श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय पंधरावा


मयसभेची रचना


॥ श्रीगणेशायनमः ॥
जय जय जगद्‌गुरो ब्रह्मानंदा । पांडुरंगा पुंडलीकवरदा ।
विद्वज्जनहृत्पद्ममिलिंदा । आनंदकंदा जगत्पते ॥ १ ॥
निकटभिमातटविहारा । आदिपुरुषा दिगंबरा ।
सनकसनंदनचित्तपंकजकीरा । निर्विकारा निर्द्वंद्वा ॥ २ ॥
आनंदकंदा अध्वरपालका । अनंतवेषा आर्तिनाशका ।
अनादिसिद्धा सुखदायका । खगवरकेतना हृषीकेशा ॥ ३ ॥
मन्मथजनका मनोहरा । सौख्यसिंधो नीलगात्रा ।
सुहास्यवदना शतपत्रनेत्रा । विचित्रलीला दावीं तूं ॥ ४ ॥
गोपीमानसराजहंसा । स्वानंदक्षीरसागरविलासा ।
पूतनाप्राणशोषका अविनाशा । वर्णिता शेषा अगम्य ॥ ५ ॥
कंसचाणूरप्राणहरणा । मंदरोद्धारका गोवर्धनोद्धारणा ।
कर्ममोचका कालियमर्दना । पांडवपालका पंढरीशा ॥ ६ ॥
दशावतारचरित्रचालका । योगिमानसाह्रादकारका ।
तुझी लीला विश्वव्यापका । बोलवीं कथा येथूनि ॥ ७ ॥
पांडवप्रताप ग्रंथ सुरस । सभापर्व बोलिला व्यास ।
सुत्रधार तूं हृषीकेश । कथा सुरस चालवीं ॥ ८ ॥
मागें संपलें आदिपर्व । पुढें सभापर्व अति अपूर्व ।
चातुर्याचा अभिनव । जलार्णव भरला हा ॥ ९ ॥
नवरसांचें भांडार । रणशूर आणि नृपवर ।
त्यांत वीररस अपार । असंभाव्य येथें असे ॥ १० ॥
जे पंडित वेदविदुष । त्यांस वेदींचाच सारांश ।
समाधिसुख परमहंस । श्रवणें भोगिती येथेंचि ॥ ११ ॥
भक्तांस दाटे प्रेमरस । विलासियांसी श्रृंगार सुरस ।
युक्तिवंतांसी बुद्धि विशेष । येथें प्रकटे श्रवणेंचि ॥ १२ ॥
भक्त मुमुक्षु साधक संत । यांसी विश्रांति येथें अद्‍भुत ।
एवं नवही रस समस्त । विराजती येथेंचि ॥ १३ ॥
व्यासभारत सुवर्ण सुंदर । त्याचे प्राकृत हे अलंकार ।
लेवोत पंडित चतुर । निर्मत्सर हृदय ज्यांचें ॥ १४ ॥
अक्षरप्रबंधसुधारस । कर्ता स्वामी वेदव्यास ।
लिहिणार जेथें गणेश । अतिविशेष रसज्ञ हा ॥ १५ ॥
त्यांतील सारांश साचार । वटबीजवत अणुमात्र ।
ब्रह्मानंदें श्रीधर । कथासार वर्णीतसे ॥ १६ ॥
भारतरत्‍नांचा पर्वत । भाग्यें देखिला परमाद्‍भुत ।
नुचलवेचि समस्त । पाहें तटस्थ उगाचि ॥ १७ ॥
मग त्यांतील रत्‍नें वरिष्ठ । उचले ऐसी बांधिली मोट ।
ग्रंथ वाढवितां अचाट । घेतील वीट पंडित पैं ॥ १८ ॥
संकोचित बोलतां साचार । हेंही न मानिती चतुर ।
अर्थरसकथासार । साहित्यरसें बोलावें ॥ १९ ॥
शौनकादिऋषिपंक्ती । नैमिषारण्यीं एकांतीं ।
सूतमुखें श्रवण करिती । ब्रह्मानंदें सर्वदा ॥ २० ॥
तेंचि जनमेजय करी श्रवण । वक्ता निपुण वैशंपायन ।
म्हणे नृपते सावधान । उघडीं कान सर्वांगाचे ॥ २१ ॥
आदिपर्व संपतां पूर्ण । संगितलें खांडववनदहन ।
मयदैत्यास प्राणदान । देऊनि सोडिला कृष्णपार्थीं ॥ २२ ॥
तेणें उपकारें दाटोन । प्रीतीनें स्तविले कृष्णार्जुन ।
म्हणे मी आहें विद्याप्रवीण । होईन उत्तीर्ण कांहींएक ॥ २३ ॥
तों मयास म्हणे फाल्गुन । कृष्णार्जुनीं केलें प्राणदान ।
हें सर्वांपाशीं करिशी वर्णन । तृप्त इतुकेन आम्ही असों ॥ २४ ॥
तरी सखया जाईं निजमंदिरा । सुख देईं निजदारापुत्रां ।
स्नेह वाढवीं पवित्रा । क्षणाक्षणां भेटोनि ॥ २५ ॥
उपभोगें काम वाढत । वनवा वाढे लागतां वात ।
शुक्लपक्षीं रोहिणीकांत । कला वाढत ज्यापरी ॥ २६ ॥
धरितां शुचित्व नेम अमूप । विशेष वाढे जैसें तप ।
सत्समागमें वाढे रोप । दयेचें जैसें सर्वदा ॥ २७ ॥
पुण्य वाढे करितां दान । पराक्रमें वाढे प्रताप पूर्ण ।
अत्यादर धरितां अनुदिन । मैत्री वाढे अपार ॥ २८ ॥
तरी मयासुरा तूं पूर्णमित्र । करुं भाविसी उपकार ।
तरी जें सांगेल इंदिरावर । तेंचि सिद्धी पाववीं ॥ २९ ॥
