शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(४७६)

स्वस्याविद्या-बंध-संबंध-मोक्षात् सत्य-ज्ञानानंद-रूपात्म-लब्धौ ।
शास्त्र युक्तिर्देशिकोक्तिः प्रमाणं चांतःसिद्धा स्वानुभूतिः प्रमाणम् ॥ ४७६ ॥
अविद्याजन्य बंधाशी असणाऱ्या आपल्या संबंधातून आपली सुटका झाल्यावर, सत्य, ज्ञान आणि आनंद हे स्वरूप असणाऱ्या आत्म्याची प्राप्ती होते. या संदर्भात शास्त्र, तर्क आणि गुरुचे वचन ही जशी प्रमाणे आहेत त्याप्रमाणे आपल्या अंत:करणात सिद्ध झालेला स्वतःचा अनुभव हेही प्रमाण आहे.


अविद्येचा बंध तुटला की सच्चिदानंद आत्म्याची प्राप्ती होते. या वचनाला प्रमाण/ आधार असणारी वचने येथे सांगितली आहेत. वेदांतशास्त्र सांगते की आत्मा सच्चिदानंद आहे. शास्त्राला अनुसरून गुरू तसेच सांगतो. शास्त्रवचन आणि गुरुवचन यांना अनुसरून केलेल्या तर्काने त्याचे दृढीकरण होते आणि अशा सच्चिदानंद आत्म्याचा आपणास अनुभव आला की स्वानुभूती हेही प्रमाण ठरते. ज्ञानाच्या बाबतीत स्वानुभव हेच प्रमाण आहे.


(४७७)

बंधो मोक्षश्च तृप्तिश्च चिंतारोग्य क्षुधादयः ।
स्वेनैव वेद्या यज्ज्ञानं परेषामानुमानिकम् ॥ ४७७ ॥
बंध, मोक्ष, तृप्ती, चिंता, आरोग्य, भूक इत्यादी गोष्टी आपण स्वतःच जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांचे जे ज्ञान दुसऱ्यांना असते वा दुसऱ्यांकडून कळते ते साक्षात् नसून अनुमानावर आधारलेले असते.


इतरांच्या शब्दांवरून आणि अनुमानावरून कळणारे ज्ञान जर आपल्या अनुभवाला आले तर ते खरे ठरते. स्वानुभव हीच खात्री.


(४७८) श्रुती/वेद आणि गुरू जे सांगतात ते केवळ शाब्दिक ज्ञान असते. त्याचा अनुभव आपणास आला तर ते आपणास पटते -

तट-स्थिता बोधयंति गुरवः श्रुतयो यथा ।
प्रज्ञयैव तरेद् विद्वानीश्वरानुगृहीतया ॥ ४७८ ॥
जशी श्रुती तसेच गुरू हे काठावर उभे राहून म्हणजे तटस्थपणाने आपणांस बोध करतात. शहाण्या माणसाने ईश्वराच्या अनुग्रहाने युक्त अशा आपल्या प्रज्ञेने संसार-सागर तरून जावयाचा आहे.


मुमक्षला संसार-सागर तरून जावयाचा आहे. त्याच्या तटावर/काठावर उभे राहून श्रुती आणि गुरू हे मार्गदर्शन करतात. पण प्रत्यक्ष पोहण्याचे आणि तरून जाण्याचे काम हे मुमुक्षूलाच करावयाचे असते. त्यासाठी त्याने स्वतःची बुद्धी वापरणे आवश्यक आहे. पण केवळ बुद्धी उपयोगी ठरत नाही. त्या बुद्धीला ईश्वरी कृपेची जोड लाभावी लागते.


(४७९) तेव्हां स्वतःच आत्मानंदाचा अनुभव घेत मुमुक्षूने आनंदात राहावे -

स्वानुभूत्या स्वयं ज्ञात्वा स्वमात्मानमखंडिनम् ।
संसिद्धः संमुखं तिष्ठेन्निर्विकल्पात्मनात्मनि ॥ ४७९ ॥
स्वतःच आपल्या अखंड आत्म्याला जाणून, स्वतःच्या अनुभवाने पूर्णपणे सिद्ध झालेल्या मुमुक्षूने निर्विकल्प मनाने (आत्मना) आत्म्याचे ठायीच (आत्मनि) घट्टपणे (संमुख) राहावे.


