॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥

अध्याय नववा
समास पहिला


जयें गोधना संकटी रक्षियेले । किती जीव अन्नोदकें तृप्त केले ।
बहू मंदिरें स्थापिली धन्य कीर्ति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ९ ॥

जयजय सद्‌गुरु तरुवरा । संतप्त पांथिकां आसरा ।
कल्पतरूहूनि साजिरा । निर्विकल्प ॥ १ ॥
कल्पतरू काय देतो । कल्पिली वस्तु पुरवितो ।
कल्पनातीत जीव होतो । गुरुछायेसी ॥ २ ॥
संसारपथ महाघोर । त्रिविधतापें पोळें शरीर ।
भेटतां मागीं गुरुवर । कृपाविस्तार साउली ॥ ३ ॥
तरीच शीण अवघा जाये । ना तरी किरणें घेतील धांवे ।
याकारणें संत तुझिये । आश्रयें सुख भोगिती ॥ ४ ॥
शांति सुगंध सुमनांचा । मेवा भ्रमर संतांचा ।
ताप निवाला जन्मांतरींचा । तेथेंच गुंग जाहले ॥ ५ ॥
बोधसुमनें जमविलीं । आत्मारामासी वाहिलीं ।
फलाशेची वाट मोडिली । संतजनांनी ॥ ६ ॥
वृक्षविस्तार बहु मोठा । माजीं अनंत जीवांच्या पेठा ।
छायेसी न पडे तोटा । आकार कोणा न गणवे ॥ ७ ॥
कीर्तिमोहोर विस्तारला । चैतन्यफळांनी लिगडला ।
पक्षीसमुदाय लोटला । स्वानंदरस चाखाया ॥ ८ ॥
सेवूनिया स्वानंदरस । पूज्य झाले जगतास ।
अनुहत ध्वनि श्रवणास । अति आल्हाद देतसे ॥ ९ ॥
वासनेच्या पर्जन्यधारा । त्यांपासोनि तूंचि आसरा ।
सकलां करिसी निवारा । कृपासागरा गुरुमूर्ते ॥ १० ॥
जे जे तव आश्रया आले । ते तेथेंचि स्थिर झाले ।
पुन्हां परतोन नाहीं गेले । त्रिविधताप सोसाया ॥ ११ ॥
ऐशी तुझ्या छायेची गोडी । सुख वाढतें घडोघडी ।
संसारदुःखां वरपडीं । जाहलीं कितीयेक ॥ १२ ॥
अहंकारें उन्मत्त झाले । ते त्वदाश्रयासी मुकले ।
अहंकाररहित नम्र झाले । ते पावले निजरूपा ॥ १३ ॥
निबिड संसारकानन । अज्ञान अंधकार पसरला गहन ।
षड्रिपु श्वापदें हिंस्र दारुण । जीव नेती कुंभीपाकीं ॥ १४ ॥
ज्ञानसूर्य मावळला । विद्युन्मायेचा गलबला ।
शब्दज्ञान खद्योत भला । एकाचें एक दावितो ॥ १५ ॥
अनीति कांटेरी कुंपणें । अणुप्रवेशें करिती सदनें ।
यमकिंकरादि पिशुनें । भिवविती जीवासी ॥ १६ ॥
दारिद्र्यसर्प डसों येती । लोकेषणा वृश्चिक फिरती ।
कामेषणा गिळूं म्हणती । अजगर थोर काननींचे ॥ १७ ॥
ऐसा प्राणी बहु भ्रमला । आशा-तृष्णा-गर्तीं पडला ।
तंव अकस्मात भेटला । पूर्वसंचित सोबती ॥ १८ ॥
तेणें हातीं धरोनि नेला । जेथें ज्ञानतरु सद्‌गुरु भला ।
संतसमुदाय असे भरला । कृपाछायेसी ॥ १९ ॥
कोठें सूर्याऐसी दीप्ती । नांदे तेथें तो रघुपती ।
विवेक शूर सेनापती । श्वापदें दूर पळवीतसे ॥ २० ॥
आनंद भरोन आनंदरूप । प्राणि होत निस्ताप ।
द्वैत भावना संकल्प । विरोनि जाती मुळींहुनीं ॥ २१ ॥
ऐसा तूं सद्‌गुरुवरा । संसारकाननींचा आसरा ।
निःस्वार्थदाता दुसरा । दिसेना त्रिखंडा शोधिल्या ॥ २२ ॥
अखंड अगाध अविनाशी । नामरूप भेद न ज्यासी ।
भक्तांकारणें तूं साकारशी । निरुपाधि निराकारा ॥ २३ ॥
दयेचा निधि असे भरला । अनंत जीव शांतविला ।
धर्म आदरें संरक्षिला । अधर्मप्रवर्तकयुगीं ॥ २४ ॥
कैसें युगाचें महिमान । अधर्मकर्मीं प्रेम गहन ।
दुर्जन तेचि भाग्यवान । दिसों लागले ॥ २५ ॥
देहममता बहु लागली । तेणें सुखसाधनें जमविलीं ।
धर्महानि होऊं लागली । हें ध्यानीं येईना ॥ २६ ॥
धर्मबीजरक्षणकर्ते । विप्र वागूं लागले भलते ।
यजनादिक कर्में निरुतें । राहिलीं पूर्वापार ॥ २७ ॥
राहिलें केवळ वाग्जाळ । अर्थभाग्याची पडली भुरळ ।
तेणें मति जाहली चंचल । आत्मानुभव दूर राहिला ॥ २८ ॥
येणेंचि रीती सर्व वर्ण । अनेक मतें भिन्न भिन्न ।
उपहासती अन्योन्यालागून । सत्य कांहींच उमगेना ॥ २९ ॥
धर्में मर्यादा कथियेली । कर्में सर्व आंखून दिलीं ।
तीं सोडितां सत्ता बुडाली । उभय लोकींची ॥ ३० ॥
दैवी शक्ति समूळ गेली । मानवी सत्ता राहिली ।
धर्मभेदें दुही माजली । तेणें आली विकळता ॥ ३१ ॥
धर्म जीवाचें जीवन । धर्म राष्ट्राचें भूषण ।
अभ्युदयासी कारण । धर्मचि एक ॥ ३२ ॥
धर्मविन्मुख जे झाले । इहपर सुखासी मुकले ।
आचार सर्वही भासले । निरर्थक सकळांसी ॥ ३३ ॥
शरीरीं रोग अति गहन । आणि पथ्य दिधलें सोडून ।
मग औषध वाटे गुणहीन । रोगिया जैसें ॥ ३४ ॥
शब्दज्ञानी शहाणें ठरलें । भाविक मूर्खामाजीं गणले ।
अनुभव नेत्र जातां आंधळे । होवोन भांडती परस्परें ॥ ३५ ॥
धर्मदुही बहु जाहली । तेणें समाजा फुटी पडली ।
आपली आपणा वैरी झाली । दुजीयाची काय कथा ॥ ३६ ॥
स्वात्मसुख स्वप्नवत्‌ । होवोनि झाले विषयासक्त ।
विषयीं द्वैताची मात । सहजचि आली ॥ ३७ ॥
विषयीं वाढे अनाचार । विषयीं वाढे मत्सर ।
विषय व्यसनाचें माहेर । विषय तनु जीर्ण करिती ॥ ३८ ॥
विषय साधनीं विक्षेप । विषय म्हणजे महापाप ।
विषय वाढविती संताप । विषय विषया वाढविती ॥ ३९ ॥
धर्महीन झाले सकळ । गेलें ऐक्यतेचें बळ ।
पराधीनतेनें विकळ । होऊं लागले ॥ ४० ॥
भगवदाज्ञें कलि आला । तैसा धर्म क्षीण झाला ।
