श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय सहावा


भीष्माची गोष्ट


॥ श्रीगणेशाय नमः ॥
जनमेजय बोलिला । वैशंपायना विवेककुशला ।
मजपर्यंत वंशमाला । मूळापासूनि सांगिजे ॥ १ ॥
मग म्हणे वैशंपायन । क्षीराब्धिशायी नारायण ।
नाभिकमलीं चतुरानन । त्यापासूनि दक्षप्रजापति ॥ २ ॥
दशकन्या अदिति रत्‍न । तिचा पुत्र विवस्वान ।
त्यापासोन मनु निर्माण । पुरुरवा तेथोनियां ॥ ३ ॥
तेथूनि अयुनामा नरेश । त्यापासूनि जाहला नहूष ।
त्याचा ययाति विशेष । शुक्र श्वशुर जयाचा ॥ ४ ॥
तेथूनि पुरुनामा नरराय । त्यापुढें त्वन्नामा जनमेजय ।
तेथूनी प्रचिन्वान होय । पुत्र तयाचा राजेंद्रा ॥ ५ ॥
तयाचा पुत्र शर्याती । त्यापासूनि अहंयाती ।
सार्वभौम निश्चिती । महाराज तयाचा ॥ ६ ॥
तेथूनियां जयत्सेन । त्यापासून विचिन्वान ।
तेथूनि महाभीम जाण । प्रतापवंत जन्मला ॥ ७ ॥
प्राचीनधन्वा तेथोन । त्याचा अयुतनामा बली पूर्ण ।
त्यापासोन अक्रोधन । देवातिथि तेथोनियां ॥ ८ ॥
ऋचनामा तेथून । ऋचाचा रुक्षाभिधान ।
तेथोनि मतिनार कुरु जाण । तष्यंत त्याचा जाणिजे ॥ ९ ॥
तयापासोन जाहला ईलिन । त्याचा दुष्यंतराव जाण ।
त्यापासोन भरत निधान । त्याचे वंशीं भारत तुम्ही ॥ १० ॥
भरताचा सुहोत्र पुण्यरुप । तयाचा पुत्र हस्तिप ।
तेणें आपला नामप्रताप । हस्तनापुर रचियेलें ॥ ११ ॥
त्याचा विकट पुढें अजमीढ नृपनाथ । त्याचा संवरण पुण्यवंत ।
तेथूनि कुरुक्षत्रियनिर्मित । कुरुवंशीं कौरव तुम्ही ॥ १२ ॥
त्याचा पुत्र परीक्षिति अभिधान । तेंच नाम आथिलें त्वत्पित्याचें पूर्ण ।
त्याचा भीमनामें नंदन । त्याचा प्रतीप जाणिजे ॥ १३ ॥
त्याचा पुत्र शंतन । त्याचा बाल्हीक सहोदर पूर्ण ।
शंतनुसुत देवव्रत जाण । भीष्म नाम तयाचें ॥ १४ ॥
शंतनु वरी सत्यवती । दोघे पुत्र जाहली प्रसवती ।
चित्रांगद नामें नृपती । विचित्रवीर्य दुसरा ॥ १५ ॥
त्याविचित्रवीर्याचे पुत्र । धृतराष्ट्र पंडू विदुर ।
एक शत कुमार । धृतराष्ट्रासी जाहले ॥ १६ ॥
पंडूचे पांच सुत । नामें त्रिभुवनीं विख्यात ।
द्रौपदीउदरीं जन्मत । पांच कुमार पांडवांचे ॥ १७ ॥
प्रतिविंध्य श्रुतसोम । श्रुतकीर्ति शतानीक उत्तम ।
पांचवा श्रुतकर्मा नाम । पांच कुमार पांचांचे ॥ १८ ॥
पार्थभार्या कृष्णभगिनी । सुभद्रादेवी वसुदेवनंदिनी ।
तिचे उदरी मभिमन्यु गुणी । प्रतिअर्जुन जन्मला ॥ १९ ॥
अभिमन्युपुत्र परीक्षिति । तुझा पिता जाण भूपति ।
त्याचे पोटीं तूं पुण्यमूर्ति । जनमेजय राजेंद्रा ॥ २० ॥
तुझे पुत्र दोघे जण । शतनीक शतकर्ण ।
त्याचा पुत्र सुदंताभिधान । नातु तुझा जनमेजया ॥ २१ ॥
एवं नारायणापासोन । तुझा नातु सुदंत पावन ।
अठ्ठेचाळीस पुरुष पूर्ण । वंशमाला सांगितली ॥ २२ ॥
इक्ष्वाकुवंशीं परम । राजा जाहला महाभिष नाम ।
तेणें अश्वमेध उत्तम । एक सहस्त्र केले पैं ॥ २३ ॥
शत एक राजसूय यज्ञ । करुन पावला स्वर्गभुवन ।
त्यास बहु मानी सहस्त्रनयन । देव मान अति देती ॥ २४ ॥
एकदा ब्रह्मसभेस महाभिष । येऊनि बैसला पुण्यपुरुष ।
तों गंगामूर्ति निर्दोष । सुवस्त्र नेसे त्वरेनें ॥ २५ ॥
तों वातें फिटलें वसन । सभा पाहे अधोवदन ।
परि महाभिषें अवलोकून । क्षण एक ती पाहिली ॥ २६ ॥
महाभिषाकडे पाहोन । गंगा जाहली हास्यवदन ।
ते देखोनि चतुरानन । शापवचन बोलत ॥ २७ ॥
स्वर्गवास टाकून विशेष । मृत्युलोकीं व्हाल मनुष्य ।
कामना पुरतां स्वपदास । बहुकालें पावाल ॥ २८ ॥
असो गंगा विचरतां गगनीं । अष्टवसु देखिले नयनीं ।
रोदन करितां देवतटनी । तयां साक्षेपें पुसतसे ॥ २९ ॥
वसु म्हणती भागीरथि । वसिष्ठें शाप दिला आम्हांप्रति ।
मानव होऊनि अधोगति । मृत्युलोकीं उपजाल ॥ ३० ॥
वसिष्ठाची गाय चोरुनी । आम्हीं आश्रमीं बांधिली नेऊनी ।
म्हणोन शाप वदला मुनी । तुजे उदरीं जन्मूं आतां ॥ ३१ ॥
