श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय त्रेचाळिसावा


भीष्म शरपंजरी पडले


श्रीगणेशाय नम: ॥
भीष्म आणि सुभद्रापती ॥ रणरंगीं उभे शोधती ॥
दोघांचें युद्ध विलोकिती ॥ सुरपतिही विमानीं ॥ १ ॥
एक कल्पांतींचा चंडकिरण ॥ दुजा केवळ प्रलयाग्न ॥
कीं एक भृगुकुलभूषण ॥ रविकुलमंडण दुसरा तों ॥ २ ॥
एक कृतांत एक काळ ॥ एक कुंभिनी एक निराळ ॥
एक वासुकी एक शेष केवळ ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥ ३ ॥
भीष्मावरी सहस्र बाण ॥ टाकिता जाहला वीर अर्जुन ॥
तेणें तितुकेही निवारून ॥ सोडिले मार्गण दोन सहस्र ॥ ४ ॥
पार्थें निवारिले वरिच्यावरी ॥ तों शिखंडी धांवला समरीं ॥
बाण वर्षे भीष्मावरी ॥ मेघधारा जैशा कां ॥ ५ ॥
शिखंडी सोडी असंख्य बाण ॥ तिकडे न पाहे गंगानंदन ॥
न टाकी एकही मार्गण ॥ स्त्रीअभिधान म्हणोनियां ॥ ६ ॥
आधीं स्त्री मग पुरुष ॥ त्यावरी पूर्वजन्मींचा द्वेष ॥
म्हणोनि तों कुरुनरेश ॥ बाण सहसाही न टाकी ॥ ७ ॥
मग शिखंडीवरी बाण ॥ घालिता जाहला गुरु द्रोण ॥
तों हांक फोडी भीमसेन ॥ सूर ऐकोन भयभीत ॥ ८ ॥
चतुरंगदळ अपार ॥ संहारीत जाय वृकोदर ॥
गदाघायें रथ कुंजर ॥ चूर्ण करी न गणवेचि ॥ ९ ॥
इकडे रणांगणीं विजयरथ ॥ दिसे जैसा उंच पर्वत ॥
त्यावरी ध्वज नभचुंबित ॥ भोंवता दिसे दशयोजनें ॥ १० ॥
त्यावरी विशाळ रूप धरून ॥ अंजनीसुत विक्राळवदन ॥
प्रलयविजेसमान ॥ ऊर्ध्व लांगू्ल गेलें असे ॥ ११ ॥
गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ वेळोवेळां देत बुभुःकार ॥
त्यांत उभयकृष्ण भयंकर ॥ शंख बळें त्राहाटिती ॥ १२ ॥
त्यामाजी वाद्यांचें घनचक्र ॥ वीरांच्या हांका अनिवार ॥
भूतें आरडती भयासुर ॥ वायुतनुजाभोंवतीं ॥ १३ ॥
त्यांत गांडीवाचा ऐकतां ध्वनी ॥ टाळी बैसली दिग्गजकर्णीं ॥
तों घोष कौरवीं ऐकोनी ॥ पाठीं दडती भीष्माचें ॥ १४ ॥
एकास दाटला हिमज्वर ॥ एक वहनें टाकून सत्वर ॥
भीष्मरथामागें वीर॥ भयभीत दडताती ॥ १५ ॥
त्यांत नावाजिके महावीर ॥ निवडिले चवदा सहस्र ॥
त्यांहीं वेढिला पार्थ वीर॥ शस्त्रसंभार वर्षोनियां ॥ १६ ॥
लघुलाघवी पृथानंदन ॥ उभयकरांचें समसंधान ॥
संधानीं वेग परम गहन ॥ सोडी बाण चपलत्वें ॥ १७ ॥
दाटला बाणमंडप थोर ॥ दिवसाच पडला अंधकार ॥
चौदा सहस्र वीर॥ करूनि जर्जर संहारिले ॥ १८ ॥
बाणमेघधारा तत्वतां ॥ असिलता झळकती विद्युल्लता ॥
तों जयद्रथ अवचिता ॥ पार्थावरी चौताळला ॥ १९ ॥
पार्थ म्हणे रे तस्करा ॥ महामलिना खळा निष्टुरा ॥
आम्ही नसतां द्रौपदी सुंदरा ॥ चोरून नेत होतासी ॥ २० ॥
शिरीं पांच पाट काढितां जाण ॥ आलास काकुळती दीनवदन ॥
मग धर्मराजें सोडून ॥ तुज दिधलें पामरा ॥ २१ ॥
तों तूं काळें वदन घेऊनी ॥ युद्धा आलासी समरांगणीं ॥
तरी आतां धीर धरीं रणांगणीं ॥ पाठिमोरा पळू नको ॥ २२ ॥
जयद्रथ नेदी प्रत्युत्तर॥ पार्थावरी टाकी बाण घोर॥
अर्जुने टाकोनि दहा शरा ॥ हृदयवर्मीं भेदिला ॥ २३ ॥
विकल जाहला जयद्रथ ॥ सारथियानें फिरविला रथ ॥
इकडे नकुल आणि त्रिगर्त ॥ युद्ध करिती रणांगणीं ॥ २४ ॥
तों धांवला कृपीचा नंदन ॥ पार्थाचें हृदय लक्षून ॥
भेदिता जाहला दहा बाण ॥ होती चूर्ण गिरी जेणें ॥ २५ ॥
सवेंच तों वीर द्रौणी ॥ कृष्णास विंधी सत्तर बाणीं ॥
ऐसें अर्जुने देखोनी ॥ निर्वाण शर सोडिले ॥ २६ ॥
सर्वांगीं खिळिला गुरुनंदन ॥ ध्वजीं टेकला मूर्च्छा येऊन ॥
मग उगाच राहिला अर्जुन ॥ सहसा बाण सोडीना ॥ २७ ॥
म्हणे गुरुबंधु आणि ब्राह्मण ॥ यांस न मारावे गेलिया प्राण॥
जळो हा क्षात्रधर्म दारुण ॥ अन्याय होतो पाहतां ॥ २८ ॥
तों सात्यकीचे दहा पुत्र ॥ पुढें धांवले वर्षत शरा ॥