बोल नाहीं इतरांला । ऐसें पूर्वींच कथियेलें ॥ ४१ ॥
प्रारब्धें रोग झाला । परि प्रयत्नेंथ पाहिजे हटविला ।
कांहीं काळ तरी सुखाचा गेला । म्हणजे बरें ॥ ४२ ॥
यास्तव साधू अवतरती । वेळोवेळीं धर्म रक्षिती ।
कलि प्रबल झाला जगतीं । परि कांहींसा उपाय ॥ ४३ ॥
कलीनें बुद्धि भारली । कलीनें क्षिति व्यापिली ।
प्रथम चरणीं गति झाली । प्रत्यक्ष पहा ॥ ४४ ॥
वर्णाश्रमधर्म राहिला । मतामतांचा गलबला ।
मूर्तिपूजेसी कंटाळला । प्राणी दिसे ॥ ४५ ॥
काम्यकर्में कांही राहिलीं । नैष्कर्म्यता समूळ गेली ।
धर्ममर्यादा शिथिल झाली । रूढी पडल्या अनेक ॥ ४६ ॥
देश सुपीक साजिरा । तेणें आळसा झाला थारा ।
धनिकसुत दिसे बरा । परि बहुधा गुणहीन ॥ ४७ ॥
आळसें आला करंटपणा । धूर्त मारिती टोमणा ।
अन्नवस्त्रा बापुडवाणा । होवोनि गेला ॥ ४८ ॥
करूं नये तेंचि करिती । भ्रष्टाकार माजविती ।
कोठेंही मिळेना शांति । मति भ्रष्ट जाहली ॥ ४९ ॥
उदरपूर्तीकारणें । लागे नीचसेवा करणें ।
योग्यायोग्य कोण जाणे । धनसंग्रह मुख्य काज ॥ ५० ॥
सत्य विश्वास उडाला । असत्य अविश्वास भरला ।
कामिकांचा सुकाळ झाला । आपपर नेणती ॥ ५१ ॥
एवढेंच मानिती भाग्य । तेंचि पुरुषार्थाचें अंग ।
कुलकलंक निःसंग । नारीनर किती झाले ॥ ५२ ॥
अधर्में धरणी पिकेना । पिकतां खाऊं देईना ।
निःशक्तासी रोग नाना । नवे नवे उद्भवती ॥ ५३ ॥
प्रथमचरणीं ऐसी स्थिती । अंती होईल कोण गती ।
पशुसम मानव होती । प्रज्ञाबल तेजहीन ॥ ५४ ॥
पुराणें सांगती बहुत । पुनरावृत्ति नको येथ ।
कार्यकारण ऐसें कथित । श्रोतीं रोष न धरावा ॥ ५५ ॥
अधर्मा आणिक कारण । धनसंचय मुख्य ध्येय जाण ।
त्यालागीं वेंचिती प्राण । आणि घेती इतरांचे ॥ ५६ ॥
पोटचें मांस विकून खाती । वयसीमाही न पाहती ।
त्यांच्या जिण्या पडो माती । वृद्धां विवाहीं देती बालिका ॥ ५७ ॥
तेणें घडती अनाचार । कुलक्षय झाले फार ।
भेसळ जाती अनिवार । होवोनि गेल्या ॥ ५८ ॥
उद्भव तैसा अंकुर । तैसी बुद्धी आणि विचार ।
पाखांड माजलें फार । धार्मिकासी निंदिती ॥ ५९ ॥
धर्म झाला दुबळा । रूढीनें विसंग पावला ।
परकीयांनीं लाग साधिला । छिद्रें शोधूं लागले ॥ ६० ॥
दीन दारिद्र्यें पीडिले । अथवा धनाशे जे भुलले ।
मायिक वैभवासी भाळले । तयां तयां भ्रष्टविती ॥ ६१ ॥
विहित आचार कळेना । रूढींत तत्त्व मिळेना ।
कळतें तेंहि वळेना । विषयासक्तीचेनि योगें ॥ ६२ ॥
देह विषय-व्यसनाधीन । तेणें अत्यंत जाहला क्षीण ।
पद्मपत्रींचें जीवन । तैसें आयुष्य जाहलें ॥ ६३ ॥
लहान शिकविती थोरास । मिथ्या म्हणती वेदश्रुतीस ।
स्त्रिया ठेविती पतीस । सत्तेखालीं आपुल्या ॥ ६४ ॥
सूकरी बहुत प्रसवली । दुबळी संतती वाढली ।
अल्पकाळीं मुखीं पडली । महाथोर मृत्यूच्या ॥ ६५ ॥
रोगें आयुष्य क्षीण झालें । जोडपें विजोडतां पावलें ।
पुनरावृत्ति करूं लागले । पशु जैसे ॥ ६६ ॥
आणिकही बहुत प्रकार । लिहितां ग्रंथीं ये विकार ।
खेचरी सृष्टी अनिवार । होवोनि गेली ॥ ६७ ॥
स्त्रीपुरुष दोघेजण । राहती पक्ष्यांसमान ।
आप्तइीष्ट बंधुजन । पर्वा न करिती कोणाची ॥ ६८ ॥
आहारविहार सात्त्विक । जावोन रजतमात्मक ।
राहतां बुद्धीही निःशंक । राजस तामस वाढली ॥ ७० ॥
रजप्रधान बुद्धि जाहली । सुखाची अति हांव सुटली ।
यांत्रिक कला निघों लागली । अधिकाधिक ॥ ७१ ॥
प्रवृत्तिज्ञान भेदयुक्त । भेद भेदा वाढवित ।
अष्टधेचा कर्दम बहुत । दुरत्यय मानवा ॥ ७२ ॥
जितुकें शोधोनि काढावें । तितुकें गूढचि स्वभावें ।
अनंतजन्म शिणावें । तरी ज्ञान पुरेना ॥ ७३ ॥
आदिमाया विश्वजननी । चौर्यांनशी लक्ष जीवयोनी ।
अनंत ब्रह्मांडे जिचेनि । सत्तामात्रें चालती ॥ ७४ ॥
पंचमहाभूतांचा मेळा । वासनाकर्दमा निराळा ।
प्रकृतिपुरुषांचा सोहळा । रामचि जाणे ॥ ७५ ॥
असो राजस ज्ञान फोंफावलें । तमोमिश्रित भ्रष्ट झाले ।
चित्तशुद्धीसी मुकले । धन्य कलियुगाची ॥ ७६ ॥
येथें जे स्मरले राम । तेचि पावले विश्राम ।
सर्वां घटीं आत्माराम । आदिअंतीं निर्मळ ॥ ७७ ॥
रामभक्त सद्‌गुरुराय । सद्धर्मा करिती साह्य ।
पुढील समासीं तेंचि ध्येय । श्रोतेजनीं परिसावें ॥ ७८ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय नववा
समास दुसरा

अधर्म वाढिला गहन । अति बळावले दुर्जन ।
साधुसंतांचे छळण । मांडिलें बहुत ॥ १ ॥
कुलस्त्रिया भ्रष्टविती । सद्धर्मासी निंदिती ।
धेनू कसाया अर्पिती । हायहाय दुर्दिन ॥ २ ॥
कित्येक कन्याविक्रय करिती । बहु परधर्म स्वीकारिती ।
स्वधर्मीं आचार सांडिती । राहिले आडनांवाचे ॥ ३ ॥
कांहीं केवळ श्रद्धावान । आदरें करिती स्वधर्माचरण ।
परि मार्गदर्शक त्यांलागुन । अनुभवज्ञानी मिळेना ॥ ४ ॥
बाह्यस्थिति विपरित । तेणें चित्त होय विस्खलित ।
श्रद्धा डळमळोनि साधनीं येत । अनिवार विक्षेप ॥ ५ ॥
बोलके पंडित ते किती । धर्मज्ञानी म्हणविती ।
परि आचार आणि नीति । विपरीत दिसे ॥ ६ ॥
असो ऐशा समयाला । सद्‌गुरुमहाराज अवतरला ।
