श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय बेचाळिसावा


भीष्मांची प्रतिज्ञा


श्रीगणेशाय नम: ॥
श्रीकृष्णकृपेचें बळ अद्‌भुत ॥ दिसती पांडव अतिसमर्थ ॥
कवचालंकारमडित ॥ सिद्ध जाहले दळभारें ॥ १ ॥
रणतुरांची घाई आगळी ॥ दोन्ही दळी एकचि लागली ॥
पांच पांडव आणि वनमाळी ॥ त्राहाटिती शंख बळें ॥ २ ॥
दोन्ही दळींची हांक गाजली ॥ धाकें कुंभिनी डोलों लागली ॥
तों भीमे हांक फोडिली ॥ भयें दचकली धरा तेव्हां ॥ ३ ॥
महारथी कांपले सर्वत्र ॥ गज अश्व करिती मलमूत्र ॥
त्रिभुवन कांपलें समग्र ॥ म्हणती कृतांत दुसरा हा ॥ ४ ॥
चपळ चपळत्वें धांवे परम ॥ तैसा परदळीं प्रवेशला भीम ॥
कीं असंख्य पापांवरी नाम ॥ श्रीकृष्णाचें एक जैसें ॥ ५ ॥
असंख्य देखोनि दंदशूक ॥ त्यांवरी निःशंक उठे विनायक ॥
कीं अजाभारामाजी वृक ॥ निर्भय जैसा प्रवेशे ॥ ६ ॥
तों दुर्योधनादि बंधू समग्र ॥ शतही धांवले महावीर॥
शरधारा सोडिती अपार ॥ भीमावरी एकसरें ॥ ७ ॥
तितुक्यांचेही बाण ॥ छेदून पाडी भीमसेन ॥
शरांशीं शर होतां घर्षण ॥ कृशानुवृष्टि होय तेथें ॥ ८ ॥
तंव तों महाराज देवव्रत ॥ सर्वांत श्रेष्ठ रणपंडित ॥
लक्षोनियां वीर पार्थ ॥ शर सोडित धांवला ॥ ९ ॥
मेरुमंदार करितील चूर्ण ॥ ऐसे भीष्माचे बाण तीक्ष्ण ॥
ते अर्जुने समरीं तोडून ॥ सोडी आपण चपलत्वें ॥ १० ॥
प्रलयशर पार्थाचे पाहीं ॥ खडतरले गंगात्मजाचे हृदयीं ॥
परी कंपायमान सर्वथाही ॥ शरीर त्याचें न जाहलें ॥ ११ ॥
सात्यकी कृतवर्मा दोघेजण ॥ युद्ध करिते जाहले निर्वाण ॥
बृहद्‌बल आणि अभिमन्य ॥ भिडती जाण समरभूमी ॥ १२ ॥
दुर्योधन आणि भीम ॥ घोर करिती तेव्हां संग्राम ॥
सहदेव आणि दुर्धर्ष परम ॥ निःशंक भिडती समरांगणीं ॥ १३ ॥
दुर्मुखावरी नकुल ॥ धर्मावरी धांवला शल्य ॥
धुष्टद्युम्न गुरु द्रोण चपल ॥ युद्ध करिती अतिनिकरें ॥ १४ ॥
शंखनामा विराटसुत ॥ तेणें पाचारिला सोमदत्त ॥
बाल्हीक आणि धृष्टकेत ॥ शिशुपालाचा पुत्र तो ॥ १५ ॥
अलंबुष घटोत्‍कच पाहीं ॥ असुर दोघे भिडती शंका नाहीं ॥
शिखंडी द्रौणी लवलाहीं ॥ फार सोडिती अतिनिकरें ॥ १६ ॥
विराट आणि भगदत्त ॥ बृहत्क्षत्र आणि गौतमसुत ॥
द्रुपद आणि जयद्रथ ॥ निकरेंकरून झुंजती ॥ १७ ॥
श्रुतसोम आणि विकर्ण ॥ सुशर्मा आणि चेकितान ॥
शकुनि प्रतिविंध्य दोघेजण ॥ सुलक्षण आणि श्रुतकर्मा ॥ १८ ॥
श्रुतायुध इलावान भिडती सतेज ॥ विंदानुविंदावरी कुंतीभोज ॥
पंचबंधू कैकयराज ॥ त्रिगर्तावरी लोटले ॥ १९ ॥
वीरबाहु आणि उत्तर ॥ चेदिराज उलूक शकुनिपुत्र ॥
ऐशीं द्वंद्वे सहस्र ॥ एकप्रहर युद्ध जाहलें ॥ २० ॥
सुरवर विमानीं पाहती ॥ एकाचे रथ एक छेदिती ॥
तूणीर सायकासनें तोडिती ॥ ध्वज पाडिती क्षितीवरी ॥ २१ ॥
परस्परें मारिती सारथी ॥ उसणें परस्परें फेडिती ॥
सवेंच हृदयीं शर भेदिती ॥ वाद्यें वाजती दोन्ही दळी ॥ २२ ॥
बाणजाळ पसरलें अमूप ॥ तेणें झांकोळला आकाशमंडप ॥
जे परम धीट त्यांस सुटला चळकंप ॥ हिमज्वरें व्यापिले ॥ २३ ॥
भारतीयुद्ध अद्‌भुत पाहीं ॥ त्यास तुजी उपमा नाहीं ॥
ऐसे वीर निर्वाण पाहीं ॥ कोठेच नाहीं झुंजले ॥ २४ ॥
वीर विदेही होऊन ॥ रणांगणीं भिडती निर्वाण ॥
सुहृन्माया दारा धन ॥ थोरपण नाठवेचि ॥ २५ ॥
देहाचें स्मरण नाहीं तयांप्रती ॥ म्हणोनि वीरांस समरीं मुक्ती ॥
पूर्वापार बोलिजे पंडिती ॥ शास्त्ररीति निर्धारीं ॥ २६ ॥
