|
शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’(४२६)
वासनानुदयो भोग्ये वैराग्यस्य परोऽवधिः ।
अहंभावोदयाभावो बोधस्य परमोऽवधिः । लीन-वृत्तेरनुत्पत्तिर्मर्यादोपरतेस्तु सा ॥ ४२६ ॥
भोग्य वस्तूच्या ठिकाणी (पुनः) वासना न उद्भवणे ही वैराग्याची परम-सीमा आहे. अहंकाराचा उदय न होणे ही ज्ञानाची परम-सीमा आहे. आणि (एकदा) लीन झालेली वृत्ती पुनः उत्पन्न न होणे ही उपरतीची परम-सीमा आहे.
(४२७)
ब्रह्माकारतया सदा स्थिततया निर्मुक्त-बाह्यार्थ-धी-
रन्यावेदित-भोग्यं-भोग-कलनो निद्रालुवद् बालवद् । स्वप्नालोकित-लोकवञ्जगदिदं पश्यन् क्वचिल्लब्धी- रास्ते कश्चिदनंत-पुण्य-फल-भुग् धन्यः स मान्यो भुवि ॥ ४२७ ॥
नेहमी ब्रह्मरूप स्थितीत राहणाऱ्या ज्या जीवन्मुक्ताची बाह्य विषयांवरची बुद्धी ही झोपलेल्या माणसाप्रमाणे सुटलेली आहे (निर्मुक्त), दुसऱ्या/अन्य माणसांनी दिलेल्या (अन्य-आवेदित) भोग्य वस्तूंचा भोग जो लहान मुलाप्रमाणे (बालबत्) घेतो आणि क्वचित विषयांकडे बुद्धी वळली तर स्वप्नात पाहिलेल्या जगाप्रमाणे हे जग जो क्वचितच पाहतो, जो आपल्या अनंत पुण्याचे फळ भोगतो, असा (जीवन्मुक्त) पुरुष या जगामध्ये धन्य आणि (सर्व-) मान्य असतो.
या श्लोकातील वर्णन स्थितप्रज्ञा(जीवन्मुक्ता)चे आहे, हे पुढील श्लोक ४२८ वरून लक्षात येते. (४२८)
स्थितप्रज्ञो यतिरयं यः सदानंदमश्नुते ।
ब्रह्मण्येव विलीनात्मा निर्विकारो विनिष्क्रियः ॥ ४२८ ॥
जो निर्विकार आणि क्रियारहित आहे आणि ज्याचे मन (आत्मा) (अथवा प्रत्यगात्मा) ब्रह्मातच लीन झाले आहे आणि जो सतत आनंदाचा उपभोग घेत आहे, तो हा स्थितप्रज्ञ संयमी पुरुष होय.
स्थितप्रज्ञ कोण याचे उत्तर श्लोक ४२९ मध्ये आहे. (४२९)
ब्रह्मात्मनोः शोधितयोरेक-भावावगाहिनी ।
निर्विकल्पात्र चिन्मात्रा बृत्तिः प्रज्ञेति कथ्यते । सुस्थितासी भवेद् यस्य स्थितप्रज्ञः स उच्यते ॥ ४२९ ॥
उपाधिरहित (शोधित) असे ब्रह्म व प्रत्यगात्मा यांच्या एकभावात एकत्वात बुडून गेलेली, निर्विकल्प आणि केवळ चितरूप अशी (मनाची) वृत्ती ही प्रज्ञा म्हटली जाते. ही प्रज्ञा ज्याची चांगल्याप्रकारे स्थिर झाली आहे, तो माणूस स्थितप्रज्ञ म्हटला जातो. हा स्थितप्रज्ञ जीवन्मुक्त आहे हे उघड आहे. (४३०) यापुढे श्लोक ४३०-४४३ मध्ये स्थितप्रज्ञ-जीवन्मुक्तीचे वर्णन आहे. या वर्णनात कधी 'स जीवन्मुक्त इष्यते', असे ध्रुवपद आहे तर कधी 'जीवन्मुक्तस्य लक्षणम्' असे ध्रुवपदवजा शब्द आहेत.
