षाख्येन परिक्षिप्तः यत्र द्वीपाख्याकरः जंबूप्रमाणः हिरण्मयः प्लक्षः उत्थितः यत्र सप्तजिह्वः अग्निः उपास्ते तस्य अधिपतिः प्रियव्रतात्मजः इध्मजिह्वः स्वं द्वीपं सप्तवर्षाणि विभज्य सप्तवर्षनामभ्यः आत्मजेभ्यः आकलय्य स्वयं आत्मयोगेन उपरराम हा जंबूद्वीप जितक्या लांबीरुंदीच्या प्रमाणाने विस्तृत आहे तितक्याच प्रमाणाने क्षारसमुद्राने जसा मेरुपर्वत जंबू नामक द्वीपाने वेष्टिला आहे तसा वेढिलेला आहे, क्षारसमुद्र सुद्धा जसा खंदक बाहेरील उपवनाने तसा त्या जंबूद्वीपाहून दुप्पट लांब व रुंद असा प्लक्षनामक द्वीपाने वेढिलेला आहे, ज्या प्लक्षद्वीपात द्वीपाचे नाव पाडणारा जांभळाच्या वृक्षाएवढा मोठा सोन्याचा पायरीचा वृक्ष वाढलेला आहे, जेथे सात जिभा असलेला अग्नि रहातो, त्या प्लक्षद्वीपाचा राजा प्रियव्रताचा इध्मजिव्ह नावाचा मुलगा आपल्या प्लक्षनामक द्वीपाला सात खंडांच्या रूपाने विभागून सात खंडांचीच ज्यांना नावे आहेत अशा पुत्रांना वाटून देऊन स्वतः आत्मयोगसाधनेने देहत्याग करिता झाला. ॥२॥ तत्र शिवं यवयसं सुभद्रं शान्तं क्षेमं अमृतं अभयं इति वर्षाणि (सन्ति) तेषु गिरयः च नद्यः सप्त एव अभिज्ञाताः तेथे शिव, यवयस, सुभद्र, शान्त, क्षेम, अमृत, अभय अशी खंडे आहेत, त्या खंडांमध्ये पर्वत आणि नद्या सातच प्रसिद्ध आहेत. ॥३॥ मणिकूटः वज्रकूटः इंद्रसेनः ज्योतिष्मान् सुपर्णः हिरण्यष्ठीवः मेघमालः इति सेतुशैलाः (सन्ति) अरुणा नृम्णा अंगिरसी सावित्री सुप्रभाता ऋतंभरा सत्यंभरा इति महानद्यः (सन्ति) यासां जलोपस्पर्शनविधूतरजस्तमसः हंसपतंगोर्ध्वायनसत्यांगसंज्ञाः चत्वारः वर्णाः सहस्रायुषः विबुधोपमसंदर्शनप्रजननाः त्रय्या विद्यया त्रयीमयं स्वर्गद्वारं भगवन्तं आत्मानं सूर्यम् यजन्ते मणिकूट, वज्रकूट, इंद्रसेन, ज्योतिष्मान, सुपर्ण, हिरण्यष्ठीव, मेघमाल असे मर्यादा दाखविणारे पर्वत आहेत, अरुणा, नृम्णा, अंगिरसी, सावित्री, सुप्रभाता, ऋतंभरा, सत्यंभरा अशा महानद्या आहेत, ज्या नद्यांच्या पाण्यांमध्ये आचमनादि केल्याने ज्यांचा रजोगुण व तमोगुण धुवून गेला आहे असे हंस, पतंग, ऊर्ध्वायन व सत्यांग ही नावे धारण करणारे चार वर्ण हजार वर्षे आयुष्य असणारे ज्यांचे रूप व प्रजोत्पादनसामर्थ्य देवांप्रमाणे आहे असे तीन वेदांनी तीन वेदरूपी स्वर्गाचे द्वारच की काय अशा सर्वगुणसंपन्न आत्मस्वरूपी सूर्याला पूजितात. ॥४॥ यत् प्रत्नस्य विष्णोः रूपं च सत्यस्य ऋतस्य ब्रह्मणः अमृतस्य च मृत्योः आत्मानं सूर्यं ईमहि इति (सूर्यं स्तुवन्ति) जे अतिप्राचीन अशा विष्णूचे स्वरूप आणि सत्याचे प्रमाणसिद्ध धर्माचे, वेदांचे, मोक्षाचे आणि मृत्यूचे आत्मस्वरूपाने व्यापून राहिलेल्या सूर्याला शरण जातो याप्रमाणे सूर्याची स्तुति करितात. ॥