भगवान व्यासकृत् 'महाभारत' या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी ब्रह्मतत्त्वासंबंधी विवेचन आढळते. महाभारताच्या उद्योगपर्वांतील अध्याय ४१ ते ४६ इथेही ब्रह्मतत्त्वाविषयी चर्चा आढळते. या भागाला 'सनत्सुजातीय' पर्व असे नांव दिले आहे. या सहा अध्यायांत विदुराच्या विनंतीवरून सनत्कुमारांनी राजा धृतराष्ट्राला ब्रह्मविद्येचे गुह्यज्ञान सांगितले आहे -




सनत्सुजातीय

अध्याय ६ वा

यत् तच्छुक्रं महज्ज्योतिर्दीप्यमानं महद् यशः ।
तद् वै देवा उपासते तस्मात्सूर्यो विराजते ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १ ॥
शुक्राद्‍ ब्रह्म प्रभवति ब्रह्म शुक्रेण वर्धते ।
तच्छुक्रं ज्योतिषां मध्येऽतप्तं तपति तापनम् ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ २ ॥
आपोऽथ अद्‍भ्यः सलिलस्य मध्ये
     उभौ देवौ शिश्रियातेऽन्तरिक्षे ।
अतन्द्रितः सवितुर्विवस्वा-
     नुभौ बिभर्ति पृथिवीं दिवं च ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ ३ ॥
उभौ च देवौ पृथिवीं दिवं च
     दिशश्च शुक्रो भुवनं बिभर्ति ।
तस्माद् दिशः सरितश्च स्रवन्ति
     तस्मात् समुद्रा विहिता महान्ताः ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ ४ ॥
चक्रे रथस्य तिष्ठन्तोऽध्रुवस्याव्यय कर्मणः ।
केतुमन्तं वहन्त्यश्वास्तं दिव्यमजरं दिवि ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ ५ ॥
न सादृश्ये तिष्ठति रूपमस्य
     न चक्षुषा पश्यति कश्चिदेनम् ।
मनीषयाथो मनसा हृदा च
     य एनं विदुरमृतास्ते भवन्ति ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ ६ ॥
द्वादश पूगां सरितं पिबन्तो देव रक्षितम् ।
मध्वीक्षन्तश्च ते तस्याः संचरन्तीह घोराम् ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ ७ ॥
तदर्धमासं पिबति सञ्चित्य भ्रमरो मधु ।
ईशानः सर्वभूतेषु हविर्भूतमकल्पयत् ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ ८ ॥
हिरण्यपर्णमश्वत्थमभिपद्य ह्यंपक्षकाः ।
ते तत्र पक्षिणो भूत्वा प्रपतन्ति यथादिशम् ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ ९ ॥
पूर्णात्पूर्णान्युद्धरन्ति पूर्णात् पूर्णानि चक्रिरे ।
हरन्ति पूर्णात् पूर्णानि पूर्णमेवावशिष्यते ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १० ॥
तस्माद्वै वायुरायातस्तस्मिंश्च प्रयतः सदा ।
तस्मादग्निश्च सोमश्च तस्मिंश्च प्राण आततः ॥ ११ ॥
सर्वमेव ततो विद्यात् तत् तद् वक्तुं न शक्नुमः ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १२ ॥
अपानं गिरति प्राणः प्राणं गिरति चन्द्रमाः ।
आदित्यो गिरते चन्द्रमादित्यं गिरते परः ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १३ ॥
एकं पादं नोत्क्षिपति सलिलाद्धंस उच्चरन् ।
तं चेत् संततमूर्ध्वाय न मृत्युर्नामृतं भवेत् ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १४ ॥
अंगुष्ठमात्र पुरुषोऽन्तरात्मा
     लिङ्‌गस्य योगेन स याति नित्यम् ।
तमीशमीड्यमनुकल्पमाद्यं
     पश्यन्ति मूढा न विराजमानम् ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १५ ॥
असाधना वापि ससाधना वा
     समानमेतद् दृश्यते मानुषेषु ।
समानमेतदमृतस्येतरस्य
     मुक्तास्तत्र मध्व उत्सं समापुः ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १६ ॥
उभौ लोकौ विद्यया व्याप्य याति
     तदा हुतं चाहुतमग्निहोत्रम् ।
मा ते ब्राह्मी लघुतामादधीत
     प्रज्ञानं स्यान्नाम धीरा लभन्ते ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १७ ॥
एवंरूपो महात्मा स पावकं पुरुषो गिरन् ।
यो वै तं पुरुषं वेद तस्येहार्थो न रिष्यते ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १८ ॥
यः सहस्रं सहस्राणां पक्षान् सन्तत्य सम्पतेत् ।
मध्यमे मध्य आगच्छेदपि चेत्स्यान्मनोजवः ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ १९ ॥
न दर्शने तिष्ठति रूपमस्य
     पश्यन्ति चैनं सुविशुद्धसत्त्वाः ।
हितो मनीषी मनसा न तप्यते
     ये तं प्रव्रजेयुरमृतास्ते भवन्ति ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ २० ॥
गूहन्ति सर्पा इव गह्वराणि
     स्वशिक्षया स्वेन वृत्तेन मर्त्याः ।
तेषु प्रमुह्यन्ति जना विमूढा
     यथाध्वानं मोहयन्ते भयाय ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ २१ ॥
नाहं सदा सदासत्कृतः स्यां न मृत्यु-
     र्न चामृत्युरमृतं मे कुतः स्यात् ।
सत्यानृते सत्यसमानबन्धे
     सतश्च योनिरसतश्चैक एव ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ २२ ॥
न साधुना नोत असाधुना वा-
     समानमेतद् दृश्यते मानुषेषु ।
समानमेतदमृतस्य विद्या-
     देवंयुक्तो मधु तद् वै परीप्सेत् ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ २३ ॥
नास्यातिवादा हृदयं तापयन्ति
     नानधीतं नाहुतमग्निहोत्रम् ।
मनो ब्राह्मी लघुतामादधीत
     प्रज्ञां चास्मै नाम धीरा लभन्ते ।
योगिनस्तं प्रपश्यन्ति भगवन्तं सनातनम् ॥ २४ ॥
एवं यः सर्वभूतेषु आत्मानमनुपश्यति ।
अन्यत्रान्यत्र युक्तेषु किं स शोचेत् ततः परम् ॥ २५ ॥
यथोदपाने महति सर्वतः संप्लुतोदके ।
एवं सर्वेषु वेदेषु आत्मानमनुजानतः ॥ २६ ॥
अङ्गुष्ठ मात्रः पुरुषो महात्मा
     न दृश्यते सौहृदि संनिविष्टः ।
अजश्चरो दिवारात्रमतन्द्रितश्च
     स तं मत्वा कविरास्ते प्रसन्नः ॥ २७ ॥
अहमेव स्मृतो माता पिता पुत्रोऽस्म्यहं पुनः ।
आत्माहमपि सर्वस्य यच्च नास्ति यदस्ति च ॥ २८ ॥
पितामहोऽस्मि स्थविरः पिता पुत्रश्च भारत ।
ममैव यूयमात्मस्था न मे यूयं न वो ह्यहम् ॥ २९ ॥
आत्मैव स्थानं मम जन्म चात्मा
     ओतप्रोतोऽहमजरप्रतिष्ठः
अजश्चरो दिवारात्रमतंद्रितोऽहं
     मां विज्ञाय कविरास्ते प्रसन्नः ॥ ३० ॥
अणोरणीयान् सुमनाः सर्वभूतेषु जाग्रति ।
पितरं सर्वभूतानां पुष्करे निहितं विदुः ॥ ३१ ॥
॥ इति श्रीमन्महाभारते उद्योगपर्वणि
सनत्सुजातपर्वणि षट्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४६ ॥


