शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(४०१)

असत्-कल्पो विकल्पोऽयं विश्वमित्येक-वस्तुनि ।
निर्विकारे निराकारे निर्विशेषे भिदा कुतः ॥ ४०१ ॥
(विश्वरूपाने भासणारा) हा विकल्प असत् मिथ्या आहे. (कारण) निर्विकार, निराकार, निर्विशेष अशा एकमात्र (ब्रह्म/आत्मा) वस्तूचे ठिकाणी भेद (= काहीतरी वेगळे) कोठून असणार ?


(४०२)

द्रष्ट-दर्शन-दृश्यादि-भाव-शून्यैक-वस्तुनि ।
निर्विकारे निराकारे, निर्विशेषे भिदा कुतः ॥ ४०२ ॥
निर्विकार, निराकार, निर्विशेष, द्रष्टा-दृश्य-दर्शन या बंधांनी रहित अशा ब्रह्म या एक वस्तूच्या ठिकाणी भेद कोठून असणार ?


विश्वात द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी असते. ब्रह्म हे ज्ञानमात्र असल्याने त्यात ही त्रिपुटी नाही.


(४०३)

कल्पार्णव इवात्यंत-परिपूर्णक-वस्तुनि ।
निर्विकारे निराकारे निर्विशेषे भिदा कुतः ॥ ४०३ ॥
निर्विकार, निराकार, निर्विशेष आणि प्रलयकालीन समुद्राप्रमाणे अतिशय परिपूर्ण अशा ब्रह्म या एका वस्तूचे ठायी भेद कोठून असणार ?


प्रलयकालीन समुद्रात टेकडी, डोंगर इत्यादी भेद दिसेनासे होऊन सर्वत्र पाणीच पाणी दिसते.


(४०४)

तेजसीव तमो यत्र प्रलीनं भ्रांति-कारणम् ।
अद्वितीये परे तत्त्वे निर्विशेषे भिदा कुतः ॥ ४०४ ॥
प्रकाशात ज्याप्रमाणे अंधाराचा लय होतो. त्याप्रमाणे जेथे (- ज्या ब्रह्मात) भ्रांतीचे कारण लीन होऊन जाते. अशा अद्वितीय, निर्विशेष अशा (ब्रह्म या) परतत्त्वाचे ठिकाणी भेद कोठून असणार ?



(४०५)

एकात्मके परे तत्त्वे भेद-वार्ता कथं भवेत् ।
सुषुप्तौ सुख-मात्रायां भेदः केनावलोकितः ॥ ४०५ ॥
एक हेच स्वरूप असणाऱ्या (ब्रह्म या) परतत्त्वाच्या ठिकाणी भेदाची गोष्ट कशी काय असणार ? (जसे -) केवळ सुखाने भरलेल्या अशा सुषुप्तीमध्ये भेद कुणी पाहिला आहे ?


सुषुप्ती अवस्थेत फक्त सुख असते, तेथे दुःख असत नाही. ब्रह्म एकच आहे तेथे दोन नाही.


(४०६)

न ह्यस्ति विश्वं पर-तत्त्व-बोधात् सदात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे ।
काल-त्रये नाप्यहिरीक्षितो गुणे न ह्यंबु-बिंदु-र्मृगतृष्णिकायाम् ॥ ४०६ ॥
ब्रह्म या परतत्त्वाचे ज्ञान झाल्यावर, सत्-रूप अशा निर्विकल्प ब्रह्माचे ठिकाणी विश्व असतच नाही. (रजुसर्प दृष्टांतात) रज्जूवर (गुणे) कालत्रयी साप दिसत नाही. तसेच (वाळवंट हे अधिष्ठान कळताच) मृगजळात नदीच्या पाण्याचा थेंबसुद्धा दिसून येत नाही.


अधिष्ठानाचे ज्ञान होताच त्यावरील अध्यस्त पदार्थ नाहीच हे कळून येते.


(४०७)

मायामात्रमिदं द्वैतमद्वैतं परमार्थतः ।
इति ब्रूते श्रुतिः साक्षात् सुषुप्तावनुभूयते ॥ ४०७ ॥
'हे द्वैत केवळ माया आहे, परमार्थदृष्ट्या अद्वैत आहे', असे श्रुती सांगते. (या अवैताचा) साक्षात् अनुभव सुषुप्तीमध्ये येतो.


