॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥

अध्याय आठवा
समास पहिला


किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हाया । किती भाविती देहव्याधी हराया ॥
कृपादृष्टीनें त्यांसि आनंद देती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ८ ॥

जयजया सद्‌गुरु क्षीरसगरा । अपरंपारा परात्परा ।
भक्तजनमनोहरा । आनंदरूपा ॥ १ ॥
तुझिय उदरामाजी । अनंत जलचरें असती राजी ।
अनंत भक्त झाले गाजी । पयःपान करोनी ॥ २ ॥
कृपामृताचा भरला पूर । नाकीं तोंडीं गेलें नीर ।
सर्वांगी भरली सार । गुरुभक्ति ॥ ३ ॥
तेणें गेले तळासी । जेथें क्षीरसागरनिवासी ।
लक्ष्मी चरणाची दासी । शेषशय्ये पहुडले ॥ ४ ॥
दर्शनें आनंदित झाले । पुन्हां संसृतीस न आले ।
तुजमाजीं बुडोनि तरले । हें नवल गुरुराया ॥ ५ ॥
सद्‌गुरुसागरा तुमचे पोटी । अनंत रत्नें् असती गोमटीं ।
मोलें वसुंधरा थिटी । तीं भाग्यवंता लाभती ॥ ६ ॥
भक्तिप्रवाल ठायीं ठायीं । वेल पसरले रीघ नाहीं ।
शांती मौक्तिकें शोभती पाहीं । अमोल आणि सतेज ॥ ७ ॥
कीर्तीच्या उसळती लाटा । अनुहतध्वनी गर्जे मोठा ।
मायादरडीसी चपेटा । मारून झिजविती ॥ ८ ॥
साक्षात्कार फेन भरला । तेणें जीवा चटका लागला ।
असंख्य समुदाय लोटला । तुमचे चरणीं ॥ ९ ॥
भोळे भाविक सज्जन । धरिती देवा तुमचे चरण ।
भेटविले सीतारमण । क्षीराब्धिवासी ॥ १० ॥
असो ऐसी गुरुमूर्ति । स्तवितां थकले वेद श्रुति ।
तेथें मानव अल्पमति । वदतां बोल न स्थिरावे ॥ ११ ॥
शब्दब्रह्म हें फोल । व्योमीं भ्रम भासला चंचल ।
तेणें नातुडे निश्चल । निश्चयें गुरुपद ॥ १२ ॥
शब्दलाघव हावभाव । हीं तों चंचल माव ।
अनुभवी घेई अनुभव । तो याहून निराळा ॥ १३ ॥
अज्ञानिया शब्द गहन । तेंचि तया अधिष्ठान ।
तेथेंचि त्याचें समाधान । अकुंचितपणें ॥ १४ ॥
परि तेचि देवें अंगीकारले । तयाकारणें तैसेचि झाले ।
पत्रें पुष्पें फलें आणि जलें । तोषले परमात्मा ॥ १५ ॥
तैसी उपमा श्लाघ्य नोहे । परि आवडी अंतरीं उठताहे ।
तेणें बोलणें घडलें हें । मानूनि घ्यावें ॥ १६ ॥
दीन दासांची माउली । अज्ञान अर्भकांची साउली ।
भक्तकाजार्थ पावली । कलियुगीं मर्त्यलोकीं ॥ १७ ॥
तेथें अनंत शरण आले । कृपाप्रसादा लाधले ।
निजहित साधोनि पावले । समाधान ॥ १८ ॥
तीच येईल पुढती कथा । त्याचा तोचि बोलविता ।
अगाध सिंधु तरोनि जातां । शक्ति कैंची आम्हांसी ॥ १९ ॥
श्रींनीं देशोदेशी प्रवास केला । तेथें तेथें समुदाय वाढला ।
दर्शनें वेध लाविला । परांतरासी ॥ २० ॥
साधु आले ऐसें वदती । बहुत लोक दर्शना जाती ।
दर्शनें आनंदित होती । तपाचेनि तेजें ॥ २१ ॥
नास्तिक खट बाष्कळ । आर्त जिज्ञासू निर्मळ ।
प्रापंचिक कामनेनें विकळ । झाले जे कां ॥ २२ ॥
अथवा त्रिविधतापें जे पोळले । किंवा ज्ञानाचे भुकेले ।
परमार्थ हेत धरूनि आले । ऐसे बहुत ॥ २३ ॥
कित्येक उगाच पाहूं येती । कोणी परोत्कर्षें झोंबती ।
कितीएक कर्मठ निंदिती । नामधारकां ॥ २४ ॥
ऐशा जाती अनेक । कित्येक केवळ भाविक ।
पाहों येती सहेतुक । गुरुराज योगी ॥ २५ ॥
शुद्धाशुद्ध भावना । धरोन येती लोक नाना ।
नाना जीवांच्या कल्पना । किती म्हणोन सांगाव्या ॥ २६ ॥
दृष्टादृष्ट होतां पाही । ऊर्मी मावळती सर्वही ।
भक्तिपाझर फुटे हृदयीं । नम्र होती गुरुचरणी ॥ २७ ॥
जीवाचा जिवलग शिव । तो निर्विकल्प घेई धांव ।
निर्विकल्प गुरुराव । स्वतेजें नमवीतसे ॥ २८ ॥
जनीं जनार्दन ओळखिला । द्वैता ठाव कोठें उरला ।
आपआपणा भेटता झाला । सहजीं सहज आनंद ॥ २९ ॥
अज्ञानी विकल्पी निवाले । अहंकार राउत आडले ।
जेणें जग निर्माण केलें । मिथ्या माया जगडंबर ॥ ३० ॥
तेणें घेतली झुंजणी । झुंजतां गेला पळोनी ।
वायु जैसा गगनीं । विरोन जाय ॥ ३१ ॥
असो संगतीं आले ते तरले । दर्शनें आनंदित झाले ।
ज्ञान शांति साक्षात्कार भले । पाहोनि झालें चकित ॥ ३२ ॥
भूतीं दया आणि सत्ता । राजयोग आणि नम्रता ।
नीति भक्ति विरक्तता । दाक्षिण्यहि सर्वत्र ॥ ३३ ॥
रामनामाचा गजर । उपासना निरंतर ।
स्वधर्मकर्मीं आदर । लीनता पाहोन लीन होती ॥ ३४ ॥
जो साक्षात्‌ हनुमंतअंलश । तया वर्णिता कोण पुरुष ।
बाह्य लक्षणें कांहीं विशेष । अल्पबुद्धीनें कथियेलीं ॥ ३५ ॥
जे जे कोणी शरण आले । ते ते सन्मार्गीं लागले ।
इहपर सौख्य पावले । भावनेसारिखे ॥ ३६ ॥
चौदा सिद्ध झाले असती । ऐसे सद्‌गुरु बोलती ।
आणीक होतील त्यां मिती । कोण करील ॥ ३७ ॥
गुरुवचनीं विश्वास धरिला । तो तो तरोनिया गेला ।
विकल्प आळस ज्यानें केला । तो राहिला ऐलीकडे ॥ ३८ ॥
या भव्य भरतखंडांत । अनंत झाले पदांकित ।
त्यांचा न लागे अंत । कांहीं प्रसिद्ध कथन करूं ॥ ३९ ॥
सकळां करूं नमस्कार । जे सद्‌गुरूंचे किंकर ।
तुमच्या कथा वर्णावया थोर । मति द्यावी दासासी ॥ ४० ॥
समर्थ आणि कल्याण । तैसे श्रीगुरु आणि आनंदसागर जाण ।