आत्म्याचे स्वरूप व योगीच त्याला पाहतात, असें प्रतिपादन.

सनत्सुजात- हे राजा, ब्रह्मवेत्ता ज्ञानयोगाने ज्याला पहातो व ज्याला जाणूनच ब्रह्मज्ञ अमृत होतात, तें तत्त्व शुक्र म्हणजे शुद्ध - अविद्यादि दोषरहित, सर्वावभासक असल्यामुळें महज्जोति व देदीप्यमान महत् यश आहे. इंद्रादि देव ज्याची उपासना करतात व ज्याच्या तेजानेंच सूर्य विराजमान होतो, त्या परमात्म्याख्य सनातन पूज्य ब्रह्माला योगीच पाहूं शकतात. ज्ञानयोगानें रहित असलेले पुरुष त्याला पाहूं शकत नाहींत. त्या पूर्वोक्त शुद्धब्रह्मापासून हिरण्यगर्भसंक्षक ब्रह्म उत्पन्न होतें. शुद्ध ब्रह्मापासून उत्पन्न झालेलें हिरण्यगर्भाख्य ब्रह्म शुक्राने म्हणजे विराडरूपानें वृद्धि पावते. ते शुद्ध ब्रह्म आदित्यादिकांकडून प्रकाशित न होतां आदित्यादिकांमध्यें स्वतःच प्रकाश पावतें. त्या आदित्यादिकांनाही प्रकाशित करते, म्ह० परमात्मा दुसऱ्या कोणाकडूनही प्रकाशित होत नसून स्वयं प्रकाश व सर्वावभासक आहे. अशा त्या सनातन भगवानाला योगीच पाहूं शकतात. ज्ञानयोगरहित पुरुष पाहूं शकत नाहींत.