थोर माजली रणधुमाळी ॥ रिते कुंजर धांवती दळी ॥
ध्वज अपार पडती भूतळीं ॥ रिते रथ अश्व नेती ॥ २७ ॥
नग्न शस्त्रें पडलीं अपार ॥ वीरांचे पसरले अलंकार ॥
असो जेवीं उदयाचळीं सहस्रकर ॥ गंगाकुमार तेवीं दिसे ॥ २८ ॥
पंचपताकी शोभे रथ ॥ महारथी पाठीशीं अपरिमित ॥
असंख्य बाण तेव्हां वर्षत ॥ खिळीत पांडवसेनेतें ॥ २९ ॥
बहुत वीरांचीं शस्त्रें ॥ छेदून पाडिलीं क्षणमात्रें ॥
तों श्रीरंगभगिनीपुत्रें ॥ केलें धांवणें सत्वर ॥ ३० ॥
तों केवळ प्रत्यर्जुन ॥ दोन्ही हातांचें समसंधान ॥
शतबाणीं गंगानंदन ॥ भेदिला तेणें समरांगणीं ॥ ३१ ॥
कृतवर्मा खिळिला नवबाणीं ॥ तैसाच शल्य विंधिला ते क्षणीं ॥
सारथ्यांची शिरें धरणीं ॥ सहस्रावधि पाडिलीं ॥ ३२ ॥
हस्तलाघव देखोन ॥ सकल वीर डोलविती मान ॥
सव्यतर्जनी उचलोन ॥ धन्य सर्व शूर म्हणती ॥ ३३ ॥
आणीक घालोनि बाणजाळ ॥ खिळिलें सर्व कौरवदळ ॥
मग तों भीष्म केवळ काळ ॥ कोपला प्रलयाग्नि जैसा कां ॥ ३४ ॥
मग सर्व वीर मिळोन ॥ सौभद्रावरी टाकिती बाण ॥
तितक्यांचेंही तों संधान ॥ टाकी छेदून क्षणमात्रें ॥ ३५ ॥
मग भीष्में सोडून निर्वाण बाण ॥ सर्वांगीं खिळिला अभिमन्य ॥
कठिण देखोन दहा जण ॥ महारथी धांवले ॥ ३६ ॥
दळासहित धावला विराट ॥ भीमे हांक दिधली अचाट ॥
बाण वर्षती सदट ॥ भीष्मावरी ते काळीं ॥ ३७ ॥
तीन बाणीं गंगानंदन ॥ भेदिता जाहला भीमसेन ॥
शल्य गजावरी बैसोन ॥ उत्तरावरी धांवला ॥ ३८ ॥
शल्यें टाकिली दिव्य शक्ती ॥ उत्तर मूर्च्छित पडला क्षितीं ॥
उत्तराचा चपल हस्ती ॥ बाणघायीं मारिला ॥ ३९ ॥
उत्तर सावध होऊन सवेग ॥ मारिले शल्यरथाचे तुरंग ॥
भीष्में बाणजाळ सवेंच मग ॥ सैन्यावरी घातलें ॥ ४० ॥
भीष्माचे लागले नाहींत बाण ॥ ऐसा वीर नसेच कवण ॥
मयूर जेवीं पिच्छें पसरून ॥ तैसे वीर दिसती ॥ ४१ ॥
श्वेतनामें विराटसुत ॥ तों परम योद्धा अद्‌भुत ॥
तेणें युद्ध अपरिमित ॥ केलें भीष्माशीं ते काळीं ॥ ४२ ॥
एकेच दिवशीं संपूर्ण ॥ सेना आटिता गंगानंदन ॥
परी श्वेतें युद्ध निर्वाण ॥ करून भीष्म आवरिला ॥ ४३ ॥
श्वेतें बहु आगळें दाविलें ॥ शतही कौरव शरीं जर्जर केले ॥
पळों लागलीं शत्रुदळें ॥ पाठ देऊन रणभूमी ॥ ४४ ॥
सवेंच श्वेते परतोन ॥ शतबाणीं खिळिला गंगानंदन ॥
भीष्मेंही शर टाकून ॥ सर्वांगीं तों खिळियेला ॥ ४५ ॥
परी तों दांडगा वीर ते क्षणीं ॥ कदा न निघें समराहूनी ॥
तेणें भीष्माचें चाप छेदूनी ॥ दहा वेळ टाकिलें ॥ ४६ ॥
भीष्माचे ध्वज सारथी ॥ श्वेत छेदी त्वरितगती ॥
हाहाकार कौरव करिती ॥ वाजविती पांडव जयवाद्यें ॥ ४७ ॥
मग दुर्योधनें ते अवसरीं ॥ सर्व सेना प्रेरिली त्यावरी ॥
श्वेतें ख्याति केली यावरी ॥ समरीं शरीं सर्व खिळिले ॥ ४८ ॥
पांडव माथे डोलविती ॥ धन्य विराटपुत्र वानिती ॥
शरजाळीं भीष्माप्रती ॥ त्रासिले तेणें पराक्रमें ॥ ४९ ॥
मग प्रलयीं खवळे जैसा कृतांत ॥ तैसा क्रोधावला शंतनुसुत ॥
घोडे सारथी ध्वज रथ ॥ भीष्में छेदून टाकिले ॥ ५० ॥
धरणीवरी आला श्वेत ॥ तीक्ष्ण बाणजाळ वर्षत ॥
शक्ति घेऊन त्वरित ॥ धावला श्वेत भीष्मावरी ॥ ५१ ॥
बळें सोडिली शक्ती ॥ अनावर वाटे भीष्माप्रती ॥
मग नवांठायीं ते निश्चितीं ॥ छेदोनि क्षितीं पाडिली ॥ ५२ ॥
श्वेत धावला गदा घेऊन ॥ केला भीष्माचा रथ चूर्ण ॥
सारथी तुरंग संहारून ॥ महावीरें टाकिले ॥ ५३ ॥