यांची कथा विस्तारून । निरोपिजेल आतां ॥ ४१ ॥
मोगलाईमध्यें अंबड तालुका । तेथें पिंपळ गांवीं निका ।
कुळकर्णी अंताजीपंत देखा । गांवकामगार सुशील ॥ ४२ ॥
तयासी झाला एक सुत । गोविंदनामें संबोधित ।
बुद्धि देखोन चकित होत । लहान थोर ॥ ४३ ॥
कांही काळ लोटल्यावरी । अंतोबा गेले इंदुरीं ।
कांही धरोन चाकरी । प्रपंचभार चालविती ॥ ४४ ॥
गोविंदा थोर झाला । तंव शाळेसी घातला ।
तेथें भजन करूं लागला । आणि पोरां शिकवीत ॥ ४५ ॥
म्हणोनि शाळे येवों न देती । इतरां बिघडवील म्हणती ।
यासी सरासरी लिहिण्याप्रती । येऊं लागलें ॥ ४६ ॥
शिवालयीं जावोन बैसावें । आदरें रामनाम घ्यावें ।
दासबोध विवरीत असावें । सर्वकाळ येकांतीं ॥ ४७ ॥
ऐसें क्रमितां समयासी । पंत झाले बैकुंठवासी ।
दशवर्षें गोविंदासी । माय अत्यंत दुखावली ॥ ४८ ॥
कांहीं येईना शेतसारा । भाऊबंदें केला पोबारा ।
क्षत देखून चोंच मारा । म्हणती काक जैसे ॥ ४९ ॥
गृही अत्यंत गरिबी आली । पुंजी सर्व संपोन गेली ।
गोविंदें लिखाई धरिली । निर्वाहाकारणें ॥ ५० ॥
अर्ज चिठ्ठी लिहून द्यावी । कांहीं मजुरी मिळवावी ।
खर्चापुरती गृहीं द्यावी । उरलिया धर्म करी ॥
अंध पंगु भिकारी । यांची येत करुणा भारी ।
तयांलागीं साह्य करी । द्रव्यद्वारां ॥ ५२ ॥
ऐसा गेला कांही काळ । फावल्या वेळीं जपे नाममाळ ।
दासबोध सर्वकाळ । वाची आणि मनन करी ॥ ५३ ॥
अभ्यासें गोडी लागली । अंतरीं उदासीनता आली ।
गुरुभेटीची आर्त लागली । उद्यमीं जाहले दुर्लक्ष ॥ ५४ ॥
सिद्ध साधु बैरागी । आलिया भेटती वेगीं ।
प्रश्न करिती तयांलागीं । अध्यात्मविषयीं ॥ ५५ ॥
जेणें दासबोध विवरिला । तेणें बिकट प्रश्न केला ।
प्रत्युत्तरें भांबावला । दिसे साधु ॥ ५६ ॥
आणिक लक्षणें पाहती । भक्ति उपासना नीति ।
कांहींच नसतां उपहासिती । पोटभरु म्हणोनि ॥ ५७ ॥
जन भुलवायाकारणें । देहाची विटंबना करणें ।
यापेक्षां उदरी कांटे भरणें । फार बरें ॥ ५८ ॥
ऐसे बहुत उपहासिती । अंतरीं गुरुभेटीची आर्ति ।
कोणी भेटेल ज्ञानज्योति । जागोजागीं पाहातसे ॥ ५९ ॥
गुरुप्राप्तीलागून । नित्य प्रार्थिती हनुमान ।
सेवा करिती अतिगहन । सद्‌गुरु भेटावा तुम्हांऐसा ॥ ६० ॥
जैसे दिवस गेले । तैसें अंतर तळमळलें ।
वैराग्य शरीरीं खवळलें । धंदा सर्व सोडिला ॥ ६१ ॥
एकदां माय गांवीं जातां । चीजवस्तु वांटिली समस्तां ।
भिक्षाहारें उदरपूर्तता । करूं लागले ॥ ६२ ॥
माय अत्यंत शोक करी । पुत्र आठवली मधुकरी ।
प्ररब्धगति विचित्र सारी । देवा कैसी केली तुवां ॥ ६३ ॥
गोविंदें लोकलाज सांडिली । एकांतवसति आरंभिली ।
चित्ताची मलिनता गेली । देखतदेखतां ॥ ६४ ॥
क्षेत्र नांगरून तयार केलें । वैराग्यजळें तुडुंब भरलें ।
कृषीवल ते शोधीत आले । ज्ञानबीज पेराया ॥ ६५ ॥
एकदा दासबोध वाचीत असतां । महाराज देखिले अवचितां ।
दृष्टादृष्टीं एकतानता । होवोनि गेली ॥ ६६ ॥
देहाची स्मृति उडाली । चिदानंदीं वृत्ति रमली ।
तंव इकडे गुरुमाउली । निघोन गेली ॥ ६७ ॥
एक प्रहरें सावध होती ॥ तंव न दिसे गुरुमूर्ति ।
गल्लोगल्लीं शोधित फिरती । आनंदकंद गुरुलागीं ॥ ६८ ॥
कोणी सांगा समाचार । कोठें गेले गुरुवर ।
नयनीं चालला अश्रुपूर । पुसों लागले सर्वांसी ॥ ६९ ॥
भव्य रूप दिव्य कांती । पायीं खडावा असती ।
कफनी फरगुल घालिती । मस्तकीं टोपी शोभतसे ॥ ७० ॥
कंठीं वैजयंतीमाळा । केशर कस्तुरी त्रिपुंड्र भाळा ।
भोंवती भक्तांचा मेळा । राम राम गर्जतसे ॥ ७१ ॥
कोणी सांगतीं ते समयीं । दिवाण काटापूर गृहीं ।
कोणी साधु असती पाही । शीघ्र जावोन भेटावें ॥ ७२ ॥
धांवत गेले तेथूनी । देखिली नयनीं गुरुजननी ।
देह लोटिला चरणीं । कोण वानी तें सुख ॥ ७३ ॥
उठवोन देती आलिंगन । आनंदसागर ऐसें म्हणोन ।
पोटीं धरिती कुरवाळोन । अनुतापा निवविती ॥ ७४ ॥
तैंपासोन नाम आनंदसागर । वदों लागले नारीनर ।
गोविंदबुवा गुरुवर । ऐसेंहि कोणी म्हणती ॥ ७५ ॥
प्रश्नोत्तरें दिवसरात । होते तेथें आनंदांत ।
परि त्यांची माय होत चिंताग्रस्त । वेड लाविलें बाळासी ॥ ७६ ॥
येवोन निंदों लागली । ’पुत्राच्या जन्माची माती केली ।
मर्कटाहातीं कोलती दिधली । आजिं तुम्हीं’ ॥ ७७ ॥
सद्‌गुरु म्हणती ’अहा माय । तुमचें भाग्य पावलें उदय ।
जन्ममरणादि चुकवील घाय । बेचाळीस कुळांचा ॥ ७८ ॥
ऐसा पुत्र लाधला । आणि म्हणतां वेडा झाला ।
तुम्ही माझे अनुरोधें चाला । तुमचे मनोरथ पुरतील ॥ ७९ ॥
रामसेवा करितां सतत । सर्व पुरतील मनोरथ ।
तुम्ही असावें निश्चिंत । भाग्यें लाधला सुपुत्र’ ॥ ८० ॥
बोध करितां भ्रम गेला । उभयतां अनुग्रह दिला ।
नेम घालोन दिधला । भवसिंधुतारक ॥ ८१ ॥
आनंदसागर करिती सेवा । सेविती स्वानंदाचा मेवा ।
तो प्रकार श्रवण करावा । भाविक जन हो ॥ ८२ ॥
गुरुसेवेहून सार । न मानिती दुजें थोर ।