'संमुखं' याचे ऐवजी असणारा 'सुसुखं' हा पाठभेद अधिक बरा वाटतो. सुसुखं म्हणजे सुखाने.


(४८०) आपल्या उपदेशाचा समारोप गुरू पुढील श्लोक ४८० मध्ये करतो.

वेदांत-सिद्धांत-निरुक्तिरेषा ब्रह्मैव जीवः सकलं जगच्च ।
अखंड-रूप-स्थितिरेव मोक्षो ब्रह्माद्वितीये श्रुतयः प्रमाणम् ॥ ४८० ॥
जीव आणि संपूर्ण जग हे ब्रह्मच आहेत; अखंड आत्मरूपात/ ब्रह्मरूपात राहणे हाच मोक्ष आहे; हेच केवलाद्वैत वेदांत शास्त्राच्या सिद्धांताचे सार आहे. 'ब्रह्म हे अद्वितीय एकमेव एक आहे', या विधानाला श्रुती/वेद प्रमाण आहे.


ब्रह्म/आत्मा एकमेव एक अद्वितीय आहे, असे श्रुती सांगते. नाना काही नाही. म्हणून जीव आणि जग हे ब्रह्मरूपच आहेत. कायम ब्रह्मस्वरूपात राहणे हाच मोक्ष आहे. हे केवलाद्वैत वेदांताचे मुख्य सिद्धांत आहेत.


(४८१) या श्लोकाअखेर गुरुच्या मुख्य उपदेश संपला. तो ऐकल्यावर शिष्याची काय स्थिती झाली ते प्रलोक ४८१ सांगतो.

इति गुरु-वचनाच्छृति-प्रमाणात् परमवगम्य सत्तत्त्वमात्म-युक्त्या ।
प्रशमित-करणः समाहितात्मा क्वचिदचलाकृतिरात्मनिष्ठितोऽभूत् ॥ ४८१ ॥
अशाप्रकारे श्रुती हे प्रमाण, गुरूचे वचन आणि स्वतःचा तर्क यांच्या योगाने (ब्रह्म या) परमतत्त्वाला जाणून घेतल्यावर, शिष्याची इंद्रिये शांत झाली, मन एकाग्र झाले (समाहितात्मा), आणि तो एकाच ठिकाणी निश्चल शरीर असणारा होऊन, आत्म्यावर निष्ठा ठेवणारा झाला. शिष्याचे चित्त आत्म्यावर केंद्रित होऊन तो आत्मनिष्ठ बनला.



(४८२)

कंचित् कालं समाधाय परे ब्रह्मणि मानसम् ।
उत्थाय परमानंदादिदं वचनमब्रवीत् ॥ ४८२ ॥
काही काळ परब्रह्माचे ठिकाणी मन एकाग्र करून (समाधाय) तो शिष्य ब्रह्माशी एकरूप होऊन ब्रह्मानंदात बुडून गेला. मग त्या ब्रह्माच्या परमानंदातून उठून, तो शिष्य हे वचन बोलू लागला. शिष्य ब्रह्मरूप झाला. तो जीवन्मुक्त झाला. मग त्याची स्थिती कशी झाली ते शिष्य सांगू लागला. आता श्लोक ४८३ पासून ५२१ पर्यंत शिष्याचे हे भाषण दिलेले आहे.



(४८३)

बुद्धिर्विनष्टा गलिता प्रवृत्तिर्ब्रह्मात्मनोरेकतयाधिगत्या ।
इदं न जानेऽप्यनिदं न जाने किंवा कियद् वा सुखमस्त्यपारम् ॥ ४८ ॥
ब्रह्म आणि प्रत्यक्ष आत्मा (किंवा जीवात्मा) यांच्या ऐक्याचा अनुभव आल्यामुळे (अधिगत्या) माझी अहं-बुद्धी तसेच भेद-बुद्धी लयाला गेली, बाह्य जगताकडील प्रवृत्ती गळून गेली. हे दृश्य पदार्थ मला कळत नाहीत तसेच अदृश्य पदार्थही (अनिद) कळेनासे झाले, तसेच ब्रह्माचे ठिकाणचे अपार सुख कसले व किती हेही मला कळेनासे झाले आहे.