तरी उपजतांच नेऊन । गंगेंत देईं टाकून ।
सोडवीं मनुष्यदेहापासून । शापमोचन होईल ॥ ३२ ॥
गंगा म्हणे ते अवसरीं । लोक मज म्हणती असुरी ।
अष्ट पुत्र निर्धारीं । कैसे टाकूं उदकांत ॥ ३३ ॥
वसु म्हणती ते वेळीं । सात टाकीं गंगाजळीं ।
आठवा वसु प्रतिपाळीं । प्रतापसूर्य सज्ञान ॥ ३४ ॥
अष्ट वसूंचे मिळोन अंश । एक पुत्र होईल विशेष ।
महाज्ञानी निर्दोष । जितेंद्रिय धर्मात्मा ॥ ३५ ॥
हस्तनापुरीचा प्रतीप नृपवर । मृगयामिषें हिंडे गिरिगव्हर ।
भागीरथीतीरीं जातां सत्वर । श्रम पावोन बैसला ॥ ३६ ॥
तों प्रवाहांतून अकस्मात । गंगा निघाली मूर्तिमंत ।
दिव्याभरणी भूषित । श्वेतवसना गौरांगी ॥ ३७ ॥
गंगा आनंदवल्लीचें सुमन । कीं लावण्यभूमीचें निधान ।
कीं शुभ्रसुमनमाला पूर्ण । अपर्णावरमस्तकींची ॥ ३८ ॥
कीं श्रृंगारनभींची चपला । कीं साक्षात दुसरी कमला ।
आनंदवनींची वेल्हाळा । कुरंगिणी चमकत ॥ ३९ ॥
एसें देखोनि ते अवसरीं । प्रतीप मनीं आश्चर्य करी ।
म्हणे उमा रमा कीं सावित्री । कीं सरस्वती साक्षात ही ॥ ४० ॥
रायाचे सव्यांकीं ते वेळीं । बैसे गंगा श्रृंगारवल्ली ।
म्हणे राया तूं प्रतापबळी । मज वरीं ये वेळे ॥ ४१ ॥
राजा म्हणे देवतटिनी । मी व्रतस्थ आहें एकपत्‍नी ।
सव्यांकीं बैसलीस येऊनी । तरी स्नुषा कन्या तैसी तूं ॥ ४२ ॥
तरी माझिया पुत्राची पत्‍नी होऊन । राजभोग घेईं संपूर्ण ।
गंगा म्हणे मी पुत्र जन्मवीन । विजयध्वज वंशासी ॥ ४३ ॥
सुरनदी ऐसें बोलोन । सवेंच पावली अंतर्धान ।
पुढें महाभिष जाहला शंतन । पुत्र प्रतीपरायांचा ॥ ४४ ॥
देशोदेशींचे भूपती । शंतनूस कन्या देऊं म्हणती ।
वचन न गोंवीच नृपती । स्नुषा गंगा इच्छित ॥ ४५ ॥
शंतनुनामक पुत्राप्रती । प्रतीप सांगे एकांतीं ।
तुज गंगा वरील अतिप्रीतिं । आणिक युवती न वरीं तूं ॥ ४६ ॥
ऐसें बोलोन झडकरी । छत्र धरिलें पुत्रावरी ।
आपण तपा गेला ते अवसरीं । परत्र मोक्ष साधावया ॥ ४७ ॥
इकडे शंतनु गंगातीरीं । सर्वकाल मृगया करी ।
मार्ग लक्षीत अंतरीं । तों जन्हुकुमारी प्रकटली ॥ ४८ ॥
इंदिरेची अपरप्रतिमा । तैसी प्रकटली दिव्य रामा ।
माळ घाली सार्वभौमा । शंतनुराया ते काळीं ॥ ४९ ॥
म्हणे जें मी राया करीन । तें तुवा मानावें प्रमाण ।
माझें कर्तृत्व म्हणतां अप्रमाण । मी जाईन तेच क्षणीं ॥ ५० ॥
राव म्हणे जें तूं करिशी । तें मी न मोडीं निश्चयेंसीं ।
भाष देऊनि तियेसी । पट्टमहिषी आणिली घरा ॥ ५१ ॥
जान्हवीसंगें उल्हास । तृणवत मानी स्वर्गसुखास ।
वर्ष तें वाटे निमिष । तिशीं विलास भोगितां ॥ ५२ ॥
गर्भवती जाहली राणी । पुत्र प्रसवली सुगुणी ।
परी तें बाळ तत्काळ नेऊनी । गंगागर्भीं टाकिलें ॥ ५३ ॥
सप्त पुत्र ऐसेच टाकिले । शंतनु भिडेनें न बोले ।
आठवा पुत्र यथाकालें । प्रतिसूर्य जन्मला ॥ ५४ ॥
तो गंगाजळी टाकावा । तों वसुधापति आला आडवा ।
म्हणे एवढा तरी न टाकावा । महातामसे असुरि ॥ ५५ ॥
वंशवृक्षनिर्मूळकारिणी । केवल तीक्ष्ण कुथारिणी ।
तूं नारी नव्हेस सर्पिणी । पिलीं प्रसवूनि भक्षिलीं ॥ ५६ ॥
देवतटिनी बोले वचन । जाहलें वसुशापविमोचन ।
मी जात्यें आतां येथून । तूं मजविण राज्य भोगीं ॥ ५७ ॥
आठवा पुत्र उत्तम । तुज पुढें देईन भीष्म ।
ऐसें बोलोन सप्रेम । गुप्त जाहली जान्हवी ॥ ५८ ॥
सांगातें नेला कुमार । मग तळमळी राजेश्वर ।
भोग वाटती जैसे विखार । गंगेविना रायातें ॥ ५९ ॥
रायें केला विवेक । म्हणे नश्वर सर्व क्षणिक ।
मग इंद्रिये नियमूनि नैष्ठिक । राज्य नीतीनें चालवी ॥ ६० ॥
गंगावियोगें आकळे मनीं । न पाहे दुसरी कामिनी ।
छत्तीस वर्षें या प्रकारेंकरुनी । शंतनु राज्य लोटी हो ॥ ६१ ॥
भागीरथीच्या तीरीं त्वरित । राव मृगया करीत जात ।
गंगा आठवूनि मनांत । सद्‌गदित पहातसे ॥ ६२ ॥
तों भागीरथीचें जल । स्वल्प वाहे झुळझुळ ।
चकित पाहे भूपाळ । म्हणे मूळ शोधूं आतां ॥ ६३ ॥
