शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(१)
सर्व-वेदान्त-सिद्धान्त-गोचरं तमगोचरम् ।
गोविंद परमानंद सद्‌गुरु प्रणतोऽस्म्यहम् ॥ १ ॥
वेदान्ताच्या सर्व सिद्धान्तांना गोचर असणारा, परंतु इंद्रिये, अन्य शास्त्रे इत्यादींना गोचर नसणारा, श्रेष्ठ आनंद हे स्वरूप असणारा, असा जो माझा प्रसिद्ध सद्‌गुरु गोविंद, त्याच्यापुढे मी नम्र झालो आहे.


गोविंद नामक सद्‌गुरूपुढे नम्र होऊन आणि त्याला वंदन करून शंकराचार्यांनी येथे मंगल केले आहे. गोविंद ऊर्फ गोविंदयति हे शंकराचार्यांचे गुरू होते. ग्रंथारंभी मंगल केल्यामुळे ग्रंथ निर्विघ्नपणे तडीस जातो अशी पारंपरिक समजूत होती. तिला अनुसरून शंकराचार्यांनी येथे मंगल श्लोक दिला आहे.

परमार्थात सद्‌गुरू हा ब्रह्मरूप मानलेला आहे. ''गुरुः साक्षात् परं ब्रह्म''हे त्याचे खरे स्वरूप आहे, लौकिक शरीर हे त्याचे सत्य स्वरूप नव्हे. ब्रह्म हे सच्चित् आणि परमानंद स्वरूपाचे आहे. येथे ''परमानंद ''गुरू असे म्हणून सद्‌गुरू व ब्रह्म यांचे ऐक्य शंकराचार्यांनी दाखविले आहे.

गुरू म्हणजे अज्ञानरूपी अंधकार दूर करणारा प्रकाश. सद्‌गुरू म्हणजे सत् स्वरूप ब्रह्माचे दर्शन शिष्याला घडविणारा असा अर्थ आहे.

येथे गोविंद शब्दाने सगुण तसेच निर्गुण ब्रह्म सूचित होते. व्यावहारिकदृष्ट्या शंकराचार्यांना सगुण ब्रह्म/ईश्वर मान्य आहे. या ईश्वराचे उल्लेख या ग्रंथात पुढे येतात (श्लोक ३, २३५, ४४७, इत्यादी)

सद्‌गुरू हे सगुण-निर्गुण ब्रह्म हे अगोचर आहे. गोचर म्हणजे इंद्रियजन्य ज्ञानाच्या टप्प्यात येणारे, अगोचर म्हणजे तसे नसणारे. ब्रह्म हे सगुण असो अगर निर्गुण असो, ते इंद्रियांना कळणारे नाही. तरी सद्‌गुरू/ब्रह्म हे वेदांताच्या म्हणजे उपनिषदांच्या सिद्धांतांना गोचर आहे म्हणजे उपनिषदांतील सिद्धांतावरून ब्रह्म हे कळून येणारे आहे. येथे वेदान्त म्हणजे उपनिषद. उपनिषदे ही वेदाच्या अंत भागी येत असल्याने त्यांना वेदान्त म्हणतात. या उपनिषदांत अनेक ऋषी-मुनींनी ब्रह्माचे ज्ञान दिलेले आहे. उदा., 'ब्रह्म हे सत्य, ज्ञान, अनंत आहे', 'ब्रह्म सह्यिदानद आहे', 'ईश्वर हा जगत्कर्ता आहे', इत्यादी उपनिषदांतील वचनांवरून ब्रह्माचे शाब्दिक ज्ञान होते. वेदांताखेरीज इतर शास्त्रांवरून ब्रह्माचे ज्ञान होत नसल्याने ते त्यांना अगोचर आहे. तसेच प्रत्यक्ष, अनुमान इत्यादी ज्ञानाच्या लौकिक प्रमाणांनी ब्रह्म कळत नाही; त्यांनाही ते अगोचर आहे.

या मंगल श्लोकात 'विवेकचूडामणि' या ग्रंथाचे तसेच केवलाद्वैत वेदांताचे चार अनुबंध सुचविले आहेत असे काहीजण म्हणतात. अनुबंध म्हणजे एखाद्या शास्त्राचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आवश्यक मानले गेलेले चार घटक पुढील प्रमाणे :

(१) अधिकारी : त्या त्या शास्त्राचा अभ्यास करण्याची पात्रता असणारा जिज्ञासू, (२) विषय : त्या शास्त्राचा विषय, (३) संबंध : शास्त्राचा विषय आणि ग्रंथ यात संबंध असणे. उदा. शरीर हा शरीरशास्त्राचा विषय; पृथ्वी हा शरीरशास्त्राचा विषय नव्हे, (४) प्रयोजन : त्या शास्त्राच्या अध्ययनाने प्राप्त होणारे फळ. या श्लोकात 'प्रणत पुरुष' हा अधिकारी मानावयास हवा, 'सद्‌गुरू परमानंद आहे' या वाक्यावरून जीव-ब्रह्मैक्य हा विषय सूचित होतो (श्लोक ५८ पहा ). 'परमानंद प्राप्ती' हे प्रयोजन आहे (श्लोक ४६). विषयाचे प्रतिपादन करणारा विवेकचूडामणि हा ग्रंथ असल्याने, 'प्रतिपाद्य-प्रतिपादक' असा संबंध येथे आहे. हे चारही अनुबंध या मंगल श्लोकात आहेत हे दाखविण्यासाठी शब्दार्थांची ओढाताण करावी लागते हे मात्र खरे.


(२)
या जगात मानव म्हणून जन्म घेणे हे अवघड आहे. त्यातील अवघड गोष्टी केवळ पूर्व-पुण्याईनेच प्राप्त होतात असे पुढील श्लोक सांगतो.

जंतूनां नर-जन्म दुर्लभमतः पुस्त्वं ततो विप्रता
तस्माद् वैदिक-धर्म-मार्ग-परता विद्‌द्वत्त्वमस्मात् परम् ।
आत्मानात्म-विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थिति-
र्मुक्तिर्नो शत-जन्म-कोटि-सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते ॥ २ ॥
प्राण्यांच्या बाबतीत मनुष्य-जन्म मिळणे हे दुर्लभ आहे. त्याच्यापेक्षा पुरुष म्हणून जन्म घेणे हे अधिक दुर्लभ आहे. त्याच्यापेक्षा विप्र म्हणून जन्म हा दुर्लभ आहे. त्याहीपेक्षा वेदांनी सांगितलेल्या धर्ममार्गात तत्परता /आवड ही दुर्लभ आहे; त्याच्यापेक्षा विद्वत्ता असणे हे आणखी दुर्लभ आहे. या दुर्लभ गोष्टींचा सदुपयोग करून आत्मा आणि अनात्मा यांतील फरक जाणणे, नंतर आत्म्याचा स्वतः चांगला अनुभव घेणे, त्यानंतर ब्रह्मस्वरूपात म्हणजेच आत्मस्वरूपात मिसळून राहणे म्हणजेच मुक्ती, या गोष्टी दुर्लभ आहेत. शेकडो कोटी जन्मात केलेल्या पुण्याशिवाय मुक्ती मिळत नाही.