यस्य स्थिता भवेत् प्रज्ञा यस्यानंदो निरंतरः ।
प्रपंचो विस्मृत-प्रायः स जीवन्मुक्त इष्यते ॥ ४३० ॥
ज्याची प्रज्ञा (श्लोक ४२९) स्थिर झाली आहे. ज्याला निरंतर आनंद मिळतो आणि जो (विश्वातील विषयांच्या) विस्ताराला (प्रपंच) बहुतांशी विसरला आहे, तो जीवन्मुक्त म्हटला जातो. (४३१)
लीनधीरपि जागर्ति यो जाग्रद्-धर्म-विवर्जितः ।
बोधो निर्वासनो यस्य स जीवन्मुक्त इष्यते ॥ ४३१ ॥
(ब्रह्मामध्ये) बुद्धी/ मन लीन झाले असतानाही जो जागृत असतो, जो जागा असतो परंतु जागृतावस्थेचे धर्म ज्याच्या ठिकाणी नसतात, आणि ज्याचे ज्ञान वासनारहित असते, तो जीवन्मुक्त म्हटला जातो.
तो जागा असतो म्हणजे निर्विकल्प समाधीत असून त्याला ब्रह्माचे ज्ञान असते. तो जागृति-धर्म रहित असतो म्हणजे जागृतीतील देह, इंद्रिये इत्यादींच्या संदर्भात त्याची आसक्ती नसते. वासनारहित झाल्यावर त्याला ब्रह्माचे ज्ञान झाले असल्याने त्याचे ब्रह्मज्ञान हे वासनारहित असते. (४३२)
शांत-संसार-कलनः कलावानपि निष्कलः ।
यस्य चित्तं विनिश्चिंतं स जीवन्मुक्त इष्यते ॥ ४३२ ॥
ज्याचे विश्वाच्या पसाऱ्याकडे (संसार) लक्ष नसते, जो कलायुक्त असूनही कलारहित असतो, आणि ज्याचे चित्त हे चिंतारहित असते, तो (पुरुष) जीवन्मुक्त म्हटला जातो.
जीवन्मुक्त हा जिवंत असल्याने त्याचे ठिकाणी देह, इंद्रिये इत्यादी कला/अवयव असतात अथवा त्याच्याजवळ उपनिषदांनी सांगितलेल्या सोळा कला असतात; तथापि, त्यांकडे त्याचे लक्ष नसल्याने आणि तो ब्रह्मरूप झाला असल्याने, तो कलारहित असतो. त्याला सतत आनंद मिळत असल्याने (श्लोक ४३०) त्याच्या चित्तात कोणतीच चिंता नसते. (४३३)
वर्तमानेऽपि देहेऽस्मिन् छायावदनुवर्तिति ।
अहंता-ममताभावो जीवमुक्तस्य लक्षणम् ॥ ४३३ ॥
छायेप्रमाणे मागे लागलेल्या या वर्तमानकालीन देहावर अहंता आणि ममता यांचा अभाव, हे जीवन्मुक्ताचे लक्षण होय.
जीवन्मुक्त हा जिवंतपणी मुक्त आहे. पण बर्तमानकालीन देहावर त्याचा अहंकार आणि ममत्व नसते. (४३४)
अतीताननुसंधानं भविष्यदविचारणम् ।
औदासीन्यमपि प्राप्तं जीवन्मुक्तस्य लक्षणम् ॥ ४३४ ॥
भूतकालीन गोष्टींची आठवण न काढणे, भविष्यकालीन गोष्टींचा विचार न करणे, आणि वर्तमानकालीन गोष्टींविषयी उदासीनता असणे, असे हे जीवन्मुक्ताचे लक्षण आहे.
जीवन्मुक्त हा भूत-वर्तमान-भविष्य या तीनही काळांतील गोष्टींबाबत उदासीन असतो. (४३५)
गुण-दोष-विशिष्टेऽस्मिन् स्वभावेन विलक्षणे ।
सर्वत्र सम-दर्शित्वं जीवन्मुक्तस्य लक्षणम् ॥ ४३५ ॥
गुण आणि दोष यांनी युक्त असणाऱ्या, आणि स्वभावतःच विलक्षण असणाऱ्या या (संसाराच्या) संदर्भात सर्वत्र सम ब्रह्म पाहणे, हे जीवन्मुक्ताचे लक्षण आहे.
