श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय एकसष्टावा


मयूरध्वजाची कथा


श्रीगणेशाय नम: ॥
संपलें बभ्रुवाहनाचें आख्यान ॥ पुढें चालिला श्यामकर्ण ॥
सारथि रथीं इंदिरारमण ॥ सच्चिदानंदतनु जो ॥ १ ॥
संगे अपार सैन्य घेऊन ॥ निघता जाहला बभ्रुवाहन ॥
हंसध्वज नीलध्वज मदन ॥ स्वभारेंशीं चालती ॥ २ ॥
अनुशाल्व यौवनाश्व सुवेग ॥ कर्णनंदन मेघवर्ण जाती सवेग ॥
तो दुसरा श्यामकर्ण सुरंग ॥ तिकडून येतां देखिला ॥ ३ ॥
मयूरध्वज राजा प्रसिद्ध ॥ जेणें केले सहा अश्वमेध ॥
सातवा याग आरंभिला सुबद्ध ॥ घोडा सोडिला पृथ्वीवरी ॥ ४ ॥
ताम्रध्वज त्याचा सुत ॥ साठ अक्षौहिणी दळासहित ॥
पृथ्वीचे राजे जिंकीत ॥ त्याच मार्गें पातला ॥ ५ ॥
दोन्ही घोडे मिळाले ॥ ताम्रध्वजें दृष्टीं देखिले ॥
पार्थाचा घोडा त्या वेळे ॥ धरिला मयूरध्वजसुतें ॥ ६ ॥
पत्र तत्काळ वाचिलें ॥ मग कुलध्वज प्रधान बोले ॥
ज्याणें पूर्वी कौरव आटिले ॥ अकरा अक्षौहिणी दळासहित ॥ ७ ॥
तो आला आहे वीर पार्थ ॥ सवें रक्षी क्षीराब्धिजामात ॥
यावरी ताम्रध्वज बोलत ॥ उत्तम बहुत जाहलें ॥ ८ ॥
सहा अश्वमेध जाहले पूर्ण ॥ आतां हे दोन्ही नेऊ श्यामकर्ण ॥
एव जाहले आठ यज्ञ ॥ त्यावरी श्रीकृष्ण भेटला ॥ ९ ॥
धन्य आमुचें भाग्य ॥ यागास आला श्रीरंग ॥
इतुकेन सर्व सांग ॥ जन्मसार्थक जाहलें ॥ १० ॥
पार्थास म्हणे मनमोहन ॥ पुढें युद्ध दिसे बहु कठिण ॥
एवढा वीर दारुण बभ्रुवाहन ॥ करभार देत मयूरध्वजा ॥ ११ ॥
सत्त्वशील वीर अद्‍भुत ॥ मयूरध्वज परमभक्त ॥
नर्मदातटीं याग करित ॥ रत्‍नपुरनगरीं जो ॥ १२ ॥
तो युद्ध मांडिलें अद्‍भुत ॥ ताम्रध्वज श्रीहरीस बोलत ॥
मी तुज देखोनि निर्भयचित्त ॥ युद्ध अत्यंत करीन आतां ॥ १३ ॥
ताम्रध्वजें चाप ओढून ॥ पार्थावरी टाकिले सत्तर बाण ॥
ऋषिसंख्या मार्गण ॥ सात्यकीवरी सोडिले ॥ १४ ॥
कृतवर्म्यावरी आठ बाण ॥ शतबाणीं विंधिला मदन ॥
श्रीकृष्णावरी तीन बाण ॥ टाकिता जाहला ताम्रध्वज ॥ १५ ॥
यावरी बाणजामात ॥ पुढें धांवला उखानाथ ॥
बाणजाळ घालित ॥ ताम्रध्वजावरी तेधवां ॥ १६ ॥
वीस बाणीं हृदय भेदित ॥ दळ संहारीत मदनसुत ॥
पितामह वैकुंठनाथ ॥ विलोकी पार्थही कौतुकें ॥ १७ ॥
रणभूमि माजली बहुत ॥ रक्तयुक्त निम्नगा जाती वाहत ॥
अनिरुद्ध वीर अद्‌भुत ॥ दळ पाडिलें तीन अक्षौहिणी ॥ १८ ॥
बाणामागें बाण सोडित ॥ ताम्रध्वज केला विरथ ॥
मग तो मयुरध्वजाचा सुत ॥ कृतांतवत क्षोभला ॥ १९ ॥
कालदंडाऐसे बाण ॥ सोडिता जाहला तीक्ष्ण ॥
मग तो मन्मथाचा नंदन ॥ मूर्च्छित पाडिला ताम्रध्वजें ॥ २० ॥
पांडवांस प्रिय अत्यंत ॥ पुढें धांवला वीर वृषकेत ॥
ताम्रध्वजाचा रथ ॥ चूर्ण केला तीक्ष्ण शरीं ॥ २१ ॥
दुजे रथी तो बैसत ॥ तोही चूर्ण केला क्षणांत ॥