बहुतांसी आश्रयो झाला । तेंचि पुढती कथन करूं ॥ ७ ॥
हिंसाधर्मी वाढले जन । नित्य करिती पशुहनन ।
बळेंच विरुद्धाचरण । करावया सुख वाटे ॥ ८ ॥
हृदयस्थ जनार्दन । हें शास्त्राचें वचन ।
जीवशिवांचा योग जाण । अतिनिकट ॥ ९ ॥
जीवमात्र जगदीश्वर । ऐसा शास्त्रांचा विचार ।
देहममत्व अनिवार । लागे मायासंयोगें ॥ १० ॥
देहासी करितां दंडण । जीवासी दुःख होत दारुण ।
पाहावें प्रत्यक्ष प्रमाण । आपुलेपाशीं ॥ ११ ॥
यास्तव अहिंसा मुख्य नेम । त्यांतहि भेद असती सूक्ष्म ।
सत्त्वप्रधान निरुपद्रवी परम । ऐसे जीव तरी दुखवूं नये ॥ १३ ॥
श्रीहरीची पूजास्थाने । गाई ब्राह्मण वन्हि जीवने ।
अतिथि प्रतिमास्थानें । वृक्षादी अनेक ॥ १४ ॥
यांतीलही मुख्य गाय । आम्हां भारतीयांची माय ।
तिचा करोनि विक्रय । घात करिती आपुला ॥ १५ ॥
माय देती कसाबाहातीं । त्यांच्या जिण्या पडो माती ।
तिच्या उपकारातें नेणती । अज्ञानांध जन झाले ॥ १६ ॥
वेद शास्त्रें वर्णिती कीर्ती । तेहतीस कोटी देव वसती ।
रोमरंध्री ऋषि राहती । ऐसी धेनू पवित्र ॥ १७ ॥
ब्रह्मा विष्णु महेश । पाठीं पोटीं मुखास ।
चंद्र सूर्य नेत्रांस । राहोनिया शोभविती ॥ १८ ॥
अष्टदिक्पाळ भैरव । आदित्यादि ग्रह सर्व ।
तेहतीस कोटी राहती देव । उदरामाजीं जियेच्या ॥ १९ ॥
मूत्रस्थानीं गंगा राहे । पय प्रत्यक्ष अमृत पाहे ।
पृच्छीं नाग शोभताहे । धन्य जियेचें दर्शन ॥ २० ॥
जियेचे जिणें परोपकारी । जी सदा निर्विकारी ।
पुत्रपौत्रांसहित चाकरी । मानवाची करितसे ॥ २१ ॥
तेचि मानव निष्ठुरपणें । कृत्य करिती लाजिरवाणें ।
वत्सापरी पय सेवणें । परि उपकार फेडिती गळफांसे ॥ २२ ॥
पुत्र क्षेत्र सोज्वळ करी । धान्यराशी पडती घरी ।
दुष्ट तयांसी संहारी । वाहवा रे युगधर्म ॥ २३ ॥
जियेचें मलमूत्र आणि पय । अगणित उपकार हेंचि ध्येय ।
शरीरस्वास्थ्याची सोय । निर्मिली देवें ॥ २४ ॥
पयःपान जे करिती । आयुष्यबळ आणि मति ।
वाढोनिया मनोगति । स्थिर होय ॥ २५ ॥
अपस्मारादि भ्रमरोग । रक्तदोषीं अनंत भोग ।
जीर्णज्वर पांडुरोग । क्षयादि नाश पावती ॥ २६ ॥
हृदय संबंधी विकार । मूत्रकृच्छ पित्त विखार ।
दाहोन्माद श्रमपरिहार । अमृत मर्त्यलोकींचे । २७ ॥
तैसेचि बहुरोगांसी पथ्यकर वदती । भिषगृषि ।
बालतरुणवृद्धांसी । अनायासे पचतसे ॥ २८ ॥
सर्वांसी दे समाधान । रुचिकर मधुर असे जाण ।
देवाप्रिय सत्त्वप्रधान । गोदुग्ध जाणावें ॥ २९ ॥
मायदूध दोषी झालें । तरी गोदुग्ध पाजिती भले ।
दुजी माय नेणोनि भ्रमले । आश्चर्य वाटे ॥ ३० ॥
तैसाचि गोमूत्रप्रताप । दर्शनें हरतें पाप ।
प्राशनें निरसे बहु ताप । व्याधिजन्य विकार ॥ ३१ ॥
सेवितां वाढते बुद्धि । औषधांमाजी महौषधि ।
कफ आणि वात व्याधी- । पासोनि करी निर्मुक्त ॥ ३२ ॥
कुष्ठ गुल्म आणि उदर । पांडु अर्श कंडू विकार ।
नेत्ररोग सांथीचे ज्वर । पाठवी दूरदेशीं ॥ ३३ ॥
क्षार रक्तशुद्धि करित । नाना जंतू निवारित ।
अरुचि घालवूनि आल्हाद देत । मानवासी गोमूत्र ॥ ३४ ॥
गोमय तेंही प्रसिद्ध । देव महानुभाव सिद्ध ।
सर्वांसी प्रिय असे शुद्ध । महिमा किती वर्णावा ॥ ३५ ॥
हवा शुद्ध करावयासी । दुजी वस्तु नसे ऐसी ।
मत्कुणादि कृमींसी । हौऊंच नेदी ॥ ३६ ॥
पय प्रधान पित्तनाशी । मूत्र कफातें निरसी ।
गोमय वात शुद्धीसी । करतें मानवहितार्थ ॥ ३७ ॥
ऐसी ही मायधेनु । साक्षात्‌ हीच कामधेनू ।
उपकृतीवांचूनि आनु । कार्य नसे जियेचें ॥ ३८ ॥
जे जे इचा घात करिती । ते आपुलाचि घात योजिती ।
ऐसें इतिहास सांगती । दृष्टी फिरवा माघारी ॥ ३९ ॥
परि या कलीची राहटी । पुराणेंच म्हणती खोटी ।
तेथें काय सांगाव्या गोष्टी । दृष्टांतरूपें ॥ ४० ॥
परि प्रत्यक्ष उपयोग होतो । हा तरी प्रत्यय येतो ।
म्हणोनि सकळांसी विनवितो । उपेक्षा न करा धेनूची ॥ ४१ ॥
असो इतुके सांगावया काज । गोपालक महाराज ।
गोरक्षण धर्मबीज । असे एक ॥ ४२ ॥
प्रसिद्ध क्षेत्र म्हसवडासी । हाट भरे प्रतिसप्ताहासी ।
धेनु नेती गळफांसी । दुष्ट कसाब कितीएक ॥ ४३ ॥
सद्‌गुरु तेथें जावोनी । सांगती तें मोल देवोनी ।
असंख्य धेनू आणिती सदनी । वारंवार ॥ ४४ ॥
भव्य गोशाळा बांधोन । आदरें करिती संरक्षण ।
अभ्यंकर कारकून । नेमिले तयावरी ॥ ४५ ॥
वरचेवरी किती येती । गोप्रदानें किती जाती ।
पाहतां वाटे ही शक्ति । मानवी नव्हे ॥ ४६ ॥
सुकाळीं नेती पाळावयासी । दुष्काळीं सोडिती गुरुपाशीं ।
वेंचिति किती धनराशी । देव जाणे ॥ ४७ ॥
गंगी नामें गाय लंगडी । कदाही गुरूची पाठ न सोडी ।
दर्शनाची अति गोडी । पशूसही वाटतसे ॥ ४८ ॥
गोशाळेंत सद्‌गुरुस्वारी । जाऊनि बैसे वरचेवरी ।
झाड लोट करिती साजिरी । स्वहस्तें आनंदें ॥ ४९ ॥
गोसेवा करावयासी । लाविले महारोगियांसी ।
मुक्त झाले बहुतांशी । गोसेवासुकृतें ॥ ५० ॥
गाईची सेवा करितां । संतुष्ट होती समस्त देवता ।
ग्रहपीडा न बाधे सर्वथा । मनकामना सफल होय ॥ ५१ ॥