या श्लोकात सांगितलेल्या दुर्लभ गोष्टी अशा आहेत : - (१) मनुष्य म्हणून जन्म घेणे अवघड आहे. पूर्व कर्मांनुसार प्राणी ८४ लक्ष योनीत जन्माला येत असतो. पुढे ''एकेका योनि कोटि कोटि फेरा । नरदेहाचा वारा मग लागे ॥'' या वचनावरून माणूस म्हणून जन्म मिळणे किती अवघड आहे हे लक्षात येते. मनुष्य जन्मातच मोक्ष मिळू शकतो; मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. हा मनुष्यजन्म मिळणे कठीण आहे. (२) माणूस हा पुरुष, स्त्री, नपुंसक म्हणून जन्मास येऊ शकतो. त्यामध्ये पुरुष म्हणून जन्म मिळणे हे अवघड आहे. पुरुषजन्माला इतके महत्त्व का ? उत्तर असे दिसते. पुरुषाचे ठिकाणी धैर्य आणि स्थैर्य हे गुण प्रामुख्याने दिसतात. हे गुण मोक्षप्राप्तीस उपयोगी पडतात. म्हणून पुरुषजन्माला महत्च दिले गेले. आणखी असे दिसते की, मोक्षशास्त्र लिहिणारे बहुतेक सर्व पुरुष होते. साहजिकच त्यांनी पुरुषजन्माला महत्त्व दिले. मग प्रश्न असा की, स्त्रिया आणि नपुंसक हे मोक्षाला अधिकारी नाहीत काय ? उत्तर आहे की, ते अधिकारी आहेत. तथापि, पुरुषांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण नगण्य म्हणण्याइतके कमी आहे. साहजिकच त्यांचा स्वतंत्र निर्देश केलेला दिसत नाही. (३) विप्र म्हणून पुरुष जन्म घेणे हे अवघड आहे. शंकराचार्य हे भारतीय होते. म्हणून त्यांनी भारतीय कल्पनेनुसार विष्णू, वेद, धर्म इत्यादींचा निर्देश केला आहे. एकेकाळी भारतात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण होते. त्यातील पहिल्या तीहींना विप्र म्हणत. शूद्र, चांडाळ इत्यादीपेक्षा विप्रत्व चांगले. प्राचीन भारतात वर्णव्यवस्था धर्मशास्त्रानुसार होती. धर्मशास्त्रांना वेद हे प्रमाण होते. वेदांना अनुसरून असणाऱ्या धर्मशास्त्रांनी चार वर्ण आणि चार आश्रम यांची कर्तव्ये सांगितली होती. विप्र म्हणून जन्म आला तरी वेदानुसार धर्माचरण करणे हे महत्त्वाचे होते. येथे प्रश्न असा - त्रैवर्णिकाखेरीज समाजातील इतर लोक मोक्षाधिकारी नव्हते काय ? याचे उत्तर असे - केवलाद्वैत वेदांतानुसार जो कोणी साधन-चतुष्टय-संपन्न आहे तो मोक्षाचा अधिकारी आहे. तेव्हा इतर लोकांनी पूर्वजन्मी वेदाचा अभ्यास व आचरण केले असले तरी चालते. या संदर्भात 'वेदांतसार ' हा ग्रंथ सांगतो - 'अधिकारी तु विधिवद् अधीत-वेद-वेदांगत्वेन आपाततः अधिगत-अखिलवेदार्थः अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा । ' आणखी असे - स्त्रियांप्रमाणेच शूद्र इत्यादी तुरळकपणेच मोक्ष मिळविणारे होते असे दिसून येते. तसेच मोक्षशास्त्रावर लिहिणारे बहुतेकजण त्रैवर्णिक असल्याने त्यांनी इतरांकडे दुर्लक्ष केले असावे. आणखी असे - विप्रत्व हा शब्द सत्त्वगुण सुचवितो असे म्हटले तर शूद्र इत्यादी सात्त्विक स्वभावाचे असतील तर ते मोक्षाधिकारी होऊ शकतात. (४) पहिल्या तीन वर्णांतील सर्वचजण वेदाचे अध्ययन करीत, असे नव्हते. वेदाला अनुसरून धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या धर्माचे आचरण केल्याने चित्त शुद्ध होण्यास मदत होते आणि चित्तशुद्धी ही मोक्षमार्गावर आवश्यक आहे. म्हणून वेदप्रणीत धर्माचे आचरण महत्त्वाचे ठरते. (५) मोक्षासाठी आत्मानात्मविवेक हा अति आवश्यक आहे. तो येण्यास विद्वत्ता हवी. ग्रंथांचे श्रवण, मनन, इत्यादींच्याद्वारा विवेकबुद्धी येणे म्हणजे विद्वत्त्व. साधकबाधक गोष्टींचा विचार करून काहीतरी निश्चय करणारा विद्वान असतो. या विद्वत्तेलाच पुढे श्लोक ४ मध्ये ''श्रुति-पार-दर्शन'' असे म्हटले आहे. असली विद्वत्ता मोक्षमार्गात आवश्यक आहे. (६) वरील दुर्लभ गोष्टी मिळाल्याने सर्व काम भागत नाही. 'आत्मा हा एकमेव एक अंतिम सत्यतत्त्व आहे आणि बाकी सर्व अनात्मा आहे', ही गोष्ट पटणे व मनात ठसणे आवश्यक आहे. आत्मा नित्य आहे. अनात्मा अनित्य आहे. अनात्मा असणारे विश्व अनित्य आहे. हे पटले तर विश्वातील अनित्य वस्तू-विषयीची आसक्ती दूर होऊन वैराग्य येईल. वैराग्य ही मोक्षाची पहिली पायरी आहे. त्यासाठी आत्मानात्मविवेक दृढ होणे नितांत आवश्यक आहे. (७) उपनिषदांच्या अभ्यासाने कळते की नित्य असणारा आत्मा अंतिम सत्यतत्त्व आहे आणि तोच आपला आत्मा - अंतरात्मा - आहे. पण या शाब्दिक ज्ञानाचा उपयोग नाही. हा आत्मा सच्चिदानंद आहे. आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव येणे गरजेचे आहे. कारण अनुभव हीच खात्री. (८) हा आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. आत्मानुभव म्हणजेच ब्रह्मानुभव. या ब्रह्मानुभवाने ब्रह्माचा अनुभव घेणारा ब्रह्मरूप होऊन जातो (ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति । ). असे ब्रह्मरूप होऊन जाणे, ब्रह्मरूपाने राहणे हाच मोक्ष आहे (ब्रह्मभावश्च मोक्षः । ).

मोक्ष म्हणजे तरी काय ? संसाराच्या बंधनातून सुटका म्हणजे मोक्ष. संसार म्हणजे जन्ममरणाचा फेरा. तेव्हा संसारातून सुटका म्हणजे जन्ममरणातून सुटका. मोक्षात जीव ब्रह्मरूप होतो. ब्रह्म हे सच्चिदानंद आहे. म्हणून ब्रह्मानंदाची प्राप्ती म्हणजेच परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. संसारातील सुखदुःखांचा अभाव म्हणजे परमानंद नव्हे, तर नित्य निर्विषय आनंदाची प्राप्ती हा मोक्ष आहे आणि मोक्ष मिळविणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे.

अनेक दुर्लभ गोष्टी मिळत गेल्यास माणूस दुर्लभ मोक्ष मिळवू शकतो. साहजिकच एकाच जन्मात मोक्ष मिळेल असे नाही. गीतेने म्हटल्याप्रमाणे 'अनेक्तजन्म-संसिद्ध' असा पुरुष मोक्षसिद्धी प्राप्त करून घेतो. येथे प्रश्न असा - शंकराचार्य, ज्ञानेश्वर, समर्थ रामदासस्वामी, एकनाथ महाराज हे एकाच जन्मात मुक्त झाले असे दिसते. ते कसे काय ? याचे उत्तर नामदेव महाराजांनी दिले आहे - 'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । तेव्हा या विठ्ठले कृपा केली ॥'

प्रस्तुतच्या श्लोकात असे म्हटले आहे - 'शेकडो कोटी जन्मात चांगल्या प्रकारे केलेल्या पुण्यकर्मांनी मुक्ती मिळते. येथे 'चांगला प्रकार' हे शब्द महत्त्वाचे आहेत. उदा., दान देणे हे पुण्य आहे पण ते दान त्रागा करून, आदळआपट करून, वाईट तोंड करून देणे हा प्रकार चांगला नव्हे. तर 'दान हे आवश्यक आहे', इत्यादी चांगली बुद्धी बाळगून दान करावयास हवे म्हणजे चांगला प्रकार होईल.

केवलाद्वैतमतानुसार कोणत्याही प्रकारच्या कर्मांनी मोक्ष मिळत नाही (पहा श्लोक ७, ११, ५८, इत्यादी) मग येथे पुण्यकर्मांनी मोक्ष मिळतो असे का म्हटले आहे ? या प्रश्नाचे उत्तर असे - साक्षात् कर्मांनी मोक्ष मिळत नाही. तथा, चांगल्या कर्मांनी मोक्षासाठी आवश्यक पण दुर्लभ अशा ज्या गोष्टी या श्लोकात सांगितल्या आहेत, त्या मिळू शकतात. तसेच कर्मांनी चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी ही आवश्यक बाब आहे. अशाप्रकारे कर्मे ही अप्रत्यक्षपणे मोक्षप्राप्तीला उपयोगी ठरतात.

आणखी एक प्रश्न असा - श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांनी ब्रह्मसाक्षात्कार होऊन मोक्ष मिळतो असे या ग्रंथातच पुढे सांगितले आहे. मग प्रश्न असा - श्रवण इत्यादी कर्मे नाही काय ? याचे उत्तर असे - तांत्रिकदृष्ट्या श्रवण इत्यादी कर्मे आहेत. पण ती मोक्षासाठी असल्याने आणि ती कर्माच्या बंधनात पाडीत नसल्याने, ती नेहमीच्या 'कर्म' या सदरात गणली जात नाहीत. जसे - इच्छा ही बंधनात पाडणारी आहे पण मोक्षाची इच्छा ही इच्छा असली तरी ती बंधनात पाडीत नाही म्हणून ती नेहमीच्या 'इच्छा' या वर्गात मोडत नाही.