तिसरे रथीं आरूढत ॥ केला निःपात तयाचा ॥ २२ ॥
एकामागे एक जाण ॥ तीनशे रथ केले चूर्ण ॥
ताम्रध्वज जर्जर करून ॥ सेना अपार मारिली ॥ २३ ॥
यावरी ताम्रध्वज अवीट वीर ॥ करीत उठिला संहार ॥
बाणघाये कर्णकुमार ॥ मूर्च्छित केला समरांगणीं ॥ २४ ॥
सहस्रबाणीं ते वेळां ॥ सात्यकी मूर्च्छित पाडिला ॥
कृतवर्माही पहुडविला ॥ समरभूमीसी ते काळीं ॥ २५ ॥
यौवनाश्व सुवेग वीर ॥ मदन नीलध्वज प्रवीर ॥
बभ्रुवाहनें युद्ध केलें थोर ॥ तोही पाडिला ताम्रध्वजें ॥ २६ ॥
सेना जाहली भयभीत ॥ म्हणती हा क्षोभला कृतांत ॥
कित्येक लटकेच भूमीं पहुडत ॥ मूर्च्छागतांसारिखे ॥ २७ ॥
बाण तयाचे परम तीव्र ॥ चपलेऐसे अनिवार ॥
कोणी उभा न राहे समोर ॥ सेना सर्वत्र पडियेली ॥ २८ ॥
एक उरले कृष्णार्जुन ॥ पार्थासी म्हणे इंदिरारमण ॥
महावीर पुण्यपरायण ॥ तुझी सेना संहारिली ॥ २९ ॥
शूरत्वाचा अभिमान ॥ यापुढें सकळांचा क्षीण ॥
सर्वांचे गर्व हरून ॥ समरीं शयन करविलें ॥ ३० ॥
यावरी तो महावीर पार्थ ॥ बाणधारा त्यावरी वर्षत ॥
ताम्रध्वजाचा छेदून रथ ॥ सारथि मारिला तत्काळ ॥ ३१ ॥
ताम्रध्वजाचे सहस्त्र रथ ॥ चूर्ण करी सुभद्रानाथ ॥
मग ताम्रध्वजें पुरुषार्थ ॥ अत्यद्भुत प्रकटविला ॥ ३२ ॥
ताम्रध्वज म्हणे वैकुंठनाथा ॥ आतां तूं रक्षी आपुल्या पार्था ॥
पहा माझिया पुरुषार्था ॥ धरून नेईन दोघांतें ॥ ३३ ॥
श्येनपक्षी जैसा धांवत ॥ तैसा उडाला अकस्मात ॥
ब्रह्मांडनायक द्वारकानाथ ॥ उचलून घेत खांद्यावरी ॥ ३४ ॥
अर्जुन धरिला चरणीं ॥ दोघे घेऊन उडाला गगनीं ॥
अर्जुनास म्हणे कैवल्यदानी ॥ पहा पुरुषार्थ ययाचा ॥ ३५ ॥
मग यावरी तो कमलावर ॥ ताम्रध्वजाचे हृदयीं सत्वर ॥
वज्रप्राय लत्ताप्रहार ॥ देता जाहला तेधवां ॥ ३६ ॥
ताम्रध्वजासी आली गिरगिरी ॥ तिघेही पडिले पृथ्वीवरी ॥
पार्थ आणि कंसारी ॥ मूर्च्छा अत्यंत पावले ॥ ३७ ॥
गेलेच काय नेणों प्राण ॥ तेविं विकळ पडले दोघे जण ॥
ताम्रध्वजें मूर्च्छा सांवरून ॥ आपुले रथीं आरूढला ॥ ३८ ॥
जयवाद्यें वाजवून ॥ घेऊन चालिला दोन्ही श्यामकर्ण ॥
रत्‍नपुरास जाऊन ॥ पितयालागीं भेटला ॥ ३९ ॥
सांगे समूळ वृत्तांत ॥ जिकिले पार्थ आणि वैकुंठनाथ ॥
पाडूनियां मूर्च्छागत ॥ सेना सर्व आटिली ॥ ४० ॥
बभ्रुवाहन मदन अनिरुद्ध जाण ॥ मेघवर्ण घटोत्कचनंदन ॥
हंसध्वज नीलध्वज संपूर्ण ॥ सेनेसहित मारिले ॥ ४१ ॥
आणिले दोन्ही श्यामकर्ण ॥ अष्टयज्ञ तुमचे जाहले संपूर्ण ॥
मयूरध्वज दीक्षित होऊन ॥ ब्राह्मणीं वेष्टित बैसलासे ॥ ४२ ॥
समस्त वृत्तांत ऐकोन ॥ मयुरध्वज गहिवरला पूर्ण ॥
ताम्रध्वजास बोले वचन ॥ मज आतां वदन दावू नको ॥ ४३ ॥
परब्रह्म केवळ वैकुंठनाथ ॥ जो कमलोद्भवजनक समर्थ ॥
