श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय १३ वा - अन्वयार्थ

संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहूगणाची संशयनिवृत्ती -

दुरत्यये अध्वनि अजया निवेशितः रजस्तमःसत्त्वविभक्तकर्मदृक् सः एषः अर्थपरः सार्थः परिभ्रमन् भवाटवीं याति शर्म न विंदति ओलांडून जाण्यास कठीण अशा मार्गात मायेने ठेविलेला रज, तम व सत्त्व ह्या गुणांनी विभागिलेल्या कर्माकडेच लक्ष देणारा तो हा द्रव्यप्राप्तीच्या कामी तत्पर उदमी लोकांचा तांडा भटकणारा संसाराण्याप्रत गमन करितो सुखाला प्राप्त होत नाही. ॥१॥

नरदेव यस्यां इमे षट् दस्यवः कुनायकं सार्थं बलात् विलुंपंति यत्र गोमायवः प्रमत्तं सार्थिकं आविश्य यथा वृकाः उरणं (तथा) हरंति हे राजा, ज्या संसाररूप अरण्यात हे सहा चोर ज्याचा पुढारी वाईट आहे अशा व्यापार्‍यांच्या तांडयाला बलात्काराने लुटतात जेथे कोल्हे असावध अशा व्यापार्‍याला चोहोकडून घेरून जसे लांडगे मेंढयाला त्याप्रमाणे लुबाडीत असतात. ॥२॥

क्वचित् प्रभूतवीरुत्तृणगुल्मगह्वरे (वने) कठोरदंशैः मशकैः उपद्रुतः क्वचित् तु गंधर्वपुरं च क्वचित् आशुरयोल्मुकग्रहं पश्यति कधी पुष्कळ वेली, गवत, जाळ्या, व गुहा असलेल्या अरण्यात तीक्ष्ण दंश असलेल्या डासांनी त्रासविलेला असतो कधी तर आकाशात दिसणार्‍या ढगांच्या नगरासारख्या आकृतीला आणि कधी अतिचंचल असा कोलीत घेऊन फिरणार्‍या पिशाचाला पहातो. ॥३॥

भोः निवासतोयद्रविणात्मबुद्धिः अटव्यां ततस्ततः धावति च क्वचित् रजस्वलाक्षः वात्योत्थितपांसुधूम्राः दिशः न जानाति अहो ज्यांची स्वतःची बुद्धि घर, उदक व द्रव्य मिळविण्याकडे आहे असा अरण्यात इकडेतिकडे धावतो आणि कधी ज्याचे डोळे धुळीने भरले आहेत असा वावटळीमुळे उठलेल्या धुळीने धुंद झालेल्या दिशांना ओळखीत नाही. ॥४॥

क्वचित् अदृश्यझिल्लीस्वनकर्णशूलः उलूकवाग्भिः व्यतिथांतरात्मा क्षुधार्दितः अपुण्यवृक्षात् श्रयते मरीचितोयानि अभिधावति कधी न दिसणार्‍या माशांच्या कठोर शब्दाने ज्याच्या कानात शूळ उत्पन्न झाला आहे असा, घुबडांच्या शब्दांनी दुःखित मन झालेला, भुकेने व्याकुळ झालेला पापी वृक्षांचा आश्रय करितो, मृगजळांकडे धावत सुटतो. ॥५॥

क्वचित् वितोयाः सरितः अभियाति च निरंधः परस्परं आलपते क्वचित् दावं आसाद्य अग्नितप्तः च क्व यक्षेः हृतासु निर्विद्यते कधी कोरडया नद्यांकडे जातो, आणि अन्न न मिळालेले असा आपापसात भाऊबंदाजवळ मागतो, एखादेवेळी वणव्यात सापडून अग्नीने तापतो, आणि केव्हा यक्षांनी ज्याचे प्राणाहूनहि प्रिय असे द्रव्य हरण केले आहे असा खिन्न होतो. ॥६॥

च क्व शूरैः हृतस्व निर्विण्णचेताः शोचन् विमुह्यन् कश्‍मलं उपयाति च क्वचित् गंधर्वपुरं प्रविष्टः निर्वृतवत् मुहूर्तं प्रमोदते आणि कधी शूर लोकांनी द्रव्य हरण केलेला असा, खिन्न मन झालेला, शोक करणारा, घेरी आलेला, मूर्च्छेला प्राप्त होतो आणि कधी गंधर्वनगरीत शिरलेला सुख पावल्यासारखा क्षणभर आनंदात राहतो. ॥७॥