मग बोले जगन्मोहन । तूं शिल्पशास्त्रीं परम प्रवीण ।
तरी सभा एक निर्मून । करीं अर्पण धर्मातें ॥ ३० ॥
ऐसें बोलतां जगदीश्वर । मयें केला नमस्कार ।
म्हणे माझे मनींचा आदर । जाणूनि आज्ञा दिधली ॥ ३१ ॥
जगन्निवासा पुरुषोत्तमा । दैत्यांमाजी मी विश्वकर्मा ।
सभा रचीन जिची सीमा । त्रिभुवनांत असेना ॥ ३२ ॥
न लावितां मृत्तिकापाषाण । मणिमय रचीन सभासदन ।
शचीवराचेंही भुले मन । कीं स्वर्ग टाकून वसावें येथें ॥ ३३ ॥
ऐसी रचीन दिव्यसभा । त्रिभुवनींची आणीन शोभा ।
इतुकी सामग्री पद्मनाभा । कोठून आणीन ऐका तें ॥ ३४ ॥
पूर्वीं क्षोभोनि रमाधव । निर्मूल करितां दैत्य सर्व ।
वृषपर्वा दानवराव । तेणें संपत्ति लपविल्या ॥ ३५ ॥
मेरुचे उत्तरेस अपार । भरलें आहे बिंदुसरोवर ।
पर्वत जेथें मैनाक थोर । रत्‍नांचा पार नाहीं तेथें ॥ ३६ ॥
यक्षराक्षस घेऊन सांगातें । क्षणांत सामग्री आणीन येथें ।
वाहतां वर्षें शतानुशतें । सामग्री ते सरेना ॥ ३७ ॥
जेथें जांबुनदाचे तुळवट । हिरियांचे खांब सदट ।
आणीक वस्तु तेथें वरिष्ठ । दोन असती आणीन त्या ॥ ३८ ॥
चूर्ण होती गिरि सकळ । ऐसी गदा तेथें आहे सबळ ।
जे कनकोदकें रेखिली विशाळ । वरती दिव्य रत्‍नबिंदु ॥ ३९ ॥
मुष्टिमाजी धरितेठायीं । अनर्घ्य रत्‍नें जडलीं पाहीं ।
ते भीमास देईन सर्वही । शत्रुदलें निवटावया ॥ ४० ॥
शंख एक देवदत्त । ज्याच्या नादें शत्रु समस्त ।
ऐकतां होती भयभीत । दुमदुमतें त्रिभुवन ॥ ४१ ॥
तो दिव्य शंख आणून । पार्थाप्रति देईन ।
त्यावरी मय आज्ञा घेऊन । गेला बिंदुसरोवर ॥ ४२ ॥
मग समस्तांप्रति पुसोन । द्वारकेसी चालला जगज्जीवन ।
दिव्य स्यंदनावरी बैसोन । दारुकसारथि विराजे ॥ ४३ ॥
असो इकडे मयासुर । वेगें पातला बिंदुसरोवर ।
जेथें रत्‍नांचे पर्वत अपार । सुवर्णाचल तैसेचि ॥ ४४ ॥
जेथें कल्पवृक्षांचें वन । धनरत्‍नराशी पडल्या पूर्ण ।
ऋषींनीं दक्षिणा नेतां उबगोन । ठायीं ठायीं टाकिल्या ॥ ४५ ॥
इंदिरेसहित श्रीधर । तप तेथें आचरला थोर ।
दिव्य सहस्त्रवर्षें दीर्घसत्र । हरीनें केलें ते ठायीं ॥ ४६ ॥
भगीरथ तेथें आचरला तप । चतुराननें तेथें अमूप ।
याग केले सुखरुप । इंद्रादिकीं समस्तीं ॥ ४७ ॥
जेथें तप याग विशेष । स्वयें करी व्योमकेश ।
दक्षिणा दिली ते निःशेष । लेखा शेषा न करवे ॥ ४८ ॥
तेथींची सामग्री घेऊन अपार । आठ लक्ष यक्षनिशाचर ।
त्याचें शिरीं देऊनि समग्र । शकप्रस्थास आणित ॥ ४९ ॥
भीमास गदा दिधली देख । पार्थासी अर्पिला शंख ।
मग मुहूर्त पाहोनि सुरेख । सभामंडप आरंभिला ॥ ५० ॥
आठ लक्ष बली राक्षस । सामग्री देती विशेष ।
दहा सहस्त्र हस्त चौरस । सभामंडप रचियेला ॥ ५१ ॥
मनीं कल्पिले तैसे तुळवट । नवरत्‍नांचे खांब सदट ।
स्वयंभू जाण अवाट । हिरियांचे आणियेले ॥ ५२ ॥
मयासुर पांडवाचां मित्र । जो दैत्यांमाजी विधीचा अवतार ।
तेणें ते सभा रचिली सुंदर । जे अनुपम त्रिभुवनीं ॥ ५३ ॥
सभा अत्यंत वर्णिली येथ । म्हणोनि सभापर्व म्हणती पंडित ।
तेथींची रचना अद्‍भुत । न भुतो न भविष्यति ॥ ५४ ॥
सभा रचिली तये वेळीं । आठही आय साधिले तळीं ।
अष्टदिक्पाल महाबळी । पायाचे मूळीं स्थापिले ॥ ५५ ॥
विद्रुमशिला आरक्तवर्ण । तेणें पाया आणिला भरुन ।
स्फटिकशिला शुभवर्ण । त्यांचीं पोंवळीं लखलखित ॥ ५६ ॥
सप्तरंगी पाषाण । चक्रें झळ्कती आंतून ।
अंतर्बाह्य देदीप्यमान । पाहतां जन विस्मित ॥ ५७ ॥
शेषफणांच्या आकृती । चर्या जडित झळकती ।
जेंवि उगवले गभस्ती । बैसले पंक्तीं एकदा ॥ ५८ ॥
इंद्रनीलाचे वारण । हिर्‍यांचे द्विज सतेज पूर्ण ।
ते खालते जडून । वरी मंडप रचियेला ॥ ५९ ॥