आणखी असे - येथे 'शेकडो कोटी जन्मातील पुण्य' असे म्हटल्याने ते पुण्य 'अनंत' होते. मग ते 'पुण्य' या नेहमीच्या सदरात पडत नाही. अगणित अथवा अनंत पुण्य हे नेहमीच्या 'पुण्य' या वर्गात पडत नाही. त्यामुळे 'अनंत पुण्याने मोक्ष' असे म्हटले तरी बिघडत नाही.

(३)
श्लोक २ मध्ये सांगितलेल्या दुर्लभ गोष्टींखेरीज आणखी काही दुर्लभ गोष्टी मोक्षासाठी आवश्यक आहेत.

दुर्लभं त्रयमेवैतद् देवानुग्रह-हेतुकम् ।
मनुष्यत्व मुमुक्षुत्व महा-पुरुष-संश्रयः ॥ ३ ॥
माणूस म्हणून जन्म, मोक्षासाठीची इच्छा आणि महापुरुषाचा आश्रय या तीनही गोष्टी दुर्लभ आहेत. (त्या मिळण्यास) देवाचा अनुग्रह हे कारण आहे.


मनुष्यजन्म दुर्लभ आहे मागे सांगून झाले आहे. तसेच ब्रह्मभाव, परमानंद आणि म्हणजे मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय म्हणून सांगून झाले (श्लोक १ -२) पण अनेकदा माणसाला मोक्ष मिळविण्याची इच्छा होत नाही. ऐहिक ऐषआराम आणि सुखे यांत माणूस इतका दंग आणि गुंग होऊन जातो की मोक्ष हे आपले साध्य आहे हे तो विसरून जातो. म्हणून मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षप्राप्तीची इच्छा होणे हे दुर्लभ आहे असे येथे म्हटले आहे.

आता सर्व दुर्लभ गोष्टी मिळाल्या तरी मोक्ष मिळेल असे नाही. कारण त्यासाठी काय करावे लागते हे गुरूकडून जाणून घेणे आवश्यक आहे. या गुरूला येथे 'महापुरुष' असे म्हटले आहे (श्लोक ८ पहा. महापुरुष व त्याचे समानार्थी शब्द पुढे अनेकदा येतात). गुरू हा अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियांद्वारा ब्रह्माचे ज्ञान देतो आणि ब्रह्मप्राप्तीसाठी-मोक्षासाठी काय करावयास हवे हे सांगतो. असा गुरू काही वाटेवर पडलेला नाही अथवा तो दारावर पाटी लावून बसलेला नाही. तर गुरूचा शोध करून त्याचा आश्रय घेणे हे अवघड आहे.

वर उल्लेखिलेल्या तीन दुर्लभ गोष्टी देवाच्या दयेने मिळतात असे येथे सांगितलेले आहे. देवाची/ईश्वराची कृपा होण्यास त्याची पूजा, भक्ती इत्यादी आवश्यक आहेत. पण ईश्वरभक्ती ही केवलाद्वैत वेदांताच्या चार साधनांत सांगितलेली नाही. म्हणून पुढील गोष्ट लक्षात घ्यावी. केवलाद्वैत वेदांतात माया ही उपाधी असणारा ईश्वर मानलेला आहे. तो सर्वगुणसंपन्न आहे. सगुण ईश्वराचा निर्देश पहिल्या श्लोकात आहेच. या ईश्वराची कृपा कुणावर होते ? उत्तर आहे - त्याची भक्ती करणाऱ्यावर. तसेच प्राण्याच्या कर्मानुसार ईश्वर त्याला देत असतो. अशी ईश्वराची कृपा झाली तर या श्लोकात सांगितलेल्या तीन दुर्लभ गोष्टी माणसाला प्राप्त होतात.

(४)
समजा सर्व दुर्लभ गोष्टी प्राप्त झाल्या तरी तेवढ्याने भागत नाही. माणसाने परमानंदासाठी-मोक्षासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक आहे.

लब्ध्वा कथंचित् नरजन्म दुर्लभं
    तत्रापि पुस्त्वं श्रुति-पार-दर्शनम् ।
यस्त्वात्म-मुक्तौ न यतेत मूढधीः
    स ह्यात्‍महा स्वं विनिहन्त्यसद्-ग्रहात् ॥ ४ ॥
कसेतरी का होईना दुर्लभ असा नरजन्म, पुरुष म्हणून जन्म, आणि श्रुतीचे सांगोपांग अध्ययन प्राप्त झाल्यावर, जो मूर्ख बुद्धीचा माणूस स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्‍न करणार नाही, तो स्वतःचा घात करणारा होतो, आणि चुकीच्या कल्पनेने तो स्वतःचा घात करून घेतो.


मोक्ष हे मानवी जीवनाचे ध्येय आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून सुटका. विद्यमान जीवनात माणूस अविद्येने बांधलेला आहे (श्लोक ५२); तो अविद्या, काम आणि कर्म या पाशांनी बद्ध आहे (श्लोक ५७). या बंधनातून माणसाने आपली सुटका करून घ्यावयाची आहे. तेव्हा शहाण्या माणसाने बंधनातून सुटण्याचा प्रयत्‍न करावयास हवा. तसे न करणाऱ्याची बुद्धी मूढ आहे असे येथे म्हटले आहे. कारण त्याची बुद्धी योग्य मार्गाने चाललेली नाही.

जो बंधनातून सुटण्याची इच्छा करीत नाही तो स्वतःचा घात करून घेतो. प्राचीन काळी आत्मघात/आत्महत्या हे पाप आहे असे मानले जाई. तेव्हा बंधनातून सुटू न इच्छिणारा पापी होईल. ये थे आत्महत्या म्हणजे आत्म्याची हत्या नव्हे. कारण आत्मा/ब्रह्म अमर आहे. आत्मा शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. तेव्हा आत्मघात म्हणजे देह, इंद्रिये इत्यादींचा दुरुपयोग असा अर्थ घेता येईल. येथे ''श्रुति-पार-दर्शन'' शब्दाने श्लोक २ मधील विद्वत्त्व अभिप्रेत आहे.
'असद्-ग्रह' या शब्दाचे पुढीलप्रमाणे अनेक अर्थ होऊ शकतील - (१) दुर्लभ नरजन्म, पुरुषजन्म, वेदविद्या इत्यादी मिळाले. आता आणि काही मिळावयाचे राहिले नाही. असे जर वाटू लागेल तर तो 'असद्-ग्रह' होईल. मोक्ष हे साध्य सोडून जर इतर गोष्टी पुरेशा वाटू लागल्या तर तो चुकीचा निर्णय आहे आणि अशा चुकीच्या समजांनी माणूस सन्मार्गावरून भ्रष्ट होऊ शकतो. (२) केवलाद्वैत वेदांताचे मत जग हे असत्/मिथ्या आहे. ते जग खरे आहे असे मानून जर माणूस जगातील विषयांत आसक्त झाला तर तोही 'असद्-ग्रहच 'आहे. कारण मग तो मोक्ष या ध्येयाचा विचारच करणार नाही. आत्म्याचा परमानंद सोडून जगातील क्षणिक सुखाची इच्छा ही असद्-ग्रह च आहे.

(५)
वरील भागच पुढील श्लोक ५ मध्ये वेगळ्या शब्दांत सांगितला आहे.

इतः को न्वस्ति मूढात्मा वस्तु स्वार्थे प्रमाद्यति ।
दुर्लभं मानुषं देहं प्राप्य तत्रापि पौरुषम् ॥ ५ ॥
दुर्लभ अशा मानवी देहात जन्म आणि त्यातही पुरुष म्हणून जन्म हे प्राप्त झाले असता, जो स्वार्थाचे बाबतीत प्रमाद करतो, त्या माणसापेक्षा आणखी दुसरा कोण बरे मूर्ख माणूस असेल ?


या श्लोकात सांगितलेल्या सर्व दुर्लभ गोष्टी मागे निर्देशिलेल्या सर्व दुर्लभ गोष्टींचा समावेश करतात.

स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित, कल्याण. येथे लौकिक जगातील स्वार्थ अभिप्रेत नाही. द्रव्य, स्त्री, घरदार मिळविणे हा लौकिक स्वार्थ आहे. येथे स्वार्थ म्हणजे स्वतःचे हित म्हणजे मोक्षप्राप्ती हा स्वार्थ अभिप्रेत आहे. आणि त्या बाबतीत माणसाने प्रमाद, हयगय, दुर्लक्ष, कानाडोळा, इत्यादी करू नये. तसे करणाऱ्याचे मन (आत्मा) हा गोंधळलेला (मूढ) आहे; त्याच्या मनाला हिताहित कळत नाही असा अर्थ होतो.

(६)
मोक्ष हे स्वतःचे हित कशाने प्राप्त होते आणि कशाने होत नाही ते आता सांगितले आहे.