धेनुमाय जयाचे गृहीं । पयःपान करिती पाहीं ।
गोमयें सारविती मही । सडे घालिती साजिरे ॥ ५२ ॥
क्वदित्‌ गोमूत्र सेविती । धेनुसन्निध वास करिती ।
तयांची प्रगल्भ होय मति । निरोगी राहती सर्वकाळ ॥ ५३ ॥
सत्त्वगुण नांदे तेथें । संतति बळवान होते ।
भाग्य नाही शांतीपरतें । भोगिती तें अनायासें ॥ ५४ ॥
वांझ स्त्री गाईची सेवा करी । तरी पुत्र खेळतील तिचे घरी ।
गोप्रदानें यमपुरी । वैतरणी ने पैलपार ॥ ५५ ॥
द्विमुख गाईसी प्रदक्षिणा । घालितां त्रिभुवनासी जाणा ।
प्रदक्षिणेचें फल तयांना । मिळेल निश्चयें ॥ ५६ ॥
सवत्स धेनु दान करितां । पृथ्वीदानफल ये हाता ।
दान घे त्यासी समर्थता । असावी मात्र ॥ ५७ ॥
गाईसी घालितां चारा । सुख होईल समस्त पितरां ।
आशीर्वाद देती तया नरा । पुत्रधनसमृद्धि ॥ ५८ ॥
वासुदेव स्वयें सेवा करित । तेथें मानवाची काय मात ।
दत्त गोरक्ष समर्थ । ऋषि सिद्ध महामुनी ॥ ५९ ॥
असो गोसेवा ऐसी । सद्‌गुरु करिती आदरेंसी ।
करविती, बोधिती सकलांसी । गोशुश्रूषा करावी ॥ ६० ॥
एकदां ऐसा प्रकार घडला । खाटिक आले गोंदावलीला ।
संगे घेवोनि धेनूंला । वधायासी चालिले ॥ ६१ ॥
मार्गें गोंदावलीस येता । वार्ता कळली सद्‌गुरुनाथा ।
पाचारूनि तयां समस्तां । वदती ’गाई न न्याव्या ॥ ६२ ॥
यांचे मोल आम्ही देतों । आदरें सर्व संरक्षितो ।
तुम्हांसीही ऐसें कथितों । मायवध न करावा ॥ ६३ ॥
चिंताग्रस्त झाल्या दिसती । पुढील भविष्य आणोनि चित्तीं ।
दीनवदनें करुणा भाकिती । हाय हाय युगधर्म ॥ ६४ ॥
अश्रु ढाळिती नयनांतुनी । गोड न लागे अन्नपाणी ।
दिसूं लागली यमजाचणी । प्राणांतसमयाची ॥ ६५ ॥
जीव प्रिय सकलांसी । कल्पना करा तुम्हीं मानसीं ।
भेट झालिया व्याघ्रासी । काय अवस्था होईल’ ॥ ६६ ॥
कसाई वदती निष्ठुर । ’अज्ञानी पशु हे साचार ।
कोठला यां ज्ञानविचार । असेल तरी दावावें ॥ ६७ ॥
निर्बंधन करूनि चारा । घलितों, तुम्ही हांका मारा ।
जरी असेल ज्ञानझरा । तरी धांवोन येतील ॥ ६८ ॥
धांवोन येतां समस्त । सोडून देऊं नेमस्त ।
ना तरी शीघ्र वधाप्रत । नेऊं सत्य जाणावें’ ॥ ६९ ॥
सद्‌गुरु तया रुकार देती । दुष्ट कसाई तैसें करिती ।
दूर राहोन पाचारिती । नामें घेवोन गुरुराव ॥ ७० ॥
’गंगे यमुने गोदावरी । तुंगे कृष्णे या सत्वरीं ।
कपिले वारणे आणि मधुरी । दासासमीप धांवा गे’ ॥ ७१ ॥
ऐसें वदतां ते अवसरीं । धांवोन आलीं तीं सारीं ।
कोणी शेंपूट उभारी । कोणी फोडी हंबरडें ॥ ७२ ॥
चरण चाटोन क्षालन करिती । कोणी मुखाकडे पाहती ।
कांही उगाच हुंगिती । सद्‌गुरुराजयांसी ॥ ७३ ॥
भोंवती धेनूंचा समुदाव । मध्यें शोभे सद्‌गुरुराव ।
वाटे दुजा वासुदेव । वृंदावनीं उभा असे ॥ ७४ ॥
असो ऐसी घडतां स्थिति । अनुताप पावले दुर्मति ।
ढळढळां अश्रु ढाळिती । आम्ही अतिपातकी म्हणोनी ॥ ७५ ॥
सद्‌गुरु केवळ दयामूर्ती । सकळांसी भोजन घालिती ।
’पुनरपि ऐसी नीचवृत्ती । तुम्ही सर्वथा न करावी’ ॥ ७६ ॥
असो मोल देवोनि तयांसी । पाठविलें स्वसदनासी ।
ऐशी आस्था श्रीगुरूंसी । धेनूविषयीं अतिशय ॥ ७७ ॥
कृष्णराव गांवकामगार । धनगरी भिकवडीकर ।
श्रीगुरुपासोन चार । नेती पाळावया ॥ ७८ ॥
परि बहु अनास्था केली । जनावरें मरों घातलीं ।
दृष्टांत होय ते काळीं । गाई माघारीं पोंचवाव्या ॥ ७९ ॥
वदती चालण्या शक्ति नाहीं । तरी रामतीर्थ लवलाहीं ।
देवोन पोंचवी पाहीं । अनास्था त्वां बहु केली ॥ ८० ॥
गायी येतां गळां पडती । भारी भोगिल्या विपत्ती ।
येक गाय रामापुढती । मरतां गंगा घातली ॥ ८१ ॥
करविती सकलां नामगजर । गुरुक्षेत्र वाटे काशीपुर ।
अंतकाळीं गुरुवर । प्राणियां देती सद्‌गति ॥ ८२ ॥
वामनराव पेंढारकर । मोरगिरी मंदिरींचे भक्त थोर ।
त्यांचे पुत्राचा समाचार । श्रोतेजनीं परिसावा ॥ ८३ ॥
बहुतांदिवशीं सुत झाला । परि देहव्याधीनें पीडिला ।
गुरुदर्शना आणिला । गोंदावलेग्रामीं ॥ ८४ ॥
काळवेळ जवळी । ती श्रींनी जाणितली ।
गंगा घातली मुखकमळीं । तुळशी कर्णरंध्रांत ॥ ८५ ॥
पित्याहस्तें गोप्रदान । स्वसंकल्पें देववोन ।
अज्ञान अर्भका उपदेशोन । वैकुंठासी धाडिती ॥ ८६ ॥
रामापुढती ठेवोन । म्हणती करा सर्वही भजन ।
दशदानें देववोन । बाळ नेलें मोक्षासी ॥ ८७ ॥
ब्रह्मानंद स्वहस्तेंसी । दहन करिती बालकासी ।
कर्पूर तुळशी चंदनासी । इंधनीं त्या घालोन ॥ ८८ ।
मायबाप असोन जावळी । अश्रु न ढाळिती ते वेळीं ।
महदाश्चर्य मानिती सकळी । धन्य गुरूंचे बोधामृत ॥ ८९ ॥
लग्नसोहळा मृतसोहळा । गुरुगृहीं एकचि लीला ।
मायोद्भवविकाराला । पुसे कोण ॥ ९० ॥
एकदां ऐसें झालें । मंदिरापुढती गाढव पडलें ।
प्राणांतव्याधीनें ग्रासिलें । दैवें आलें संतद्वारीं ॥ ९१ ॥
यमपाशी जीव ओढे । लोभें देहींच तडफडे ।
शिष्यें कथितां पवाडे । दयासागर ते ठायीं ॥ ९२ ॥
गंगा घालोन मुखांत । अंगावरोन फिरविती हात ।
पवित्र नामगजरांत । सद्‌गति देती तयासी ॥ ९३ ।
येणें प्रकारें बहुतांसी । अंतीं नेती सद्‌गतीसी ।