हरिद्वारापर्यंत । राव चालिला शोधित ।
तों प्रवाह कोंडिला अद्‍भुत । शरसंधानीं भीष्मदेवें ॥ ६४ ॥
पुत्र आपुला हें न कळे । परि मोहें अंतर भरलें ।
भूषणीं भूषित स्वरुप चांगलें । राव बोले ते वेळीं ॥ ६५ ॥
म्हणे कोणाचा तूं सुत । स्नेह उपजला मज बहुत ।
तों भीष्मदेव जाहले गुप्त । गंगाजळीं ते वेळीं ॥ ६६ ॥
राजा खेद पावला बहुत । गंगा आठविली मनांत ।
नयनीं आले आश्रुपात । म्हणे धांवें वल्लभे ॥ ६७ ॥
आठवा पुत्र देईन । म्हणून बोललीस वचन ।
सत्य करीं मज भेटून । कठिण मन करुं नको ॥ ६८ ॥
तों हातीं धरुन सुत । गंगा प्रकटली अकस्मात ।
जैसें परम भाग्यें आराध्यदैवत । निधान देत आणूनि ॥ ६९ ॥
वस्त्राभरणीं भूषित । मुक्तमाला पदकें झळकत ।
ऐसा आणूनियां सुत । देती जाहली रायातें ॥ ७० ॥
म्हणे सांभाळीं आपुला नंदन । यास वसिष्ठापासोन विद्यादान ।
हा भार्गवरामापासून । धनुर्वेद शिकलासे ॥ ७१ ॥
मंत्रविद्येमाजी प्रवीण । जाहला वाचस्पतीपाशीं पूर्ण ।
सोमवंशविजयध्वज जाण । नेईं नंदन गृहातें ॥ ७२ ॥
युवराज्य यासी देईं । सागरान्तमेदिनी सर्वही ।
तुझी आज्ञा चालवील पाहीं । नाहीं ज्ञानी दुसरा ॥ ७३ ॥
ऐसें बोलोनि देवतटिनी । गुप्त जाहली तेच क्षणीं ।
हातीं कुमार धरुनी । शंतनु आला हस्तिनापुरा ॥ ७४ ॥
सकळ प्रजा राजे येऊन । भीष्मास करिती नमन ।
भेरी मंगलतुरें वाजवून । राज्यभर ओपिला ॥ ७५ ॥
सर्वांविषयीं चतुर । कार्यमात्रीं दक्ष फार ।
आवरिला सर्व राज्यभार । व्यंग न पडे कोठेंही ॥ ७६ ॥
विशेष वेतन मान बहुत । देऊन सेवक मोहिले समस्त ।
याचक दानें केला तृप्त । दरिद्र नाहीं शोधितां ॥ ७७ ॥
अवलोकून गंगानंदन । राजा सदा आनंदघन ।
म्हणे आयुष्य परिपूर्ण । चतुरानन देवो यासी ॥ ७८ ॥
शंतनुराव एके दिनीं । मृगया जंव करीत वनीं ।
तों दिव्य सुवास घ्राणीं । येऊनियां झगटला ॥ ७९ ॥
म्हणे कोठें आहे सुवासवस्त । यमानुजातीरीं शोधित जात ।
तों पुढें दाशनगर देखत । नौका रक्षीत दाशकुमारी ॥ ८० ॥
रुप पाहतां सतेज । भुलोन जाय मकरध्वज ।
अंगींचा सुवास फांके सहज । योजन एक सभोंवता ॥ ८१ ॥
राजा म्हणे तियेसी । तूं कोण येथें नौका रक्षिसी ।
येरी म्हणे उतरीं पांथिकांसी । दाशकुमारी मी असें ॥ ८२ ॥
मन्मथबाणें भेदिला शंतन । मग दाशगृहा आदरें जाऊन ।
भेटे स्नेहादरें पूर्ण । तो म्हणे धन्य भाग माझें ॥ ८३ ॥
मग म्हणे कुंभिनीपालक । तुज मागणें आहे एक ।
येरु म्हणे मी तुझा रंक । प्राण सांडीन ओंवाळूनि ॥ ८४ ॥
परम सुंदर तुझी नंदिनी । ते करीं माझी पट्टराणी ।
दाश म्हणे ते क्षणीं । विचार एक असे पैं ॥ ८५ ॥
इचे पोटीं होईल पुत्र । तो वंशवर्धनीं नृपछत्र ।
ऐसी भाषा द्यावी निर्धार । ऐकुनि नृपवर दचकला ॥ ८६ ॥
भीष्माऐसा पुत्र पाहीं । ब्रह्मांडांत दुजा नाहीं ।
तनुमधन सर्वही । ओवाळावें त्यावरुनी ॥ ८७ ॥
मौनेंच राव उठोन । स्वग्रामा गेला परतोन ।
मनीं लागलें सत्यवतीचें ध्यान । न बोले वचन कोणाशीं ॥ ८८ ॥
शंतनुराव चिंतातुर । भीष्में ऐकतां साचार ।
पुसे रायास येऊनि विचार । नमस्कार करोनियां ॥ ८९ ॥
मजसारिखा पुत्र असतां । तुम्हां काय पडली चिंता ।
शक्रास दुर्लभ ज्या वस्ता । आणून देईन क्षणार्धे ॥ ९० ॥
मग बोले नृपवर । तुजसारिखा नाहीं पुत्र ।
परि तुज बंधु असावे साचार । पाठीराखे वाटतें ॥ ९१ ॥
एक डोळा एक चरण । एक पाणि एक वसन ।
याचें सुख मानी तो विवेकहीन । चतुर नव्हे सर्वथा ॥ ९२ ॥
संसार क्षणिक साचार । एक कुमार तो नव्हे कुमार ।
एका स्तंभीं अवघें घर । तगेल कैसें सांग पां ॥ ९३ ॥
ऐसें बोलतां शंतन । भीष्मास कळलें वर्तमान ।
प्रधानास पाचारुन । गंगात्मज सांगतसे ॥ ९४ ॥
रायास नाहीं विषयस्वार्थ । परि पत्‍नी पाहिजे धर्मार्थ ।
गृहस्वामिणी नसतां गृहांत । वाटत शून्य अवघें गृह ॥ ९५ ॥
तरी वधू पाहा सुंदर । ऐसें ऐकून नृपवर ।