भूरिश्रवा कौरववीर ॥ त्यांशीं युद्धा प्रवर्तला ॥ २९ ॥
एक यामपर्यंत ॥ दहाही बाळे युद्ध करित ॥
त्यांहीं कौरवसेना समस्त ॥ बाणजाळीं झांकिली ॥ ३० ॥
मग भूरिश्रव्यानें दशबाणीं ॥ दहाही वीर मारिले रणीं ॥
सात्यकी धांवला तये क्षणीं ॥ प्रलयकाल जैसा कां ॥ ३१ ॥
भूरिश्रव्याचा रथ सारथी ॥ केला चूर्ण रणपंथीं ॥
शरीं खिळोन क्षितीं ॥ मूर्च्छित रणीं पाडिला ॥ ३२ ॥
सात्यकीचे कैवारें पार्थ ॥ मिसळला कौरववाहिनींत ॥
पंचवीस सहस्र वीर अद्‌भुत ॥ समरभूमी पहुडविले ॥ ३३ ॥
पांच दिवस जाहले संपूर्ण ॥ यावरी सहावे दिवशीं निर्वाण ॥
युद्ध मांडले दारुण ॥ भीमसेन धावला ॥ ३४ ॥
तूलराशीस जाळी कृशान ॥ तेवीं भीमे मारिलें बहुत सैन्य ॥
सात्यकी वीर वेगेंकरून ॥ आला मागुता धांवोनी ॥ ३५ ॥
भीम मिसळला सेनेआंत ॥ रिता देखिला तयाचा रथ ॥
सात्यकी जाहला भयभीत ॥ म्हणे भीम काय जाहला ॥ ३६ ॥
अश्रुधारा वाहती नयनीं ॥ घेत वक्ष:स्थल पिटोनी ॥
तों भीमाचा सारथी ते क्षणीं ॥ विशोक जवळीपातला ॥ ३७ ॥
म्हणे भीम आहे स्वस्तिक्षेम ॥ सेनेंतकरितो घोरसंग्राम ॥
जैसा समुद्रांत मत्स्य परम ॥ चौताळत चपलत्वें ॥ ३८ ॥
मग घेऊन असिलता ओढण ॥ धांवे सात्यकी पंचानन ॥
तया देखोन भीम आनंदघन ॥ रणांगणीं नाचतसे ॥ ३९ ॥
मग सात्यकी आणि भीमसेन ॥ वीस सहस्र वीर मारून ॥
कौरवदळ पळवून ॥ विजयी होऊन परतले ॥ ४० ॥
मग सकल सेना घेऊन ॥ पुढें धांवला दुर्योधन ॥
तों द्रौपदीचे पंच नंदन ॥ वर्षत बाण ऊठिले ॥ ४१ ॥
सकळ शरीं करोनि जर्जर॥ पळविले कुमारीं कौरवभार ॥
रक्तगंगेचे पूर ॥ लवणाब्धि पाहों धांवती ॥ ४२ ॥
सहा दिवस संपूर्ण जाहले ॥ सातवे दिवशीं युद्ध मांडलें ॥
दुर्योधनाशी ते वेळे ॥ भीम बोले समरांगणीं ॥ ४३ ॥
म्हणे दुर्जना रण टाकून ॥ निर्लजा पळूं नको एथून ॥
तुवां जें केलें कर्म गहन ॥ त्याचें फळ भोगीं आतां ॥ ४४ ॥
आम्ही षंढतीळ जाण ॥ उलूकाहातीं पाठविलें सांगून ॥
शतखंड तुझें वदन ॥ करावें वाटे दुर्जना ॥ ४५ ॥
गदाघाये परम दारुण ॥ तुझा अंक मी करीन चूर्ण ॥
लत्ताप्रहारेंकरून ॥ रगडीन सत्य मस्तक तुझें ॥ ४६ ॥
ऐसें बोलोन भीमसेन ॥ घातले तयावरी बाण ॥
अश्व सारथी स्यंदन ॥ केले चूर्ण रणांगणीं ॥ ४७ ॥
छत्र ध्वज तूणीर ॥ चाप छेदिलें सत्वर ॥
मग धांवोन बहुत वीर ॥ दुर्योधन पळविला ॥ ४८ ॥
पार्थ सोडून इंद्रास्त्र ॥ बहुत खिळिले नृपवर ॥
सहस्रांचे सहस्र वीर ॥ पाठीं लपती भीष्माच्या ॥ ४९ ॥
रणसागरीं अचाट ॥ भीष्मरथ हेंच बेट ॥
कासावीस वीर श्रेष्ठ ॥ आश्रयें त्याच्या राहती ॥ ५० ॥
विराट आणि द्रोण ॥ माजविती समरांगण ॥
परी द्रोणाचें सामर्थ्य गहन ॥ विराट निघोन चालिला ॥ ५१ ॥
चित्रसेन विकर्ण दुर्योधन ॥ सौभद्रावरी धांवले तिघेजण ॥
जैसे त्रिदोष दारुण ॥ कलेवर व्यापिती ॥ ५२ ॥
तिघेही वर्षती शर ॥ परमप्रतापी उत्तरावर ॥
तेणें लघुलाघवें समग्र ॥ सायक त्यांचे छेदिले ॥ ५३ ॥
परी आगळे करी दुर्योधन ॥ छेदिला सौभद्राचा स्यंदन ॥
अश्व सारथी मारून ॥ ध्वजही खालीं पाडिला ॥ ५४ ॥
चरणचालीं युद्ध करित ॥ रणीं एकला विराटजामात ॥
श्रीकृष्ण पार्थास सांगत ॥ संकटीं पडला सुत तुझा ॥ ५५ ॥
पातया पातें न लागत ॥ इतक्यांत धांवला वीर पार्थ ॥
छेदोन तिघांचेही रथ ॥ भूमीवरी आणिले ॥ ५६ ॥
पिच्छे पसरिजे मयूरीं ॥ तैसे तिघे खिळिले शरीं ॥
समस्त वीर ते अवसरीं ॥ पळविते जाहले तिघांतें ॥ ५७ ॥
पार्थें परमप्रतापें ॥ छेदिलीं सकल वीरांचीं चापें ॥
सवेंच तूणीर साक्षेपें ॥ छेदिता जाहला ते वेळीं ॥ ५८ ॥
परम बळियाढे महारथी ॥ एकाकडे एक पाहती ॥
म्हणती बरी न दिसे गती ॥ पळती वेगेंकरोनियां ॥ ५९ ॥
धर्म म्हणे द्रुपदकुमारा ॥ ऐक शिखंडी महावीरा ॥
आपुली प्रतिज्ञा सत्वरा ॥ खरी करून दावीं कां ॥ ६० ॥