ग्रंथविस्तारभयासी । धरोन संकेत दाविला ॥ ९४ ॥
सकळां भूतीं दया समान । परि आदरें गोशुश्रूषण ।
करिती काल जाणोन । श्रोते पुढतीं अवधारा ॥ ९५ ॥
दुजें देवपूजास्थान । गरीब सत्पत्र ब्राह्मण ।
अतिथी मानवी अन्नदान । करिती पुढें परिसावें ॥ ९६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय नववा
समास तिसरा



अन्न म्हणजे ब्रह्म पूर्ण । जीवन तो नारायण ।
अन्नभोक्ता भगवान । जठरानलरूपी ॥ १ ॥
अन्न जीवा रक्षण करतें । अन्न जीवा शांतवितें ।
दान नाहीं यापरतें । त्रिभुवनीं आणिक ॥ २ ॥
जीवन जीवासी जीववितें । जीवन जीवरूप निरुतें ।
जीवन वदतांच आल्हाद देतें । प्राणिमात्रांसी ॥ ३ ॥
क्षुधातृषेचें दुःख भारी । झोंबतें प्राण्या दोप्रहरीं ।
यादुःखाची सरी । दुज्या कशाशी नसे ॥ ४ ॥
अन्नदाता पितया समान । अन्नदाता धार्मिक गहन ।
अन्नदाता श्रेष्ठ पूर्ण । दातयांमाजी ॥ ५ ॥
अन्नदानें प्रायश्चित्त घडे । अन्नदानें दोष उडे ।
अन्नदानें सुकृत जोडे । व्याधी हरती अन्नदानें ॥ ६ ॥
अन्नदानें देवतांसी । अन्नदानें पितरांसी ।
अन्नदानें भूतांसी । आनंद होय ॥ ७ ॥
बहुत करितां द्रव्यदान । अथवा अमोल वस्तुदान ।
तरी तृप्ति अन्नदानासमान । आणिक कोठें आढळेना ॥ ८ ॥
सकळ जीवां अन्नदान । करणें हें उचित जाण ।
सामर्थ्य नसतां त्यांतही प्रधान । कथिती तें परिसावें ॥ ९ ॥
संन्यासी अतिथि ब्रह्मचारी । भुकेनें पीडित नीच जरी ।
विप्र विद्यार्थी सदाचारी । साधक सिद्ध संतजन ॥ १० ॥
अडचणींत गवसला जो देख । पोटार्थी देशसेवक ।
पांथिक अज्ञान अर्भक । व्यंग दीन परोपकारी ॥ ११ ॥
आणि जीं देवतामुखें । अग्नि जीवन धेन्वादिकें ।
त्यांसी अन्न अर्पितां निकें । अगणित सुकृत हातीं ये ॥ १२ ॥
जे वेदविद्या पठण करिती । जे अध्यात्मज्ञानें रंगोनि जाती ।
ज्यांसी बाणली वैराग्यस्थिति । तयां अन्न देतां भलें ॥ १३ ॥
पशुपक्ष्यादिकांसी । अन्न द्यावें विवेकेंसी ।
भुकेजल्या व्याघ्रासी । मास कधी अर्पू नये ॥ १४ ॥
विप्र असावा सदाचरणी । ब्रह्मचारी वेदपठणी ।
अहिंसायुक्त अन्न सदनीं । असेल तें अर्पावें ॥ १५ ॥
हिंसा म्हणजे परपीडा । चोरी लबाडी घात, हे सोडा ।
युक्त अन्न देतां जोडा । सुकृतासी दुजा नाहीं ॥ १६ ॥
अनंत सुकृतांच्या राशी । तरी घडे अन्नदानासी ।
तृप्ती नाहीं यासरसी । आणिक कोठें ॥ १७ ॥
सद्‌गुरु आम्हांसी वदती । विप्रोच्छिष्टें जे काढिती ।
तयांचीं उच्छिष्टें श्रीपती । स्वहस्तें काढितसे ॥ १८ ॥
सद्‌गुरुगृहीं सर्वकाळ । अन्नाचा होत सुकाळ ।
किती शमविती जठरानल । त्याची गणती असेना ॥ १९ ॥
मुमुक्षु साधक सिद्ध । थोर थोर येती प्रसिद्ध ।
वैदिक शास्त्री आणि वैद्य । विद्वज्जन कितियेक ॥ २० ॥
बहुत येती अन्नार्थी । स्त्रियां लेकुरां नसे मिती ।
चिंताग्रस्त तृप्त होती । धनिक आणि सदिच्छ ॥ २१ ॥
नित्य असे मुक्तद्वार । उपवासी न रहावा नर ।
येविषयीं खबरदार । असती सतत ॥ २२ ॥
गांवोगांवींचे येती नर । कोणी भिडस्त आळशी विसर ।
राहती, म्हणोन वरचेवर । निमंत्रणें पाठविती ॥ २३ ॥
इतुक्याही देतां सूचना । क्वचित्‌ कोणी राहतां जाणा ।
सर्वज्ञ ते सांगती खुणा । अमुक गृहस्था बोलवावें ॥ २४ ॥
धनिक विद्वान आणि दीन । सकळांसी एकचि अन्न ।
स्वहस्तें प्रसाद देऊन । जेवूं घालती अतिप्रीती ॥ २५ ॥
गुरुवारी समाराधना । नित्य होत उपासना ।
विप्रकुटुंबें गांवची जाणा । सकल जेवूण घालिती ॥ २६ ॥
गांवभोजनें ती किती । वरचेवरी अनेक होती ।
अठरापगड याती मिळती । तृप्त होती गुरुगृहीं ॥ २७ ॥
गोंदवलें गांव अति लहान । तेथें बाजार सुरू करोन ।
गुरुप्रिय गुरुवार जाणोन । नेमून दिला ॥ २८ ॥
कित्येक बाजार दिवशीं । पाचारती बाळा पाटलासी ।
वदती आज श्रीरामासी । नैवेद्य असे ॥ २९ ॥
मनुष्य न सोडावा बाजारी । जेवूं घाला पोटभरी ।
तदनंतर गांवची सारीं । रामप्रसाद सेवावा ॥ ३० ॥
कोणी शिधासाहित्य देती । काहिली चुलाणीं ठेवती ।
पुरुष इतर पाक करिती । स्त्रिया भाजिती पुरणपोळ्या ॥ ३१ ॥
चुलींच्या करिती हारी । वाटे यात्रा ही साजिरी ।
सत्ताधीश गुरूचे घरीं । गांवोगांवची भरलीसे ॥ ३२ ॥
असो बाजारी जेवोन जाती । मग गांवची सकल येती ।
स्वहस्ते श्रीगुरु वाढिती । आग्रहातें करकरोनी ॥ ३३ ॥
तो सोहळा अपूर्व । जेथें नांदे गुरुराव ।
प्रसादा येती वाटे देव । मनुष्यवेष घेवोनी ॥ ३४ ॥
आणि उत्साहीं विशेष । यात्रा भरे गोंदवलेस ।
तेसमयीं अन्नदानास । गणती कोण करील ॥ ३५ ॥
नित्य उत्साह गुरुगृहीं । त्यांतही विशेषत्वें पाहीं ।
परिसा श्रोते सर्वही । एकचित्तें गुरुमहिमा ॥ ३६ ॥
चैत्र शुद्ध नवमीसी । यात्रा भरे दहा दिवसीं ।
आषाढ शुद्ध पौर्णिमेसी । नामसप्ताह गुरुघरचा ॥ ३७ ॥
गुरुपूजेचा तो दिवस । धांवोन येती सकल शिष्य ।
सोहळा तो विशेष । आनंद न समाये अंतरी ॥ ३८ ॥
माघमासीं दासनवमी । उत्साह होत गुरुधामीं ।
झोळी कुबडी जे नेमी । दिक्षाधारी करिती भिक्षा ॥ ३९ ॥