तळीं पद्मरागाचे तोळंबे सबळ । वरी हिरियांचे खांब विशाळ ।
निळ्यांचीं उथाळीं सुढाळ । तेजाचे कल्लोळ दिसताती ॥ ६० ॥
सुवर्णाचे तुळवट अखंड । माणिकांचे दांडे प्रचंड ।
गरुडपाचूंच्या किलचा उदंड । अभेदपणें जडियेल्या ॥ ६१ ॥
पेरोजांचे उंबरे तळवटीं । पुष्कराजांच्या वरी चौकटी ।
गजास्य जडिले मध्यपीठीं । आरक्तवर्ण माणिकांचे ॥ ६२ ॥
घोटींव जे मर्गजपाषाण । तेणें साधिलें मंडपांगण ।
वरी कनकवर्ण वृक्ष रेखून । तटस्थ नयन पाहतां ॥ ६३ ॥
हिर्‍यांच्या मजलसा विशाळ । त्यावरी मोतियांचे मराळ ।
वदनीं विद्रुम तेजाळ । अतिचपळ दिसताती ॥ ६४ ॥
नीलरत्‍नांचें शिखर साजिरें । गरुडपाचूंचे कीर बरे ।
रत्‍नमणियांचीं सुंदरें । जांबुळें मुखीं आकर्षिलीं ॥ ६५ ॥
धन्य मयासुराची करणी । शुक्र पाचूचे बोलती क्षणोक्षणीं ।
मयूर नाचती आनंदूनी । पुतळ्या क्षणोक्षणीं खेळताती ॥ ६६ ॥
प्रत्यक्ष रत्‍नपुतळे बोलती । सभेसी आल्या बैसा म्हणती ।
कितीक पुतळे आनंदें गाती । पुरे म्हणतां होती तटस्थ ॥ ६७ ॥
नवल कर्त्याची करणी । पुढें सेवक वेत्रपाणी ।
धांवा म्हणतां सभाजनीं । चपलचरणी धांवती ॥ ६८ ॥
मेष कुंजर एकसरी । आज्ञा होतां घेती झुंझारी ।
टाळ मृदंग वाजविती कुसरीं । रागोद्धार करिती पैं ॥ ६९ ॥
घटिका भरतां दिवस । एक पुतळे वाजविती तास ।
देवांगनांचीं रुपें विशेष । नृत्य करिती सांगतां ॥ ७० ॥
हिरियांचें स्तंभांतरीं । नृसिंहमूर्ति गर्जती हुंकारीं ।
कौस्तुभमणि झळकती एकसरीं । स्तंभाप्रति जडियेले ॥ ७१ ॥
कोठें जडिले स्यमंतकमणी । कीं एकदाच उगवले तरणी ।
दिवस किंवा यामिनी । तये स्थानीं न कळे कोणा ॥ ७२ ॥
एकावरी एक शतखण । मंगलतुरें अनुदिन ।
लेपें वाजविती नवल विंदान । कर्तयानें दाविलें ॥ ७३ ॥
चपला तळपती एकसरीं । तैशा पताका झळकती अंबरीं ।
कळस जडित नानापरी । हिणविती भगणांतें ॥ ७४ ॥
गरुडपाचूच्या ज्योती । चित्रशाळे विचित्र दिसती ।
गोलांगुलें झोळकंबे घेती । जीव नसतां चपलत्वें ॥ ७५ ॥
चतुर्दश भुवनें नृपांसहित । भिंतींवरी पुतळे रत्‍नजडित ।
ज्यांची जैशी आकृति सत्य । प्रत्यक्ष तैसेचि काढिले ॥ ७६ ॥
नीलरत्‍नांचें वैकुंठ । हिरयांचें कैलासपीठ ।
पुष्कराजाचें वरिष्ठ । केलें स्पष्ट ब्रह्मसदन ॥ ७७ ॥
इंद्र अग्नि यम नैऋति । वरुण सोम कुबेर उमपति ।
ज्यांचे तनूची विशेष दिप्ति । प्रत्यक्षमूर्ति दिक्पालांच्या ॥ ७८ ॥
मित्र रोहिणीवर भूमिसुत । सोमसुत गुरु शुक्र शनीसहित ।
राहु केतु नवग्रह मूर्तिमंत । पाहतां तटस्थ जन होती ॥ ७९ ॥
मत्स्य कूर्म वराह नृसिंहमूर्ति । वामन भार्गव राघवाकृति ।
कृष्ण बौद्ध कलंकी अवतारस्थिति । चरित्रासमवेत प्रत्यक्ष पैं ॥ ८० ॥
अतल वितल सुतल । शेष वासुकी फणिपाल ।
एवं सप्तपातालें निर्मल । लोकांसहित रेखिलीं ॥ ८१ ॥
सप्त द्वीपें नव खंड । छ्प्पन्न देश काननें प्रचंड ।
सरिता सागर तीर्थें उदंड । पापसंहारक रेखिलीं ॥ ८२ ॥
शिवचरित्रें विष्णुचरित्रें । शक्त्याख्यानें अतिविचित्रें ।
सोमकांतपाषाणी सरोवरें । सोपानें सुंदर बांधिलीं ॥ ८३ ॥
शीतोष्ण उदकांच्या पुष्करिणी । मंगलस्नानें करितां जनीं ।
तनूवरी राजकला ये तत्क्षणीं । नवलकरणी मयाची ॥ ८४ ॥
स्फटिकभूमी देखोन । भुलती पाहतयांचे नयन ।
कीं वाटे भरलें जीवन । वस्त्रें सांवरुनि चालती ॥ ८५ ॥
जेथें भरलें असे जल । तें भूमीऐसें दिसे केवल ।
वस्त्रें न सांवरिती अतिकुशल । तों सभा सकल हांसे तयां ॥ ८६ ॥
अंतर्बाह्य निर्मल दिसती । सतेजकाशीरांच्या भिंती ।
मार्ग म्हणोनि सरळ धांवती । तों ते आदळती भिंतीसी ॥ ८७ ॥
हिर्‍यांचीं कवाडें कडोविकडी । झांकिलीं कीं न कळती उघडीं ।