समरांगणीं युद्ध करून ॥ टाकीं भीष्मास वधून ॥
शिखंडी अवश्य म्हणोन ॥ सोडीत बाण भीष्मावरी ॥ ६१ ॥
तिकडे न पाहे गंगासुत ॥ जैशी पुष्यवृष्टि गज मदोन्मत्त ॥
कीं काडिया पडतां पर्वत ॥ सहसा खेद न मानी ॥ ६२ ॥
अचाट वीर गंगानंदन ॥ समोर शिखंडी अव्हेरून ॥
आणिकेकडे न्याय धांवोन ॥ पांडवसेना संहारी ॥ ६३ ॥
सप्त दिवस जाहले संपूर्ण ॥ पुढें लागला आठवा दिन ॥
परम घोर माजलें रण ॥ गंगानंदन युद्ध करी ॥ ६४ ॥
जैसा वृषभारावरी पंचानन ॥ तैसा प्रवेशला भीमसेन ॥
बाणजाळीं सकल सैन्य ॥ संहारिलें प्रतापें ॥ ६५ ॥
सुनाभ राजा भीमावरी ॥ कोसळला जैसा गिरीवर गिरी ॥
युद्ध जाहले घटिका चारी ॥ मग मारिला समरीं भीमसेनें ॥ ६६ ॥
त्याचें छेदोनियां शिर ॥ गगनीं भिरकावी वृकोदर ॥
दुर्योधनापुढें सत्वर ॥ उतरोन मागुती पडियेलें ॥ ६७ ॥
कुंडधार शरपंडित ॥ त्याचा केला निःपात ॥
विशालाक्ष आदित्यकेत ॥ सहोदरही संहारिला ॥ ६८ ॥
ऐसा संहार देखोन ॥ चिंतार्णवीं पडिला दुर्योधन ॥
म्हणे विदुर बोलिला जें वचन ॥ तैसेंच होत चालिलें ॥ ६९ ॥
भीष्मापुढें जाऊन ॥ दुर्योधन करी रोदन ॥
गांगेय म्हणे त्वां पूर्वी वचन ॥ ऐकिलें नाहीं वडिलांचें ॥ ७० ॥
अजून तरी सोडीं अभिमाना ॥ शरण जाईं जगज्जीवना ॥
परी तें न मानेच सुयोधना ॥ दिव्यान्न जैसें रोगिया ॥ ७१ ॥
असो रण माजलें अपार॥ इलावाननामा पार्थपुत्र ॥
उलूपी शेषकन्या पवित्र ॥ तिचे पोटीं जाहला जो ॥ ७२ ॥
तेणें माजविली रणमेदिनी ॥ शरीं झांकिली कौरववाहिनी ॥
त्याचें युद्धकौशल्य पाहोनी ॥ पांडव ग्रीवा डोलविती ॥ ७३ ॥
शकुनीचे पांच सुत ॥ गज वृक्ष वृषकेत ॥
चर्मवान पांचवा सत्य ॥ युद्ध करित रणांगणीं ॥ ७४ ॥
इलावान योद्धा प्रबळ ॥ पांचांचीं शिरें छेदिलीं तत्काळ ॥
मग अलंबुष राक्षस सबळ ॥ दुर्योधनें प्रेरिला ॥ ७५ ॥
मायावी कपटी निशाचर॥ तेणें युद्ध केलें अपार॥
नाना रूपें धरी भ्यासुरा ॥ वृक व्याघ्र सर्पादि ॥ ७६ ॥
सहस्रावधि रूपें आपुली ॥ अलंबुषें तेव्हां धरिलीं ॥
इलावानानें तितुकीं छेदिलीं ॥ नाटोपेचि राक्षसांतें ॥ ७७ ॥
मग कपटी राक्षस बहुत ॥ ऊर्ध्वपंथें येऊनि अकस्मात ॥
शिर छेदोनियां त्वरित ॥ इलावानाचें टाकिलें ॥ ७८ ॥
पांडवदळीं हाहाकार ॥ मग तों घटोत्कच महावीर॥
करीत चालिला संहार ॥ असुरभार घेऊनी ॥ ७९ ॥
असंख्य शिळांचा प्रहार॥ चहूंकडून वृक्षांचा मार ॥
रथारूढ भीमपुत्र ॥ सुयोधनावरी धांवला ॥ ८० ॥
म्हणे दुर्योधना पापखाणी ॥ आजि तुज मारीन समरांगणीं ॥
माझे पितर वनोवनीं ॥ त्वां हिंडविले पामरा ॥ ८१ ॥
माझी माता याज्ञसेनी ॥ सभेस नेली त्वां पापखाणी ॥
तरी आजि समरांगणीं ॥ पळू नको दुर्जना ॥ ८२ ॥
अधर रगडूनियां दांतीं ॥ घटोत्कचें प्रेरिली शक्ती ॥
तों अंगराजें लोटिला हस्ती ॥ असुरासमोर तेधवां ॥ ८३ ॥
तों शक्ति आली दारुण ॥ गज पाडिला विदारून ॥
मग अंगराज उतरोन ॥ एकीकडे जाहला ॥ ८४ ॥
दुर्योधनारी निर्वाण शर ॥ घटोत्कचें सोडिले अपार ॥
भयभीत कौरवेश्वर ॥ सोडून समर चालिला ॥ ८५ ॥
तों द्रोण आणि शारद्वत ॥ धांवले पुढें बाण वर्षत ॥
महावीर रणपंडित ॥ घटोत्‍कच नाटोपे ॥ ८६ ॥
क्षणामाजी होय गुप्त ॥ सवेंच गगनोदरीं जात ॥
तेथून बाण वर्षत ॥ मेघधारा जैशा कां ॥ ८७ ॥
मागुती भूमीवरी येत ॥ द्रोणावरी बाण सोडित ॥
तों घटोत्कचाचा रथ ॥ द्रोणें छेदूनि टाकिला ॥ ८८ ॥
घटोत्कच एकला देखोन ॥ द्रौपदीचे पंचनंदन ॥
आले वायूस मागें टाकून ॥ तों अभिमन्यूही धांवला ॥ ८९ ॥
घटोत्‍कच आणि साही कुमार ॥ यांहीं रणभूमि माजविली अपार॥
त्यांत धांवला वृकोदर ॥ हांकें अंबर गाजविले ॥ ९० ॥
थोर गाजली रणधुमाळी ॥ कौरवसेना विभांडिली सकळी ॥
सात पांडवकुमार बळी ॥ देखोन काळ चळीं कांपे ॥ ९१ ॥