देशतः, कालतः, वस्तुतः अपरिच्छिन्न म्ह० पूर्ण असलेल्या परमात्म्यापासून जीवरूपाने पूर्णाचाच उद्धार करतात. म्ह० पूर्ण परमात्म्यापासून पूर्ण जीवात्माच उत्पन्न होतो. पूर्णापासूनच जीवाचा उद्धार-उद्भव झालेला असल्यामुळे विद्वान् या जीवस्वरूपालाहि पूर्णच म्हणतात. त्याचप्रमाणे जीवरूपानें अवस्थित असलेल्या पूर्णापासून देहेंद्रियादिकांमध्ये अनुप्रविष्ट झालेल्या पूर्ण आत्मस्वरूपाला देहेंद्रियादिकांहून पृथक् करून त्यांच्या सर्वांतर साक्षीला देहद्वयापासून उद्धरतात. त्यामुळे ते उद्धृत मूलभूत स्वरूप पूर्णानंदाने अवशिष्ट रहाते. म्ह० त्या पूर्णानंद ब्रह्माशीच संयुक्त होऊन चित्-सदानंद-अद्वितीय ब्रह्मरूपाने अवस्थित होते. अशा त्या सनातन भगवानाला योगीच पाहूं शकतात. (या वाक्यांत भगवान् सनत्सुजातांनीं 'पूर्णमदः पूर्णमिदम्०' या श्रुतीचा अनुवाद केला आहे. बृ. भा. पृ. ५. १. १. )

प्रजापतीने प्रथम परमात्म्यापासून 'आप' उत्पन्न केले. येथील 'आप' हा शब्द भूतपंचकाच्या उपलक्षणार्थ आहे. अर्थात् 'आप' या शब्दावरून उपलक्षित होणारी सर्व सूक्ष्म सृष्टि उत्पन्न केली. त्यानंतर त्या पूर्वसृष्ट 'आपा'-पासून सलिल-भूतपंचकात्मक स्थूल देहादिकांना उत्पन्न केले. त्या स्थूल देहरूपानें अवस्थित असलेल्या सलिलाच्या मध्यवर्ती अंतरिक्षांत-हृदयाकाशांत दोघे तेजःस्वभाव जीव-परमात्मा रहातात. ते केवल हृदयाकाशाचाच आश्रय करून रहातात असे नाही, तर आग्नेयादि सहा उपदिशांसह प्राच्यादि सर्व दिशांनी आच्छादित करणारे ते दोघे देव पृथ्वी व द्युलोक यांना धारण करतात. त्यातील एक म्ह० जीव आपले स्वाभाविक चित्सदानंद-अद्वितीय-ब्रह्मात्मतत्त्व न जाणतां देहादि अनात्म्यामध्यें आत्मभावाला प्राप्त होऊन भूतभौतिक-लक्षण कर्मफलानुरूप सुख-दुःखात्मक देहादि पृथ्वीला धारण करतो व दुसरा देव द्योतनात्मक स्वात्मस्वरूपाला धारण करतो. [ सनत्सुजातांनी येथे 'द्वा सुपर्णा०' या श्रुतीचाच अर्थ सांगितला आहे. (मुं. भा. ३. १. १) जो स्वात्ममायेनें स्वात्म्यालाच प्राणादि अनंत भेदांनीं उत्पन्न करून व त्यांत प्रवेश करून त्यांना पहात रहातो, त्या भगवानाला योगीच पहातात.

राजा, इंद्रियाश्व ज्याचे कर्म अव्यय आहे, अशा ईश्वररूपानें अवस्थित झालेल्या जीवाला त्रैलोक्यस्वरूपानें अवस्थित असलेल्या, आपल्या शरीरामध्ये संचार करणाच्या देहांत रहाणार्‍या, प्रज्ञावान् म्हणूनच दिव्य-अप्राकृत, जरा-मरणादिशून्य, कधींहि उदय व अस्त न पावणाच्या द्योतनात्मक व पूर्णानंद अशा ब्रह्मामध्ये नेऊन पोंचवितात. म्ह० इंद्रिये स्वभावतःच विषयांमध्ये जरी रहात असली, तथापि बुद्धि-सारथ्याकडून आकर्षण केली जाणारी ती आत्मरूप जीवाला द्यूलोकांतील प्रज्ञावान् पुरुषालाच नेऊन पोंचवितात. ( याविषयी कळवल्लींतील 'आत्मानं रथिनं विद्धि' हें रूपक पहा. का. भा. १. ३. ३. ) याप्रमाणे इंद्रिये तपाच्या योगाने जीवाला ज्या परमात्म्याला नेऊन पोंचवितात, त्या परमात्म्याला योगीच पहातात.