गुरुआज्ञेवरी विकल्प विचार । अणुभरी धरिती ना ॥ ८३ ॥
स्नान करितां अर्धवस्त्र भिजलें । आणि समर्थें बोलाविलें ।
त्वरित तैसेचि निघाले । ऐसी भक्ती ॥ ८४ ॥
भोजनीं हातीं धरिला घांस । हांक येतां त्या समयास ।
तैसाचि ठेवोनि तयास । धांवत जाती ॥ ८५ ॥
सद्‌गुरु अंतर पाहती । जपानुष्ठाना बैसविती ।
एक दोन दिनराती । अन्नोदकाविण ॥ ८६ ॥
तरी न मानिती खेद । वाटे तो महदानंद ।
आज्ञा झाली हाचि प्रसाद । विशेष मानिती ॥ ८७ ॥
असो सेवेचा ऐसा प्रकार । नित्य झिजविती शरीर ।
जाळिले दुरितांचे डोंगर । गुरुकृपा संपादुनी ॥ ८८ ॥
उन्मनी अवस्था जै आली । पिशाचवत्‌ वृत्ती झाली ।
श्रीगुरूंनीं शांतविली । कृपादृष्टी करोनी ॥ ८९ ॥
ज्ञानोर्मीसी शमविता । गुरुवांचोन नसे त्राता ।
पाठीं पोटीं संरक्षिता । एकलाचि गुरुराणा ॥ ९० ॥
तैसाचि अष्ट महासिद्धी । साधकां घालिती उपाधी ।
शुद्ध भावें दयानिधी । गुरुनाथ तारितसे ॥ ९१ ॥
उभयतां निरोप देती । नर्मदातीरीं बडवाईप्रती ।
जावोन राहावें शीघ्रगती । जप दासबोध चालवावा ॥ ९२ ॥
दहा समास दिधले काढोनी । तैसाचि जप नेमोनी ।
नित्य असावें उपासनीं । ऐंशी हजार दिनसंख्या ॥ ९३ ॥
तंव विरहें दुःखी झाले । परि निरुपायें निघाले ।
बढवाईचे रानीं राहिले । खोपट करोनी ॥ ९४ ॥
ग्रामीं भिक्षा मागोनि । निर्वाह करिती आनंदानें ।
जप दासबोधवाचनीं । क्रमिती काळ ॥ ९५ ॥
दासबोध विवरीत असतां । पक्षी बैसती सभोंवता ।
दाणे टाकिल्याही न खातां । श्रवणीं होती तल्लीन ॥ ९६ ॥
तयासी आधी झाले ज्ञान । रामरूप पाहे भुवन ।
सर्पासी करी वंदन । राम राम म्हणोनि ॥ ९८ ॥
ऐसा काळ चालिला । आनंदीआनंद वाढला ।
दिवस आला आणि गेला । हें न कळे तिघांसीही ॥ ९९ ॥
पुत्राची सिद्धदशा पाहता । माय वंदितसे सुता ।
अनुचित गोष्टी हे तत्त्वतां । वदती आनंदसागर ॥ १०० ॥
तेही करिती नमस्कार । माय धरी त्यांचा कर ।
तूं विश्ववंद्य सिद्ध साचार । मी अज्ञानी मज न नमावें ॥ १०१ ॥
उभयतां वाद पडला । सद्‌गुरूंनी तो मिटवला ।
उभयतांनीं एकमेकाला । नमन कधीं करूं नये ॥ १०२ ॥
उपासना बहु वाढली । सिद्धदशा येऊं लागली ।
तंव इकडे गुरुमाउली । शिष्यभेटीसि निघाली ॥ १०३ ॥
गुरु येती म्हणोन । माळियास झालें ज्ञान ।
उभयतां सामोरे जाऊन । वंदिती गुरुपदा ॥ १०४ ॥
संतुष्ट झाले गुरुवर । ठेविला मस्तकीं वरद कर ।
दवडिले अज्ञान विकार । निजपद तयां दिधलें ॥ १०५ ॥
तयां मुखीं हनुमंतासी । देवविलें अनुग्रहासी ।
हा भक्त योगी ज्ञानराशी । बहुतांसी तारील ॥ १०६ ॥
उभयतांसी अधिकार दिला । मंत्रानुग्रह करावयाला ।
वाढवावें श्रीउपासनेला । रामसेवा करीत जावी ॥ १०७ ॥
आनंदसागरांप्रती । मांदारमुळींचा मारुती ।
देवोनि पारंनरे अंबड प्रांतीं । तयांलागी पाठविलें ॥ १०९ ॥
तेरा कोटी जप केला । अंबड जालना मठ स्थापिला ।
वाढविती उपासनेला । राममंदिरें दोहींकडे ॥ ११० ॥
एकदां गोपाळकाल्यासी । श्रीकृष्ण आले गोपवेषीं ।
दर्शन देवोनि भक्तासी । पुन्हां अदृश्य जाहले ॥ १११ ॥
श्रीगुरु वदती विवाहासी । करीं आतां सत्वरेंसी ।
आनंदसागर वदती मजसी । न लगे प्रपंचबंधन ॥ ११२ ॥
मातेसी पुसती विचार । तीही न दे रुकार ।
गोसावी केला माझा पुत्र । दूषण दिधलें इंदुरीं ॥ ११३ ॥
विनोदें मागील स्मरण देतां । माय विनवी ’श्रीगुरुनाथा ।
अज्ञानें भुरळ होती चित्ता । तव कृपें निवाली’ ॥ ११४ ॥
असो आग्रहें लग्न केलें । सावधासी बंधन कसलें ।
पुत्रकन्यांनी शोभविलें । सच्छिष्य गृहस्थाश्रमी ॥ ११५ ॥
शिष्य शाखा वाढविली । नामगुढी उभारिली ।
बहुतांची यातना सोडविली । अनुग्रहप्रसाद देवोनी ॥ ११६ ॥
कसा उतरल्या वांचोन । अनुग्रह न देती जाण ।
म्हणती विघ्नें येतील दारुण । मम अनुग्रह घेतलिया ॥ ११७ ॥
आनंदपुरीं वसविलें स्थान । नित्य पूजाअर्चा भजन ।
आल्या अतिथा अन्नदान । शरणागता रक्षिती ॥ ११८ ॥
असो सद्‌गुरुप्रसाद । सेवितां झाला आनंद ।
पुढती कथा परिसा विशद । ब्रह्मानंद सिद्धांची ॥ ११९ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय आठवा
समास दुसरा



दुजे शिष्यवर ब्रह्मानंद । दृढ धरिलें गुरुपद ।
सिद्ध होवोनि प्रसिद्ध । जगदुद्धार बहु केला ॥ १ ॥
कर्नाटकीं विजापूर प्रांत । बदामीसन्निध जालिहाळ ग्रामांत ।
विप्रकुटुंब नांदत । स्वधर्मकर्मीं दक्ष सदा ॥ २ ॥
भारद्वाजगोत्री परम । गाडगुळी ऐसें उपनाम ।
बाळंभट्ट द्विजोत्तम । भार्या सती जिऊबाई ॥ ३ ॥
रेणुका उपास्यदैवत । तिचे कृपें चार सुत ।
त्यांमाजीं अनंतभट्ट विख्यात । जाहले श्रीब्रह्मानंद ॥ ४ ॥
बालपणीं हूड भारी । मुलें जमवोनि भजन करी ।
व्रतबंध झालियाउपरी । शास्त्र शिकों घातलें ॥ ५ ॥
मुळगुंद येथील विद्वान । गुरुशास्त्री नामें ब्राह्मण ।
तयाजवळीं राहोन । विद्या बहुत पठण केली ॥ ६ ॥
काव्य तर्क वेदांत । वेदपठणही बहुत ।
शिकोन झाले पंडित । जगन्मान्य ॥ ७ ॥