प्रवेशतां संशयीं पाडी । मग हस्तेंकरुनि चांचपिती ॥ ८८ ॥
सरोवरीं सुवर्णकमलां सुवास । हे कला दाविली विशेष ।
वरी नीलांचे भ्रमर सावकाश । रुंजी घालिती आनंदे ॥ ८९ ॥
हिर्‍यांचे मत्स्य तळपती । पाचूचीं कांसवें अंग लपविती ।
काश्मीरांचे बक धांवती । मत्स्य धरावयाकारणें ॥ ९० ॥
त्रिभुवनसौंदर्य एकवटलें । तें मयसभेवरी ओतिलें ।
तें सभास्थल जेणें विलोकिलें । तेणें देखिले ब्रह्मांड ॥ ९१ ॥
सभेसी जाता मार्गीं भले । चंदनाचे सडे घातले ।
पुष्पाभार विखुरले । मृगमदें लिंपिले भित्तिभाग ॥ ९२ ॥
सभासौंदर्य हाचि समुद्र । पाहतयांचे चक्षु पोहणार ।
ते न पावती पैलपार । अलीकडेच बुचकळती ॥ ९३ ॥
कीं सभासागराचें पैलतीर । मनोविहंगम चपल थोर ।
पावावया नाहीं धीर । तेजाचे आवर्तीं पडे पैं ॥ ९४ ॥
ज्या ज्या पदार्थाकडे पाहती प्राणी । तिकडेचि चित्त जाय जडोनी ।
दिवस किंवा आहे रजनी । पाहतयासी समजेना ॥ ९५ ॥
स्वर्ग मृत्यु पाताळ शोधितां । ऐशी सभा नाहीं तत्वतां ।
धन्य तो मयासुर निर्मिता । विरिच्यंश सत्य पैं ॥ ९६ ॥
आरक्तपटांचे चाम्दवे दिसती । मुक्ताघोंस भोंवते शोभती ।
दिव्य आस्तरणें पसरलीं क्षितीं । गाद्या झळकती विचित्र ॥ ९७ ॥
पीकदानें उर्ध्वमुख । तांबूलपत्रें अतिसुरेख ।
परिमलद्रव्यें मृगमदादिक । पेट्या झळकती तयांच्या ॥ ९८ ॥
कनकवेली रेखिल्या । वाटती रत्‍नस्तंभींच चढल्या ।
देवद्रुमांच्या दाटी जाहल्या । फलपुष्पीं झळकती ॥ ९९ ॥
लवंगांचे वेल शोभती । नाना वृक्ष विराजती ।
मलयागर चंदन पुष्पजाती । सुवास प्रकटती नवल हें ॥ १०० ॥
भरतां मास चतुर्दश । पूर्ण सभेचा जाहला कळस ।
मय म्हणे धर्मास । सभा दृष्टीं अवलोकिजे ॥ १०१ ॥
मग बंधु कुमार प्रधान । सवें अपार मुनिजन ।
इष्ट आप्त संगें घेऊन । सभे पातला युधिष्ठिर ॥ १०२ ॥
सभास्थानीं प्रवेशले । बलिदान आधीं समर्पिलें ।
वस्त्रालंकार ते वेळे । अपार दिधले विप्रांसी ॥ १०३ ॥
सभा पाहतां संपूर्ण । विसरले अवघे भूक तहान ।
मन न निघे तेथून । वर्षानुवर्षें पाहतां ॥ १०४ ॥
धन्य धन्य तो सूत्रधार । कमलासनांश मयासुर ।
धर्में देऊनि वस्त्रें अलंकार । प्राणसखा गौरविला ॥ १०५ ॥
निरोप घेऊनियां स्वस्थला । मयासुर तत्काल गेला ।
देशोदेशींचे नृपाल ते वेळां । येती सभा पहावया ॥ १०६ ॥
लक्ष ब्राह्मणांस भोजनें । सभेंत दिधलीं कुंतीनंदनें ।
सुधारसाहूनि गोड अन्नें । वर्णितां ग्रंथ वाढेल ॥ १०७ ॥
कमलपात्रें बहुत येती । मयसभेसी ओळंगती ।
नानाशास्त्रचर्चा होती । धर्मसभेसी सर्वदा ॥ १०८ ॥
अपार ऋषिजन वसती । धर्माचे संगतीं सुख भोगिती ।
त्यांचीं नामें नाना रीती । बोलिजेती पुढें ॥ १०९ ॥
नाना देशींचे राजसुत । धर्मापाशीं सदा तिष्ठत ।
असुर यवनगण बलवंत । धर्मरायापुढें उभे सदा ॥ ११० ॥
द्वादश जातींचे यादव । वृष्णयंधकादिक सर्व ।
सारण भोज अक्रूर उद्धव । पार्थसंगें वसती पैं ॥ १११ ॥
यादवांचे सकल सुत । शाण्णवकुलींचे राजपुत्र समस्त ।
पार्थापाशीं शिकत । धनुर्वेद सर्वही ॥ ११२ ॥
साठलक्ष कृष्णकुमार । प्रद्युम्न सांबादिक समग्र ।
त्यांसी किरीटी गुरु चतुर । विद्या अपार देतसे ॥ ११३ ॥
गंधर्वराज चित्रसेन । किन्नर अप्सरा अनुदिन ।
तुंबरु स्वर्गवास सांडून । मयसभेसीं गातसे ॥ ११४ ॥
उदय पावला सुकृतमित्र । पांडवांचें भाग्य विचित्र ।
तों अकस्मात विधिपुत्र । नारदस्वामी पातला ॥ ११५ ॥
व्यास वाल्मिकी ध्रुव प्रर्‍हाद । जयाचे शिष्य जगद्वंद्य ।
चौदा विद्या चार्‍ही वेद । मुखोद्‌गत जयासी ॥ ११६ ॥
चौसष्ट कला शास्त्रें बहुत । ज्याचें मुखीं विस्तारलीं समस्त ।