येथे पहिला चरण म्हणजे मांडूक्यकारिका, १४ आहे आणि ते वचन गौडपादाचार्यांचे आहे. तत्सदृश बचने इतर उपनिषदांत सापडतात. उदा., नेह नानास्ति किंचन । (कठोपनिषद्, २.१.११). येथे श्रुती आणि अनुभव यांच्या आधारे अद्वैत हेच खरे, असे शंकराचार्यांना सांगावयाचे आहे.


(४०८)

अन्यन्यत्वमधिष्टानादारोप्यस्य निरीक्षितम् ।
पंडितै रज्जु-सर्पादौ विकल्पो भ्रांति-जीवनः ॥ ४०८ ॥
आरोपित/अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाशी एकरूप असतो ही गोष्ट पंडितांनी रङ्ग-सर्प इत्यादी (दृष्टांता) मध्ये पाहिलेली आहे. (म्हणून अधिष्ठानापेक्षा अध्यस्त पदार्थ भिन्न असतो हा) विकल्प भ्रांतीवर आधारलेला आहे.


ब्रह्मावर अध्यस्त असणारे विश्व हे ब्रह्माशी एकरूप आहे. कारण अधिष्ठानावर आरोपित असणारा पदार्थ हा भिन्न नसून तो अधिष्ठानाशी एकरूपच असतो.


(४०९) अध्यस्तपदार्थ अधिष्ठानापेक्षा वेगळा असतो हा विकल्प कसा निर्माण होतो हे पुढील श्लोक ४०९ मध्ये सांगितले आहे.

चित्त-मूलो विकल्पोऽयं चित्ताभावे न कश्चन ।
अतश्चित्तं समाधेहि प्रत्यग-रूपे परात्मनि ॥ ४०९ ॥
ब्रह्मापेक्षा/परमात्म्यापेक्षा विश्व वेगळे आहे या विकल्पाचे मूळ चित्त आहे, चित्त नसताना कोणताही विकल्प नसतो. म्हणून (हे शिष्या) प्रत्यगात्मरूप परमात्म्याचे ठायी चित्ताचा लय/एकाग्रता साध.


मागील श्लोक ४०८ मध्ये विकल्प हा भ्रांतीवर आधारलेला आहे, असे म्हटले तर प्रस्तुत श्लोकात विकल्पाचे कारण चित्त असे म्हटले आहे. याचा अर्थ असा - चित्त कार्यप्रवण असताना भ्रांती होते आणि भ्रांतीने विश्व ब्रह्मापेक्षा वेगळे असा विकल्प येतो. तेव्हा हे चित्त/मन जर प्रत्यगात्म्याचे ठिकाणी लीन झाले तर भ्रांतीला आणि परिणामतः विकल्पाला अवकाश राहत नाही.


(४१०)

किमपि सतत-बोधं केवलानंद-रूपं
निरुपममतिवेलं नित्य-मुक्तं निरीहम् ।
निरवधि गगनाभं निष्कलं निर्विकल्पं
हृदि कलयति विद्वान् ब्रह्म पूर्णं समाधौ ॥ ४१० ॥
सतत बोधरूप/ज्ञानरूप, केवळ आनंदरूप, उपमारहित, कालाचे अतीत, नित्यमुक्त, इच्छारहित, मर्यादारहित, आकाशाप्रमाणे (व्यापक, असंग) कलारहित/ भागरहित/ अवयवरहित, विकल्परहित, असे अद्भुत (किमपि) पूर्ण ब्रह्म शहाणा मुमुक्षू समाधी-अवस्थेत मनात जाणतो.


श्लोक ४०९ मध्ये प्रत्यगात्म्यावर मन केंद्रित करण्यास सांगितले होते. तसे केल्यावर लागणाऱ्या समाधी अवस्थेत मुमुक्षूला मनाने ब्रह्माचा अनुभव येतो. त्या ब्रह्माचे वर्णन येथे आहे.