सनकादिकांचें आराध्यदैवत ॥ सार निगमागमाचे ॥ ४४ ॥
महाराज कृष्णार्जुन ॥ प्रत्यक्ष ते नरनारायण ॥
त्यांवरी तूं शस्त्र धरून ॥ कां तूं युद्ध केलें रे ॥ ४५ ॥
घालूनियां लोटांगण ॥ आणितास येथें धावून ॥
तरी मी होतों सुखसंपन्न ॥ म्हणतों धन्य तुजलागीं ॥ ४६ ॥
अरे तूं हिंसक प्रसिद्ध ॥ अरे कैसा केला लिंगभेद ॥
श्रीकृष्ण पूर्ण ब्रह्मानंद ॥ त्यावरी शस्त्र टाकिलें तुवां ॥ ४७ ॥
घरास येतां चिंतामणी ॥ अभाग्यें दिधला भिरकावूनी ॥
कल्पवृक्ष उपडोनी ॥ आंगणी जैसा टाकिला ॥ ४८ ॥
कामधेनु येतां सत्वर ॥ अभाग्यें मारिले काष्ठप्रहार ॥
तैसा तुवां केला प्रकार ॥ हरीवरी शर घातले ॥ ४९ ॥
अमृत भाग्ये प्राप्त जाहले ॥ तेणें कैसें संमार्जन केलें ॥
तैसें परब्रह्म घरा आलें ॥ अपमानिलें कैसें तुवां ॥ ५० ॥
अरे तूं विष्णुद्रोही घातक ॥ जाई रे परता न दाखवीं सुख ॥
सहा अश्वमेध केले देख ॥ द्वारकानायक आला पैं ॥ ५१ ॥
सातवा यज्ञ करावयास ॥ येत होता जगन्निवास ॥
द्यावया मज निर्दोष यश ॥ स्वामी माझा दयाळु ॥ ५२ ॥
कंठ दाटला सद्‌गदित ॥ विमलांबुधारा नेत्रीं वाहत ॥
मयूरध्वज चिंताक्रांत ॥ अशनप्राशन न घेचि ॥ ५३ ॥
ऐसा राव आरंबळत ॥ इकडे काय जाहले सेनेंत ॥
उठोनियां वैकुंठनाथ ॥ सावध करीत पार्थासी ॥ ५४ ॥
उभा रे ताम्रध्वजा म्हणून ॥ हांक देत उठिला अर्जुन ॥
हांसोनि बोले जनार्दन ॥ गेला घेऊन अश्व दोन्ही ॥ ५५ ॥
सैन्य तुझें मारिलें समस्त ॥ उरलों आम्ही दोघे जीवंत ॥
एवढा तुझा बलपुरुषार्थ ॥ क्षीण केला तेणें पहा ॥ ५६ ॥
तुजहून शतगुणें देख थोर ॥ बळकट ताम्रध्वज राजेंद्र ॥
मग बोले पार्थ वीर ॥ आतां यज्ञ राहिला कीं ॥ ५७ ॥
सर्वकर्ता तूं नारायण ॥ आमुचा कायसा अभिमान ॥
तुवांच मांडिला यज्ञ ॥ कर्ता पूर्ण तुझा तूं ॥ ५८ ॥
पांडवांचा पूर्ण कैवारी ॥ हें ब्रीद गाजे त्रिभुवनभरी ॥
तें तूं सांभाळी कैटभारी ॥ पूतनारे कंसांतका ॥ ५९ ॥
यावरी बोले मदनतात ॥ मयूरध्वजाची भक्ति अद्‌भुत ॥
सत्वशील सदा शांत ॥ तुज दावितों चाल आतां ॥ ६० ॥
हरि जाहला वृद्ध ब्राह्मण ॥ शिष्य सहजचि अर्जुन ॥
पूर्वस्वरूपें पालटून ॥ रत्‍नपुरासमीप आले ॥ ६१ ॥
त्या नगरींची पाहतां रचना ॥ विस्मय वाटे अर्जुना ॥
म्हणे हस्तनापुर नारायणा ॥ ओवाळावे यावरूनि ॥ ६२ ॥
आधि व्याधि दुःख दरिद्र अवर्षण ॥ वृद्धत्व दुष्काळ दुर्मरण ॥
नगरीं नाहीं अणुप्रमाण ॥ प्रजाजन सुखरूप ॥ ६३ ॥
नगरांत प्रवेशले दोघे जण ॥ लोकीं देखोनि दिव्य ब्राह्मण ॥
समस्त करिती साष्टांग नमन ॥ नाहीं अभिमान कोणासी ॥ ६४ ॥
कृतांतासी शिक्षा लाविती ॥ ऐसे वीर नगरीं हिंडती ॥
पार्थासी म्हणे श्रीपती ॥ पाहें वीर समर्थ हे ॥ ६५ ॥
आधींच परब्रह्म साक्षात ॥ त्याहीवरी द्विजरूप शोभत ॥