नारद नारायण यथार्थ । परमाद्‍भुत महिमा ज्याचा ॥ ११७ ॥
दिवुअ सुमनें दिव्य गंध । सुरगणीं पूजिला विविध ।
ज्याचें सामर्थ्य अगाध । ब्रह्मादिकां नेणवे ॥ ११८ ॥
हें ब्रह्मांड मोडून । दुसरें करील निर्माण ।
अन्याय विलोकितां पूर्ण । शिक्षा करील इंद्रादिकां ॥ ११९ ॥
ऐसा महाराज नारदमुनी । युधिष्ठिरें दृष्टीं देखोनी ।
सामोरें धांवोनि धरणीं । साष्टांग नमन केलें पैं ॥ १२० ॥
दिव्यासनीं बैसविला । रत्‍नाभिषेक धर्मे केला ।
पूजा आर्पूनि ते वेळां । बद्धहस्तीं उभा पुढें ॥ १२१ ॥
धर्मास म्हणे नारद । नामासारखी करणी शुद्ध ।
तुजपाशीं आहे कीं विशद । धर्मात्मजा धर्मराया ॥ १२२ ॥
पृथ्वीचें राज्य आलें समस्त । तरी धर्मावरी असावें सदा चित्त ।
कामनाबुद्धि टाकूनि यथोचित । कर्मे कृष्णार्पण करिसी कीं ॥ १२३ ॥
कुल शील विद्या धन । राज्य तप रुप यौवन ।
या अष्टमदेंकरुन । मन भुलत नाहीं कीं ॥ १२४ ॥
सर्वज्ञता अंगीं असोन । निरभिमान असशी कीं पूर्ण ।
ऐश्वर्य असोन उदास मन । धर्मराया आहे कीं ॥ १२५ ॥
प्रज्ञा अंगीं असोनि बहुत । भोळेपण न सांडिजे किंचित ।
अंतरी बहु उदारत्व । सुहृदऋषींशीं आहे कीं ॥ १२६ ॥
श्रेष्ठांचा मूल आचार । तोचि आचरसी कीं सादर ।
अविहित कर्म अनाचार । नावडे कीं सर्वज्ञा ॥ १२७ ॥
इंद्रियें आहेत कीं आधीन । नित्यनैमित्तिकीं आर्त मन ।
निषिद्ध कर्म संपूर्ण । लोटिसी कीं पातल्या ॥ १२८ ॥
भाग्य आलें अकस्मात । भोगिसी कीं सुहृदांसमवेत ।
शमदमादिसाधनीं यथार्थ । बुद्धि सदा वसे कीं ॥ १२९ ॥
विकल पडतां प्राक्तन । स्वधर्मीं रहाटे कीं मन ।
कामक्रोधादि शत्रु संपूर्ण । केले अधीन तुवां कीं ॥ १३० ॥
पाप पुण्य घडलें किती । विचारिसी कीं अहोरात्रीं ।
स्मरणें पूजनें भावभक्तीं । वश श्रीपति असे कीं ॥ १३१ ॥
संतांशीं सदा मैत्री । दान देशी कीं सत्पात्रीं ।
धर्म करितां अपात्रीं । सुकृता हानि होतसे ॥ १३२ ॥
परस्त्रीशीं काम निषिद्ध । ब्राह्मणावरी नसावा क्रोध ।
सुहृदयातीशीं मद । सहसाही न करावा ॥ १३३ ॥
नसावा सर्वभूतीं मत्सर । साधुसंत विप्र पवित्र ।
त्यांशीं दंभ अणुमात्र । सर्वथाही नसावा ॥ १३४ ॥
कर्ता सर्व ईश्वर । म्हणोनि न धरावा अहंकार ।
आपलें सुकृत आचार । स्वमुखें कदा न बोलावा ॥ १३५ ॥
सकलगुणें मंडित पूर्ण । असती कीं तव प्रधान ।
तुझी आज्ञा शिरीं धरुन । कापट्याभावें वर्तती कीं ॥ १३६ ॥
विश्वासूक जैसे प्राण । जवळी आहेत कीं सेवकजन ।
स्वामिकाजीं ओवाळून । देह टाकिती आपुले ॥ १३७ ॥
भक्षिती राजवेतन । इतर द्रव्य तृणसमान ।
सेवाव्यापारीं सुजाण । सेवक तुझे आहेत कीं ॥ १३८ ॥
वृषलीपुत्रास अमात्यपद । पवित्रास सेवा निषिद्ध ।
अपमानूनि संत वृद्ध । न भजसी कीं अपात्रीं ॥ १३९ ॥
आपुले काजीं वेंचिले प्राण । त्यांचीं करिसी कीं कुटुंबें पालन ।
स्वस्त्री टाकूनि मन । परस्त्रीविषयीं न रमे कीं ॥ १४० ॥
बालमित्र भेटों आले । कष्टी देखोनि सभाग्य केले ।
परि ओळखी नेदोनि दवडिले । ऐसें होत नाहीं कीं ॥ १४१ ॥
परगुणपरीक्षा उत्तम । जाणसी कीं विद्येचे श्रम ।
पराचें साधन देखतां परम । मन तुझें न साकळे कीं ॥ १४२ ॥
सर्वभूतीं द्यावें अन्न । पूजा करावी सत्पात्र पाहून ।
मागें न बोलावें दुजियांचे न्यून । हें सुलक्षण असे कीं ॥ १४३ ॥
सेवक कैसे वर्तती । यश किंवा अपयश देती ।
हें मुख्यत्वें अहोरात्रीं । चित्तीं सर्वदा आणिशी कीं ॥ १४४ ॥
सुखें सारा नेमस्त घेऊन । करिसी कीं प्रजेचें पालन ।
त्यांसी पीडा करितां सेवक प्रधान । पदावेगळे करिसी कीं ॥ १४५ ॥
देवाची पूजा करिती सांग । तैसाच देऊन राजविभाग ।
प्रजा वर्तती कीं अव्यंग । स्वधर्मानें आपुल्या ॥ १४६ ॥