वदंतु शास्त्राणि यजंतु देवान्
    कुर्वंतु कर्माणि भजंतु देवताः ।
आत्मैक्य-बोधेन विनापि मुक्ति-
    र्न सिध्यति ब्रह्म-शतांतरेऽपि ॥ ६ ॥
या जगातील लोक अनेक शास्त्रे उच्चारू देत, अनेक देवांची पूजा करू देत अथवा अनेक देवांसाठी यज्ञ करू देत, अनेक चांगली/शुभ कर्मे करू देत, अनेक देवतांचे भजन करू देत अथवा अनेक देवतांचा आश्रय घेऊ देत, तथापि प्रत्यग् आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत; हे ज्ञान झाल्याविना, शेकडो ब्रह्मदेव होऊन गेले तरीसुद्धा मुक्ती प्राप्त होत नाही.


या जगात माणसे निरनिराळ्या गोष्टी करीत असतात; पण त्यांच्या योगे त्यांना मोक्ष मात्र मिळत नाही. उदा., काही लोक शास्त्रे शिकतात, त्यांचे स्पष्टीकरण करतात; त्यामुळे त्यांना विद्वान् म्हणून मान मिळेल पण मोक्ष मिळणार नाही.

काहीजण देवांसाठी यज्ञ करतात; त्यामुळे त्यांना फारतर स्वर्ग मिळेल. काहीजण किरकोळ गोष्टींच्या प्राप्तीसाठी देवदेवतांची पूजा-अर्चा करतात. त्यांच्या त्या त्या इच्छा पूर्ण होतील. शास्त्रे आणि वडीलधारी माणसे सांगतात म्हणून दान देणे, विहिरी-तलाव खणून घेणे, इत्यादी चांगली कर्मे काहीजण करतात; त्यामुळे त्यांना पुण्य मिळेल. कित्येक लोक विशिष्ट कारणासाठी गौण देवतांचा आश्रय घेतात; त्यांचे भजन, पूजन, स्मरण करतात, मग त्यांच्या इष्ट गोष्टी त्यांना मिळतात. पण या सर्व कर्मांनी मोक्ष मात्र मिळत नाही. मोक्ष प्राप्त होण्यास एकच साधन आहे आणि ते म्हणजे जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान. हे ज्ञान नसेल तर कितीही प्रदीर्घ काळ गेला तरी माणसाला मुक्ती प्राप्त होत नाही.

येथे प्रदीर्घ काळ दाखविण्यास 'शेकडो ब्रह्मदेव' असे म्हटले आहे. मानवी काल आपल्याकडे कृत, त्रेता, द्वापार आणि कलि या चार युगांत मोजला जातो. या युगांच्या बेरजेच्या कितीतरी पटीने ब्रह्मदेवाचे आयुष्य आहे; ते कोट्यवधी वर्षांत मोजले जाते. ब्रह्मदेवाची अशी शेकडो आयुष्ये होऊन गेली तरी वर उल्लेखिलेल्या कर्मांनी मोक्ष मिळत नाही. ते मोक्षाचे मार्ग नाहीत. मोक्षप्राप्त करून घेण्याचा ज्ञान हा एकच मार्ग उपनिषदांनी सांगितलेला आहे (ज्ञानादेव तु कैवल्यम् । ) हे ज्ञान व्यावहारिक ज्ञान नव्हे. हे ज्ञान म्हणजे जीव आणि ब्रह्म/आत्मा एकच आहेंत हे ज्ञान होय. व्यवहारात आपण देह, इंद्रिये, मन इत्यादींना आत्मा मानत असतो. खरे म्हणजे आपण स्वतः आत्मा/प्रत्यगालत्मा आहोत, परंतु अध्यासाने आपण देह इत्यादींना 'आपण' आहोत असे म्हणत असतो. केवलाद्वैत मतानुसार, 'मी' या शब्दाने अंतरात्मा सूचित होतो आणि हा अंतरात्मा आणि परमात्मा/ब्रह्म हे एकच आहेत. (तथाकथित जीव हा प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब असल्याने त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही.) हे ज्ञान झाले तर जीव ब्रह्मरूप होतो आणि तोच मोक्ष आहे. म्हणून ''ब्रह्मात्मैकत्व-बोधेन मोक्षः सिध्यति नान्यथा ''असे या ग्रंथातच (श्लोक ५८) पुढे सांगितले आहे. भावार्थ असा - अन्य काही करून उपयोग नाही. जीव ब्रह्माचे ऐक्य ज्ञान झाल्याविना मोक्ष नाही. येथे एक लक्षात ठेवावे - जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचे शाब्दिक ज्ञान मात्र उपयोगी नाही, तर तसे अनुभवजन्य ज्ञान हवे.

(७)
यावर कुणीतरी म्हणतो - द्रव्याने सर्वकाही मिळते. तसेच कर्मे केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात. ''प्रयत्‍ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे'' असे म्हणतात. म्हणून द्रव्य म्हणा अथवा कर्म/प्रयत्‍न म्हणा, या उपायांनी मोक्ष मिळेल. ज्ञानाने मोक्ष मिळतो असा अट्टाहास कशासाठी ? याला उत्तर असे -

अमृतत्वस्य नाशास्ति वित्तेनेत्येव हि श्रुतिः ।
ब्रवीति कर्मणो मुक्तेरहेतुत्वं स्फुटं यतः ॥ ७ ॥
द्रव्याच्या योगाने मोक्षाची (अमृतत्व) आशा नाही, तसेच कर्म हे मुक्तीचे कारण नाही, असे श्रुतीने स्पष्टपणे सांगितलेले आहे.


श्रुती म्हणजे वेद. वेद ऋषींना ऐकू आले. म्हणून त्यांना श्रुति असे म्हणतात. वेदाचे कर्मकांड आणि ज्ञानकांड असे दोन भाग आहेत. तत्त्वज्ञानाची चर्चा करणारे आरण्यक आणि उपनिषदे हे भाग ज्ञानकांडात येतात. केवलाद्वैत वेदांतात प्रायः श्रुति-शब्दाने उपनिषदे अभिप्रेत असतात. केवलाद्वैत वेदांताच्या दृष्टीने श्रुती हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. ही श्रुतीच सांगते की, द्रव्य आणि कर्म यांनी मोक्ष मिळत नाही. श्रुती ही आप्तवचनाप्रमाणे आहे. आप्ताचे वचन आपण खरे मानतो. तसे श्रुतीचे वचन खरे असते असेच आपण समजावयास हवे.

पैशानेच जर मोक्ष मिळत असता तर जगातील सर्व पैसेवाले मुक्त झालेले दिसले असते; पण तसे दिसत नाही. तसेच केवळ कर्मांनी मोक्ष साध्य असता तर दिवसाकाठी २०-२० तास काम करणारे सर्वजण मुक्त झाले असते. पण तसेही दिसत नाही. म्हणून द्रव्य आणि कर्म यांनी मोक्ष मिळत नाही असे श्रुती सांगते.
येथे 'मोक्ष' दाखविण्यासाठी श्रुतीने 'अमृतत्व' शब्द वापरला आहे. अमृतत्व म्हणजे पुनः न मरणे म्हणजे पुनः जन्मास येऊन न मरणे म्हणजेच जन्म-मरणाचा अभाव म्हणजेच जन्ममरणरूपी संसारातून सुटका म्हणजेच मोक्ष. ब्रह्माशी एकरूप होणे हाच मोक्ष आहे. (ब्रह्मभावश्च मोक्षः । ) आणि हा मोक्ष माणसाने चालू जीवनात मिळवावयाचा आहे. तसे झाले तर तो कृतार्थ होतो.

या श्लोकात अभिप्रेत असणारी श्रुती वचने पुढीलप्रमाणे आहेत : -

(१) अमृतत्वस्य तु नाशास्ति वित्तेन । (बृहदारण्यक उपनिषद, २.४.२), (२) न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनैके अमृतत्वमाणशुः) तैत्तिरीय आरण्यक, १०, १० ).

(८)
द्रव्य आणि कर्म यांनी मोक्ष मिळत नाही. पण योग्य पद्धतीने प्रयत्‍न केल्यावर मोक्ष मिळू शकतो.

अतो विमुक्त्यै प्रयतेत विद्वान्
    संन्यस्त-बाह्यार्थ-सुख-स्पृहः सन् ।
संतं महांतं समुपेत्य देशिकं
    तेनोपदिष्टार्थ - समाहितात्मा ॥ ८ ॥
म्हणून बाह्य अशा (शब्द, स्पर्श, इत्यादी) पदार्थांतून सुख मिळेल ही आशा टाकून, महान् संत अशा गुरूजवळ जाऊन, त्याने उपदेशिलेल्या गोष्टींवर मन (आत्मा) एकाग्र करून, शहाण्या माणसाने मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्‍न करावयास हवा.


