|
शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’(२६)
शास्त्रस्य गुरु-वाक्यस्य सत्य-बुद्ध्यवधारणम् ।
सा श्रद्धा कथिता सद्भिर्यया वस्तूपलभ्यते ॥ २६ ॥
शास्त्रवाक्ये आणि गुरूची वाक्ये ही सत्य आहेत असा बुद्धीचा जो निश्चय त्याला सज्जन लोकांनी श्रद्धा असे म्हटले आहे, जिच्या योगे या आत्मवस्तूची उपलब्धी होते.
बुद्धी ही निश्चय करणारी आहे. बुद्धीची एक निश्चयात्मक वृत्ती-श्रद्धा आहे. येथे शास्त्र म्हणजे केवलाद्वैत वेदांत शास्त्र; ते जाणणारा आणि आत्मसाक्षात्कारी असा गुरू असतो. गुरू तो की जो ज्ञान देऊन अज्ञान दूर करतो. शास्त्र आणि गुरू जे सांगतात ते संपूर्णपणे सत्य आहे, असा जो बुद्धीचा दृढ निश्चय, त्याला श्रद्धा म्हणतात. शास्त्र आणि गुरू खोटे सांगतात अशी शंकासुद्धा येता कामा नये. श्रद्धा नसेल तर माणूस शास्त्र आणि गुरू सांगतात त्याप्रमाणे वागणार नाही; मग त्याला इष्ट गोष्ट प्राप्त होणार नाही. येथे हे लक्षात घ्यावे की, लौकिक व्यवहारातसुद्धा श्रद्धा ही आवश्यक असते. भगवद्गीतेने म्हटल्याप्रमाणे, योग्य त्या गोष्टी केल्यावर "श्रद्धावान् लभते ज्ञानम् ।" शास्त्र व गुरू यांच्या द्वारा ब्रह्माचे शाब्दिक ज्ञान होते. त्याची परिणती ब्रह्मसाक्षात्कारात व्हावयास हवी. तरच आत्मवस्तू ची प्राप्ती होते. येथे हे लक्षात ठेवावे - श्रद्धा हे आत्मसाक्षात्काराचे साक्षात् साधन नाही, पण ती अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणून श्रद्धेने आत्मवस्तूची प्राप्ती होते असे येथे म्हटले आहे. येथे वस्तु- शब्दाने आत्मा/ब्रह्म अपेक्षित आहे. (२७)
सर्वदा स्थापनं बुद्धेः शुद्धे ब्रह्मणि सर्वदा ।
तत् समाधानमित्युक्तं न तु चित्तस्य लालनम् ॥ २७ ॥
शुद्ध ब्रह्माचे ठिकाणी सदा सर्वदा बुद्धी/मन ठेवणे यालाच समाधान असे म्हटलेले आहे. चित्ताचे/मनाचे कोडकौतुक म्हणजे समाधान नव्हे.
समाधान हा शब्द म्हणजे सम्+आ+धा या धातूपासून साधलेले नाम आहे. त्याचा व्युत्प्यत्यर्थ "व्यवस्थित ठेवणे, स्थापन करणे" असा आहे. ब्रह्माचे ठिकाणी मनाची स्थापना म्हणजे समाधान आहे. जग, शरीर आणि अंतःकरण यांतील कोणताही मळ ब्रह्मात नसल्याने ते शुद्ध आहे. शुद्ध ब्रह्माचे ठिकाणी बुद्धी/मन ठेवणे म्हणजे ब्रह्माचे विचार सातत्याने मनात घोळत ठेवणे. चित्ताचे/मनाचे कोडकौतुक केले म्हणजे मन सांगेल तसे वागले तर काही काळ मनाला बरे वाटते, समाधान वाटते. पण हे समाधान क्षणिक असते. म्हणून येथे अपेक्षित नाही. तर शास्त्र आणि गुरू यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मविषयक चिंतन मनात करणे म्हणजे समाधान आहे. (२८)
अहंकारादि-देहांतान् बंधानज्ञान-कल्पितान् ।
स्व-स्व-रूपावबोधेन मोक्तुमिच्छा मुमुक्षुता ॥ २८ ॥
अहंकारापासून ते देहापर्यंत जे अज्ञानाने कल्पिलेले बंध आहेत, त्यातून सुटून, स्वतःच्या (स्व) खऱ्या स्वरूपाचे (स्वरूप) ज्ञान करून घेऊन, त्या बंधातून सुटण्याची इच्छा म्हणजे मुमुक्षता आहे.