तों गजारूढ भगदत्ता ॥ धावला जैसा प्रलयकृतांत ॥
घटोत्कचावरी शक्ति अद्‌भुत ॥ प्रेरिता जाहला तेधवां ॥ ९२ ॥
महाप्रलयींची वीज ॥ तैशी शक्ति येत सतेज ॥
पांडवदळीं गजबज ॥ थोर जाहली तेधवां ॥ ९३ ॥
तंव तों घटोत्कच महाबळी॥ धांवोन वेगें अंतराळीं ॥
प्रलयशक्ति हातीं धरिली॥ घालोनि मोडिली पायांतळीं ॥ ९४ ॥
पांडवआदिकरून नृपती ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥
धन्य या वीराची शक्ती ॥ जगतीमाजी अभिनव ॥ ९५ ॥
इकडे नवल वर्तलें अपूर्व ॥ कुंडनामा वीर कौरव ॥
धरोनियां युद्धाची हांव ॥ भीमासमोर धावला॥ ९६ ॥
तों पायीं वृकोदरें धरोनी ॥ आपटून मारिला रणमेदिनीं ॥
इकडे पार्थेंही तये क्षणीं ॥ संहारिली बहुत सेना ॥ ९७ ॥
भीष्म द्रोण गौतमकुमार ॥ पार्थांस करिती शरमार ॥
परी तों रणपंडित महापूर ॥ तितुक्यांसही नाटोपे॥ ९८ ॥
त्याच युद्धांत अभिमन्य ॥ धांवला वर्षत वज्रबाण ॥
जैसा प्रलयानलासी प्रभंजन ॥ साह्य पाठीं धांवतसे ॥ ९९ ॥
वीज प्रवेशे वनांत॥ तैसा सौभद्र वेगें तळपत ॥
त्यांत धृष्टद्युम्न धांवत ॥ प्रलय अत्यंत वर्तला ॥ १०० ॥
कंदुकाऐशीं शिरें॥ ऊर्ध्वपंथें जाती अपारें॥
हाहाकार एकसरें ॥ कौरवदळीं जाहला॥ १०१ ॥
तों मावळला वासरमणी ॥ स्वस्थाना पावली उभयवाहिनी ॥
रजनी सरतां तये क्षणीं ॥ अर्क उदय पावला तों ॥ १०२ ॥
प्रवर्तला नवम दिन॥ तळमळी परम दुर्योधन ॥
दुःशासन शकुनी कर्ण ॥ विचार करिती तेधवां ॥ १०३ ॥
प्रलययुद्ध मनापासून ॥ न करी कदा गंगानंदन ॥
पांडवांचें कल्याण॥ त्याचें मन इच्छितसे ॥ १०४ ॥
कर्ण म्हणे गंगासुत ॥ जरी समरीं पावेल मूल्य ॥
कीं युद्ध सांडून पळता ॥ कीं शस्त्र टाकील उबगोनी ॥ १०५ ॥
तरी मी न लागतां क्षण॥ पांचही पांडव संहारीन ॥
मग भीष्माप्रति दुर्योधन ॥ येऊन बोलत सक्रोधें ॥ १०६ ॥
तुवां युद्ध केलें अभिनव ॥ परी एकही मेला नाहीं पांडव ॥
माझिया कर्णे आजवरी सर्व ॥ मारिले असते समरांगणीं ॥ १०७ ॥
महाराज तों गंगानंदन ॥ स्तब्ध न बोले दुःखेंकरून ॥
मग आरक्त करूनि नयना ॥ क्रोधायमान बोलतसे॥ १०८ ॥
भीमार्जुनांचा पुरूषार्थ ॥ तूं जाणतोस कीं अद्‌भुत ॥
गंधर्वी तुम्हांस गेलें समस्त ॥ तेव्हां कां कर्ण पळाला॥ १०९ ॥
क्षणक्षणां बोलसी न्यून ॥ काय मशका काढिला कर्ण॥
कोठे महावीर अर्जुन ॥ कौलिकपुत्र कोणीकडे ॥ ११० ॥
सौदंणी आणि सागर॥ कोठे रजक आणि रमावर ॥
बाभळ आणि कल्पवृक्ष साचार॥ समान कैसे सांग पां॥ १११ ॥
दीप आणि दिनमणी ॥ इतर ओहळ आणि स्वर्धुनी ॥
इतर पाषाण आणि चिंतामणी ॥ समान काय सांग पां॥ ११२ ॥
दुर्जन आणि सज्जन॥ रंक आणि सहस्रनयन ॥
तैसा कर्ण आणि श्वेतवाहन ॥ कैसे समान होती पां ॥ ११३ ॥
ज्यास साह्य हरिहर॥ तों तुम्हां सर्वांचा करील संहार॥
ते नरनारायण अवतार॥ पुरुषरूपें अवतरले ॥ ११४ ॥
एकाच बाणेंकरून ॥ नभ आणितील खालीं छेदून ॥
त्यांस जिंकील ऐसें कर्ण ॥ छळणोत्तरें बोलसी ॥ ११५ ॥
तूं फार करितोसी वल्गना ॥ आज युद्ध करितों पाहें नयनां ॥
तूं युद्धसमयीं घेऊन कर्णा ॥ पहा कैसें होईल तें ॥ ११६ ॥
आज मी प्रलययुद्ध करीन ॥ पांडवसेना संहारीन ॥
ऐसें बोलोन गंगानंदन ॥ रथ पुढें लोटित ॥ ११७ ॥
भद्रव्यूह अतिथोर ॥ रचिता जाहला गंगाकुमार ॥
धुष्टद्युम्नें शेषाकार ॥ व्यूह तेव्हां रचियेला ॥ ११८ ॥
मांडिली एकचि रणधुमाळी ॥ चतुरंगसेना मिसळली ॥
उत्तरापति ते काळीं ॥ शर वर्षत धांविन्नला ॥ ११९ ॥
करीत दळाचा संहार॥ हस्तलाघव दावी अपार॥
मानवती सर्वं वीर॥ अनिवार म्हणती हा ॥ १२० ॥
निजमित्र जो अलंबुष ॥ दुर्योधन म्हणे त्यास ॥
अभिमन्यूनें आसमास ॥ वीर पाडिले धावे कां ॥ १२१ ॥
धांवला राक्षस भयंकर॥ कपाळी चर्चिला शेंदूर॥