क्वचित् चलन् कंटकशर्करांघ्रिः नगारुरुक्षुः विमनाः इव आस्ते पदेपदे अभ्यंतरवह्‌निना अर्दितः कौटुंबिकः वै जनाय क्रुध्यति कधी चालू लागला की, काटे व खडे पायात मोडलेला असा, पर्वतावर चढण्याची इच्छा करणारा, खिन्न झाल्याप्रमाणे स्वस्थ रहातो, पावलोपावली जठराग्नीने पीडलेला, ज्याच्या पदरी कुटुंब आहे असा खरोखर लोकांवर संतापतो. ॥८॥

क्वचित् अजगराहिना निगीर्णः जनः किंचित् न अवैति च क्व विपिने अपविद्धः दंदशूकैः दष्टः अंधः अंधकूपे पतितः तमिस्रे शेते स्म कधी अजगर सर्पाने गिळलेला लोक काही देखील जाणत नाही आणि एखादेवेळी अरण्यात अपमान करून सोडलेला सर्पांनी चावलेला, आंधळा होऊन अंधार्‍या विहिरीत पडलेला, दुःखात लोळत असतो. ॥९॥

कर्हिस्मचित् क्षुद्ररसान् विचिन्वन् तन्मक्षिकाभिः विमानः व्यथितः (भवति) अथ तत्र अतिकृच्छ्रात् प्रतिलब्धमानः (भवति) तं ततः अन्ये बलात् विलुंपंति कधीकधी हलक्या रसांना शोधणारा, तेथील माशांनी अवमान केलेला, पीडा पावतो, जर कदाचित तेथे मोठया कष्टाने इच्छित पदार्थ प्राप्त झाला आहे ज्याला असा होतो, त्या पदार्थाला त्याहून दुसरे कोणी बलात्काराने लुटतात. ॥१०॥

च क्वचित् शीतातपवातवर्षप्रतिक्रियां कर्तुं अनीशः आस्ते च क्वचित् यत् किंचित् मिथः विपणन् वित्तशाठयात् उत विद्वेषं ऋच्छति आणि एखादे प्रसंगी थंडी, उन्ह, वारा, पाऊस ह्यांचे निवारण करण्यास असमर्थ होतो, आणखी कधी थोडाबहुत परस्परांशी व्यवहार करणारा द्रव्याविषयीच्या फसवणुकीमुळे अधिकच द्वेषाप्रत प्राप्त होतो. ॥११॥

क्वचित् क्वचित् तु तस्मिन् क्षीणधनः शय्यासनस्थानविहारहीनः याचन् परात् अप्रतिलब्धकामः पारक्यदृष्टिः अवमानं लभते कधी कधी तर त्यात नष्ट झाले आहे द्रव्य ज्याचे असा शय्या, आसन, घर यांनी रहित झालेला, भिक्षा मागणारा, दुसर्‍यापासून इच्छित पदार्थ प्राप्त न झालेला, दुसर्‍याच्या वस्तूवर दृष्टि ठेवणारा, अपमानाला प्राप्त होतो. ॥१२॥

अन्योन्यवित्तव्यतिषंगबद्धवैरानुबंधः च मिथः विवहन् अमुष्मिन् अध्वनि विहरन् उरुकृच्छ्रवित्तबाधोपसर्गैः विपन्नः (भवति) परस्परात केलेल्या द्रव्यव्यवहारामुळे पडला आहे वैरसंबंध ज्याचा असा आणि एकमेकांशी विवाहसंबंध करणारा, ह्या मार्गात क्रीडा करणारा, अनेक संकटे, द्रव्यनाश इत्यादिकाच्या त्रासामुळे मृतप्राय होतो. ॥१३॥

सः सार्थः तान् तान् विपन्नान् तत्रतत्र विहाय जातं परिगृह्य अद्य अपि न आवर्तते वीर कश्‍चित् अत्र अध्वनः पारं योगं न उपैति तो व्यापार्‍यांचा तांडा त्या त्या मृतप्राय झालेल्याना तेथे तेथे सोडून जन्मास आलेल्याला घेऊन अजूनसुद्धा माघारा फिरत नाही, हे वीरा कोणीहि येथे ह्या मार्गाच्या पलीकडील योगमार्गाला जाऊन पोचत नाही. ॥१४॥