द्वादश टिळे विराजित ॥ यज्ञोपवीत झळकतसे ॥ ६६ ॥
नेसला क्षीरोदक सुढाळ ॥ शाटी पांघुरला शुभ्र निर्मळ ॥
कर्णीं कुंडलांचा झळाळ ॥ गंडस्थळीं बिंबलासे ॥ ६७ ॥
केश सावरून दिधली ग्रंथी ॥ पायीं पादुका विराजती ॥
पुढें शिष्य सुभद्रापती ॥ काठी धरूनि जातसे ॥ ६८ ॥
यज्ञमंडपांत आले दोघे जण ॥ तो चार लक्ष बैसले ब्राह्मण ॥
एकदांच अवघे उठोन ॥ सामोरे येती विप्रांतें ॥ ६९ ॥
कुंडांतूनि तिन्ही वन्ही ॥ मूर्तिमंत उभे ठाकोनी ॥
आहवनीय गार्हपत्य दक्षिणाग्नी ॥ सामोरे जाती विप्रांते ॥ ७० ॥
मयूरध्वज धांवोन ॥ घालिता जाहला लोटांगण ॥
परमसन्मानें प्रीतींकरून ॥ सिंहासनीं बैसविले ॥ ७१ ॥
रत्‍नाभिषेकेंकरून ॥ केलें षोडशोपचारे पूजन ॥
मयूरध्वज कर जोडून ॥ उभा पुढें राहतसे ॥ ७२ ॥
ब्राह्मण धाकती समस्त ॥ वृद्ध वेदोनारायण साक्षात ॥
जरी आम्हांसी कांही पुसेल येथ ॥ तरी प्रत्युत्तर न देववे ॥ ७३ ॥
मयूरध्वज मुख विलोकित ॥ तो ब्राह्मण जाहला सद्‌गदित ॥
स्फुंदस्फुंदोनि तेव्हां रडत ॥ नयनीं वाहत अश्रुधारा ॥ ७४ ॥
सभा गजबजली समस्त ॥ हा ब्राह्मण सत्वशील बहुत ॥
कोण्या पतितें दुःख प्राप्त ॥ केलें यासी कळेना ॥ ७५ ॥
मयूरध्वज तेव्हां बोलत ॥ स्वामी काय सांगावा वृत्तांत ॥
तुज दुःख दिलें त्यास बहुत ॥ दंड आतां करीन मी ॥ ७६ ॥
तुजवरून प्राण ॥ मी आपुला ओवाळून ॥
तूं सांगसी तें करीन ॥ आतांच देईन मागसी तें ॥ ७७ ॥
विप्र स्फुंदे ते अवसरीं ॥ बोलतां शब्द न फुटे बाहेरी ॥
म्हणे राजेंद्रा अवधारीं ॥ वृत्तांत आतां जाहला तो ॥ ७८ ॥
मी द्वारकेचा ब्राह्मण ॥ सांगातें पुत्र शिष्य घेऊन ॥
तुवां केले सहा यज्ञ ॥ म्हणोनि कीर्ति ऐकिली ॥ ७९ ॥
सातव्या यज्ञालागून ॥ येत होतों त्वरेंकरून ॥
तुझ्या नगरासमीप जाण ॥ दाट उद्याने लागलीं ॥ ८० ॥
त्यांतून अकस्मात पंचानन ॥ आला आम्हांवरी धांवोन ॥
एकुलता एक जाण ॥ पुत्र माझा धरियेला ॥ ८१ ॥
वेदशास्त्री परमनिपुण ॥ वेदविधि नाम त्यालागून ॥
ऐसा पुत्र प्रवीण ॥ भूमंडळी नसे कोणातें ॥ ८२ ॥
कोमल बाळ धरून ॥ गेला झाडांमाजी घेऊन ॥
ऐसें बोलतां ब्राह्मण ॥ कंठ दाटला पुढती ॥ ८३ ॥
कोणास दुःख सांगों आतां ॥ मग राजेंद्र जाहला बोलता ॥
सेना सिद्ध करा रे तत्त्वतां ॥ त्वरें चला वना जाऊं ॥ ८४ ॥
पृथ्वीवरील पंचानन ॥ धरून आतां जिवे मारीन ॥
राव सिद्ध जाहला जाणोन ॥ म्हणे ब्राह्मण ऐक राया ॥ ८५ ॥
मी त्यासी बोलिलों वचन ॥ भक्षीं मज सोडीं नंदन ॥
मग तो बोलिला पंचानन ॥ तुझें कठिण शरीर नलगे ॥ ८६ ॥
तुवां व्रतें तपें केलीं फार ॥ न भक्षीं तुझें जरठ शरीर ॥
आतां काकुलती येतसे थोर ॥ तरी विचार ऐक एक ॥ ८७ ॥
तुझा पुत्र मी रक्षितों क्षणभरी ॥ तूं मयूरध्वजापाशीं जा झडकरी ॥
