श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय सतरावा


राजसूय यज्ञ


॥ श्रीगणेशायनमः ॥
श्रीकृष्णकृपेनें पांडव समर्थ । अक्षय्य भांडारें अक्षय्य रथ ।
गांडीव चाप अक्षय्य सत्य । अक्षय्य तूणीर सर्वदा ॥ १ ॥
त्यावरी मयासुरें उचित । सभा दिधली अत्यदभुत ।
जरासंध मारिला बलोन्मत्त । तो पुरुषार्थ ठसावला ॥ २ ॥
बावीस सहस्त्र राजे सोडविले । आपलेसे करुनि स्थापिले ।
धर्में यावरी काय केलें । आज्ञापिले चौघे बंधु ॥ ३ ॥
उत्तर दिशेसी जाय अर्जुन । सवें दलभार घेऊन ।
प्रतापकल्लोळ संपूर्ण । उचंबळत ब्रह्मांडभरी ॥ ४ ॥
कोणी राजे युद्ध करिती । सवेंच मागुती शरण येती ।
एक पहिलेच मित्र भूपती । जरासंधाचे बंदींचे ॥ ५ ॥
देशोदेशींचा झाडा पूर्ण । घेत चालिला श्वेतवाहन ।
समूहनामें राजा जिंकोन । अपार धन घेतलें ॥ ६ ॥
त्याचा समागमें घेतला भार । पुढें देखिलें प्राग्ज्योतिष नगर ।
नरकपुत्र भगदत्त वीर । तीन दिवसांत जिंकिला ॥ ७ ॥
कुंतलींचा राजा बृहत । त्यासही जिंकी वीर पार्थ ।
तो पद्मराग रत्‍नें ओपित । शतकोटि पांडवांतें ॥ ८ ॥
सेनविदनामें महारथ । सुनाभ सुवर्चस बहुत ।
पर्वतवासी हे समस्त । मार्गघ्न तस्कर जिंकिले ॥ ९ ॥
हिमाचल ओलांडोनि समस्त । पुढे जिंकीत चालिला पार्थ ।
धन रत्‍नें सुवर्णपर्वत । असंख्य येत करभार ॥ १० ॥
पुरुषखंड हाटकदेश । गोरकपर्वत सुवर्ण विशेष ।
मानससरोवरीं अतिप्रकाश । रत्‍नखाणी देखिल्या ॥ ११ ॥
जेथींचा पाट वाहे शुद्ध । तेचि जाणिजे सरयू प्रसिद्ध ।
संख्या एक अर्बुद । हस्ती भरिले सुरत्‍नें ॥ १२ ॥
गंधर्वदेश जिंकून । नाना दुर्गस्थानें कठिण ।
जेथें नाहीं मनुष्यांचें गमन । तेथें अर्जुन पावला ॥ १३ ॥
ज्या ज्या देशीं धन घेतलें । त्याचें हातीं शक्रप्रस्था पाठविलें ।
अश्व रथ गज भरिले । पावते केले धर्मातें ॥ १४ ॥
एवं उत्तरदिशा जिंकून । अपार वस्तुसामग्री घेऊन ।
धर्मराजापुढें आणून । पार्थ वीर समर्पी ॥ १५ ॥
भांडारें भरलीं संपूर्ण । नगरांत न मावे धन ।
मग शक्रप्रस्थाबाहेर नेऊन । धनराशी ठेविल्या ॥ १६ ॥
पूर्वदिशेसी भीमसेन । देश जिंकीत चालिला संपूर्ण ।
पांचालपुरा येऊन । नगराबाहेर राहिला ॥ १७ ॥
द्रुपद प्रेमें धांवला । वृकोदरास भेटला ।
अपार करभार दिधला । सवें चालिला साह्यातें ॥ १८ ॥
गंडकी ओलांडून जात । विदेह भेटला मिथिलानाथ ।
पुढें सुशर्मा जिंकित । अपार भेटत नृपती पैं ॥ १९ ॥
धन देऊन पुष्कळ । आदरें भेटला शिशुपाल ।
तेरा दिवस सहदल । भीमसेन राहिला ॥ २० ॥
बृहदबल कोसलपति सबल । जिंकीत जात म्लेच्छमंडल ।
ते धन देऊनि पुष्कळ । पाय वंदिती भीमाचे ॥ २१ ॥
पर्वतवासी येत तस्कर । वस्त्रें ललामें देती अपार ।
नाना शस्त्रजातींचे संभार । अलंकार विचित्र पैं ॥ २२ ॥
मलयागर कृष्णागर चंदन । केशर कस्तुरी जवादी पूर्ण ।
पोतास पाच कचोरे सुगंध जाण । अपार देती भीमातें ॥ २३ ॥
पुर्वदिशा सर्व जिंकून । अपार संपत्तिपर्वत घेऊन ।
धर्मास भेटला भीमसेन । आनंदें गगन पूर्ण जाहलें ॥ २४ ॥
दक्षिणेस दक्षिणा घ्यावया निश्चित । सहदेव पाठविला माद्रीसुत ।
पृतना घेऊन असंख्यात । जाता जाहला बलाब्धि ॥ २५ ॥
शूरसेनास जिंकून । दंतवक्त्रासी आलिंगून ।
कुंतिभोजें भेटोन । अपार धन दिधले ॥ २६ ॥
मत्स्य सुकुमार सुमित्र । युद्धीं जिंकोन पटच्चर ।
रत्‍नधनराशी अपार । अर्पिते जाहले सहदेवा ॥ २७ ॥
भोजकटकनगरीं जाण । रुक्मिया झुंजला द्वयदिन ।
मग दासत्व अंगीकारुन । पुजासंभार समर्पी ॥ २८ ॥
बहुत देश जिंकित सहदेव । धाकें भेटती सर्वही राव ।
किष्किंधा वेढी बलार्णव । युद्ध असंभाव्य जाहलें ॥ २९ ॥
मैंद द्विविद वानर । केशधरणीं युद्ध अपार ।