निर्जितदिग्गजेंद्राः मनस्विनः भुवि मम इति बद्धवैराः सर्वे मृधे शयीरन् गतवैरः न्यस्तदंडः तु यत् अभियाति तत् न व्रजंति ज्यांनी दिक्पाल जिंकिले आहेत असे शूर पृथ्वीवर ही माझी अशा अभिमानाने वैर धरून रहाणारे सर्व युद्धात लोळत पडतील वैर नाहीसे झालेला, दुसर्‍याला शिक्षा देणे ज्याने सोडिले आहे असा संन्यासी तर ज्या पदाला जातो त्या स्थानाला जात नाहीत. ॥१५॥

क्व अपि लताभुजाश्रयः तदाश्रयाव्यक्तपदद्विजस्पृहः प्रसज्जति क्वचित् कदाचित् हरिचक्रतः त्रसन् बककंकगृध्रैः सख्यं विधत्ते क्वचित् प्रसंगी सुद्धा वेलीच्या फांद्यांचा आश्रय करणारा, त्या वेलींच्या आश्रयाने रहाणार्‍या अस्पष्ट शब्द बोलणार्‍या पाखरांवर ज्याचे प्रेम जडले आहे असा आसक्त होतो केव्हा कधी सिंहाच्या कळपापासून भिणारा बगळे, कंक व गिधाडे यांच्याशी मित्रत्व करितो. ॥१६॥

तैः वंचितः हंसकुलं समाविशन् शीलं अरोचयन् वानरान् उपैति तज्जातिरासेन सुनिर्वृतेन्द्रियः परस्परोद्वीक्षणविस्मृतावधिः त्यांच्या संगतीने फसलेला, हंसांच्या समूहात प्रवेश करणारा, त्यांचा स्वभाव न आवडणारा, वानरांकडे जातो त्या वानरजातीच्या क्रीडेने ज्यांची इंद्रिये अत्यंत सुख पावली आहेत असा, परस्परांकडे पहाण्याने ज्याला अंतकाळाचा विसर पडला आहे असा, ॥१७॥

क्वचित् द्रुमेषु रंस्यन् सुतदारवत्सलः व्यवायदीनः स्वबंधने विवशः प्रमादात् गिरिकंदरे पतन् गजभीतः वल्लीं गृहीत्वा आस्थितः केव्हा वृक्षांच्या ठिकाणी रममाण होणारा, पुत्र व स्त्रिया यांवर प्रेम ठेवणारा, मैथुनेच्छेमुळे दीन झालेला, आपल्या बंधनामुळे पराधीन झालेला, असावधपणामुळे पर्वताच्या गुहेत पडणारा, हत्तीची भीति बाळगणारा, वेलीला धरून बसतो. ॥१८॥

अरिंदम कथंचित् अतः आपदः विमुक्तः पुनः च सार्थं प्रविशति अमुष्मिन् अध्वनि अजया निवेशितः भ्रमन् कश्‍चन जनः अद्य अपि (पुरुषार्थं) न वेद हे शत्रुदमना राजा, कसा तरी ह्या संकटातून सुटलेला पुनः आणि व्यापार्‍यांच्या मेळ्यात शिरतो ह्या मार्गात मायेने लोटून दिलेला फिरणारा कोणीहि मनुष्य अजूनहि पुरुषार्थाला जाणत नाही. ॥१९॥

रहूगण त्वम् अपि संन्यस्तदंडः कृतभूतमैत्रः असज्जितात्मा हरिसेवया शितं ज्ञानासि आदाय अस्य अध्वनः पारं अतितर हे रहूगण राजा, तु सुद्धा टाकिला आहे राजदंड ज्याने असा, सर्वांशी मैत्री ठेवणारा, कोठेहि मन आसक्त न होऊ देणारा असा, ईश्वराच्या सेवेने तीक्ष्ण अशा ज्ञानरूप तलवारीला घेऊन ह्या मार्गाच्या परतीराला तरून जा. ॥२०॥

अहो नृजन्मा अखिलजन्मशोभनं (अस्ति) अमुष्मिन् (लोके) अपि अपरैः जन्मभिः किं यत् हृषीकेशयशःकृतात्मनां महात्मना वः प्रचुरः समागमः न अहो मनुष्य जन्म संपूर्ण जन्मामध्ये कल्याणकारक होय ह्या स्वर्गलोकांमध्ये सुद्धा दुसर्‍या देवादिकांच्या जन्मांनी काय उपयोग जेथे इंद्रियांचा स्वामी जो ईश्वर त्याच्या कीर्तीच्या योगाने शुद्ध केली आहेत मने ज्यांनी अशा सत्पुरुष अशा तुमचा भरपूर समागम नाही. ॥२१॥