त्याचा देह कर्वतून ये अवसरीं ॥ उजवे अंग आणीं कां ॥ ८८ ॥
त्याचें सुकुमार शरीर गौरवर्ण ॥ भक्षितां मी तृप्त होईन ॥
मग तुझा पुत्र सोडीन ॥ हा निश्चय जाण पां ॥ ८९ ॥
मज एवढाच राया सुत ॥ वेदशास्त्रीं पारंगत ॥
त्याचें लग्न मांडिलें निश्चित ॥ वैशाखशुद्ध द्वादशीसी ॥ ९० ॥
देशील कांहीं आम्हांसी धन ॥ म्हणोन येत होतों धांवोन ॥
ऐसें मयूरध्वज ऐकोन ॥ काय वचन बोलत ॥ ९१ ॥
आयुष्य धन यौवन ॥ हें मरीचिजलवत क्षणिक जाण ॥
राज्यांतीं नरक पूर्ण ॥ भोगावे कीं न सुटती ॥ ९२ ॥
क्षणिक शरीर हें अशाश्वत ॥ आयुष्याचें न कळे गणित ॥
ब्राह्मणकाजीं वेचितां यथार्थ ॥ सार्थक याचें जाहलें ॥ ९३ ॥
सिद्ध जाहला राजेंद्र ॥ कर्वत आणविला सत्वर ॥
मग बोलत काय विप्र ॥ ऐक एक सांगतों ॥ ९४ ॥
तुझी स्त्री आणि सुत ॥ यांजवळी देई कर्वत ॥
तुझ्या डोळा आले अश्रुपात ॥ किंवा रडत देखिला कोणीं ॥ ९५ ॥
नगरांतील मनुष्यमात्र ॥ कोणीं न करावा हाहाकार ॥
कर्वतितां रायाचें शरीर ॥ गीत गावें स्त्रीपुत्रांनीं ॥ ९६ ॥
यांत कांहीं अंतर पडतां जाण ॥ मी जाईन तत्काळ उठोन ॥
मग राये स्त्री आणि नंदन ॥ बरव्यापरी बोधिलीं ॥ ९७ ॥
तुम्हांसी पाळिले आजवरी देख ॥ आतां माझें करा सार्थक ॥
कदा न करावा कोणीं शोक ॥ सर्व लोको विनविलें ॥ ९८ ॥
स्नान करूनि सत्वधीर ॥ नित्यकर्म सारूनि परिकर ॥
दान देऊन अपार ॥ उभा ठाकला तेधवां ॥ ९९ ॥
शिरीं घातला कर्वत ॥ हरिनामावली मुखीं उच्चारित ॥
कृष्ण माधव गोविंदा अच्युत ॥ नामप्रबंध उच्चारी ॥ १०० ॥
स्त्रीपुत्रीं धरिला कर्वत ॥ राव समस्तांस कर जोडित ॥
म्हणे ब्राह्मणांस विपरीत ॥ सहसा कोणी बोलूं नका ॥ १०१ ॥
खणखणां कर्वत वाजत ॥ राव नामावली मुखीं उच्चारित ॥
हे द्वारकानाथ मदनतात ॥ द्रौपदीलज्जारक्षका ॥ १०२ ॥
गजेंद्रोद्धारका जगज्जीवना ॥ पांडवपालका जगन्मोहना ॥
तुझें अक्षयपद जनार्दना ॥ मज नेईं तेथें आतां ॥ १०३ ॥
ब्राह्मण म्हणे मूकवत ॥ कां कर्वतिता तुम्ही येथ ॥
राव स्त्रीपुत्रां खुणावित ॥ गा कांहीं येईल तैसें ॥ १०४ ॥
मग म्हणती राजेंद्रा ॥ मयूरध्वजा अत्युदारा ॥
शरीरसंपत्ति देऊन विप्रा ॥ कीर्ति केली अद्‌भुत ॥ १०५ ॥
सकल मुख्यीचे भूपाल घेऊनी ॥ राजेंद्रा लागती तुझे चरणीं ॥
तुजऐसा उदार त्रिभुवनीं ॥ दुजा नाहीं भूभुज ॥ १०६ ॥
ब्राह्मणांच्या पंक्तीं बैसवून ॥ कोण देईल इच्छाभोजन ॥
सकळ धरामरां सतेज पूर्ण ॥ कर्ता तुजविण नसेचि ॥ १०७ ॥
नगरांत आकांत होत थोर ॥ कैंचा आला रे येथें विप्र ॥
न मागे संपत्ति राज्य साचार ॥ राजशरीर छेदवितो ॥ १०८ ॥
सकल देव विमानीं ॥ सिद्ध जाहले पुष्पें घेऊनी ॥
म्हणती धन्य उपमा त्रिभुवनीं ॥ मयूरध्वजा तुज नसे ॥ १०९ ॥
एक म्हणती देवपदें सकळीं ॥ यास आतां देईल वनमाळी ॥