एकनाथ नामदेव तुकाराम । पुण्यतिथीचा सोहळा परम ।
जयंत्या सण नित्यनेम । महाप्रसाद होतसे ॥ ४० ॥
जपानुष्ठानसांगता किती । उपनयनें विवाह होती ।
बारशादी संस्कार चालती । नित्य पोळी गुरुगृही ॥ ४१ ॥
भोजनाआधीं ’जय जय श्रीराम’ । या घोषाचा असे नेम ।
मध्यें श्लोक आर्याही सुगम । प्रेमानंदें गर्जती ॥ ४२ ॥
नामस्मरणी भोजन करतां । कित्येकांच्या हरल्या व्यथा ।
प्रसादरुचि न ये वर्णितां । भाविकांसी अति प्रिय ॥ ४३ ॥
व्याधिपीडित जनांसी । रामतीर्थ औषधी खाशी ।
प्रसाद देता पथ्यासी । रोगमुक्त व्हावया ॥ ४४ ॥
सद्‌गुरूंचे चरणतीर्थ । सेवितां समाधान होत ।
नित्य घेती गुरुभक्त । अत्यानंदें ॥ ४५ ॥
प्रसादें रोग जाती । प्रसादें चित्तशुद्धी होती ।
प्रसादें वाढे भगवद्भंक्ति । महिमा किती वर्णावा ॥ ४६ ॥
प्रसादें अन्नपूर्णा प्रसन्न । कदापिही न पडे न्यून ।
तोही प्रकार सांगेन विशद करोनी ॥ ४७ ॥
प्रातःकाळी पाक करिती । सामुग्री घेती उपस्थित जनांपुरती ।
दोप्रहरीं भक्त येती । क्वचित्काळीं अनेक ॥ ४८ ॥
शेंदीडशें लोक येती । त्यांतचि देखा तृप्त करिती ।
ऐसे गुरु कौतुक दाविती । महदश्चर्य कलियुगीं ॥ ४९ ॥
ब्रह्मानंदांसी दर्शन । द्यावया कर्नाटकीं जाण ।
गेले, तेथें एक शेर अन्न । शतकांसी पुरविले ॥ ५० ॥
तैसीच उपहाराची स्थिति । अल्प परि सकळां वाढिती ।
ऐसे प्रकार नित्य घडती । अन्नपूर्णा वास करी ॥ ५१ ॥
इंदुरी असतां गुरुवर । दुष्काळ पडला असे थोर ।
तेव्हां श्रींचे द्रवलें अंतर । जेवूं घालिती गरिबांसी ॥ ५२ ॥
किती लोक आले धाले । किती अन्न खर्च झाले ।
हिशेब कोणा न कळे । गुरुगृहींचा ॥ ५३ ॥
हिशेब केवळ भाजीचा । राखिला कोणी समयाचा ।
जाहला बहुत शतकांचा । आश्चर्य वाटे सकळांसी ॥ ५४ ॥
गोंदावलीस असतां किती । वारकरी जेवूं घालिती ।
शिबिका दिंड्या मार्गावरती । येतां आदरें जेवविले ॥ ५५ ॥
भोजनाचा ऐसा प्रकार । क्वचित्‌ केवळ मीठभाकर ।
क्वचित्‌ पक्वान्नें मधुर । ऊर्मी एक राहीना ॥ ५६ ॥
कर्णासारखी दानशूरता । क्वचित्‌ दाविती हीनता ।
भिकार्याख पाशी भीक मागतां । लाभ काय होईल ॥ ५७ ॥
क्वचित्‌ भिक्षा मागती । क्वचित्‌ ग्रामभोजनें करिती ।
अंत कोणा न लागों न देती । ऊर्मी एक तगेना ॥ ५८ ॥
क्वचित्‌ कफनी भरजरीची । क्वचित्‌ कौपीन चिंधीची ।
खूण जाणा गुरुघरची । ” आहे आहे, नाही नाही” ॥ ५९ ॥
उदकपूर्ति तैशाच रिती । ज्ञानवापीतीराप्रति ।
घाट बांधोन कुंडें करिती । शीत स्वच्छ झर्यांयची ॥ ६० ॥
खालती वरती पाणी कमी । परि येथेंच वाहतसे नामी ।
ईशकृपा सद्‌गुरुधामीं । साच साच ॥ ६१ ॥
असो अन्नोदकाचा सुकाळ । नित्य करिती गुरुदयाळ ।
जपतां तयांची नाममाळ । तृष्णाताप निवेल ॥ ६२ ॥
व्याधिग्रस्तां वैद्य मिळाला । भूतखेतां मांत्रिक झाला ।
दरिद्रियांसी धनिक भेटला । गुरुराजयोगी ॥ ६३ ॥
आन्नार्थियांसी अन्नदाता । वेदांतियांसी सर्वज्ञता ।
धेनूंसी होय प्राणदाता । योगियां योग शिकवितसे ॥ ६४ ॥
नास्तिकां साधनीं लावित । साधकां सिद्ध करित ।
भाविकांसी दावोनि देत । निजरूप ॥ ६५ ॥
भाविक नास्तिक हठयोगी । यांसी लावितसे सन्मार्गीं ।
ऐसी माय भेटली जगीं । तो येक धन्य पुरुष ॥ ६६ ॥
असो साधका साधन करावयासी । मंदिरें बांधविती कैसीं ।
हेंचि कथा पुढील समासी । श्रोते हो द्यावें अवधान ॥ ६७ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय नववा
समास चवथा



ब्रह्मचैतन्य सद्‌गुरुराणा । सकलां सांगे उपासना ।
मुख्य स्मरणभक्ति जाणा । दुजी आत्मनिवेदन ॥ १ ॥
आणिक ज्या उरल्या भक्ति । त्यांकारणें मंदिराप्रति ।
पाहिजें जाणोन चितीं । करविती अनेक ॥ २ ॥
भक्तीचे नवविध प्रकार । श्रवण कीर्तन नामगजर ।
सेवा अर्चन नमस्कार । दास्य सख्य निवेदन ॥ ३ ॥
घडतां नवविधा भक्ती । सहज मिळे जीवा शांति ।
नवविध भक्ति सहज घडती । मंदिरांमाजी ॥ ४ ॥
मंदिरीं पुराणश्रवण घडे । मंदिरीं कीर्ति डोळ्यांपुढें ।
स्मरण तें मागें पुढें । सहजचि राही ॥ ५ ॥
मंदिर बांधाया काज । सद्बोाध हेंचि एक बीज ।
बोधकर्ता गुरुराज । दृष्टीसमोर उभा ठाके ॥ ६ ॥
मंदिर असावें मलरहित । मंदिर असावें शोभिवंत ।
येणें ध्यासें सेवा घडत । वंदन पहा प्रत्यक्ष ॥ ७ ॥
दर्शन घेतां मंदिरांत । तूं देव मी भक्त ।
ऐसा दास्यभाव उमटत । आपोआप ॥ ८ ॥
आमुचा देव आमुचा धर्म । आमुची याती आमुचा नेम ।
आमुचे म्हणतांच सख्य परम । अंतरीं वसे ॥ ९ ॥
मंदिरीं वसे देवमूर्ति । कैसें स्वरूप कैसी व्याप्ति ।
कैसेनि घडे भगवद्भक्ति । अनन्य जिज्ञासा होतसे ॥ १० ॥
जिज्ञासु करी श्रवण मनन । तेणें निजध्यास चाले गहन ।
निजध्यासें आत्मनिवेदन । नववी भक्ति घडतसे ॥ ११ ॥
असो ऐशा नऊही भक्ति । मंदिरीं साधका सहज घडती ।
याकारनें गुरुमूर्ति । मंदिरें स्थापिती अनेक ॥ १२ ॥
मंदिर खरी धर्म धर्मशाळा । मंदिर उपासका जिव्हाळा ।
मंदिर आनंदाचा मळा । शिणल्या भागल्या जीवासी ॥ १३ ॥