अहंकार, बुद्धी, देह, इंद्रिये ही जीवाची सामग्री आहे. तिच्या योगाने तो आसक्ती बाळगून कर्मे करतो. त्या कर्माअंती त्याला पुनःपुनः जन्ममरण येते. पुनःपुनः येणारे जन्ममरण म्हणजे संसार आहे. म्हणून अहंकार इत्यादी बंध आहे असे म्हटले आहे. या जन्ममरणाच्या म्हणजेच संसाराच्या बंधनातून सुटण्याची इच्छा म्हणजे मुमुक्षुता, मुमुक्षुत्व अथवा मुमुक्षा होय. अहंकार, देह इत्यादी सर्व बंधन अज्ञानाने कल्पिलेले आहेत. हे अज्ञान म्हणजे जीवाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान नसणे. ते ज्ञान झाले की अज्ञान नष्ट होऊन माणूस अज्ञान-निर्मित बंधनातून सुटतो. जीवाचे मूळ स्वरूप आत्मा अथवा ब्रह्म आहे (जीवो ब्रह्मैव नापरः । ) तेव्हा स्वतःच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घेऊन, अज्ञान-जन्य बंधनातून सुटण्याची इच्छा म्हणजे मुमुक्षा आहे. येथे बंध हा अज्ञान-कल्पित आहे असे म्हटले आहे. पुढेही 'अविद्याकल्पितात् देहबंधात् ' (श्लोक ४८) "अज्ञानयोगात् अनात्म-बंधः" (श्लोक ४९), आणि "अविद्येमुळे हे जग निर्माण होते" (श्लोक ११०) असे म्हटले आहे. केवलाद्वैतमतानुसार अज्ञानामुळे/अविद्येमुळे विश्व निर्माण होते, आणि अज्ञानाने देह इत्यादींचा बंध येतो, असे मानलेले आहे. ब्रह्माला अविद्या ही उपाधी आली की, अज्ञानाच्या विक्षेपशक्तीमुळे ब्रह्मावर विश्व भासू लागते. (याचा सविस्तर खुलासा प्रस्तावनेतील 'अध्यारोप' या शीर्षकाखाली केला आहे.) (२९) ही मुमुक्षा तीव्र असेल तर शिष्य गुरूच्या आदेशानुसार वागून, स्वतःचे स्वरूप जाणून मुक्त होऊन जातो.
मंद-मध्यम-रूपाणि वैराग्येण शमादिना ।
प्रसादेन गुलेः सेयं प्रवृद्धा सूयते फलम् ॥ २९ ॥
ती ही मुमुक्षता मंद, नंतर मध्यम, अशी असली तरी, ती वैराग्य आणि शम इत्यादी गुणांनी तसेच गुरूच्या कृपा-प्रसादाने वाढत जाते आणि मग ती इष्ट फल निर्माण करते.
परमार्थात गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. तिचा उल्लेख येथे आहे. मंद, मध्य असणारी मुमुक्षा वाढत जाऊन तीव्र होते आणि ती इष्ट फळ म्हणजे मोक्ष देते. वैराग्य आणि तीव्र मुमुक्षा हे अत्यावश्यक आहेत. (३०)
वैराग्यं च मुमुक्षुत्वं तीव्रं यस्य तु विद्यते ।
तस्मिनेवार्थवंतः स्युः फलवंतः शमादयः ॥ ३० ॥
ज्या साधकाची मुमुक्षा आणि वैराग्य तीव्र आहेत, त्याच्या बाबतीतच शम इत्यादी गुण सार्थ होतात आणि मोक्ष हे फळ देणारे होतात.
तीव्र वैराग्य आणि मुमुक्षा ही दोन साधने शम इत्यादीपेक्षा अधिक चांगली आहेत असे येथे सुचवावयाचे आहे. हाच भाग वेगळ्या शब्दांत असा सांगितला आहे. (३१)
एतर्योमंदता यत्र विरक्तत्व-मुमुक्षयोः ।
मरौ सलिलवत् तत्र शमादेर्भानमात्रता ॥ ३१ ॥
जेथे (ज्या साधकाच्या ठिकाणी) वैराग्य आणि मुमुक्षा हे मंद आहेत, तेथे (= त्या साधकाचे ठायी) वाळंवटावर ज्याप्रमाणे पाणी भासते, त्याप्रमाणे शमादि गुण हे केवळ भासमान असतात.