ब्रह्मरूप झालेला आणि ब्रह्मानंद भोगणारा शिष्य लौकिक दृष्टीने गडबडून गेला आहे.


(४८४)

वाचा वक्तुमशक्यमेवं मनसा मंतुं न वा शक्यते
स्वानंदामृत-पूर-पूरित-परब्रह्मांबुधेवैभवम् ।
अंभोराशि-विशीर्ण-वार्षिक-शिला-भावं भजन् मे मनो
यस्यांशांश-लवे बिलीनमधुनानंदात्मना निर्वृतम् ॥ ४८४ ॥
स्वरूपानंद-रूपी अमृताच्या पुराने भरलेल्या परब्रह्मरूपी सागराचे वैभव हे वाचेने सांगण्यास अशक्य आहे. तसेच त्याचा विचार मनाने करणे हेही शक्य नाही. समुद्रात मिसळून गेलेल्या (विशीर्ण) पावसाळ्यातील गारांची स्थिती धारण करणारे माझे मन हे त्या वैभवाच्या अंशाच्याही अंशाच्या लहान अंशामध्ये (लव) विलीन होऊन, आता ते आनंदरूपाने सुखी/शांत (निवृत) झाले आहे.



(४८५)

क्व गतं केन वा नीतं कुत्र लीनमिदं जगत् ।
अधुनैव मया दृष्टं नास्ति किं महदद्भुतम् ॥ ४८५ ॥
आत्ता तर मी हे जग पाहिले होते पण आता ते कुठे गेले ? कोणी नेले ? कशात विलीन झाले ? ते आता नाहीसे झाले काय ? हे मोठे अद्भुत/नवल आहे. किंवा हे मोठे नवल नाही काय ?


ब्रह्मानंदात बुडण्यापूर्वी शिष्याला दिसणारे जग आता कुठे आहे असे त्याला नवल वाटते.


(४८६)

किं हेयं किमुपादेयं किमन्यत् किं विलक्षणम् ।
अखंडानंद-पीयूष-पूर्ण-ब्रह्म-महार्णवे ॥ ४८६ ॥
अखंड आनंदरूपी अमृताने पूर्णपणे भरलेल्या ब्रह्मरूपी महासागरातून काय घ्यावे, काय टाकावे, दुसरे काय आहे आणि वेगळे काय आहे ? असा विचार मला पडला आहे.



(४८७)

न किंचिदत्र पश्यामि न शृणोमि न वेदम्यहम् ।
स्वात्मनैव सदानंद-रूपेणास्मि विलक्षणः ॥ ४८७ ॥
या एकरूप स्थितीत मला अन्य काही दिसत नाही, अन्य काही ऐकू येत नाही, आणि अन्य काही कळत नाही. सदानंद-रूपाने मीच त्या रूपात असल्यामुळे (स्वात्मना) मी इतर सर्वापक्षा वेगळा झालो आहे.


श्लोक ४८८ पासून पुढील काही श्लोकात ज्या गुरुच्या कृपेमुळे शिष्याला ही नवीन अवस्था प्राप्त झाली त्या गुरूबद्दल शिष्य सांगतो.


(४८८)

नमो नमस्ते गुरवे महात्मने विमुक्त-संगाय सदुत्तमाय ।
नित्याद्वयानंद-रस-स्वरूपिणे भूम्ने सदापार-दयांबु-धाम्ने ॥ ४८८ ॥
मोठ्या मनाच्या, संगातून सुटलेल्या, सत्पुरुषांत उत्तम, नित्य अद्वितीय आनंदरस हे स्वरूप असणाऱ्या, महान् (भूम्ने), नेहमी अपरंपार दयेचा सागर हे स्वरूप असणाऱ्या, गुरूला वारंवार माझा नमस्कार असो.