विमुक्ती म्हणजे मुक्ती अथवा मोक्ष. कर्माने मोक्ष मिळत नाही, असे श्लोक ६ मध्ये सांगितले आणि येथे मोक्षासाठी प्रयत्‍न करावा असे सांगितले. आता प्रयत्‍न म्हणजे कर्म आहेच की ! मग कर्माने मोक्ष मिळत नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे ? या प्रश्नाचे उत्तर असे - श्रुतिस्मृतींनी सांगितलेल्या कर्मांनी तसेच लौकिक कर्मांनी मोक्ष मिळत नाही हे खरेच आहे. तथापि, श्रवण, मनन व निदिध्यासन यांच्या प्रयत्‍नाने मुक्ती मिळते आणि ते मोक्षासाठी असल्यामुळे त्यांना कर्म म्हटले जात नाही. जसे - मुमुक्षा ही इच्छा आहे, पण ती मोक्षासाठी असल्याने ती इच्छा मानली जात नाही, कारण जी जन्ममरणाच्या फेऱ्यात पाडणारी नाही.

मोक्षासाठी प्रयत्‍न करण्यापूर्वी योग्य ती पूर्वतयारी आवश्यक आहे. जसे - भात करण्यापूर्वी तांदूळ, पाणी, अग्नी इत्यादी जमविणे आवश्यक आहे. मुक्तीसाठी प्रयत्‍न करण्यापूर्वी पुढील तीन गोष्टी आवश्यक आहेत असे येथे सांगितलेले आहे - (१) शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे बाह्य पदार्थ नाशवंत असल्यामुळे त्यांच्यापासून सततचे सुख मिळणार नाही हे जाणून, त्यांच्याविषयीची आसक्ती दूर व्हावयास हवी, म्हणजेच वैराग्य हवे. (२) ज्या आत्मज्ञानाने मोक्ष प्राप्त होणार आहे, ते ज्ञान गुरूकडून संपादन करून घ्यावयास हवे. अशा गुरूचा शोध घ्यावयास हवा. (३) गुरूने सांगितलेले खरे आहे अशीच श्रद्धा ठेवून (श्लोक २६) त्याने सांगितलेल्या गोष्टींचे एकाग्र मनाने चिंतन करून (मनन), ते ज्ञान मनात ठसवून ठेवावयास हवे.

केवलाद्वैत वेदांत हा अगदी अडाणी माणसांसाठी नाही. ज्याने थोडेफार आध्यात्मिक ज्ञान मिळविले आहे, ज्याला उपनिषदांतील वचनांचा वरवरचा का होईना अर्थ माहीत आहे, असा माणूस येथे 'विद्वान् ' शब्दाने अभिप्रेत आहे. त्या माणसाने हे ज्ञान चालू जन्मात अथवा पूर्वजन्मांत (जन्मांतर) मिळविले असेल तरी चालते.
श्लोक ३ मध्ये ज्याला 'महापुरुष' म्हटले होते त्यालाच येथे ''संतं महांतं'' असे म्हटले आहे. योग्य त्या पद्धतीने अशा महान् संताकडे जावयाचे आहे. हा महापुरुष ब्रह्मात स्थित आणि ब्रह्मसाक्षात्कारी आहे. तसेच हा गुरू श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हवा असेही सांगितले जाते (श्लोक ३४). मोक्षमार्ग कळण्यास गुरूची आवश्यकता आहे, ही गोष्ट 'आचार्यवान् पुरुषो वेद' या शब्दांत उपनिषदांनी सांगितलेली आहे.

(९)
व्यवहारात आपल्यासाठी काही गोष्टी इतरांनी केल्या तरी चालते. पण परमार्थात मोक्षासाठीचा प्रयत्‍न ज्याचा त्यानेच करावयास हवा.

उद्धरेदात्मनात्मानं मग्न संसार-वारिधौ ।
योगारूढत्वमासाद्य सम्यग्-दर्शन-निष्ठया ॥ ९ ॥
योग्य त्या तत्त्वज्ञानावर निष्ठा विश्वास ठेवून, आणि ज्ञानयोगाचा आधार घेऊन संसाररूपी सागरात बुडालेल्या (मग्न) स्वतःला (आत्मानं) आपण स्वतःच (आत्मना) उद्धरून न्यावयाचे आहे.


संसार म्हणजे जन्ममरणाचे चक्र. संसारावर येथे सागराचे रूपक केले आहे. जन्ममरणरूपी सागरात आपण गटांगळ्या खात आहोत (श्लोक १४३ ). पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या माणसाला भोपळा, तराफा उपयोगी पडतात. ते आपणास तारतील असा भरवसा हवा. त्याप्रमाणे केवलाद्वैत वेदांत हे योग्य तत्त्वज्ञान आपणास तारून नेईल अशी निष्ठा हवी. मग त्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन आपण संसारसागर तरून जावयाचा आहे. दुसरा कोणी आपणास तारेल ही आशा करू नये. आपणच योग्य तो प्रयत्‍न करावयास हवा. योग्य ते आत्मज्ञान झाले की संसारातून उद्धार होतो (श्लोक ६, ४७, ५८) आणि हे आत्मज्ञान आपणच मिळवावयाचे आहे.

'उद्धरेदात्मनात्मानं 'ही ओळ गीतेतील (६. ५) तत्सदृश ओळीप्रमाणे आहे. 'योगारूढ' हा शब्दही गीतेत (६. ४) येतो. पण गीतेतील योगारूढ हा कर्मयोगारूढ आहे. प्रस्तुत श्लोकात निर्देशिलेला 'योगारूढ' हा ज्ञानयोगारूढ आहे हे लक्षात घ्यावे.

(१०)
केवळ वैराग्याने काम भागत नाही, तर -

संन्यस्य सर्व-कर्माणि भव-बंध-विमुक्तये ।
चिंत्यतां पंडितैर्धीरैरात्माभ्यास उपस्थितैः ॥ १० ॥
संसाराच्या बंधनातून सुटण्यासाठी, सर्व कर्मांचा त्याग करून, प्रत्यग् आत्म्याच्या (ज्ञानासाठीच्या) प्रयत्‍नात तत्पर असणाऱ्या विचारी (धीर) शहाण्या माणसांनी आत्म्याचे चिंतन करावयास हवे.


भव म्हणजे संसार, जन्ममरणाचे रहाटगाडगे. जन्ममरण हे कर्मांमुळे येते. कर्मांमुळे माणूस जन्ममरणात म्हणजे संसारात बद्ध होतो. म्हणून कर्मांनी मोक्ष मिळत नाही असे मागे श्लोक ७ मध्ये सांगितले होते. म्हणून आसक्ती आणि अहंकार यांनी युक्त असणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग व्हावयास हवा. नंतर आत्मज्ञानासाठी गुरूकडे जावयाचे आहे (श्लोक ८ ). गुरूने त्याला आत्मा आणि अनात्मा याविषयी सांगितले आहे (श्लोक १९ ). त्यातील आत्मा या वस्तूबद्दल मुमुक्षूने तत्परतेने चिंतन करावयास हवे (श्लोक १५). मग आत्म्यैक्य ज्ञान होईल (श्लोक ७). आत्माविषयक चिंतन म्हणजेच मनन हे पुनपुनः सतत केले (अभ्यास) तर ते मनात ठसून राहते.

(११)
जर कर्मांनी मोक्ष मिळत नाही तर श्रुति-स्मृतींनी कशासाठी कर्मे सांगितली आहेत ? या प्रश्नाचे उत्तर देऊन, कर्मांनी मोक्ष मिळत नाही, असे श्लोक ११ सांगतो.

चित्तस्य शुद्‌धये कर्म न तु वस्तूपलब्धये ।
वस्तु-सिद्धिर्विचारेण न किंचित् कर्म-कोटिभिः ॥ ११ ॥
चित्ताच्या शुद्धीसाठी उपयोगी म्हणून कर्म सांगितलेले आहे; कर्म हे ब्रह्म/आत्मा वस्तूच्या उपलब्धीसाठी उपयोगी पडणारे नाही. आत्मवस्तूची प्राप्ती ही विचाराने होते, कोट्यवधी कर्मे करूनही होत नाही.


श्रुति-स्मृतींनी जी काही कर्मे सांगितली आहेत, ती चित्ताच्या शुद्धीसाठी उपयोगी पडतात. निष्कामपणाने केल्या जाणाऱ्या कर्मांनी चित्ताची शुद्धी होते म्हणजे चित्तातील काम, क्रोध इत्यादी विकार बाजूला जातात. शुद्ध झालेल्या चितात ज्ञान प्रगटते आणि मग त्या आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो. आत्मप्राप्तीच्या संदर्भात कोट्यवधी कर्मेही निष्कळ ठरतात.