घडिघडीं आपुले राष्ट्रा । कृपादृष्टीं पाहसी कीं पवित्रा ।
लेंकराऐशा प्रजा समग्रा । विलोकिसी कीं सज्ञाना ॥ १४७ ॥
मार्गपाडे चोर निषाद । यांचा करिसी कीं तत्काल वध ।
यात्रा नागविती जे मैंद । त्यांचें हनन करिसी कीं ॥ १४८ ॥
दुर्बलासी क्लेश होई । द्वारीं येऊन उभा राही ।
त्यासी जवळी बोलावून लवलाहीं । क्लेशातीत करिसी कीं ॥ १४९ ॥
ब्राह्मण मित्र प्रजा स्नेहाळ । त्यांसी न आडविती कीं द्वारपाल ।
दुष्ट दुर्जन जे कां खल । आंत येऊं न देती कीं ॥ १५० ॥
परराज्य जातां घ्यावया । सैन्य येतें झुंजावया ।
त्यासी जिंकोन लुटितां राया । ग्रामप्रजा रक्षिसी कीं ॥ १५१ ॥
आपुलिया जे ग्रामांत । दीन जन होती दुःखित ।
ते तुज होऊनियां श्रुत । क्लेश त्यांचे हरिसी कीं ॥ १५२ ॥
मातापितयांचें भजन । पुत्र करिती कीं अनुदिन ।
हें स्वग्रामांतील वर्तमान । तुजलागीं श्रुत असे कीं ॥ १५३ ॥
शिष्य गुर्वाज्ञा पाळिती । स्त्रिया भ्रतरासी भजती ।
सेवक स्वामिद्रोह न करिती । ऐशीच स्थिति असे कीं ॥ १५४ ॥
सासूसासर्‍यांची सेवा । सुना करिती कीं नरपार्थिवा ।
रात्रीं चोर जार सदैवा । नगरामाजी न फिरती कीं ॥ १५५ ॥
सात्विक ब्राह्मण निर्धन । ह्यांचें दूर करिसी कीं दैन्य ।
रोगें पीडिले जे अत्यंत दीन । त्यांचें पालन करिसी कीं ॥ १५६ ॥
दरिद्री ब्राह्मण तरुण । गेला परदेशालागून ।
तरुण स्त्री भ्रताराविण । तळमळत वाट पाहे ॥ १५७ ॥
तीं दोघें एकत्र करुन । नांदविसी कीं देऊन धन ।
मृगया करुनि वनपालन । दुष्ट श्वापदें वधिसी कीं ॥ १५८ ॥
सज्जनें घेतलें दुष्टाचें ऋण । तो करुं नेदी त्यासी भोजन ।
परम पीडितो हें ऐकून । ऋणमोचन करिसी कीं ॥ १५९ ॥
क्षुधार्त तृषित घरा येती । सोयर्‍यांऐशी त्यांवरी प्रीती ।
पुत्राहूनि स्नेहरीती । संतांवरी करिसी कीं ॥ १६० ॥
आश्रित उपाध्याय ऋत्विज ब्राह्मण । सांग करिती कीं अनुष्ठान ।
जप याग पुरश्चरण । कोठें न्यून न पडे कीं ॥ १६१ ॥
वसुधरा आणि असिधरा । दानोकधारा वाग्धारा ।
पंचामृतधारा अभिषेकधारा । उदारा सदैव चालती कीं ॥ १६२ ॥
आपुल्या हातें वर्षासन । देऊनि रक्षिसी कीं ब्राह्मण ।
क्षत्रियांसी नांदवून । समाचार घेशी कीं ॥ १६३ ॥
दुष्टग्रहांचें करुन पूजन । तयांसी करिसी कीं प्रसन्न ।
गणक ज्योतिषी शास्त्रनिपुण । निकट सदा असती कीं ॥ १६४ ॥
वैद्य चिकित्सक पवित्र भले । नाडीज्ञानी चातुर्यागळे ।
जे जवळी सदा ठेविले । आहेत कीं राजेंद्रा ॥ १६५ ॥
कोशगृहींचे रक्षक । ते आहेत कीं निरपेक्षक ।
अंतःपुरींचे नपुंसक । किंवा वृद्ध आहेत कीं ॥ १६६ ॥
पवित्र विश्वासु आणि चतुर । पाककर्ते असावे साचार ।
जाणताती ते सूपशास्त्र । तेचि तुवां रक्षिले कीं ॥ १६७ ॥
नापित हडपी अंगमर्दक । उदक देणारे हुजरे देख ।
हे निकट असणारे सेवक । विश्वासुक आहेत कीं ॥ १६८ ॥
जे अविचारी अनिवार शूर । तेच युद्धांत ठेवावे साचार ।
स्थिरबुद्धि जे धैर्यें थोर । ते दुर्गतटीं असतीं कीं ॥ १६९ ॥
बृहस्पतीऐसे चतुर पंडित । बोलों जाणती समयोचित ।
वेधिती शत्रूंस निश्चित । ऐसे निकट असती कीं ॥ १७० ॥
समय पाहूनि त्रिशुद्धी । तुज शिकविती कीं सुबुद्धी ।
अनर्थीं पडो नेदिती कधीं । ऐसे निकट असती कीं ॥ १७१ ॥
पिशुन शठ दुष्ट दुर्जन । निष्ठुर वादक पाहती न्यून ।
सत्पात्रांचा करिती अपमान । ते सभास्थानीं वर्जिसी कीं ॥ १७२ ॥
साधुदेवां बोलती दुष्टशब्द । त्यांचा करिसी कीं जिह्वाछेद ।
रात्रीं जागा होऊनि मनोबोध । मोक्ष पावावया करिसी कीं ॥ १७३ ॥
जनीं वसे जनार्दन । ते करिती निंदा कीं स्तवन ।