धरणीवरी उभा गंगाकुमार ॥ तों धांवले कौरवांचे भार॥
दुसरे रथीं सत्वर ॥ शंतनुज बैसला ॥ ५४ ॥
तों श्वेतवीर घेऊनि खड्‌ग ॥ भीष्माचे रथीं चढला सवेग ॥
हातींचें चाप सुरंग ॥ एकाच घायें तोडिलें ॥ ५५ ॥
मग भार्गवदत्त बाण ॥ नूतन चापावरी लावून ॥
काळदंडाऐसा सोडून ॥ गंगात्मजें दिधला पैं ॥ ५६ ॥
तों श्वेताचें हृदय भेदून ॥ गेला पृथ्वीतल फोडून ॥
जैसा सूर्य पावे अस्तमान ॥ तैसा श्वेत रणीं पडियेला ॥ ५७ ॥
पांडवदळीं हाहाकार ॥ कौरव हर्षें होती निर्भर ॥
म्हणती ख्याती करून हा वीर॥ रणांगणीं पडियेला ॥ ५८ ॥
तों श्वेताचा बंधु शंखवीर ॥ तेणें पाचारिला गंगाकुमार ॥
चार घटिका घोरांदर ॥ युद्ध तेणें माजविलें ॥ ५९ ॥
द्रुपदाचें सैन्य ते क्षणीं ॥ भीष्में आटिलें निर्वाण बाणीं ॥
मध्यान्हींचा तीव्र तरणी ॥ तैसा गंगात्मज दिसे पैं ॥ ६० ॥
रवि गेला अस्तमानास ॥ ऐसा जाहला पूर्ण दिवस ॥
वाजविती वाद्यघोष ॥ दळे पावलीं स्वस्थाना ॥ ६१ ॥
धर्म आपले शिबिरांत ॥ बैसला होऊन चिंताक्रांत ॥
श्रीरंगाप्रति बोलत ॥ विचार कैसा करावा ॥ ६२ ॥
भीष्मास समरीं जिंकी ॥ ऐसा वीर नाही त्रिलोकीं ॥
आमुचे राजे रणपर्यंकीं ॥ पहुडवील भीष्म नेमें ॥ ६३ ॥
माझिया बंधूंचा प्राण ॥ भीष्म घेईल न लागतो क्षण ॥
हरि मज नलगे राज्यासन ॥ मी करीन वनवास ॥ ६४ ॥
मग बोले वैकुठनायक ॥ धर्मा तूं कदा न करीं शोक ॥
तुझे बंधू आणि नृपनायक ॥ प्रलय उदयीक करतील ॥ ६५ ॥
ऐसें बोलतां रजनी सरली ॥ दोन्ही दळीं सत्कर्में सारिलीं ॥
वाद्यांची घाई लागली ॥ सेना लोटली समरांगणीं ॥ ६६ ॥
दुर्योधन म्हणे गंगानंदना ॥ तुम्ही काल आटिली इतुकी सेना ॥
तरी सतेज दिसते पहा नयनां ॥ अधिकाधिक नूतन ॥ ६७ ॥
मकरव्यूह रचिला कौरववीरीं ॥ धृष्टद्युम्न क्रौंचव्यूह करी ॥
शंख त्राहाटिले तेणें थरारी ॥ पृथ्वीतळ तेधवां ॥ ६८ ॥
पांचजन्य देवदत्त ॥ वाजवी पार्थ मदनतात ॥
अनंतविजय शंख सत्य ॥ युधिष्ठिरें त्राहाटिला ॥ ६९ ॥
पौंड्रक तों वृकोदरें ॥ सुघोष मणिपुष्पक माद्रीकुमारें ॥
दुमदुमलीं दिशांचीं अंतरे ॥ एकचि हांक गाजिन्नली॥ ७० ॥
प्रलयीं जैसा कृतांत ॥ विश्व भक्षू पाहे क्षुधित ॥
तैसा भीष्म देखोनि पार्थ ॥ म्हणे ऐक जगदीशा ॥ ७१ ॥
लोटीं वेगें आजि स्यंदन ॥ मी भीष्माचा घेईन प्राण ॥
तैं पवनास मागें टाकून॥ रथ लोटिला त्वरेनें ॥ ७२ ॥
अर्जुन आणि गंगाकुमार ॥ रणीं उभे राहिले समोर॥
जैसा मेरु आणि मंदार॥ कीं रमावरं उमावरं ते ॥ ७३ ॥
कीं रोहिणीवर आणि दिनकर॥ कीं समुद्र आणि अंबर ॥
कीं वसिष्ठ आणि विश्वामित्र॥ तैसे दोघे दिसती ॥ ७४ ॥
भीष्में ओढिलें सायकासन ॥ सोडिले सत्याहत्तर बाण ॥
ते पार्थ वरिच्यावरी तोडून ॥ केलें संधान चपलत्वें ॥ ७५ ॥
शतबाणीं गंगानंदन ॥ पार्थ ताडिला न लागतां क्षण ॥
तों द्रोणें पंचवीस मार्गण ॥ पार्थावरी घातले ॥ ७६ ॥
दुर्योधनें चौसष्ट बाण ॥ पार्थावरी दिधले सोडून ॥
शतार्धबाणीं गौतमनंदन ॥ ताडिता जाहला सक्रोधें ॥ ७७ ॥
पार्थ त्याचिया द्विगुणीं ॥ सायक सोडिले तये क्षणीं ॥
तितके खिळिले समरांगणीं ॥ पराक्रमेकरोनियां ॥ ७८ ॥
सवेंच भीष्मावरी ऐंशी शरा ॥ टाकी तेव्हां सुभद्रावर ॥
तेणें विकळ गंगाकुमारा ॥ घटिका एक जाहला ॥ ७९ ॥
भीष्म मूर्छित जाणोन ॥ कौरवसेनेंत प्रवेशला अर्जुन ॥
जैसे भोगींद्र असंख्य देखोन ॥ अरुणानुजे संहारी ॥ ८० ॥
