|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय १२ वा - अन्वयार्थ
रहूगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान - अवधूत कारणविग्रहाय स्वरूपतुच्छीकृतविग्रहाय नमोनमः द्विजबंधुलिंगनिगूढनित्यानुभवाय तुभ्यं नमः हे निःसंग पुरुषा, कारणाकरिता शरीर धारण करणार्या स्वरूपाच्या अनुभवामुळे शरीराला तुच्छ मानणार्या तुला वारंवार नमस्कार असो. अधम ब्राह्मणाच्या वेषाने नित्यानुभव गुप्त राखणार्या तुम्हाला नमस्कार असो. ॥१॥ ब्रह्मन् यथा ज्वरामयार्तस्य सत् अगदं यथा निदाघदग्धस्य हिमांभः कुदेहमानाहिविदष्टदृष्टेः मे ते वचः अमृतं औषधम् अस्ति हे ब्रह्मवेत्त्या जसे ज्वररोगाने पीडित झालेल्याला चांगले औषध, जसे उन्हाने तापलेल्याला थंड पाणी, निंद्य अशा देहाविषयी अभिमान हाच सर्प त्याने चाविली आहे दृष्टि ज्याची अशा मला तुझे भाषण अमृततुल्य औषध होय. ॥२॥ तस्मात् मम संशयार्थं पश्चात् भवंतं प्रक्ष्यामि अधुना कौतूहलचेतसः मे अध्यात्मयोगग्रथितं तव उक्तं सुबोधं आख्याहि त्याकरिता माझा संशयाचा विषय मागाहून तुला विचारीन सांप्रत ज्याच्या मनात जिज्ञासा आहे अशा मला अध्यात्मयोगाने गुंफलेले तुझे भाषण चांगले समजेल अशा रीतीने स्पष्ट सांग. ॥३॥ योगेश्वर भवान् यत् दृश्यमानं क्रियाफलं सद्व्यवहारमूलं अंजसा तत्त्वविमर्शनाय नहि आह अमुष्मिन् मे मनः भ्रमते हे योगेश्वरा, आपण जे दिसणारे भार वहाणे इत्यादिक क्रियांचे फळ खर्या व्यवहारास कारण असताहि प्रत्यक्ष तत्त्वविचार करण्यास समर्थ नाही म्हणाला ह्याविषयी माझे मन घोटाळत आहे. ॥४॥ पार्थिव यः पार्थिवः सः एव कस्य (चित्) हेतोः पृथिव्यां चलन् अयं जनः नाम (अस्ति) च तस्य अपि अङ्घ्र्योः अधि गुल्फजंघाजानूरुमध्योरशिरोधरांसाः (अवयवाः सन्ति) हे राजा, जो पृथिवी विकार तोच काही कारणामुळे पृथिवीच्या ठिकाणी हिंडणारा हा मनुष्य खरोखर होय. आणि त्या पृथिवीविकाररूप देहाच्याहि पायांवर घोटे, पोटर्या, गुडघे, मांडया, कमर, वक्षस्थल, मान व खांदे हे अवयव रचिले आहेत. ॥५॥ च अंसे अधिदार्वी शिबिका (अस्ति) यस्यां सौवीरराजेत्यपदेशः आस्ते यस्मिन् सिंधुषु राजा अस्मि इति रूढनिजाभिमानः दुर्मदांधः भवान् (अस्ति) आणि खांद्यावर लाकडाची पालखी आहे, ज्या पालखीत सौवीर देशाचा राजा अशा नावाचा एक पुतळा आहे, ज्याच्या ठिकाणी सिंधु राजा मी आहे असा धारण केला आहे स्वतःविषयी अभिमान ज्याने असा, दुष्ट मदाने आंधळा झालेला तू आहेस. ॥६॥ शोच्यान् इमान् अधिकष्टदीनान् तु विष्टया निगृह्णन् निरनुग्रहः असि जनस्य गोप्ता अस्मि इति विकत्थमानः धृष्टः वृद्धसभासु न शोभसे ज्यांच्याबद्दल वाईट वाटावे अशा ह्या अत्यंत कष्ट भोगून दीन झालेल्या भोयांना तर वेठीला धरणारा असा निर्दय आहेस, लोकांचा रक्षक आहे अशी प्रौढी मिरविणारा उद्धट असा, ज्ञानवृद्ध लोकांच्या सभेमध्ये शोभत नाहीस. ॥७॥ यदा क्षितौ एव नित्यं चराचरस्य प्रभवं च निष्ठां विदाम तत् नामतः व्यवहारमूलं क्रियया सत् इति अनुमेयं अन्यत् निरूप्यतां जर पृथ्वीतच सदोदित स्थावरजंगम वस्तूची उत्पत्ति आणि प्रलय आपण जाणतो तर नाममात्राहून व्यवहाराला कारणीभूत असे अर्थक्रियेने खरे आहे असे अनुमान करण्याजोगे दुसरे निरूपण कर. ॥