जालिया मग वालीनें भांडार । फोडोनि द्रव्य दिधलें ॥ ३० ॥
शुक्रबृहस्पतीऐशीं तेजाळ । रत्‍नमुक्तें दिधलीं पुष्कळ ।
पुढें माहिष्मती पुरी सबळ । नीळ राज्य करी तेथें ॥ ३१ ॥
जो दुसरा शक्र म्हणवित । वह्नि जयाचा जामात ।
तया नगरप्रदेशीं दलासमवेत । येता जाहला सहदेव ॥ ३२ ॥
तों अग्नि क्षोभला अकस्मात । सहदेवाचें दल जाळित ।
अश्व गज वीर रथ । हव्यवाट जाळितसे ॥ ३३ ॥
संकटीं पडला पंडुकुमार । म्हणे दूर राहिला श्रीकरधर ।
सव्यसाची विद्यासमुद्र । वृकोदर दुरावला ॥ ३४ ॥
नसे दलभार किंचित । कृशान आम्हांसी झुंजत ।
वैश्वानर होय शांत । ऐसा प्रकार समजेना ॥ ३५ ॥
महिष्मती नगरीं तत्वतां । चहूंवर्णांच्या योषिता ।
जारकर्मी परम रता । विधिनिषेध नसेचि ॥ ३६ ॥
राजा नील याग करित । फुंकितां कष्टले बहुत ।
परि न पेटेचि पुरुहुत । मग येत राजकन्या ॥ ३७ ॥
ते लावण्यसरिता गुणराशी । रुपासी न तुळे रंभा उर्वशी ।
अंगीं परिमल अहर्निशीं । सुगंधासी सीमा नसेचि ॥ ३८ ॥
तिणे फुंकितां तये वेळीं । मन्मथें व्यापिला ज्वालामाली ।
अनलही विरहानलीं । तप्त जाहला तेधवां ॥ ३९ ॥
वदनद्वयें चुंबावें । कीं सप्तहस्तीं अलिंगावें ।
मग तो त्रिचरण स्वभावें । विप्रवेषें प्रकटला ॥ ४० ॥
रायासी म्हणे चत्वारिश्रृंग । मज हे कन्या देईं सवेग ।
देखोनि वैश्वानर अभंग । भूभुज अवश्य म्हणतसे ॥ ४१ ॥
मग जाहलें पाणिग्रहण । त्यावरी बोले विभावसु आपण ।
व्यभिचार करितां निर्दोष पूर्ण । स्त्रिया नगरींच्या करीन मी ॥ ४२ ॥
दक्षिणदिशे समुद्रतीर । केरल मल्याळ देश थोर ।
जारकर्मरीति अपवित्र । तेथें चालत अद्यापि ॥ ४३ ॥
आणि श्वशुराप्रति बोले अग्न । परकें दल येतां जाळीन ।
मग घरजांवयी कृशान । नीलें करुन ठेविला ॥ ४४ ॥
यालागीं अग्नि जाळित । मग सहदेव होऊन शुचिर्भूत ।
अग्नीचें स्तवन करित । हात जोडून तेधवां ॥ ४५ ॥
चित्रभानु अनल बृहदभानु । कृशानु ज्वलन हुताशनु ।
विभावसु वीतिहोत्र हव्यवाहनु । वैश्वानर कृष्णवर्त्मा ॥ ४६ ॥
भुरितेजा लोहिताश्व पावक । मेषवाहन मरुन्मित्र देख ।
चत्वारिश्रृंग त्रिपद अधोमुख । द्विमूर्धा सप्तपाणी ॥ ४७ ॥
महाराज तूं जातवेद । ज्वालामाली वेदप्रतिपाद्य ।
सकल देवांत मुख्य तूं वंद्य । सागरजीवनशोषक तूं ॥ ४८ ॥
मदनदहनतृतीयनयनीं । वास करितां तूं सदा अग्नी ।
विश्वाचे जठरीं अवतरोनी । पालन करिसी पवित्रा ॥ ४९ ॥
तूं तृप्त व्हावया पूर्ण । आरंभिला राजसूय यज्ञ ।
तुज दिधलें आमंत्रण । सामग्री जाण मेळवितों ॥ ५० ॥
ऐसें ऐकतां स्तवन । प्रत्यक्ष प्रकटला हुताशन ।
शीतळ केलें सकळ सैन्य । क्षेमलिंगन देऊनियां ॥ ५१ ॥
सहदेवास म्हणे वैश्वानर । पार्थें मजवरी केला उपकार ।
खांडववन देऊन समग्र । रोग माझा दवडिला ॥ ५२ ॥
श्रीकृष्णभक्तांसी विघ्न । मी न करीं गेलिया प्राण ।
प्रर्‍हाद म्यां रक्षिला पूर्ण । लंकादहनीं हनुमंत ॥ ५३ ॥
जे न करिती हरिस्मरण । न ऐकती पांडवांचें कीर्तन ।
नाचरती स्वधर्माचरण । जाळीन सदनें तयांचीं ॥ ५४ ॥
जे निंदक अभक्त दुर्जन । जे न करिती माझें स्तवनपूजन ।
जे न करिती सूर्याराधन । त्यांसी जाळीन क्षणमात्रें ॥ ५५ ॥
काय असूनि उत्तम सदन । जेथें नाहीं ब्राह्मणभोजन ।
जेथें नव्हेचि हरिकीर्तन । तें मी जाळीन अकस्मात ॥ ५६ ॥
अतिथि जाय निराश । मातापितयांचा करी द्वेश ।
गुरुदर्शनीं जया आळस । जाळीन सर्व तयाचें ॥ ५७ ॥
वडील बंधु माझा धर्म । त्यासी न मानिती जे अधम ।
मी क्षोभोनि करीन भस्म । नृप तस्कर नागविती ॥ ५८ ॥
यालागीं सहदेवा अवधारीं । मी तुमचा साह्यकारी ।
असो नीलराज ते अवसरीं । भेटविला सहदेवा ॥ ५९ ॥
संपूर्ण होय राजसूय यज्ञ । ऐसें नीलें दिधलें धन ।
म्हणे राजसूययज्ञीं येईन । श्रीकृष्णचरण पहावया ॥ ६० ॥