जगातील प्रपंच हा गुण, दोष इत्यादींनी युक्त आणि परस्पर-विलक्षण अशा नाना पदार्थांनी भरलेला आहे. त्यांचे संदर्भात त्याला त्याचे ज्ञान न होता त्याला सर्वत्र सम अशा ब्रह्माचे ज्ञान होत असते. (४३६)
इष्टानिष्टार्थ-संप्राप्तौ समदर्शितयात्मनि ।
उभयत्राविकारित्वं जीवन्मुक्तस्य लक्षणम् ॥ ४३६ ॥
तो सम ब्रह्म सर्वत्र पाहात असल्याकारणाने, त्याला आवडत्या तसेच नावडत्या वस्तू प्राप्त झाल्या तरी त्या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत त्याच्या मनात (आत्मनि) विकार येत नाहीत. हे जीवन्मुक्ताचे लक्षण आहे.
आवडती वस्तू हवी, नावडती नको असे विचार त्याच्या मनात येत नाहीत. कारण त्याला सर्वत्र ब्रह्मच दिसत असते. (४३७)
ब्रह्मानंद-रसास्वादसक्त-चित्ततया यतेः ।
अंतर्बहिरविज्ञानं जीवन्मुक्तस्य लक्षणम् ॥ ४३७ ॥
ब्रह्मानंदाच्या रसाचा आस्वाद घेण्यात (त्याचे) चित्र आसक्त झाले असल्याने त्याला आतील किंवा बाहेरील गोष्टींचे अनुसंधान नसते. असे हे संयमी (यतेः) जीवन्मुक्ताचे लक्षण आहे.
बाह्य जगातील वस्तूंकडे अथवा मनातील विचारांकडे जीवन्मुक्ताचे लक्ष नसते. कारण त्याचे चित्त ब्रह्मानंदात आसक्त झालेले असते. (४३८)
देहेंद्रियादी कर्तव्ये ममाहं-भाव-वर्जितः ।
औदासीन्येन यस्तिष्ठेत् स जीवन्-मुक्त-लक्षणः ॥ ४३८ ॥
देह, इंद्रिये इत्यादींच्या बाबतीत करावयाच्या कर्तव्यावर अहंता आणि ममता न ठेवता (त्यांचे बाबतीत) जो उदासीनपणाने वागत असतो, त्याच्याजवळ जीवन्मुक्ताचे लक्षण आहे.
जीवन्मुक्त जिवंत आहे. त्याचा देह, इंद्रिये इत्यादी आपापली कर्तव्ये करीत असतात. पण त्या कर्तव्यांच्या संदर्भात त्याच्या जवळ अहंता आणि ममता नसते; त्यांच्या बाबतीत तो उदासीन असतो. (४३९)
विज्ञात आत्मनो यस्य ब्रह्म-भावः श्रुतेर्बलात् ।
भय-बंध-विनिर्मुक्तः स जीवन्-मुक्त-लक्षणः ॥ ४३९ ॥
वेदवचनांच्या सामर्थ्याने ज्याला आपला-ब्रह्मभाव कळलेला आहे आणि म्हणून जो संसाराच्या बंधनातून सुटला आहे, त्याच्याजवळ जीवन्मुक्ताचे लक्षण आहे असे समजावे.
'अहं ब्रह्मास्मि', 'अयमात्मा ब्रह्म', 'तत्त्वमसि' इत्यादी वेदातील वाक्ये जीव हा ब्रह्मच आहे असे सांगतात. (४४०)
देहेंद्रियेष्वहंभाव इदंभावस्तदन्यके ।
यस्य नो भवतः कापि स जीवन्मुक्त इष्यते ॥ ४४० ॥
देह आणि इंद्रिये यांच्या बाबतीत अहंभाव आणि त्याखेरीज इतर वस्तूंच्या बाबतीत इदंभाव हे दोन्ही ज्याच्या ठिकाणी कधीही नसतात, तो माणूस जीवन्मुक्त म्हटला जातो.
देह, इंद्रिये म्हणजे 'मी' असा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. त्याखेरीज अन्य अनेक पदार्थ या विश्वात आहेत. त्या विश्वाच्या बाबतीत 'इदं' म्हणजे 'हे विश्व' अशी भूमिकाही त्याची नसते. कारण त्याला सर्वत्र सम ब्रह्म दिसत असते. (४४१)
न प्रत्यग्-ब्रह्मणो भेदं कदापि ब्रह्म-सर्गयोः ।
प्रज्ञया यो विजानाति स जीवन्मुक्त-लक्षणः ॥ ४४१ ॥
जो स्वतःच्या प्रज्ञेने/मनाने/ज्ञानाने प्रत्यग् आत्मा आणि ब्रह्म तसेच ब्रह्म आणि ब्रह्माबर अध्यासाने उत्पन्न झालेले जग यांमध्ये कधीही भेद मानीत नाही, तो जीवन्मुक्ताच्या लक्षणाने युक्त आहे.