८॥ एवं असन्निधानात् क्षितिशब्दवृत्तं निरुक्तं ये परमाणवः उच्यन्ते ते अविद्यया मनसा कल्पिताः सन्ति येषां समूहेन विशेषः कृतः याचरीतीने सूक्ष्म परमाणूत लय होत असल्यामुळे पृथ्वी या शब्दाचा वृत्तांत स्पष्ट केला जातो जे परमाणू म्हणून म्हणतात ते अज्ञानाने मनाने कल्पिलेले आहेत ज्या परमाणूंच्या समुदायाने पृथ्वी हा विशेष आकार केलेला आहे ॥९॥ एवं अन्यत् यत् कृशं स्थूलं अणुः बृहत् असत् सत् जीवं च अजीवं द्वितीयं द्रव्यस्वभावाशयकालकर्मनाम्ना अजया कृतं अवेहि याप्रमाणे दुसरे जे किडकिडीत, लठ्ठ, सूक्ष्म, मोठे, खोटे, खरे, चेतन आणि जड हे द्वैत विषय, स्वभाव, संस्कार, काल व कर्म ह्या नावाने मायेने केलेले जाण. ॥१०॥ कवयः यत् विशुद्धं परमार्थं एकं अनंतरं अबहिः सत्यं ब्रह्म प्रत्यक् प्रशांतं भगवच्छब्दसंज्ञं ज्ञानं तु वासुदेवं वदंति ज्ञानी लोक ज्या अत्यंत शुद्ध परमार्थरूपी अद्वितीय अभ्यंतररहित बाह्यरहित सत्यस्वरूप ब्रह्मरूप अंतर्मुख निर्विकार भगवान असे नाव असणार्या ज्ञानाला तर वासुदेव असे म्हणतात. ॥११॥ रहूगण एतत् महत्पादरजोभिषेकं विना तपसा न याति वा इज्यया च गृहात् निर्वपणात् न छंदसा न जलाग्निसूर्यैः एव न (याति) हे रहूगण राजा, हे ज्ञान सत्पुरुषांच्या चरणधूलीचे स्नान घडल्यावाचून तपश्चर्येने प्राप्त होत नाही अथवा यज्ञाने आणि गृहस्थाश्रमाने, अन्नसमर्पणाने प्राप्त होत नाही, वेदाभ्यासाने मिळत नाही, जल, अग्नि व सूर्य ह्यांच्या उपासनेने सुद्धा मिळत नाही. ॥१२॥ यत्र ग्राम्यकथाविघातः उत्तमश्लोकगुणानुवादः प्रस्तूयते अनुदिनं निषेव्यमाणः सः मुमुक्षोः वासुदेवे सतीं मतिं यच्छति ज्या सत्पुरुषांमध्ये विषयसुखसंबंधी कथांचा विघात करणारे परमेश्वराच्या गुणांचे वर्णन केले जाते प्रतिदिवशी सेविले जाण्यास योग्य ते गुणवर्णन मुक्तीची इच्छा करणार्या पुरुषाला परमेश्वराविषयी निर्मल अशी बुद्धि देतो. ॥१३॥ अहं पुरा विमुक्तदृष्टश्रुतसंगबन्धः भगवतः आराधनं ईहमानः भरतः नाम राजा मृगसंगात् हतार्थः मृगः अभवं मी पूर्वी दिसलेल्या व ऐकिलेल्या वस्तूवरील आसक्तिरूप बंधन सुटले आहे ज्याचे असा परमेश्वराचे आराधन इच्छिणारा भरत ह्या नावाचा राजा हरिणाच्या संगतीने पुरुषार्थ नष्ट झाला आहे ज्याचा असा हरिण झालो. ॥१४॥ वीर सा कृष्णार्चनप्रभवा स्मृतिः मृगदेहे अपि मां न जहाति अथो अहं (अधुना) जनसंगात् विशंकमानः असंगः अविवृतः चरामि हे पराक्रमी राजा, ती परमेश्वराच्या पूजनाने उत्पन्न झालेली आठवण हरिणाच्या देहामध्येहि मला सोडती झाली नाही म्हणून मी आता जनसंगाची भीति बाळगणारा निःसंग प्रगट नाही स्वरूप ज्याचे असा संचार करितो. ॥१५॥ तस्मात् इह एव असंगसुसंगजातज्ञानासिना विवृक्णमोहः नरः तदीहाकथनश्रुतिभ्यां लब्धस्मृतिः अध्वनः अतिपारं हरिं याति याकरिता ह्या जन्मामध्येच सर्वसंगपरित्याग केलेल्या सत्पुरुषांच्या संगतीपासून उत्पन्न झालेल्या ज्ञानरूपी तलवारीने मोह तोडिला आहे ज्याने असा मनुष्य परमेश्वराच्या लीला कथन करणे व ऐकणे ह्यांपासून प्राप्त झाली आहे आत्मस्वरूपाची स्मृति ज्याला असा संसारमार्गाच्या पैल तीरावर हरीला प्राप्त होतो. ॥१६॥ पंचम स्कन्धः - अध्याय बारावा समाप्त |