पुढें सहदेव चालिला बळें । सागरद्वीपीं म्लेच्छमंडळें ।
पुरुषार्थें जिंकोनि सकलें । करभार घेतला ॥ ६१ ॥
फिरंगी हबसान ताम्र । मंडलें जिंकिलीं समग्र ।
निषाद राक्षस अपार । जिंकिले बळें तेधवां ॥ ६२ ॥
कर्णवसनहीन एकचरण । कालमुखे गुदहीन ।
जलचरपति तिमिंगिल जिंकून । द्रव्यरत्‍नें घेतलीं ॥ ६३ ॥
चोलमंडल द्रविडदेश । कर्नाटक त्रिगुल निःशेष ।
पत्र धाडिलें लंकेस । बिभीषणास सहदेवें ॥ ६४ ॥
बिभीषण म्हणे दिवस धन्य । भेटला सहदेवास येऊन ।
रावणभांडारींचीं रत्‍नें आणून । असंख्यात समर्पिलीं ॥ ६५ ॥
नाना वस्तूंचे संभार । जे त्रिभुवनीं दुर्लभ साचार ।
राक्षसमाथां देऊन अपार । शक्रप्रस्था पाठविले ॥ ६६ ॥
सहदेव म्हणे बिभीषणा । आपण यावें राजसूययज्ञा ।
असो तयाची घेऊन आज्ञा । शक्रप्रस्था परतला ॥ ६७ ॥
वंदोनियां धर्मनृपती । अर्पिल्या सकळ संपत्ती ।
यावरी नकुल दलाप्रती । घेऊनि चालिला पश्चिमे ॥ ६८ ॥
नकुलाचा बलप्रताप । जिंकिले पश्चिमेचे भूप ।
असो द्वारकेसमीप । नकुल बाहेर उतरला ॥ ६९ ॥
दूताहातीं सत्वर । धर्मराजमुद्रांकित पत्र ।
द्वारकेस धाडी माद्रीपुत्र । करभार देइंजे म्हणोनि ॥ ७० ॥
पत्र देखोन राजीवनेत्र । मस्तकीं वंदी जलजगात्र ।
सच्चिदानंद सर्वेश्वर । हर्षनिर्भर जाहला ॥ ७१ ॥
इंदिरावर कृपाघन । काय बोलत हांसोन ।
मी धर्माचा अंकित पूर्ण । सर्व देईन मजसहित ॥ ७२ ॥
अपार करभार द्या रे नेऊन । मीही जाईन आणिक घेऊन ।
धनरत्‍नांचे पर्वत पूर्ण । पाठविले नकुलाप्रति ॥ ७३ ॥
तो लावण्यामृतसागर । भक्तवल्लभ करुणाकर ।
नकुलास येऊन सत्वर । नगराबाहेर भेटला ॥ ७४ ॥
येतां देखोनि तमालनील । सप्रेम होऊन धांवे नकुल ।
दृढ धरिले चरणकमल । नेत्रीं जल वाहतसे ॥ ७५ ॥
श्रीकृष्णचरणक्षालन । केलें नेत्रोदकेंकरुन ।
श्रीरंगें या उचलोन । हृदयीं धरिलें आवडीं ॥ ७६ ॥
प्रेमें स्फुंदत नकुल । मी अन्यायी दास केवल ।
तूं माउली परम स्नेहाळ । अपराध पोटीं घालिसी ॥ ७७ ॥
मी अन्यायी यादवेंद्रा । पत्राचे मस्तकीं करुन मुद्रा ।
भक्तमानसचकोरचंद्रा । तुजलागीं पाठविलें ॥ ७८ ॥
महापुण्याचे पर्वत । तुजलागीं केले अपरिमित ।
आमुचा तूं ऋणाइत । अन्याय पोटीं घालिशी ॥ ७९ ॥
श्रीरंग म्हणे ते वेळे । तुम्हीं मज जिंकिलें भावबळें ।
धर्मसंस्थापनीं घेतले । अवतार म्यां युगानुयुगीं ॥ ८० ॥
असो अज्ञा घेऊन त्वरित । पुरंदरप्रस्था जात माद्रीसुत ।
दयासागर भगवंत । गुण वर्णी तयाचे ॥ ८१ ॥
खर्व अर्बुद पद्म शंख । निधींच्या निधि न करवे लेख ।
द्रव्य रत्‍नें आणून देख । धर्मराज संतोषविला ॥ ८२ ॥
जे ते देशींचीं मनुष्यें पाहीं । वेठीसी धरुनियां सर्वही ।
संपत्तिभार मस्तकीं लवलाहीं । घेऊन येती शक्रप्रस्था ॥ ८३ ॥
संपूर्ण जाहला दिग्विजय । उदय पावला प्रतापसूर्य ।
शत्रुखद्योतसमुदाय । तेजहीन दिसती ॥ ८४ ॥
ऐसे दिवस कांहीं लोटले । मग धर्मराज बंधूप्रती बोले ।
हें करभारद्रव्य आणिलें । त्याचें करावे सार्थक ॥ ८५ ॥
पडले द्रव्याचे पर्वत । सहस्त्र गजभरी वेंचिलें नित्य ।
तरी सहस्त्र वर्षेंपर्यंत । द्रव्य न सरे सर्वथा ॥ ८६ ॥
सर्वसामग्री सिद्ध जाहली । याग आरंभावा ये काळीं ।
आप्त सुहृद सोयरे सकळी । पाचारावे यज्ञातें ॥ ८७ ॥
पाचारावे ब्राह्मण समस्त । जे शापानुग्रहसमर्थ ।
वेदोनारायण साक्षात । ज्यांचे हृदयीं नांदतसे ॥ ८८ ॥
सप्तपुर्‍या तीर्थें अगाध । तेथें जे जे वसती ब्रह्मवृंद ।
जे वेदांतज्ञानी ब्रह्मानंद । निजसुखें डोलती ॥ ८९ ॥
शाण्णव कुलींचे भूपाळ । आप्त सोयरे द्रुपदादि सकळ ।
विराटादिक महानृपाळ । यज्ञालागीं पाचारा ॥ ९० ॥
द्वारकेसी आधीं पाठवावे दूत । जगद्वंद्य आमुचें कुलदैवत ।