पुरोहित पाचारुन समग्र । एकांतीं सांगे तयांतें ॥ ९६ ॥
सत्यवती दाशनंदिनी । ती करुन द्यावी मज राणी ।
तिजविणें नितंबिनी । दुसरी न लगे सर्वथा ॥ ९७ ॥
ऐसा हा वृत्तांत । भीष्मास जाणविती पुरोहित ।
अवश्य म्हणोनि देवव्रत । दाशगृहासी पातला ॥ ९८ ॥
कैवर्तक सामोरा येत । सन्मानें बैसविले समस्त ।
दाशराजासी म्हणे देवव्रत । तूं सोयरा आमुचा ॥ ९९ ॥
सत्यवती करीं आमुची जननी । विलंब न करावा ये क्षणीं ।
दाश म्हणे माझे मनीं । चिंता एक वर्ततसे ॥ १०० ॥
महाराज तूं देवव्रत । माझे माथा ठेवीं हस्त ।
तरी मग बोलेन मात । राग मनांत न धरावा ॥ १०१ ॥
इचे पोटीं होईल कुमार । तो व्हावा छत्रपति वंशधर ।
ऐसें ऐकतां गंगाकुमार । गर्जोनियां बोलतसे ॥ १०२ ॥
इचे पोटीं होईल कुमार । त्यावरी मी धरीन छत्र ।
त्याचा वंश स्थापीन समग्र । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १०३ ॥
हा अप्रमाण होईल शब्द । तरी म्लेंच्छ्मुखीं प्रवेशो वेद ।
धन्य धन्य म्हणती ब्रह्मवृंद । देवव्रत सत्यवचनी ॥ १०४ ॥
यावरी बोले किरात । तुझे पुढें होतील सुत ।
ते हिरोन गेतील समस्त । युद्ध व्यवहार करुनी ॥ १०५ ॥
तूं सत्यव्रत महाराज । परि कैसे होतील नेणों आत्मज ।
बलाद्‍भुत सतेज । जेष्ठ अधिकारी राज्यातें ॥ १०६ ॥
ऐसें ऐकतां भीष्म । करिता जाहला अचाट नेम ।
जो कोणा न चले निःसीम । त्रिभुवनांत एक तो ॥ १०७ ॥
यावरी आजन्मपर्यंत । मी ब्रह्मचारी व्रतस्थ ।
गंगेसमान स्त्रिया समस्त । त्रिभुवनींच्या केल्या म्यां ॥ १०८ ॥
मन्मथाचा केला म्यां शिरश्छेद । पायीं बांधिलें येथूनि ब्रीद ।
माझा वाङ्नेम प्रसिद्ध । ब्रह्मांडभरी उभविला ॥ १०९ ॥
संततीविणें मी विशद । पावेन स्वर्गमोक्षपद ।
ऐसें ऐकतां सभावृदं । जयजयकार करिती हो ॥ ११० ॥
दिव्य सुमनांचे संभार । वर्षती वरुन सुरवर ।
माथे तुकविती ऋशीश्वर । पितृभक्त धन्य हा ॥ १११ ॥
तत्काल ती सत्यवती । दाशें दिधली भीष्माचे हातीं ।
तेणें वाहोन कनकरथीं । हस्तिनापुरा आणिली ॥ ११२ ॥
तवं ते समयीं सुमुहूर्त । पाहूनि दोघांचे लग्न लावित ।
पिता संतोषोनि वदत । देवव्रत नाम तुज साजे ॥ ११३ ॥
भीषण केला जेणें नेम । म्हणोन नाम तुझें भीष्म ।
इच्छामरण पावसी परम । इह परत्रीं धन्य तूं ॥ ११४ ॥
सत्यवतीसीं भोगीतां भोग । रायासी उणा वाटे स्वर्ग ।
तों पुत्र जाहला सवेग । चित्रांगद या नांवें ॥ ११५ ॥
आणीक एक संवत्सरा । गरोदर जाहली सुंदरा ।
विचित्रवीर्य दुसरा । पुत्र जाहला सुलक्षणी ॥ ११६ ॥
जातकर्मादि संस्कार । शंतनु करीत समग्र ।
बीष्में याचक सत्वर । तृप्त केले सर्व दानें ॥ ११७ ॥
बालत्व क्रमिलें संपूर्ण । प्राप्त झालें तरुणपण ।
तों शंतनु देह ठेवून । स्वर्गाप्रति पावला ॥ ११८ ॥
तेव्हां उत्तरक्रिया समस्त । भीष्म स्वांगें संपादित ।
चित्रांगद जेष्ठ सुत । भीष्में राज्यीं बैसविला ॥ ११९ ॥
चित्रांगदें पुरुषार्थ करुन । जगत जिंकिलें संपूर्ण ।
दिव्य वस्तु आणिल्या हिरोन । राजांपासून पराक्रमें ॥ १२० ॥
जिंकूनियां यादवेंद्र । वस्तु आणिल्या अपार ।
भीष्म पाठिराखा महाशूर । उणें न पडे कोठेंही ॥ १२१ ॥
तों एक नामाच्या विषादेंकरुनी । गंधर्वराज येऊनी ।
हस्तनापुरी समारांगणीं । युद्ध केलें अपार ॥ १२२ ॥
मग कपट विद्या करुन । घेतला चित्रांगदाचा प्राण ।
भीष्मभेणे तेथून । पळून गेला स्वर्गलोका ॥ १२३ ॥
जाहला एकचि हाहाकार । शोक करी सत्यवती अपार ।
मग विचित्रवीर्य सत्वर । राज्यासनीं स्थापिला ॥ १२४ ॥
सर्व शास्त्रीं केला निपुण । धनुर्वेद अभ्यासी संपूर्ण ।
सर्व विषयी भीष्म आपण । अंतर्बाह्य रक्षित ॥ १२५ ॥
विवाह करावा यावरी । गंगात्मज चिंती अंतरीं ।
तों वार्ता सांगितली ऋषीश्वरीं । दिव्य कुमारी काशीश्वराज्च्या ॥ १२६ ॥
अंबा अंबिका अंबालिका । स्वयंवर मांडलें त्यांचें देखा ।