कृष्णवर्ण पर्वताकार॥ दाढा शुभ्र दिसताती ॥ १२२ ॥
राक्षसाची माव थोर ॥ दिवसा पडला अंधकार॥
शिलांचा वर्षाव अनिवार ॥ करिता जाहला पापी तों ॥ १२३ ॥
मग सौभद्रें सूर्यास्त्र ॥ प्रेरितां निरसला अंधकार ॥
निजबाणीं कौरवभारा ॥ संहारीत तेधवां ॥ १२४ ॥
सौभद्राचा मार विशेष ॥ पळाला तेव्हां अलंबुष ॥
मग बाणजाळ आसमास ॥ कौरवदळावरी टाकी ॥ १२५ ॥
सौभद्राचे ठायीं जाण ॥ श्रीकृष्णें दिधले आपुले गुण॥
धैर्य शौर्य पराक्रम पूर्ण ॥ पाहतां सर्व मानवती ॥ १२६ ॥
अर्जुनाचेही द्विगुण ॥ संधानकर्ता अतिनिपुण ॥
दोन्ही पक्ष जयाचे पावन ॥ महिमा जाण न वर्णवे ॥ १२७ ॥
केला कौरवदळाचा संहार॥ चालिले रक्तनदीचे पूर॥
जिवंत वीर अपार ॥ वहात जाती ते समयीं ॥ १२८ ॥
कोणी वीर तिकडून ॥ येत हस्तीवरी बैसोन ॥
तों यमराष्ट्रवर्धिनी भरून ॥ घोषें गर्जत जातसे ॥ १२९ ॥
गदा घेऊन वृकोदर ॥ संहारीत जाय कुंजर ॥
कुंभस्थळें फोडितां अपार ॥ मुक्ते बाहेर उसळती ॥ १३० ॥
शुंडादंड पिळून ॥ कित्येक पाडिले उलधून ॥
कित्येकांचे दंत मोडून ॥ वीर अपार झोडिले ॥ १३१ ॥
पळता गज पायीं धरी ॥ आपटूनि पाडी भूमीवरी ॥
पुच्छी धरोनि चक्राकारीं ॥ भोवंडून टाकित ॥ १३२ ॥
वणवा लागे जैसा वना ॥ तेवीं भीष्मवीरें आटिली पांडवसेना ॥
असंख्य वीर मारिले रणा ॥ करी गणना कोण त्यांची ॥ १३३ ॥
अर्जुनासी म्हणे श्रीधर॥ पाहा भीष्में केला संहार॥
हा केवळ काळ गंगाकुमार ॥ उरों नेदी कोणातें ॥ १३४ ॥
मग धावला वीर पार्थ ॥ बाणीं बुजविला भीष्माचा रथ ॥
दहाही धनुष्यें तेथ ॥ भीष्महस्तींचीं छेदिलीं ॥ १३५ ॥
घोडे फिरवी मुरहर ॥ पार्थास लागों नेदी शर ॥
भीष्माचीं चापें पार्थ वीर॥ वरच्यावरी छेदितसे ॥ १३६ ॥
पार्थाचें संधान पाहोन ॥ भीष्म म्हणे धन्य धन्य ॥
तुझेनि वंश पावना ॥ नाहीं आन वीर ऐसा॥ १३७ ॥
तों अस्ता गेला दिनकर॥ शिबिरा गेले सर्वही भार ॥
श्रीधर आणि युधिष्ठिर॥ विचार करिती एकांतीं ॥ १३८ ॥
धर्म म्हणे गा श्रीहरी ॥ भीष्म नाटोपेचि समरीं ॥
यास आटोपी ऐसा निर्धारीं ॥ वीर कोणी दिसेना ॥ १३९ ॥
भीष्मापासून जय ॥ कदाकाळीं प्राप्त न होय ॥
धर्म म्हणे धरूनि श्रीहरिपाय ॥ मज राज्य नलगे हें ॥ १४० ॥
मी वनामाजी जाऊन ॥ घोर तप आचरीन ॥
श्रीकृष्ण म्हणे चौघेजण ॥ बंधू तुझे पराक्रमी ॥ १४१ ॥
त्यांस जरी आटोपेना ॥ तरी मजप्रति देई आज्ञा॥
सोडोनियां सुदर्शना ॥ संहारीन क्षणार्धें ॥ १४२ ॥
मी भक्तांचा साह्यकारी ॥ प्रल्हाद रक्षिला नानापरी ॥
दावाग्नि गिळून निर्धारीं ॥ रक्षिले गायीगोपाळ ॥ १४३ ॥
शिलाधारीं सहस्रनयन ॥ वर्षला गोकुळी जेव्हां घन ॥
अंगुलीवरी सप्तदिन ॥ गोवर्धन धरिला म्यां ॥ १४४ ॥
रात्रीमाजी मथुरापुरी ॥ नेली द्वारावतीमाझारीं ॥
मग धर्म म्हणे मुरारी ॥ तुझेनें साजिरे आम्ही कीं ॥ १४५ ॥
तरी जय कैसा होय तें संपूर्ण ॥ भीष्म बोलिला पुढें सांगेन ॥
मग पांच बंधू आणि जगज्जीवन ॥ रजनीमाजी निघाले ॥ १४६ ॥
भीष्मशिबिराप्रति जाऊन ॥ घालिती पांचही लोटांगण॥
भीष्में श्रीकृष्णासी नमून ॥ आपुले जवळी बैसविलें ॥ १४७ ॥
भीष्म म्हणे रे पूतनारी ॥ माझी पांच वत्सें जतन करीं ॥
युद्ध करितां श्रमलीं समरीं ॥ रक्षी यांस गोविंदा ॥ १४८ ॥
बाळें वनवासीं श्रमलीं ॥ सवेंच युद्धावर पडियेलीं ॥
असो धर्म तेव्हां बद्धांजली ॥ उभा ठाकला भीष्मापुढें ॥ १४९ ॥
धर्म म्हणे आम्हांस जय ॥ महाराजा कैसा प्राप्त होय ॥
तूं महावीर प्रतापसूर्य ॥ आकळशील कैसा पां ॥ १५० ॥
भीष्म म्हणे मजपासून जय निश्चित ॥ कृतांतासही नव्हे प्राप्त ॥
शिखंडीप्रति करून निमित्त ॥ पाठी पार्थ असों द्या ॥ १५१ ॥
शिखंडीचे पाठीशीं लपोन ॥ घालीं पार्थां मजवरी बाण ॥
जयप्रासीस कारण ॥ वर्म हेंच जाणिजे ॥ १५२ ॥