तो स्वामी श्रीकृष्णनाथ । रुक्मिणीसहित पाचारा ॥ ९१ ॥
द्रोणाचार्य कृपाचार्य । धृतराष्ट्र भीष्मादि आर्य ।
जे केवल ज्ञानसूर्य । पाचारावें आधीं येथें ॥ ९२ ॥
दुर्योधनादिक बंधु सर्व । पाचारावे सर्व कौरव ।
विदुर महाज्ञानी कृपार्णव । आधीं येथें बोलावा ॥ ९३ ॥
ऐशी आज्ञा देतां भूपती । लक्षानुलक्ष दूत धांवती ।
धर्माची आज्ञा सर्वांस सांगती । नृप निघती वेगेंशी ॥ ९४ ॥
तों दैव उदेलें अदभुत । दूत न पाठविता अकस्मात ।
निजभाराशीं वैकुंठनाथ । नगराजवळी पातला ॥ ९५ ॥
दूत धांवत आले धर्माजवळी । सांगती समीप आले वनमाळी ।
कुजंरभेरी गर्जती निराळीं । प्रतिशब्द न समाये ॥ ९६ ॥
ऐकतां धर्मराज गहिंवरला । दूत म्यां अजून नाहीं पाठविला ।
अंतर ओळखोन धांविन्नला । स्वामी माझा मजलागीं ॥ ९७ ॥
एक प्रेम धरितां हरिपायीं । मूळाविण येतो लवलाहीं ।
माझ्या भाग्यासी अंत नाहीं । आला जांवई भीमकाचा ॥ ९८ ॥
बंधुसहित धर्मराव । नगराबाहेर घेतसे धांव ।
तों सेनेसहित इंदिराधव । पंडुपुत्रें देखिला ॥ ९९ ॥
सवें सोळा सहस्त्र कामिनी । मुख्य रुक्मिणी विश्वजननी ।
छप्पन्न कोटि यादवश्रेणी । तितुक्या तेव्हां असती संगें ॥ १०० ॥
साठ लक्ष कृष्णकुमार । कन्या स्नुषा आल्या समग्र ।
चौदा सहस्त्र भेरी प्रचंड थोर । गजपृष्ठावरी धडकती ॥ १०१ ॥
गज तुरंग पदाति रथ । अनुपम अलंकारमंडित ।
ध्वज अपार लखलखित । जेविं पुष्करीं सौदामिनी ॥ १०२ ॥
मित्राऐशीं मित्रपत्रें । चंद्रमंडलातुल्य तळपती छत्रें ।
नील आरक्तवर्ण विचित्रें । संख्येरहित दिसताती ॥ १०३ ॥
कुचें चामरें झळकती । गज महानादें किंकाटती ।
हिरे जडिले दंतोदंती । कर्णी डोलती मुक्तघोंस ॥ १०४ ॥
रत्‍नजडित पाखरा सुरेख । घंटा गर्जती अधोमुख ।
मज वाटतें ते कृष्णोपासक । हरिनामें किंकाटती ॥ १०५ ॥
अतिरथी जे उद्‌भट वीर । पाठीसी चालती कृष्णकुमार ।
महारणपंडित धनुर्धर । प्रचंड शूर हरीचे ॥ १०६ ॥
गजस्कंधीं बैसोन बंदीजन । हरिप्रताप वाखाणिती गर्जोन ।
पुढें कनकवेत्रधारी धांवोन । वाव करिती चालावया ॥ १०७ ॥
श्रीकृष्णभोंवते राजे घनदाट । आदळती मुकुटांसी मुकुट ।
ऐसा द्वारकानाथ वरिष्ठ । धर्मराजें देखिला ॥ १०८ ॥
पांचही जणांस ते काळीं । क्षेम देतसे वनमाळी ।
धर्म हरीचे अंध्रिकमळीं । मस्तक ठेवी आदरें ॥ १०९ ॥
हरि म्हणे तूं दीक्षित सहजीं । तुझी पूजा करावी आजी ।
असो धर्में श्रीरंग नगरामाजी । मंदिरासी आणिला ॥ ११० ॥
चौदा सहस्त्र मत्त वारण । आणिले अलंकार द्रव्य भरुन ।
नानारत्‍नीं वस्त्रीं पंडुनंदन । द्वारकाधीशें पूजिला ॥ १११ ॥
तों सकल देशींचे नृपवर । घेऊन पातले करभार ।
अठ्यायशीं सहस्त्र ऋषीश्वर । शिष्यांसहित पातले ॥ ११२ ॥
जे जरासंधाचे बंदीं पडिले । बावीस सहस्त्र राजे सोडविले ।
तितुकेही यज्ञ पहावया आले । संगें करभार घेऊनियां ॥ ११३ ॥
धनाच्या राशी अपार । स्वर्गाहूनि पाठवी कुबेर ।
त्रिदशांसहित सुरेश्वर । विमानारुढ पाहतसे ॥ ११४ ॥
नवग्रह सुप्रसन्न । जय लाभ उभे कर जोडून ।
श्रीरामभक्त बिभीषण । आनंदें पाहों पातला ॥ ११५ ॥
सप्त द्वीपें छप्पन्न देश । नवखंडींचे नराधीश ।
भीष्मद्रोणादिक कौरवेश । पुत्रांसहित धृतराष्ट्र ॥ ११६ ॥
जे जे आले राजेश्वर । त्यांसी धर्में जाऊनि समोर ।
बहुत करुनियां आदर । इंद्रप्रस्था आणिलें ॥ ११७ ॥
कोटी शिल्पकारीं अगोदर । चंदनसदनें निर्मिलीं विचित्र ।
सकल ऋषी राजे यांसी पवित्र । तींच सदनें दिधलीं ॥ ११८ ॥
धर्म म्हणे सहदेवातें । धौम्यपुरोहिताचे अनुमतें ।
जे जे सामग्री लागेल यज्ञातें । ते सिद्ध करीं सत्वर ॥ ११९ ॥
मग भीष्म आणि जगन्मोहन । एकासनीं बैसवून ।
कृष्णपदीं मस्तक ठेवून । धर्मराज विनवीतसे ॥ १२० ॥