साधकाचे ठिकाणी वैराग्य आणि मुमुक्षा हे नावालाच असतील तर त्याचे शमादि गुण वरवरचे ठरून ते निरुपयोगी होतात. (३२) केवळ साधन-चतुष्टय असून कार्यभाग होत नाही, तर निदिध्यास हे खरे मोक्षाचे कारण आहे.
मोक्ष-कारण-सामग्र्यां भक्तिरेव गरीयसी ।
स्व-स्वरूपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयते ॥ ३२ ॥
मोक्ष प्राप्तीच्या कारण-सामग्रीमध्ये भक्ती हीच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचे अनुसंधान आहे असे सांगितले जाते.
साधनचतुष्टय अंगी बाणल्यावर शिष्य गुरूकडे गेला आहे. गुरूने त्याला श्रवण-मनन-निदिध्यासन हा मोक्षप्राप्तीचा उपाय सांगितला आहे. या तिन्हींमध्ये स्वस्वरूपाचे म्हणजे आत्माचे/ब्रह्माचे निदिध्यासन हेच जास्त महत्त्वाचे आहे. आत्मस्वरूपाचा निदिध्यास लागला तरच तो ब्रह्म होतो. स्वतःच्या स्वरूपाचे अनुसंधान म्हणजे भक्ती आहे. यावरून द्वैताधिष्ठित भक्ती अभिप्रेत नाही हे अगदी उघड होते. (३३अ)
स्वात्म-तत्त्वानुसंधानं भक्तिरित्यपरे जगुः ॥ ३३अ ॥
स्वतःच्या आत्मतत्त्वाचे अनुसंधान म्हणजे भक्ती हे शब्द दुसरे काही जण वापरतात.
स्वस्वरूपानुसंधान म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचे अनुसंधान. आता आत्मा हे सत्यतत्त्व हेच साधकाचे खरे स्वरूप आहे. म्हणून स्वतःचे खरे स्वरूप जे आत्मा, त्याचे अनुसंधान म्हणजे भक्ती असे काही जण म्हणतात. स्व-स्वरूपानुसंधान आणि स्वात्मतत्त्वानुसंधान हे शब्द भिन्न आहेत पण दोहोंचा अर्थ मात्र एकच आहे. (३३ब -३४/अ) आत्मानुसंधानाचे वर्म कळून घेण्यास साधकाने गुरूकडे जाणे आवश्यक आहे, असे पुढील श्लोक सांगतो.
उक्त-साधन-संपन्नस्तत्त्वजिज्ञासुरात्मनः ।
उपसीदेद् गुरु प्राज्ञं यस्माद् बंध-विमोक्षपम् ॥ ३३ब -३४/अ ॥
वर सांगितलेल्या साधनांनी जो संपन्न आहे आणि ज्याला आत्म्याचे खरे स्वरूप जाणून घेण्याची इच्छा आहे अशा साधकाने शहाण्या गुरूकडे जावयास हवे; त्यामुळे संसार-बंधनातून त्याची सुटका होईल.
आत्म्याचे खरे स्वरूप जाणून घेण्यास आणि आत्मप्राप्तीचे अनुसंधान शिकण्यास साधकाला तज्ज्ञ गुरूकडे जाणे आवश्यक आहे. तेवढ्याने भागत नाही; तर गुरू जे उपाय सांगतील ते त्याने केले तरच तो संसाराच्या बंधनातून मुक्त होईल. (३४ब-३५) ज्या गुरूकडे साधकाने जावयाचे आहे तो गुरू कसा हवा ते आता यापुढे सांगितले आहे.
श्रोत्रियोऽवृजिनोऽकाम-हतो यो ब्रह्मवित्तमः ॥ ३४ब ॥
ब्रह्मण्युपरतः शांतो निरिंधन इवानलः । अहेतुक-दया-सिंधुर्बंधुरानमतां सताम् ॥ ३५ ॥
तो गुरु श्रोत्रिय, सरळ मनाचा, इच्छारहित, ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ, ब्रह्मात लय पावलेला, सर्पणरहित अग्नीप्रमाणे शांत, काही कारण नसताना दयेचा सागर असणारा, आणि आपणास नमन करणाऱ्या सज्जन साधकांचा बांधव म्हणजे हितचिंतक असावा.