यो परमात्म्याचे रूप दुसर्‍या कोणत्याहि वस्तूसारखे नाही. कारण याच्यासारखे दुसरें कांहीं नाहींच. याविषयीं श्रुतीनेंहि 'ज्याचें नांव महद्यश आहे, त्याला दुसरी उपमाच नाहीं' असे म्हटले आहे. यास्तव परमात्म्याचे रूप उपमानादिकांचा विषय होणारे नाही. त्याचप्रमाणे या सर्वांतर परमात्म्याला चक्षुनें कोणी पहात नाही. ( तर मग त्याला कसे पहातात म्हणून विचारशील तर सांगतो. )

निश्चयात्मक बुद्धि, संकल्प-विकल्पात्मक मन व हृदय या साधनानें पुरुष त्याला पहातात. परमात्म्याची उपलब्धि हृदयावांचून होत नाहीं, हे सांगण्यासाठीच मी येथे 'हृदयाने' असे म्हटले आहे. किंवा केवल मन व बुद्धिच नव्हे, तर हृदयस्थ परमेश्वराकडूनहि अनुगृहीत होत्साते जे साधक याला पहातात, ते अमृत होतात. याप्रमाणे ज्याला जाणून योगी अमृत होतात, त्याला योगीच पाहू शकतात.

राजा, इंद्रियांची विषयांमध्ये होणारी प्रवृत्ति अनर्थालाच कारण होते. कारण पांच कर्मेंद्रियें, पांच ज्ञानेंद्रियें, अकरावे मन व बारावी बुद्धि, एकेकाला अनेक पुरुषांच्या अपेक्षेने पूग-समूह असे म्हटले आहे. असे जे बारा पूग, ते चलनशील व परमात्म्याकडून सुरक्षित आहेत. ते पूग मधाप्रमाणे मधुर असलेल्या विषयांचे असांकर्यानें नियमन करतात. म्ह० प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयाचा अनुभव घेते. पुरुष जेव्हां विषयासक्त होऊन त्याचीं इंद्रियें विषयपरायण होतात, तेव्हां तीं घोर संसारामध्ये प्रवेश करतात. यास्तव इंद्रियांचा विषयांपासून उपसंहार करून त्यांना स्वात्म्यामध्येच स्थिर करावे. ज्या परमात्म्याकडून नियमित झालेली हीं इंद्रियें सुरक्षित असतात, त्या देवाला योगीच पाहू शकतात. ज्याप्रमाणे मधुकर पंधरा दिवसांत संपादन केलेला मध अर्धा महिना प्राशन करतो, त्याप्रमाणे हा भ्रमणशील संसारी आपला संचित विषयरूप मध अर्धमासभर पीत रहातो. तो पूर्वजन्मामध्ये संपादन केलेले कर्म अन्य जन्मामध्ये भोगतो.

धृतराष्ट्र--भगवन् , इहलोकींच फल देणार्‍या कर्माची फलसिद्धि संभवते. कारण ते फल कर्मानंतर लागलेच मिळू शकते. पण परलोकीं फल देणार्‍या कर्माची फलसिद्धि कशी होणार ! कारण कर्माला विनाशित्व आहे.

सनत्सुजात - राजा, केवल कर्मापासूनच फलसिद्धि झाली असती, तर हा दोष संभवला असता. पण, परमेश्वर पुरुषाने जो धर्माचरणरूप प्रयत्न केलेला असतो, त्याच्या अपेक्षेने म्ह० प्राणाग्निहोत्र व इतर कर्म यांस अनुसरून सर्व प्राण्यांमध्ये हविर्भूत अन्नादि कल्पितो. याप्रमाणे जो ईश्वर सर्व भूतांमध्ये अन्नादिकांची योजना करतो, त्याला योगीच पाहू शकतात. राजा, यावर तू कदाचित् म्हणशील की, हे विषयरूप मधाचे प्राशन करणारे जीव सर्वदा भ्रमण करीतच रहातात, किंवा ज्ञानाला प्राप्त होऊन मुक्त होतात ? तर त्याचे उत्तर सांगतों, ऐक.