जें जें मनीं इच्छिलें । तें तें रमाधवें पुरविलें ।
सकल राजे भृत्य जाहले । द्रव्य सांचलें असंभाव्य ॥ १२१ ॥
तरी येथें कार्यें वांटिल्याविण । सिद्धि न पावे कदा यज्ञ ।
कोणा योग्य कोण कारण । तूं नारायण जाणसी ॥ १२२ ॥
आम्ही नेणतीं लेंकुरें श्रीरंगा । आम्हांस एक कार्य सांगा ।
कंसांतका भक्तभवभंगा । आज्ञा करीं सत्वर ॥ १२३ ॥
मग बोले श्रीकरधर । मी चतुर नव्हे नृपवर ।
मी नंदाचा गोरक्षक साचार । मज हा विचार समजेना ॥ १२४ ॥
यावरी अर्जुनाचा सारथि होय । हें तों जाणे भुवनत्रय ।
धर्में धरिले दृढ पाय । तरी मी काय करुं आतां ॥ १२५ ॥
हरि म्हणे मी इतुकें करीन । द्विजांचीं चरणांबुजें क्षालीन ।
उच्छिष्टपात्रें काढीन । इतुकें कारण मज देईं ॥ १२६ ॥
ऋषींस लागतील जे उपचार । ते विदुरें द्यावे समग्र ।
राजपूजेसी चतुर । संजय शिष्य व्यासाचा ॥ १२७ ॥
द्रव्य लागेल जें अपार । तें तें पुरवावें समग्र ।
द्रोणाचे आज्ञें द्रोणपुत्र । अश्वत्थामा करील हें ॥ १२८ ॥
अपार आल्या राजपृतना । त्यांसी भक्ष्यभोज्याची विचारणा ।
हें कार्य सांगावें दुःशासना । अवश्य म्हणे धर्मराव ॥ १२९ ॥
ब्राह्मणांस दक्षिणा सहज । देईल कृपाचार्य महाराज ।
जो प्रतापसूर्य तेजःपुंज । वेदज्ञ आणि रणपंडित ॥ १३० ॥
राजे आणिती बहु धनें । तें दृष्टीं पाहोनि दुर्योधनें ।
मग भांडारीं ठेविजे यत्‍नें । अवश्य म्हणे पंडुपुत्र ॥ १३१ ॥
यज्ञास येतील महाविघ्नें । तितुकीं निवारावीं अर्जुनें ।
ब्राह्मणांची प्रार्थना भीमसेनें । भोजनसमयीं करावी ॥ १३२ ॥
सुमनमाला गंधाक्षता । धूप दीप परिमलद्रव्य तत्वतां ।
हीं अर्पावीं समस्तां । नकुलासी हें सांगिजे ॥ १३३ ॥
घृतमध्वादिक पंचामृतें । हीं सहदेवें वाढिजे एकचित्तें ।
न्यून पूर्ण होईल तेथें । गंगात्मजें विलोकावें ॥ १३४ ॥
विप्रराजांच्या बैसती पंक्ती । त्यांस वाढील द्रौपदी सती ।
जे अन्नपूर्णा केवल भगवती । करील तृप्ति समस्तां ॥ १३५ ॥
प्रतिविंध्यादि जे राजकुमार । अत्यंत सुगंध करुन नीर ।
भोजन करितां वारंवार । पुरविजे शीघ्र तयांनीं ॥ १३६ ॥
त्रयोदशगुणी विडे विचित्र । एक तांबूल सहस्त्रपत्र ।
हा धृष्टद्युम्ना सांगावा विचार । धर्मराज अवश्य म्हणे ॥ १३७ ॥
धर्मराया तूं यजमान । भोंवती घेऊनि दिव्य ब्राह्मण ।
यथासांग करीं यज्ञ । जेणें त्रिभुवन धन्य म्हणे ॥ १३८ ॥
ऋत्विज नेमिले चौघे जण । त्यांत कमलोद्‌भव मुख्य पूर्ण ।
दुजा सत्यवतीहृदयरत्‍न । वेदज्ञ केवल सूर्य जो ॥ १३९ ॥
तिजा ब्रह्मनंदन वसिष्ठ । चौथा याज्ञवल्क्य अतिवरिष्ठ ।
हे चौघे ऋत्विज स्पष्ट । धर्मराया योजीं कीं ॥ १४० ॥
राजा आणि भणंग दीन । सर्वांस अन्न समसमान ।
हें मुख्य प्रभूचें लक्षण । यज्ञ पूर्ण होय तेणें ॥ १४१ ॥
ऐशी आज्ञा देऊनि सकळां । मग यज्ञासी आरंभ केला ।
दीक्षाग्रहणीं धर्म बैसला । विप्रासहित मखाजवळी ॥ १४२ ॥
एक संवत्सरपर्यंत । वसुधारा अखंड चालत ।
जातवेद जाहला तृप्त । न्यून पदार्थ एकही नसे ॥ १४३ ॥
विभाग पावोनि समस्त । जयजयकारें देव गर्जत ।
असंभाव्य पुष्पवृष्टि होत । शक्रप्रस्थावरी तेधवां ॥ १४४ ॥
ऋषी राजे थोर लहान । रत्‍नताटीं करिती भोजन ।
षड्रसान्नें जेविती पूर्ण । जीं दुर्लभ सुरांतें ॥ १४५ ॥
तों विप्रांस प्रार्थी भीमसेन । बोले परम कठिण वचन ।
म्हणे टाकाल जरी अन्न । तरी मी बांधीन शेंडीसी ॥ १४६ ॥
उदरापुरतेंच मागोन घ्यावें । पात्रीं सांडितां बरवें नव्हे ।
म्हणे माझे स्वभाव ठावे । तुम्हांस आहेत सर्वही ॥ १४७ ॥
भीमाच्या धाकेंकरुन । ब्राह्मण जेविती किंचित अन्न ।
विप्र गेले शुष्क होऊन । ते जगज्जीवने जाणीतलें ॥ १४८ ॥
भीमास म्हणे जगन्मोहन । गंधमादनऋषि परम निपुण ।