राजे मिळाले नाहीं लेखा । ऐकतां भीष्म आवेशे ॥ १२७ ॥
प्रतापें जिंकोनि स्वयंवरीं । आणिल्या काशीश्वराच्या कुमारी ।
शाण्णव कुळींचे ते अवसरीं । राजे युद्धासी प्रवर्तले ॥ १२८ ॥
वातापुढें जलदजाळ । तैसे राजे विभांडिले सकळ ।
त्यांमाजी शाल्वें तुंबळ । युद्ध केलें भीष्मासीं ॥ १२९ ॥
महापंडितापुढें युक्ती । अबलांच्या जेवीं न चलती ।
तैशी शाल्वाची झाली रीती । पाठ दावूनि चालिला ॥ १३० ॥
असो विजयी झाला देवव्रत । कुंजरपुरा पातला त्वरित ।
कन्या सत्यवतीहस्तीं ओपित । कनिष्ठ बंधूकारणें ॥ १३१ ॥
विवाहारंभीं ते काळीं । वडिल अंबा काय बोलिली ।
शाल्वापाशीं वृत्ति गुंतली । मनीं घातली त्या माळ ॥ १३२ ॥
ऐसें ऐकतां जाह्नवीसुत । अंबेसी रथीं बैसवित ।
संगें सेना देऊनि बहुत । शाल्वापाशीं पाठविली ॥ १३३ ॥
भीष्में शाल्व विभांडिला । तेणें खेद परम पावला ।
तों दळभारेंसीं ते वेळां । अंबा आली शाल्वापाशी ॥ १३४ ॥
सभेंत बोले येऊन । तुझे ठायीं गुंतलें माझें मन ।
मी भीष्माचा निरोप घेऊन । आळें तुज वरावया ॥ १३५ ॥
शाल्व म्हणे तुज जिंकून । गेला गंगात्मज घेऊन ।
मज युद्धीं पराभवून । नेलें जाण तुजलागीं ॥ १३६ ॥
आतां गेलिया हा प्राण । तुजशीं न करीं कदा लग्न ।
एकें स्पर्शितां अन्नपात्र पूर्ण । इतरां जाण उच्छिष्ट तें ॥ १३७ ॥
परम खेद पावोन । अंबा निघाली तेथून ।
कुंजरपुरालागून । येती जाहली फिरोनियां ॥ १३८ ॥
इकडे अम्बिका अंबालिका दोनी । व्यासादि ऋषि बोलावूनी ।
विचित्रविर्याशीं लग्न लावूनी । भीष्म करी सोहळा ॥ १३९ ॥
संपादिले चार्‍ही दिन । तो अंबा आली परतोन ।
म्हणे मी माळ घालीन । गंगात्मजा तुजलागीं ॥ १४० ॥
शाल्व न वरी मजलागून । तुवां मज आणिलें हिरोन ।
मी तुझी भाजा होईन । वाढवीन वंशातें ॥ १४१ ॥
भीष्म म्हणे मातेसमान । तुजसहित सर्व स्त्रिया जाण ।
ऊठ जाईं येथून । आपुलिया पितृगृहा ॥ १४२ ॥
भीष्म धिक्कारितां जाण । जाहला परम अपमान ।
मग एकलीच अंबा निघोन । बदरिकाश्रमाप्रति गेली ॥ १४३ ॥
तप करुन खडतर । प्रसन्न केला रेणुकापुत्र ।
जेणें एकवीस वेळां सर्वत्र । कुंभिनी केली निःक्षत्रिया ॥ १४४ ॥
प्रसन्न जाहला जामदग्न्य । येरी सांगे सर्व वर्तमान ।
तुझां शिष्य गंगानंदन । वर देईं करुनियां ॥ १४५ ॥
मग अंबेस घेऊन सांगातें । भार्गव आले गजपुरातें ।
समाचार कळतां गंगात्मजातें । येत सामोरा गजरेंसी ॥ १४६ ॥
करुनियां सष्टांग नमन । नगरांत आणिला भृगुनंदन ।
रत्‍नाभिषेक करुन । सर्वोपचारें पूजिला ॥ १४७ ॥
मग म्हणे परशुधर । ईस वरीं तूं सत्वर ।
भीष्म बोले जोडूनि कर । सर्व स्त्रिया माझ्या माता ॥ १४८ ॥
परम कोपला जामदग्न्य । मोडिसी माझें आज्ञावचन ।
मजशीं करीं युद्धकदंन । किंवा लग्न लावीं इशीं ॥ १४९ ॥
भीष्म बोले धरुन चरण । मी अवश्य युद्ध करीन ।
मग सिद्ध करुन दोन स्यंदन । नगराबाहेर पातले ॥ १५० ॥
एक रथ आणि सारथी । दिधला मग भार्गवाप्रती ।
आपण बैसला दुजे रथीं । महाव्रती भीष्म बोले ॥ १५१ ॥
म्हणे स्वामींनीं टाकावे बाण । तों भार्गवें चाप ओढून ।
दोन शर सोडून । भुजा दोन्ही भेदिल्या ॥ १५२ ॥
भीष्म उतरुन रथाखालता । गुरुचरणीं ठेवी माथा ।
म्हणे क्षत्रियाचे बाण आतां । केवीं साहसी विप्रवर्या ॥ १५३ ॥
पुढती रथावरी बैसोन । युद्ध करी गंगानंदन ।
पांच बाणीं संपूर्ण । शरीर भेदिलें भार्गवाचें ॥ १५४ ॥
तेवीस दिवसपर्यंत । युद्ध जाहलें अत्यद्‍भुत ।
मेरु मांदार भिडत । तेवीं दोघे दिसती हो ॥ १५५ ॥
कीं इंद्र आणि चंद्र जाण । कीं रमानाथ आणि उमारमण ।
शस्त्रजाळें संपूर्ण । भरिती गगन दोघेही ॥ १५६ ॥
कीं सागर आणि अंबर । किंवा वासुकी आणि सहस्त्रवक्त्र ।
कीं वसिष्ठ आणि विश्वामित्र । तैसे दोघे भीडती ॥ १५७ ॥
कौतुक पाहती निर्जर । भीष्में भार्गव केला जर्जर ।
हृदयीं खडतरतां निर्वाण शर । ध्वजस्तंभीं टेंकला ॥ १५८ ॥
