|
शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’(५०१)
आकाशवल्लेप-विदूरगोऽहमादित्यवद् भास्य-विलक्षणोऽहम् ।
अहार्यवन्नित्य-विनिश्चलोऽहमंभोधिवत् पार-विवर्जितोऽहम् ॥ ५०१ ॥
आकाशाप्रमाणे मी लेपापासून/संगापासून अतिशय दूर आहे. सूर्याप्रमाणे मी प्रकाश्य (भास्य) वस्तूंपेक्षा वेगळा आहे. पर्वताप्रमाणे (अहार्य) मी निरंतर अतिशय निश्चल आहे आणि समुद्राप्रमाणे मला दुसरा काठ/तट नाही (म्हणजे मी अपार आहे), (५०२)
न मे देहेन संबंधो मेघेनेव विहायसः ।
अतः कुतो मे तद्धर्मा जाग्रत्-स्वप्न-सुषुप्तयः ॥ ५०२ ॥
आकाशाचा जसा ढगाशी संबंध असत नाही. त्याप्रमाणे माझा देहाशी संबंध नाही. म्हणून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या देहाच्या धर्माशी म्हणजे अवस्थांशी माझा संबंध कोठून असेल बरे ? (५०३)
उपाधिरायाति स एव गच्छति स एव कर्माणि करोति भुङ्क्ते ।
स एव जीवन् म्रियते सदाहं कुलाद्रिवन्निश्चल एव संस्थितः ॥ ५०३ ॥
मला उपाधी येते आणि तीच निघून जाते. तीच कर्म करते आणि कर्माची फळे भोगते. तीच जिवंत राहते आणि मरून जाते. कुलपर्वताप्रमाणे मी नेहमी निश्चलच राहिलेला असतो.
येथे 'उपाधी' शब्दाने आत्म्याला येणाऱ्या स्थूल, सूक्ष्म व कारण या देहांचा बोध होतो. पुराणांनी काहींना कुलपर्वत अशी संज्ञा दिली आहे. हे सात आहेत, त्यांची नावे अशी - महेंद्र, मलय, सह्य, शक्तिमान, ऋक्ष, विंध्य आणि पारिपात्र. (५०४)
न मे प्रवृत्तिर्न च मे निवृत्तिः सदैकरूपस्य निरंशकस्य ।
एकात्मको यो निबिडो निरंतरो व्योमेव पूर्णः स कथं नु चेष्टते ॥ ५०४ ॥
नेहमी एकरूप आणि अवयवरहित असणाऱ्या मला प्रवृत्तीही नाही आणि निवृत्तीही नाही. जो एकस्वरूप (एकात्मक), निबिड/घनदाट, अंतररहित आणि आकाशाप्रमाणे पूर्ण आहे असा मी कसा बरे क्रिया/व्यापार करणारा असेन ?
जीवन्मुक्त शिष्य ब्रह्मरूप/आत्मरूप झालेला आहे. त्याचा जगातील व्यवहार संपलेला आहे. त्याला जगातील व्यवहार करण्याची प्रवृत्ती होत नाही तसेच व्यवहारातून निवृत्तीही नाही. एकरूप, घनदाट, आकाशाप्रमाणे पूर्ण अशा आत्मरूप शिष्याच्या ठिकाणी क्रिया कशी बरे संभवेल ? (५०५)
पुण्यानि पापानि निरिंद्रियस्य निश्चेतसो निर्विकृतेर्निराकृतेः ।
कुतो ममाखंड-सुखानुभूतेर्ब्रूते ह्यनन्वागतमित्यपि श्रुतिः ॥ ५०५ ॥
इंद्रियरहित, मनरहित, (देहरहित) निराकार, निर्विकार आणि अखंड सुखाचा अनुभव घेणाऱ्या मला पापे आणि पुण्ये कोठून असणार ? हीच गोष्ट 'अनन्वागतं' ही श्रुती सांगते.
देह, इंद्रिये, मन मग अहंकार आणि आसक्ती असणाऱ्या माणसाकडून पापपुण्य घडते. असंग आत्मरूप झालेल्या शिष्याला ते दोन्ही लागू शकत नाहीत. येथे अभिप्रेत असणारी श्रुती अशी आहे - अनन्वागतेन पुण्येन अनन्वागतेन पापेन तीर्णो हि तदा सर्वान् शोकान् हृदयस्य भवति । (बृहदारण्यक उपनिषद, ४.३.२२) (५०६)
छायया स्पृष्टमुष्णं वा शीतं वा सुष्टु दुष्ठु वा ।
न स्पृशत्येव यत् किंचित् पुरुषं तद्-विलक्षणम् ॥ ५०६ ॥
एखाद्या पुरुषाच्या छायेशी संबंध आलेला (स्पृष्ट) उष्ण अथवा थंड, चांगला किंवा वाईट पदार्थ हा त्या छायेपेक्षा वेगळ्या असणाऱ्या पुरुषाला स्पर्श करू शकत नाही.