आत्मा/ब्रह्म या परमोच्च तत्त्वाला 'वस्तू'असे म्हटले जाते. वस्तू म्हणजे सतत सदोदित नित्य असणारा पदार्थ. अशी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे आत्मा अथवा ब्रह्म. या आत्मवस्तूची प्रगती विचाराने म्हणजे विचारजन्य ज्ञानाने होते. ''विचारात जायते ज्ञानम्'' असे पंचदशीकाराचे वचन आहे. आत्मवस्तूचा विचार म्हणजे चिंतन/मनन झाले की आत्मज्ञान होते. आत्मज्ञानाने/ब्रह्मज्ञानाने ब्रह्माची प्राप्ती होते. ''ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति'' असे एक उपनिषद सांगते.


(१२)
विचाराने आत्मवस्तूची प्राप्ती कशी होते हे एक उदाहरण घेऊन पुढील श्लोक १२ सांगतो.

सव्यग्र विचारतः सिद्धा रज्जु-तत्त्वावधारणा ।
भ्रांतोदित-महासर्प-भय-दुःख-विनाशिनी ॥ १२ ॥
योग्य विचार केल्याने रज्जूच्या खऱ्या स्वरूपाचा निश्चय होतो आणि भ्रांतीने त्या रज्जूवर भासणाऱ्या मोठ्या सर्पामुळे वाटणारे भय आणि दुःख नष्ट होऊन जाते.


या श्लोकात रज्जूसर्प दृष्टांत सांगितलेला आहे. केवलाद्वैत वेदांतात हा दृष्टांत वरचेवर येतो. तो असा - जमिनीवर एक लांब दोरी-रज्जू वेडीवाकडी पडलेली होती. अंधूक प्रकाशामुळे ती कुणालातरी रज्जू म्हणून कळली नाही. म्हणून तेथे रज्जू नसून साप आहे अशी - भ्रांती- चुकीचे ज्ञान - झाले. मग तो सर्प चावेल अशी भीती वाटली आणि मनात दुःख झाले. पण पुढे विचार केल्यावर तेथे रज्जू आहे असे कळले ते विचाराने. जर हा साप असता तर तो स्वस्थ न बसता हलला असता, त्याने फणा काढला असता, त्याने फूत्कार केला असता. पण येथे दिसणारा हा साप तसले काहीच करीत नाही आहे. तेव्हा येथे साप नाही. येथे सापासारखी वाटणारी रज्जू पडलेली दिसते. असा योग्य विचार केल्यावर येथे साप नसून रज्जूच पडलेली आहे असे रज्जूचे खरे स्वरूप कळून आले आणि मग रज्जूचे स्वरूप कळताच साप आहे असे वाटल्यामुळे निर्माण झालेली भीती आणि दुःख नष्ट होऊन गेले. याचप्रमाणे योग्य विचार केला तर आत्मवस्तूचे खरे स्वरूप कळून येते आणि आत्म्यावर भ्रांतीने भासणाऱ्या संसाराची भीती आणि संसारातील दुःख संपते.


(१३)
आत्म्याविषयी योग्य विचार कसा करावयाचा ते पुढील श्लोक सांगतो.

अर्थस्य निश्चयो दृष्टो विचारेण हितोक्तितः ।
न स्नानेन न दानेन न प्राणायाम-शतेन वा ॥ १३ ॥
आप्ताच्या (हित) वचनाला अनुसरून विचार केल्याने श्रेष्ठ वस्तू (अर्थ) काय आणि कशी आहे याचा निश्चय होतो असे दिसून येते. हा निश्चय स्नान, दान किंवा शेकडो प्राणायाम यांच्याद्वारा होऊ शकत नाही.


विचाराने आत्मवस्तूचे ज्ञान होते हे खरे पण हा विचार आपले हित करू शकणाऱ्या पुरुषाच्या वचनाला अनुसरून व्हावयास हवा. हा हितकारक पुरुष म्हणजे आपला गुरू (श्लोक ८ पहा). गुरूला आत्मसाक्षात्कार झाला आहे. साहजिकच विचार कसा करावा हे तोच सांगू शकतो. त्याच्या वचनाला अनुसरून विचार झाला असता आत्मवस्तूचे निश्चित ज्ञान होऊ शकते. येथे हित म्हणजे व्यावहारिक हित करू इच्छिणारा पुरुष असा मात्र अर्थ नाही.

कितीही कर्मे केली तरी मोक्षदायक ज्ञान होत नाही. तीर्थक्षेत्री जाऊन त्रिकाल स्नाने केली अथवा कोट्यवधी दाने दिली तरी पुण्यप्राप्ती होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान होणार नाही. तसेच शेकडो वेळा प्राणायाम केला तर फार तर शरीरशुद्धी, नाडीशुद्धी होईल पण आत्मवस्तूचे ज्ञान मात्र कधीच होणार नाही.


(१४)
विचाराने आत्मज्ञान होते पण हा विचार करणाऱ्या माणसाजवळ काही पात्रता आणि साहाय्यकारी गोष्टी लागतात.

अधिकारिणमाशास्ते फल-सिद्धिर्विशेषतः ।
उपाया देश-कालाद्याः सत्यस्मिन् सहकारिण ॥ १४ ॥
मोक्षरूपी/उरात्मज्ञानरूपी फळाच्या सिद्धीसाठी विशेषकरून अधिकारी/पात्र व्यक्तीची अपेक्षा असते आणि त्या संदर्भात (अस्मिन्) देश, काल, इत्यादी हे सहायभूत असतात.


या जगात सर्वांसाठी सर्व नाही. साहजिकच आत्मज्ञान हे वाटेल त्या व्यक्तीला होत नाही. ज्या व्यक्तीजवळ विशिष्ट पात्रता आहे त्या व्यक्तीला हे ज्ञान होते. (ही पात्रता पुढे श्लोक १७-२८ मध्ये सांगितली आहे.) लौकिक व्यवहारातही अधिकार/पात्रता/योग्यता पाहिली जाते. तसेच या संदर्भात देश, काल इत्यादी पुढीलप्रमाणे उपयोगी ठरतात - अधिकारी पुरुषाने गुरूजवळ जाऊन आणि राहून (देश) त्याच्याकडून योग्य त्या मार्गाने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे आहे. मग गुरू जेव्हां प्रसन्न होईल (काळ) तेव्हा ज्ञान मिळेल. गुरू प्रसन्न होण्यास शिष्याचा विनय, सेवा (आद्याः) इत्यादी गोष्टी साहाय्यकारी होतात (श्लोक ३६ पहा).


(१५)
विचार करण्यापूर्वी योग्य तो हितकर्ता गुरू प्राप्त करून घ्यावयास हवा.

अतो विचारः कर्तव्यो जिज्ञासोरात्म-वस्तुनः ।
समासाद्य दया-सिंधुं गुरु ब्रह्मविदुत्तमम् ॥ १५ ॥
उत्तम ब्रह्मवेत्ता/ब्रह्मसाक्षात्कारी आणि दयेचा सागर असा गुरू प्राप्त करून घेऊन, आत्मवस्तू जाणून घेऊ इच्छिणाऱ्या पुरुषाने गुरूच्या वचनाला अनुसरून विचार करावयाचा आहे.


जो हितकर्ता गुरू शोधावयाचा आहे तो ब्रह्मवेत्ता हवा. जर गुरूच ब्रह्म जाणणारा नसेल तर तो ब्रह्मजिज्ञासू शिष्याला काय सांगू शकेल ? तसेच ब्रह्मवेत्ता गुरू दयाळू हवा. त्याला ब्रह्मजिज्ञासू शिष्याची करुणा आली तर तो त्याच्या कल्याणासाठी त्याला आत्मोपदेश करील. पण केवळ त्या उपदेशाचे श्रवण करून भागणार नाही. गुरूच्या उपदेशाचा विचार/चिंतन/मनन होणे आवश्यक आहे. तरच ते गुरूपदिष्ट ज्ञान मनात ठसून राहील.


(१६)
आत्मविद्येचा/ब्रह्मविद्येचा अधिकारी पुढीलप्रमाणे हवा -

मेधावी पुरुषो विद्वानूहापोह-विचक्षणः ।
अधिकार्यात्म-व्द्याया मुक्त-लक्षण-लक्षितः ॥ १६ ॥
बुद्धिमान, विद्वान्, ऊहापोह करण्यात कुशल, आणि (पुढे श्लोक १७ मध्ये) सांगितलेल्या लक्षणांनी/गुणांनी युक्त असा पुरुषच आत्मविद्या जाणून घेण्यास अधिकारी होतो.