५॥ प्लक्षादिषु पञ्चसु पुरुषाणां आयुः इंद्रियम् ओजः सहः बलं बुद्धिः च विक्रमः इति सर्वेषां औत्पत्तिकी सिद्धिः अविशेषेण वर्तते प्लक्षादिक पाच द्वीपांमध्ये पुरुषांचे आयुष्य, इंद्रिये, इंद्रियांचे पटुत्व, उत्साह, सामर्थ्य, बुद्धि आणि पराक्रम अशी सर्वांमध्ये जन्मसिद्ध सिद्धि सारखेपणाने आहे. ॥६॥ प्लक्षः स्वसमानेन इक्षुरसोदेन आवृतः यथा तथा शाल्मलः द्वीपः अपि द्विगुणविशालः (सन्) समानेन सुरोदेन आवृतः परिवृंक्ते प्लक्षद्वीप आपल्या लांबीरुंदीएवढया विस्ताराच्या उसाच्या रसाच्या समुद्राने वेष्टिला जसा आहे त्याप्रमाणे शाल्मल द्वीप सुद्धा प्लक्षद्वीपाच्या दुप्पट लांबीरुंदीचा असून तेवढया मद्याच्या समुद्राने वेढिलेला शोभत आहे. ॥७॥ यत्र ह वै प्लक्षायामा शाल्मली अस्ति वाव किल यस्यां भगवतः छंदःस्तुतः पतत्रिराजस्य निलयं आहुः सा द्वीपहूतये उपलक्ष्यते जेथे खरोखरच पायरीच्या वृक्षाएवढा विस्तार असलेला सावरीचा वृक्ष आहे आणखी खरोखर ज्या सावरीच्या वृक्षावर सर्वगुणसंपन्न वेदाने स्तविलेल्या पक्ष्यांचा राजा जो गरुड त्याचे वसतिस्थान आहे असे म्हणतात तो वृक्ष द्वीपाचे नाव पडण्यास कारण आहे असे समजले जाते. ॥८॥ तद्द्वीपाधिपतिः प्रियव्रतात्मजः यज्ञबाहुः सप्तभ्यः स्वसुतेभ्यः तन्नामानि सप्त वर्षाणि व्यभजत् सुरोचनं सौमनस्यं रमणकं देववर्षं पारिभद्रं आप्यायनं अविज्ञातं इति (तानि सन्ति) त्या द्वीपाचा राजा प्रियव्रताचा मुलगा यज्ञबाहु आपल्या सात मुलांना मुलांचीच नावे ज्यांना दिली आहेत अशी सात खंडे वाटून देता झाला, सुरोचन, सौमनस्य, रमणक, देववर्ष, पारिभद्र, आप्यायन, अविज्ञात अशी ही सात खंडे होत. ॥९॥ तेषु वर्षाद्रयः च नद्यः सप्त एव अभिज्ञाताः स्वरसः शतशृंगः वामदेवः कुंदः मुकुंदः पुष्पवर्षः सहस्रश्रुतिः इति अनुमतिः सिनीवाली सरस्वती कुहूः रजनी नंदा राका इति त्या सात खंडामध्ये खंडांच्या मर्यादा दाखविणारे पर्वत आणि नद्या सातच प्रसिद्ध आहेत, स्वरस, शतशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद, पुष्पवर्ष, सहस्रश्रुति हे सात पर्वत, अनुमति, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी, नंदा, राका अशा ॥१०॥ तद्वर्षपुरुषाः श्रुतधरवीर्यधरवसुंधरेषंधरसंज्ञाः भगवन्तं वेदमयं आत्मानं सोमं वेदेन यजन्ते त्या खंडात रहाणारे पुरुष श्रुतधर, वीर्यधर, वसुंधर व इषंधर अशी नावे धारण करणारे सर्वगुणसंपन्न वेदरूप आत्मरूपाने व्यापणार्या चंद्राला वैदिक मंत्राने पूजितात. ॥११॥ कृष्णशुक्लयोः पितृदेवेभ्यः स्वगोभिः अंधः विभजन् सोमः सर्वासां प्रजानां नः राजा अस्तु इति कृष्णपक्षात व शुक्लपक्षात अनुक्रमाने पितर व देव यांना आपल्या किरणांनी अन्न वाटून देणारा चंद्र संपूर्ण प्रजा अशा आमचा राजा होवो अशा रीतीने. ॥१२॥ एवं सुरोदात् बहिः तद्द्विगुणः कुशद्वीपः यथापूर्वः समानेन घृतोदेन आवृतः यस्मिन् देवकृतः तद्द्वीपाख्याकरः कुशस्तंबः अपरः ज्वलनः इव स्वशष्परोचिषा दिशः विराजयति याप्रमाणे मद्याच्या समुद्राहून बाहेर त्याच्या दुप्पट लांबीरुंदीच्या प्रमाणाचे कुशद्वीप पूर्वीच्या द्वीपाएवढे तेवढया विस्ताराच्या अशा तुपाच्या समुद्राने वेष्टिलेले आहे ज्या कुशद्वीपात देवांनी निर्माण केलेले त्या कुशद्वीपाला नाव पाडणारे दर्भाचे बेट आहे दुसरा अग्निच की काय असा आपल्या कोमल अंकुरांच्या कांतीने दाही दिशांना प्रकाशित करतो. ॥१३॥ राजन् तद्द्वीपपतिः प्रैयव्रतः हिरण्यरेतः नाम स्वं द्वीपं सप्तभ्यः वसुवसुदानदृढरुचिनाभिगुप्तस्तुत्यव्रतविविक्तवामदेवनामभ्यः स्वपुत्रेभ्यः यथाभागं विभज्य स्वयं तपः आतिष्ठत हे राजा, त्या द्वीपाचा राजा हिरण्यरेत नावाचा प्रियव्रताचा मुलगा आपल्या द्वीपाला सात वसु, वसुदान, दृढरुचि, नाभिगुप्त, स्तुत्यव्रत, विविक्त व वामदेव ह्या नावांच्या आपल्या मुलांना योग्य विभागाने वाटून देऊन स्वतः तप करिता झाला. ॥१४॥ तेषां वर्षेषु सप्तसप्त एव सीमागिरयः च नद्यः अभिज्ञाताः चक्रः चतुःशृंगः कपिलः चित्रकूटः देवानीकः ऊर्ध्वरोमा द्रविणः इति रसकुल्या मधुकुल्या मित्रविंदा श्रुतविंदा देवगर्भा घृतच्युता मंत्रमाला इति त्यांच्या खंडांमध्ये सातसातच खंडांच्या मर्यादा दाखविणारे पर्वत आणि नद्या प्रसिद्ध आहेत चक्र, चतुःशृंग, कपिल, चित्रकूट, देवानीक, ऊर्ध्वरोमा, द्रविण याप्रमाणे पर्वत रसकुल्या, मधुकुल्या, मित्रविंदा, श्रुतविंदा, देवगर्भा, घृतच्युता, मंत्रमाला अशा ॥१५॥ कुशद्वीपौकसः कुशलकोविदाभियुक्तकुलकसंज्ञाः यासां पयोभिः कर्मकौशल्येन जातवेदसरूपिणं भगवन्तं यजन्ते कुशद्वीपात रहाणारे कुशल, कोविद, अभियुक्त व कुलक अशी नावे धारण करणारे लोक ज्या नद्यांच्या उदकांनी कर्म करण्यात कौशल्य दाखवून अग्निस्वरूप धारण करणार्या परमेश्वराला पूजितात. ॥१६॥ जातवेदः साक्षात् परस्य ब्रह्मणः हव्यवाट् असि पुरुषांगानां देवानां यज्ञेन पुरुषं यज इति हे अग्ने, प्रत्यक्ष श्रेष्ठ अशा परब्रह्मस्वरूपी परमेश्वराला हविर्भाग अर्पण करणारा आहेस महापुरुष ईश्वराचे अवयवच की काय अशा इंद्रादि देवांना उद्देशून केलेल्या यज्ञीय हविर्भागाने परमेश्वराला पूज अशी स्तुती करितात. ॥१७॥ तथा घृतोदात् बहिः द्विगुणः क्रौंचद्वीपः स्वमानेन क्षीरोदेन परितः उपक्लृप्तः वृतः यथा कुशद्वीपः घृतोदेन (तथा) यस्मिन् क्रौंचः नाम पर्वतराजः द्वीपनामनिर्वर्तकः आस्ते त्याप्रमाणे तुपाच्या समुद्राच्याहून बाहेर दुप्पट परिमाणाचे क्रौंच नावाचे द्वीप आपल्या एवढयाच अशा दुधाच्या समुद्राने सभोवार कल्पिलेल्या वेष्टणाने युक्त आहे जसे कुशद्वीप तुपाच्या समुद्राने वेष्टिले आहे तसे जेथे क्रौंच नावाचा श्रेष्ठ पर्वत द्वीपाला नाव पाडणारा आहे. ॥१८॥ यः असौ गुहप्रहरणोन्मथितनितंबकुञ्जः अपि क्षीरोदेन आसिच्यमानः भगवता वरुणेन अभिगुप्तः विभयः बभूव जो हा क्रौंच पर्वत कार्तिकस्वामीच्या शस्त्राने ज्याच्या कडांवरील लतामंडप उध्वस्त करून टाकिले आहेत असा झाला असूनहि दुधाच्या समुद्राने भिजविला गेलेला भगवान वरुणाने रक्षिलेला निर्भय असा झाला. ॥१९॥ तस्मिन् अपि प्रैयव्रतः घृतपृष्ठः नाम भगवान् अधिपतिः स्वेद्वीपे सप्त वर्षाणि विभज्य पुत्रनामसु तेषु सप्त रिक्थादान् वर्षपान् निवेश्य स्वयं भगवतः परमकल्याणयशसः आत्मभूतस्य हरेः चरणारविन्दं उपजगाम त्या क्रौंच द्वीपातहि प्रियव्रताचा घृतपृष्ठ नावाचा मुलगा सर्वगुणसंपन्न राजा आपल्या द्वीपामध्ये सात खंडे करून पुत्रांचीच नावे ज्यांना दिली आहेत अशा त्यात सात पितृद्रव्याचा उपभोग घेणार्या खंडांचे अधिपति म्हणून आपल्या सात पुत्रांना स्थापून स्वतः षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा अत्यंत कल्याणकारक ज्याची कीर्ति आहे अशा आत्मस्वरूपी परमेश्वराच्या पादकमलाला मिळविता झाला. ॥२०॥ आमः मधुरुहः मेघपृष्ठः सुधामा भ्राजिष्ठः लोहितार्णः वनस्पतिः इति घृतपृष्ठसुताः तेषां वर्षगिरयः च नद्यः सप्त सप्त एव अभिख्याताः शुक्लः वर्धमानः भोजनः उपबर्हिणः नंदः नंदनः सर्वतोभद्रः इति (पर्वताः) च अभया अमृतौघा आर्यका तीर्थवती वृत्तिरूपवती पवित्रवती शुक्ला इति (नद्यः) आम, मधुरुह, मेघपृष्ठ, सुधामा, भ्राजिष्ठ, लोहितार्ण, वनस्पति असे घृतपृष्ठ राजाचे मुलगे होत त्या सात खंडांचे खंडांची मर्यादा दाखविणारे पर्वत आणि नद्या सातसातच प्रसिद्ध आहेत शुक्ल, वर्धमान, भोजन, उपबर्हिण, नंद, नंदन, सर्वतोभद्र असे पर्वत होत आणि अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थवती, वृत्तिरूपवती, पवित्रवती, शुक्ला ह्या सात नद्या होत. ॥२१॥ यासां पवित्रं अमलं अंभः उपयुंजानाः पुरुषऋषभद्रविणदेवकसंज्ञाः वर्षपुरुषा आपोमयं देवं अपां पूर्णेन अञ्जलिना यजन्ते ज्या नद्यांच्या शुद्ध निर्मळ उदकाला सेवणारे पुरुष, ऋषभ, द्रविण व देवक ही नावे असणारे खंडातील लोक जलरूपी देवाला उदकांच्या योगे भरलेल्या ओंजळीने पूजितात. ॥२२॥ आपः पुरुषवीर्याः स्थ भूर्भुवःसुवः पुनन्तीः आत्मना अमीवध्नीः ताः स्पृशतां नः भुवः पुनीत इति अहो उदकांनो, ज्यांना ईश्वरापासून सामर्थ्य मिळालेले आहे असे तुम्ही आहा पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग ह्यांना पवित्र करणारी स्वतः पापांचा नाश करणारी ती उदके स्पर्श करणार्या आमच्या शरीरांना पवित्र करोत याप्रमाणे मंत्र म्हणून पूजितात. ॥२३॥ एवं पुरस्तात् क्षीरोदात् परितः उपवेशितः शाकद्वीपः द्वात्रिंशल्लक्षयोजनायामः समानेन च दधिमंडोदेन परितः यस्मिन् शाकः नाम महीरुहः स्वक्षेत्रव्यपदेशकः ह यस्य महासुरभिगन्धः तं द्वीपं अनुवासयति याप्रमाणे पुढे दुधाच्या समुद्रानंतर सभोवार वेष्टून असलेला स्थापिलेला शाकद्वीप बत्तीस लक्ष योजने विस्तृत असलेला आणि तेवढयाच प्रमाणाच्या दह्याच्या मठठ्याच्या समुद्राने सभोवार ज्याला वेष्टिले आहे असा आहे ज्या शाकद्वीपात शाक नावाचा वृक्ष स्वतःच्या द्वीपाला नाव पाडणारा आहे त्याप्रमाणे ज्या शाकवृक्षाचा मोठा सुगंधी सुवास त्या शाकद्वीपाला सुगंधित करितो. ॥२४॥ तस्य अपि अधिपतिः प्रैयव्रतः नाम्ना मेधातिथिः एव सः अपि पुत्रनामानि सप्त वर्षाणि विभज्य तेषु पुरोजवमनोजवपवमानधूम्रानीकचित्ररेफबहुरूपविश्वाधारसंज्ञान् स्वात्मजान् अधिपतीन् निधाय्य स्वयं भगवति अनन्ते आवेशितमतिः तपोवनं प्रविवेश त्या द्वीपाचाही राजा प्रियव्रताचा मुलगा नावाने मेधातिथिच होय, तो मेधातिथीसुद्धा मुलांची नावे ज्यांना दिली आहेत अशी सात खंडे विभागून त्या खंडांमध्ये पुरोजव, मनोजव, पवमान, धूम्रानीक, चित्ररेफ, बहुरूप, विश्वाधार या नावाच्या आपल्या पुत्रांना खंडांचे राजे नेमून स्वतः सर्वगुणसंपन्न परमेश्वराच्या ठिकाणी आपली बुद्धि आसक्त केली आहे ज्याने असा तपोवनात प्रविष्ट झाला. ॥२५॥ एतेषां वर्षमर्यादागिरयः च नद्यः सप्तसप्त एव ईशानः उरुशृङ्गः बलभद्रः शतकेसरः सहस्रस्रोतः देवपालः महानसः इति (पर्वताः) अनघा आयुर्दा उभयसृष्टिः अपराजिता पञ्चपदी सहस्रस्रुतिः निजधृतिः इति (नद्यः) ह्या खंडांच्या खंडमर्यादा दाखविणारे पर्वत आणि नद्या सात सातच होत, ईशान, उरुशृंग, बलभद्र, शतकेसर, सहस्रस्रोत, देवपाल, महानस असे हे सात पर्वत होत, अनघा, आयुर्दा, उभयसृष्टि, अपराजिता, पंचपदी, सहस्रस्रुति, निजधृति अशा ह्या सात नद्या होत. ॥२६॥ ऋतव्रतसत्यव्रतदानव्रतानुव्रतनामानः तद्वर्षपुरुषाः प्राणायामविधूतरजस्तमसः वाय्वात्मकं भगवन्तं परमसमाधिना यजन्ते ऋतव्रत, सत्यव्रत, दानव्रत व अनुव्रत ही नावे असणारे त्या खंडांतील पुरुष प्राणायामांनी ज्यांचे रजोगुण व तमोगुण नष्ट झाले आहेत असे वायुस्वरूपी परमेश्वराला मोठया समाधियोगाने पूजितात. ॥