मग जनकजनकास नमून ॥ मंदिरास गेले पंडुनंदन ॥
सवेंच उगवला सूर्यनारायण ॥ दशम दिन प्राप्त जाहला ॥ १५३ ॥
मग शिखंडीस पुढें करून ॥ वेगें निघाले पंडुनंदन ॥
द्रुपद पांचाळ धृष्टद्युम्न ॥ रक्षति जाती पाठीसी ॥ १५४ ॥
माजलें घोर युद्धकंदन ॥ प्रेतनाथपुरविवर्धन ॥
वाद्यें वाजती गजरेंकरून ॥ नाद गगनीं न समाय ॥ १५५ ॥
कौरवसेनेचा संहार॥ करिते जाहले पंडुकुमार ॥
तें देखोन गंगापुत्र ॥ प्रेरी वेगें रहंवरा ॥ १५६ ॥
भीष्माचें हस्तलाघव गहन ॥ देखोनि स्तवित पंडुनंदन ॥
शिखंडी म्हणे भीष्मालागून ॥ आज मारीन तुज सत्य ॥ १५७ ॥
भीष्म नेदीं प्रत्युत्तर॥ त्यावरी कदा न टाकी शरा ॥
शिखंडीस म्हणे पार्थ वीर ॥ तुझे पाठीशीं मी आहें ॥ १५८ ॥
सर्व कौरवांसी आवरीन ॥ तूं टाकीं भीष्मावरी बाण ॥
आजि सोडूं नको प्राण ॥ समरीं घेई तयाचा ॥ १५९ ॥
तों इकडे गंगानंदन ॥ पाडीत शरांचा पर्जन्य ॥
गंगात्मजें हांक देऊन ॥ दोन्ही दळें गर्जविलीं ॥ १६० ॥
गोरक्षक गोधनांचे भार॥ एकदांच पिटी समग्र ॥
तैसा घटोत्कच महावीर॥ येतां पळती कौरवदळें ॥ १६१ ॥
तों लक्ष महावीर नेमे ॥ ते दिवशी मारिले भीष्मे ॥
पूर्वी लंकेस दाशरथी रामे ॥ पराक्रम जेवीं केला ॥ १६२ ॥
दहा सहस्र कुंजरा ॥ लक्ष पायदळ भयंकर॥
इतका भीष्में केला संहार॥ हाहाकार जाहला ॥ १६३ ॥
पार्थ म्हणे शिखंडी॥ भिऊं नको बाण सोडीं ॥
सर्व वीर कडोविकडी ॥ आम्ही तुजला रक्षितों ॥ १६४ ॥
ठायीं ठायीं युद्ध मांडले ॥ कौरववीर रणीं गोंविले ॥
महा अपशकुन ते वेळे ॥ भीष्मालागीं जाणवती ॥ १६५ ॥
दुर्योधनाची दैवतें रडती ॥ शिवा सेनेसमोर बोभाती ॥
वायुघातें निश्चितीं ॥ सुयोधनाचें छत्र पडे ॥ १६६ ॥
दुःशासन पाहे आदर्श समोर॥ तंव न दिसे आपुलें शिर ॥
सुयोधनाचे गृहावरी अपवित्र ॥ दिवाभीतेने बाहती ॥ १६७ ॥
कौरवस्त्रिया देखती स्वप्न ॥ विगतधवा स्त्रिया येऊन ॥
मृत्तिका रक्षा घेऊन ॥ ओंटी भरिती आग्रहें ॥ १६८ ॥
मंगलदायक दिव्यशकुन ॥ धर्मास जाणविती शुभचिन्ह॥
असो भीष्मावरी बाण ॥ शिखंडी टाकी अतिवेगे ॥ १६९ ॥
महाप्रलय भीष्म करी ॥ पांडवसेना संहारी ॥
धर्मास ते अवसरीं ॥ देवव्रत बोलत ॥ १७० ॥
हें मी शरीर टाकीन ॥ भगवत्पदाप्रति जाईन ॥
तुम्ही अवघे वीर मिळून ॥ शर टाकावे मजवरी ॥ १७१ ॥
शिखंडी टाकी ते बाण ॥ उगाच सोशी गंगानंदन ॥
त्याचे मागून अर्जुन ॥ तीक्ष्ण मार्गण वर्षत ॥ १७२ ॥
पांडवदळींचीं रितीं वाहनें ॥ बहुत केलीं गंगानंदनें ॥
भीष्माचिया तये भेणें ॥ वीर पळती दशदिशा ॥ १७३ ॥
शिखंडीचे हळवट बाण ॥ लागतां हांसे गंगानंदन ॥
मग दिव्यास्त्र दारुण ॥ भीष्में बाणीं स्थापिलें ॥ १७४ ॥
तें अस्त्र गहन देखोन ॥ शिखंडीआड लपे अर्जुन ॥
मग देवव्रतें आवरून ॥ निजस्थानीं ठेविलें ॥ १७५ ॥
कल्पांतींचा भास्कर॥ तैसा दिसे गंगाकुमारा ॥
मग पार्थ टाकूनि शरा ॥ सर्वांगीं तों खिळियेला ॥ १७६ ॥
सर्व रायांनीं शर ॥ भीष्मावरी घातले अपार॥
तितुक्यांवरी गंगाकुमार ॥ बाण वर्षत प्रतापें ॥ १७७ ॥
भीष्मागींचे कवच पुण्यरूप ॥ गळोन पडलें आपोआप ॥
शिखंडीं होऊन सकोप ॥ दहा बाण सोडित पैं ॥ १७८ ॥
ते खडतरले भीष्माचे हृदयीं ॥ सारथी रथ भेदिला ते समयीं ॥
ध्वज घोडे लवलाहीं ॥ शिखंडीनें मारिले ॥ १७९ ॥
एकाच बाणेंकरून ॥ पांच पांडवाची शिरें छेदून ॥
क्षणें टाकणार गंगानंदन ॥ परी तें मानसीं न धरीच ॥ १८० ॥
पुढें द्यावया तिलांजली ॥ एवढेच उरतील स्वकुळीं ॥
ऐसें जाणोन हृदयकमळीं ॥ भीष्म न मारीच तयांतें ॥ १८१ ॥
येतां शिखंडीचे बाण ॥ म्हणे हे लागती जैसें तृण ॥
हे पार्थाचे शर तीक्ष्ण ॥ शरीर भेदोन पुढें जाती ॥ १८२ ॥
प्रसूतसमयी सिंहिणीचें देख ॥ उदर फोडून निघे शावक ॥