जे जीवभ्रमर ज्ञानपक्षरहित होऊन मधुभक्षण करीत परिवर्तन करतात, ते ज्याची पाने आपातरमणीय आहेत, अशा हिरण्यपर्ण अश्वत्थावर आरूढ होऊन-वेदसंयोगी ब्राह्मणादि देहास प्राप्त होऊन, त्याच ब्राह्मणादि देहांमध्ये पक्षयुक्त ज्ञानी होतात व इष्टस्थानीं उडून जातात. त्यामुळे ते सुखाने मुक्त होतात. ज्याला जाणून पुरुष असे पक्षवान् व मुक्त होतात, त्याला योगीच पाहू शकतात.

प्राण अपानाचा उपसंहार करतो वे चंद्रमा-मन प्राणाचा उपसंहार करतो. त्या चंद्राला-मनाला आदित्य-बुद्धि गिळून टाकते व परब्रह्म आदित्याला-बुद्धीलाहि आपल्यामध्ये उपसंहृत करते. पुरुष समाधिसमयीं अपानाचा प्राणामध्यें, प्राणाचा मनामध्ये, मनाचा बुद्धीमध्यें व बुद्धीचा परमाम्यामध्ये उपसंहार करून स्वाभाविक चित्सदानंद अद्वितीय ब्रह्मरूपाने अवस्थित होतो. त्या सनातन भगवंताला योगीच पाहूं शकतात.

आतां सनत्सुजात परमात्म्याचे जीवरूपाने अवस्थान सांगतात--अविद्या व तिचे कार्य, यांचा नाश करितो म्हणून हंस-परमात्मा. तो हंस या भूतभौतिकलक्षण संसारसलिलाच्या बाहेरच राहून आपला जीवाख्य पाद वर उचलून घेत नाहीं; तर तो संसारातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिरूपच - प्रत्येक व्यक्तीसारखा - होऊन रहातो. तो आपला जीवाख्य पाद का बरे वर उचलीत नाहीं ? म्हणून विचारशील तर सांगतो. त्या सतत गमन करणाच्या जीवाख्यपादाला जर त्याने वर काढले म्ह० तो हंस आपल्या मायेच्या योगाने स्वात्म्याला प्राणादि अनंत भेदयुक्त करून व त्यामध्ये जीवरूपाने प्रवेश करून जर अवस्थित न झाला तर मृत्यु जनन-मरणादि लक्षण अनर्थ हाच संसार सिद्ध होणार नाही. कारण तो जर जीवनरूपाने सर्व कार्यामध्ये प्रविष्ट होऊन न राहिला, तर संसारी जीवांचाच अभाव होईल आणि संसारी जीवांचाच जर अभाव झाला तर जन्ममरणादिरूप अनर्थ कोठचा ! त्याचप्रमाणे अमृतत्व म्ह० मोक्षहि होणार नाही. कारण जो प्रविष्टच झाला नाहीं त्याच्या दर्शनाचा असंभव आहे. याप्रमाणे जो पादरूपाने जीवात्मा होतो व त्रिपादरूपाने सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्मरूपानें अवस्थित होतो, त्या परमाम्याला योगीच पहातात.

'तर मग कोणत्या उपाधीनें परमात्मा पादरूपाने अवस्थित होतो !' अशी आशंका घेऊन सनत्सुजात परमात्म्याचेच लिंगोपाधिक जीवस्वरूप दाखवतात. तोच सच्चिदानंदाद्वितीय सर्व भूतान्तरात्मा, पूर्ण, पुरुष, परमात्मा अंतःकरणप्रधान लिंगशरीराशीं संबद्ध होऊन अंगुष्ठमात्र परिमाणानें परिच्छिन्न होत्साता नित्य संसार करतो. पण तो लिंगशरीरयोगानें अंगुष्ठमात्र होऊन संसार कां करतो, असे विचारशील तर तेहि सांगतों --

जो लिंगयोगाने अंगुष्ठमात्र होऊन संसार करतो, जो स्तुत्य व सर्वांचा ईशिता सर्वांमध्ये प्रवेश करून सर्व शरीरांना आत्मयुक्त करून प्रत्येक शरीरामध्ये आत्मरूपानें विराजमान होणारा ईश, त्याला देहद्वयावर आत्माभिमान ठेवणारे अविवेकी मूढ पहात नाहीत आणि आत्म्याचा ब्रह्मभाव ज्ञात न झाल्यामुळे ते संसार करतात. ज्या आत्म्याला न जाणल्यामुळे अविवेकी संसार करतात, त्याला योगीच पाहतात.