तो आश्चर्य वर्तलें ते काळीं ॥ तेंच सकळीं परिसिजे ॥ ११० ॥
रायाचा जो वामनेत्र ॥ तेथून चालिली अश्रुधारा ॥
ब्राह्मण चालिला सत्वर ॥ म्हणे रडतो नेघे मी आतां ॥ १११ ॥
ब्राह्मण जातो देखोनी ॥ स्त्रीपुत्र विनविती रायालागूनी ॥
विप्र जातो तुज टाकूनी ॥ काय आम्हीं करावें ॥ ११२ ॥
राव ब्राह्मणास ते वेळीं ॥ करें खुणावूनी बोलावी जवळी ॥
येरू पातला तत्काळीं ॥ म्हणे सांग कां अश्रु आले ॥ ११३ ॥
मयूरध्वज बोले वचन ॥ माझें सव्यांग आनंदघन ॥
तुम्ही जाल तें घेऊन ॥ सार्थक जाहलें तयाचें ॥ ११४ ॥
वामनेत्रीं अश्रु आले ॥ कीं आपुलें सार्थक नाहीं जाहले ॥
तें दुःख आठवतें ये वेळे ॥ खेदें रडतों याकरितां ॥ ११५ ॥
ऐसें ऐकतां जगज्जीवन ॥ दिव्य चतुर्भुज रूप प्रकटवून ॥
किरीटकुंडलें मंडित वदन ॥ आकर्णनयन विराजती ॥ ११६ ॥
कर्वत काढून ते समयीं ॥ मयूरध्वज धरिला हृदयीं ॥
क्षत न दिसे सहसाही ॥ दिव्यरूप जाहलें ॥ ११७ ॥
जाहला एकचि जयजयकार ॥ पुष्पे वर्षती सुरवर ॥
लागले वाद्यांचे गजर ॥ लोक धांवती पहावया ॥ ११८ ॥
अर्जुने स्वरूप प्रकट केलें ॥ मयूरध्वजें आलिंगिलें ॥
ते काळीं जें सुख जाहले ॥ त्यास दृष्टांत नसेचि ॥ ११९ ॥
कृष्णार्जुनांचें पूजन ॥ राये केलें प्रीतींकरून ॥
करूनियां अपार स्तवन ॥ धरी चरण वारंवार ॥ १२० ॥
मग मयूरध्वजासहित श्रीकृष्ण ॥ संगे सप्त अक्षौहिणीदळ घेऊन ॥
जेथें पडलें घोर रण ॥ तेथें आले तेधवां ॥ १२१ ॥
अद्‍भुत केलें गोपाळे ॥ दृष्टीनें विलोकितां सर्व दळें ॥
प्राणिमात्र जीवविले ॥ गर्जो लागले सकळ वीर ॥ १२२ ॥
ताम्रध्वजाचें दळ ॥ जीवविले श्रीरंगे तत्काळ ॥
गर्जत वाद्यांचा कल्लोळ ॥ रत्‍नपुरा प्रवेशले ॥ १२३ ॥
राहवून सप्त दिवस ॥ राये पूजिला जगन्निवास ॥
अपार संपत्ति रत्‍नें विशेष ॥ भगवंतास समर्पिलीं ॥ १२४ ॥
मयूरध्वजास म्हणे जगज्जीवन ॥ तुम्ही आम्ही साह्य होऊन ॥
धर्मयाग संपादून ॥ सिद्धीस नेऊ तत्त्वतां ॥ १२५ ॥
मयूरध्वज म्हणे कृपानिधी ॥ सातवा याग न पावतां सिद्धी ॥
अंतर पडेल वेदविधी ॥ कैसा येऊं सांगातें ॥ १२६ ॥
हरि म्हणे सहा याग केले ॥ तेणें तुवां कोणास तोषविलें ॥
आतां सप्त यागांचें श्रेय सगळें ॥ मदर्पण करीं कां ॥ १२७ ॥
अनंतयागांचें फळ ॥ तुझ्या हातास आलें निर्मळ ॥
तुष्टलों मी घननीळ ॥ चाल धर्मासी भेटावया ॥ १२८ ॥
मयूरध्वज बोले वचन ॥ तुझें वाक्य मज प्रमाण ॥
सोडिले दोन्ही श्यामकर्ण ॥ साह्य आपण चालिला ॥ १२९ ॥
पूर्ण ब्रह्मानंद अभंग ॥ सर्वस्वें साह्य श्रीरंग ॥
श्रीधरवरद निःसंग ॥ न पडे व्यंग कोठेही ॥ १३० ॥
दोन्ही श्यामकर्ण पुढें जात ॥ सकलरायांसहित पार्थ ॥
पाठीसी जातसे रक्षित ॥ नृप समस्त समागमें ॥ १३१ ॥
यावरी सारस्वतपुरीं ॥ वीरवर्मा राज्य करी ॥
