|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय ५ वा - अन्वयार्थ
ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूतवृत्ती धारण करणे - नृलोके देहभाजां अयं देहः ये विङ्भुजाम् कष्टान् कामान् न अर्हते पुत्रकाः दिव्यं तपः येन सत्त्वं शुद्ध्येत् यस्मात् तु अनंतं ब्रह्मसौख्यं मनुष्यलोकांत देहधारी लोकांचा हा देह जे विष्ठा भक्षण करणार्यांचे त्या दुःखदायक भोगांना योग्य नाही. मुलांनो दिव्य तप ज्याच्या योगाने अंतःकरण शुद्ध होईल ज्यापासून तर अनंत ब्रह्मसुख प्राप्त होईल. ॥१॥ महत्सेवां विमुक्तेः द्वारं योषितां संगिसंगं तमोद्वारं आहुः ये समचित्ताः प्रशांताः विमन्यवः सुहृदः साधवः ते महान्तः सत्पुरुषांच्या सेवेला मुक्तीचे द्वार स्त्रियांचा संग असणार्यांच्या संगतीला नरकाचे द्वार म्हणतात जे अंतःकरणवृत्ति सम असणारे अतिशय शांत स्वभावाचे क्रोधरहित कोमलहृदय साधु असतात ते थोर होत. ॥२॥ वा ये ईशे मयि कृतसौहृदार्थाः देहंभरवार्तिकेषु जनेषु जायात्मजरातिमत्सु गृहेषु प्रीतियुक्ताः न च लोके यावदर्थाः ते महान्तः अथवा जे मी जो ईश्वर त्या माझ्या ठिकाणी प्रेम ठेवणे हाच पुरुषार्थ मानणारे उदर भरण्यासंबंधी गोष्टी करणार्या लोकांच्या ठिकाणी स्त्री, पुत्र, मित्र, इत्यादिकांनी युक्त अशा गृहांच्या ठिकाणी प्रेम ठेवणारे नसतात आणि लोकांमध्ये कामापुरता संबंध ठेवणारे ते थोर पुरुष होत. ॥३॥ यत् इंद्रियप्रीतये आपृणोति प्रमत्तः नूनं विकर्म कुरुते यतः अयं आत्मनः असन् अपि क्लेशदः देहः आस साधु न मन्ये जेव्हा इंद्रियांच्या संतोषासाठी व्यापार करितो प्रमत्त होत्साता निश्चयेकरून पापकर्म करितो ज्या कर्मापासून हा आत्म्याला मिथ्याभूत असाहि दुःख देणारा देह झाला चांगले मी मानीत नाही. ॥४॥ यावत् आत्मतत्त्वं न जिज्ञासते तावत् अबोधजातः पराभवः यावत् क्रियाः तावत् वै मनः कर्मात्मकं ((भवेत्) येन शरीरबंधः जोपर्यंत आत्मतत्त्वाला पुरुष जाणण्याची इच्छा करीत नाही तोपर्यंत अज्ञानापासून उत्पन्न झालेला पराभव असतो जोपर्यंत व्यापार चालू आहेत तोपर्यंत खरोखर मन कर्मात गढलेले असणार ज्यामुळे शरीररूपी बंध भोगावा लागतो. ॥५॥ एवं अविद्यया आत्मनि उपधीयमाने मनः कर्मवशं प्रयुंक्ते यावत् वासुदेवे मयि प्रीतिः न तावत् देहयोगेन न मुच्यते याप्रमाणे अविद्येने आत्मा आच्छादिला असता मन कर्माच्या नियंत्रणात ठेविते जोपर्यंत मी जो वासुदेव त्या माझ्याठिकाणी प्रीति नाही तोपर्यंत शरीरसंबंधापासून पुरुष मुक्त होत नाही. ॥६॥ यदा स्वार्थे प्रमत्तः विपश्चित् गुणेहां अयथा न पश्यति तत्र अज्ञः सहसा गतस्मृतिः मैथुन्यं अगारं आसाद्य तापान् विंदति जेव्हा स्वार्थाच्या ठिकाणी प्रमत्त विद्वान गुणांच्या चेष्टेला जशी दिसते तशी नाही असे पहात नाही तेव्हा मूर्ख अकस्मात ज्याचे स्मरण नष्ट झाले आहे असा मैथुनसुखप्रधान गृहाला प्राप्त होऊन त्रिविध तापांना मिळवितो. ॥