तैसे लक्ष वीर समरांगणीं ॥ पार्थ मारिले तये क्षणीं ॥
धडीं मुंडीं रणमेदिनी ॥ झांकोन गेली दिसेना ॥ ८१ ॥
पार्थवीरे शिरांची लाखोली ॥ भूलिंगास जैं समर्पिली ॥
भीष्माप्रति ते वेळीं ॥ सुयोधन बोलतसे ॥ ८२ ॥
बहुत मातला अर्जुन ॥ पृतना टाकिली संहारून ॥
तुम्हांनिमित्त वीर कर्ण ॥ नेम करून बैसला ॥ ८३ ॥
काय कौतुक पाहतां एथ ॥ आजि समरीं मारावा पार्थ ॥
मग भीष्में लोटिला रथ ॥ उभयकृष्ण लक्षोनियां ॥ ८४ ॥
नवबाणीं वीर पार्थ ॥ भेदीत बळें गंगासुत ॥
सवेच शतबाणीं तों रणपंडित ॥ भेदिता जाहला भीष्माते ॥ ८५ ॥
श्रीरंगाचे हृदयीं तीन बाण ॥ भीष्में भेदिले दारुण ॥
पार्थे भीष्माचा सारथी लक्षून॥ सत्तर बाणीं खिळियेला॥ ८६ ॥
हस्तलाघव दावी गंगानंदन ॥ त्याहून आगळे करी अर्जुन ॥
इकडे द्रोण धृष्टद्युम्न ॥ युद्ध करिती अतिनिकरें ॥ ८७ ॥
निर्वाणींचा एक बाण ॥ द्रोणें सोडिला जेवीं चंडकिरण ॥
परी तों अग्निगर्भ धृष्टद्युम्न ॥ नाहीं भ्याला तयासी ॥ ८८ ॥
बाण येत जेवीं कृतांत ॥ परी तेणे तोडिला अकस्मात ॥
अरुणानुज खंडित ॥ गगनी जैसा व्याळातें ॥ ८९ ॥
वीर म्हणती धन्य धन्य ॥ प्रतापी वीर हा धृष्टद्युम्न ॥
यावरी पांचाळे शक्ति उचलून ॥ द्रोणावरी सोडिली ॥ ९० ॥
द्रोणें दिव्य शर सोडोनी ॥ शक्ति खंडून पाडिली धरणीं ॥
सर्वांग भेदिलें बाणीं ॥ मयूराऐसे दिसती पैं ॥ ९१ ॥
कलिंग देशींचा नृपनाथ ॥ नाम जयाचें केतुमंत ॥
भीमाशीं युद्ध अद्‌भुत ॥ तेणें केलें तेधवां ॥ ९२ ॥
मेदिनीवसनाची वाट गा ॥ शोधीत धांवती रक्तनिम्नगा ॥
कलिंगाचा पुत्र दांडगा ॥ भीमावरी कोसळला ॥ ९३ ॥
अश्वावरी तों बैसोन ॥ भीमावरी सोडी बाण ॥
तों वृकोदरें गदा भोवंडून ॥ मत्कुणापरी मारिला ॥ ९४ ॥
ज्याचें नाम चक्रवीरा ॥ भीमे केला त्याचा संहार ॥
मग असिलता घेऊन वृकोदर ॥ कौरवभारीं मिसळला ॥ ९५ ॥
चहूंकडून बाणांचे पूर॥ भीमावरी येती अपार॥
असिलतेनें वृकोदर ॥ तोडून पाडी एकीकडे ॥ ९६ ॥
जैसा कां बहिरीससाणा ॥ निवटीत उठे द्विजगणां ॥
त्याचपरी भीम जाणा ॥ पाडी सेना चपलत्वें ॥ ९७ ॥
कलिंगाचा दुसरा सुत ॥ नाम त्याचें भानुमंत ॥
शलभ विजेस धरू धांवत ॥ तैसा लोटला भीमावरी ॥ ९८ ॥
भीमाचे करींची असिलता ॥ झळके जैशी विद्युल्लता ॥
एकाच घायें भानुमंता ॥ यमसदनास धाडिलें ॥ ९९ ॥
कलिंगाचा तिसरा सुत ॥ शतायुनामा वीर धांवत ॥
मातोनियां जैसा बस्त ॥ महाव्याघ्रावरी पडे ॥ १०० ॥
जैसा मुद्‌घट होय चूर्ण ॥ तेवीं भीमे टाकिला मारून ॥
शेवटीं कलिंग आपण ॥ उसणें घ्यावया धावला ॥ १०१ ॥
वृकोदराचा मार अनिवार॥ उडविलें कलिंगाचे शिरा ॥
भेदीत गेलें अंबर॥ कौरव पाहती ऊर्ध्वमुखें ॥ १०२ ॥
दोनसहस्र हस्ती ॥ सातशतें महारथी ॥
कलिंगाची सेनासंपत्ती ॥ संहारिली भीमसेनें ॥ १०३ ॥
तैशीच धृष्टद्युम्नें ते क्षणीं ॥ संहारिली कौरववाहिनी ॥
तें भीष्म वीर देखोनी ॥ बाण वर्षत धांवला ॥ १०४ ॥
भीष्मावरी शक्ती ॥ भीमे टाकिली अवचिती ॥
ते तत्काल छेदून क्षितीं ॥ देवव्रतें पाडिली ॥ १०५ ॥
अश्वत्यामा धृष्टद्युम्न ॥ युद्ध करिती निर्वाण ॥
त्याची पाठी राखित अभिमन्य ॥ वर्षत बाण उठिला ॥ १०६ ॥
महावीर तये क्षणीं ॥ सौभद्रें खिळिले निजबाणीं ॥
दुर्योधनपुत्र धांवोनी ॥ लक्ष्मण पुढें पातला ॥ १०७ ॥
लक्ष्मणें सोडिले तीव्र बाण ॥ त्या अभिमन्यूवरी लक्षून ॥