[ आतां सनत्सुजात इंद्रियें व विषय यांचे अनर्थहेतुत्व दाखवितात-] ज्याप्रमाणे सर्प आपल्या बिळांतून बाहेर पडून व आपल्या विषप्रदानरूप व्यापाराने मर्त्यांना क्षीण करून पुनः आपल्या बिळांत जाऊन लपतात, स्वरूपाला आच्छादित करतात, त्याप्रमाणे इंद्रियरूप सर्प श्रोत्रादि बिळांमध्ये रहातात आणि त्या श्रोत्रादि छिद्रांतून बाहेर पडून मर्त्यांना विषयरूप विषाचे प्रदान करतात व त्या विषयविषप्रदानानें त्यांचा नाश करतात. हे राजा, हे इंद्रियरूपी सर्प आपापल्या बिळांत शिरून स्वतःला आच्छादित करतात. याप्रमाणे विषयविषाने व्याकुल झालेले जीव विशेषतः अविवेकी बनतात. विषयांहून अन्य कांहीं जाणत नाहींत. त्या इंद्रियांनी दिलेले विषयरूप भोग मर्त्यांना पुनः पुनः मोहित करतात.

हा विषयमोह जीवांच्या गर्भ-जन्म-मरणादि संसाराला कारण होतो. ज्या आद्य शुद्ध परमात्म्याला न पाहिल्यामुळे विषयविषांध जीव मोहित होतात, त्याला योगीच पाहूं शकतात. हे राजा, मानवांतील जे शम-दमादि साधनांनी रहित असतात व जे शमादि साधनांनी युक्त असतात, त्या दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये आत्मस्वरूप एकसारखेंच प्रतीत होते. त्याप्रमाणे मोक्ष व संसार या दोन्ही अवस्थांमध्ये अमृत-मोक्षहि समान असतो. पण त्यांतील जे शमादिसाधनयुक्त असतात, ते त्या विष्णूच्या परम पदांतील मधाच्या पोळ्याला - पूर्णानंद ब्रह्माला - प्राप्त होतात. याप्रमाणे शमादि-साधनयुक्त लोक ज्या मधुनिधीला प्राप्त होतात, त्याला योगीच पाहू शकतात.

ते पूर्णानंद ब्रह्म इहलोक व परलोक या दोन्ही लोकांना ब्रह्मात्मत्वविद्येने व्यापून त्यांच्याहि पलीकडे रहाते, ज्या अर्थी तें या दोन्ही लोकांना व्यापून अवशिष्ट रहाते, त्या अर्थीं या आत्मज्ञानानें पुरुषाचे अहुत अग्निहोत्र मुख्यवृत्तीनें हुत केल्यासारखे होते; म्ह० आत्मज्ञानाच्या योगानें अग्निहोत्रादि सर्व कर्मफल संपादित होते. ज्याअर्थीं या विद्येच्या योगाने पुरुष दोन्ही लोकांना व्यापून जातो आणि ज्याअर्थी अहुत अग्निहोत्र हुत होते, त्याअर्थीं हे राजा, तुझी ब्रह्मविषयक विद्या तुला अग्निहोत्रादि कर्माप्रमाणे लघुत्व म्ह० मर्त्यभाव न देवो. जेव्हां पुरुष अज्ञानाख्य तमाहून अगदीं विलक्षण असलेल्या परमात्मरूप प्रज्ञानाला आत्मत्वाने संपादन करतो, तेव्हां ब्रह्मविद्येमध्ये व्यापृत असलेल्या व परमात्म्याला आत्मत्वाने जाणणा-या या पुरुषाला प्रज्ञान व ब्रह्म असे नांव प्राप्त होते. हे राजा, ज्ञानी पुरुषाला जे प्रज्ञान ब्रह्म प्राप्त होते त्याला योगीच जाणतात.