तैसे पार्थाचे बाण निःशंक ॥ भेदून जाती कलेवरा ॥ १८३ ॥
शंतनुरायाचा वर जाण ॥ कीं स्वेच्छेनें पावशी मरण ॥
म्हणोनियां गंगानंदन ॥ अजिंक्य वीर सर्वांसी ॥ १८४ ॥
तों अष्टवसू आणि सप्तऋषी ॥ गुप्त येती भीष्मापाशीं ॥
म्हणती आतां ज्ञानराशी ॥ सीमा युद्धाची जाहली ॥ १८५ ॥
महायोगिया वीरा भीष्मा ॥ आतां चाल वेगीं निजधामा ॥
विमानांतूनि सुत्रामा ॥ सुमनभार वर्षतसे ॥ १८६ ॥
तों काम क्रोध मद मत्सर॥ भीष्में सोडिले समग्र ॥
देव करिती जयजयकार ॥ सोडी नव शर शिखंडी ॥ १८७ ॥
पार्थ टाकिले एकवीस बाण ॥ परी आनंदरूप गंगानंदन ॥
तों दहावा दिन संपूर्ण ॥ जाहला ऐसें पाहिलें ॥ १८८ ॥
पार्थाचे रथाकडे पाहोन ॥ हृदयीं देखिले कृष्णध्यान ॥
किरीटकुंडलमंडित वदन ॥ दिव्य तेज झळकतसे ॥ १८९ ॥
कौस्तुभ आपाद वनमाळा ॥ पीतवसन कटीं मेखळा ॥
चतुर्भुज घनसांवळा ॥ हृदयीं रेखिला भीष्मदेवें ॥ १९० ॥
सूर्य अस्तमानास जैसा गेला ॥ तैसा भीष्म रथाखालीं पडला ॥
शरपंजरीं पहुडला ॥ कंपित जाहला भूगोल ॥ १९१ ॥
इतक्यांत सोडावा जो प्राण ॥ तों थोडे उरलें दक्षिणायन ॥
अंतरिक्षध्वनि जाहली पूर्ण ॥ आतांच शरीर सोडूं नको ॥ १९२ ॥
मग चाप बाण ते वेळे ॥ भीष्में भूमीवरी ठेविले ॥
तों महर्षी सर्व धांवले ॥ भीष्मदर्शन घ्यावया ॥ १९३ ॥
गुप्तरूपें ऋषी येऊन ॥ भीष्मास करिती प्रदक्षिण ॥
स्वर्गीहूनि देवगण ॥ पुष्पें टाकिती क्षणक्षणां ॥ १९४ ॥
इकडे कौरवदळीं आकांत ॥ द्रोणाचार्य शारद्वत ॥
दुर्योधनादि राजे समस्त ॥ शोकार्णवीं बुडाले ॥ १९५ ॥
वाटे बुडालें समग्र ॥ पडला त्रिभुवनीं अंधार ॥
पांडवदळी जयजयकार॥ वाद्यध्वनि जयघोषें ॥ १९६ ॥
भीमे मारिली आरोळी ॥ दोन्ही दळे हडबडलीं ॥
भीष्मालागीं पांडवदळीं ॥ शोक करिती सर्वही ॥ १९७ ॥
म्हणती जळो हा क्षात्रधर्म ॥ पडला कीं महाराज भीष्म ॥
ज्याचें प्रातःकाळी घेतां नाम ॥ सर्व पातके भस्म होती ॥ १९८ ॥
जो भक्तिज्ञानवैराग्ययुक्त ॥ ब्रह्मचारी जैसा शुक हनुमंत ॥
पुण्यपरायण आणि रणपंडित ॥ ऐसा पुन: न होय पैं ॥ १९९ ॥
चिंताग्नींत आहाळला कर्ण ॥ म्हणे गेलें भीष्माऐसें निधान ॥
दुर्योधन दुःशासन ॥ अश्रु गाळिती अधोवदनें ॥ २०० ॥
कौरव पांडव शस्त्रें ठेऊनी ॥ आले भीष्मापाशीं ते क्षणीं ॥
त्याचे पाय मस्तकीं वंदोनी ॥ करिती प्रदक्षिणा रडतची ॥ २०१ ॥
धर्म आणि दुर्योधन ॥ स्फुंदती तेव्हां अधोवदन ॥
नकुल सहदेव भीमार्जुन ॥ नेत्रीं जीवन ढाळिती ॥ २०२ ॥
शरपंजरी देवव्रत ॥ परी शिर खालीं लोंबत ॥
म्हणे मज उसे द्या रे त्वरित ॥ शिरास टेंकण ये समयीं ॥ २०३ ॥
उत्तम उशा आणी दुर्योधन ॥ मग बोले गंगानंदन ॥
म्हणे पाहा माझें आंथरूण ॥ उशी आणोन तैशीच द्या ॥ २०४ ॥
भीष्म पार्थाकडे पाहोनी ॥ म्हणे श्रीकृष्णप्रिया वीरचूडामणी ॥
तूं तरी उशी दे आणोनी ॥ ग्रीवां धरणीं लोंबते रे॥ २०५ ॥
मग पार्थ गांडीव चढवून ॥ तीन बाणांचें तिकटें करून ॥
क्षणमात्रें शर सोडून ॥ ग्रीवा उचलोन सांवरिली ॥ २०६ ॥
भीष्म म्हणे अहा अर्जुना ॥ उत्तम उशी दिली सुजाणा ॥
विजया तुज वैकुठराणा ॥ सर्वदाही रक्षो कीं ॥ २०७ ॥
प्राप्त होय उत्तरायण ॥ तोंवरी मी न सोडीं प्राण ॥
मग भोंवतें ठेविलें रक्षण ॥ कौरव पांडवां अंतर बहु ॥ २०८ ॥
दुर्योधन वैद्य आणित ॥ देखोनि हांसे देवव्रत ॥
मी समरभूमीस जाहलों मुक्त ॥ आतां वैद्य कासया ॥ २०९ ॥
दोन्ही दळीचे नृपवर ॥ भीष्मास अर्पिती पूजासंभार ॥
प्रदक्षिणा नमस्कार॥ करून जाती स्वस्थाना ॥ २१० ॥
सकल प्रजा अठरा याती ॥ भीष्मदेवास येऊन नमिती ॥
गांवोगांवीच्या नरयुवती ॥ पाहों येती महाराज तो ॥ २११ ॥
क्षणक्षणां पंडुकुमार ॥ येऊन घेती समाचार॥
भीष्म कृष्णस्मरणीं सादर॥ सहस्रनाम उच्चारी ॥ २१२ ॥