त्याच्या सेवकीं झडकरी ॥ वारू धरून नेले तेव्हां ॥ १३२ ॥
ज्याच्या राज्यांत बहुत नीती ॥ जांवई ज्याचा संयमिनीपती ॥
पुण्यपरायण नृपती ॥ नाहीं वस्ति पापाची ॥ १३३ ॥
परस्त्री देखतां निर्बळ ॥ परधन पाहतां अंध केवळ ॥
परनिंदेविषयीं सकळ ॥ मुके होती जाण पां ॥ १३४ ॥
आधि व्याधि दरिद्र कांहीं ॥ ज्याचे ग्रामीं नसे कालत्रयीं ॥
संयमिनी ज्याची कन्या पाहीं ॥ ते दिधली यमातें ॥ १३५ ॥
सर्वही वीर मरती ॥ शेवटीं यमालयाप्रति जाती ॥
म्हणोन ते यमस्त्री निश्चितीं ॥ जाहली ऐसें विचारूनि ॥ १३६ ॥
सर्व प्रतिव्रता म्हणविती ॥ अग्नीस शेवटीं शरीर देती ॥
तरी ते नव्हे प्रतिव्रता सती ॥ वैश्वानरासी मिळता पैं ॥ १३७ ॥
ऐसें जाणोन संयमिनी ॥ जाहली वैवस्वताची पत्‍नी ॥
ते पतिव्रतांमाजी शिरोमणी ॥ भ्रतारसेवे सादर ॥ १३८ ॥
वीरवर्म्याचीनगरी शुद्ध ॥ धर्म नांदत चतुष्पाद ॥
घरोघरीं ब्रह्मानंद ॥ नाहीं विषम कोठेही ॥ १३९ ॥
असो पंचपुत्रांसहित ॥ वीरवर्मा बाहेर निघत ॥
ज्याच्या दळास नाहीं अंत ॥ युद्ध अद्भुत मांडले ॥ १४० ॥
श्वशुराचे संकट जाणोन ॥ यम पातला स्वर्गाहून ॥
नाना व्याधि रोग घेऊन ॥ साह्यतेस पातला ॥ १४१ ॥
तीन शत शूळे मूर्तिमंत ॥ ऐंशी वातरोग आले धांवत ॥
पातले चौदा सन्निपात ॥ अष्टादश कुष्ठ वेगळाले ॥ १४२ ॥
अष्टोत्तरशत गुल्मरोग ॥ चौर्‍यायशीं धनुर्वात आले सवेग ॥
क्षयरोग सेनापति अभंग ॥ सर्वांमाजी श्रेष्ठ तो ॥ १४३ ॥
अष्टोत्तरशत रोग मुख्य सप्त ॥ त्यांचे भेद मग आहेत बहुत ॥
वर्णितां न लागेचि अंत ॥ कासया ग्रंथ वाढवूं ॥ १४४ ॥
वीरवर्म्याचें अद्भुत बळ ॥ साह्यतेस पातलें यमाचें दळ ॥
युद्ध मांडिलें तुंबळ ॥ पांडवदळ सहारिलें ॥ १४५ ॥
पार्थरथी कमलाकांत ॥ वीरवर्मा त्याप्रति बोलत ॥
श्रीकृष्णा तूं रक्षीं पार्थ ॥ पाहें प्रताप माझा आतां ॥ १४६ ॥
साठ बाण घालून ॥ विकळ केला वीर अर्जुन ॥
पांच बाणीं संपूर्ण ॥ पंचशरजनक विंधिला ॥ १४७ ॥
सावध होऊन पार्थ ॥ त्यावरी बाणजाळ घालित ॥
मग म्हणे रमानाथ ॥ पार्था वीर नाटोपे हा ॥ १४८ ॥
तुवां मारिले कर्ण जयद्रथ ॥ तैसें नव्हे हें येथ ॥
राजे सर्व केले मूर्च्छित ॥ साह्य तुज आले जे ॥ १४९ ॥
तरी हनुमंता याचा रथ बांधावा ॥ नेऊन समुद्रांत टाकावा ॥
वायुसुत म्हणे केशवा ॥ अशोकवन नव्हे हें ॥ १५० ॥
महाराज हा विष्णुभक्त ॥ तव सामर्थ्येंच बलवंत ॥
मग वीरवर्म्याचा रथ ॥ अंजनीपुत्रें उचलिला ॥ १५१ ॥
वीरवर्म्यानें पार्थस्थंदन ॥ एक हस्ते घेतला उचलून ॥
अलातचक्राऐसा भोवंडून ॥ समुद्रावरी पातले ॥ १५२ ॥
वीरवर्मा म्हणे हनुमंता ॥ तूं मज टाकिशी जेथें आतां ॥
पार्थ आणि कृष्णनाथा ॥ यांसही तेथेंच बुडवीन मी ॥ १५३ ॥
एका हातें धरिला रथ ॥ एका हस्ते ताडिला हनुमंत ॥