जो प्रज्ञानैकरस ब्रह्मस्वरूप होऊन रहातो, तो आत्मा महान् होतो. सर्वांचा उपसंहार करणे, हे ज्याचे रूप आहे, त्या कारणासह सर्व कार्याचा आत्मस्वरूपामध्ये उपसंहार करणारा जो त्या ज्ञानैकरसपूर्ण पुरुषाला साक्षात् जाणतो, त्या प्रज्ञानरूप परमात्म्याला आत्मत्वाने जाणणाच्या पुरुषाचा आत्मा याच देहामध्यें विनाश पावत नाही, कारण विद्वानाच्या उत्क्रांतीचा - मरणाचा अभाव सांगितलेला आहे. उत्क्रांतीच्या निमित्तानेच विनाश होत असतो. सारांश, ज्याला जाणून आत्मविनाश होत नाही, त्या सनातन परमात्म्याला योगीच पहातात. तस्मात् जो अहर्निश मोठ्या आदरानें सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्माला आत्मत्वाने जाणतो, तो सदा सत्कृत होतो, लोकांकडून त्याचा सत्कार केला जातो. त्याला मृत्यु-जन्म-मरणलक्षण संसार नाहीं, मग अमृत तरी कोठचे ! कारण अमृतत्व मृत्युसापेक्ष आहे. मृत्यूच्या अभावीं अमृतत्वाची प्राप्तिच संभवत नाहीं.

सत्य आणि अनृत ही दोन्ही परमार्थ सत्य व एका अधिष्ठानाच्या आश्रयानें रहातात. रज्जूच्या आश्रयाने जसा सर्प रहातो, त्याचप्रमाणे लौकिक सत्य आणि असत्य ही दोन्ही एका सद्‌रूप ब्रह्माच्या आश्रयाने रहातात. म्हणूनच एक अद्वितीय ब्रह्म सर्व कारण आहे, असेहि म्हणतां येते. ज्या आत्मतत्त्वाचे ज्ञान झाल्यानें मृत्यूचा विनाश होतो व ज्याच्या आश्रयाने सत्य व अनृत रहातात त्या परमात्म्याला योगीच पहातात.

आकाशादि-देहान्त जगत् उत्पन्न करून हृदयामध्ये प्रविष्ट झालेला हा अज चर व अचर भूतांचा आत्मा होतो. तो मनुष्यशरीरांतील अंगुष्ठमात्र हृदयामध्ये अभिव्यक्त होतो, पण स्वतःच्या सच्चिदानंद अद्वितीय स्वरूपानें कोठेच प्रतीत होत नाहीं. जो अहर्निश निरलस व सावधान होऊन पंच कोशापासून सर्वान्तर आत्म्याला पृथक् करतो, तो कृतार्थ पुरुष कवि, ज्ञानी होतो. त्याच्यापासूनच वायु उत्पन्न होतो व त्यांतच लीन होतो. त्याच्यापासूनच अग्नि व सोम हे देव प्रकट होतात व हा प्राणहि त्याच्यापासूनच उत्पन्न झालेला आहे. ब्रह्मच सर्वांचा आधार आहे. तेंच अमृत, तेच हे सर्व लोक, तेंच ब्रह्म व तेंच यश आहे. त्याच्यापासूनच हीं सर्व भूतें उत्पन्न झाली व त्याच्यामध्येंच ती सर्व लीन होतात. चंद्र व सूर्य हे दोन देव, पृथ्वी, द्युलोक, दिशा व हीं सर्व भुवनें यांस ते शुक्र—शुद्ध ब्रह्मच धारण करते, त्याच्यापासूनच दशदिशा उत्पन्न झाल्या आहेत. गंगा, यमुना, सिंधु, सरस्वती, गोदावरी, कावेरी इत्यादि या सर्व नद्या, त्याच्याच सत्तेने स्रवतात. त्याच्यापासूनच हे महासागर उत्पन्न झाले आहेत.

एखाद्या पुरुषाने आपल्याला सहस्त्रावधि पंख लावून जरी उडाण केले व या कारणाचा अंत लावण्यासाठीं तो अनेक कोटी कल्प जरी उड्डाण करीत राहिला, तरी या सर्वकारण परमात्म्याचा त्याला अंत लागणार नाहीं. तो जरी मनासारखा वेग धारण करून सर्व दिशांमध्ये संचार करीत राहिला, तरी त्याला ब्रह्माची सीमा कळत नाहीं. यावरून हा परमात्मा अनंत आहे, असे सिद्ध होते. अशा या सनातन अनंत परमात्म्याला योगीच पाहू शकतात. या परमात्म्याचे स्वरूप इंद्रिय-विषयांमध्ये स्थित होत नाही. म्ह० ते अतींद्रिय आहे. तथापि यज्ञ-दान-तपोरूप कर्मांनीं ज्यांचे अंतःकरण शुद्ध झालेले असून ते अग्नीप्रमाणें अतिशय दीप्त झालेलें असतें, तेच आपल्या सूक्ष्म व एकाग्र अंतःकरणाने त्याला साक्षात् जाणतात. ज्याअर्थीं असें आहे त्याअर्थीं राग-द्वेषादि मलांनीं रहित व विशुद्ध सत्त्व होऊन एकाग्र मनाने त्या परमात्म्याला जाणावें.

