|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय २ रा - अन्वयार्थ
आग्नीध्र-चरित्र - एवं पितरि संप्रवृत्ते तदनुशासने वर्तमानः आग्नीध्रः धर्मावेक्षमाणः जंबूद्वीपौकसः प्रजाः औरसवत् पर्यगोपायत् याप्रमाणे पिता उत्तममार्गाला लागला असता त्याच्या आज्ञेत असणारा आग्नीध्र धर्मावर दृष्टि ठेवणारा असा जंबूद्वीपात रहाणार्या प्रजांना स्वतःच्या पुत्राप्रमाणे पाळिता झाला. ॥१॥ च सः कदाचित् पितृलोककामः तपस्वी आभृतपरिचर्योपकरणः सुरवरवनिताक्रीडाचलद्रोण्यां भगवंतं विश्वसृजां पतिं आत्मैकाग्र्येण आराधयांबभूव आणि तो एकदा पितृलोकाची इच्छा करणारा तप करणारा जमविले आहे पूजेचे साहित्य ज्याने असा देवस्त्रियांचा क्रीडापर्वत जो मंदर त्याच्या गुहेत ऐश्वर्यवान अशा प्रजापतींचा स्वामी जो ब्रह्मदेव त्याला एकाग्र अंतःकरणाने आराधिता झाला. ॥२॥ तत् उपलभ्य भगवान् आदिपुरुषः सदसि गायंती पूर्वचित्ति नाम अप्सरसं अभियापयामास ते जाणून भगवान ब्रह्मदेव सभेत गायन करणार्या पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेला पाठविता झाला. ॥३॥ सा च अतिरमणीयं विविधनिबिडविटपिविटपनिकरसंश्लिष्टपुरटलतारूढस्थलविहंगममिथुनैः प्रोच्यमानश्रुतिभिः प्रतिबोध्यमानसलिलकुक्कुटकारण्डवकलहंसादिभिः विचित्रं उपकूजितामलजलाशयकमलाकरं तदाश्रमोपवनं उपबभ्राम आणि ती अप्सरा अतिशय रमणीय अशा नानाप्रकारच्या दाट वृक्षांच्या फांद्यांच्या समूहावर चिकटलेल्या सुवर्णवल्लींवर बसलेल्या पक्ष्यांच्या जोडप्यांनी उच्चारलेल्या शब्दांनी जागे झालेले पाणकोंबडे, कारंडव व कलहंस इत्यादिकांच्या योगे चित्रविचित्र झालेल्या पक्ष्यांच्या शब्दांनी दुमदुमून गेली आहेत स्वच्छ सरोवरातील कमळांची वने ज्यातील अशा आग्नीध्राच्या आश्रमाजवळील बागेत फिरू लागली. ॥४॥ च सुललितगमनपदविन्यासगतिविलासायाः तस्याः अनुपदं खणखणायमानरुचिरचरणाभरणस्वनं आकर्ण्य नरदेवकुमारः समाधियोगेन आमीलितनयननलिनमुकुलयुगलं ईषत् विकचय्य व्यचष्ट आणि अत्यंत मोहक आहे चालण्यातील पावले टाकण्याच्या क्रमाची शोभा जीच्या अशा तिच्या पावलोपावली होणार्या खणखण आवाज करणार्या सुंदर नूपुरांच्या शब्दाला ऐकून राजपुत्र समाधीमुळे मिटलेल्या नेत्ररूपी कमळांच्या दोन कळ्यांना किंचित् उघडून पाहू लागला. ॥५॥ तदवलोकनेन विवृतावसरस्य भगवतः मकरध्वजस्य वशम् उपनीतः अविदूरे एव तां मधुकरीम् इव सुमनसः उपजिघ्रन्तीं दिविजमनुजमनोनयनाह्लाददुघैः गतिविहारव्रीडाविनयावलोकसुस्वराक्षरावयवैः नृणां मनसि कुसुमायुधस्य विवरं विदधतीं निजमुखविगलितामृतासवसहासभाषणामोदमदांधमधुकरनिकरोपराधेन द्रुतपदविन्यासेन वल्गुस्पंदनस्तनकलशकबरभाररशनां देवीं जडवत् इति ह उवाच तिला पाहिल्यामुळे अवसर सापडलेल्या ऐश्वर्ययुक्त अशा मदनाच्या नियंत्रणात गेलेला तो राजा जवळच असणार्या त्या भ्रमरीप्रमाणे फुले हुंगणार्या देव व मनुष्य यांच्या मनाला व नेत्राला आनंद देणार्या गति, क्रीडा, लज्जा, विनय, अवलोकन, सुस्वर भाषण व नेत्रादि अवयवांनी मनुष्यांच्या मनात मदनाचे छिद्र करणार्या स्वतःच्या मुखांतून निघालेली अमृत व मद्यच जणू काय, अशी जी हास्ययुक्त भाषणे आणि सुगंध यांच्या मदाने अंध झालेल्या भ्रमरसमूहांच्या प्रतिबंधामुळे त्वरित चालण्याच्या योगाने सुंदररीतीने हालत आहेत स्तन, वेणी व कमरपटटा जीचा अशा अप्सरेला मूर्खासारखा याप्रमाणे खरोखरच म्हणाला. ॥६॥ मुनिवर्य त्वं का च शैले किं चिकीर्षसि भगवत्परदेवतायाः का अपि माया असि सुहृत् विज्ये धनुषी आत्मनः अर्थे बिभर्षि किंवा विपिने प्रमत्तान् मृगान् मृगयसे हे मुनिषश्रेष्ठा तू कोण आणि पर्वतावर काय करण्याची इच्छा करीत आहेस, श्रेष्ठ अशा भगवान परमेश्वराची अवर्णनीय अशी तू माया आहेस काय हे मित्रा दोरी नसलेली दोन धनुष्ये आपल्याकरिता तू धारण केली आहेस अथवा अरण्यातील उन्मत्त झालेल्या पशूंना शोधीत आहेस. ॥७॥ भगवतः इमौ शतपत्रपत्रौ शांतौ अपुंखरुचिरौ अतितिग्मदंतौ बाणौ वने विचरन् कस्मै युयुंक्षसि न विद्मः तव विक्रमः जडधियां नः क्षेमाय अस्तु ऐश्वर्यवान अशा मदनाचे हे कमलाचा पिसारा असलेले शांत मुठी नसून सुद्धा सुंदर असे अत्यंत तीक्ष्ण पाती असलेले दोन बाण अरण्यात फिरता फिरता कोणावर तू योजणार आहेस आम्ही जाणत नाही तुझा पराक्रम जड बुद्धीच्या आमच्या कल्याणाकरिता असो. ॥८॥ इमे शिष्याः भगवतः परितः पठंति अजस्रं ईशं सरहस्यं साम गायंति सर्वे युष्मच्छिखाविलुलिताः सुमनोऽभिवृष्टीः ऋषिगणाः वेदशाखाः इव भजंति हे शिष्य ऐश्वर्यवान अशा तुमच्या सभोवार पाठ करीत आहेत सतत ईश्वरस्वरूप असा रहस्यासहित सामवेद गात आहेत सगळे तुमच्या शेंडीपासून गळालेल्या पुष्पवृष्टींना ऋषिगण जसे वेदांच्या शाखांना तसे सेवीत आहेत. ॥९॥ ब्रह्मन् तुभ्यं चरणपंजरतित्तिराणां अरूपमुखरां परं वाचं शृणवाम अंकविटंकबिंबे कदंबरुचिः लब्धा यस्यां अलातपरिधिः (अस्ति) ते वल्कलं क्व च हे ब्रह्मनिष्ठ मुने तुमच्या चरणरूपी पिंजर्यांतील साळुंक्यांच्या रूप न दिसता शब्द प्रगट होत असलेल्या केवळ वाणीला ऐकतो सुंदर नितंबमंडळावर, कळंबाच्या फुलासारखी कांति प्राप्त झालेली आहे जिच्या भोवती कोलतीच्या चक्रासारखे वेष्टण आहे तुझे वल्कल कोठे बरे आहे ॥१०॥ द्विज ते रुचिरयोः शृंगयोः किं संभृतं (अस्ति) मध्ये कृशः वहसि यत्र मे दृशिः श्रिता सुभग आत्मविषाणे ईदृक् सुरभिः अरुणः पंकः (अस्ति) येन मे आश्रमं सुरभीकरोषि हे ब्राह्मण, तुझ्या दोन सुंदर शिंगांमध्ये काय भरले आहे मध्यभागी कृश असा धारण करतोस ज्या ठिकाणी माझी दृष्टि लागून राहिली आहे हे सुंदरा स्वतःच्या शिंगाच्या ठिकाणी अशा तर्हेचा सुगंधित रक्तवर्णाचा लेप आहे ज्याच्यायोगाने माझ्या आश्रमाला तू सुगंधित करीत आहेस. ॥११॥ सुहृत्तम मे तावकं लोकं प्रदर्शय यत्रत्यः इत्थं अस्मद्विधस्य मनउन्नयनौ अपूर्वौ अवयवौ उरसा बिभर्ति वक्त्रे बहु अद्भुतं सरसराससुधादि हे मित्रवर्या मला तुझे रहाण्याचे स्थान दाखीव जेथे रहाणारा याप्रमाणे आमच्यासारख्यांच्या मनाची चलबिचल करणारे अपूर्व अवयव वक्षस्थलावर धारण करितो मुखांत अत्यंत अद्भुत अशी मधुर भाषणरूप अमृत इत्यादि असतात. ॥१२॥ अंग (तव) आत्मवृत्तिः का वा अदनात् हविः वाति विष्णोः कला असि ते कर्णौ अनिमिषोन्मकरौ च मुखं उद्विग्नमीनयुगलं द्विजपंक्तिशोचिः आसन्नभृंगनिकरं सर इव हे मित्रा, तुझे शरीरनिर्वाहाचे साधन कोणते बरे आहे तुझ्या खाण्यातून होमद्रव्य वहाते विष्णूची कला आहेस तुझे कान पापण्या नसलेली मकराकार कुंडले ज्यात आहेत असे आणि मुख माशांची जोडपी जिकडेतिकडे फिरत आहेत अशा पक्ष्यांच्या रंगांनी शोभित झालेल्या भ्रमरांचे समूह ज्याच्याजवळ आहेत अशा सरोवराप्रमाणे ॥१३॥ यः असौ त्वया करसरोजहतः पतंगः (अस्ति) दिक्षु भ्रमन् भ्रमतः मे अक्षिणी एजयते ते मुक्तं वक्रजटावरूथं न स्मरसि कष्टः एषः लंपटः अनिलः नीवीं हरति जो हा तू करकमलाने ताडिलेला चेंडू आहे सर्व दिशांमध्ये भ्रमण करीत भ्रमण करणार्या माझ्या नेत्रांना चंचल करीत आहे तुझ्या सुटलेल्या कुटिल केशांच्या समुदायाला स्मरत नाहीस काय दुःखदायक असा हा लंपट वायु निरीची गाठ सोडीत आहे. ॥१४॥ तपोधन तपः चरतां तपोघ्नं एतत् रूपं तु भवता केन तपसा उपलब्धं मित्र मह्यं मया सह तप चर्तुं अर्हसि मे स भवभावन वै प्रसीदती कवा हे तपोधना तपश्चर्या करणार्यांच्या तपाचा भंग करणारे हे रूप तर तुझ्याकडून कोणत्या तपाने मिळविले गेले हे मित्रा मला असे वाटते माझ्यासह तप आचरण्यास योग्य आहेस मला तो सृष्टिकर्ता ब्रह्मदेव निश्चयेकरून प्रसन्न होत आहे की काय ॥१५॥ द्विज देवदत्तं दयितं त्वां नत्यजामि यस्मिन् न लग्नं मनः दृग् अपि न वियाति चारुशृंगि ते चित्तयतः अनुव्रतं मां नेतुं अर्हसि शिवाः सचिव्यः प्रतिसरंतु हे ब्राह्मणा देवाने दिलेल्या प्रिय अशा तुला टाकणार नाही ज्याच्या ठिकाणी आमचे संलग्न झालेले मन आणि दृष्टि सुद्धा दूर होत नाही हे सुंदर शिंगे असणारे तुझे मन जेथे असेल तेथे आज्ञा पाळणार्या मला नेण्याला तू योग्य आहेस कल्याणकारक अशा मैत्रिणी बाजूला सरोत. ॥