२७॥ यः भूतानि अन्तः प्रविश्य आत्मकेतुभिः बिभति सः अन्तर्यामी ईश्वरः साक्षात् नः पातु यद्वशे स्फुटं जो प्राण्य़ांच्या आत शिरून आपल्या प्राणादिवृत्तिरूपी ध्वजांनी धारण करितो तो आत वास्तव्य करणारा ईश्वर प्रत्यक्ष आम्हाला रक्षण करो ज्याच्या स्वाधीन स्पष्टरीतीने ॥२८॥ एवम् एव दधिमंडोदात् परतः ततो द्विगुणायामः पुष्करद्वीपः समन्ततः उपकल्पितः समानेन स्वादूदकेन समुद्रेण बहिः आवृतः यस्मिन् ज्वलनशिखामलकनकपत्रायुतायुतं बृहत् पुष्करं कमलासनस्य भगवतः अध्यासनं परिकल्पितं याप्रमाणेच दह्याच्या मठ्ठयाच्या समुद्राहून पलीकडे पूर्वीच्या द्वीपाहून दुप्पट विस्ताराचा पुष्करद्वीप सभोवार कल्पिला आहे सारख्या विस्ताराचा गोडया पाण्याच्या समुद्राने बाहेरून वेढिलेला ज्या द्वीपात अग्नीच्या ज्वाळेसारखी ज्याला कोटयावधि पाने आहेत असे मोठे कमळ कमळावर बसणार्या ब्रह्मदेवाचे बसण्याचे आसन रचिले आहे. ॥२९॥ तद्द्वीपमध्ये मानसोत्तरनामा अयुतयोजनोच्छ्रायायामः एकः एव अर्वाचीनपराचीनवर्षयोः मर्यादाचलः यत्र चतसृषु दिक्षु इंद्रादीनां लोकपालानां चत्वारि पुराणि (सन्ति) यदुपरिष्टात् मेरुं परिभ्रमतः सूर्यरथस्य संवत्सरात्मकं चक्रं देवानां अहोरात्राभ्यां परिभ्रमति त्या द्वीपात मानसोत्तर नावाचा दहा हजार योजने उंच व लांबरुंद असा एकटाच अलीकडील व पलीकडील अशा दोन खंडांच्या मर्यादा दाखविणारा पर्वत, जेथे चार दिशांमध्ये इंद्रादिक लोकपालांची चार नगरे आहेत, ज्याच्यावरील प्रदेशातून मेरुपर्वताला प्रदक्षिणा घालून फिरणार्या सूर्यरथाचे संवत्सर नामक चाक देवांच्या दिवस व रात्र या क्रमाने फिरत आहे. ॥३०॥ तद्द्वीपस्य अधिपतिः अपि प्रैयव्रतः वीतिहोत्रः नाम एतस्य आत्मजौ रमणकघातकिनामानौ वर्षपती नियुज्य सः स्वयं पूर्वजवद्भगवत्कर्मशीलः एव आस्ते त्या द्वीपाचा राजासुद्धा प्रियव्रताचा मुलगा वीतिहोत्र नावाचा आहे, ह्याचे दोन मुलगे रमणक व घातकि या नावाचे दोन खंडांचे अधिपति स्थापित करून तो स्वतः पूर्वजांप्रमाणे भगवंतासंबंधी कर्मे करणारा स्वभाव आहे ज्याचा असाच असतो. ॥३१॥ तद्वर्षपुरुषाः ब्रह्मरूपिणं भगवन्तं सकर्मकेण कर्मणा आराधयंति इदं च उदाहरन्ति त्या पुष्करद्वीपात रहाणारे पुरुष ब्रह्मस्वरूपी परमेश्वराला ब्रह्मलोकप्राप्तीचे साधन अशा कर्माने आराधितात आणि ह्या पुढील मंत्राला उच्चारितात. ॥३२॥ जनः तत् कर्ममयं ब्रह्मलिङ्गं एकान्तं अद्वयं शान्तं यत् लिंगं अर्चयेत् तस्मै भगवते नमः इति लोक ते कर्मफलस्वरूप ब्रह्मस्वरूप एकावरच अवलंबून रहाणारे द्वैतरहित शांत जे मूर्तस्वरूप त्याला पूजितो त्या सर्वगुणसंपन्न परमेश्वराला नमस्कार असो ह्याप्रमाणे मंत्र म्हणून जप करितात. ॥