निरोप आला गृहासी । मायबापें झालीं हर्षी ।
करूं म्हणती विवाहासी । सुशील कन्या पाहोनि ॥ ८ ॥
तंव अनंतें देहभोग । हस्तीं दाविला कुष्ठरोग ।
त्या निमित्तें विवाहयोग । टाळिला साधनीं विक्षेप ॥ ९ ॥
मातापितयांसी विनविलें । देहभोग भोगणें घडलें ।
उपशमन पाहिजे केलें । ईशसेवा करूनी ॥ १० ॥
या निमित्तें आज्ञा घेतली । स्वारी तेथून निघाली ।
सोर्टूर सन्निध पावली । व्यंकटेशासमीप ॥ ११ ॥
भोंवतीं डोंगर उंच गाढे । माजीं व्यंकटवाडी खेडें ।
काळनेमें पडलें उघडें । ओस आणि निर्मनुष्य ॥ १२ ॥
सन्निध ओहोळ आणि कुंड । झाडे गर्द आणि प्रचंड ।
श्वापदें नांदती उदंड । भयानक स्थळ ॥ १३ ॥
कर्नाटकीं व्यंकटेश । दैवत मान्य विशेष ।
तैसें तेथें एक ओस । मंदिर पूर्वींचें ॥ १४ ॥
स्वयंभू व्यंकटेशमूर्ति । नसे कांहीं अवयवाकृति ।
तेथें जावोन राहती । निर्मनुष्य वनामाजी ॥ १५ ॥
भक्तीस एकाग्रता एकांतस्थलीं । वृत्ति साधनीं स्थिर केली ।
सेवा निष्ठेनें चालविली । व्यंकटेशप्रभूची ॥ १६ ॥
उषःकाली स्नान करोनि । अनुष्ठान करिती, मग माध्यान्ही ।
सोर्टूरीं भिक्षा आणोनि । पुष्करणीकुंडीं बुडविती ॥ १७ ॥
व्यंकटेशा नैवेद्य दावोन । एक वेळ करिती भोजन ।
पुनरपि श्रीआराधन । अहोरात्र चालविती ॥ १८ ॥
दिवसांही कोणी संचार न करिती । तेथें केली नित्यवसती ।
वैराग्य उपजलें चित्तीं । देहसार्थक करावें ॥ १९ ॥
विनवीत श्रीव्यंकटेशा । ’भवभयहारका परेशा ।
पुरवावी येवढी आशा । देह सार्थकीं लावावा ॥ २० ॥
बहुत शास्त्रें पठण केली । परि समाधानता नाही आली ।
समधानाची साउली । व्यंकटरमणा दावावी ॥ २१ ॥
करुणा भाकिती वेळोवेळीं । नऊ मास सेवा करी ।
जगन्माय संतोषली । स्वप्नीं येवोनि सांगत ॥ २२ ॥
’आतां अनुष्ठान पुरें करावें । त्वरित उत्तरेसी जावें ।
सद्‌गुरुचरणीं लीन व्हावें । खाणाखुणा सांगितल्या ॥ २३ ॥
अनंत जन्मांची सुकृतें । फळा येतील तेथें ।
कामना व्याधी समस्तें । हरतील सकल गुरुराव’ ॥ २४ ॥
स्वारी तेथून निघाली । उत्तरेप्रति चालिली ।
वाराणसीं वसति केली । कांही कालपर्यंत ॥ २५ ॥
कृष्णानंद स्वामींपाशी । पुन्हां केलें पठणासी ।
गीता उपनिषद्‌भाष्यासी । शारीरभाष्य वेदांत ॥ २६ ॥
विद्वत्ता झाली गहन । तरी नोहे समाधान ।
मनीं ध्यानीं सद्‌गुरुचरण । कोठें भेटतील मजलागीं ॥ २७ ॥
काशी प्रयाग नारायण । अयोध्या मथुरा वृंदावन ।
सकल तीर्थें फिरून । गुरुमाय शोधिती ॥ २८ ॥
फिरत आले इंदुरासी । तेथें देखिलें गुरूंसी ।
दृष्टांती लक्षणें जैसी । तैशीं तेथें पाहिलीं ॥ २९ ॥
तेंचि रूप तेंचि ध्यान । परि न दिसे ज्ञानचिन्ह ।
पोरांसवें खेळत जाण । अज्ञानासारिखे ॥ ३० ॥
नाहीं गीता भाष्य उपनिषद्‌ । पूर्वपक्ष उत्तरपक्ष वाद ।
परमार्थाचा संवाद । तोहि दिसेना ॥ ३१ ॥
प्राकृत भाषा बोलती । नाहीं संस्कृत व्युत्पत्ति ।
मग येथें ज्ञानप्राप्ति । मजसी काय होईल ॥ ३२ ॥
वाराणसीं देखिले साधु । तेथें होत वादविवादु ।
वेदांतचर्चा अनुवादु । पूर्वपक्ष आणि सिद्धांत ॥ ३३ ॥
येथें कांहींच दिसेना । ऐसा विकल्प झाला मना ।
परि वेध लागला तो सुटेना । दर्शनें आनंद होतसे ॥ ३४ ॥
लीला दाविती गुरुराव । येथें शब्दज्ञानवैभव ।
गुंतली वृत्ति अनुभव- । सुखासी नाहीं देखिलें ॥ ३५ ॥
नित्य दर्शनासी येती । सद्‌गुरु बळेंचि वागती ।
बालकांसवें करिती । हास्यविनोद ॥ ३६ ॥
ऐसा काळ बहुत गेला । दर्शनाचा हव्यास लागला ।
परि मनीं विकल्प आला । ज्ञानचिन्ह दिसेना ॥ ३७ ॥
शरण जावें वा न जावें । ऐसे चित्तीं पडले गोवे ।
उगाच पाहत बसावें । सद्‌गुरुलीला ॥ ३८ ॥
भोळे भाविक दर्शना येती । चरणीं लोटांगण घालिती ।
सद्‌गुरु समाधान करिती । ज्याचे त्यापरी ॥ ३९ ॥
देहव्याधि दूर करिती । भूतपिशाचें शरण येती ।
रामनाम प्रस्थापिती । सकळां ठायीं ॥ ४० ॥
पराव्याचें जाणोनि अंतर । नेमकेंचि देती प्रत्युत्तर ।
नित्य घडती चमत्कार । पाहतां विस्मय वाटतसे ॥ ४१ ॥
संगतीसुखा लोलुप झाले । अहंता विकल्प मावळले ।
अनुतापें पोळोनि निघाले । पदीं शरण रिघाया ॥ ४२ ॥
पाहोन चित्तशुद्धि झाली । गुरुमाय पान्हावली ।
ब्रह्मानंदीं मग्न केली । वृत्ति अनंतभट्टाची ॥ ४३ ॥
नाम ठेविलें ब्रह्मानंद । दिधला अनुग्रहप्रसाद ।
सकलांसि झाला आनंद । अनंतशास्त्री शरण आले ॥ ४४ ॥
अंगावरोन हात फिरविती । देहव्याधित्रस्त वदती ।
ब्रह्मानंद तैं विनविती । देहातीत सुख असावें ॥ ४५ ॥
प्रारब्ध भोगोनि सारावें । कर्मबंधापासोन सुटावें ।
तरीच परमार्थ फावे । बंधरहित ॥ ४६ ॥
सद्‌गुरु पुढें आज्ञापिती । जावें नर्मदातीराप्रति ।
ओंकारेश्वर उमापती । स्थान जेथें ॥ ४७ ॥
निर्मनुष्य अरण्यांत । शिवालय जीर्ण बहुत ।
तेथें जावोनि सतत । नामस्मरण करावें ॥ ४८ ॥
ऐशी आज्ञा होतां पाहीं । शीघ्र पावले त्या ठायीं ।
जेथें मनुष्यवसति नाहीं । हिंस्र श्वापदें हिंडती ॥ ४९ ॥