त्यांस सत्वर आणीं बोलावून । अगत्य कारण असे त्याचें ॥ १४९ ॥
भीमाचे ठायीं अभिमान । मी एक बळें आगळा पूर्ण ।
वृकोदर जात वेगेंकरुन । गंधमादन आणावया ॥ १५० ॥
तों वाटेस एका पर्वतांत । वृद्धवेष धरुन बहुत ।
बैसला होता हनुमंत । पुच्छ आडवें टाकूनि ॥ १५१ ॥
त्यासी भीम बोले प्रौढी । वानरा वाटेचें पुच्छ काढीं ।
मज जाणे आहे तांतडी । ऋषिदर्शनाकारणें ॥ १५२ ॥
तों हनुमंत बोले नम्रवचन । भीमा मज आलें वृद्धपण ।
हे पुच्छ जड जाहले पूर्ण । आता माझ्याने उचलेना ॥ १५३ ॥
तरी तूं बळिया भीमसेन । एकीकडे ठेवीं उचलोन ।
अवश्य म्हणे कुंतीनंदन । पुच्छ उचलून पाहतसे ॥ १५४ ॥
नवसहस्त्र वारणांचें बळ । तें भीमसेनें वेंचिलें सकळ ।
तों पुच्छ न ढळे अढळ । जैसा अचल पडियेला ॥ १५५ ॥
हतबल जाहला भीमसेन । गदगदां हांसे वायुनंदन ।
म्हणे धर्मानुजा गर्व सांडून । कृष्णभजनीं राहीं तूं ॥ १५६ ॥
मग भीमें स्तवूनि हनुमंता । म्हणे तूं आवडसी रघुनाथा ।
आणि दशास्यबलहंता । सीताशोकहर्ता तूंचि पैं ॥ १५७ ॥
निरभिमान भीमास देखिलें । मग पुच्छ हनुमंतें काढिलें ।
गंधमादनपर्वतास ते वेळे । धर्मानुज पातला ॥ १५८ ॥
दृष्टीं देखिला गंधमादन । अंग जैसें दिव्य सुवर्ण ।
परी तया सूकराचें वदन । दुर्गंधि पूर्ण येतसे ॥ १५९ ॥
भीमे केला नमस्कार । उभा राहिला जोडूनि कर ।
म्हणे तुम्हांस पाचारी यादवेश्वर । याग होतसे धर्मसदनीं ॥ १६० ॥
मग बोले गंधमादन । हें परम दुर्गंधि सूकरवदन ।
मी तेथें नयेंचि घेऊन । उपहासिती सर्वही ॥ १६१ ॥
भीम म्हणे महाऋषी । तुझी कांति सुवर्णाऐशी ।
ऐसे तुज मुख व्हावयासी । काय कारण सांग पां ॥ १६२ ॥
येरु म्हणे ऐकें सावधान । पूर्वीं मी होतों बहु सधन ।
सर्व दानें केलीं पूर्ण । यथाविधिकरुनियां ॥ १६३ ॥
परि ब्राह्मणांचा जाय प्राण । ऐसें बोलिलों कठिण वचन ।
यालगीं ऐसें जाहलें वदन । पंडुनंदना जाण पां ॥ १६४ ॥
भीमा तूं तरी सावधान । नको बोलूं कठोर वचन ।
मनांत दचकला भीमसेन । आला परतोन इंद्रप्रस्था ॥ १६५ ॥
मग विप्रांसी म्हणे तेव्हां । स्वामी सावकाश जी जेवा ।
न रुचे त्याचा त्याग करावा । प्रसाद ठेवावा निजपात्रीं ॥ १६६ ॥
विप्र म्हणती नवल जाहलें । यासी हे गुण कोणें लाविले ।
प्रार्थना करितां नम्र बोले । आमचें फळलें भाग्य वाटे ॥ १६७ ॥
असो धर्माची संपदा बहुत । देखतां दुर्योधन संतापत ।
म्हणे याचा साह्यकारी कृष्णनाथ । त्याचेनि समस्त पूर्ण होय ॥ १६८ ॥
श्रीकृष्णास म्हणे दुर्योधन । तुझें पांडवांवरी बहु मन ।
तूं एवढा देव होऊन । समता नसे तुझे ठायीं ॥ १६९ ॥
पांडवांशीं धरिसी प्रीति । तैसी आम्हांकडे नाहीं रीती ।
तुझे ठायीं द्वैत श्रीपति । नवल मज वाटतें ॥ १७० ॥
हरि म्हणे दुर्योधना । मी समसमान अवघ्या जणां ।
एकास अधिक एकासी उणा । सर्वथा नाही विचारीं ॥ १७१ ॥
दरिद्री राजा हो कां रंक । सर्वांसी समान जैसा अर्क ।
किंवा गंगेचें उदक । सर्वांसही सम जैसें ॥ १७२ ॥
कीं सर्वां घटीं समान अंबर । कीं सर्वांसी समान जैसा समीर ।
कीं गगनीं उगवतां रोहिणीवर । शीतल जैसा सर्वांतें ॥ १७३ ॥
तैसा मी दुर्योधना असें जाण । परि जे कां कुटिल जन ।
ते समत्व विषमत्व संपूर्ण । माझ्या ठायीं भाविती ॥ १७४ ॥
जे भक्त धरिती अत्यादर । त्यांस जवळ वाटे मी यादवेंद्र ।
मी समीप असोनि साचार । अभक्त दूरी भाविती ॥ १७५ ॥
त्याची दावावया प्रचीती । दुर्योधनास म्हणे यदुमती ।
एक कारण असे निश्चिती । तें तूं ऐक सुयोधना ॥ १७६ ॥
इतुके हे बैसले ब्राह्मण । त्यांत एक सत्पात्र निवडून ।
लौकर आणीं उत्तम दान । देणें असे तयासी ॥ १७७ ॥
दुर्योधन चालिला पहावया । मग बोलाविलें धर्मराया ।