पुरुषाच्या छायेच्या संपर्कात आलेले पदार्थ पुरुषाशी संबंधित होत नाहीत. त्याप्रमाणे बुद्धीतील चिदाभासाशी संबंध असणारे पुण्य, पाप इत्यादी मूळ चित्ला स्पर्श करू शकत नाहीत. (५०७)
न साक्षिणं साक्ष्य-धर्माः संस्पृशंति विलक्षणम् ।
अविकारमुदासीनं गृह-धर्माः प्रदीपवत् ॥ ५०७ ॥
घराचे गुणदोष धर्म हे ज्याप्रमाणे घरातील दिव्याला स्पर्श करीत नाहीत, त्याप्रमाणे साक्ष्य-धर्म हे अविकारी, उदासीन आणि (साक्ष्य - धर्मापेक्षा) वेगळे असणाऱ्या साक्षीला स्पर्श करीत नाहीत.
घराचा रंग, आकार इत्यादी घराचे गुणधर्म घरातील दिव्याशी संबंधित होत नाहीत; कारण तो त्या गुणधर्मापेक्षा निराळा आहे. त्याप्रमाणे आत्मरूप झालेला शिष्य हा साक्षी आहे; तो देह, इंद्रिये, मन यांपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्या साक्ष्य पदार्थाचे गुणधर्म साक्षी असणाऱ्या शिष्याला स्पर्श करू शकत नाहीत. (५०८)
रवेर्यथा कर्मणि साक्षिभावो वह्वेर्यथा दाह-नियामकत्वम् ।
रजोर्यथारोपित-वस्तु-संगस्तथैव कूटस्थ-चिदात्मनो मे ॥ ५०८ ॥
कूटस्थ आणि चैतन्यस्वरूप असणाऱ्या अशा माझा, सूर्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व कर्मांमध्ये साक्षिभाव आहे. दाह करण्यात नियामक असणाऱ्या अग्नीप्रमाणे माझे नियामकत्व आहे आणि (स्वतःवर) आरोपित/अध्यस्त असणाऱ्या सर्परूपी वस्तूशी ज्याप्रमाणे रज्जूचा संग आहे, तसा माझा (जगाशी) संग/संबंध आहे.
(५०९)
कर्तापि वा कारयितापि नाहं भोक्तापि वा भोजयितापि नाहम् ।
द्रष्टापि वा दर्शयितापि नाहं सोऽहं स्वयंज्योतिरनीदृगात्मा ॥ ५०९ ॥
मी काही कर्ता नाही आणि कारयिताही नाही. भोक्ता मी नाही तसेच (इतरांकडून) भोग घेवविणाराही नाही. मी द्रष्टाही नाही तसेच इतरांना दाखविणाराही नाही. यांपेक्षा वेगळा (म्हणजे तसे नसणारा) असा मी स्वयंप्रकाशी सोऽहं आहे.
कर्ता, भोक्ता इत्यादी संबंध भासमान जगात असतात. आत्मरूप शिष्य त्यांपेक्षा वेगळा आहे. तो स्वयंप्रकाशी सोहं आहे. (५१०)
चलत्युपाधौ प्रतिबिंब-लौल्यमौपाधिकं मूढधियो नयंति ।
स्व-बिंब-भूतं रविवद् विनिष्क्रियं कर्तास्मि भोक्तास्मि हतोऽस्मि हेति ॥ ५१० ॥
उपाधीत फरक/विकार झाला असता, 'मी कर्ता आहे', 'मी भोक्ता आहे', (स्त्री-पुत्र इत्यादी मृत झाल्यावर) 'मी मेलो आहे', अशाप्रकारे विवेकहीन पुरुष हे उपाधीमुळे झालेले चिदाभासाचे चंचलत्व हे चिदाभासाच्या मूळ अशा निष्क्रिय, बिंबभूत आत्म्यावर आरोपित करतात. जसे, सूर्याच्या पाणी इत्यादीमधील प्रतिबिंबात पडणारे फरक हे सूर्यावर आरोपित केले जातात.