आत्मज्ञान काही वाटेवर पडलेले नाही. ते येऱ्यागबाळ्याकडून मिळेल असेही नाही. म्हणून आत्मज्ञानी/ब्रह्मज्ञानी गुरू निवडावयास हवा. तो पुढीलप्रमाणे असावा :- तो श्रोत्रिय म्हणजे वेदविद्यापारंगत हवा. वेदाचे ज्ञान त्याला (या जन्मी अथवा पूर्वजन्मी) झालेले असावे. हा गुरू ढोंगी असता कामा नये. "मला ब्रह्मज्ञान आहे" असे ढोंग करून इतरांना फसविणारा नसावा. तो ब्रह्मवित्तम म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारी हवा. जरी गुरू हा देहधारी आहे; तरी तो देहातून अलिप्त असतो आणि त्याचा अंतरात्मा ब्रह्मरूप झालेला असतो. साहजिकच आता त्याला काहीतरी मिळावयाचे राहिलेले नाही. म्हणून तो शिष्याकडून कशाचीही अपेक्षा करीत नाही. सर्पण संपले की अग्नी शांत होतो. त्याप्रमाणे मनाला जाळणारे काम, क्रोध इत्यादी विकार दूर झाले असल्याने गुरू हा शांत, समाधानी असतो. या जगात माणसे कारणपरत्वे इतरांना दया दाखवितात, इतरांवर उपकार करतात. गुरू शिष्याला दया दाखवितो याला काही कारण नसते. शिष्याचे हित व्हावे या इच्छेने तो दयावान् होतो. नम्रपणाने जे शिष्य त्याच्या जवळ येतात त्यांचे हित व्हावे इतकीच त्याची इच्छा असते. हे शिष्य मात्र चांगले - सत् - म्हणजे साधनचतुष्टयाने संपन्न हवेत. (३६) गुरूकडून कसे ज्ञान मिळवावे हे आता सांगितले आहे.
तमाराध्य गुरुं भक्त्या प्रह्व-प्रश्रय-सेवनैः ।
प्रसन्नं तमनुप्राप्य पृच्छेज्ज्ञातव्यमात्मनः ॥ ३६ ॥
अशा त्या गुरूकडे जाऊन, भक्ती, नम्रता, प्रेम आणि सेवा यांचे द्वारा त्याची अराधना करून आणि त्याला प्रसन्न करून, मग त्याला आपल्याला जे जाणून घ्यावयाचे आहे ते (मुमुक्षू शिष्याने) विचारावे.
गायनाचार्य ज्याप्रमाणे खूष झाल्यावर आपल्या शिष्याला गाणे शिकवतो त्याप्रमाणे खूष झालेला गुरू शिष्याला विनामूल्य आपले ज्ञान देतो. आदरयुक्त भक्ती, विनय/नम्रता, प्रेम आणि सेवा यांच्याद्वारे गुरूची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्यावयास हवे. उर्मटपणा, मस्ती इत्यादी दाखविल्यास तो प्रसन्न होणार नाही. गुरू प्रसन्न झाल्यावर शिष्याने त्याला प्रश्न केल्यावर गुरू इष्ट ज्ञान देईल. "नापृष्टं कस्यचिद् ब्रूयात् । " असे थोरांचे वागणे असते. भगवद्गीताही सांगते, "तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । " (३७) यापुढे ३७-४२ या श्लोकांत शिष्याने गुरूशी काय आणि कसे बोलावे हे सांगितले आहे.
स्वामिन् नमस्ते नत-लोक-बंधो कारुण्य-सिंधो पति भवाब्धौ ।
समुद्धरात्मीय-कटाक्ष-दृष्ट्या ऋज्व्याति-कारुण्य-सुधाभिवृष्ट्या ॥ ३७ ॥
हे स्वामिन् (गुरो), हे नम्र लोकांचे हित करणाऱ्या, हे करुणा-सागरा, मी संसाररूपी सागरात पडलो आहे. (आणि बुडत आहे). तेव्हा मजवर दया करून आपण आपल्या सरळ आणि अतिशय-कारुण्यरूपी अमृताची वृष्टी करणाऱ्या दृष्टीच्या कटाक्षाने माझा संसार सागरातून उद्धार करा.