म्हणे एक द्विज नष्ट पाहूनियां । वेगें आणीं आतांचि ॥ १७८ ॥
धर्म जों पाहे ब्राह्मण । तों केवळ दिसती सूर्यनारायण ।
महातपस्वी पुण्यपरायण । नष्ट एकही दिसेना ॥ १७९ ॥
परतोनि आला हरीपाशीं । म्हणे आवघे आहेत पुण्यराशी ।
अपित्र गुण एकासी । न दिसे कोठें सर्वथा ॥ १८० ॥
इकडे दुर्योधन शोधित शोधित । अवघें ऋषिमंडळ पहात ।
एकही धड नाहीं त्यांत । दूषणे बहुत दिसती तया ॥ १८१ ॥
हरीजवळी आला सत्वर । म्हणे अवघेचि अपवित्र ।
एकही न दिसे सत्पात्र । दोष सर्वत्र असती ॥ १८२ ॥
दुर्योधनास म्हणे जगज्जीवन । तुझें हृदय कपटी मलिन ।
सदोषिया निर्दोष जाण । त्रिभुवनींही दिसेना ॥ १८३ ॥
दुरात्मा जो दुर्बुद्धि खळ । त्यासी अवघे दिसती अमंगळ ।
दृष्टीं कोणी न दिसे निर्मळ । पापें समूळ वेष्टिला ॥ १८४ ॥
वेश्येचिया नयनीं । सकळ स्त्रिया दिसती जारिणी ।
तैसा दुरात्मा तूं पापखाणी । मलिन मनीं सर्वथा ॥ १८५ ॥
धर्मास अवघे दिसती पुण्यवंत । तेच तुज दोषी भासत ।
दुर्योधन न बोले तटस्थ । जो उन्मत्त विषयांध ॥ १८६ ॥
असो एक वर्षपर्यंत । राजसूययज्ञीं उत्साह होत ।
तों नवल एक वर्तलें तेथ । श्रोते सावचित्त ऐकोत पां ॥ १८७ ॥
जाह्नवीचे तीरीं जाण । कोणी एक तपस्वी ब्राह्मण ।
अरण्यामाजी गुंफा बांधोन । स्त्रियेसहित राहतसे ॥ १८८ ॥
परम तेजस्वी ब्राह्मण । सदा करी शिवोपासन ।
नित्य कैलासाहूनि विमान । संध्यासमयीं येतसे ॥ १८९ ॥
तये विमानीं बैसोन दोघें । कैलासासी जाती सवेगें ।
शिवार्चन करुनि निजांगें । येती परतोनि आश्रमासी ॥ १९० ॥
ऐसें असतां एके काळीं । दोघे हिंडती वनस्थलीं ।
विमान यावयाची वेळ जाहली । पुष्पें तोडिती सवेग ॥ १९१ ॥
तों तेथें एकांतवन देखोन । कामातुर जाहला ब्राह्मण ।
स्त्रियेसी म्हणे भोगदान । देईं मज येथेंचि ॥ १९२ ॥
तंव ती म्हणे भ्रतरासी । चंडाशुं आला मध्याह्नासी ।
पुढें जाणें असे शिवपूजेसी । ही गोष्ट मानसीं धरुं नका ॥ १९३ ॥
तुम्ही सर्वशास्त्रीं निपुण । बरवें पहा विचारुन ।
तंव तो कामे व्यापिला पूर्ण । घूर्णित नयन जाहले ॥ १९४ ॥
अंतर भरले अनंगें । पंथ सोडून जाय आडमार्गें ।
तों कालसर्प डंखिला वेगें । प्राण गेले तत्काल ॥ १९५ ॥
अचेतन पडलें प्रेत । जवळ आली स्त्री धांवत ।
अट्टहासें शोक करित । तों नारद तेथें पातला ॥ १९६ ॥
नारद पुसे काय जाहलें । तिणें जाहलें ते सर्व कथिलें ।
नारद म्हणे हें काय केलें । कां वचन मोडिलें भ्रतराचे ॥ १९७ ॥
तंव ते म्हणे नारदमुनी । कांहीं उपाय सांगा ये क्षणीं ।
येरु म्हणे शक्रप्रस्था घेऊनी । प्रेत जाईं सवेग ॥ १९८ ॥
यज्ञापाशीं टाकीं प्रेत । तेथें मिळाले श्रेष्ठ समस्त ।
मी तुज दावितों शक्रप्रस्थ । उचलीं कुणप वेगेंशीं ॥ १९९ ॥
पुढें चाले नारदमुनी । मागें ते येई प्रेत घेऊनी ।
यज्ञमंडपांत आणूनी । अकस्मात टाकिलें ॥ २०० ॥
म्हणे सर्पदंशें मेला भ्रतार । कोणीं उठवावा सत्वर ।
तरीच मखफल होय साचार । देखोनि युधिष्ठिर घाबरला ॥ २०१ ॥
म्हणे यज्ञास विघ्न ओढवलें । जैसा दुग्धामाजी सैंधव पडलें ।
स्वाहाकार खोळंबले । हस्त आखुडिले ब्राह्मणीं ॥ २०२ ॥
धर्म जाहला दीनवदन । समस्तांस विनवी कर जोडून ।
कोणी तरी तपस्तेज वेंचून । उठवा शीघ्र कुपण हें ॥ २०३ ॥
तटस्थ पाहती सभाजन । कोणी न बोले कांहीं वचन ।
धर्में उदकें भरुनि नयन । जगद्वंद्याकडे पाहिलें ॥ २०४ ॥
म्हणे कैवारिया भक्तवत्सला । शेवटी हा अनर्थ ओढवला ।
जैसे विदेशाहूनि ग्रामास आला । वेशींत नागविला तस्करीं ॥ २०५ ॥
हातास लागावें जों निधान । तों तेथें विवशी पडे येऊन ।
म्हणे मायबाप तूं जगज्जीवन । तुझा यज्ञ सांभाळीं ॥ २०६ ॥
मी किंकर तुझा दीन । तूं सांभाळीं आपुला यज्ञ ।