जैसा पंडितापुढें भाषण॥ शतमूर्ख करूं आला ॥ १०८ ॥
त्या मूर्खाचें वाग्जाल समस्त ॥ एकाच वचनें छेदी पंडित ॥
तैसे लक्ष्मणाचे शर समस्त॥ एकाच शरें तोडिले ॥ १०९ ॥
मग अभिमन्यें निर्वाणबाणीं ॥ मूर्च्छित लक्ष्मण पाडिला रणीं ॥
दुर्योधन तें देखोनी ॥ सैन्यासह धांवला ॥ ११० ॥
सौभद्रास सकळीं वेढिलें ॥ तें कपिवरध्वजें दुरोनि देखिलें ॥
मग खगवरध्वजें ते वेळे ॥ स्यंदन वेगें पीटिला ॥ १११ ॥
विद्युल्लता पडे जैशी पर्वतीं ॥ तैसा कौरवांत आला सुभद्रापती ॥
तितुकेही वीर शरपंथी ॥ जर्जर केले पराक्रमें ॥ ११२ ॥
सूर्यरथापर्यंत ॥ धुरोळा दाटला तेथ ॥
कौरवभार सर्व पळत ॥ पार्थभयेंकरोनियां ॥ ११३ ॥
रणभूमि माजली फार ॥ रिते धांवती अश्व कुंजर ॥
मोकळे रथ अपार॥ गगनमार्गें झुगारती ॥ ११४ ॥
शस्त्रास्त्रांसहित हस्त ॥ अपार पडले भूषणमंडित ॥
किरीटकुंडलांसहित ॥ शिरें अगणित पडलीं पैं ॥ ११५ ॥
ब्रिदांसहित पडले चरण ॥ हातीं अंकुश घेऊन ॥
गजाकर्षक मरून ॥ चहूंकडे पडियेले ॥ ११६ ॥
वाग्दोरे तैसेच हातीं ॥ सूत पडले बहु क्षितीं ॥
भीष्म म्हणे द्रोणाप्रती ॥ धन्य जगतीं वीर पार्थ ॥ ११७ ॥
सूर्य पावला अस्तमान ॥ संपूर्ण जाहला द्वितीय दिन ॥
निशा संपतां चंडकिरण ॥ उदय पावला तेधवां ॥ ११८ ॥
भीष्में सुपर्णव्यूह रचिला ॥ पांचाळे अर्धचंद्राकार केला ॥
सकल सेनेस रक्षक जाहला ॥ धृष्टद्युम्न तेधवां ॥ ११९ ॥
त्यासही रक्षक पार्थ वीर॥ पार्थास रक्षक जगदीश्वर॥
मांडलें युद्धाचें घनचक्र ॥ शिरें अपार उडताती ॥ १२० ॥
सात्यकी आणि शकुनी ॥ भिडती तेव्हां रणमेदिनीं ॥
तों कपटियास विरथ करूनी ॥ रणांतून पळविला ॥ १२१ ॥
भीमसेनावरी सुयोधन ॥ उठिला तेव्हां वर्षत बाण ॥
तों घटोत्‍कच गदा घेऊन॥ भीमास साह्य जाहला ॥ १२२ ॥
एक काळ एक कृतांत ॥ तेवीं भीम आणि हिडिंबसुत ॥
कौरवदळाचा निःपात ॥ केला बहुत ते क्षणीं ॥ १२३ ॥
भीष्मास हिणावी सुयोधन ॥ तूं वीरांमाजी सहस्रकिरण ॥
पाडवांचीं मुले येऊन ॥ तुज शरीं जर्जर करिती ॥ १२४ ॥
तुझे मनीं त्यांचें कल्याण ॥ व्हावें हें मी जाणें पूर्ण ॥
प्रतिज्ञा करून वीर कर्ण ॥ राहिला पुढें न येचि॥ १२५ ॥
भीष्म म्हणे पूर्वीच समस्त ॥ तुज म्यां केलें असे श्रुत ॥
पांडव वीर प्रतापवंत ॥ कळिकाळासी न गणिती ॥ १२६ ॥
तरी मी आजि निर्वाण ॥ पाहें नयनीं युद्ध करीन ॥
मग महावीरे स्यंदन ॥ पांडवदळीं लोटिला॥ १२७ ॥
पांडवचमूचा संहार॥ भीष्में केला तेव्हां अपार॥
फुलले किंशुकतरुवर ॥ तैसे वीर दिसताती ॥ १२८ ॥
परम चपल देवव्रत ॥ क्षणांत पूर्वेस जाय रथ ॥
सवेंच पश्चिमेस जात ॥ त्रुटिमात्र न वाजतां ॥ १२९ ॥
क्षणें उत्तर क्षणें दक्षिण ॥ अलातचक्रवत फिरे स्यंदन ॥
चहूंकडोनि सोडी बाण ॥ वरी दृष्टि न ठरे कोणाची ॥ १३० ॥
श्येनपक्षी जैसा फिरे॥ तैसा रहंवर जाय स्वरें ॥
चतुरंगसेना अपारें ॥ संहारिली ते दिवशीं ॥ १३१ ॥
तें देखोन कृष्णार्जुन ॥ म्हणती धन्य वीर गंगानंदन ॥
धांडोळितां हें त्रिभुवन ॥ ऐसा शूर दुजा नसे ॥ १३२ ॥
श्रीरंग म्हणे अर्जुना॥ भीष्में आटिली सर्व सेना ॥
तुझी कोठे राहिली प्रतिज्ञा ॥ लाज कां तुज न वाटे ॥ १३३ ॥
अर्जुन म्हणे श्रीकृष्णा ॥ आतां प्रेरीं सत्वर स्यंदना ॥
तों निमेष न लागतो जाणा॥ अर्जुने केलें अद्‌भुत ॥ १३४ ॥
लाघव आणि हस्तवेग जाण ॥ दाखवी भीष्माहून दशगुण ॥
हरि म्हणे पार्था स्यंदन ॥ चालवितों पहा कैसा तों ॥ १३५ ॥