आत्मविद्या जाणून घेऊ इच्छिणारा पुरुष हा मंदबुद्धीचा नको, तो बुद्धिमान हवा. तो मठ्ठ, दड्‍ढोबा असेल तर गुरू काय सांगतो हे त्याला कळणारही नाही. तो विद्वान म्हणजे अनेक शास्त्रे जाणणारा हवा, तरच त्याला शब्दांचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, कार्य-कारण-संबंध इत्यादी गोष्टी कळतील. तो ऊहापोह म्हणजे साधक-बाधक विचार करणारा हवा; त्यात तो कुशल असेल तरच त्याला ग्राह्य काय आणि अग्राह्य काय हे कळेल. इतकी किमान पात्रता झाली. याखेरीज पुढे सांगितलेले साधन-चतुष्टयाचे गुण त्याच्या ठिकाणी हवेत. असे सर्व असणारा पुरुषच आत्मविद्या जाणून घेण्यास अधिकारी/पात्र ठरतो.


(१७)
आत्मविद्या जाणून घेणाऱ्याजवळ आणखी काय हवे, ते आता सांगितले आहे.

विवेकिनो विरक्तस्य शमादि-गुणशालिनः ।
मुमुक्षोरेव हि ब्रह्मजिज्ञासा-योग्यता मता ॥ १७ ॥
आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक करू शकणारा, (विषयांतून) विरक्त झालेला, शम इत्यादी गुणांनी शोभणारा आणि मोक्षाची इच्छा करणारा असा पुरुषच ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा करण्यास योग्य आहे, असे (केवलाद्वैत शास्त्रात) मानले जाते.


येथे विवेक करणारा म्हणजे लौकिक व्यवहारात विवेक करणारा असा अर्थ नाही. विवेक म्हणजे दोन गोष्टीतील फरकांचे ज्ञान. आत्मा आणि अनात्मा, नित्य आणि अनित्य वस्तू यांतील फरक जाणणारा येथे अपेक्षित आहे. श्लोक ७३ पासून पुढे आत्मा-अनात्मा यांचे विवेचन सुरू होते.

विरक्त म्हणजे वैराग्याने युक्त. वैराग्यासाठी श्लोक २१-२२ पहा. शम, इत्यादी गुण त्या पुरुषाजवळ पाहिजेत. हे गुण यानंतरच्या २२-२५ श्लोकांत दिले आहेत. त्या पुरुषाजवळ मुमुक्षा हवी. मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा- म्हणजेच संसारातून जन्ममरणाच्या फेऱ्यातून, सुखदुःखातून सुटण्याची इच्छा (श्लोक २८ पहा). ही इच्छाच जर नसेल तर माणूस आत्मविद्येकडे वळणारच नाही. एवंगुणविशिष्ट पुरुष हा ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा करण्यास योग्य आहे.


(१८)
वर श्लोक १७ मध्ये सांगितलेल्या गुणांनाच केवलाद्वैत वेदांतात साधन-चतुष्टय म्हणतात. हे साधनचतुष्टय असेल तरच ब्रह्मजिज्ञासा पूर्ण होऊ शकते.

साधनान्यत्र चत्वारि कथितानि मनीषिभिः ।
येषु सत्स्वेव सन्निष्ठा यदभावे न सिध्यति ॥ १८ ॥
केवलाद्वैत शास्त्रात चार साधने शहाण्या माणसांनी सांगितलेली आहेत. ती माणसाजवळ असतील तरच सत् अशा ब्रह्मावरील/आत्म्यावरील निष्ठा (म्हणजे शाब्दिक ज्ञानाविषयीची इच्छा/अपेक्षा) पूर्ण होते; त्या साधनांचा अभाव असेल तर (सन्निष्ठा) सिद्ध होत नाही.


या श्लोकांत निर्दिष्ट केलेल्या चार साधनांचा खुलासा पुढे श्लोक १९-२८ मध्ये आहे. सन्निष्ठा म्हणजे सत् विषयीची निष्ठा. सत् म्हणजे जे तीनही काळांत न बदलता अस्तित्वात असते ते. असे एकच ब्रह्म अथवा आत्मा हे तत्त्व केवलाद्वैत वेदांतात मानलेले आहे. म्हणून सत् = ब्रह्म = आत्मा = परब्रह्म = परमात्मा असे समीकरण मांडता येते.


(१९)
आदौ नित्यानित्य-वस्तु-विवेकः परिगण्यते ।
इहामुत्र-फल-भोग-विरागस्तदनंतरम् ॥ १९ ॥
चार साधनांत प्रथम नित्यानित्यवस्तु-विवेकाची गणना केली जाते. त्यानंतर इहलोक व परलोक यांतील भोगाविषयीच्या इच्छेचा अभाव (=वैराग्य) सांगितला जातो.


नित्यानित्य-वस्तु-विवेक म्हणजे नित्य काय आणि अनित्य काय यांतील फरकाचे ज्ञान. सत् ब्रह्म हे एकमेव नित्य आहे; आणि बाकी सर्व जे दिसते, भासते ते सर्व अनित्य आहे, असे ज्ञान व्हावयास हवे. नित्य ते की जे भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांत न बदलता असतेच असते. जे नित्य नाही ते अनित्य. जे काही काळ भासते, टिकते आणि नंतर अदृश्य अथवा नष्ट होते, ते अनित्य. नित्यालाच ''सत्'' म्हणतात; आणि जे जग अनित्य आहे ते ''सत्'' नसल्याने ते ''असत्', ''मिथ्या''आहे (श्लोक २०-२१ पहा).

या जगात जिवंत असताना आणि मेल्यावर स्वर्ग इत्यादी परलोकात चांगले अन्न, वस्तू, अमृत, अप्सरा इत्यादी भोगण्यास मिळावेत अशी माणसाची इच्छा असते. ही इच्छा ब्रह्मजिज्ञासेला मारक आहे. कारण जो भोगामागे लागला तो ब्रह्मामागे कशाला लागेल ? म्हणून ब्रहजिज्ञासेसाठी ही इच्छा असता कामा नये. या इच्छेचा अभाव म्हणजेच इह-अमुत्र-फलभोग-विराग होय. यालाच वैराग्य असे म्हणतात. वैराग्याचा अधिक खुलासा श्लोक २१-२२ मध्ये आहे.


(२०)
चार साधनातील दोन साधने मागील श्लोकात सांगून झाली. उरलेली दोन साधने या श्लोकाच्या प्रथम चरणांत दिली आहेत.

शमादि-षट्क-संपत्तिर्मुमुक्षुत्वमिति स्फुटम् ॥ २०अ ॥
शम इत्यादी सहा गुणांच्या समूहाचा उत्कर्ष (संपत्ती) (हे तिसरे साधन) आणि मुमुक्षुत्व हे स्पष्टपणे (चौथे साधन आहे). शम इत्यादी सहा गोष्टींचा खुलासा २२ब-२७ या श्लोकांत आहे.


मुमुक्षुत्व म्हणजे मुमुक्षा म्हणजे संसार बंधनातून, जन्म-मरणाच्या चक्रातून, कर्माच्या बंधनातून सुटण्याची इच्छा. जर जन्ममरण येते हे ठीक आहे, त्यातील सुखदुःख ठीक आहे असे वाटत असेल, तर ब्रह्माकडे कोण वळेल ? जन्ममरणाच्या चिखलात लोळणे हेच आवडत असेल तर ब्रह्म हवेच कशाला ? याउलट अनित्य अशा सुखदुःखातून सुटका व्हावी असे वाटत असेल तरच माणूस नित्य ब्रह्माचा विचार करील. म्हणून मुमुक्षा ही आवश्यक आहे.




(२०ब) (२१अ)
आता नित्यानित्य-वस्तू -विवेकाबद्दल सांगितले आहे.

ब्रह्म सत्यं जगन्मिष्येवंरूपो विनिश्चयः ।
सोऽयं नित्यानित्य-वस्तु-विवेकः समुदाहतः ॥ २०ब-२१अ ॥
ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे अशा स्वरूपाचा (बुद्धीचा) जो दृढ निश्चय तो हा नित्यानित्य-वस्तु-विवेक या नावाने सांगितलेला आहे.


ब्रह्म हे एकमेव सत्य आहे, कारण ते तीनही काळांत अस्तित्वात असते. त्याला उत्पत्ती, स्थिती, विनाश हे विकार होत नाहीत. ते स्वतः सिद्ध आहे. सततचे अस्तित्व हेच ब्रह्माचे स्वरूप आहे. म्हणून ते सत्य, सत् आहे. जग हे ब्रह्माप्रमाणे सत्य, सत् नाही. जग हे कधीतरी उत्पन्न झाले आहे; ते सतत बदलत असते; त्याचा कधीतरी नाश होणार आहे; म्हणून ते असत् , मिथ्या आहे. आपल्या नेहमीच्या जीवनात जग सत्य आहे असे मानून आपला व्यवहार चाललेला असतो. तो विचार दूर व्हावयास हवा. ब्रह्म सत्य असल्याने नित्य आहे, याउलट जग सत्य नसल्याने ते असत्य, मिथ्या आहे असा निश्चय व्हावयास हवा.

(२१ब-२२अ)
वैराग्य म्हणजे काय ते आता सांगितले आहे.