(४११)

प्रकृति-विकृति-शून्यं भावनातीत-भावं
समरसमसमानं मान-संबंध-दूरम् ।
निगम-वचन-सिद्धं नित्यमस्मत्-प्रसिद्धं
हृदि कलयति विद्वान् ब्रह्म पूर्णं समाधौ ॥ ४११ ॥
जे प्रकृती आणि विकृती यांनी रहित आहे, ज्याचे अस्तित्व (भाव)_हे (मनाच्या) चिंतनापलीकडचे आहे (भावनातीत), जे समरस (= एकस्वरूप) आहे, ज्याच्या समान कोणी नाही. जे अभिमानाच्या संबंधापासून म्हणजे अभिमानरहित आहे. किंवा लौकिक प्रमाणांच्या संबंधाने रहित म्हणजे लौकिक प्रमाणांनी न कळणारे आहे, जे वेदाच्या वचनावरून सिद्ध होणारे आहे, जे 'मी' (अस्मत्) या शब्दाने लौकिक जीवनात प्रसिद्ध आहे, असे पूर्णब्रह्म शहाणा मुमुक्षू समाधी अवस्थेत मनाने जाणतो.


प्रकृती-विकृतिशून्य म्हणजे कार्यकारण-संबंधाने रहित. 'मान' म्हणजे अभिमान अथवा लौकिक प्रमाण. 'अस्मत्-प्रसिद्ध' म्हणजे 'मी'. 'मी' या स्वरूपात प्रत्यगात्मा लोकांच्याकडून निर्दिष्टिला जातो; हा प्रत्यगात्मा ब्रह्मच आहे.

समाधी-अवस्थेत मुमुक्षूला कळणाऱ्या ब्रह्माचे वर्णन येथे आहे.


(४१२)

अजरममरमस्ताभाव-वस्तु-स्वरूपं
स्तिमित-सलिल-राशि-प्रख्यमाख्या-विहीनम् ।
शमित-गुण-विकारं शाश्वतं शांतमेकं
हृदि कलयन्ति विद्वान् ब्रह्म पूर्ण समाधौ ॥ ४१२ ॥
जे जरा-रहित आहे, जे मरण-रहित आहे, ज्यात अभाव लय पावतात (अस्ताभाव), जे वस्तु-स्वरूप आहे, जे शांत/स्तब्ध (स्तिमित) सागराप्रमाणे आहे, ज्याला नाव (आख्या) नाही, ज्यात गुणांचे विकार (अथवा गुण आणि विकार) शांत (शमित) झालेले असतात, जे शाश्वत, शांत आणि एक आहे, असे पूर्ण ब्रह्म शहाणा (मुमूक्ष) समाधी-अवस्थेत मनाने जाणतो.


पहिल्या चरणात 'मस्ताभास-वस्तु असा पाठभेद आहे. मग 'ज्यात (जगाच्या) आभासाचा अभाव आहे', असा अर्ध होईल. वस्तू म्हणजे तीनही काळांत असणारा पदार्थ, रूपाला नाव देता येते; ब्रह्माला रूप नसल्याने त्याला नाव देता येत नाही. सत्त्व-रज-तम हे गुण ब्रह्मात नाहीत; ते गुणातीत आहे; तसेच गुणांचे विकारही ब्रह्मात नाहीत किंवा काम, क्रोध इत्यादी विकार ब्रह्मात नाहीत. गुण आणि विकार ब्रह्मात नसल्याने ते शांत आहे: त्याच्या जोडीने अन्य काही नसल्याने ते एकमेव एक आहे.

श्लोक ४१०-४१२ मध्ये 'हृदि कलयति .... समाधी' हा चरण ध्रुवपदवजा आहे.


(४१३)

समाहितांतः करण-स्वरूपे विलोकयत्यात्मानमखंड-वैभवम् ।
विच्छिंधि बंधं भव-गंध-गंधितं यत्नेन पुंस्त्वं सफलीकुरुष्व ॥ ४१३ ॥
(आपल्या) स्वरूपामध्ये अंतःकरण एकाग्र करून, हे शिष्या) अखंड वैभव असणारा आत्मा पहा. संसाराच्या गंधाने गंधित झालेल्या भवबंधाला प्रयत्नपूर्वक तोडून टाक, आणि स्वतःचा पुरुष-जन्म सफळ कर.


जगातील वैभव कायम टिकणारे नसते. आत्म्याचे वैभव सततचे आहे. भव मरणजे जन्ममरण चक्र: त्याच्या वासाने म्हणजे संसर्गाने दुषित झालेला संसार. संसाराचा बंध तोडून आत्मदर्शन घेणे हेच नर-जन्म सफळ होण्याचे कारण आहे.