पार्थें सोडिला आधीं बाण ॥ मग श्रीरंगें प्रेरिला स्यंदन ॥
बाणास मागें टाकून ॥ रथ गेला त्वरेनें ॥ १३६ ॥
सवेंच परतविला रहंवरा ॥ तों पुढें येऊन पडला शर ॥
मग पार्थ स्तवन करी अपार ॥ म्हणे पार नेणवे तुझा॥ १३७ ॥
स्वामी सर्वज्ञा श्रीकरधरा ॥ अश्वांमाजी हे कैंची त्वरा ॥
विश्वव्यापका त्रिभुवनेश्वरा ॥ गती समग्र तुझ्याची ॥ १३८ ॥
असो नरवीरें बाण टाकून ॥ छेदिलें भीष्माचें सायकासन ॥
भीष्म म्हणे पार्था धन्य ॥ तुज देखोनि सुखाचे मी ॥ १३९ ॥
माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तैसा दिसे तीच अर्जुन ॥
भीष्म म्हणे निर्वाण ॥ झुंजें मजशीं आजि तूं ॥ १४० ॥
ते दिवशीं आदिपुरुष ॥ अंगीं कवच घाली निर्दोष ॥
मस्तकीं कोटीर झळके विशेष ॥ तेज न समाय अंबरीं ॥ १४१ ॥
कर्णी कुंडलांचे जोड ॥ सर्व सारथियांमाजी सुधडद ॥
तों द्वारकाधीश उघड ॥ पाठी राखे पार्थाची ॥ १४२ ॥
यावरी तों देवव्रत ॥ करिता जाहला कर्म अद्‌भुत ॥
म्हणे हे जगजीवन मदनतात ॥ प्रतिज्ञा माझी अवधारीं ॥ १४३ ॥
तुझा नेम शस्त्र न धरीं ॥ तरी मी धरवीन आजि समरीं ॥
कंसांतका मधुमुरारी ॥ प्रतिज्ञा खरी करीन मी ॥ १४४ ॥
हें जरी न करवे माझेनी ॥ तरी व्यर्थ प्रसवली स्वर्धुनी ॥
शंतनुतनुज आजपासोनी ॥ सर्वथाही म्हणवीना ॥ १४५ ॥
विजयरथ करीन चूर्ण ॥ कीं कपिवरध्वज खालीं पाडीन ॥
तेव्हां मग शस्त्र घेऊन ॥ धांवशी कीं आम्हांवरी ॥ १४६ ॥
सेनेसहित त्रासीन अर्जुन ॥ सर्वांचीं शिरें खालीं पाडीन ॥
तेव्हां मग शस्त्र घेऊन ॥ धांवशी कीं आम्हांवरी ॥ १४७ ॥
रक्ताचे पूर वाहवीन ॥ पांडवादिक सकल सैन्य ॥
हें समग्र बाणें आटीन ॥ मग सुदर्शन धरिसी कीं ॥ १४८ ॥
आजि हे खरी करीन प्रतिज्ञा ॥ तुझीच आण कंसप्राणहरणा॥
माझा क्षत्रियधर्म जनार्दना ॥ अवलोकीं तूं यावरी ॥ १४९ ॥
ऐसें देवव्रतें बोलोनी ॥ चाप टणत्कारिलें तये क्षणीं ॥
झणत्कारिल्या लघुकिंकिणी ॥ ऐकोन कर्णीं सर्व भ्याले ॥ १५० ॥
प्रलयी क्षोभला कृतांत ॥ तेवीं समरीं दिसे गंगासुत ॥
शरवृष्टि करितां अपरिमित ॥ लेखा शेषा न करवे ॥ १५१ ॥
वृक्षाग्रींचें फळ लक्षून ॥ जैसे पक्षी येती धांवोन ॥
तैशी बाणें शिरें उडवून ॥ ऊर्ध्वपंथें बहु जाती॥ १५२ ॥
लक्षांचीं लक्ष शिरें ॥ उडविलीं तेव्हां गंगाकुमारें ॥
कित्येक कंदुकांऐशीं स्वरें ॥ आकाशपंथें उसळलीं ॥ १५३ ॥
पांडवदळीं हाहाकार ॥ असंख्य वीरांचा केला संहार॥
अलातचक्रवत्‌ गंगाकुमार‍ ॥ सेनेमाजी धांवतसे ॥ १५४ ॥
बाणपर्जन्याच्या धारा ॥ त्यामाजी वर्षती शिरें गारा ॥
अशुद्धजीवनाचें सत्वरा ॥ पूर चालिले चहूंकडे ॥ १५५ ॥
पळावया नाहीं वाव ॥ नेदी पृथ्वी लपावया ठाव॥
रथगजांआड वीर सर्व ॥ लपतांही न वांचती ॥ १५६ ॥
भीष्माचे शर तीक्ष्ण॥ गजकलेवरे फोडून ॥
सवेंच अश्वनरांसी भेदून ॥ पृथ्वीमाजी प्रवेशती ॥ १५७ ॥
उरले वीर सोडून समर ॥ पळती घेत दिगंतरा ॥
महायोद्धे रणधीर॥ न येती समोर भीष्माचे ॥ १५८ ॥
आकांत वर्तला थोर॥ भीष्में पार्थ लक्षोनि समोर॥
प्रेरिला बाणांचा पूर॥ खिळिला वीर सर्वांगीं ॥ १५९ ॥
अर्जुन सोडित शरा ॥ ते वरच्यावर तोडी गंगाकुमार ॥
पार्थ दिसे जैसा सपिच्छ मयूर॥ बाणपिच्छेंकरोनियां ॥ १६० ॥
विशेष भीष्मबाणप्रताप ॥ गळाले पार्थाचें गांडीव चाप ॥
मूर्छा येऊन सकंप ॥ ध्वजस्तंभीं टेकला ॥ १६१ ॥