येथे संसारावर सागराचे रूपक आहे आणि कारुण्यावर अमृताचे रूपक आहे. गुरूच्या केवळ कृपाकटाक्षाने शिष्य संसारातून उद्धरून जाईल. इतकी गुरुकृपा प्रभावी आहे. (३८)
दुर्वार-संसार-दवाग्नि-तप्तं दोधूयमान दुरदृष्ट-वातैः ।
भीत प्रपन्नं परिपाहि मृत्योः शरण्यमन्यद् यद हं न जाते ॥ ३८ ॥
दूर करण्यास कठीण अशा संसाररूपी वणव्याने पोळलेल्या/भाजलेल्या आणि दुष्ट अशा पूर्वसंचित (अदृष्ट) कर्मरूपी वादळी वाऱ्यांनी इकडेतिकडे उडवल्या जाणाऱ्या आणि म्हणून भ्यालेल्या आणि आपणास शरण आलेल्या अशा माझे, हे गुरो, तुम्ही मृत्यूपासून रक्षण करा. कारण तुमच्याखेरीज रक्षण करणारा दुसरा कोणी मला माहीत नाही.
येथे संसारावर वणव्याचे रूपक आहे आणि पूर्वसंचित कर्मांवर बेफाम अशा वादळी वाऱ्याचे रूपक आहे. संसार म्हणजे जन्ममरणाचे चक्र. गुरूने मृत्यूतून वाचवावे म्हणजेच जन्ममरणाच्या चक्रातून सोडवावे. (३९) "मी तुझे रक्षण का करावे" असा गुरूचा प्रश्न अध्याहृत घेऊन, शिष्य गुरूसारख्या मोठ्या माणसांचे उदाहरण देतो.
शांता महांतो निवसंति संतो वसंतवल्लोक-हितं चरंतः ।
तीर्णाः स्वयं भीम-भवार्णवं जनानहेतुनान्यानपि तारयंतः ॥ ३९ ॥
वसंतऋतू प्रमाणे लोकांचे हित करणारे, स्वतः भयंकर संसार-सागर तरून गेलेले, शांत, महान् साधु असे; तसेच कोणत्याही कारणाशिवाय इतर लोकांना संसार-सागरातून तारणारे लोक या जगात राहतात.
वसंत ऋतूमध्ये वृक्षांना पाने, फुले, फळे येतात; त्यामुळे लोकांचे हित होते. पण वसंताला मात्र लोकांकडून कसलीही अपेक्षा असत नाही. वसंतऋतू प्रमाणे अकारणच लोकांचे हित करणारे महान् संत या जगात आहेत. ते स्वतःच संसारसागर तरून गेले असल्यामुळे ते इतरांना तरण्याचा उपाय सांगू शकतात. तसे करताना त्यांची कोणतीच अपेक्षा असत नाही. अशा संत लोकांतच गुरूचा समावेश होतो. (४०)
अयं स्वभावः स्वतः एव यत् पर-श्रमापनोद-प्रवणं महात्मनाम् ।
सुधांशुरेष स्वयमर्क-कर्कश-प्रभा-भितप्तामवति क्षिति किल ॥ ४० ॥
दुसऱ्यांचे श्रम दूर करण्यात स्वतःच तत्पर असणे हा महात्म्यांचा स्वतःसिद्धच स्वभाव असतो. जसे सूर्याच्या कडक उन्हाने तापलेल्या पृथ्वीचे हा चंद्र स्वतःहूनच रक्षण करतो (म्हणजे तिला थंडगार करतो). (४१)
ब्रह्मानंद-रसानुभूति-कलितैः पूतैः सुशीतैर्युतै -
र्युष्मद्-वाक्-कलशोज्झितैः श्रुति-सुखैर्वाक्यामृतैः सेचय । संतप्तं भव-ताप-दाव-दहन-ज्वालाभिरेनं प्रभो धन्यास्ते भवदीक्षण - गतेः पात्रीकृताः स्वीकृताः ॥ ४१ ॥
हे प्रभो (गुरो), ब्रह्मानंद रसाच्या अनुभवाने युक्त, पवित्र, अतिशय शीतल, तर्कयुक्त (युतैः) अशा तुमच्या वाणीरूपी कलशातून बाहेर टाकलेल्या, कानाला श्रुति) सुखकारक असणाऱ्या, अशा वाक्यरूपी अमृतांनी आपण संसार - तापरूपी वणव्याचा ज्वाळांनी संतप्त झालेल्या अशा या माझ्यावर सिंचन करा. जे लोक तुमच्या कृपाकटाक्षाच्या टप्प्यांत येऊन पात्र/योग्य झाले ते धन्य आहेत.