च त्वच्चरणाब्जरेणुभिः हतांहसः अधोक्षजे अमला भक्तिः अद्‌भुतं न हि यस्य मौहूर्तिकात् समागमात् मे दुस्तर्कमूलः अविवेकः अपहतः आणि तुझ्या चरणकमलांच्या रजःकणांनी नष्ट झाले आहे पाप ज्याचे अशाच परमेश्वराच्या ठिकाणी निर्मळ भक्ति जडणे हे आश्‍चर्य नव्हे कारण ज्याच्या क्षणभर टिकणार्‍या समागमाने माझा ज्याच्या मुळाशी कुतर्क आहे असा अविवेक दूर झाला. ॥२२॥

महद्‍भ्यः नमः अस्तु शिशुभ्यः नमः युवभ्यः नमः आबटुभ्यः नमः ये ब्राह्मणाः अवधूतलिंगाः गां चरंति तेभ्यः नमः राज्ञां शिवं अस्तु सत्पुरुषांना नमस्कार असो, लहान मुलांना नमस्कार असो, तरुणांना नमस्कार असो, बटु आदिकरून सर्वांना नमस्कार असो, जे ब्राह्मण अवधूतासारखा वेष धारण करणारे पृथ्वीवर संचार करितात त्यांना नमस्कार असो, राजांचे कल्याण असो. ॥२३॥

उत्तरामातः वै परानुभावः सः ब्रह्मर्षिः विगणयतः (अपि) परमकारुणिकतया सिंधुपतये इति एवं आत्मसतत्त्वं उपदिश्य रहूगणेन सकरुणं अभिवंदितचरणः आपूर्णार्णवः इव निभृतकरणोर्म्याशयः इमां धरणीं विचचार उत्तरा ज्याची आई आहे अशा हे परीक्षिता, खरोखर ज्याचे सामर्थ्य श्रेष्ठ आहे असा तो जडभरत अपमान करणार्‍याविषयीसुद्धा अत्यंत दयाळूपणे सिंधु देशाच्या राजाला याप्रमाणे आत्मज्ञान उपदेशून रहूगणाने गहिवरून वंदिले आहेत चरण ज्याचे असा भरती आलेल्या समुद्राप्रमाणे शांत आहेत इंद्रियांच्या लाटा ज्यात अशा मनाने युक्त झालेला ह्या पृथ्वीवर संचार करिता झाला. ॥२४॥

सुजनसमवगतपरमात्मसतत्त्वः सौवीरपतिः अपि आत्मनि अविद्याध्यारोपितं देहात्ममतिं विससर्ज हि नृप एवं भगवदाश्रिताश्रितानुभावः सज्जनांच्या समागमाने ज्याला परमात्मतत्त्व कळले आहे असा सौवीर देशाचा राजा सुद्धा आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाने आरोपित केलेल्या देह हाच आत्मा होय अशा बुद्धीला सोडिता झाला कारण हे राजा, असे परमेश्वराच्या दासाच्या दासांचे सामर्थ्य असते. ॥२५॥

महाभागवत ह वा बहुविदा त्वया परोक्षेण वचसा आर्यमनीषया कल्पितविषयः यः इह जीवलोकभवाध्वा अभिहितः सः हि अंजसा अव्युत्पन्नलोकसमधिगमः न अथ तत् एव दुरवगमं एतत् समवेतानुकल्पेन निर्दिश्यतां इति हे महाभगवद्‌भक्त मुने, सांप्रत विपुल ज्ञान असलेल्या तुझ्याकडून अप्रत्यक्ष रूपकात्मक अशा भाषणाने सूज्ञांच्या बुद्धीने ज्याचा खरा अर्थ उकलला आहे असा जो येथे जीवसमूहाचा संसारमार्ग कथन केला गेला तो खरोखर सहज अशिक्षित लोकांना कळण्याजोगा नाही म्हणून तेच दुर्बोध असे हे रूपक योग्य अशा पदार्थाच्या योजनेने दाखवून द्यावे असे. ॥२६॥

पंचम स्कन्धः - अध्याय तेरावा समाप्त

GO TOP