ऐसें गंगात्मजें देखोन । धावला सद्‌गद होऊन ।
नेत्रांस जीवन लावून । घाली पवन स्वहस्तें ॥ १५९ ॥
सावध जाहला परशुधर । हृदयीं धरिला गंगापुत्र ।
म्हणे माझी विद्या समग्र । तुझे ठायीं बिंबली ॥ १६० ॥
पुनः म्हणे परशुराम । पूर्ण जाहला माझा नेम ।
अंबे तूं पितृगृहास जाईं परतोन । देह दंडून करीं तप ॥ १६१ ॥
गजपुरांत आला भीष्म । स्वस्थानीं गेला भार्गवराम ।
मग त्या अंबेनें परम । घोरवन सेविलें ॥ १६२ ॥
म्हणे भीष्माचा घेईन प्राण । घोर तप आचरोन ।
मग योगसाधन करुन । देह टाकिला अंबेनें ॥ १६३ ॥
इकडे द्रुपद त्रिनेत्र । प्रसन्न करुन मागे पुत्र ।
मग बोलिला पंचवक्त्र । ऐक सादर जनमेजया ॥ १६४ ॥
पूर्वीं स्त्री मग पुरुष जाण । ऐसा होईल तुज नंदन ।
तीच अंबा स्त्री होऊन । द्रुपदोदरीं जन्मली ॥ १६५ ॥
शिखंडी नाम ठेवित । लोकांत गुप्त केली मात ।
पुरुषवेष त्यास देत । जाहला सुत थोर तो ॥ १६६ ॥
दशार्णदेशींचा हिरण्यनृपती । त्याची कन्या केली शिखंडीप्रती ।
लग्न जाहल्या एकांतीं । स्त्री पातली भोगकामा ॥ १६७ ॥
नाहीं पुरुषत्व कामविकार । ओळखिलें स्त्रीशरीर ।
राजकन्या उठोनि सत्वर । जात माहेरा आपुल्या ॥ १६८ ॥
सांगे पित्यास वर्तमान । तेणें दळ सिद्ध करुन ।
पांचालपुरास येऊन । आरंभिलें भांडण द्रुपदाशीं ॥ १६९ ॥
म्हणे स्त्रीचा करुन सुत । कैसा केला अनर्थ ।
मी करीन तुझा घात । कीं माझा प्राण वेंचीन ॥ १७० ॥
इकडे शिखंडीनें रात्रीं उठोन । पळत घेतलें घोर आरण्य ।
एकांतीं करिता रोदन । तों कुबेरगण पातला ॥ १७१ ॥
त्याचें नाम स्थूलकरण । पुसता झाला शिखंडीलागून ।
तेणें जाहलें तें मूळींहून । वर्तमान निवेदिलें ॥ १७२ ॥
स्थूलकरण म्हणे तुझें स्त्रीपण । मी घेतों आठ दिवस जाण ।
माझें पुरुषत्व तूं घेऊन । कार्य संपादीं जाऊनि ॥ १७३ ॥
मग स्त्रीपण देऊन त्यासी । पुरुष होऊन आला नगरासी ।
वर्तमान सांगे द्रुपदासी । येरु मनीं संतोषला ॥ १७४ ॥
मग हिरण्याकडे पाठविले चार । म्हणे पाहें येऊन समाचार ।
माझा पुरुष असतां पुत्र । काय विचार मानिला ॥ १७५ ॥
पाहती स्त्रिया पाठवून । तों शिखंडी देखिला जेवीं मदन ।
जाहलें स्त्रीचें समाधान । सेना घेऊन श्वशुर गेला ॥ १७६ ॥
लोटलिया आठ दिवस । शिखंडी गेला कुबेरवनास ।
उदया आलें भाग्य विशेष । वैश्रवण आला कानना त्या ॥ १७७ ॥
तों स्थूलकरण स्त्रीवेष धरुन । बैसला लज्जित आकर्षून ।
कुबेर जाणोन हें वर्तमान । शाप देता जाहला ॥ १७८ ॥
शिखंडीचा होय जों देहांत । तोंवरी असो त्यास पुरुषत्व ।
तूं स्त्री होऊन बैस येथ । वचन असत्य नव्हे कदा ॥ १७९ ॥
तों शिखंडी येऊन । धरित कुबेराचे चरण ।
येरु म्हणे पुरुषत्वेंकरुन । सुखें नांदें निजगृहीं ॥ १८० ॥
शिखंडी आला परतोन । पितयास सांगे वर्तमान ।
सदाशिव जाहला पूर्वीं प्रसन्न । चरित्र जाण त्याचें हें ॥ १८१ ॥
एवं भीष्मवध कल्पून मनांत । अंबा शिखंडी जाहला सत्य ।
सिंहावलोकनें समस्त । कथा ऐकें मागील ॥ १८२ ॥
उभयदारांसहित । विचित्रवीर्य क्रीडत ।
पुढें संतान नसतां अकस्मात । रोग रायातें लागला ॥ १८३ ॥
उदंड वैद्य आणून । भीष्म करी औषधप्रयत्‍न ।
परी आयुष्यसूर्य अस्तमान । पावता झाला ते काळीं ॥ १८४ ॥
विचित्रविर्य पावतां मरण । सत्यवती आणि गंगानंदन ।
शोकार्णवीं जाहलीं निमग्न । वंशसंतान बुडालें ॥ १८५ ॥
उत्तरकार्य संपूर्ण । करिता जाहला गंगानंदन ।
सत्यवती करी रोदन । भीष्मकंठीं झोंबोनि ॥ १८६ ॥
मग भीष्में विवेकयुक्तीं । शांत केली सत्यवती ।
माता भीष्मास म्हणे एकांतीं । वंश वाढवीं पुढारां ॥ १८७ ॥
तूं आपलें करुन लग्न । वाढवीं वंशसंतान ।
भीष्म म्हणे मातेसमान । नारीमात्र सर्वही ॥ १८८ ॥
चळती मेरु आनि मांदार । वरुणदिशे उगवे मित्र ।
मर्यादा सोडिल सागार । परी नेम माझा टळेना ॥ १८९ ॥
वायु पडे मोडून चरण । कुंभिनी सांडील सह्स्त्रवदन ।