(४१४)

सर्वोपाधि-विनिर्मुक्तं सच्चिदानंदमद्वयम् ।
भादयात्मानमात्मस्थं न भूयः कल्पसेऽध्वने ॥ ४१४ ॥
सर्व उपाधींतून मुक्त, सच्चिदानंद, अद्वय अशा देहातील (आत्मस्थ) आत्म्याचे चिंतन हे शिष्या तू कर (भावय). मग तू पुनः संसाराच्या मार्गावर येणार नाहीस.



(४१५)
छायेव पुंसः परिदृश्यमानमाभास-रूपेण फलानुभूत्या ।
शरीरमाराच्छववन्निरस्तं पुनर्न संधत्त इदं महात्मा ॥ ४१५ ॥
आभासरूपाने (कर्म -) फळांचा अनुभव येत असल्याने, माणसाच्या छायेप्रमाणे दिसणारे, आणि (विवेकामुळे) प्रेताप्रमाणे दूर सारलेले जे शरीर, त्याकडे महात्मे लोक पुनः लक्ष देत नाहीत. (किंवा महात्मे पुनः जन्म घेऊन देह धारण करीत नाहीत.


किंवा पूर्व कर्मांची फळे अनुभवत असल्याने, माणसाच्या छायेप्रमाणे आभासरूपाने दिसणारा (जड) देह हा प्रेताप्रमाणे दूर टाकलेला असल्याने (आत्मसाक्षात्कारी) महात्मे लोक त्याच्याकडे पुनः लक्ष देत नाहीत).

प्रारब्ध कर्माने आलेला देह आभासरूप आहे, त्याची फळे आभासरूप आहेत. माणसाच्या छायेप्रमाणे देह हा कधी असतो तर कधी नसतो; तो क्षणभंगुर आहे. देह म्हणजे आत्मा नव्हे हे कळल्याने त्याला प्रेताप्रमाणे बाजूला सारले आहे. मुक्त महात्मे आत्मसाक्षात्कारानंतर या देहाचा पुनः विचार करीत नाहीत म्हणजे देहाला महत्त्व देत नाहीत. अथवा जन्ममरण संपल्याने ते पुन: देह धारण करीत नाहीत. किंवा ते पुनः देहाला आत्मा मानीत नाहीत.


(४१६)

सतत-विमल-बोधानंद-रूपं समेत्य
त्यज जड-मल-रूपोपाधिमेतं सुदूरे ।
अथ पुनरपि नैष स्मर्यतां वांत-वस्तु
स्मरण-विषय-भूतं कल्पते कुत्सनाय ॥ ४१६ ॥
सतत शुद्ध ज्ञानरूप आणि आणि आनंदरूप (आत्म्या) ला प्राप्त करून घेतल्यावर (जाणल्यावर), या जड आणि मलरूप अशा (देहरूपी) उपाधीला खूप दूरच सोडून दे; नंतर हि शिष्या) पुनः सुद्धा (तुला) त्याचे स्मरण होऊ देऊ नको. ओकून टाकलेली वस्तू जर (पुनः) स्मरणाचा विषय झाली तर ती किळस घृणा उत्पन्न करते.


जड देहाच्या उपाधीने रहित अशा आत्म्याचा अनुभव आल्यावर, त्याच्यावरची आसक्ती टाकावयास हवी. मग त्याचे स्मरण अथवा विचार करू नये.


(४१७)

समूलमेतत् परिदह्य वह्नौ सदात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे ।
ततः स्वयं नित्य-विशुद्ध-बोधानंदात्मना तिष्ठति विद्वद्-वरिष्ठः ॥ ४१७ ॥
सत् हे स्वरूप असणाऱ्या अशा निर्विकल्प ब्रह्मरूपी अग्नीमध्ये हे (संपूर्ण विश्व) मुळासकट पूर्णपणे जाळून टाकून, त्यानंतर श्रेष्ठ असा आत्मवेत्ता हा स्वतः नित्य, विशुद्ध, ज्ञानरूप आणि आनंदरूप अशा आत्म्याच्या (म्हणजे ब्रह्माच्या) स्वरूपात राहतो.


एतत् म्हणजे विश्व अथवा देहरूपी उपाधी. उत्तरोक्त अर्थ पुढील श्लोकाला अनुसरून वाटतो. मुळासकट म्हणजे कर्मांसकट अथवा अविद्येसह, जाळून टाकून म्हणजे लय करून, निरास करून, देह, विश्व यांची आसक्ती संपल्यावर जीवन्मुक्त हा ब्रह्माच्या स्वरूपातच राहतो.