३३॥ ततः परस्तात् लोकालोकनामा अचलः लोकालोकयोः अन्तराले परितः उपक्षिप्तः त्याहून पलीकडे लोकालोक नावाचा पर्वत सूर्यप्रकाश जेथपर्यंत आहे व जेथून सूर्यप्रकाश नाही ह्या दोन्ही स्थानांच्या मधील सांध्यावर सभोवार उभारिलेला आहे. ॥३४॥ मानसोत्तरमेर्वोः यावत् अंतरं तावती भूमिः काञ्चनी अन्या आदर्शतलोपमा यस्यां प्रहितः पदार्थः कथंचित् पुनः न प्रत्युपलभ्यते तस्मात् (सा) सर्वसत्त्वपरिहृता आसीत् मानसोत्तर पर्वत व मेरुपर्वत ह्यांच्यामधील जितके अंतर आहे तितकी पृथ्वी सुवर्णमय आहे ह्याहून दुसरी आरशाप्रमाणे निर्मळ आहे जेथे पडलेला पदार्थ केव्हाहि फिरून हाती लागत नाही म्हणून ती भूमि सर्व प्राण्यांनी टाळिलेली अशी झाली. ॥३५॥ यत् लोकालोकस्य अन्तर्वर्तिना अनेन अचलेन अवस्थाप्यते लोकालोकः इति (तस्य) समाख्या ज्याअर्थी प्रकाश व अंधकार यांच्या मध्ये असणार्या ह्या पर्वताने रहाणे केले जाते लोकालोक असे त्याचे नाव आहे. ॥३६॥ ईश्वरेण सः लोकत्रयान्ते परितः विहितः यस्मात् सूर्यादीनां ध्रुवापवर्गाणां ज्योतिर्गणानां गभस्तयः अर्वाचीनान् त्रीन् लोकान् आवितन्वाना कदाचित् पराचीनाः भवितुं न उत्सहन्ते तावदुन्नहनायामः परमेश्वराने तो पर्वत त्रैलोक्याच्या शेवटी सभोवार ठेविला आहे जेथून सूर्यापासूनच्या ध्रुवापर्यंतच्या ज्योतिश्चक्रांची किरणे अलीकडल्या त्रैलोक्याला सभोवार प्रकाश देणारी अशी कधीहि पलीकडे जाणारी होण्यास समर्थ होत नाहीत, तितक्या उंचीचा व विस्तृत हा पर्वत आहे. ॥३७॥ कविभिः एतावान् लोकविन्यासः मानलक्षणसंस्थाभिः विचिंतितः सः तु पंचाशत्कोटिः च अयं लोकालोकाचलः गणितस्य भूगोलस्य तुरीयभागः विद्वानांनी इतकीच लोकव्यवस्था प्रमाण, लक्षणे व रचना यांनी विचारपूर्वक वर्णिली आहे ती लोकव्यवस्था तर पन्नास कोटि इतकी आहे हा लोकालोकपर्वत मोजमाप केलेल्या भूगोलाचा चतुर्थांश आहे. ॥३८॥ तदुपरिष्टात् चतसृषु आशासु अखिलजगद्गुरुणा आत्मयोनिना ऋषभः पुष्करचूडः वामनः अपराजितः इति ये द्विरदपतयः अधिनिवेशिताः ते सकललोकस्थितिहेतवः त्या लोकालोकपर्वतावर चार दिशांच्या ठिकाणी सर्व जगांचा गुरु अशा ब्रह्मदेवाने ऋषभ, पुष्करचूड, वामन, अपराजित असे जे मोठमोठे चार दिग्गज स्थापित केले आहेत ते दिग्गज सर्व लोकांना धारण करणारे आहेत. ॥३९॥ तेषां स्वविभूतीनां लोकपालानां विविधर्योपबृंहणाय भगवान् परममहापुरुषः महाविभूतिपतिः धर्मज्ञानवैराग्यैश्वर्याद्यष्टमहासिद्ध्युपलक्षणं आत्मनः विशुद्धसत्त्वं अन्तः याम्य विष्वक्सेनादिभिः स्वपार्षदप्रवरैः परिवारितः निजवरायुधोपशोभितैः निजभुजदंडैः संधारयमाणः गिरिवरे समंतात् सकललोकस्वस्तये आस्ते त्या स्वतःच्या विभूतीच अशा लोकपालांच्या अनेकप्रकारच्या पराक्रमांना वाढविण्याकरिता सर्वगुणसंपन्न श्रेष्ठ महापुरुष मोठमोठया विभूतींचा अधिपती असा धर्म, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य इत्यादि आठ महासिद्धींनी शोभणार्या स्वतःच्या शुद्धसत्त्वगुणाला सर्वांच्या हृदयात प्रगट करून विष्वक्सेनप्रमुख आपल्या मुख्य सेवकगणांनी वेष्टिलेला आपल्या स्वतःच्या श्रेष्ठ आयुधांनी शोभणार्या स्वतःच्या बाहुदंडांनी जगाला धारण करणारा परमेश्वर श्रेष्ठ लोकालोकपर्वतावर सर्वप्रकारे सर्व लोकांच्या कल्याणाकरिता रहातो. ॥४०॥ एवं वेषं गतः एषः भगवान् आत्मयोगमायया आकल्पं विरचितविविधयात्रागोपीथायं (अस्ति) इति अर्थः याप्रमाणे वेषाला धारण करणारा हा परमेश्वर स्वतःच्या योगमायेने कल्प पुरा होईपर्यंत रचलेल्या अनेकप्रकारच्या सृष्टिक्रमाच्या रक्षणाकरिता आहे असा अर्थ आहे. ॥४१॥ यः अन्तर्विस्तारः एतेन हि अलोकपरिमाणं व्याख्यातं यत् लोकालोकाचलात् बहिः ततः परस्तात् विशुद्धां योगेश्वरगतिं उदाहरन्ति जो आतील विस्तार सांगितला त्यावरून खरोखर अलोकपर्वताचे प्रमाण सांगितल्यासारखे आहे कारण लोकालोक पर्वताच्या बाहेरच्या प्रदेशात त्याहून पलीकडल्या प्रदेशात अत्यंत शुद्ध अशी योगेश्वर जो परमेश्वर त्याचीच गति आहे असे म्हणतात. ॥४२॥ सूर्यः अंडमध्यगतः द्यावाभूम्योः यत् अंतरं सूर्यांडगोलयोः मध्ये पञ्चविंशतिः कोटयः योजनानि स्युः सूर्य ब्रह्मांडगोलाच्या मधोमध आहे स्वर्ग व भूमि यांच्यामधील जे अंतर सूर्य व ब्रह्मांडगोल यांच्या मध्यभागी पंचवीस कोटी योजने आहेत. ॥४३॥ यत् एषः एतस्मिन् मृते अंडे अभूत् ततः मार्तण्डः इति (तस्य) व्यपदेशः यत् हिरण्याण्डसमुद्भवः तत् हिरण्यगर्भः इति ज्याअर्थी हा सूर्य ह्या मेल्याप्रमाणे अचेतन अशा ब्रह्मांडामध्ये होता त्याअर्थी मार्तंड असे ज्याचे नाव आहे ज्याअर्थी सुवर्णाच्या ब्रह्मांडगोलकापासून उत्पन्न झाला त्याअर्थी हिरण्यगर्भ या नावाने प्रसिद्ध झाला. ॥४४॥ हि दिशः खं द्यौः मही स्वर्गापवर्गौ नरकाः च रसौकांसि सर्वशः सूर्येण भिदा विभज्यन्ते कारण दिशा, आकाश, स्वर्ग, पृथ्वी, स्वर्ग व मोक्ष, नरक आणि पाताळातील स्थाने सर्वत्र सूर्याकडून भेदरूपाने विभागिली जातात. ॥४५॥ सूर्यः देवतिर्यङ्मनुष्ययाणां सरीसृपसवीरुधां सर्वजीवनिकायानां आत्मा च दृगीश्वरः सूर्य, देव, पशु आदिकरून योनि व मनुष्ये यांचा वेलींसह सरपटणार्या सर्पादि प्राण्यांचा सर्व प्राणिसमूहांचा आत्मा आणि नेत्रेंद्रियांची देवता आहे. ॥४६॥ पंचम स्कन्धः - अध्याय विसावा समाप्त |