परी माझें नेमवचन । न टळे माते कल्पांतीं ॥ १९० ॥
तरी आपत्कलीं आपद्धर्म साचार । पूर्वींच स्थापिती शास्त्रकार ।
प्रार्थूनियां ऋषीश्वर । क्षत्रियकुलें वाढवावीं ॥ १९१ ॥
एकवीस वेळ निःक्षत्री । परशुरामें केली धरित्री ।
मग राजांगनांनी ब्राह्मण श्रोत्री । प्रार्थूनियां वश केले ॥ १९२ ॥
सतवती म्हणे भीष्मास । तुज सांगतें ऐक रहस्य ।
कुमारीदशेंत जाहला व्यास । यमुनाद्वीपीं मजपासूनी ॥ १९३ ॥
महायोगी पराशर । सुगंध केलें माझें शरीर ।
कुमारीत्व न मोडतां साचार । व्यास महाराज जन्मला ॥ १९४ ॥
तरी तयासी प्रार्थून । वाढवावें वंशसंतान ।
ऐसें ऐकतां गंगानंदन । आनंदें टाळी पिटीत ॥ १९५ ॥
म्हणे माते न लावीं व्यवधान । प्रार्थीं आतां कृष्णद्वैपायन ।
येरी करपाद प्रक्षालून । करी ध्यान व्यासाचें ॥ १९६ ॥
निशांतीं प्रकटे आदित्य । कीं कुंडांतून निघे आराध्यदैवत ।
तैसा सत्यवतीपुढें प्रकट । साक्षात व्यास नारायण ॥ १९७ ॥
चंद्र सूर्य कृशान । एके ठायीं जाहले संपूर्ण ।
तैसें स्वरुप देदीप्यमान । पाहतां मन निवतसे ॥ १९८ ॥
अवलोकितां व्यासध्यान । दुःखदोष जाय विरोन ।
ज्याचें करितां स्मरण । सकल विघ्नें नासती ॥ १९९ ॥
भीष्में धरिले दृढ चरण । मग तो कृष्णद्वैपायन ।
मातेस करी नमन । म्हणे स्मरण कां केलें ॥ २०० ॥
म्हणे पुत्रा संकट पडलें । म्हणोनि तुज बोलाविलें ।
दोघे अनुज तुझे पडले । कालानलीं जाऊनि ॥ २०१ ॥
तुटला वंश खुंटलें संतान । तुज अधिकार असे पूर्ण ।
तरी देऊनि वीर्यदान । पुत्रवती करीं दोघींस ॥ २०२ ॥
भारतवल्ली खंडोन । गेली विचित्रवीर्यापासून ।
तरी शुक्रजीवन घालून । वृद्धि पुढें करावी ॥ २०३ ॥
अवश्य म्हणे कृष्णद्वैपायन । शुचिर्भूत स्त्रिया होऊन ।
माझें तेज परम दारुण । साहिलें पाहिजे निर्भयें ॥ २०४ ॥
सत्यवती म्हणे सुता । तूंचि तयांस धैर्यदाता ।
उशीर न लावीं आतां । फलोत्पत्ति होऊंदे ॥ २०५ ॥
एकांतीं आसन घालूनी । व्यास बैसले अनुष्ठानीं ।
मध्य झालिया निशीथिनी । स्नुषेस सांगे सत्यवती ॥ २०६ ॥
करुनियां मंगलस्नान । करावें हरिहरपूजन ।
देऊनियां अपार दान । विप्रभोजन मनेच्छा ॥ २०७ ॥
तैसेंच करी अंबिका । चातुर्यकासारमरालिका ।
कीं चढत चालिली कनकलतिका । व्यासकल्पद्रुमावरी ॥ २०८ ॥
उग्र तेज देखतां वेगीं । कंप सुटला अंबिकेलागीं ।
व्यास प्रवर्तले सुरतसंगीं । नयन झांकी नारी ती ॥ २०९ ॥
वीर्य निक्षेपून उदरीं । वेदव्यास आले बाहेरी ।
जननी म्हणे व्यासा सांग निर्धारीं । पुत्र कैसा उपजेल ॥ २१० ॥
व्यास म्हणे सुत सुलक्षण । नवनागसहस्त्रबली पूर्ण ।
परी इणें भयें झांकिले नयन । पुत्रहि अंध होईल ॥ २११ ॥
सत्यवती म्हणे कर्म गहन । अंधास काय राज्यासन ।
मग म्हणे सुता कृपेंकरुन । अंबालिकेस पुत्र देईं ॥ २१२ ॥
निकें म्हणोन परशारनंदन । तत्काल पावला अतंर्धान ।
तों धृतराष्ट्र जन्मला चक्षुहीन । नवनागसहस्त्रबली ॥ २१३ ॥
पुत्र देखतां दृष्टीं । सत्यवती झाली कष्टी ।
मग म्हणे कैसी करावी गोष्टी । धांवें जगजेठी व्यासदेवा ॥ २१४ ॥
तत्काल प्रकटला कृष्णद्वैपायन । बैसला एकांतीं जाऊन ।
अंबालिका श्रृंगार करुन । तयाजवळी पातली ॥ २१५ ॥
नृसिंह देखतां इंदिरा । कांपूं लागली थरथरां ।
तैसी भोगा प्रवर्ततां सुंदरा । व्यास तेज न सोसे ॥ २१६ ॥
शरीर जाहलें पांडुरवर्ण । बाहेर आले भोग देऊन ।
माता म्हणे बोले वचन । सुलक्षणी पुत्र कैसा तें ॥ २१७ ॥
परम सुलक्षण राजपुत्र । होईल धर्मात्मा अति पवित्र ।
मातृदोषें शरीर । कर्पूर वर्ण होईल ॥ २१८ ॥
धृतराष्ट्रस शतपुत्र । पंडूस होतील पांच कुमार ।
त्या पांडवांस श्रीकरधर । साह्य होईल सर्वस्वें ॥ २१९ ॥
व्यास स्वस्थाना पावत । पुढें अंबालिका जाहली प्रसूत ।
कर्पूरगौर तैसा सुत । पंडुराज जन्मला ॥ २२० ॥
सर्व लक्षणीं संपूर्ण । परी बाल देखतां पांडुरवर्ण ।