जे साधनसंपन्न अधिकारी परमात्म्याला 'मीच तो आहे,' असे आत्मत्वाने जाणतात ते अमृत-अमरण धर्मवान् होतात. जो शरीरेंद्रियादि-अभिमानानें युक्त असलेल्या सर्व भूतांमध्ये या सर्वान्तर आत्म्याला पहातो, तो सर्व भूतांमध्ये स्वात्म्याला पहाणारा विद्वान् कोणाला उद्देशून शोक करणार ! सर्व भूतांमध्ये आत्म्याला पहाणारा तो कृतार्थ होत असल्यामुळे कोणालाच उद्देशून शोक करीत नाही. ज्याप्रमाणे, जलाने परिपूर्ण असलेल्या फार मोठ्या जलाशयाचा लाभ झाल्यामुळे कृतकृत्य झालेल्या पुरुषाचें अन्य अल्प जलाशयामध्यें कांहीं प्रयोजन उरत नाही, त्याप्रमाणें सर्व भूतांमध्ये आत्म्याला पहाणार्‍या ब्राह्मणाचे विशेषतः कांहीं प्रयोजन उरत नाहीं.

[ आतां सनत्सुजात पूर्वोक्त अर्थच दृढ करण्यासाठीं वामदेवादिकांप्रमाणे स्वानुभव सांगतात-] हे राजा धृतराष्ट्रा, मी तुमची माता-जननी आहे. पिताहि मीच आहे. तुझा दुर्योधनादि पुत्रहि मीच, फार काय पण प्राणिजाताचा आत्मा मीच आहे. सत् आणि असत् असें जें जें कांहीं आहे, त्या सर्वांचा मीच आत्मा आहे.

[ याप्रमाणे आधिभौतिक पित्रादिक मीच आहे असे सांगून सनत्सुजात मलाच आधिदैविक पित्रादिभाव आहेत असे दाखवितात-] हे राजा, मी वृद्ध पितामह आहे. इंद्रादिकांचा पितामह जो अनादि सिद्ध परमात्मा तोहि मीच आहे. जो इंद्रादिकांचा पिता हिरण्यगर्भ, तोहि मीच, तुम्ही सर्व माझ्याच स्वरूपामध्यें स्थित आहां. पण वस्तुतः तुम्ही माझ्या स्वरूपांतहि स्थित नाहीं व मीहि तुमच्या स्वरूपात स्थित नाहीं. ( गी. भा. ९-४). राजा, यद्यपि माझ्या स्वरूपांत तुम्ही नाहीं व मी तुजमध्ये नाहीं, तथापि माझा आत्माच सर्वांचा आशय आहे. जन्महि आत्माच आहे. म्ह० या आत्म्यापासूनच सर्व उत्पन्न झाले आहे. मीच तुमचा जनक सर्व जगामध्ये ओतप्रोत भरून राहिलों आहे. मीच अजरप्रतिष्ठ-जरामरणशून्य स्वस्वरूपांत स्थित आहे. मी स्वतः अज असून चराचर भूतांचा आत्मा आहे. मी अहोरात्र-अहर्निश निरलस होऊन आपल्या नित्य चैतन्यरूपानें राहिलों आहे. मी सूक्ष्माहूनहि सूक्ष्म आहे. माझे मन शोभन-रागद्वेषादि धर्मरहित आहे. त्यामुळेच मी सुमना, ज्याचे मन सच्चिदानंद अद्वितीय ब्रह्माकार झाले आहे, असा असून सर्व भूतांच्या हृदयकमलामध्ये स्थित आहे.

राजा, माझाच हा असा अनुभव आहे, असें नाहीं. तर सनक, सनंदन वामदेवादि अन्य ब्रह्मवेत्तेहि या परमात्म्याला सर्व भूतांचा पिता व सर्व प्राण्यांच्या हृदयपुंडरीकामध्ये स्थित असलेला पहातात. तेहि मजप्रमाणेच परमात्म्याला आत्मत्वाने जाणतात व याविषय बृहदारण्यक, ऐतरेय, तैत्तिरीयक, छान्दोग्य, तलवकार इत्यादि अनेक उपनिषदांमध्ये अनेक विद्वानांचाहि असाच अनुभव वर्णिला आहे. यास्तव तूहि विद्वानांच्या मार्गाचे अनुवर्तन कर.

सनत्सुजातपर्व समाप्त झालें.


GO TOP