तद् वैराग्य जिहासा या दर्शन-श्रवणादिभिः ।
देहादि-ब्रह्म-पर्यंते डनित्ये भोग-बस्तुनि ॥ (२१ब-२२अ ॥
देह इत्यादीपासून ते ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत अशा ज्या काही पाहिलेल्या अगर ऐकलेल्या, अनित्य अशा भोगवस्तू आहेत, त्या टाकण्याची जी इच्छा, ते हे वैराग्य होय.


माणसाजवळ पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये आहेत; ती सर्व देहात आहेत. या देहाच्या आणि इंद्रियांच्या मार्फत माणूस जगातील पाच प्रकारचे जे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे विषय आहेत, त्यांचा उपभोग घेत असतो. हे पाच विषय तो जगात पाहत असतो आणि त्याने असे ऐकले असते की, स्वर्गात अप्सरा, अमृत, कल्पवृक्ष इत्यादी भोग्यवस्तू आहेत आणि ब्रह्मदेवाच्या लोकात/जगात आणखी काही भोग्यवस्तू आहेत. पण या सर्व भोग्यवस्तू संपूर्णपणे अनित्य आहेत. त्या कधीतरी संपणार. साहजिकच त्यांचा भोगही संपणार, मग त्या भोगाअंती वाटणारे सुखही संपणार. म्हणून या अनित्य वस्तूंच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही अशी खात्री पटावयास हवी. तरच ते पदार्थ टाकण्याची इच्छा निर्माण होईल. सर्व अनित्य भोग्यवस्तू टाकण्याची इच्छा म्हणजेच वैराग्य. भोग भोगण्याच्या इच्छेचा असा अभाव म्हणजे वैराग्य (श्लोक १९ ).

वरील भाषांतरात ''दर्शन-श्रवणादिभिः ''या शब्दांचा संबंध भोग्य वस्तूंकडे घेतला आहे. तो ''जिहासा'' या शब्दाकडेही घेता येईल. मग भोग्य वस्तूंकडे पाहणे, त्यांच्याविषयी ऐकणे इत्यादी गोष्टी टाळण्याची इच्छा असा अर्थ होईल. ''श्रवणादिभिः ''यातील ''आदि '' पदाने स्पर्श इत्यादी विषयसुद्धा सूचित होतील. ''देहादि'' शब्दातील ''आदि'' शब्दाने इंद्रिये अपेक्षित आहेत. या श्लोकातही 'ब्रह्म' शब्दाने अंतिम तत्त्व ब्रह्म अपेक्षित नसून ब्रह्मदेव, ब्रह्मदेव-लोक अभिप्रेत आहेत.

(२२ ब १२३/अ)
'शमादिषट्क म्हणजे शम, दम, उपरति, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान या सहाचा आता क्रमाने विचार केला आहे.

विरज्य विषय-व्राताद् दोष-दृष्ट्या मुहुर्मुहुः ।
स्व-लक्ष्ये नियतावस्था मनसः शम उच्यते ॥ (२२ब-२३अ) ॥
विषयांचे समोह (व्रात) हे दोषयुक्त आहेत असा दृष्टिकोन वारंवार घेतल्याने, त्या विषयांतून विरक्त झालेले मन जेव्हा स्वतःच्या लक्ष्याच्या ठिकाणी निश्चितपणे स्थिर होते, त्या मनाच्या स्थितीला (मनाचा) शम असे म्हटले जाते.


शम ही एक मनाची विशिष्ट अवस्था आहे. ती प्राप्त होण्यास दोन गोष्टी आवश्यक आहेत - (१) शब्द, स्पर्श इत्यादी विषय हे दोषयुक्त आहेत ही भूमिका वारंवार यावयास हवी. शब्द इत्यादी पाच विषयांच्या समूहाला येथे ''व्रात ''म्हटले आहे. येथे हे लक्षात घ्यावे की विषय हे स्वतः दोषयुक्त नाहीत, तर त्यांच्याविषयी मनाची ओढ ही वाईट, दोषयुक्त आहे. विषय भोगावयास मिळावेत म्हणून माणूस काहीही करण्यास तयार होतो, हा दोष आहे. तसेच विषयांपासून सतत सुख मिळेल असे वाटते हाही दोष आहे; कारण तसे होऊ शकत नाही. याची कारणे दोन - विषय अनित्य आहेत आणि विषयाविषयींची आपली आवडही बदलणारी आहे. अशाप्रकारे विषय हे दोषयुक्त आहेत हे एकदा समजून चालत नाही. कारण मन पुनःपुनः विषयांकडे धाव घेत असते. म्हणून विषय दोषयुक्त आहेत हा दृष्टिकोन वारंवार मनावर ठसवावा लागतो. तरच विषयांच्या बाबतीत वैराग्य येते. वैराग्य आल्यावर (विरज्य) मग मन विषयांतून मागे घेऊन आपल्या लक्ष्यावर/ध्येयावर केंद्रित करावे लागते. मानवी जीवनाचे लक्ष्य/ध्येय मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे ब्रह्मभाव आहे. म्हणून विषयांतून मनाचे लक्ष काढून ते ब्रह्मावर/आत्म्यावर केंद्रित करणे हे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे विषयातून परतलेले मन ब्रह्मावर केंद्रित करणे हा मनाचा शम आहे.

(२३ब- (२४अ)

विषयेथ्यः परावर्त्य स्थापनं स्व-स्व-गोलके ।
उभयेषामिन्द्रियाणां स दमः परिकीर्तितः ॥
विषयांतून परावृत्त करून दोन्ही प्रकारची इंद्रिये आपापल्या स्थानी स्थापन करणे यालाच दम असे म्हटले जाते.


शब्द, स्पर्श इत्यादी विषयांविषयी वैराग्य निर्माण झाल्यावर, इंद्रियांची विषयांकडची ओढ कमी होते. म्हणजेच इंद्रिये विषयांतून परावृत्त होतात. मग ती इंद्रिये विषयांकडे न धावता आपापल्या स्थानी राहतात. यालाच दम असे म्हणतात. माणसाची इंद्रिये ही दोन प्रकारची आहेत - ज्ञानेंद्रिये आणि कर्मेद्रिये. डोळा, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही इंद्रिये शब्द, स्पर्श इत्यादी विषयांचे ज्ञान करून देत असल्याने त्यांना ज्ञानेंद्रिये म्हणतात. हात, पाय, वाणी, गुद, व शिश्न ही इंद्रिये कर्मे करीत असल्याने त्यांना कर्मेंद्रिये असे म्हटले जाते. दम हा दोनही प्रकारच्या इंद्रियांशी संबंधित आहे.

(२४/ब)
बाह्यानालंबन-वृत्तेरेवोपरति-सत्तमा ॥ २४/ब ॥
मनाची वृत्ती ही बाह्य विषयांवर अवलंबून नसणे हीच उत्कृष्ट उपरति आहे.


वृत्ती म्हणजे मनाची/अंतःकरणाची एक विशिष्ट अवस्था. इंद्रियांचे मागोमाग मन हे विषयांकडे प्रायः धावत असते. आता, बाह्य विषयांकडे मनाची अशी वृत्ती न होणे हीच उत्तम उपरती आहे. विषयांपासून मनाची अलिप्त स्थिती म्हणजे उपरती. हिलाच उपरम असेही म्हणतात.

(२५)

सहनं सर्व-दुःखानामप्रतीकार-पूर्वकम् ।
चिंता-विलाप-रहितं सा तितिक्षा निगद्यते ॥ २५ ॥
प्रतिकार न करता, चिंता आणि विलाप/शोक न करता सर्व दुःखे सहन करणे या गोष्टीला तितिक्षा असे म्हटले जाते.


या जगात प्रत्येकावर सुखदुःखाचे घाले पडत असतात. आपल्या मनात असो वा नसो सुखदुःख आपल्याकडे येतेच. आता सुख आले तर माणूस ते हसत खेळत भोगतो. पण दुःख आले तर मात्र असे होते - आपण दुःखाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्‍न करतो. जसे - शेजाऱ्यांशी भांडण झाले. तो आपणास मारू लागला. आपण त्याचा व्यवस्थित प्रतिकार करतो. तथापि, आपण तसे करावयाचे नाही. प्रतिकार करण्याची ताकद असूनसुद्धा प्रतिकार न करता येणारे दुःख शांतपणे सोसावयाचे. ही तितिक्षा. दुःख आल्यावर काही माणसे आरडाओरडा, रडारड करतात. तसेच समजा आपल्या हातापायाला दुखापत झाली तर आपले हातपाय कायमचे नादुरुस्त झाले काय अशी चिंता आपल्याला वाटू लागते. अशी चिंता, रडारड, विलाप, शोक न करता, प्रतिकार न करता, सर्व दुःखे सहन करीत राहणे ही तितिक्षा आहे.

GO TOP