मोक्षनरकांचें चिह्न । यथेंचि पुरें जाणसी कीं ॥ १७४ ॥
शत्रु जिंकावे समरीं । जिंकिले ते पाळावे चतुरीं ।
शरणागतां बरव्यापरी । रक्षावें हें जाणसी कीं ॥ १७५ ॥
गिरिदुर्गीं आणि पर्वतीं । नूतन धान्यें वर्षाअंतीं ।
जुनीं काढोनि पुढती । नवीं बहुसाल भरिशी कीं ॥ १७६ ॥
गडदुर्गांच्या भिंती । जीर्ण होता कोसळती ।
ठायीं ठायीं रचावया पुढती । शिल्प खनक असती कीं ॥ १७७ ॥
मठ धर्मशाला प्रासाद । कूप वापी तडाग सुबद्ध ।
हीं खचलीं कीं करुनि सिद्ध । जीर्णोद्धार करिसी कीं ॥ १७८ ॥
नैवेद्य दीप ठायीं ठायीं । चालविशी कीं देवालयीं ।
वर्षाकालीं पीडती पशु गायी । त्यास गोठाणें बांधविसी कीं ॥ १७९ ॥
वृद्ध दरिद्री अशक्त अती । तपस्वी संन्यासी अतिथी ।
हें वर्षाकालीं पंथीं । न चालती ऐसें करिसी कीं ॥ १८० ॥
गोत्रज प्रजा वृद्ध तापस । तुझा न घेती कदा त्रास ।
श्रेष्ठ जे येती दर्शनास । त्यां अपमानीत नाहींस कीं ॥ १८१ ॥
पुरोहित प्रधान पंडित । आपुलें नष्ट होईल महत्त्व ।
म्हणून भल्यांचा अपमान सत्य । न करिती कीं सर्वथा ॥ १८२ ॥
उदयास्तमानीं शयन । व्रतपर्वकालीं मैथुन ।
पंक्तिभेद एकल्यानें भोजन । तुज घडत नाहीं कीं ॥ १८३ ॥
चार्‍ही वर्ण आपुल्या सुतां । विद्या पढविती कीं नरनाथा ।
बहु मूर्ख दवडोनि एका पंडिता । धनमानें रक्षिली कीं ॥ १८४ ॥
एकांतविचार गौप्य समस्त । प्रकटत नाहीं कीं जगांत ।
मंत्र आयुष्य वित्त । न सांगसी कीं कोणांतें ॥ १८५ ॥
एक प्रकट लोकीं बोलावें । एक साधुकर्णींच सांगावें ।
एक मनींच गौप्य ठेवावें । हें तूं बरवें जाणसी कीं ॥ १८६ ॥
शत्रु काय करिती विचार । क्षणोक्षणीं आणविजे समाचार ।
सत्यवादी हेर चार । धन देऊन रक्षिसी कीं ॥ १८७ ॥
तुजशीं स्नेह दाविती बहुत । शत्रूंस समाचार करिती श्रुत ।
ते ओळखोनि मनांत । सावधान अससी कीं ॥ १८८ ॥
वार्ता आली जे अकस्मात । तिचे सत्यत्वासी पाठवावे दूत ।
अल्प यत्‍न लाभ बहुत । तेथें त्वरा करिसी कीं ॥ १८९ ॥
अल्प यशास मोठी हानी । गोष्टीं न धरावी ते मनीं ।
दान मान सुकृत जनीं । प्रकट कदा न करिशी कीं ॥ १९० ॥
जे राज्यरक्षक रणशूर । त्यांचें वेतन द्यावें समग्र ।
त्यांसी कष्टी करितां निर्धार । अनर्थ हें जाणसी कीं ॥ १९१ ॥
आदा पाहोनियां वेंच । करावा हें जाण साच ।
गुरुगृहीं पुरविजे खर्च । सर्वदा हें जाणसी कीं ॥ १९२ ॥
आजि काय सांचलें धन । वेंचिलें किती पत्रीं लिहून ।
नित्य सायंकालीं आणून । लेखक हे दाविती कीं ॥ १९३ ॥
वस्त्राभरणें नित्य लेवून । दर्शना येती कीं समस्त जन ।
सुहृद रणशूर स्वतः होऊन । उभयभागीं बैसती कीं ॥ १९४ ॥
वस्त्रें शस्त्रें अलंकारें येर । अवघे सारिखे रणशूर ।
अश्वगजयानीं समग्र । सतेज सदा असती कीं ॥ १९५ ॥
सत्पात्रीं धन देतां बहुत । नाहीं वारीत कीं पुरोहित ।
विघ्न करिती ते पदच्युत । तत्काळचि करिशी कीं ॥ १९६ ॥
घोषांचे ते ग्राम । ग्रामांचीं पट्टणें उत्तम ।
पर्वत वनें वसवोनि परम । मार्ग चालते करिसी कीं ॥ १९७ ॥
न पडे जरी जलदजाल । विशाल तडागें पाटस्थल ।
शालीवनें पिकती पुष्कळ । ऐसी भरती असे कीं ॥ १९८ ॥
प्रजा कोणी अत्यंत दीन । त्यांसी देऊनि धन धान्य ।
करुनि सभाग्य पूर्ण । मग राजधन घेसी कीं ॥ १९९ ॥
प्रजापीडक हिंसक । आततायी इतर देख ।
त्यांचा वध तत्कालिक । करिसी कीं राजेंद्रा ॥ २०० ॥
क्षुधें पीडतां दुष्काळांत । उत्तमें चोरी केली अकस्मात ।
धरुनि आणितां राजदूत । तत्काल मुक्त करिशी कीं ॥ २०१ ॥
अंतर्बाह्य संरक्षण । स्त्रियांसी करुनियां पूर्ण ।
अष्टभोग देऊनि जाण । गुह्यभाषण न करिशी कीं ॥ २०२ ॥
परराज्य घेतां सत्य । ज्यासी जे जे लाभे वस्त ।