साधोनिया एकांतवास । जप केला सहा मास ।
मग प्रगट झाले गुरु परेश । शिवलिंगामधोनी ॥ ५० ॥
पोटीं धरोनि कुरवाळिलें । अनुष्ठान समाप्त करविलें ।
सवेंचि तेथें गुप्त झाले । गोंदावलीस यावें म्हणोनि ॥ ५१ ॥
गोंदावली येऊनि दर्शन घेती । अति आदरें सेवा करिती ।
कांहीं दिवसांउपरांतीं । आज्ञा करिती गुरुराव ॥ ५२ ॥
’सर्व अधिकार दिधले तुम्हांसी । आतां जावें कर्नाटकासी ।
वाढवावें समर्थपंथासी । राममंदिर स्थापावें ॥ ५३ ॥
वृक्ष न वाढें वृक्षाखालीं’ । ऐसें वदती ते काळीं ।
’जावोनि नामपोई घालीं । हीच सेवा आमुची’ ॥ ५४ ॥
गुरुनिरोपें निघाले । ते कपोतेश्वरीं आले ।
एक तप अनुष्ठान केलें । तेरा कोटी जपाचें ॥ ५५ ॥
बेलधडीस आले तेथोनी । मनीं चिंतिती समर्थवाणी ।
मंदिर बांधावें म्हणोनी । आज्ञा मज झाली असे ॥ ५६ ॥
ऐसी चिंता लागली । तंव समर्थस्वारी आली ।
चरणीं लोटांगण घाली । ब्रह्मानंद शिष्यराणा ॥ ५७ ॥
महाराज वदती ’काय चिंता । रामकृपें सर्व सिद्धता ।
राम भक्ता साह्यकर्ता । यदर्थीं शंका नसावी’ ॥ ५८ ॥
बोधें चित्त शांतविती । मग आले गोंदवलीप्रती ।
इकडे वर्तली चमत्कृती । श्रोतेजनीं परिसावी ॥ ५९ ॥
मंदिर कैसें बांधावें । कैसें द्रव्य मेळवावें ।
गुरुआज्ञे सादर व्हावें । इच्छिती ऐसें ॥ ६० ॥
गांवोगांवी जावोन । बहुत द्रव्य मेळवोन ।
मंदिर बांधिलें शोभायमान । बेलधडीक्षेत्रासी ॥ ६१ ॥
रामस्थापना करायासी । आणिलें श्रीसमर्थांसी ।
तृप्त केले बहुवसीं । अन्नदानें विप्रगण ॥ ६२ ॥
कांहीं दिवसांउपरांतीं । उन्मनी अवस्था धरिती ।
उडाली मुळीं देहस्मृति । बंधन बहुतजन्मींचें ॥ ६३ ॥
कोठेंही पडोनि रहावें । कोणासवें न बोलावें ।
अत्यानंदे डुलत रहावें । अन्नवस्त्रा चाड नाहीं ॥ ६४ ॥
ऐसी ही उन्मनी अवस्था । वेडगळ बाटे समस्तां ।
परि जोडल्या अनंत सुकृतां । जीवा समाधान देतसे ॥ ६५ ॥
असो ऐसे ब्रह्मानंद । सेवोनि श्रीगुरुप्रसाद ।
उन्मन होवोन निजानंद । भोगिती । सिद्धसोहळा ॥ ६६ ॥
पुन्हां लोककार्य करिती । लोकांसारिखे वावरती ।
बीज भाजल्याउपरांतीं । रुजणेचें भय नाहीं ॥ ६७ ॥
तेथून पुढें नरगुंदासी । करविलें रामजपासी ।
तेराकोटी पुरश्चरणासी । विप्रांमुखें ॥ ६८ ॥
सांगतेची केली सिद्धता । परि जलाची नसे पूर्तता ।
अधिकारी वदती भक्तां । उत्सव तेथें न करावा ॥ ६९ ॥
ब्रह्मानंद वदती धीर धरा । रामकृपें सुटतील धारा ।
तंव अकस्मात्‌ मेघ भरारा । येवोनि जल वर्षती ॥ ७० ॥
जलस्थानें भरोन गेलीं । भक्तमंडळी आनंदलीं ।
देव दासांचा वाली । उणें दिसतां धांवतसे ॥ ७१ ॥
जावोनि स्वयें गोंदावलीसी । विनविती श्रीगुरूंसी ।
आलिया जपसांगतेसी । आनंदीआनंद वाढेल ॥ ७२ ॥
जैसा देव भक्तप्राण । तैसे गुरु शिष्याधीन ।
नरगुंदा साधलें निधान । जगदुद्धारक महाराज ॥ ७३ ॥
होम हवन अन्नदान । पुराण भजन निरूपण ।
भूतां पूजोनि भगवान । संतुष्ट केले ब्रह्मानंदें ॥ ७४ ॥
असो ऐसे ब्रह्मानंद । स्वयें पावले सद्‌गुरुपद ।
बहुतांसी अनुग्रहप्रसाद । देवोन सुमार्गा लाविलें ॥ ७५ ॥
पुढें बिदरहळ्ळीसी । गोपाळ कृष्णमंदिरासी ।
केलें जीर्णोद्धारासी । अन्नदान अगणित ॥ ७६ ॥
तेरा कोटी जपसांगता । होम हवनादि पूर्तता ।
आणवोनि सद्‌गुरुनाथा । याचक बहु तोषविले ॥ ७७ ॥
आजन्म ब्रह्मचर्यें राहिले । व्यंकटापूर ठाणें केलें ।
चिरेबंदी मंदिर बांधिलें । भव्य आणि सुंदर ॥ ७८ ॥
श्रीराम आणि हनुमान । तैसे महाराज आणि ब्रह्मानंद जाण ।
गुरुभक्त मानिती तयांलागुन । सद्‌गुरुसारिखे ॥ ७९ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय आठवा
समास तिसरा



आनंदसागर ब्रह्मानंद । यांनी जाणिले ब्रह्मचैतन्य पद ।
आणि शिष्य झाले प्रसिद्ध । तेही पुढती सांगिजेल ॥ १ ॥
कुर्तकोटी । इनामदार । धनवान आणि चतुर ।
लिंगनगौडा नामे द्विजवर । सरस्वती प्रसन्न तयांसी ॥ २ ॥
पाश्चात्य विद्या संपादोनि । संस्कृतीं अग्रगण्यता मिळवूनि ।
विद्याभूषण पदवी जयांनीं । स्वतेजें संपादिली ॥ ३ ॥
आणिकही बहुमान । देशी विदेशी मेळवून ।
नित्य करिती विद्यादान । विद्यार्थियांसी ॥ ४ ॥
सार्वजनिक हितासाठी । नित्य करिती आटाआटी ।
अकस्मात झाली भेटी । ब्रह्मानंदगुरूंची ॥ ५ ॥
पाठक आणि अनुभवी । यांची भेटी झाली बरवी ।
अनुभव सुखाची चवी । वेगळीच आहे ॥ ६ ॥
भक्ति उपासना आणि ज्ञान । पाहोन झालें समाधान ।
नम्र होवोनि तत्क्षण । अनुग्रहप्रसाद घेतला ॥ ७ ॥
तदुपरी ब्रह्मानंद यांनी । विद्या वैराग्य पाहोनि ।
घातले समर्थचरणी । अनुग्रहप्रसाद देवविला ॥ ८ ॥
सद्‌गुरु वदती तयांलागून । करावें भागवतकथन ।
व्युत्पत्ती पाहतां संतोषोन । 'महाभागवत' नामे देती ॥ ९ ॥
महाभागवतांचे वैराग्य । पाहतां वाटे धन्य भाग्य ।
भवनदी दुस्तर दुर्लंघ्य । सहज हे उल्लंघिती ॥ १० ॥
सद्‌गुरुसेवा करीती बहुत । रामनाम सदा जपत ।