शरीरात बुद्धीमध्ये चैतन्याचे प्रतिबिंब पडते आणि अहंकारामुळे माणूस शरीर इत्यादी म्हणजे मी असे म्हणू लागतो. शरीर, बुद्धी इत्यादी उपाधिजन्य विकार मूर्ख माणसे बिंबभूत चैतन्यावर/आत्म्यावर आरोपित करतात. (५११)
जले वापि स्थले वापि लुठत्वेष जडात्मकः ।
नाहं विलिप्ये तद्-धरमैर्घट-धर्मैर्नभो यथा ॥ ५११ ॥
हा जड स्वरूपाचा देह पाण्यात अथवा जमिनीवर खुशाल लोळो. त्या देहाच्या धर्मांनी (आत्मरूप झालेला) मी लिप्त होत नाही. जसे घटाच्या धर्मांनी आकाश हे लिप्त होत नाही.
उपाधींचे गुणधर्म हे ज्याला उपाधी आली आहे त्याला चिकटत नाहीत. म्हणून आत्म्याला आलेल्या देह या उपाधीचे गुणधर्म आत्म्याला चिकटू शकत नाहीत. (५१२)
कर्तृत्व-भोक्तृत्व-खलत्व-मत्तता-जडत्व-बद्धत्व-बिमुक्ततादयः ।
बुद्धे र्विकल्पा न तु संति वस्तुतः स्वस्मिन् परे ब्रह्मणि केवलेऽद्वये ॥ ५१२ ॥
कर्तृत्व, भोक्तृत्व, दुष्टपणा, उन्मत्तपणा, जडता, बंध आणि मोकळेपणा इत्यादी सर्व बुद्धीचे विकल्प आहेत. आत्मस्वरूपभूत अशा अद्वितीय परब्रह्माच्या ठिकाणी हे विकल्प खरोखर वस्तुतः नाहीतच.
अध्यारोपाने देह, बुद्धी इत्यादी उपाधी ब्रह्माला आल्या. त्या उपाधीचे ठिकाणी कर्तृत्व इत्यादी गुणधर्म बुद्धी ही अहंकाराने कल्पिते. पण उपाधिभूत बुद्धीचे हे गुणधर्म अधिष्ठानभूत आत्मस्वरूप ब्रह्माचे ठिकाणी नाहीतच. (५१३)
संतु विकाराः प्रकृतेर्दशधा शतधा सहस्रधा वापि ।
किं मेऽसंग-चितेस्तैर्न घनः क्वचिदंबरं स्पृशति ॥ ५१३ ॥
माया/अविद्यारूपी प्रकृतीचे विकार हे दहा, शंभर अथवा हजार असेनात का ! संग-रहित चैतन्यरूप अशा मला त्यांचे काय ? जसे ढग कधी आकाशाला स्पर्श करीत नाहीत.
अविद्यारूप प्रकृतीचे सर्व विकार हे ब्रह्मावर अध्यारोपित आहेत. त्यांचा अधिष्ठानरूप ब्रह्मावर काहीही परिणाम घडू शकत नाही. साहजिकच चित्स्वरूप ब्रह्म झालेल्या शिष्यावर त्यांचा परिणाम घडू शकत नाही. (५१४)
अव्यक्तादिस्थूल-पर्यंतमेतद् विश्वं यत्राभासमानं प्रतीतम् ।
व्योम-प्रख्यं सूक्ष्ममाद्यंतहीनं ब्रह्माद्वैतं यत्तदेवाहमस्मि ॥ ५१४ ॥
सूक्ष्म इत्यादीपासून स्थूलापर्यंत पसरलेले हे विश्व जेथे केवळ आभास या स्वरूपात प्रतीत होते, ते अद्वैत ब्रह्म आकाशाप्रमाणे सूक्ष्म, आदि आणि अंतरहित आहे. ते जे ब्रह्म आहे ते मी (झालो) आहे.
सर्वाधारं सर्व-वस्तु-प्रकाशं सर्वाकारं सर्वगं सर्वशून्यम् ।
नित्यं शुद्धं निचलं निर्विकल्पं ब्रह्माद्वैतं यत्तदेवाहमस्मि ॥ ५१५ ॥
सर्वांना आधारभूत असणारे, सर्व वस्तूंना प्रकाशित करणारे, सर्व आकार असणारे, सर्वव्यापी आणि सर्व पदार्थानी रहित, नित्य, शुद्ध, निश्चल, निर्विकल्प असे जे अद्वितीय ब्रह्म आहे ते मी (झालो) आहे.