येथे गुरूच्या वाणीवर कलशाचे रूपक आहे, गुरूच्या वाक्यावर अमृताचे रूपक आहे आणि संसारतापावर वणव्याच्या ज्वालांचे रूपक आहे. संसारात आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक असे त्रिविध ताप आहेत. त्यांनी तप्त झालेला शिष्य गुरूच्या वचनरूपी अमृताच्या सिंचनाने शीतल होईल. कारण अमृत हे शीतल आहे. (४२)
कथं तरेयं भव-सिंधुमेतं का वा गतिर्मे कतमोऽस्त्युपायः ।
जाने न किंचित् कृपयाव मां प्रभो संसार-दुःख-क्षतिमातनुष्व ॥ ४२ ॥
हे प्रभो (गुरू), या भवसागरातून मी कसा बरे तरेन ? नाहीतर माझी गत काय होईल ? संसारसागर तरून जाण्याचा कोणता उपाय आहे ? यातील काहीच मला माहीत नाही. तेव्हा कृपा करून माझे रक्षण करा. माझ्या संसारातील दुःखांचा नाश करा. (४३) श्लोक ४२ पर्यंत शिष्याचे वचन आहे. आता गुरू बोलू लागतो -
तथा वदतं शरणागतं स्वं संसार-दावानल-ताप-तप्तम् ।
निरीक्ष्य कारुण्य-रसार्द्र-दृष्ट्या दद्यादभीतिं सहसा महात्मा ॥ ४३ ॥
अशाप्रकारे बोलणाऱ्या आणि आपणास (स्वं) शरण आलेल्या आणि संसाररूपी वणव्याच्या उष्णतेने होरपळलेल्या शिष्याकडे कारुण्यरसाने आर्द्र झालेल्या दृष्टीने पाहून महात्मा गुरूने त्याला लगेच अभय दिले.
येथे 'दद्यात्' हे विध्यर्थाचे रूप असले तरी अर्थ मात्र भूतकाळाप्रमाणे करावयास हवा. (४४)
विद्वान् स तस्मा उपसत्तिमीयुषे मुमुक्षवे साधु यथोक्त-कारिणे ।
प्रशांत-चित्ताय शमान्विताय तत्त्वोपदेशं कृपयैव कुर्यात् ॥ ४४ ॥
शरण आलेल्या, मोक्षाची इच्छा करणाऱ्या, सांगितल्याप्रमाणे योग्य /चांगले ते करणाऱ्या, प्रशांत चित्त असणाऱ्या आणि शमाने युक्त असणाऱ्या अशा त्या शिष्याला विद्वान गुरूने कृपेअंती (लगोलग) तत्त्वोपदेश करण्यास प्रारंभ केला.
साधन-चतुष्टयाने युक्त असणाऱ्या मुमुक्षूला केवलाद्वैत वेदांताचा उपदेश करण्याची पद्धत होती (श्लोक १७ ). शिष्य तसा आहे. शिष्य शमान्वित आहे. हा शब्द त्याच्याजवळ नित्यानित्यवस्तुविवेक आणि वैराग्य आहे असे सुचवितो. तो मुमुक्षु आहे असे येथे म्हटलेच आहे. गुरूवर विश्वास ठेवून शिष्याने विनंती केली. तेव्हा तो सांगितलेले करेल असे गुरूला वाटते. अशाप्रकारे तो शिष्य तत्त्वोपदेश करण्यास पात्र होता. (४५) पुढील श्लोक ४५ पासून गुरूचे भाषण सुरू होते. प्रथम गुरू शिष्याला अभय देतो आणि संसार तरण्याचा उपाय सांगेन असे आश्वासन देतो.
मा भैष्ट विद्वंस्तव नास्त्यपायः संसार-सिंधोस्तरणेऽस्तुपायः ।
येनेव याता यतयोऽस्य पारं तमेव मार्गं तव निर्दिशामि ॥ ४५ ॥
अरे शहाण्या शिष्या, भिऊ नको. तुला संसारापासून अपाय नाही. कारण संसार-सागर तरून जाण्याचा उपाय आहे. त्या मार्गाने जाऊन संयमी पुरुष (पूर्वीच्या काळात) संसारसागराच्या पलीकडे गेले आहेत. तोच मार्ग मी आता तुला सांगेन. (४६) संसारसागर तरून जाण्याचा जो उपाय मी सांगणार आहे त्याचे आचरण तू केल्यास तू संसारसागर तर तरशीलच इतकेच नव्हे तर तुला परमानंदाची प्राप्ती होईल असे आश्वासन गुरू देतो.