रथ फेरीत जगन्मोहन ॥ पार्थाकडे पाहे परतोन॥
म्हणे करि न सोडिशी बाण ॥ तों तेणें नयन झांकिले ॥ १६२ ॥
गळाले करीचे सायकासन ॥ देखोन खवळला मधुसूदन ॥
करितां सुदर्शनाचे स्मरण॥ न लागतां क्षण हाता आलें ॥ १६३ ॥
उडी टाकून मुरारी ॥ करीवरी चपेटे जैसा हरी ॥
पीतांबर मागें न सांवरी ॥ धरणीवरी लोळतसे ॥ १६४ ॥
उगवले नेणों सहस्रकिरण ॥ तेवीं झळके करीं सुदर्शन ॥
बिंबाधरारक्तदशन ॥ क्रोधेंकरून रगडिले ॥ १६५ ॥
कौरवदळीं हाहाकार॥ महापूर घेती गिरिकंदर॥
वाटे सर्वांचीं शिरें समग्र ॥ एका घायें पाडील पैं ॥ १६६ ॥
आतां कैंचा गंगानंदन ॥ झांकले सर्वांचे नयन ॥
कौरव सर्व मूर्छा येऊन ॥ पडती पालथे पृथ्वीवरी ॥ १६७ ॥
परम कोपायमान श्रीधर॥ ब्रह्मांड हें जाईल समग्र ॥
दोहीं दळीं आकांत थोर॥ हांक एकचि गाजली ॥ १६८ ॥
पृथ्वी तडतडां वाजत ॥ अंबर थरथरां कांपत ॥
वायु फिरों न लाहे तेथ ॥ सप्त समुद्र तप्त जाहले ॥ १६९ ॥
सुदर्शनतेजाचे आवर्ती ॥ चंद्र सूर्य बुचकळ्यादेती ॥
सृष्टि गेली गेली म्हणती ॥ सुर पळविती विमानें ॥ १७० ॥
चक्रवत्‌ फिरवी सुदर्शन ॥ सावध पाहे गंगानंदन ॥
म्हणे हे जगन्निवास मनमोहन ॥ येई येई झडकरी ॥ १७१ ॥
हे द्वारकानगरविहारी ॥ हे मधुसूदना कैटभारी ॥
माझी प्रतिज्ञा झाली खरी ॥ वधीं यावरी मज आतां ॥ १७२ ॥
हे रविकर वरांबरधरा॥ विषकंठवंद्या गुणगंभीरा॥
छेदीं आतां माझिया शिरा ॥ सोडवीं संसारापासोनी ॥ १७३ ॥
जन्मापासोनि आजपर्यंत ॥ आचरलों जें ब्रह्मचर्यव्रत ॥
तें सफळ जाहलें समस्त ॥ पावेन मृत्यु हरिहस्ते ॥ १७४ ॥
दुर्जनाचें संगेकरून ॥ आजवर शिणले माझें मन ॥
सोडवीं या देहापासून ॥ घे मेळवून तुजमाजी ॥ १७५ ॥
भक्तजनसंतापनाशका ॥ इंदिरावरा नेत्रसुखदायका ॥
पांडवजनप्रतिपालका॥ सोडीं सुदर्शन सत्वर॥ १७६ ॥
सावध होऊन पाहे अर्जुन ॥ मग धांवला उडी टाकून ॥
हरिजघनीं मिठी घालून ॥ धरिले चरण आवडीं ॥ १७७ ॥
पार्थास झिडकावी श्रीधर॥ म्हणे सोडीं मज छेदितों शिर ॥
चरण न सोडी सुभद्रावर ॥ स्तवन फार करीतसे ॥ १७८ ॥
माझिया हातें कंसारी ॥ हें कौरवदळ संहारीं ॥
भीष्मास मारवीं यावरी ॥ चला रथावरी श्रीरंगा॥ १७९ ॥
ऐसें अर्जुन अनुवादोन ॥ हातीं धरून रुक्मिणीजीवन ॥
निजरथावरी बैसवून ॥ आपण वरी आरूढला ॥ १८० ॥
हरीचे इच्छेंकरूनि जाणा ॥ सुदर्शन गेलें स्वस्थाना॥
मग अर्जुन वर्षत बाणां ॥ सहस्रवदना लेखा नव्हे ॥ १८१ ॥
प्रलयविजेसमान ॥ झळके गांडीव शरासन ॥
प्रचंड चाप टणत्कारोना ॥ शरीं व्यापिले कौरव ॥ १८२ ॥
नानाशस्त्रांचे मारा ॥ कौरव करिते जाहले अपार॥
तोमर शक्ति पाश चक्र ॥ मुद्‌गर पट्टिश असिलता ॥ १८३ ॥
जितुकीं शस्त्रें कौरव प्रेरिती ॥ तितुकीं छेदी सुभद्रापती ॥
सर्व वीर पार्थ शरपंथीं ॥ जर्जर केले तेधवां ॥ १८४ ॥
दोन्ही दळीचे वाद्यनाद ॥ आणि वीरांच्या हांका सुबद्ध॥
परी गांडीवाचा शब्द अगाध ॥ त्याहूनही आगळा ॥ १८५ ॥
राघवचरणारविंदभ्रमर ॥ ध्वजस्तंभीं देत बुभुःकार ॥
भूतांच्या हांका अनिवार॥ ऐकतो कृतांत चळिं कांपे ॥ १८६ ॥
असो दिवस जाहले तीन ॥ अस्तास गेला चंडकिरण ॥
लक्षावधि दीपिका पाजळून ॥ पार्थ परतला शिबिराप्रति॥ १८७ ॥
चवथे दिवशीं सर्पाकार॥ व्यूह रची गंगाकुमार ॥
तीच रचना पांचाळ वीर ॥ पांडवदळीं करी तेव्हां ॥ १८८ ॥
अर्जुनाचा देखोनि रथ ॥ कौरवदळें भयभीत ॥
तों धांवला सुभद्रासुत ॥ बाण वर्षत भीष्मावरी ॥ १८९ ॥