(५१६)
यत् प्रत्यस्ताशेष-माया-विशेषं प्रत्यग्-रूपं प्रत्ययागम्यमानम् ।
सत्य-ज्ञानानंतमानंद-रूपं ब्रह्माद्वैतं यत् तदेवाहमस्मि ॥ ५१६ ॥
जेथे मायेचा कोणताही स्पर्श लयाला गेलेला आहे, जे प्रत्यगात्मस्वरूप आहे. जे इंद्रियांना प्रत्ययाने कळणारे नाही, जे सत्यस्वरूप, ज्ञानस्वरूप, अनंतस्वरूप आणि आनंदस्वरूप आहे, जे अद्वितीय आहे असे ते ब्रह्म मी (झालो) आहे.
मायेच्या कोणत्याही कार्याचा स्पर्श ब्रह्माला होत नाही (श्लोक ५१६). तसेच ब्रह्म हे लौकिक प्रमाणांनी प्रत्ययाला येणारे नाही. (५१७)
निष्क्रियोऽस्म्यविकारोऽस्मि निष्कलोऽस्मि निराकृतिः ।
निर्विकल्पोऽस्मि नित्योऽस्मि निरालंबोऽस्मि निर्द्वयः ॥ ५१७ ॥
मी ब्रह्मरूप झालो असल्याने, ब्रह्माप्रमाणे मी क्रियारहित, विकाररहित आहे, मी अवयवरहित आहे, मी आकाररहित आहे, मी विकल्परहित आहे, मी नित्य आहे, मी आधाररहित आहे, मी द्वैतरहित आहे. (५१८)
सर्वात्मकोऽहं सर्वोऽहं सर्वातीतोऽहमद्वयः ।
केवलाखंड-बोधोऽहमानंदोऽहं निरंतरम् ॥ ५१८ ॥
मी ब्रह्मरूप झालो असल्याने, ब्रह्माप्रमाणे मी सर्वांचा आत्मा या स्वरूपाचा आहे, सर्व काही मी आहे, मी सर्वांपलीकडे आहे, मी द्वैतरहित आहे, मी केवळ अखंड ज्ञानरूप आहे, मी आनंदरूप आहे, मी निरंतर आहे.
मी निरंतर अखंड ज्ञानरूप आणि आनंदरूप आहे. (५१९)
स्वाराज्य-साम्राज्य-विभूतिरेषा भवत्कृपाश्री-महिम-प्रसादात् ।
प्राप्ता मया श्रीगुरवे महात्मने नमो नमस्तेऽस्तु पुनर्नमोऽस्तु ॥ ५१९ ॥
शिष्य म्हणतो हे गुरो, आपल्या कृपेच्या उत्तम (श्री) माहात्म्याच्या प्रसादामुळे मला हे (ब्रह्मरूप होण्याचे) स्वराज्य आणि साम्राज्य यांचे वैभव (विभूति) प्राप्त झाले आहे. म्हणून त्या महात्म्या गुरूला माझा नमस्कार आहे. हे गुरो तुम्हाला माझा नमस्कार. हे गुरो पुनः तुम्हाला माझा नमस्कार आहे.
ब्रह्मसाक्षात्कारासाठी शिष्याच्या प्रयत्नाच्या जोडीने गुरूची कृपा आवश्यक असते. म्हणून गुरू हा वंदनीय असतो. (५२०)
महास्वप्ने माया-कृत-जनि-जरा-मृत्यु-गहने
भ्रमंतं क्लिश्यंतं बहुल-तर-तापैरनुदिनम् । अहंकार-व्याघ्र-व्यथितमिममत्यंत-कृपया प्रबोध्य प्रस्वापात् परमवितवान् मामसि गुरो ॥ ५२० ॥
शिष्य म्हणतो- हे गुरो, मायेने निर्माण केलेल्या जन्म, जरा, व मरण यांनी युक्त अशा निबिड कठीण/घनदाट अशा महास्वप्नात भरकटणाऱ्या, प्रतिदिवशी अतिशय ताणांनी/दुःखांनी क्लेश पावणाऱ्या, अहंकाररूपी वाघामुळे अतिशय व्यथित झालेल्या अशा या मला (इमं) आपण आपल्या अतिशय कृपेने/दयेने गाढ निद्रेतून (प्रस्वाप) जागे करून, आपण माझं चांगले (परं) रक्षण केले आहे (अवितवान्).
गुरूच्या बोधामुळे शिष्य अज्ञानातून ज्ञानी झाला. त्याला गुरूच्या कृपेने जाग आली. (५२१)
नमस्तस्मै सदेकस्मै कस्मैचिन्महसे नमः ।
यदेतत् विश्वरूपेण राजते गुरुराज ते ॥ ५२१ ॥
शिष्य म्हणतो हे गुरुराजा, जे हे आपले अद्भुत तेजोरुप (महस्) नेहमी एकस्वरूपी आहे आणि जे विश्वरूपाने भासते, त्या आपल्या स्वरूपाला नमस्कार आहे.