निरूपणें चित्त शांतवित । सकल जनांचे ॥ ११ ॥
लोकसेवेची हौस भारी । धर्मसुधारणा व्हावी बरी ।
म्हणोन हिंडती नगरोनगरीं । निःस्वार्थ निरालस्यें ॥ १२ ॥
कुर्तकोटीचें शिवमंदिर । तेथेंचि स्थापिले रघुवीर ।
अनुग्रहाचा अधिकार । सद्‌गुरूंनी दिधला असे ॥ १३ ॥
शिष्यशाखा असे थोडी । समाजहिताची बहु गोडी ।
पाश्चात्य पौर्वात्य द्विधा जोडी । उकलोनी दाविती ॥ १४ ॥
स्वधर्मीं सदा रत व्हावें । देशोन्नतीसी झटावें ।
बोध करिती मनोभावें । ठायीं ठायीं ॥ १५ ॥
असो श्रीमहाभागवत । पुढे झाले विख्यात ।
सद्‌गुरुचरणीं झाले रत । आणिक शिष्य ॥ १६ ॥
कर्हा्डक्षेत्री शांताश्रम । संन्यासी कर्मठ परम ।
त्यांचें श्रीगुरूंवरी प्रेम । अतिशयेंसी ॥ १७ ॥
कांही काल वाराणशीसी । होते श्रीगुरूंचे संगतीसी ।
गुरुबंधु उभयतांसी । मानिती एकमेक ॥ १८ ॥
समर्थशिष्य विश्वनाथ । नामें होता भाग्यवंत ।
तयासी समर्थ आज्ञापित । कर्हाहडक्षेत्रीं जावया ॥ १९ ॥
शांताश्रम यतीपाशीं । जावें तुवां वेगेंसी ।
सेवा करावी अहर्निशी । ती आम्हां पावेल ॥ २० ॥
म्हणती प्रसाद घ्यावा । साधनीं देह झिजवावा ।
मम कृपें परलोक साधावा । वदती ऐसें ॥ २१ ॥
यज्ञेश्वर वैदिक विद्वान । श्रीगुरूंसी गेले शरण ।
अनुग्रह मंत्र घेवोन । सेवा केली एकनिष्ठ ॥ २२ ॥
नामपुरश्चरणें केलीं । वेदविद्या गुरूंसी अर्पिली ।
चित्तासी समाधानता आली । साधनबळें ॥ २३ ॥
सद्‌गुरु बहु संतोषले । 'विश्वनाथ' नाम ठेविलें ।
सर्व अधिकार तयां दिधले । वाढवा म्हणती भक्तिपंथ ॥ २४ ॥
मठ केला आटपाडीस । स्थापिलें राममंदिरास ।
शिष्यशाखा बहुवस । रामनाम गर्जतसे ॥ २५ ॥
गुरुदक्षिणा विद्येप्रत । दिधली कवण निमित्त ।
तरी परिसावें उदर भरित । होते भिक्षुकी करोनी ॥ २६ ॥
वेदविक्रय कंचकवृत्ती । येणें न घडेल भगवद्भीक्ति ।
यास्तव सद्गुचरुप्रति । अर्पण करोनि सोडिली ॥ २७ ॥
कृष्णा नामें कुच्चीकर । यांचे शिष्य होते चतुर ।
श्रद्धायुक्त नामगजर । करणेंविषयीं प्रसिद्ध ॥ २८ ॥
कुरवली श्रीसिद्धस्थान । तेथील दामोदरबुवा म्हणोन ।
गोसावी हरिदास धरिती चरण । सद्गुारुमहाराजांचे ॥ २९ ॥
अति कठिण सेवा करिती । नीच कामें अंगीकारिती ।
गुरुचरणीं अतिप्रीती । प्रपंचाअस्था टाकिली ॥ ३० ॥
पडेल ते काम करावें । जैसें मिळेल तैसें खावें ।
सदा संतोषी असावें । नाम घ्यावें आदरें ॥ ३१ ॥
दोन तपें संगतीसी । राहिले गुरुसेवेसी ।
सद्गुपरु होवोनि संतोषी । दीक्षा दिधली तयांप्रति ॥ ३२ ॥
अनुग्रहाचा अधिकार । देते झाले गुरुवर ।
गोमेवाडीचें मंदिर । सेवा तेथें सांगितली ॥ ३३ ॥
कांही कालपर्यंत । होतें तेथे सेवा करित ।
पुढें कुरवली जन्मग्रामांत । आज्ञें मंदिर स्थापिलें ॥ ३४ ॥
कुरवलीसी मठ केला । शिष्य समुदाय वाढविला ।
दीनजनांसी दाविला । बोधूनिया सुपंथ ॥ ३५ ॥
भजन अत्यंत प्रेमळ । उच्चस्वर आणि रसाळ ।
परिसतां वाटें मायाजाळ । सोडूनि भजनीं लागावें ॥ ३६ ॥
असो ऐसे दामूबुवा । सन्मागीं लाविती जीवां ।
गुरुप्रसाद वानावा । किती म्हणोनी ॥ ३७ ॥
विष्णुबुवा कुंभोजकर । नामें देशस्थ द्विजवर ।
श्रीगुरूंचे किंकर । झाले कैसे अवधारा ॥ ३८ ॥
सहज गेले दर्शनासी । देखिले श्रीगुरुचरणांसी ।
समाधान झालें मानसीं । पाहोन ज्ञान उपासना ॥ ३९ ॥
भूत भविष्य वर्तमान । जाणोनिही प्राकृतासमान ।
प्रपंच परमार्थ चालवून । समाधानी गुरुमूर्ति ॥ ४० ॥
अनुग्रह घ्यावा ऐसी चित्ती | उदित होय स्वयंस्फूर्ती |
तेंव्हा करिती विनंती | दिना हाती धरावे ॥ ४१ ॥
समर्थ वदती तयांसी । 'विसरलां मागील गुरूंसी ।
तैसेंच कराल आम्हांसी । तरी कैसें करावें ॥ ४२ ॥
गुरु म्हणजे नव्हे मेवा । लागे देह अर्पावा ।
तरीच त्या देवाधिदेवा । होईल भेटी ॥ ४३ ॥
एक गुरु असतां पाहीं । दुजा वरणे श्लाघ्य नाहीं ।
गुरुक्षोभ घडतां पाही । ठाव कोठेंही न मिळे' ॥ ४४ ॥
श्रीगुरूंनी बोध केला । तेव्हां मनीं आठव झाला ।
शिवमंत्र असे दिधला । पूर्वीं एका गुरूंनी ॥ ४५ ॥
आणिक सांगितली खूण । तुजसी होईल विस्मरण ।
भेटतां सच्चिदानंद घन । बोध करितील पुनरपि ॥ ४६ ॥
तयांसि सद्गुदरु मानावें । चित्त तेथेंचि अर्पावें ।
जिणें सार्थक करोनि घ्यावें । सद्गु रुसेवा करोनी ॥ ४७ ॥
सर्व वृत्तांत निवेदिला । श्रीगुरूंनीं अनुग्रह केला ।
तोचि मंत्र उपदेशिला । शिवउ्पासना लाविली ॥ ४८ ॥
शिव आणि रघुपति । भेद न मानी कल्पांती ।
आसनीं असतां एकांतीं । शिवमंत्र जपावा ॥ ४९ ॥
येरवीं स्मरावा श्रीराम । जो शिवाचा आराम ।
भक्तकाज कल्पद्रुम । अखंड वदनीं असावा ॥ ५० ॥
असो अनुग्रह घेवोन । बहुत केलें साधन ।
आणि करिती तीर्थाटन । चौधाम सप्तपुर्या॥ ॥ ५१ ॥
द्वादश ज्योतिर्लिंगें केलीं । बहुत वेळां यात्रा झाली ।
पुन्हा तीर्थांची माउली । सद्‌गुरुभेटी पावले ॥ ५२ ॥
स्थिति पाहोन आज्ञा देती । सर्व अधिकार तुम्हांप्रति ।