देहाच्या उपाधीत सापडलेले ब्रह्म म्हणजेच प्रत्यग् आत्मा; ते दोघे भिन्न नाहीत. ब्रह्मावर अध्यासाने भासणारे जग म्हणजे सर्ग. अध्यस्त जग आणि अधिष्ठान ब्रह्म वेगळे नाहीत, असा अभेद जीवन्मुक्ताला ज्ञानाने कळलेला असतो. म्हणून 'अयमात्मा ब्रह्म' आणि 'सर्वं खल्विदं ब्रह्म' अशी त्याची भूमिका असते. (४४२)
साधुभिः पूज्यमानेऽस्मिन् पीड्यमानेऽपि दुर्जनैः ।
सम-भावो भवेद् यस्य स जीवन्मुक्त-लक्षणः ॥ ४४२ ॥
सज्जन लोकांनी पूजा/मानसन्मान केला असता अथवा दुर्जनांनी पीडा केली असता ज्याची वृत्ती समान असते, त्याच्याजवळ जीवन्मुक्ताचे लक्षण आहे. (४४३)
यत्र प्रविष्टा विषयाः परेरिताः नदी-प्रवाहा इव वारि-राशौ ।
लीयंति सन्मात्रतया न विक्रियामुत्पादयंत्येष यतिर्विमुक्तः ॥ ४४३ ॥
समुद्रात नद्यांचे प्रवाह तद्रूप होऊन लीन होऊन जातात, त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या प्रेरणेने पुढे आलेले विषय ज्याच्या ठिकाणी (यत्र) प्रवेश करतात पण ते सद्रूप ब्रह्म होऊन (सन्मात्रतया) लय पावतात, ते विषय त्याचे मनात कोणताही विकार निर्माण करीत नाहीत. असा जो पुरुष असेल तो संयमी माणूस हा जीवन्-मुक्त होय.
स्वत:हून जीवन्मुक्ताची विषयांकडे ओढ नाही. म्हणून येथे 'पर-प्रेरित' असे म्हटले आहे. (४४४)
विज्ञात-ब्रह्म-तत्त्वस्य यथापूर्वं न संसृतिः ।
अस्ति चेन्न स विज्ञात-ब्रह्म-भावो बहिर्मुखः ॥ ४४४ ॥
ज्याने ब्रह्म हे तत्त्व जाणले आहे, त्याला पूर्ववत् संसार नाही. आणि ज्याला पूर्ववत् संसार असेल त्याला ब्रह्मतत्त्व समजलेले नाही असा अर्थ आहे. तो बहिर्मुख (संसारात मग्न) आहे असेच समजावे.
या श्लोकात 'संसृति' म्हणजे विषयभोगांची इच्छा/आवड असा अर्थ पुढील ४४५-४४६ या श्लोकांधारे द्यावा लागतो. (४४५)
प्राचीन-वासना-वेगादसौ संसरतीति चेत् ।
न सदेकत्व-विज्ञानान्मंदीभवति वासना ॥ ४४५ ॥
'पूर्वीच्या वासनांच्या प्रभावामुळे तो संसरण करेल', असे जर कुणी म्हणेल, तर ते तसे नाही. कारण सद्रूप आणि अद्वितीय (सत् एक) अशा ब्रह्माच्या ज्ञानाने वासना मंद (नष्ट) होते.