गुरू हाही ब्रह्मरूपच आहे. गुरूच्या कृपेने शिष्यही ब्रह्मरूप झाला आहे. म्हणून शिष्य गुरूला वंदन करतो. या श्लोकाअखेर शिष्याचे कथन संपते. त्यानंतर गुरू पुनः शिष्याला सांगू लागतो. (५२२)
इति नतमवलोक्य शिष्यवर्यं समधिगतात्म-सुखं प्रबुद्धतत्त्वम् ।
प्रमुदित-हृदयः स देशिकेंद्रः पुनरिदमाह वचः परं महात्मा ॥ ५२२ ॥
ज्याला ब्रह्म हे तत्त्व उत्तमप्रकारे कळले आहे, ज्याला आत्म्याचे सुख प्राप्त झाले आहे, असा तो श्रेष्ठ शिष्य अशाप्रकारे नम्र झाला आहे हे पाहून, त्या श्रेष्ठ महात्म्या गुरूचे हृदय अतिशय आनंदित झाले, आणि मग तो पुनः असे वचन त्याला उद्देशून उच्चारू लागला. (५२३)
ब्रह्म-प्रत्यय-संततिर्जगदतो ब्रह्मैव सत् सर्वतः ।
पश्याध्यात्म-दृशा प्रशांत-मनसा सर्वास्ववस्थास्वपि । रूपादन्यदवेक्षितं किमभितश्चक्षुष्मतां दृश्यते तद्वद् ब्रह्मविदः सतः किमपरं बुद्धेर्विहारास्पदम् ॥ ५२३ ॥
हे जग म्हणजे ब्रह्माच्या प्रत्ययाचा/अनुभवाचा प्रवाह आहे आणि म्हणून हे शिष्या तू अतिशय शांत मनाने आणि आध्यात्मिक दृष्टीने ते जग सर्व अवस्थांमध्येसुद्धा सर्वप्रकारे सत् असे ब्रह्मच आहे, असे तू पाहत राहा (पश्य). ज्याप्रमाणे दृष्टियुक्त पुरुषांना सर्व बाजूंनी (अभितः) जे काही दिसते, ते रूपावाचून अन्य काही असते काय ? (उत्तर - नसते) त्याप्रमाणे ब्रह्माला जाणणाऱ्या पुरुषाच्या संदर्भात त्याच्या बुद्धीच्या/ज्ञानाच्या विहाराचे स्थान सत् अशा ब्रह्मापेक्षा दुसरे काही असते काय ? (उत्तर - नसते).
डोळे शाबूत असणाऱ्या माणसाला सर्वत्र पदार्थांचे रूपच दिसते. त्याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्कारी माणसाला सर्व अवस्थांत सर्वत्र ब्रह्मच दिसावयास हवे. (५२४)
कस्तां परानंद-रसानुभूतिमुत्सृज्य शून्येषु रमेत विद्वान् ।
चंद्रे महाह्लादिनि दीप्यमाने चित्रेंदुमालोकयितुं क इच्छेत् ॥ ५२४ ॥
ब्रह्माच्या/आत्म्याच्या परमानंदरसाचा अनुभव घेण्याचे टाकून कोणता शहाणा माणूस शून्य वस्तूंचे ठायी रममाण होईल ? अतिशय आल्हाद देणारा चंद्र (प्रत्यक्ष) प्रकाशत असताना, चित्रातील चंद्राकडे पाहण्याची इच्छा कोणता शहाणा माणूस करील बरे ?
ब्रह्म-साक्षात्कारी माणसाला सर्वत्र ब्रह्मच दिसते. तो ब्रह्मरहित अशा कोणत्या स्थानी रमेल ? (५२५)
असत्-पदार्थानुभवेन किंचिन्न ह्यस्ति तृप्तिर्नच दुःख-हानिः ।
तदद्वयानंद-रसानुभूत्या तृप्तः सुखं तिष्ठ सदात्मनिष्ठया ॥ ५२५ ॥
जगातील असत्/मिथ्या पदार्थाच्या अनुभवामुळे थोडीदेखील तृप्ती आणि दुःखाची हानी होत नाही. म्हणून हे शिष्या, अद्वितीय अशा आनंदरसाच्या अनुभूतीने तृप्त होऊन, आत्म्यावर अवलंबून (आत्मनिष्ठया) तू नेहमी सुखाने रहा.
आत्मा म्हणजेच परमात्मा/ब्रह्म आहे असा विश्वास बाळगून तू आत्मानंदाच्या अनुभवात रहा. |