देखोनि सौभद्राचें संधान ॥ भीष्म जाहला आनंदघन ॥
म्हणे होय हा प्रत्यर्जुन ॥ धन्य वंश याचेनि ॥ १९० ॥
सोमदत्तें ते अवसरी ॥ शक्ति टाकिली अभिमन्यूववरी ॥
येरें छेदोनि झडकरी ॥ त्याची त्यावरीच पाडिली ॥ १९१ ॥
यावरी तों उत्तरापती ॥ महारणपंडित पुरुषार्थी ॥
बाणजाळीं सकलांप्रती ॥ जर्जर करिता जाहला ॥ १९२ ॥
शल्यनामा कौरववीर ॥ धांवला धृष्टद्युम्नासमोर ॥
बाणधारीं रहंवर ॥ अश्व सारथी मारिले ॥ १९३ ॥
मग चरणचालीं धृष्टद्युम्न ॥ हातीं घेऊन असिलता ओढण ॥
शल्यवीराचें कंठनाल छेदून ॥ एकीकडे टाकिलें ॥ १९४ ॥
त्याचा पिता शयमिनी ॥ तेणें रण माजविलें तये क्षणीं ॥
त्यास सात्यकिवीरें छेदूनी ॥ यमसदना पाठविलें ॥ १९५ ॥
तों अपार सेना घेऊन ॥ पुढें धांवला सुयोधन ॥
त्यावरी धावला भीमसेन ॥ हांकें गगन गाजवित ॥ १९६ ॥
पंचवीससहस्र हस्ती ॥ गदाघायें पाडिले क्षितीं ॥
तीनसहस्र रथी ॥ चूर्ण केले रणीं तेव्हां ॥ १९७ ॥
गजारूढ भगदत्त ॥ भीमावरी धांवला शर वर्षत ॥
बाणजाळ घालून अद्‌भुत ॥ वृकोदर झाकियेला ॥ १९८ ॥
तों घटोत्कच हांक देत ॥ धांवला जैसा प्रलयकृतांत ॥
वर्षता झाला शिला पर्वत ॥ तेणें भगदत्त घाबरला ॥ १९९ ॥
पाडितां शिलांचा पर्जन्य ॥ पळू लागलें सकल सैन्य ॥
तीं अस्ता गेला चंडकिरण ॥ दिवस पूर्ण चार जाहले ॥ २०० ॥
उपरी प्रातःकाल जाहला ॥ मकरव्यूह कौरवीं रचिला ॥
श्येनपक्ष्याऐसा शोभला ॥ पांडवांचा व्यूह तेव्हां ॥ २०१ ॥
पांडवसेनेचें परम बळ ॥ अवघे वीर उतावीळ ॥
दुर्योधनाचे हृदयकमळ ॥ धगधगिले भयें बहु ॥ २०२ ॥
दुर्योधन म्हणे गंगानंदना ॥ पांडवीं आटिली माझी सेना॥
उरली तेही उरेना ॥ पूर्ण मज हें कळों आलें ॥ २०३ ॥
तुम्हीं वडिलीं सांगितली नीती ॥ ती म्यां धरिली नाहीं चित्तीं ॥
भीष्म म्हणे आतां प्रचीती ॥ आली तुज सुयोधना ॥ २०४ ॥
ज्या पक्षी असे वैकुंठनाथ ॥ जयलाभ तिकडेचि समस्त ॥
पांडव सन्मार्गें वर्तत ॥ यश प्राप्त सदा त्यांसी ॥ २०५ ॥
अजून तरी सुयोधना॥ शरण रिघे श्रीकृष्णचरणां ॥
तों ब्रह्मानंद वैकुंठराणा ॥ वेदपुराणां वंद्य जो ॥ २०६ ॥
बह्मादिकांचें निजध्यान ॥ अपर्णावराचें देवतार्चन ॥
तयासी तूं रिघे शरण ॥ सोडीं अभिमान पापी हा॥ २०७ ॥
मग म्हणे दुर्योधन ॥ पहिलाच गेलों चुकोन ॥
आतां अभिमानें द्यावा प्राण ॥ परी शरण न जावें ॥ २०८ ॥
मिळाले पृथ्वीचे नृपवर ॥ यां देखतां जोडूनकरा ॥
शरण जाऊन पंडुकुमार ॥ कैसें आणूं गजपुरा ॥ २०९ ॥
तूं भीष्म काळास अनिवार॥ द्रोण कर्ण त्रैलोक्य जिंकणार ॥
मज शरण जा म्हणतां निर्धार॥ लाज गेली तुमची पैं ॥ २१० ॥
युद्ध मांडले विशेष ॥ आज चालतो पांचवा दिवस ॥
पुढें माजवावा वीररस ॥ जो सुरस भवनत्रयीं ॥ २११ ॥
ब्रह्मानंदें जोडूनि करा ॥ श्रोतयांसी म्हणे श्रीधर॥
पुढील अध्यायीं गंगाकुमार ॥ ख्याती करील रणांगणीं ॥ २१२ ॥
स्वामी माझा पंढरीनाथ ॥ ब्रह्मानंद अति समर्थ ॥
पांडवांशी पाठी रक्षित ॥ दिवसनिशीं न विसंबे ॥ २१३ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ भीष्मपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ बेचाळिसाव्यांत कथियेला ॥ २१४ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे भीष्मपर्वणि द्विचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४२ ॥
अध्याय बेचाळिसावा समाप्त


GO TOP