७॥ एतं पुंसः स्त्रियः मिथुनीभावं तयोः मिथः हृदयग्रंथिं आहुः अतः गृहक्षेत्रसुताप्तवित्तैः जनस्य अहं मम इति अयं मोहः ह्या पुरुषाच्या स्त्रीच्या एकत्वाला त्यांची परस्परांतील अंतःकरणाची गाठ म्हणतात म्हणून गृह, जागा, पुत्र, आप्त व द्रव्य ह्यांच्या योगाने प्राण्याला मी आणि माझे असा हा मोह होतो. ॥८॥ यदा कर्मानुबद्धः दृढः मनोहृदयग्रंथिः आश्लथेत तदा जनः अस्मात् संपरिवर्तते मुक्तः हेतुं अतिहाय परं याति ज्यावेळेस पूर्वकर्मामुळे बांधलेली बळकट अशी मनोरूपी हृदयाची गाठ सैल होते त्यावेळेस लोक ह्या स्त्रीपुरुषांच्या एकपणापासून मागे फिरतो मुक्त होऊन बंधनाच्या कारणाला सोडून मोक्षाला जातो. ॥९॥ हंसे गुरौ मयि भक्त्या अनुवृत्त्या वितृष्णया द्वंद्वतितिक्षया च सर्वत्र जंतोः व्यसनावगत्या जिज्ञासया तपसा ईहानिवृत्त्या परमहंस ईश्वर जो मी त्या माझ्याठिकाणी भक्ति करण्याने, सेवेने, भोगेच्छा सोडल्याने, शीतोष्णादि द्वंद्वे सहन केल्याने आणि इहपरलोकी प्राण्याच्या दुःखाच्या जाणिवेने, ज्ञानाच्या इच्छेने, तपश्चर्येने, काम्यकर्मांच्या निवृत्तीने, ॥१०॥ पुत्राः च नित्यं मत्कर्मभिः मत्कथया मद्देवसंगात् मे गुणकीर्तनात् निर्वैरसाम्योपशमेन देहगेहात्मबुद्धेः जिहासया हे पुत्र हो, आणि सदोदित मत्प्रीत्यर्थ केलेल्या कर्माच्या योगाने, माझ्या कथेने, मला देव मानणार्यांच्या संगतीने, माझ्या गुणांच्या कीर्तनाने, वैरभाव, समता व शांति ह्यांच्या योगाने, देह, गृह व अहंममता यांचा त्याग करण्याच्या इच्छेने, ॥११॥ अध्यात्मयोगेन विविक्तसेवया सध्र्यक् प्राणेंद्रियात्माभिजयेन सच्छ्रद्धया ब्रह्मचर्येण शश्वत् असंप्रमादेन वाचां यमेन अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाने, एकांतवासाच्या सेवनाने, चांगल्याप्रकारे प्राण, इंद्रिये व मन ही स्वाधीन ठेविल्याने, उत्तम प्रकारच्या श्रद्धेने, ब्रह्मचर्याने, निरंतर कर्तव्यकर्मात चूक न केल्याने, वाणीच्या संयमाने, ॥१२॥ सर्वत्र मद्भावविचक्षणेन विज्ञानविराजितेन ज्ञानेन योगेन धृत्युद्यमसत्त्वयुक्तः कुशलः अहमाख्यं लिंगं व्यापोहेत् सर्व ठिकाणी माझेच अस्तित्व पहाण्याने, अनुभवाने शोभणार्या ज्ञानाने, समाधियोगाने, धैर्य, प्रयत्न व विवेक यांनी युक्त कुशल असा पुरुष अहंकाररूपी उपाधीला दूर करतो. ॥१३॥ अप्रमत्तः यथोपदेशं अनेन योगेन अविद्यया आसादितं कर्माशयं हृदयग्रन्थिबन्धं सम्यक् व्यपोह्य योगात् उपरमेत सावधान असा शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ह्या योगाने अज्ञानाने प्राप्त झालेल्या कर्माचे स्थानरूपी हृदयाच्या ग्रंथिबंधनाला चांगल्याप्रकारे दूर करून साधनांच्या अनुष्ठानापासून विराम पावतो. ॥