अस्त्युपायो महान् कश्चित् संसार-भय-नाशनः ।
तेन तीर्त्वा भवांबोधिं परमानंदमाप्स्यसि ॥ ४६ ॥
अरे शिष्या संसार-भयाचे नाश करणारा एक अपूर्व (कश्चित) महान उपाय आहे. त्या उपायाच्या अंगीकाराने तू संसारसागर तर तरशीलच खेरीज तुला परम आनंद प्राप्त होईल.
गुरू सांगत असलेला संसारसागर तरण्याचा उपाय अपूर्व आणि महान् आहे कारणे अशी - या उपायाच्या अवलंबामुळे माणूस पुनः संसारात येत नाही, तो ब्रह्मरूप होऊन जातो आणि सुखदुःखांच्या पलीकडे असणारा ब्रह्माचा श्रेष्ठ आनंद त्याला प्राप्त होतो. (४७) (आत्म)-ज्ञान हा तो उपाय आहे.
वेदांतार्थ-विचारेण जायते ज्ञानमुत्तमम् ।
तेनात्यंतिक-संसार-दुःख-नाशो भवत्यनु ॥ ४७ ॥
(केवलाद्वैत) वेदांताने सांगितलेल्या (आत्मा/ब्रह्म या) वस्तूच्या विचाराने सर्वश्रेष्ठ ज्ञान उत्पन्न होते. (नंतर या शाब्दिक ज्ञानाची परिणती साक्षात्कारात झाल्यानंतर) ताबडतोब (अनु) संसारातील दुःखांचा कायमचा (आत्यंतिक) नाश होतो.
केवलाद्वैतमतानुसार ब्रह्माच्या अज्ञानाने संसार व संसारजन्य दुःख माणसाच्या मागे लागलेले आहे. या ब्रह्माचे ज्ञान झाले की अज्ञान संपते आणि संसार-दुःखाचा नाश होतो. हे ज्ञान कसे होते ? असे होते - ब्रह्म/आत्मा ही वस्तू केवलाद्वैत वेदांताने सांगितलेली आहे. या वस्तूच्या विचाराने ती वस्तू आहे असा निश्चय होतो (श्लोक ११, १३) म्हणून आत्मवस्तूविषयी विचार करावयास हवा. (श्लोक १५ ). गुरूच्या उपदेशानुसार आत्मवस्तूचा विचार केल्यानंतर आत्मवस्तूए शाब्दिक ज्ञान होते. त्यानंतर आत्मवस्तूच्या/ब्रह्मवस्तूच्या निदिध्यासाने जीवाला आत्मसाक्षात्कार होऊन तो आत्मरूप म्हणजेच परमानंदरूप होऊन जातो. मग त्याचा संसार संपतो. साहजिकच त्याचे संसारजन्य दुःख कायमचे संपून जाते. आत्मरूप/परमानंदरूप होणे हाच मोक्ष आहे. (४८) परमानंदरूप मोक्ष कुणाला मिळतो हे पुढील श्लोक सांगतो.
श्रद्धा-भक्ति-ध्यान-योगान्मुमुक्षो-र्मुक्तेर्हेतून् वक्ति साक्षाच्छ्रुतेर्गीः ।
यो वा एतेष्वेव तिष्ठत्यमुष्य मोक्षोऽविद्या-कल्पिताद् देहबंधात् ॥ ४८ ॥
श्रद्धा, भक्ती आणि ध्यान हे मुमुक्षूच्या मुक्तीने कारण आहेत, असे साक्षात् श्रुतीची वाणी सांगते आणि (वा) जो कोणी या उपायांचा अवलंब करतो (तिष्ठति) त्याची अविद्येने कल्पिलेल्या देहबंधातून सुटका होते.