मंदिरीं अन्नदान घडतें । मंदिरीं मैत्री दुणावते ।
संत महंत भेट होते । सहज श्रीमंदिरीं ॥ १४ ॥
देशज्ञान कालज्ञान । नाना तीर्थक्षेत्रांचे ज्ञान ।
येणेंचि रीती समाधान । बहुप्रकारें ॥ १५ ॥
मंदिर बांधितां ससाहित्य । उभय कुळें उद्धरत ।
स्वयें करून करवित । उपासना बहुतांकरवीं ॥ १६ ॥
ऐसीं मंदिरें सद्‌गुरु बांधिती । परिसा जीं उभविली शिष्या हातीं ।
हर्दा येथें बांधविती । रावसाहेब यांचेकरवीं ॥ १७ ॥
महादेवभट्ट इंदुरवासी । पूजा करिती अहर्निशीं ।
शेती पूजासाहित्यासी । दिधली असे ॥ १८ ॥
बेलधडीस ब्रह्मानंद । स्थापिती रामप्रासाद ।
बिदरहळ्ळी व्यंकटापुरीं प्रसिद्ध । मंदिरें बांधिलीं तयांनी ॥ १९ ॥
आनंदसागरें जालनामठीं । स्थापिले श्रीराम जगजेठी ।
यात्रा महोत्सव दाटी । श्रीरामनवमीसी ॥ २० ॥
अंबड येथें दुसरें मंदिर । स्थापना करिती आनंदसागर ।
महोत्सव यात्रा गजर । रामसंप्रदाय वाढविला ॥ २१ ॥
प्रसिद्ध मंदिर पंढरपुरी । जी विठ्ठलाची नगरीं ।
तेथें स्थापिलें कोदंडधारी । पाहतां हारपे तहानभूक ॥ २२ ॥
आप्पासाहेब भडगांवकर । मालक धनिक द्विजवर ।
मंदिर लहान परि सुंदर । नीळकंठबुवा पुजारी ॥ २३ ॥
महाभागवतांचे येथें । शिवालय पूर्वींच होतें ।
मागें स्थापिलें रामातें । हरिहरसंगम शोभतसे ॥ २४ ॥
सिद्धक्षेत्र कुरवली स्थान । तेथें मंदिर बांधिले विस्तीर्ण ।
दामोदरबुवा शिष्य जाण । सुप्रसिद्ध तयांनी ॥ २५ ॥
भाऊसाहेब जवळगीकर । यांजकरवीं श्रीमंदिर ।
बांधविलें शहरीं सोलापूर । उपासना करावया ॥ २६ ॥
तैसेंच मंदिर गिरवीसी । येसूकाकांचे हस्तेंसी ।
पूजा करिती पिलंभट्ट जोशी । श्रीगुरुआज्ञेनें ॥ २७ ॥
नानासाहेब धनिक वदत । विष्णुकाका साधकसंत ।
यांजकरवीं मांडवें येथे । राममंदिर करविलें ॥ २८ ॥
सावळाराम देशपांडे । दंडाधारी नोकर गाढे ।
श्रीमान्‌ भरले द्रव्यघडे । बोधें अनुताप पावले ॥ २९ ॥
तयांकरवीं श्रीराममंदिर । गोमेवाडी येथें सुंदर ।
बांधवोनि केला परिहार । दुष्कृतांचा सत्कर्में ॥ ३० ॥
विष्णु‍अण्णा कात्रे पंत । नोकरी सोडून झाले विरक्त ।
माधुकरी निर्वाह करूनि सतत । भजन करूं लागले ॥ ३१ ॥
दत्तउरपासना तयांनी । घेतली सद्‌गुरुपासोनी ।
दत्तमंदिर आटपाडी बांधोनी । सेवा करिती गुरुआज्ञें ॥३२ ॥
तेथेंचि राममंदिर । स्थापिती बुवा यज्ञेश्वर ।
जे गुरुंचे भक्त थोर । सिद्धपुरुष ॥ ३३ ॥
धनिक साधक गुणराशी । विष्णुपंत म्हासुर्ण्यासी ।
स्थापिती सीतावल्लभासी । गुरुआज्ञा घेउनी ॥ ३४ ॥
विद्वान्‌ शंकरशास्त्री यांसी । श्रींनी नेमिलें पूजेसी ।
सेवा करिती अहर्निशीं । भक्त साधक प्रसिद्ध ॥ ३५ ॥
वामनबुवा पेंढारकर । नामें श्रीगुरुकिंकर ।
मोरगिरी येथें मंदिर । रघुनाथाचें बांधिती ॥ ३६ ॥
करावया पूजोपचार । जगन्नाथ इंदूरकर ।
मदतीस देती गुरुवर । रामसंस्था चालवाया ॥ ३७ ॥
भक्त वासुनाना देव । कृष्णातटीं कर्हााड गांव ।
तेथें पूजिती रामराव । गुरुबोध सेवोनिया ॥ ३८ ॥
मंदिरीं महंत बापू चिवटे । सेवा करिती एकनिष्ठें ।
अतिथीच्या ठायीं ममत्व मोठें । आदरें करिती अन्नदान ॥ ३९ ॥
गणूबुवा रामदासी । कागवाडीं करिती मंदिरासी ।
तेथें मारुतीस्थापनेसी । महाराज करिती आनंदें ॥ ४० ॥
गोविंदशास्त्री पुराणिक । दत्तोपासक भाविक ।
सातारीं दत्तमंदिर देख । बांधिती गुरुआज्ञेनें ॥ ४१ ॥
चिदंबर नाईक करी । हे राममंदिर हुबळी शहरी ।
बांधोन करिती चाकरी । सद्‌गतीकारणें ॥ ४२ ॥
पुणें प्रांती उक्साण । तेथें विठ्ठलमंदिर जाण ।
तैसेंचि नरगुंदीं जीर्णोद्धरण । विठ्ठलमंदिराचें करविलें ॥ ४३ ॥
खातवळीं श्रीविठ्ठलमंदिर । तैसेंचि विखळें येथें सुंदर ।
मांजरड्यास रघुवीर । स्थापिती गुरुआज्ञें ॥ ४४ ॥
संत दप्तरदार विठ्ठलपंत । रसाळ कवित्व जगविख्यात ।
रामोपासक कर्हािडक्षेत्रस्थ । हो‍उनिया गेले ॥ ४५ ॥
त्यांच्या मूर्ति होत्या जरी । पाटण ग्रामीं स्थापविती घरीं ।
बाळकृष्ण महाजन सेवाधिकारी । उपासक श्रीगुरूंचे ॥ ४६ ॥
तैसेंच कोकणप्रांतांत । खेरडी नामक ग्रामांत ।
शेंबेकर वासुदेवाप्रत । आज्ञा जाहली श्रीगुरूंची ॥ ४७ ॥
उत्तम करोनि मंदिर । तेथें स्थापिले रघुवीर ।
सेवाकरिती मनोहर । पूर्व पातकें नाशाया ॥ ४८ ॥
सातपुड्यांत राममंदिर । निर्मिलें कैसें परिसा सुंदर ।
एकदां एकले गुरुवर । नर्मदातटीं चालले ॥ ४९ ॥
निबिड घोर कानन । भिल्लांची वसती तेथें गहन ।
पाहतां गुरुनिधान । धांवोन आले दुष्ट ते ॥ ५० ॥
सतेज दिसे भाग्यवंत । वदती भला हा श्रीमंत ।
जवळी जावोन पहात । तंव दिसे गोसावी ॥ ५१ ॥
श्रीगुरु कफनी काढोन । देती अंगावर फेंकून ।
वदती न व्हा उदासीन । ऊर्णावस्त्र मोलाचें । ५२ ॥
क्षण एक घडतांच सत्संगति । तयांसी झाली उपरति ।
सिद्धपुरुष हा निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागले ॥ ५३ ॥
आश्रम पुनीत कराया । कांही फलाहार घ्यावा ।
आम्हांसी प्रसाद द्यावा । म्हणोनियां विनविती ॥ ५४ ॥