'संसरति' म्हणजे विषयांमध्ये आसक्ती धरून व्यवहार करेल. एकदा का ब्रह्माचे ज्ञान झाले की कोणतीही वासना शिल्लक राहत नाही. (४४६)
अत्यंत-कामुकस्यापि वृत्तिः कुंठति मातरि ।
तथैव ब्रह्मणि ज्ञाने पूर्णानंदे मनीषिणः ॥ ४४६ ॥
अत्यंत कामलंपट (स्त्री-लंपट) पुरुषाची संभोग इच्छेची वृत्ती आपल्या आईच्या बाबतीत कुंठित होते. त्याप्रमाणे पूर्ण आणि आनंदरूप ब्रह्म कळले असता शहाण्या जीवन्मुक्ताची (मनीषिणः) मनोवृत्ती ही विषयांच्या संदर्भात कुंठित होते. (४४७) येथे अशी शंका येऊ शकते - या जगात जीवन्मुक्त वावरत असतो. तसे करताना तो बाह्य विषयांचा भोग घेताना दिसतो. हे कसे काय ? या शंकेचे समाधान असे -
निदिध्यासन-शीलस्य बाह्य-प्रत्यय ईक्ष्यते ।
व्रतीति श्रुतिरेतस्य प्रारब्धं फल-दर्शनात् ॥ ४४७ ॥
ब्रह्माचा निदिध्यास करण्याची सवय असलेल्या माणसाच्या बाबतीत त्याला बाह्य विषयांची प्रतीती येत असते असे दिसून येते, ते त्याचे (एतस्य) प्रारब्ध आहे; कारण (त्या संदर्भात तेथे) प्रारब्धाचे फळ दिसून येते, असे श्रुती सांगते.
माणूस जरी जीवन्मुक्त झाला तरी त्याचे प्रारब्ध कर्म संपलेले नाही. त्यामुळे प्रारब्धाला अनुसरून त्याचे लौकिक व्यवहार चालूच राहतात. या संदर्भात श्रुतीही तसेच सांगते. (४४८) यानंतर श्लोक ४४८-४६५ पर्यंत शंकराचार्य प्रारब्धाविषयी सांगतात.
सुखाद्यनुभवो यावत् तावत् प्रारब्धमिष्यते ।
फलोदयः क्रियापूर्वो निष्क्रियो न हि कुत्रचित् ॥ ४४८ ॥
जोपर्यंत जीवन्मुक्ताला सुख इत्यादींचा अनुभव येत असतो, तोपर्यंत त्याचे प्रारब्ध कार्यशील आहे असे मानले जाते. कारण कोणतेही फळ निर्माण होण्यापूर्वी अगोदर काहीतरी क्रिया/कर्म घडलेले असतेच. कर्म घडले नसताना फळ निर्माण झाले असे या जगात कुठेही आढळत नाही.
जीवन्मुक्तावर सुख-दुःख ओढवताना दिसून येते, ते त्याच्या प्रारब्ध कर्मामुळे. सुख-दुःख इत्यादी फळांसाठी पूर्वीचे कर्म मानावेच लागते. पूर्व कर्म नसताना फळ घडले असे कुठेही दिसून येत नाही. प्रत्येक माणसाच्या बाबतीत संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण अशी तीन प्रकारची कर्म असतात. प्रारब्धानुसार जीवन्मुक्ताच्या बाबतीत सुख-दुःखे आढळून येतात. मग त्याच्या अन्य कर्मांचे काय होते ? या प्रश्नांची उत्तरे यापुढे दिलेली आहेत. (४४९)
अहं ब्रह्मेति विज्ञानात् कल्प-कोटि-शतार्जितम् ।
संचितं विलयं याति प्रबोधात् स्वप्न-कर्मवत् ॥ ४४९ ॥
जागृति-अवस्था आली असता स्वप्नातील कर्मे नष्ट होऊन जातात. त्याप्रमाणे 'मी ब्रह्म आहे', असा साक्षात्कार झाला असता, शेकडो कोटी कल्पांमध्ये साठलेले संचित कर्म लयाला जाते. (४५०) ब्रह्मसाक्षात्कारी जीवन्मुक्ताचे संपूर्ण संचित कर्म नष्ट होते, हे कसे काय, याचे उत्तर -
यत् कृतं स्वप्न-वेलायां पुण्यं वा पापमुल्बणम् ।
सुप्तोत्थितस्य किं तत् स्यात् स्वर्गाय नरकाय वा ॥ ४५० ॥
स्वप्नाच्या काळात जे काही (पुष्कळ) पुण्य आणि भयंकर पाप कर्म केले असेल ते झोपेतून जागे झालेल्या माणसाच्या बाबतीत स्वर्ग देण्याचे अथवा नरकात नेण्याचे कारण होईल काय ?
स्वप्नात केलेले पुण्य अथवा पाप जागृतावस्थेत फळ देत नाही. त्याप्रमाणे अज्ञानावस्थेत केलेले कर्म ज्ञानावस्थेत फळ देत नाही. |