(४१८)

प्रारब्ध-सूत्र-ग्रथितं शरीरं प्रयातु बा तिष्ठतु गोरियासृक् ।
न तत् पुनः पश्यति तत्त्ववेत्तानंदात्मनि ब्रह्मणि लीन-वृत्तिः ॥ ४१८ ॥
प्रारब्ध कर्माच्या सूत्रात गुंफलेले हे शरीर राहो किंवा जाबो. आनंदस्वरूप ब्रह्मामध्ये ज्याची मनोवृत्ती लीन झाली आहे असा आत्म- तत्त्ववेत्ता, गाईच्या/बैलाच्या रक्ताकडे जसे कोणी पाहत नाही त्याप्रमाणे, तो पुनः शरीराकडे ढुंकूनही पाहत नाही.


'गोरिव सूक्' असा पाठभेद आहे. तो घेतल्यास, गाईच्या गळ्यातील माळेप्रमाणे, प्रारब्धांच्या सूत्रात गुंफलेले शरीर असा अर्थ होईल, माळ खाली पडली काय किंवा गळ्यात राहिली काय, गाई बैलाला त्याचे काही वाटत नाही. त्याप्रमाणे साक्षात्कारी पुरुषाला प्रारब्ध-जन्य देहाची किंमत वाटत नाही.


(४१९)

अखंडानंदमात्मानं विज्ञाय स्व-स्वरूपतः ।
किमिच्छन् कस्य वा हेतोर्देहं पुष्यति तत्त्ववित् ॥ ४१९ ॥
अखंड आनंदरूप आत्मा हेच आपले स्वतःचे (सत्य) स्वरूप आहे, हे कळल्यावर, तत्त्व/सत्य जाणणारा कोणता माणूस कशाच्या इच्छेने आणि कोणत्या कारणाने देहाचे पोषण करील ?


देह हे आपले स्वरूप नसून आनंदरूप आत्मा आपण आहोत, हे कळल्यावर जीवन्मुक्त कोणत्याही कारणाने वा इच्छेने देहाकडे लक्ष देणार नाही; त्याच्या दृष्टीने देह हा प्रेतवत् आहे.


(४२०)

संसिद्धस्य फलं त्वेतज्जीवन्मुक्तस्य योगिनः ।
बहिरंतः सदानंद-रस-स्वादनमात्मनि ॥ ४२० ॥
आपल्या देहात (आत्मनि) आणि बाहेर सद्रूप (ब्रह्माच्या) आनंदरूपाचा आस्वाद भोगत राहणे हेच सिद्ध झालेल्या (ज्ञान-) योगी जीवन्मुक्ताला मिळणारे फळ आहे.


जीवन्मुक्त झालेल्या सिद्ध-ज्ञान-योग्याला सर्वत्र आत्मानंदाचा आस्वाद मिळत राहतो.


(४२१)

वैराग्यस्य फलं बोधो बोधस्योपरतिः फलम् ।
स्वानंदानुभवाच्छांतिरेषैवोपरतेः फलम् ॥ ४२१ ॥
वैराग्याचे फळ ज्ञान आहे. ज्ञानाचे फळ उपरती आहे. आल्याच्या (स्व) आनंदाच्या अनुभवाने (मनाला) शांती हेच उपरतीचे फळ आहे.


या श्लोकातील कार्यकारणभाव हा वाच्यार्थाने घ्यावयाचा नाही, तर वैराग्यानंतर उपरती येते. उपरतीनंतर आल्यावर लक्ष केंद्रित केले गेले तर मग आत्मानंदाचा आस्वाद चाखावयास मिळतो.


(४२२)

यद्युत्तरोत्तराभावः पूर्वं पूर्वं तु निष्फलम् ।
निवृत्तिः परमा तृप्तिरानंदोऽनुपमः स्वतः ॥ ४२२ ॥
(मागील श्लोक ४२१ मध्ये सांगितलेल्या गोष्टींत) जर प्रत्येक नंतरची/उत्तर गोष्ट होत नसेल, तर प्रत्येक पूर्वीची गोष्ट ही निष्फळ ठरते. निवृत्ती हीच श्रेष्ठ तृप्ती आहे. आनंद हा स्वतःच उपमा-रहित आहे.