वाढवी श्रीरामभक्ति । नौका जी भवनदीची ॥ ५३ ॥
गुरुआज्ञा घेवोन । पावले वर्हाीडी सेंदुरजन ।
मठ केला ब्रह्मचैतन्य । शिष्यसमुदाय वाढविला ॥ ५४ ॥
मारुतिराव पिटके म्हणोनि । गृहस्थाश्रमी साधक ज्ञानी ।
दीक्षानुग्रह द्यावयालागोनि । अधिकारी जाहले ॥ ५५ ॥
अंतर्ज्ञानी निःसंदेही । अंगी अहंता मुळींच नाही ।
शिष्य शाखा असे पाही । परि संख्या थोडीशी ॥ ५६ ॥
तम्मणशास्त्री नवलगुंद । यांहीवरी झाला प्रसाद ।
दीक्षा देवोनि 'सच्चिदानंद' । नामाभिधान ठेविलें ॥ ५७ ॥
यांचा मठ हुबळीसी । वाढविती रामभक्तीसी ।
शिष्य शाखाही अल्पशी । केली गुरुप्रसादें ॥ ५८ ॥
यावंगली शिवदीक्षित । कर्नाटकीं झाले संत ।
गुरुआज्ञा मानोनि नेमस्त । उपासना चालविती ॥ ५९ ॥
यांचे येथें दत्तस्थापना । स्वयें करी सद्गु रुराणा ।
तेथेंच श्रीजानकीरमणा । प्रतिष्ठा केली आदरें ॥ ६० ॥
उप्पनबेट्टीगिरीकर । कृष्णशास्त्री झाले किंकर ।
साधनीं झिजविती शरीर । शुद्धभाव गुरुचरणीं । ६१ ॥
गुरु शिष्य महासागर । तयांचा न लागे पार ।
अल्पप्रगट वदलें थोर । श्रोतीं रोष न धरावा ॥ ६२ ॥
ऐसे हे संतजन । ज्यांचे अंतरी सीतारमण ।
तयांसी करोनि नमन । पुढील कथा विस्तारूं ॥ ६३ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥


अध्याय आठवा
समास चवथा



नमो अयोध्यावासिया । वसिष्ठ शिष्या रघुराया ।
पित्राज्ञापालका वेदवंद्या । कौसल्यानंदना नमो तुज ॥ १ ॥
गुहकप्रिया श्रीरामा । योगिजनचित्तविरामा ।
वनवासिया निवृत्तकामा । सीतावल्लभ नमो तुज ॥ २ ॥
श्रीगुरु आपले गुण अपार । वर्णितां भागले थोर थोर ।
अवधान द्यावें सत्वर । पुढील कथेसी ॥ ३ ॥
शंकरशास्त्री म्हासुर्णेकर । काव्यव्युत्पन्न भाविक थोर ।
श्रीगुरुंचे झाले किंकर । कवि आणि साधक ॥ ४ ॥
दीक्षा अनुग्रह करावया । सद्‌गुरु अधिकार देती तयां ।
म्हासुर्णे गांवी रामराया- । पाशीं मठ तयांचा ॥ ५ ॥
शिष्य शाखा असे थोडी । कवित्वाची बहु गोडी ।
पुराणसेवेची आवडी । सद्‌गुरुंचे गुण गाती ॥ ६ ॥
कागवाडक्षेत्रीं रामदासी । लागले श्रीगुरुपदासी ।
साडेतीन कोटि जपासी । केलें असे भक्तीनें ॥ ७ ॥
श्रीगुरूंनी दिधली दीक्षा । प्रपंच परमार्थ उभय पक्षां ।
चालवोनि करिती रक्षा । अनंत दुरितांची ॥ ८ ॥
जन्मभूमीचा उद्धार । केला बांधोनि मंदिर ।
अनुग्रहा अधिकार । श्रीगुरूंनी दिधला असे ॥ ९ ॥
शिष्यशाखा असे थोडी । अध्यात्मज्ञानाची गोडी ।
अन्नदानाची परवडी । चालविती बहु ॥ १० ॥
सद्‌गुरूंसी अति भक्ति । वरचेवरी दर्शना जाती ।
प्रपंचीं नसे आसक्ति । रामसेवेची आवडी ॥ ११ ॥
आणिक शिष्य हरिदास । हरिभाऊ वदती जयांस ।
प्रपंचीं सदा उदास । गुरुसेवा अतिप्रिय ॥ १२ ॥
जेव्हां सद्‌गुरुभेटी झाली । तेव्हां पराधीनता सोडिली ।
सदा ध्याती गुरुमाउली । अनन्यभक्तीनें ॥ १३ ॥
सांगली क्षेत्र वसतीस्थान । करिती कीर्तन प्रेमळ भजन ।
नसे तालसूर बंधन । कारण एक उपासना ॥ १४ ॥
कार्यकारण कुटुंब गेह । सद्‌गुरुकार्यीं झिजविती देह ।
न जाणती अन्य उपाय । रामनाम गुरुसेवा ॥ १५ ॥
पुत्र कलत्र बंधु भगिनी । वाहिलीं समग्र सद्‌गुरुचरणीं ।
सकलही गुरुसेवा करोनी । आनंदें काल क्रमिताती ॥ १६ ॥
यांची भगिनी बहिणाबाई । गुरुचरणीं ठेवितां डोई ।
सेवा करितां आळस नाहीं । तिज मायबाप महाराज ॥ १७ ॥
असो कुटुंबी सकळ लोक । हरिदास नामाचें सार्थक ।
करोनी भोगिती सुख । दुर्मिळ गुरुसेवेचें ॥ १८ ॥
रामभट्टाआत्मज बाळंभट्ट जोशी । कुरोलीचे रहिवासी ।
व्यसनी होते अतिशयेंसी । गुरुजवळी सहज आले ॥ १९ ॥
गांजा अफू आणि चरस । सेविती रात्रंदिवस ।
विनविती श्रीसमर्थांस । 'गोष्टी आमुची परिसावी ॥ २० ॥
जरी पुरवाल आमुचें व्यसन । तरी करूं नामस्मरण ।
आज्ञा मानूं प्राणासमान । असत्य न बोलूं कदापि' ॥ २१ ॥
सद्‌गुरु वदती 'उत्तम, । अगत्य चालवूं नेम ।
ऐसे आवडती आम्हां परम । स्पष्टवक्ते' ॥ २२ ॥
नित्यनेम जप नेमून दिला । ऐसा कांहीं काळ गेला ।
कृपेनें निर्व्यसनी केला । व्यसनासक्त तो द्विज ॥ २३ ॥
साधकस्थिति प्राप्त झाली । चित्तासी शुद्धता आली ।
सद्‌गुरूंनी दीक्षा दिधली । पावन केलें बाळंभट्ट ॥ २४ ॥
ब्रह्मचारी चिमणगांवकर । वैराग्यशील साधक थोर ।
दीक्षानुग्रहाचा अधिकार । श्रीकृपेने लाधला ॥ २६ ॥
हनुमानगढीस राहून । तुळसीकृत रामायण ।
नित्य करिती पारायण । योग्याभ्यासी ज्ञानी तसे ॥ २७ ॥
बलवंतराव घाणेकर । सात्त्विक भाविक साधक थोर ।
श्रींचे झाले किंकर । तनमनधनानें ॥ २८ ॥
बापूसाहेब न्यायाधीश । साठये उपनाम जयांस ।
श्रीगुरूंचे प्रसादास । अधिकारी जाहले ॥ २९ ॥
भाऊसाहेब केतकर । नेमणुकीचे कामगार ।
गुरुचरणीं टाकिला भार । सकलही प्रपंचाचा ॥ ३० ॥
शालिग्राम पंतोजी विद्वान । गिजरेशास्त्री कर्मठ जाण ।
काशीकर गुरुजी वेदसंपन्न । गुरुचरणीं नत होती ॥ ३१ ॥
आप्पासाहेब भडगांवकर । आप्पासाहेब कागवाडकर ।