वायुसुत लत्ताप्रहार देत ॥ परी तो कदा न सोडी ॥ १५४ ॥
वीरवर्म्याचे हृदयीं ॥ कृष्णे लाथ दिधली ते समयीं ॥
मग अवघेचि पडिले महीं ॥ युद्ध तेथेंही करी तो ॥ १५५ ॥
श्रीरंग म्हणे अर्जुना ॥ हा वीर कदा आटोपेना ॥
येथें कोणाचें बळ चालेना ॥ सहस्रवर्षे भिडतां ॥ १५६ ॥
कृष्ण म्हणे रे वीरवर्म्या ॥ तुवां केली आजि युद्धाची सीमा ॥
तुज देखोन मज प्रेमा ॥ उचंबळत भेटावया ॥ १५७ ॥
ऐसें ऐकतां वचन ॥ वीरवर्मा घाली लोटांगण ॥
कृष्णार्जुनीं प्रीतीकरून ॥ भेटला तो रणपंडित ॥ १५८ ॥
आपुलें सर्व राज्य धन ॥ तत्काळ केलें कृष्णार्पण ॥
शास्त्रसंख्या दिवस राहवून ॥ आदर केला बहुतचि ॥ १५९ ॥
भांडारे समर्पिलीं सर्व ॥ एकवीस सहस्त्र दिधले अश्व ॥
यमें येऊन वंदिला माधव ॥ गेला स्वस्थाना त्यावरी ॥ १६० ॥
श्रीकृष्णवचनेंकरून ॥ वीरवर्मा दळ घेऊन ॥
साह्य चालिला संपूर्ण ॥ तनु मन धन घेऊनियां ॥ १६१ ॥
पुढें नंदडोहो गहन ॥ दोन्ही घोडे गेले त्यावरून ॥
भिजों दिला नाहीं चरण ॥ पवनासमान गमन त्यांचें ॥ १६२ ॥
मग नौका आणून बहुत ॥ पार्थ दळ उतरित ॥
पुढें कुंतलपुर देखत ॥ नगर चंद्रहास्याचें ॥ १६३ ॥
नगराजवळी येतां जाण ॥ अदृश्य जाहले श्यामकर्ण ॥
दळभार तेथें थोकोन ॥ तटस्थरूप पाहतसे ॥ १६४ ॥
म्हणती वारू नेले कोणीं येथ ॥ हा न कळेचि काय वृत्तांत ॥
वेडावला वीर पार्थ ॥ बुद्धि कांहीं सुचेना ॥ १६५ ॥
तो अकस्मात नारद मुनी ॥ उभा ठाकला तेथें येऊनी ॥
जो दिव्यगंधीं दिव्यसुमनीं ॥ सुर गणी अर्चिला ॥ १६६ ॥
देखोनि विष्णुनाभनंदन ॥ नमिती स्तविती कृष्णार्जुन ॥
सकळ राजे येऊन ॥ मस्तक ठेविती पायांवरी ॥ १६७ ॥
अर्जुन बोले वचन ॥ येथें गुप्त जाहले श्यामकर्ण ॥
हांसला तेव्हां ब्रह्मनंदन ॥ म्हणे वर्तमान ऐक आतां ॥ १६८ ॥
चंद्रहास्यें श्यामकर्ण नेले ॥ तें तुम्हांस कांहींच नाहीं कळलें ॥
यावरी सुभद्रावरें पुशिलें ॥ चंद्रहास्य हा कोण असे ॥ १६९ ॥
नारद म्हणे ऐक इतिहास ॥ चंद्रहास्य महाराज पुण्यपुरुष ॥
ज्याचें चरित्र ऐकतां निर्दोष ॥ प्राप्त यश होय पैं ॥ १७० ॥
अवघे राजे आणि कृष्णार्जुन ॥ कथा ऐकती सावधान ॥
चंद्रहास्याचें चरित्र गहन ॥ विधिपुत्र वर्णील तें ॥ १७१ ॥
ती सुरस कथा असे फार ॥ ब्रह्मानंदें होऊन निर्भर ॥
ऐका तेच हो सादर ॥ प्रेमभरेंकरूनियां ॥ १७२ ॥
श्रीपांडुरंगपुरविहारा ॥ श्रीधरवरदा जगदुद्धारा ॥
ब्रह्मानंदा अत्युदारा ॥ बोलवीं सार कथा ते ॥ १७३ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अश्वमेध जैमिनिकृत ॥
त्यांतील सारांश निश्चित ॥ एकसष्टाव्यांत कथियेला ॥ १७४ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे अश्वमेधपर्वणि एकषष्टितमोऽध्यायः ॥ ६१ ॥
अध्याय एकसष्टावा समाप्त


GO TOP