(४८९)

यत्कटाक्ष-शशि-सांद्र-चंद्रिकापात-धूत-भव-तापज-श्रमः
प्राप्तवानहमखंड-वैभवानंदमात्मपदमक्षयं क्षणात् ॥ ४८९ ॥
त्या सद्गुरू च्या कृपा-कटाक्षरूपी चंद्राचे दाट किरण पडल्यामुळे संसारातील तापामुळे निर्माण झालेले माझे श्रम नष्ट झाले आहेत (धूत) आणि एका क्षणात, ज्याचे वैभव अखंड आहे असे अक्षय आनंदस्वरूप आत्मरूप मला प्राप्त झाले आहे.



(४९०) श्लोक ४९० पासून ५०५ पर्यंत शिष्य स्वतःविषयी सांगत आहे.

धन्योऽहं कृत-कृत्योऽहं विमुक्तोऽहं भव-ग्रहात् ।
नित्यानंद-स्वरूपोऽहं पूर्णोऽहं त्वदनुग्रहात् ॥ ४९० ॥
त्या गुरूच्या कृपानुग्रहामुळे मी धन्य झालो, कृतकृत्य झालो, संसाराच्या पकडीतून सुटलो, नित्यानंद-स्वरूप झालो, आणि परिपूर्ण झालो.


भवग्रह म्हणजे संसाररूपी दुष्ट ग्रह असाही अर्थ होईल.


(४९१)

असंगोऽहमनंगोऽहमलिंगोऽहमभंगुरः ।
प्रशांतोऽहमनंतोऽहममलोऽहं चिरंतनः ॥ ४९१ ॥
मी असंग झालो आहे, अवयव-रहित झालो आहे, लिंग-शरीररहित झालो आहे, अविनाशी झालो आहे, अत्यंत शांत झालो आहे, अनंत झालो आहे, निर्मल झालो आहे, चिरंतन झालो आहे. अनंग म्हणजे स्थूल शरीररहित असाही अर्थ होईल.



(४९२)

अकर्ताहमभोक्ताहमविकारोऽहमक्रियः ।
शुद्धो-बोध-स्वरूपोऽहं केवलोऽहं सदाशिवः ॥ ४९२ ॥
मी कर्ता नाही आणि भोक्ता नाही. मी विकार-रहित आणि क्रियारहित आहे. शुद्ध ज्ञान हे माझे स्वरूप आहे. मी केवल म्हणजे एकमेव एक आणि सदा मंगलरूप (शिव) आहे.



(४९३)

द्रष्टुः श्रोतुर्वक्तुः कर्तुर्भोक्तुर्विभिन्न एवाहम् ।
नित्य-निरंतर-निष्क्रिय-निःसीमासंग-पूर्ण-बोधात्मा ॥ ४९३ ॥
द्रष्टा, श्रोता, वक्ता, कर्ता, भोक्ता या सर्वांहून मी वेगळा आहे. मी नित्य, निरंतर, क्रियारहित, सीमारहित/मर्यादारहित, संगरहित आणि पूर्ण ज्ञान हे स्वरूप असणारा आहे.


(४९४)

नाहमिदं नाहमदोऽप्युभयोरवभासकं परं शुद्धम् ।
बाह्याभ्यंतर-शून्यं पूर्ण ब्रह्माद्वितीयमेवाहम् ॥ ४९४ ॥
मी हे दृश्य/विश्व नाही, मी ते (= द्रष्टा) नाही, तर त्या दोघांना प्रकाशित करणारे आत-बाहेर यांनी रहित असे जे अद्वितीय पूर्ण ब्रह्म आहे ते ब्रह्म मी आहे.



(४९५)

निरुपममनादि-तत्त्वं त्वमहमिदमद इति कल्पना-दूरम् ।
नित्यानंदैक-रसं सत्यं ब्रह्माद्वितीयमेवाहम् ॥ ४९५ ॥
उपमा रहित, अनादी तत्त्वरूप, 'तू-मी आणि हे-ते' या कल्पनांच्या पलीकडचे, नित्यानंद या एकाच स्वरूपाचे, सत्य असे जे अद्वितीय ब्रह्म आहे, तेच मी आहे.