भय्यासाहेब हर्देकर । धनसंपन्न शिष्य झाले ॥ ३२ ॥
भैय्यासाहेब इंदुरवासी । अखंड जपती रामनामासी ।
गाडगुळी भीमराव गदगनिवासी । सदा ध्याती गुरुपद ॥ ३३ ॥
सांगली क्षेत्रींचे फडणवीस । बळवंतराव वदती जयांस ।
ब्रह्मानंद देती अधिकारास । आपुले गुरुसंस्थेचे ॥ ३४ ॥
तोफखाने जाहले महंत । जयांसी सीताराम वदत ।
गृहीं बांधोनि मंदिराप्रत । रामसेवेसी सादर ॥ ३५ ॥
फडके काकासाहेब वदती । सद्‌गुरु बहु प्रेम करिती ।
वारंवार संरक्षिती । अर्थबोध देवोनी ॥ ३६ ॥
गोदूताई नामें भक्त । परम भाविक सत्त्वस्थ ।
विनोदें 'अंबेहळद' वदत । सद्‌गुरु तियेप्रती ॥ ३७ ॥
चार वर्षांची असतां । आसनें करविती दावून सत्ता ।
किती वानूं अभिनवता । गुरुकृपेची ॥ ३८ ॥
मुलाचे व्रतबंधनाचे वेळीं । यावी श्रीगुरुमाउली ।
ऐसी आशा बहु धरिली । परि महाराज अति दूर ॥ ३९ ॥
भक्तकाजकल्पद्रुम । सद्‌गुरुमाय विश्राम ।
संकटकालीं होती उगम । भक्तांसी सदा सन्निध ॥ ४९ ॥
व्रतबंधन होवोनि गेलें । विप्र भोजनासी जमले ।
परि तूप वेळेसी न आलें । म्हणून अडलें भोजन ॥ ४१ ॥
अंबेहळद चिंताग्रस्त । श्रीगुरूंसी प्रार्थित ।
तंव ते प्रत्यक्ष प्रकटोन वदत । 'असेल तेवढें तूप आणा' ॥ ४२ ॥
पावशेर तूप सकळांसी । वाढिते झाले तपोराशी ।
आनंद झाला सकळांसी । चमत्कृति देखोनी ॥ ४३ ॥
एकदां मंदिरीं ऐसें झालें । नाथभागवत निरूपण चालिलें ।
श्रोतेजन तटस्थ जाहले । गुरुवाक्यें परिसतां ॥ ४४ ॥
तंव अंबेहळदीचा सुत । दत्तू क्रीडे आनंदांत ।
सद्‌गुरु वदती तयाप्रत । दंगा येथें न करावा ॥ ४५ ॥
परि मूल हूड भारी । उगा न राहे क्षणभरी ।
मग श्रींनीं मस्तकावरी । वरदहस्त ठेविला ॥ ४६ ॥
मुलाची लागली समाधि । स्वस्वरूपीं शांत आनंदी ।
एक दिवस गेला मधीं । माय विनवी गुरूंसी ॥ ४७ ॥
बालका लागली असेल भूक । बैसोनि अंग देखेल निःशंक ।
कृपा करोनि घालावी भीक । पुत्र स्मृतीसी आणावा ॥ ४८ ॥
सद्‌गुरु वदती हास्यवदन । निजरंगी रंगलें मन ।
रक्षणकर्ता भगवान । समाधिसमयीं ॥ ४९ ॥
असो पुनरपि मस्तकावरी । हस्त ठेवितांचि सत्वरी ।
बाळ येवोनि देहावरी । गुरुचरण वंदितसे ॥ ५० ॥
ऐसे भक्त बहुत झाले । बहुतां साक्षात्कार घडले ।
सकलांनीं साधन केलें । यथाशक्ति ॥ ५१ ॥
हर्देकरीण दुर्गाबाई । काशीबाई गंगूताई ।
'पटाईत मावशी' भक्त पाही । कवि आणि साधक ॥ ५२ ॥
गिरवीकर नरसोपंत । दासबोध वाचिती भक्तियुक्त ।
नाम येवोनि श्रवण करित । डोलतसे आनंदें ॥ ५३ ॥
जेव्हां मनीं विकल्प आला । तेव्हां येईनासा झाला ।
गुरु वदती तयांला । गुरुवाक्य प्रमाण माना ॥ ५४ ॥
मुक्ताबाई शिष्या भली । सद्‌गुरुसेवेसी लागली ।
सकल इंद्रियें झिजविली । गुरुगृहीं राहोनी ॥ ५५ ॥
पाहतां तंव रोडकी दिसे । परि गुरुसेवे उणी नसे ।
पाकशाळेमाजी भासे । प्रत्यक्ष अन्नपूर्णा ॥ ५६ ॥
नामयाची जनाबाई । तैसी गुरूंची मुक्ताबाई ।
सेवेवांचूनि काज नाहीं । वदनीं घेत हरिनाम ॥ ५७ ॥
मुखीं नाम हातीं काम । हाचि एक नित्यनेम ।
सद्‌गुरुचरणीं पावली विश्राम । धन्य भाग्य तियेचें ॥ ५८ ॥
अम्मा नामें मद्रासी । राहिली गुरुसेवेसी ।
द्वादश वर्षें व्रतासी । धरिलें मौन गुरुआज्ञें ॥ ५९ ॥
गृहासक्ति सांडोनी । दुर्लंघ्य वासना जिणोनी ।
आदसें सेवा करोनी । नाम घेत भक्तीने ॥ ६० ॥
वस्त्रें भूषणें कुशलता । गुंफोनि देत भगवंता ।
गृहाची सोडिली आस्था । स्त्रीजात असोनी ॥ ६१ ॥
गोविंदराव अळतेकर । गुरुसेवे झिजविती शरीर ।
मौनव्रत साचार । गुरुआज्ञेनें धरियेलें ॥ ६२ ॥
असो ऐसा बोधवृक्ष । शाखा पसरल्या अनेक ।
जाणते एक गुरुनायक । दुजा समर्थ दिसेना ॥ ६३ ॥
कित्येकांच्या पुरविती कामना । साह्य करिती क्षणक्षणा ।
भक्तियुक्त उपासना । लावोनि देती आनंद ॥ ६४ ॥
कित्येक येती आणि जाती । व्याधीग्रस्त मुक्त होती ।
तयांची न करवे गणती । मशका दुर्लंघ्य मेरू जैसा ॥ ६५ ॥
सकळांसी लाविती साधन । मुख्य एक नामस्मरण ।
क्वचित्‌ औषधीही कथन । करोनि करिती निर्दुःख । ६६ ॥
अंगार्यालची महती फार । लावितांचि जाति विकार ।
जवळीं ठेवितां निशाचर । पीडा न होय निश्चये ६७ ॥
ताईत चिठी दोरा देती । निरोगी करूनि शांतविती ।
मुख्य नाम वनस्पति । पेरित हृदयकाननीं ॥ ६८ ॥
देहादिक विविधताप । वासनाजन्य द्वंद्वताप ।
सकलां रामनामजप । दिव्यौषधि गुरुघरची ॥ ६९ ॥
सिद्ध साधक मुमुक्षु । गुरुगृहीं अनंत भिक्षु ।
जाणता समर्थ ज्ञानचक्षु । स्वल्प संकेत दाविला ॥ ७० ॥
सकलांसी माझा नमस्कार । वारंवार जोडून कर ।
हेंचि गुरूंचे नांदतें घर । ध्यानें अंतरीं कोंदले ॥ ७१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाटाक्षें ॥ ७२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते अष्टमाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥श्रीसदगुरुचरणार्पणमस्तु ॥
॥ इति अष्टमोऽध्यायः समाप्तः ॥


GO TOP