तंव वदले श्रीगुरु । ’तुम्ही पातकी वाटमारू ।
तेथें आम्ही प्रसाद करूं । तरी दोष आम्हांसी’ ॥ ५५ ॥
परि आग्रह धरिला त्यांनी । गोठणीं जाती घेवोनी ।
’फळें देती आणोनी । अत्याग्रह मांडिला ॥ ५६ ॥
समर्थ वदती । फळें नको तुमचीं आम्हांसी ।
बहुत दिसती गाईम्हशी । पयःपान कांही करूं’ ॥ ५७ ॥
भिल्ल वदती ’दोहनवेळ । होवोन गेली जी दयाळ ।
रानटी जनावरें ओढाळ । या समयीं दूध न देती’ ॥ ५८ ॥
समर्थ वदती भिल्लांसी । ’ही लठ्ठ दांडगी महिषी ।
दोहन करूं इजसी । पात्र आणा सत्वरीं’ ॥ ५९ ॥
’छे, ही अति बुजरट । मारकी आहे बहु खट ।
तुम्ही न धरा हिची वाट । व्यंग करील देहासी’ ॥ ६० ॥
समर्थ वदती ’तुम्हांस कांहीं । याची चिंता करणें नाहीं’ ।
ऐसे बोलोन लवलाहीं । महीषीसी कुरवाळिले ॥ ६१ ॥
तेव्हां ती स्थिर राहिली । समर्थें तिजसी दोहिली ।
द्विगुणित पात्रें क्षीरें भरलीं । आश्चर्य वाटलें भिल्लांसी ॥ ६२ ॥
वारंवार वंदन करिती । आणि करिती विनंती ।
पावन करा आम्हांप्रति । दुष्टकर्मी आम्ही असों’ ॥ ६३ ॥
समर्थ वदती ’जरी तुम्ही । द्रव्य वेंचाल सत्कर्मीं ।
तरी रामभक्ति शिकवूं आम्हीं । पावन व्हाल सर्वही’ ॥ ६४ ॥
भिल्ल वदती ’सर्वस्व दिलें’ । तेव्हां मंदिर बांधविलें ।
उपासने शिकविलें । अनुग्रह दिला तयांसी ॥ ६५ ॥
असो ऐसे रानटी लोक । भजनीं लावी श्रीसद्‌गुरुनायक ।
येणें परी मंदिरें अनेक । स्थापिते झाले गुरुराव ॥ ६६ ॥
ठायीं ठायीं उपासना । ठायीं ठायीं अन्नदाना ।
तैसीच रामनामस्मरणा । सीमा नाहीं ॥ ६७ ॥
समस्त मंदिरवासी जनां । आज्ञा करी गुरुराणा ।
जेणेंकरून यमयातना । सुटतील बहुतांच्या ॥ ६८ ॥
’मंदिरवासी संतजन । ऐका एक हितवचन ।
अखंड करा नामस्मरण । आणि करवा बहुतांकरवीं ॥ ६९ ॥
अतिथि विन्मुख न दवडावा । तया रामचि मानावा ।
अन्नोदकें तृप्त करावा । यथाशक्ति ॥ ७० ॥
अतिथीचा आदर करणे । हेंचि ब्रीद राखणें ।
शक्ति नसतां मागणें । निःस्पृह भिक्षा ॥ ७१ ॥
कोणा घालों नये संकट । नम्रत्वें असावें धीट ।
रामचरणीं भाव निकट । ठेवितां उणें पडों नेदी ॥ ७२ ॥
भूतीं असावी नम्रता । परनारी तितुकी माता ।
रामनामावांचून वृथा । श्वास जावों देवों नये ॥ ७३ ॥
उषकालीं देह शुद्ध । करोनि आळवा गोविंद ।
सडे रांगोळ्या भूमि शुद्ध । मंदिर सोज्ज्वळ असावें ॥ ७४ ॥
तदनंतर कांकडआरती । भावें ओंवाळा रघुपती ।
समस्तांही द्या जागृती । भूपाळ्या दीर्घस्वरें ॥ ७५ ॥
गणेश शारदा सद्‌गुरु । रामकृष्ण हरिहरु ।
तीर्थें परम योगेश्वरु । करुणस्वरें आळवावें ॥ ७६ ॥
सुगंधी सुमनें आणोनी । हार गुंफा निर्मळ मनीं ।
तुळसीदळें आदिकरूनि । शक्य तितुकें मेळवावें ॥ ७७ ॥
स्नानसंध्या आन्हिक कर्म । करावे आपुले आश्रमधर्म ।
वेदप्रणीत मार्ग दुर्गम । शक्य तितुके साधावे ॥ ७८ ॥
तीर्थोदक पंचामृत । न्हाऊं घाला भगवंत ।
वस्त्रें उपवस्त्रें समस्त । सर्वेश्वर पूजावा ॥ ७९ ॥
धूप दीप निरंजन । नैवेद्य दाखवा षड्रसान्न ।
तांबूल दक्षिणा देवोन । धूपारती करावी ॥ ८० ॥
करावें दासबोधपठण । नित्यनेम समास दोन ।
मनोबोध श्लोक गहन । दीर्घस्वरें म्हणावे ॥ ८१ ॥
इच्छित संख्या नामजप । करावा यथासंकल्प ।
सर्वकाल अजपाजप । करणेंचा अभ्यास असावा ॥ ८२ ॥
रामहृदय नित्यपाठ । सहस्र नामाचा घडघडाट ।
पूजासमयीं वेदपाठ । मंत्रोच्चार करावा ॥ ८३ ॥
पवमान आणि पुरुषसूक्त । पठणें संतोषें रघुनाथ ।
रुद्राभिषेकें वायुसुत । भक्तिभावें पूजावा’ ॥ ८४ ॥
उपासनेचे बहु प्रकार । लिहितां होय विस्तार ।
’साधितां प्रपंचव्यवहार । अध्यात्मविवरण करावें ॥ ८५ ॥
मंदिर म्हणजे सद्धर्मशाळा । बहुत जीवां लावा चाळा ।
दावोन उपासनासोहळा । दुर्बुद्ध सुबुद्ध करावे ॥ ८६ ॥
सायंकाळी करावें भजन । टाळ-वीणा मृदंगवादन ।
लहानथोर मिळवोन । रामभजनीं लावावे ॥ ८७ ॥
अष्टकें सवाया धांवे । धूप दीप नैवेद्य बरवे ।
आरती मंत्रपुष्प अर्पावें । रामरायासी ॥ ८८ ॥
कापूरआरती शेजारती । नित्य करावी रघुपती ।
तैसाचि नमावा मारुती । मंदिरवासी जनांनी’ ॥ ८९ ॥
असो ऐसीं मंदिरें बहुत । बांधविती श्रीगुरुनाथ ।
उपासना वाढविती बहुत । वर्णितां वानी खुंटली ॥ ९० ॥
असो मानसपूजा बहुतांशी । प्रिय असे श्रीगुरूंसी ।
प्रत्यक्षपूजेहूनि मानसपूजेसीं । चित्त होय एकाग्र ॥ ९१ ॥
बहुतांसी साक्षात्कार होती । कांहीं चुकतां खूण देती ।
पुष्पें घालितां परिमळ सुटती । ज्या-त्यापरी प्रत्यक्ष ॥ ९२ ॥
प्रत्यक्ष भेटी झाली । त्याहीपेक्षां मानसपूजेंत भली ।
मानसपूजा न घडतां गुरुमाउली । अंतरसाक्षीची खूण देतसे ॥ ९३ ॥
हा बहुतांसी अनुभव । मानसपूजा शुद्ध भाव ।
नामस्मरणीं गुरुदेव । पावतसे तत्काळ ॥ ९४ ॥
पुढील अध्यायी निरूपण । सद्‌गुरु करिती कथन ।
भक्तिमार्गीं अज्ञजन । कैसे कैसे लाविले ॥ ९५ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते नवमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥ ॥ इति नवमोऽध्यायः समाप्तः ॥


GO TOP