१४॥ मल्लोककामः च मदनुग्रहार्थः नृपः वा गुरुः पुत्रान् च शिष्यान् इत्थं विमन्युः अनुशिष्यात् अतज्ज्ञान् कर्ममूढान् कर्मसु न योजयेत् हि नष्टदृशं गर्ते निपातयन् योजयन् मनुजः कं अर्थं लभेत माझ्या लोकाची इच्छा करणारा आणि माझी कृपा हाच पुरुषार्थ मानणारा राजा अथवा गुरु मुलांना आणि शिष्यांना अशा तर्हेने कोपरहित असा उपदेश करितो ज्यांना तत्त्वज्ञान नाही अशा कर्मच आमचे कल्याण करणारे आहे असे समजून मूढ झालेल्यांना कर्माच्या ठिकाणी युक्त करीत नाही कारण आंधळ्याला खडड्यात पाडीत वेडया कर्मठांना कर्ममार्गात युक्त करणारा पुरुष कोणत्या अर्थाला मिळवील ? ॥१५॥ यः निकामकामः लोकः अन्योन्यवैरः अर्थान् समीहेत स्वयं श्रेयसि नष्टदृष्टिः मूढः सुखलेशहेतोः अनंतदुःखं न वेद जो अतिशय भोगेच्छा असलेला मनुष्य परस्परात वैर धारण करणारा विषयभोगांना इच्छितो स्वतः कल्याणाविषयी ज्याची दृष्टि नष्ट झाली आहे असा मूर्ख लेशमात्र सुखासाठी अपरिमित दुःखांना जाणत नाही. ॥१६॥ कः स्वयं तदभिज्ञः विपश्चित् सघृणः तं कुबुद्धिं अंधं अविद्यायाम् अन्तरे वर्तमानं दृष्टवा पुनः तं यथा उत्पथगं प्रयोजयेत् कोणता स्वतः तत्त्वज्ञान जाणणारा विद्वान दयावान पुरुष त्या वाईट बुद्धीच्या आंधळ्याला अज्ञानाच्या फेर्यात सापडला आहे असे पाहून पुनः त्याला जसे भलत्याच मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त करील. ॥१७॥ यः समुपेतमृत्युं न मोचयेत् सः गुरुः न स्यात् सः स्वजनः न स्यात् सः पिता न स्यात् सा जननी न स्यात् तत् दैवं न स्यात् च सः पतिः न स्यात् जो प्राप्त झालेल्या जन्ममृत्युरूप संसारापासून सोडविणार नाही तो गुरु नव्हे, तो आपला बंधु नव्हे, तो बाप नव्हे, ती माता नव्हे, ते दैवत नव्हे, आणि तो पति नव्हे. ॥१८॥ इदं मम शरीरं दुर्विभाव्यम् हि मे हृदय यत्र धर्मः सत्त्वं यत् मे अधर्मः पृष्ठे आरात् कृतः अतः हि आर्याः मां ऋषभं आहुः हे माझे शरीर तर्क करण्यास कठीण आहे कारण माझे हृदय ज्यात धर्म भरलेला आहे असे सत्त्वगुणात्मक आहे ज्याअर्थी माझ्याकडून अधर्म पाठीमागे दूर केला गेला आहे म्हणून खरोखर श्रेष्ठ लोक मला श्रेष्ठ असे म्हणतात. ॥१९॥ भवंतः हृदयेन जाताः तस्मात् यूयं सर्वे अमुं महीयांसं सनाभं भरतं अक्लिष्टबुद्ध्या भजध्वं तत् शुश्रूषणं प्रजानां भरणं तुम्ही माझ्या सत्त्वमय हृदयापासून झालेले आहा त्याकरिता तुम्ही सर्व ह्या श्रेष्ठ अशा सहोदर भरताला निष्कपटबुद्धीने भजा ते माझे सेवन प्रजांचे पालन होय. ॥२०॥ भूतेषु वीरुद्भ्यः (वरीयांसः) ये सरीसृपाः तेषु सबोधनिष्ठाः ततः मनुष्याः ततः प्रमथाः गंधर्वसिद्धाः विबुधानुगाः उदुत्तमाः चराचर प्राण्यांमध्ये वेलींहून श्रेष्ठ जे जंगम पदार्थ त्यांमध्ये ज्ञानयुक्त ज्यांची स्थिती आहे ते श्रेष्ठ होत, त्यांहून मनुष्य श्रेष्ठ होत, त्यांतून प्रमथगण श्रेष्ठ, गंधर्व श्रेष्ठ व त्याहून सिद्ध श्रेष्ठ, देवांचे किन्नरादि गण श्रेष्ठ होत. ॥२१॥ असुरेभ्यः मघवत्प्रधानाः देवाः तेषां तु ब्रह्मसुताः दक्षादयः सः विरिंचवीर्यः भवः परः अथ सः मत्परः अहं द्विजदेवदेवः असुरांहून इंद्र आहे मुख्य ज्यांमध्ये असे देव, त्यांमध्ये तर ब्रह्मदेवाचे मुलगे दक्षादिक श्रेष्ठ होत, तो ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेला शंकर श्रेष्ठ आणि तो ब्रह्मदेव मी ज्याला श्रेष्ठ आहे, असा आहे मी ब्राह्मणांना पूज्य मानणारा आहे. ॥२२॥ विप्राः ब्राह्मणैः अन्यत् भूतम् न तुलये तु अतः परं किम् पश्यामि नृभिः यस्मिन् श्रद्धया प्रहुतं अहं कामं अश्नामि तथा अग्निहोत्रे न ब्राह्मण हो, ब्राह्मणांशी दुसर्या कोणा प्राण्याला मी तोलीत नाही म्हणून या ब्राह्मणांहून श्रेष्ठ असे काय पहाणार ? मनुष्यांनी ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी श्रद्धेने अर्पण केलेले मी यथेच्छ भक्षण करितो. तसे अग्निहोत्रांत भक्षण करीत नाही. ॥२३॥ येन इह मे उशती पुराणी तनूः धृता च यत्र परमं पवित्रं सत्त्वं च शमः दमः सत्यं अनुग्रहः अनुभवः ज्या ब्राह्मणाने या लोकांत माझी सुंदर प्राचीन तनु धारण केली आणि ज्या ब्राह्मणाच्या ठिकाणी श्रेष्ठ पवित्र सत्त्वगुण आहे आणि शम, दम, सत्य, अनुग्रह, अनुभव आहे ॥२४॥ येषां परतः परस्मात् स्वर्गापवर्गाधिपतेः अनंतात् मत्तः अपि न किंचित् तेषां मयि भक्तिभाजां अकिंचनानां इतरेण किम् उ ज्यांना श्रेष्ठाहून श्रेष्ठ अशा स्वर्ग व मोक्ष यांचा स्वामी अशा अनंत जो मी त्या मजपासून सुद्धा काही एक मागण्यासारखे नाही त्या माझ्या ठिकाणी भक्ति करणार्या निर्धनी लोकांना दुसर्या राज्यादिकाशी खरोखर काय करावयाचे आहे ॥२५॥ सुताः वः सर्वाणि चराणि ध्रुवाणि भूतानि पदेपदे मद्धिष्ण्यतया संभावितव्यानि तत् उ ह विविक्तदृग्भिः भवद्भिः मे अर्हणं मुलांनो, तुम्ही संपूर्ण जंगम स्थावर प्राणी पावलोपावली माझेच स्थान आहे अशा भावनेने समजावे तेच ज्यांची दृष्टि मत्सरादिरहित आहे अशा तुम्हांकडून माझे पूजन होईल. ॥२६॥ हि मे परिबृंहणं मनोवचोदृक्करणेहितस्य साक्षात्कृतं पुमान् येन विना महाविमोहात् कृतान्तपाशात् विमोक्तुं न ईशेत् याकरिता माझे आराधन मन, वाणी, दृष्टि व इंद्रियांच्या व्यापारांचे प्रत्यक्ष फळ होय पुरुष ज्याच्याशिवाय महामोहरूपी कालपाशातून सुटण्यास समर्थ होत नाही. ॥२७॥ महानुभावः परमसुहृत् भगवान् ऋषभापदेशः स्वयं लोकानुशासनार्थं अनुशिष्टान् अपि आत्मजान् एवं अनुशास्य उपसमशीलानां उपरतकर्मणां महामुनीनां भक्तिज्ञानवैराग्यलक्षणं पारमहंस्यधर्मं उपशिक्षमाणः स्वतनयशतज्येष्ठं परमभागवतं भगवज्जनपरायणं भरतं धरणिपालनाय अभिशिच्य स्वयं भवने एव उर्वरितशरीरमात्रपरिग्रहः उन्मत्तः इव गगनपरिधानः प्रकीर्णकेशः आत्मनि आरोपिताहवनीयः ब्रह्मावर्तात् प्रवव्राज महासामर्थ्यवान, अत्यंत प्रेम करणारा, ऐश्वर्यवान, ऋषभदेवरूपी तो ईश्वर स्वतः लोकांना उपदेश करण्यासाठी सुशिक्षित अशाहि मुलांना याप्रमाणे शिकवून शांत स्वभावाच्या कर्मांचा त्याग केलेल्या श्रेष्ठ ऋषींना भक्ति, ज्ञान, व वैराग्यरूपी परमहंससंबंधी धर्माला उपदेश करण्याकरिता आपल्या शंभर पुत्रांमधील वडील अशा श्रेष्ठ भगवद्भक्त भगवद्भक्तांच्या सेवेत तत्पर अशा भरताला पृथ्वीच्या पालनाकरिता अभिषेक करून, स्वतः घरीच केवळ शरीर हाच संग्रह ज्याचेजवळ उरला आहे असा, उन्मत्ताप्रमाणे, आकाश हेच वस्त्र आहे ज्याचे असा, केस मोकळे सुटलेला, आत्म्याच्या ठिकाणी आहवनीय अग्नीचा समारोप केलेला, ब्रह्मावर्त देशातून बाहेर पडला. ॥२८॥ अवधूतवेषः अभिभाष्यमाणः अपि जनानां जडान्धमूकबधिरपिशाचोन्मादकवत् गृहीतमौनव्रतः तूष्णीं बभूव अवधूतासारखा वेष असणारा, बोलविण्याचा प्रयत्न केला तरीहि लोकांमध्ये जड, अंध, मुका, बहिरा व पिशाचाने झपाटलेल्याप्रमाणे मौनव्रत धारण केलेला निमूट रहाता झाला. ॥२९॥ तत्रतत्र पुरग्रामाकरखेटवाटखर्वटशिबिरव्रजघोषसार्थगिरिवनाश्रमादिषु अनुपथं अवनिचरापसदैः तर्जनताडनावमेहनष्ठीवनग्रावशकृद्रजःप्रक्षेपपूतिवातदुरुक्तैः वनगजः मक्षिकाभिः इव परिभूयमानः तदवगणयन् एव असत्संस्थाने एतस्मिन् सदपदेशे देहोपलक्षणे उभयानुभवस्वरूपेण स्वमहिमावस्थानेन असमारोपिताहंगमाभिमानत्वात् अविखंडितमनाः एकचरः पृथिवीं परिबभ्राम त्या त्या नगरे, गाव, खाणी, शेतकर्यांची खेडी, फुलांच्या बागा, डोंगरांच्या पायथ्यांचे गाव, सैन्याचे तळ, गोठे, गौळवाडे, व्यापार्यांचे तांडे, पर्वत, वने व आश्रम इत्यादि ठिकाणी जाताना मार्गांत नीच मनुष्यांनी निर्भर्त्सना करणे, मारणे, थुंकणे, मुतणे, दगड, विष्ठा व धूळ फेकणे, अधोवायु सोडणे व अपशब्द इत्यादिकांच्या योगेकरून अरण्यातील हत्ती, माशांनी जसा तसा त्रास दिलेला त्याला न जुमानताच मिथ्याभूत रचना ज्याची अशा ह्या सत् असे नाव मात्र आहे ज्याचे अशा शरीराचा आकार असलेल्या वस्तूंमध्ये सत् व असत् अनुभव हेच स्वरूप ज्यांचे अशा आपल्या माहात्म्यात रहाण्याने मी आणि माझे ह्या अभिमानाच्या न्यायाने चंचल मन नसणारा एकटाच फिरणारा पृथिवीवर भ्रमण करिता झाला. ॥३०॥ अतिसुकुमारकरचरणोरःस्थलविपुलबाह्वंसगलवदनाद्यवयवविन्यासः प्रकृतिसुंदरस्वभावहाससुमुखः नवनलिनदलायमानशिशिरतारारुणायतनयनरुचिरः सदृशसुभगकपोलकर्णकंठनासः विगूढस्मितवदनमहोत्सवेन पुरवनितानां मनसि कुसुमशरासनं उपदधानः परागवलंबमानकुटिलजटिलकपिशकेशभूरिभारः अवधूतमलिननिजशरीरेण ग्रहगृहीतः इव अदृश्यत ज्याचे हात, पाय, वक्षस्थल, पुष्ट बाहु, स्कंध, गळा, मुख इत्यादि अवयवांची रचना अति सुकुमार आहे असा, सुंदर अशा सहज हास्यामुळे ज्याचे मुख शोभायमान आहे असा, ताज्या कमलपत्राप्रमाणे शीतल बाहुल्या ज्यामध्ये आहेत अशा तांबूस व दीर्घ नेत्रांमुळे सुंदर असा, शरीराला शोभणारे असे गाल, कान, कंठ व नाक ज्याचे आहे असा, गुप्त हास्ययुक्त मुखाच्या विलासाने नगरातील स्त्रियांच्या मनात पुष्प हेच धनुष्य आहे ज्याचे अशा मदनाला स्थापन करणारा, पाठीवर लोंबत आहे कुरळ्या व झुबकेदार पिंगट केशांचा मोठा भार ज्याच्या असा, आपल्या अवधूतासारख्या मलीन शरीराने पिशाचाने झपाटल्यासारखा दिसत असे. ॥३१॥ यर्हि वाव सः भगवान् इमं लोकं अद्धा योगस्य प्रतीपम् इव आचक्षाणः तर्हि तत्प्रतिक्रियाकर्म बीभत्सितं इति आजगरं व्रतं आस्थितः शयानः एव अश्नाति पिबति खादति अवमेहति हदति स्म उच्चरति चेष्टमानः आदिग्धोद्देशः जरी खरोखर तो ऐश्वर्यसंपन्न ऋषभदेव ह्या लोकाला प्रत्यक्ष योगमार्गाच्या विरुद्ध अशासारखा पहात होता तरी ह्याविषयींची उपाययोजना निंद्य असे समजून अजगरसंबंधी व्रताला स्वीकारणारा निजूनच खात असे, पीत असे, भक्षण करीत असे, मुते, पुरीषोत्सर्ग करी, पुरीषोत्सर्गात लोळणारा, सर्व शरीर विष्ठेने भरून गेले आहे असा होई. ॥३२॥ तस्य ह यः पुरीषसुरभिस्नौगन्ध्यवायुः तं देशं समंतात् दशयोजनं सुरभिं चकार त्याचा खरोखर जो विष्ठेच्या गंधाने सुगंधित झालेला वायु त्या प्रदेशाला सभोवार दहा योजने सुगंधयुक्त करी. ॥३३॥ एवं गोमृगकाकचर्यया व्रजन् तिष्ठन् आसीत शयानः काकमृगगोचरितः पिबति खादति अवमेहति स्म याप्रमाणे गाई, हरिण व कावळे ह्यांच्याप्रमाणे चालत, उभा रहात, बसत, निजून, कावळा, हरिण व पशुसारखे आचरण करणारा पिई, खाई, मूत्रोत्सर्ग करी. ॥३४॥ नृप इति नानायोगचर्याचरणः भगवान् कैवल्यपतिः ऋषभः अविरतपरममहानंदानुभवः सर्वेषां भूतानां आत्मनि आत्मभूते भगवति वासुदेवे आत्मनः अव्यवधानानंतरोदरभावेन सिद्धसमस्तार्थपरिपूर्णः वैहायसमनोजवांतर्धानपरकायप्रवेशदूरग्रहणादीनि अंजसा यदृच्छया उपगतानि योगैश्वर्याणि हृदयेन न अभ्यनंदत् हे परीक्षित राजा, याप्रमाणे नाना तर्हेच्या योगमार्गांचे आचरण करणारा, ऐश्वर्यवान, मोक्षाचा स्वामी ऋषभदेव अखंड व मोठा महानंदाचा अनुभव आहे ज्यास असा संपूर्ण प्राण्यांच्या अंतःकरणात आत्मस्वरूपी भगवान वासुदेवामध्ये स्वतः ऐक्यामुळे उदररूप देहोपाधीमध्ये नसल्यामुळे तयार असलेल्या सर्व पुरुषार्थांनी पूर्ण असा, आकाशात फिरणे, मनात येईल तेथे तत्काल पोचणे, अंतर्धान होणे, दुसर्याच्या शरीरात प्रवेश करणे व दूरचे पदार्थ ग्रहण करणे इत्यादि अनायासे सहज प्राप्त झालेली योगरूपी ऐश्वर्ये मनाने चांगली मानीत नसे. ॥३५॥ पंचम स्कन्धः - अध्याय पाचवा समाप्त |