(४९६)

नारायणोऽहं नरकांतकोऽहं पुरांतकोऽहं पुरुषोऽहमीशः ।
अखंड-बोधोऽहमशेष-साक्षी निरीश्वरोऽहं निरहं च निर्ममः ॥ ४९६ ॥
मी नारायण आहे. नरक (असुरा) चा वध करणारा मी आहे; (तीन) पुरांचा नाश करणारा मी आहे. मी पुरुष आहे. मी ईश आहे; अखंड ज्ञान हे माझे स्वरूप आहे. मी सर्वांचा साक्षी आहे. मी ईश्वर-रहित आहे. मी अहंकार-रहित आहे आणि मी ममता-रहित आहे.


नारायण म्हणजे विष्णु नरकांतक म्हणजे कृष्ण, पुरांतक म्हणजे शंकर. पुरुष म्हणजे शरीरात राहणारा अंतर्यामी अथवा परम पुरुष/परमात्मा, ईश म्हणजे ईश्वर. निरीश्वर म्हणजे ज्याला अन्य कोणी ईश्वर/शास्ता नाही. शिष्य ब्रह्मरूप झाला आहे. ब्रह्मच सर्व काही आहे. म्हणून तोही विष्णू इत्यादी आहे.


(४९७)

सर्वेषु भूतेष्वहमेव संस्थितो ज्ञानात्मनांत बहिराश्रयः सन् ।
भोक्ता च भोग्यं स्वयमेव सर्वं यद् यत् पृथग् दृष्टमिदंतया पुरा ॥ ४९७ ॥
सर्व भूतांच्या ठिकाणी ज्ञानस्वरूपात राहणारा मी आहे. आत तसेच बाहेर मीच सर्वांचा आश्रय आहे. भोक्ता आणि भोग्य वस्तू मीच आहे. पूर्वी जे काही 'इदं' (= हे विश्व) या स्वरूपात होते ते सर्व मी आहे.


ब्रह्मरूप झालेला शिष्य सर्वत्र आहे आणि सर्व काही आहे. साहजिकच पूर्वी 'इदं' (= विश्व) या स्वरूपात असणारे भोग्यपदार्थ, आणि त्यांचा भोक्ता शिष्यच आहे.


(४९८)

मय्यखंड-सुखांभोधौ बहुधा विश्व-वीचयः ।
उत्पद्यंते विलीयंते माया-मारुत् विभ्रमात् ॥ ४९८ ॥
अखंड सुखाचा सागर अशा माझ्या ठिकाणी मायारूपी वाऱ्याच्या विलासाने/ हालचालीने अनेक प्रकारच्या विश्वरूपी लहरी उठतात आणि त्या लयालाही जातात.



(४९९)

स्थूलादि-भावा मयि कल्पिता भ्रमादारोपितास्तु स्फुरणेन लोकैः ।
काले यथा कल्पक-वत्सरायन-ऋत्वादयो निष्कल-निर्विकल्पे ॥ ४९९ ॥
ज्याप्रमाणे अवयवरहित/खंडरहित आणि भेदरहित अशा कालावर सूर्य इत्यादींच्या चलनामुळे (स्फुरणेन) कल्प, वर्ष, अयन, ऋतू इत्यादी लोकांनी कल्पिलेले आहेत, त्याप्रमाणे अवयव-रहित आणि भेदरहित अशा माझ्या ठिकाणी स्थूल इत्यादी अवस्था (भेद) लोकांनी भ्रमामुळे कल्पिल्या आहेत.



(५००)

आरोपितं नाश्रय-दूषणं भवेत् कदापि मूढेरतिदोष-दूषितैः ।
नार्द्रीकरोत्यूषर-भूमिभागं मरीचिका-वारि-महा-प्रवाहः ॥ ५०० ॥
अतिशय दोषांनी दूषित असणाऱ्या अडाणी लोकांनी कल्पिलेला पदार्थ हा त्याच्या अधिष्ठानाला (आश्रय) कधीही दूषित करणारा होत नाही, जसे - मृगजळाचा प्रचंड प्रवाह हा ओसाड जमिनीच्या भागाला ओले करीत नाही.



GO TOP