मी यज्ञकर्ता म्हणवीन । तरी जिव्हा हे झडोन पडो ॥ २०७ ॥
ऐकोनि धर्माचें वचन । गहिंवरले अवघे भक्तजन ।
जे शिशुपालादिक दुर्जन । हर्ष पूर्ण मनीं त्यांच्या ॥ २०८ ॥
खुणाविती एकास एक । बरें म्हणती जाहलें कौतुक ।
चांडाल दुरात्मे देख । उणें पाहती भक्तांचे ॥ २०९ ॥
परि धर्माचा पाठिराखा थोर । वैकुंठपुरींचा सुकुमार ।
तो उणें पडों नेदी अणुमात्र । कमलनेत्र कमलापति ॥ २१० ॥
मेघगंभीर गिरा गर्जोन । बोले रुक्मिणीप्राणजीवन ।
मन्मथजनक जनार्दन । पांडवजनरक्षक जो ॥ २११ ॥
म्हणे वेंचावें कांहीं निजतप । तरी उठेल हें कुणप ।
यावरी विरिंचीचा बाप । काय करिता जाहला ॥ २१२ ॥
जो पीतवसन श्रीकरधर । सुरंग रुळे उत्तरीयवस्त्र ।
मंदहास्य वारिजनेत्र । प्रेताजवळी आला तो ॥ २१३ ॥
हातीं घेतली रत्‍नजडित झारी । सव्यकरें ओती पुण्यवारी ।
कृष्णद्वेषी जे पापकारी । हांसों लागले गदगदां ॥ २१४ ॥
शिशुपालादि कौरव दुर्जन । म्हणती हा काय आचरला पुण्य ।
कोणतें तप केलें निर्वाण । जन्मादारभ्य आजिवरी ॥ २१५ ॥
महाकपटी चोर जार । गोवळ्यांचें उच्छिष्ट खाणार ।
एक म्हणती धरा धीर । कौतुक पहा उगेचि ॥ २१६ ॥
तों काय बोले मधुकैटभारी । मी आजन्मपर्यंत असेन ब्रह्मचारी ।
तों अवघे हांसती दुराचारी । हस्तासी हस्त मेळवूनि ॥ २१७ ॥
ब्रह्मचर्यसंकल्प करुन । ब्राह्मणाचे मुखीं जीवन ।
जगज्जीवनें घालितांचि खडबडून । उठला विप्र ते वेळे ॥ २१८ ॥
जाहला एकचि जयजयकार । देव वर्षती सुमनसंभार ।
प्रेमें दाटला युधिष्ठिर । भक्त अपार स्तविती तेव्हां ॥ २१९ ॥
खळ दुर्जन ते वेळीं । अधोवदन पाहती सकळी ।
आनंदली भक्तमंडळी । पिटिली टाळी सकळिकीं ॥ २२० ॥
असो उठविला जो ब्राह्मण । त्याचें धर्में केलें पूजन ।
स्त्रियेसहित गौरवून । वस्त्रें भूषणें अर्पिलीं ॥ २२१ ॥
तों यज्ञामधून एक जंबूक । अकस्मात निघाला एकाएक ।
कुंडवेदिकेवरी बैसोन देख । पुढील भविष्य वाखाणी ॥ २२२ ॥
गर्जोनि बोले जंबुक शब्द । एथें एकाचा होईल शिरच्छेद ।
पुढें दिसतो मोठा विरोध । कलह अगाध माजेल ॥ २२३ ॥
एथोनि तेरा वर्षें अवधारा । निवैंर होईल वसुंधरा ।
जितके नृप आले धर्ममंदिरा । तितुके आटतील ॥ २२४ ॥
ऐसें तो जंबुक बोलिला । तेथेंचि मग आदृश्य जाहला ।
असो पुढें स्वाहाकार चालला । ब्राह्मणहस्तेंकरुनियां ॥ २२५ ॥
हें जैमिनीभारतींचें मत । श्रोतीं पहावें असे यथार्थ ।
श्रीकृष्णें उठविलें प्रेत । हेंहि कथानक तेथींचें ॥ २२६ ॥
कथा हे गोड ऐकिली । म्हणोनि ती एथें योजिली ।
शिशुपालाचें शिर वनमाळी । छेदील परिसा आतां ॥ २२७ ॥
पुढले अध्यायीं सुरस । द्रौपदी वाढील समस्तांस ।
तेथें एक कौतुक विशेष । जगज्जीवन दाखवील ॥ २२८ ॥
पांडवप्रताप करितां श्रवण । सर्वदा विजयी होईल पूर्ण ।
एकदा ग्रंथास करितां आवर्तन । सकल मनोरथ पुरती ॥ २२९ ॥
संपत्ति विद्या पुत्र धन । कामिक पावती करितां श्रवण ।
हें श्रीविठ्ठलें वरदान । पंडहरीसी दिधलें ॥ २३० ॥
पंढरीनगरींच यथार्थ । प्रकटला पांडवप्रताप ग्रंथ ।
श्रवणें सकल संकटें वारित । सत्य सत्य श्रोते हो ॥ २३१ ॥
श्रीधरवरदा अभंगा । रुक्मिणीवल्लभा पांडुरंगा ।
पांडवरक्षका भक्तभवभंगा । अव्यया निःसंगा सुखाब्धे ॥ २३२ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । सभापर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । सप्तदशाध्यायी कथियेला ॥ २३३ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । सभापर्वटीका श्रीधरकृत ।
भीमगर्वमोचन उठविलें प्रेत । जंबुकें भविष्य कथियेलें ॥ २३४ ॥
॥ इति श्रीधरकृतपांडवप्रतापेसभापर्वणि सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
अध्याय सतरावा समाप्तGO TOP