म्हणजे असे - जर शांती मिळत नसेल तर उपरती फुकट आहे. जर उपरती नसेल तर ज्ञान व्यर्थ आहे; आणि जर ज्ञान होत नसेल तर वैराग्य निष्फळ आहे. आत्म्याचा आनंद हा मात्र स्वयं-सिद्ध आहे.


(४२३)

दृष्ट-दुःखेष्वनुद्वेगो विद्यायाः प्रस्तुतं फलम् ।
यत् कृतं भ्रांति-वेलायां नानाकर्म जुगुप्सितम् ।
पश्चान्नरो विवेकेन तत् कथं कर्तुमर्हति ॥ ४२३ ॥
(या जगात) दिसणाऱ्या प्राप्त होणाऱ्या दुःखांमुळे उद्वेग न मानणे हे (आत्म-) विद्येचे फळ आहे. भ्रांतिकाळी जे नानाप्रकारचे निंद्य कर्म (माणसाने) केले, ते कर्म तो (भ्रांती दर झाल्यावर) विवेकाने कसे बरे करेल ?


आत्मज्ञान झाले की या जगात अनुभवास येणाऱ्या दुःखांमुळे उद्वेग वाटत नाही. कारण आत्मज्ञानी हा सुख-दुःखांना सम मानणारा होतो.

जगाला खरे मानणे ही भ्रांती आहे. ही भ्रांती असताना माणसाने दुष्कर्मे केली, त्यांचे फळ या स्वरूपात दुःख प्राप्त होते. पण पुढे विवेकाने भ्रांती संपली, मग तो माणूस जाणूनबुजून बाईट कर्मे करील काय ? म्हणजे असे -- भ्रांतीकाळात वाईट कांनी प्राप्त झालेल्या दुःखांचा उद्वेग जीवन्मुक्त मानीत नाही. ज्ञानोत्तरकाळी तो कर्मात गुंततच नाही. तो आत्मानंदात असतो.


(४२४)

विद्या-फलं स्यादसतो निवृत्तिः प्रवृत्तिरज्ञान-फलं तदीक्षितम् ।
तज्ज्ञाज्ञयोर्यन्मृगतृष्णिकादी नो चेद् विदां दृष्ट-फलं किमस्मात् ॥ ४२४ ॥
जाणता माणूस (तज्ज्ञ) (फळाच्या उद्देशाने) मृगजळ इत्यादी वस्तूंकडे लक्ष देत नाही पण अज्ञ मनुष्य (मृगतृष्णका इत्यादीकडे लक्ष देतो.) (यावरून) असत/मिथ्या वस्तूंपासून निवृत्ती हे (आत्म-) विद्येचे फळ आहे आणि (मिथ्या वस्तूंकडे) प्रवृत्ती होणे हे अज्ञानाचे फळ आहे, असे दिसून येते. असे जर नसेल (नो चेत्) तर (आत्म-) ज्ञानी माणसांना या(आत्मज्ञाना)पासून (अस्मात्) कोणते इष्ट फळ मिळते (असे आपण समजू शकू) ?


असत्/मिथ्या पदार्थापासून निवृत्ती हे आत्मविद्येचे फळ आहे त्यांकडे प्रवृत्ती हे अज्ञानाचे फळ आहे. असे जर नसेल तर आत्मज्ञानी माणसांना ज्ञानाने कोणते बरे दृष्ट फळ मिळते असे समजावयाचे ?


(४२५)

अज्ञानहृदयग्रंथेविनाशो यद्यशेषतः ।
अनिच्छोर्विषयः किंतु प्रवृत्तेः कारणं स्वतः ॥ ४२५ ॥
जर संपूर्णपणे हृदयातील अज्ञान ग्रंथीचा नाश झाला तर, इच्छा नसणाऱ्या पुरुषाची (आपल्याकडे - विषयाकडे) प्रवृत्ती करून घेण्याचे कारण विषय हाच होईल काय ?


अज्ञानामुळे माणूस विषयांकडे प्रवृत्त होतो. ज्ञानाने विषयेच्छा संपून जाते. अशा स्थितीत विषयाची इच्छा न करणाऱ्या माणसाची विषयाकडे प्रवृत्ती करण्यास तो विषयच कारण होईल काय ? उत्तर : नाही.


GO TOP