१६॥ इति ललनानुनयातिविशारदः विबुधमतिः ग्राम्यवैदग्ध्यया परिभाषया तां विबुधवधूं अधिसभाजयामास याप्रमाणे स्त्रियांची मनधरणी करण्यात अतिशय निपुण असा देवासारखी बुद्धि असणारा आग्नीध्रराजा रतिविषयक चातुर्याने भरलेल्या भाषणाने त्या अप्सरेला गौरविता झाला. ॥१७॥ च ततः वीरयूथपतेः तस्य बुद्धिशीलरूपवयः श्रियौदार्येण पराक्षिप्तमनाः सा तेन जंबूद्वीपपतिना सह अयुतायुतपरिवत्सरोपलक्षणं कालं भौमस्वर्गभोगान् बुभुजे आणि नंतर वीरनायक अशा त्या आग्नीध्राच्या बुद्धि, स्वभाव, रूप, वय, संपत्ति व औदार्य यांच्या योगाने मन वेधून गेलेली ती पूर्वचित्ति त्या जंबूद्वीपाच्या राजाबरोबर दहा कोटि वर्षे अवधीच्या काळापर्यंत पृथ्वीवरील व स्वर्गातील भोगांना भोगिता झाला. ॥१८॥ सः राजवरः आग्नीध्रः तस्यां उ ह वा नाभिकिंपुरुषहरिवर्षेलावृतरम्यकहिरण्मयकुरुभद्राश्वकेतुमालसंज्ञान् नव आत्मजान् पुत्रान् अजनयत् तो राजाधिराज आग्नीध्र तिच्या ठिकाणी निश्चयेकरून नाभि, किंपुरुष, हरिवर्ष, इलावृत, रम्यक, हिरण्मय, कुरु, भद्राश्व व केतुमाल ह्या नावाच्या नऊ स्वतःपासून झालेल्या पुत्रांना उत्पन्न करिता झाला. ॥१९॥ अथ सा पूर्वचित्तिः अनुवत्सरं नव सुतान् सूत्वा गृहे एव अपहाय भूयः देवं अजम् एव उपतस्थे नंतर ती पूर्वचित्ति प्रतिवर्षी एक याप्रमाणे नऊ मुलांना प्रसवून घरीच सोडून पुनः प्रकाशमान अशा ब्रह्मदेवाजवळच जाती झाली. ॥२०॥ ते मातुः अनुग्रहात् औत्पत्तिकेन एव संहननबलोपेताः आग्नीध्रसुताः यथाभागं पित्रा विभक्ताः आत्मतुल्यनामानि बुभुजुः ते मातेच्या कृपेने जन्मतःच काठिण्य आणि शक्ति यांनी युक्त असे आग्नीध्राचे मुलगे वाटणीप्रमाणे पित्याने विभागिलेले होत्साते आपल्या नावाप्रमाणे नावे असलेल्या जंबूद्वीपाच्या भागांना भोगिते झाले. ॥२१॥ कामानां अतृप्तः अनुदिनं अप्सरसम् एव अधिमन्यमानः आग्नीध्रः राजा श्रुतिभिः तस्याः सलोकतां अवारुंध यत्र पितरः मादयंते उपभोगाविषयी तृप्त न झालेला दिवसेंदिवस अप्सरेलाच अधिक मानणारा आग्नीध्र राजा वेदोक्त कर्मांनीच तिच्या समीपस्थानाला जाता झाला ज्या ठिकाणी पितर आनंदाने रहातात. ॥२२॥ पितरि संपरेते नव भ्रातरः मेरुदेवीं प्रतिरूपां उग्रदंष्ट्रीं लतां रम्यां श्यामां नारीं भद्रां देववीतिं इति संज्ञाः नव मेरुदुहितृः उद्वहन् पिता परलोकवासी झाला असता नऊ भाऊ मेरुदेवी, प्रतिरूपा, उग्रदंष्ट्री, लता, रम्या, श्यामा, नारी, भद्रा, देववीति अशा नांवाच्या नऊ मेरूच्या कन्यांना वरिते झाले. ॥२३॥ पंचम स्कन्धः - अध्याय दुसरा समाप्त |