येथे अभिप्रेत असणारे श्रुतीचे वचन असे आहे : ब्रह्मदेव आश्वलायनाला सांगतो, "तस्मै स होवाच पितामहश्च श्रद्धा-भक्ति-ध्यानयोगादवैहि "॥ (कैवल्य उपनिषद, २) या श्लोकात भक्ती, श्रद्धा व ध्यानयोग असे तीन उपाय सांगितलेले आहेत. पण ते तितकेसे बरोबर नाही. कारण श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त होऊन, ध्यानयोग आचरणाऱ्यालाब्रह्म कळते असे कैवल्य उपनिषदाला सांगावयाचे आहे. श्रद्धा म्हणजे वेदांत-वाक्यावर विश्वास. "श्रद्धत्व सौम्य" असे आणि एक उपनिषद सांगते. श्रद्धेशिवाय श्रुतिप्रणीत आणि गुरुप्रणीत आचार होणार नाही; म्हणून श्रद्धा आवश्यक आहे. भक्तीचे स्वरूप कैवल्य उपनिषदाने सांगितलेले नाही. पण प्रस्तुत ग्रंथात "स्व-स्वरूपानुसंधान" (श्लोक ३२) अथवा "स्वात्मतत्त्वानुसंधान" (श्लोक ३३) म्हणजे भक्ती असे सांगितलेले आहे. ध्यानयोगाचे स्वरूप कैवल्य उपनिषद असे सांगते - "उमा-सहायं परमेश्वरं प्रभु त्रिलोचनं नीलकंठ प्रशांतम् । ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनिं समस्त-साक्षिं तमसः परस्तात् ॥ (कैवल्य, ७) हा ध्यानयोग म्हणजे केवलाद्वैत वेदांताचा निदिध्यास आहे. हा ध्यानयोग अथवा निदिध्यास हाच मोक्षाचा साक्षात् हेतू आहे. निदिध्यास होण्यास श्रद्धा व भक्ती आवश्यक असल्याने त्यांना गौणपणाने मोक्षाचा हेतू म्हटले आहे. या तिहीचा वापर करणारा मुमुक्षू देहबंधातून सुटतो म्हणजेच जन्ममरणाच्या चक्रातून म्हणजेच संसारातून सुटतो. हा संसार-बंध अविद्या-कल्पित आहे म्हणजे अविद्येने अध्यारोपित आहे. (अध्यारोपासाठी प्रस्तावना पहा.) (४९) अज्ञानामुळे जीव, संसार या संकल्पना येतात. ब्रह्माचे ज्ञान होताच त्या दोहोंचा समूळ नाश होतो.
अज्ञान-योगात् परमाल्पनस्तव ह्यनात्म-बंधस्तत एव संसृतिः ।
तयोर्विवेकोदित-बोध-वह्निरज्ञान-कार्य प्रदहेत् समूलम् ॥ ४९ ॥
खरे म्हणजे हे शिष्या परमात्मा (= ब्रह्म) असणाऱ्या अशा तुझ्या अज्ञानाच्या संबंधामुळे (= उपाधीमुळे) अनात्म पदार्थांशी संग घडून बंध आला आहे, आणि त्यामुळेच तुझ्यामागे संसार लागला आहे. आत्मा आणि अनात्मा यांतील फरकाच्या विचाराने उत्पन्न होणारा ज्ञानरूपी अग्नी हा मुळासकट म्हणजे अज्ञानासकट अज्ञान-जन्य कार्याचा दाह/नाश करून टाकतो.
प्रस्तावनेत अध्यारोप सांगताना म्हटले होते की अज्ञानाच्या उपाधीने परमात्म्यावरच विश्व भासू लागते. त्यामध्ये देह इत्यादी अनात्म पदार्थांची उपाधी या स्वरूपात परमात्म्याचा संबंध आला की परमात्माच जीव मानला जातो. हा जीव देह, इंद्रिये इत्यादी अनात्म पदार्थांना मी म्हणजे आत्मा असे मानू लागतो. मग तो आसक्ती व अहंकार बाळगून कर्मे करतो आणि त्या कर्माअंती तो जन्ममरणाच्या चक्रात - संसारात सापडतो. तेव्हा ज्या अज्ञानामुळे हे सर्व घडले त्या अज्ञानाचा नाश होणे आवश्यक आहे. आत्मज्ञान झाले की विश्व या कार्यासह अज्ञानाचा उच्छेद होतो आणि मग जीवाला स्वतःच मूळचे परमात्मस्वरूप प्राप्त होते. तोच त्याचा मोक्ष आहे. (५०) गुरूच्या विधानावर शिष्य त्याला प्रश्न करू इच्छितो. तो म्हणतो -
कृपया श्रूयता स्वामिन् प्रश्नोऽयं क्रियते मया ।
यदुत्तरमहं श्रुवा कृतार्थः स्यां भवन्मुखात् ॥ ५० ॥
अहो स्वामी, कृपा करून ऐका. मी हा प्रश्न करीत आहे. त्याचे उत्तर आपल्या मुखातून ऐकल्यावर मी कृतार्थ होईन.
येथे 'कृतार्थ' होणे म्हणजे स्वस्वरूप होऊन जाणे आहे. 'प्रश्नोऽयं' यातील एकवचन हे बहुवचन सूचक आहे. कारण पुढील श्लोकात शिष्य एकापेक्षा अधिक प्रश्न विचारीत आहे. |