ते त्यांसी करुन मुक्त । तोषविसी कीं तयांतें ॥ २०३ ॥
युक्त आहार युक्त निद्रा । युक्त मैथुन जाण नरेंद्रा ।
मृगया द्यूत व्यय चतुरा । युक्तचि हीं करिसी कीं ॥ २०४ ॥
सेवूनि औषध रसायन । करिसी कीं शरीरसंरक्षण ।
भजन पूजन हरिकथाश्रवण । साधुमुखें करिसी कीं ॥ २०५ ॥
शब्द बोलसी जो यथार्थ । तो न चळे जैसा पर्वत ।
हित सांगती जें साधुसंत । हृदयीं दृढ धरिसी कीं ॥ २०६ ॥
गुरु वृद्ध देव ब्राह्मण । प्रासाद गाय वृंदावन ।
यज्ञमंडप समाधिस्थान । देखोन नमन करिसी कीं ॥ २०७ ॥
अश्व भांडार गज । पवित्रभूमि देवध्वज ।
गंगा तीर्थें देखतां सहज । नमन त्यांसी करिसी कीं ॥ २०८ ॥
कार्य साधिती जे सेवक । त्यांचें स्तवन करिसी कीं सम्यक ।
सभामंडपीं मानें देख । गौरवीत आहेस कीं ॥ २०९ ॥
अचाट कार्य अद्‍भुत । करुनि आला जो भृत्य ।
वेतनावेगळें अपरिमित । द्रव्य वस्त्र देसी कीं ॥ २१० ॥
परखंडींच्या वस्तु अद्‍भुत । वाणिज आणिती इच्छूनि स्वार्थ ।
न विके तरी समस्त । द्रव्य देऊन घेसी कीं ॥ २११ ॥
कोणी आणिती वस्तु उचिता । त्यांसी दशगुणें नरनाथा ।
द्रव्य देऊन तत्त्वतां । बोळविसी कीं आदरें ॥ २१२ ॥
देशावर देउन अपरिमित । स्वदेशा धाडिसी कीं विद्यावंत ।
ते तुझी कीर्ति सांगत । थोर सभेसी जाण पां ॥ २१३ ॥
उत्तम वस्त्रे अलंकार । सत्पात्रीं देतां कीर्ति फार ।
स्थलीं स्थलीं मिरवतां थोर । यश प्रकटे नरेंद्रा ॥ २१४ ॥
भोजन तांबूल सुमन चंदन । वस्त्रें औषध उदकपान ।
इतक्यांत विष घालून । द्वेषी प्राण घेतील पैं ॥ २१५ ॥
येविषयीं सदा सावधान । निद्रेचें असे कीं दृढ स्थान ।
रात्रीं करिसी कीं जागरण । सेवकजनांसमवेत ॥ २१६ ॥
पुण्यवंतास दोषी म्हणती । दुर्बलासी धनिकत्व स्थापिती ।
दुरात्म्याचे दोष लपविती । नाहीं रीति ऐशी कीं ॥ २१७ ॥
धनिक न करिती दान । दरिद्री न करी तीर्थाटन ।
त्या दोगांसही सांगोन । हितकार्यीं योजिसी कीं ॥ २१८ ॥
बाहेर दावून आचार । आंत अवघा अनाचार ।
व्यभिचारकर्मे अपार । करिती त्यांसी दंडिसी कीं ॥ २१९ ॥
माता पिता गुरु टाकून । करुं धांवे तीर्थाटन ।
त्यासही राया तूं दंडून । भजनमार्गीं लाविसी कीं ॥ २२० ॥
बाहेर योगियाचें चिह्न । पाळिती उदर आणि शिश्न ।
अग्निहोत्र न घे वेदज्ञ । तरी पठण व्यर्थचि तें ॥ २२१ ॥
त्याचे ठायीं तुझे मन । न लागे कीं अणुप्रमाण ।
एवं सर्वविषयीं सावधान । नृपवर्या अससी कीं ॥ २२२ ॥
ऐसे हे किंचित्प्रश्न । नारदें पुसिले धर्मालागून ।
जनमेजय करी श्रवण । वैशंपायन सांगतसे ॥ २२३ ॥
हें जो नित्य ऐके पढे । त्यास न पडे कदा सांकडें ।
अंती हरिपद जोडे । यश मिळे सर्वदा ॥ २२४ ॥
पुढें श्रवण कीजे सावधान । एकाहूनि एक अध्याय गोड पूर्ण ।
आदर धरोत विचक्षण । ब्रह्मानंदेंकरुनियां ॥ २२५ ॥
रसिक साहित्यचातुर्यवाणी । ब्रह्मानंदें वदोनी ।
श्रीधराची वाग्भवानी । गोंधळ घाली स्वानंदें ॥ २२६ ॥
त्या रंगामाजी चतुर पंडित । आनंदें डोलतील समस्त ।
भक्त मुमुक्षु साधक संत । सुखदुःख समान जयां ॥ २२७ ॥
जय जय भीमातटविलासा । ब्रह्मानंदा पंढरीशा ।
श्रीधरवरदा आदिपुरुषा । अविनाशा दिगंबरा ॥ २२८ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । सभापर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । पंचदशाध्यायीं कथियेला ॥ २२९ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । सभापर्वटीका श्रीधरकृत ।
मयसभेची रचना समस्त । नारदनीति कथियेली ॥ २३० ॥
इति श्रीधरकृत पांडवप्रतापे सभापर्वणि पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
अध्याय पंधरावा समाप्त



GO TOP