सत्यवती स्मरे व्यासालागून । तत्काल प्रकटला जगदगुरु ॥ २२१ ॥
म्हणे एक अंध एक पांडुरवर्ण । अंबिकेस पुनः भोग देऊन ।
तृतीय पुत्र सुलक्षण । निर्मीं आतां गुणालया ॥ २२२ ॥
कुमारीदशेंत जाहला म्हणोनी । एकांतीं बैसला काननीं ।
कानीन म्हणती व्यासालागूनी । अर्थ पूर्ण हाचि असे ॥ २२३ ॥
अंबिकेस सांगे सत्यवती । तूं जाईं धैर्य धरीं एकांतीं ।
अवश्य म्हणोनि ते दासीप्रति । श्रृंगार करुन पाठवित ॥ २२४ ॥
तेज न सोसे आपणासी । म्हणोन पाठविलें दासीसी ।
तंव ते आनंदमय मानसीं । सुरतानंदें रिझवीत ॥ २२५ ॥
न धरी उग्रतेचें भय । कायावाचामनें पाहे ।
संतोषविला ऋषिवर्य । स्तवनें अंगमर्दनें ॥ २२६ ॥
परिचारिका जातिहीन । हृदयीं निर्मल शुद्ध मन ।
दिघींपरीस तिचे संगेकरुन । सुखी झाला श्रीव्यास ॥ २२७ ॥
बाहेर आला कानीन । माता पुसे पुत्रालागून ।
तो म्हणे भक्तराज होईल पूर्ण । परि क्षेत्र पालटलें ॥ २२८ ॥
आतां सीमा जाहली येथून । गुप्त जाहला द्वैपायन ।
पुढें विदूर जन्मला पूर्ण । त्रिकालज्ञानी भक्त जो ॥ २२९ ॥
सर्व गुणीं पुरता । जन्मला हा ऐसा क्षत्ता ।
धर्माचा अवतार तत्त्वतां । विवेकी आणि निपुण पैं ॥ २३० ॥
मांडव्यें शाप दिधला । म्हणोनि दासीउदरीं जन्मला ।
जनमेजय म्हणे ते वेळां । शापाचा काय हेतु ॥ २३१ ॥
वैशंपायन म्हणे ऐक सादर । मांडव्य महाराज मुनीश्वर ।
तरुतलीं उभा निरंतर । एके चरणीं एकांतवनीं ॥ २३२ ॥
ऊर्ध्वबाहु उभा अहोरात्र । तों नृपभांडारीं पडले तस्कर ।
वस्तु हरिल्या अपार । पळती सत्वर तेथूनियां ॥ २३३ ॥
पाठीं धांवतीं राजदूत । तस्कर जाहले भयभीत ।
ऋषीचे पाठीशीं लपत । संकोचित होऊनियां ॥ २३४ ॥
मांडव्य हें कांहीं नेणे । तंव तेथें आलें धांवणें ।
म्हणती चोर संग्रहिले येणें । तापसीवेषें मैंद हा ॥ २३५ ॥
तस्करांसहित मांडव्यासी । मारीत आणिलें राजद्वारासी ।
शूलीं घातला महर्षी । तस्करांसहित राजाज्ञें ॥ २३६ ॥
शूलीं घातला तपोधन । परी योगबलें रक्षिला प्राण ।
तैसाच करी अनुष्ठान । शूलीं आसन चळेना ॥ २३७ ॥
तों पक्षिवेषें सखेद मुनी । पुसती मांडव्यालागूनी ।
कवण्या कर्मेंकरुनी । पावलासि यादुःखा ॥ २३८ ॥
येरु म्हणे अन्याय नसतां मातें । शूलीं दिधलें नृपनाथें ।
हेर सांगती रायातें । ऋषि नेणता दंडिला ॥ २३९ ॥
राजा धांवला सपरिवारीं । मांडव्या देखोन रोदन करी ।
म्हणे नेणतां अपराध निर्धारी । मज घडला ऋषिवर्या ॥ २४० ॥
मग सूत्रधारी आणूनी । शूल काढी कर्वतूनी ।
ऋषि तत्काल देह त्यागूनी । यमपुरीस पातला ॥ २४१ ॥
यमास म्हणे ते वेळीं । मज कां तुवां दिधलें शूलीं ।
येरु म्हणे पतंगी कां घातली । कंटकाग्रीं पूर्वीं तुवां ॥ २४२ ॥
त्याचि दोषें सबल । तुज प्राप्त जाहला शूल ।
ऋषि कोपला तत्काल । शाप देत यमातें ॥ २४३ ॥
दोष बहुत लहान । मेरुहून दंड गहन ।
परम हिंसक तूं दुर्जन । जगद्‍भक्षक दुष्टात्मा ॥ २४४ ॥
दासीपोटीं तुज हो जनन । वर्तसी दरिद्रेंकरुन ।
यम धरी मग चरण । उश्शापवचन बोलावें ॥ २४५ ॥
उपजसी व्यासवीर्येंकरुनी । परि महाभक्त त्रिकालज्ञानी ।
रत होशील कृष्णभजनीं । पंडिताचार्य विवेकी ॥ २४६ ॥
म्हणोनि महाज्ञानी विदुर । व्यासवीर्यें धर्मावतार ।
पुढें कथा परम सुंदर । ब्रह्मानंदें परिसिजे ॥ २४७ ॥
ब्रह्मानंदा यतिवर्या । श्रीधरवरदा पंढरीराया ।
पांडवपालका करुणालया । जगदुद्धारा जगदगुरो ॥ २४८ ॥
सुरस पांडवप्रतापग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । षष्ठाध्यायीं कथियेला ॥ २४९ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रतापग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
वंशावलि भीष्माची जन्ममात । धृतराष्ट्रपंडुविदुरांची ॥ २५० ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
अद्याय सहावा समाप्त



GO TOP