भीष्म होऊन तृषाक्रांत ॥ कौरवांसी उदक मागत ॥
तंव ते सुगंधोदक आणित ॥ देवव्रत न घेचि तें ॥ २१३ ॥
म्हणे बोलावा अर्जुन ॥ तंव तों उभा ठाकला येऊन ॥
म्हणे सखया पाजीं जीवन ॥ तेणें बाण लाविला गुणीं ॥ २१४ ॥
भीष्मासमीप दक्षिणभाग पाहून ॥ धरणी फोडिली बाण मारून ॥
भागीरथीचें दिव्य जीवन ॥ कारंजे तेथें लाविलें ॥ २१५ ॥
धार मुखीं पडतां तत्काळ ॥ जाहलें सर्वांग तेणें शीतळ ॥
जाह्नवीतोय औषध निर्मळ ॥ दुःख समूळ विसरला ॥ २१६ ॥
तेव्हां अर्जुनाचे स्तवन ॥ राजे करिती अवघेजण ॥
भयें आणि आश्चर्येंकरून ॥ कौरव सर्व कोंदले ॥ २१७ ॥
भीष्म म्हणे रे पार्था ॥ अमिततेजा गुणभरिता ॥
श्रीरंगप्रिया सुभद्राकांता ॥ धन्य वंश तुझेनी ॥ २१८ ॥
दुर्योधनें पाप करून ॥ स्वकुला टाकिलें जाळून ॥
तुम्ही पवित्र पंडुनंदन ॥ भय नाहीं तुम्हांते ॥ २१९ ॥
सुयोधनास म्हणे देवव्रत ॥ अजून तरी करीं स्वहित ॥
मित्र करून पंडुसुत ॥ सुखरूप नांदे कां ॥ २२० ॥
दुर्योधन प्रत्युत्तर ॥ सहसा नेदी दुराचार॥
असो मग तों गंगाकुमारा ॥ नाममाळाजप करी ॥ २२१ ॥
यावरी तों महाराज कर्ण ॥ पहावया आला भीष्मालागून ॥
कंठ दाटला अश्रुजीवन ॥ टपटपां टाकी धरेवरी ॥ २२२ ॥
म्हणे हे भीष्म गंगानंदन ॥ पहा मजकडे डोळे उघडून ॥
मीं अपराधी संपूर्ण ॥ तुजशीं स्पर्धा वाढविली ॥ २२३ ॥
मग डोळे उघडून देवव्रत ॥ कर्णास करें कुरवाळित ॥
तूं मज येऊन भेटलासी ऐथ ॥ इतुकेन तृप्त जाहलो मी ॥ २२४ ॥
मज मारदे सांगितलें येऊन ॥ कीं कुंतीपुत्र तूं सूर्यवीर्य कर्ण ॥
तू नीचाश्रयें संपूर्ण ॥ भगवद्भक्तांसी द्वेषिसी ॥ २२५ ॥
येरवीं तुजऐसा कोण पवित्र ॥ उदार शूर गुणगंभीर ॥
तूं महाराज प्रतापसागर ॥ वीर अर्जुन दुसरा पैं ॥ २२६ ॥
तरी तूं पांडवांकडे जाई ॥ येरू म्हणे हें न घडे कालत्रयीं ॥
मज हें वर्तमानं सर्वही ॥ श्रीकृष्णें पूर्वीच सांगीतलें ॥ २२७ ॥
पांडवांस सांभाळी द्वारकानायक ॥ तैसा मी कौरवांचा रक्षक ॥
आम्हां क्षत्रियांचें भाग्य देख ॥ समरांगणीं पडावें ॥ २२८ ॥
आतां पांडवांस जिंकीन ॥ कीं समरांगणीं देईन प्राण ॥
भीष्मा माझे अपराध संपूर्ण ॥ क्षमा करीं यावरी ॥ २२९ ॥
मग नमून भीष्मचरण ॥ स्वस्थलाप्रति गेला कर्ण ॥
भीष्म म्हणे येथून ॥ मजला कोणी बोलवूं नका ॥ २३० ॥
मी ध्यातों श्रीहरीचें रूप ॥ येथे करूं नका कोणी विक्षेप ॥
मग बोलणें टाकून तों पुण्यरूप ॥ समाधिस्थ स्वस्वरूपीं ॥ २३१ ॥
वैशंपायन म्हणे जनमेजया ॥ भीष्मपर्व संपलें येथोनियां ॥
संजय म्हणे कुरुवर्या ॥ द्रोणपर्व ऐका पुढें ॥ २३२ ॥
नैमिषारण्यी ऋषी समस्त ॥ त्यांसी हे कथा सांगे सूत ॥
एक शत चार अध्याय समस्त ॥ या पर्वाचे जाणिजे ॥ २३३ ॥
तीन अध्यायांमाजी सर्व ॥ आणिला तों अर्थ अपूर्व ॥
ब्रह्मानंद पंढरीराव ॥ सांगतो तेंच लिहितों मी ॥ २३४ ॥
हें पर्व श्रवण करितां ॥ शत्रुक्षय होय तत्त्वतां ॥
संतति संपत्ति वाचितां ॥ अंगीं मुक्तता प्राप्त होय ॥ २३५ ॥
ब्राह्मणांस विद्या प्राप्त ॥ क्षत्रियांसी आगळे शूरत्व ॥
वैश्यांसी धन अद्‌भुत ॥ पावती इच्छित शूद्रही ॥ २३६ ॥
श्रवणें होय रोगहरण ॥ स्त्रियांस सौभाग्य संपूर्ण ॥
ऐसें बोलिला वैशंपायन ॥ सत्कार करून सर्वही ॥ २३७ ॥
आदिपुरुष श्रीदिगंबर ॥ श्रीमद्‌भीमातीरविहार॥
ब्रह्मानंद अभंग साचार॥ सर्वथाही विटेना ॥ २३८ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ भीष्मपर्वव्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रेचाळिसाव्यांत कथियेला ॥ २३९ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे भीष्मपर्वणि त्रिचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥ ४३ ॥
अध्याय त्रेचाळिसावा समाप्त


GO TOP